पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

आशा न सोडता प्रश्न सोडवू या

  हॅना रिची यांच्या Not the End of the World (जगाचा शेवट आलेला नाही) या पुस्तकावरचा माझा लेख लोकसत्तेत आला आहे . प्रकाशित लेख इथे पाहता येईल. तोच इथे देत आहे .


ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या विदा (डेटा) संशोधन केंद्रात काम करणाऱ्या संशोधक हॅना रिची यांचे Not the End of the World (जगाचा शेवट आलेला नाही) असे पुस्तक याच वर्षी म्हणजे २०२४ मध्ये प्रकाशित झाले. हॅना मुख्यतः पर्यावरण, ऊर्जा, प्रदूषण, अन्न अशा विषयांवरच्या डेटावर काम करतात. पर्यावरणातल्या बदलांचा प्रश्न गंभीर आहेच आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरजही आहे. शासन-प्रशासनाला त्याचे पुरेसे गांभीर्य जाणवणे आणि  आपण आपल्या जीवनशैलीत तातडीने बदल करणे अत्यावश्यकच आहे. पण ह्या प्रश्नाची जाणीव किंवा माहिती देताना बरेचदा असे सांगितले जाते, की परिस्थिती आता हाताबाहेर गेलेली आहे आणि आता खूप उशीर झालेला आहे. प्रश्नाच्या राक्षसी रुपावर (तसे ते आहेच) लक्ष केंद्रित केले जाते. प्रश्न हा न सुटणाराच असेल आणि शेवटी सगळे लयालाच जाणार असेल, तर ते ऐकून माणूस निराश आणि निष्क्रिय होण्याखेरीज वेगळे काहीच घडत नाही. म्हणून प्रश्नाची व्याप्ती आणि गांभीर्य कमी न करता, प्रश्नांची उत्तरे कशी शोधली जात आहेत आणि कुठे कुठे प्रदूषण कमी करण्यात यश आले आहे ते विस्ताराने, आकडे देऊन सांगणारे हे आशावादी पुस्तक आहे.   


वायुप्रदूषण  - या शतकाच्या सुरुवातीला बीजिंग हे जगातले सगळ्यांत प्रदूषित शहर होते. पण चीनने मनावर घेतले आणि २०१३ ते २०२० या काळात बीजिंगचे वायुप्रदूषण ५५% ने तर चीनचे  वायुप्रदूषण ४०% ने कमी झाले. एकेकाळी म्हणजे १९५२ मध्ये लंडनचे वायुप्रदूषण आजच्या दिल्लीपेक्षा जास्त होते आणि धुरके वाढून ४ दिवसांमध्ये १०,००० लोक मृत्यू पावले होते! आताच्या लंडनची हवा कितीतरी पटीने स्वच्छ आहे. आर्थिक प्रगती होऊनही वायुप्रदूषण कमी करता येते अशी ही उदाहरणे आहेत. या उदाहरणांवरून दिसते आहे, की हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे इतर देशांनीही हा प्रश्न मार्गी लावावा, असे लेखिकेचे म्हणणे आहे. गरिबीतून बाहेर येताना आधी वायुप्रदूषण वाढते, मग सहन करण्यापलीकडे जाते आणि लोकांचा दबाव वाढल्यावर सरकारला ते कमी करायचे उपाय योजावेच लागतात. ओझोनचे छिद्र, आम्ल-वर्षा (acid rain) असे प्रश्न गांभीर्याने घेतल्यावर सोडवता आले, तसा हाही सुटणारा प्रश्न आहे आणि सोडवायला हवा, असे लेखिका म्हणते.        


