बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

आमुच्या बागेत व्हा लडिवाळ तुम्ही पाखरे


पूर्वीपेक्षा झाडं कमी झाली, चिमण्या आणि इतर पक्षी दिसणं दुर्मिळ झालं असं म्हणतात आणि ते खरंही आहे. पण गंमत म्हणजे मला लहानपणी दिसले, भेटले त्यापेक्षा कितीतरी जास्त पक्षी आता रोज भेटतात. माझ्या मुलीला ८ वर्षाच्या वयात जेवढे पक्षी रोज दिसतात, तेवढे त्या वयात मला ऐकूनही माहीत नव्हते. माझ्या लहानपणी मी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी राहिले, तिथं आजुबाजूला जागा असली, तरी त्या काळी मी कुणाला झाडं लावताना पाहिलं नव्हतं – तसा काही विचारही बोलला, ऐकल्याचं आठवत नाही. आता “झाडं लावा” अशी निदान तोंडपाटीलकी करणारे तरी बरेच दिसतात.


तर सध्या माझ्याकडे मुनियांचं बाळंतपण सुरू आहे. हे आमच्याकडचं दुसरं. पहिलं बाळंतपण गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालं. ह्या मुनियांना मराठीत खरं तर ‘ठिपकेवाली मनोली’ असं नाव आहे. गेल्या खेपेला सुरुवातीला अचानक बागेत मुनिया दिसू लागल्या. एक-दोन दिवसांतच दिवसभर लिंबात खुडखुड सुरू केली. (हे बाल्कनीतल्या मोठ्या कुंडीत लिंबाचं कचऱ्यातून आपोआप उगवलेलं झाड. लिंबू आहे की मोसंबी हेही माहीत नाही. कारण अजून तरी त्याला काही फळ आलेलं नाही. हे जणू ह्या मुनियांसाठीच उगवून आलेलं आहे). पहिल्यांदाच मी त्यांची अशी धावपळ पाहिली. इवलुशा चोचीत गवताची लांबलचक पाती खालून आणत होत्या. एकजण आत जाऊन घरटं बांधतो/ते आणि दुसरा/री पाती आणून देतो आणि बाहेर राखणीला थांबतो. कोण 'ती' आणि कोण 'तो', ते काही कळत नाही. दोघे सारखेच दिसतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोरदार हे बांधकाम चालू होतं आणि दोनच दिवसांत घरट्याचा बऱ्यापैकी आकार दिसू लागला. एका पाईपच्या आडोशाला लिंबाच्या झाडात पटकन दिसणार नाही असं हे हिरव्या पात्यांचं वेटोळाकार घरटं. त्याला थोडंसं खालच्या बाजूला छोटंसं बीळ होतं, ये-जा करायला. चिमण्या सुद्धा मावणार नाहीत इतकं छोटं! त्यामुळे आतली अंडी आणि नंतर आलेली बाळं बाहेरून दिसायचा काही प्रश्नच नव्हता.





घरटं  बांधून झाल्यावर साधारण महिन्याने आतून चिवचिव ऐकू येऊ लागली आणि आम्हांला कळलं, की आत पिल्लं आहेत आता. आई-बाबा दोघं मिळून संगोपन करत होते. चोचीत खाऊ घेऊन येत, आधी थोड्या अंतरावर दांडीवर बसून इकडे-तिकडे बघून अंदाज घेत आणि मग हळुच घरट्यात शिरत. आई किंवा बाबा घरट्यात आला, की एकदम आवाज सुरू व्हायचा – गलका! असा आवाज ऐकायला येऊ लागल्यानंतर १२-१३ दिवसांनी अचानक एका सकाळी टवटवीत, उद्योगी पिल्लं बाल्कनीत उडताना, इकडे-तिकडे करताना दिसू लागली. माझ्या अपेक्षेपेक्षा बरीच मोठी होती, जवळ जवळ त्यांच्या आई-वडिलांएवढी! पंख फुटलेली, बाल्कनीतल्या बाल्कनीत उडता येणारी. फक्त त्यांच्या छातीवर पांढरे ठिपके नव्हते. एका कुंडीतून दुसरीत जा, काडी चोचीत धर, जोरजोरात कंठशोष करून बघ असा ह्या चौकस बाळांचा खेळ चालू होता आणि त्यामुळे आम्ही तर बाल्कनीत जाणंच बंद केलं होतं. मात्र एक उद्योगी बाळ चक्क आमच्या बैठकीच्या खोलीत येऊन बैठकीवर बसून गेलं! कसली भीती म्हणून ठाऊक नव्हती त्याला! मी दरवाजा सताड उघडून त्याच्या बाहेर जाण्याची वाट बघत बसले आणि साहेब जेव्हा सुखरूप स्वगृही परतले, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. दुसऱ्या एका पिल्लाने मला षोडशा देतात अगदी तशी स्टाईलमध्ये मागे वळून फोटोसाठी pose दिली आहे – अगदी नखरेल J .




पिल्लं बाहेर आल्यावर साधारण ३ दिवसांतच सगळी सामसूम झाली – पिल्लं आणि आई-बाबा सगळे रिकामं घरटं मागे ठेवून निघून गेले. यंदा पुन्हा जोडी आली, त्याच लिंबात नवं घरटं बांधायला. तेव्हा पाऊस विशेष झाला नव्हता आणि खाली फारसं गवत नव्हतं. त्यामुळे त्यांनी आमच्या गवती चहाची बरीच पाती वापरली. मोठ्या कष्टाने एकेक पातं तोडून घरटं बांधलं आहे, सध्या चिवचिव ऐकू येते आहे. लवकरच नवी बाळं हुंदडू लागतील..