पर्यावरणातला बदल (वाढते तापमान) - आपण जे उष्णता-धारक वायू वातावरणात सोडतो, त्यांचे प्रमाण अजूनही दरवर्षी वाढतेच आहे. पण दरडोई उत्सर्जन हळूहळू कमी होऊ लागले आहे, ही जमेची बाजू आहे. जगात अमेरिकेची लोकसंख्या ४% आहे आणि त्यांचा उत्सर्जनातला वाटा मात्र  १४% आहे. अमेरिकेएवढाच राहणीमानाचा दर्जा असूनही स्वीडनचे दरडोई उत्सर्जन अमेरिकन माणसाच्या २५% च आहे. म्हणजेच उत्सर्जन कमी करायचा मार्ग उपलब्ध आहे. इंग्लडसारख्या देशांना आर्थिक विकासाची कर्ब-उत्सर्जनाशी असलेली जोडी तोडण्यात यश आलेले  आहे. त्यांचा उपकरणांचा वापर वाढला असला तरी उत्सर्जन कमी झालेले आहे. नवीन हरित-तंत्रज्ञान दिवसेंदिवस स्वस्त होत आहे. गेल्या काही दशकांत सौरऊर्जा ८९% ने तर पवनऊर्जा ७०% ने स्वस्त झाली आहे. आता गरीब देशही हे तंत्रज्ञान वापरून आर्थिक प्रगती करू शकतात. २०१४ साली उरुग्वेत पवनऊर्जेचा वापर फक्त ५% होता, आज तो ५०% झाला आहे. त्याच काळात चिलीमध्ये सौरऊर्जा शून्य होती आणि आज ती १३% झाली आहे. लेखिकेने सकारात्मक माहिती आणि आकडेवारी देऊन “वाढत्या तापमानाला आळा घालणे शक्य आहे आणि त्या दिशेने काम करायला हवे”, असे म्हटले आहे. अर्थातच, श्रीमंत देशांनी यासाठी गरीब देशांना मदत करावी असेही म्हटले आहे.     


जंगलतोड    -  जंगलतोडीचे सगळ्यांत मुख्य कारण शेती आणि त्यातही गोमांस आहे, हे आकडे देऊन स्पष्ट केलेले आहे. बऱ्याच लोकांना वाटते, की अन्नाच्या जागतिक व्यापारामुळे जंगलतोड वाढत आहे. पण ७१% अन्न हे स्थानिक बाजारातच विकले जाते. त्यामुळे श्रीमंत देशांनी स्वतःचे अन्न स्वतः पिकवून हा प्रश्न सौम्य होईल, पण सुटणार नक्कीच नाही. बऱ्याच लोकांना असेही वाटते, की पाम तेलावर बहिष्कार घालून निर्वनीकरणाला चाप बसेल. पण पाम तेलाऐवजी दुसरे तेल वापरले, तर प्रश्न अजूनच गंभीर बनेल. एका हेक्टरमधून २.८ टन पाम  तेल निघते तर नारळाचे तेल हेक्टरी ०.२६ टन म्हणजे दहा पटीने कमी निघते. ऑलिव्हचेही कमीच निघते. म्हणजेच पाम ऐवजी वेगळे तेल वापरले तर जास्त जमीन लागेल आणि जंगलतोड अजूनच वाढेल. म्हणून तेलाचा वापर कमी करणे आणि पामची लागवड पर्यावरण-स्नेही करणे ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. जंगलतोडीला कारणीभूत उत्पादनांमध्ये ४१% गोमांस, १८% तेलबिया आणि १३% कागदाचा वाटा आहे. म्हणून ह्या उत्पादनांकडे लक्ष देऊन ते कमी करायला हवे.  अमेरिका, युरोप आणि आशियात हरित क्रांती झाली आणि शेतीतले उत्पन्न कितीतरी पटीने वाढले. आफ्रिकेतले एकरी उत्पन्न त्या प्रमाणात वाढले नाही. तिथली जंगलतोड थांबवायची असेल तर तिथे शेतीच्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करावी लागेल. त्याखेरीज जंगले राखायला प्रोत्साहन म्हणून श्रीमंत देशांनी गरीब देशांना काही मदत देऊ करावी, असेही लेखिकेने म्हटले आहे. 


अन्न - हरितक्रांती आणि रासायनिक खतांच्या उल्लेखाशिवाय अन्नाबद्दलची चर्चा होऊच शकत नाही, असे लेखिकेचे मत आहे. हरितक्रांती घडली नसती, तर आज आपण जगातल्या फक्त निम्म्या लोकसंख्येला अन्न पुरवू शकलो असतो. आज जगातल्या १०% लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही तर ४०% लोक हे जास्त खाऊन स्थूल झालेले आहेत. मनुष्याच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थूलता हा भुकेपेक्षा मोठा प्रश्न होऊन बसला आहे. आपण दरवर्षी आपल्या गरजेच्या दुप्पट धान्य पिकवतो. माणूस दरवर्षी ३ अब्ज टन धान्य पिकवतो आणि त्यातले ४१% गुरांना (मुख्यतः मांसासाठी) तर ११% इंधनासाठी वापरतो. सोयाचे ७५% उत्पादन हे गुरांना खायला वापरले जाते. (गरीब देशांमध्ये मात्र ९०% धान्य हे माणसांसाठीच वापरतात.) त्यामुळे जगातला मांसाहार कमी करणे हे खूप महत्त्वाचे आहे. जंगलतोडीचे सगळ्यात महत्त्वाचे कारण शेती आहे आणि ७५% शेतजमीन ही गुरांना चरण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी धान्य पिकवायला वापरली जाते! स्थानिक अन्न खाणे चांगलेच, पण स्थानिक मांस खाण्यापेक्षा आयात केलेली फळे बरी, असे लेखिकेने आकडेवारी देऊन सांगितले आहे. तसेच स्वीडनसारख्या देशाने टोमॅटो आयात करण्याऐवजी   हरितगृहांचा उपयोग करून देशातच त्याचे पीक घेतले तर १० पट जास्त ऊर्जा लागेल. म्हणून स्थानिक अन्नाचा आग्रह धरताना तारतम्य बाळगावे, असे लेखिकेला वाटते. जैविक शेतीबद्दल दोन मतप्रवाह आहेत. जैविक शेतीच्या परिसंस्था रासायनिक शेतीपेक्षा जास्त चांगल्या असतात म्हणून जैविक शेती चांगली, असा एक प्रवाह आहे. तर जैविक शेतीचे उत्पन्न कमी येते आणि त्यामुळे शेतीसाठी जास्त जमीन लागून परिसंस्थांचा जास्त नाश होतो, असा दुसरा मतप्रवाह आहे. दोन्ही बाजूंनी अभ्यास होत आहे आणि नक्की काय चांगले तो निर्णय इतक्यात घेता येत नाही, असे लेखिकेला वाटते.       


घटणारी जैवविविधता - निसर्गातल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या साखळ्या आणि अवलंबन हे गुंतागुंतीचे असते. एकच भाग सुटा करून त्याचा उपयोग किंवा मोल लक्षात येत नाही. त्यामुळे माणसाला जैवविविधतेचे महत्त्व आणि परिणाम पटकन लक्षात येत नाहीत आणि आपण तिचा नाश करत राहतो. माणसाने बऱ्याच सस्तन प्राण्यांना नामशेष केले आहे. आज जगातल्या सर्व सस्तन प्राण्यांचे वजन केले, तर त्यात माणसाचे ३४%, गायींचे ३५%, डुकरांचे १२% आणि जंगली जनावरांचे फक्त ४% आहे. माणूस आणि माणसाने पाळलेल्या प्राण्यांनी बाकी सर्व प्राण्यांना धोका निर्माण केलेला आहे. कितीतरी कीटक नामशेष झाले आहेत आणि होत आहेत. त्यांची मोजणी करणे आणि तपशील ठेवणे तर खूपच अवघड आहे. गेल्या ५०० वर्षांत ज्या गतीने जीव नामशेष होत आहेत, ते पाहिल्यास आपण आता पुढच्या सामूहिक विलोपनात (mass extinction) आहोत असे वाटते. पण त्याच वेळी माणूस हे थांबवायला सक्षम आहे, हेही खरे.  आशियातले आणि आफ्रिकेतले हत्ती, निळे देवमासे (blue whales) हे सर्व संपून जाण्याच्या मार्गावर होते. पण वेळीच आपण सुधारणा केल्या आणि आता त्यांची संख्या वाढू लागली आहे.  १९८० साली भारतात १५,००० हत्ती होते, आज ३०,००० आहेत. अशाच प्रकारे युरोप आणि अमेरिकेत रानगव्यांना (bisons) वाचविण्यात यश आले आहे. आपण जैवविविधता राखू शकतो. मात्र शिकार आणि शेती आटोक्यात ठेवली पाहिजे आणि ते शक्य आहे, असे लेखिकेला वाटते.   


प्लास्टिक - प्रशांत महासागरात प्लास्टिकचा भलामोठा पट्टा तरंगतो आहे. ३ फ्रान्स देश बसतील एवढा मोठा हा पट्टा आहे. जगात दरवर्षी ४६ कोटी टन प्लास्टिक तयार होते, त्यातील ३५ कोटी टनाचा कचरा होतो आणि त्यातले १० लाख टन समुद्रात जाते. समुद्रात जाणारे ८०% प्लास्टिक आशियातून जाते तर युरोपातून १% सुद्धा जात नाही. त्यामुळे सगळ्यांत जास्त महत्त्व हे आशियाई देशांमधून नद्या आणि समुद्रात जाणारे प्लास्टिक थांबवायला दिले पाहिजे. जे युरोपला शक्य आहे, ते इतर ठिकाणीही जमू शकते. लेखिकेने प्लास्टिकचा वापर आणि प्लास्टिकचे प्रदूषण या दोन्हीत फरक केला आहे. वापर कमी करावा लागेल, पण थांबवता येणार नाही असे लेखिकेचे म्हणणे आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या ऑक्सिजनच्या नळ्या, लस इथपासून ते वाहनांचे वजन (आणि म्हणून इंधन) कमी करणारे भाग अशा कितीतरी ठिकाणी प्लास्टिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे गरज नाही तिथे प्लास्टिक वापर बंद करणे आणि इतर ठिकाणी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हाच उपाय आहे असे मत लेखिका मांडते. कचरा व्यवस्थापनासाठी श्रीमंत देशांनी गरीब देशांना मदत केली पाहिजे, असेही म्हटले आहे. ‘मायक्रोप्लास्टिक’ सर्वत्र आढळते आणि ते टाळणे अशक्य झाले आहे हे मान्य केले असले तरी त्या तपशिलात जाणे मात्र लेखिकेने टाळले आहे.       


बेबंद मासेमारी -  १९६० च्या दशकात सात लाख देवमासे  (whales)  मारले गेले होते. आता गेल्या २-३ दशकांमधला आकडा मात्र २०,००० च्या खाली आला आहे. त्यांची संख्या पूर्ववत व्हायला बराच काळ जावा लागणार असला, तरी ते नामशेष होण्यापूर्वी आपण सुधारणा केली आहे. शाश्वत मासेमारी कशाला म्हणायचे ह्यावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत. “मासेमारी अशी करावी की माशांची संख्या इतकीही खालावू नये, की नंतर मासे मिळणे दुरापास्त होईल. मासेमारी टिकून राहील अशी माशांची अनुकूल पातळी टिकवणे म्हणजे शाश्वत मासेमारी” ही व्याख्या लेखिकेने गृहीत धरली आहे. यामध्ये माणसाने मासेमारी कारण्यापूर्वीच्या काळाच्या तुलनेत निम्मेच मासे टिकतील. पण ही व्याख्या जास्त व्यवहारी आणि जास्त लोकांना रुचेल अशी आहे. आजकाल जास्त मासे हे मत्स्यशेतीतून मिळवले जातात.  मासेमारीत होणारी वाढ ही मुख्यतः मत्स्यशेतीतली आहे हे लेखिकेने दाखवून दिले आहे. पूर्वी मत्स्यशेतीतल्या माशांना अन्न म्हणून मासेमारी केलेले खूप मासे लागत असत. पण आता हे प्रमाण कमी होऊन मत्स्यशेतीत वनस्पतींचे खाद्य वाढत आहे. पण नक्की किती? तर पुन्हा एकदा आपल्याला तपशील दिलेला आहे!  दरवर्षी आपण ९ कोटी टन मासे मासेमारी करून पकडतो. त्यातले फक्त ११% मत्स्यशेतीला खाद्य म्हणून जातात आणि मत्स्यशेतीतून उत्पादन मात्र १० कोटी टनांचे होते. युरोप आणि अमेरिकेत माशांची संख्या अनुकूल पातळीला टिकविण्यासाठी व्यवस्थित नियमन आणि देखरेख केली जाते. मात्र आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेत हे होत नाही. तिथे तातडीने सुधारणा आवश्यक आहेत. प्रवाळ आणि वाढत्या तापमानामुळे त्यांना वाढत असलेला धोका ह्यावरही लेखिकेने भाष्य केले आहे. पण इथे मात्र प्रवाळ वाचविणारी काहीच उदाहरणे नाहीत.मासे कमी खावेत, प्रत्येक देशाला आणि प्रत्येक बोटीला मासेमारीचा ठराविक हिस्सा (कोटा) असावा आणि तो कडकपणे पाळला जावा असे सुचवले आहे.  २०२० साली १०% समुद्रात मासेमारी-बंदी करणे अपेक्षित होते, ते ८% च झाले आहे. २०४४ पर्यंत ५०% समुद्र असा राखीव करणे अपेक्षित आहे.  


ह्या पुस्तकात मोठ्या प्रमाणावर आकडे, तक्ते आणि आलेख दिलेले आहेत. प्रत्येक मत साधार सांगितलेले आहे. ज्यांना असे आकडे आणि तपशील कंटाळवाणे वाटतात, त्यांना हे पुस्तक जरा अवघड जाऊ शकते. पुस्तक जास्त व्यवहारी आणि अडचणींमधून मार्ग काढायच्या दृष्टीने लिहिलेले आहे. पण व्यवहारी होताना कधी कधी ते सोयीचे होऊन जाते.  त्यामुळे पर्यावरणाची किंवा शाश्वत विकासाची व्याख्या सुद्धा अतिशय व्यवहारी, मनुष्यकेंद्री आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना आवडेल अशी आहे. निसर्गातला समतोल राखण्यापेक्षा मनुष्याच्या पुढच्या पिढयांना चांगल्या दर्जाचे जीवन मिळेल एवढा निसर्ग शाबूत ठेवणे, असा दृष्टिकोन दिसतो. अर्थात, व्यवहाराच्या अंगाने असल्या तरी “युक्तीच्या” आणि आशावादी चार गोष्टी सांगितल्या आहेत, त्या खूपच महत्त्वाच्या आहेत. 






शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

नामशेष होणारे अन्न

 Eating to Extinction ह्या पुस्तकाचा मी लिहिलेला परिचय महाराष्ट्र टाइम्समध्ये आला आहे. प्रकाशित लेख इथे पाहता येईल. तोच लेख इथे देत आहे.

   डॅन सालाडिनो हे पत्रकार आणि बीबीसीवर खाद्यपदार्थांचे कार्यक्रम प्रसारित करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे  गेल्या वर्षी Eating to Extinction (अन्न नामशेष करणारी खाद्यपद्धत) असे पुस्तक आले आहे. जगात दुर्मिळ होत चाललेले अन्नपदार्थ (त्यांच्या जाती) आणि ते वाचवण्याची आवश्यकता असा  ह्या पुस्तकाचा विषय आहे. जग जवळ आले आहे आणि त्यामुळे जगातल्या खाद्यपद्धतीत, खाद्यसंस्कृतीत एक प्रकारचा सारखेपणा, समानता येत चालली आहे. त्यातले वैविध्य आणि प्रादेशिक ओळख लोप पावते आहे. आपल्याला वाटते, की आपल्या पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा आपल्या खाण्यात कितीतरी वैविध्य आले आहे. अमेरिकेसारखे बर्गर, इटलीसारखा पास्टा आणि अवकाडोसारखी परदेशी फळे आता भारतात खाता येतात. आपल्या पूर्वजांना हे सगळे माहीतही नव्हते. पण खाण्यातले हे वैविध्य एकाच प्रकारचे आहे. जगभर एकाच ‘साच्यातले’ वैविध्य दिसते आहे. आता बऱ्याचशा देशांमध्ये तोच कोकाकोला, तोच पिझ्झाहट पिझ्झा मिळतो.


खाद्यपदार्थांमधले वैविध्य संपले म्हणजे काय? तर मनुष्यप्राण्याच्या आहारात पूर्वी ६००० वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश होता. आता माणसाच्या आहारातले निम्मे उष्मांक (कॅलरीज्) हे गहू, तांदूळ आणि मका ह्या ३ पदार्थांपासून येतात. त्यात बटाटा, साखर (ऊस आणि बीट), तेल ह्यांचा समावेश केल्यास माणसाचे ७५% उष्मांक अशा मोजक्या वनस्पतींपासून येतात. पूर्वी माणूस जिथे राहायचा तिथले हवामान, माती, पाणी, भौगोलिक परिस्थिती ह्यानुसार बदलणारी पिके, फळे, भाज्या आणि प्राणी त्याच्या आहारात असायचे. पण हरितक्रांतीनंतरचे जग आमूलाग्र बदलले आहे. जगातली बहुतेक बियाणे ही फक्त चार कंपन्यांच्या ताब्यात आहेत. जगभर दुधाचे चीज तयार करायला जे जीवाणू वापरतात त्यातले निम्मे फक्त एका कंपनीचे आहेत. पूर्वी प्रत्येक ठिकाणी चीज तयार करताना तिथले स्थानिक जीवाणू वापरले जायचे. जगात केळ्याच्या सुमारे १५०० जाती आहेत (आणि बऱ्याच नामशेष झाल्या आहेत). तरीही जगात पिकवली आणि विकली जाणारी निम्मी केळी ही कॅव्हेंडिश ह्या एकाच जातीची आहेत. जगातल्या दुग्धव्यवसायात बहुतांश गायी होलस्टाइन ह्या एकाच जातीच्या आहेत. असा साचेबद्ध आणि एकसुरीपणा मनुष्याच्या आहारात पूर्वी कधीच नव्हता. १९५० साली डेन्मार्कमध्ये २५०० वर्षांपूर्वीच्या मनुष्याचा मृतदेह बर्फाखाली चांगल्या अवस्थेत मिळाला, तेव्हा त्याच्या पोटातल्या खिरीमध्ये चाळीस वेगवेगळ्या झाडांच्या बिया आढळल्या! 

जंगलातल्या रानभाज्या, फळे, कंदमुळे ह्यात कितीतरी जास्त वैविध्य आणि पोषणमूल्य होते. आता पृथ्वीवरची एक तृतियांश जमीन लागवडीखाली आहे. त्यातली २५% पिकांसाठी आणि ७५% गुरांना चराईसाठी वापरली जाते. दिवसागणिक ही लागवडीची जमीन अजून अजून जंगले गिळंकृत करते आहे आणि एकाच वाणाची पिके आणि एकाच जातीचे प्राणी वाढवते आहे. ह्यातून जमिनीचा दर्जा खालावतो आहे, प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जाती  नामशेष होत आहेत, पोषणमूल्य आणि आहाराचा दर्जा खालावतो आहे आणि कितीतरी वनस्पतींची माहिती, खाद्यपदार्थ, पाककृती आणि वेगवेगळ्या चवी लयाला जात आहेत. वैविध्य घालवून एकाच वाणाची पिके घेतल्यामुळे संकटकाळ महाकठीण होणार आहे. सगळ्यात जास्त वापरली जाणारी जात एखाद्या नव्या रोगासमोर किंवा तापमान बदलामुळे तग धरू शकली नाही तर अन्नधान्याचा भीषण प्रश्न कसा उभा राहू शकतो, ते सालाडिनो स्पष्ट करतात. तीच गत प्राण्यांचीही होऊ शकते. 

प्रश्नाची ओळख करून दिल्यानंतर पुस्तकातल्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जगातल्या वेगवेगळ्या भागातले दुर्मिळ होत चाललेले अन्न, त्याचा इतिहास आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न, धडपडणारे लोक ह्याबद्दल सालाडिनो माहिती देतात. टांझानियाच्या जंगलातले मध, ऑस्ट्रेलियाच्या मूळ रहिवाशांचे मुख्य अन्न असलेले मरनॉन्ग नावाचे कंद आणि इथिओपियातून जगभर पोहोचलेली कॉफीची जंगली झाडे असा कितीतरी खजिना ते आपल्यापुढे उघडून ठेवतात. मेघालयातली ‘मेमांग नारंग’ नावाची संत्र्यासारखी फळं, तिथली जैवविविधता आणि तिथून जगभर पसरताना ‘नारंग’ शब्दात बदल होत होत तयार झालेला ‘ऑरेंज’ हा शब्द अशी कितीतरी माहिती आपल्याला थक्क करत राहते.  

सगळ्या गोष्टी सोप्या आणि सारख्या करण्याच्या अट्टहासामुळे पर्यावरण, शेती, खाद्यसंस्कृती, आहार, आरोग्य ह्या सगळ्यांवर कसा परिणाम होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा एकमेकींशी निगडित आहेत, ते ह्या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत विशद केले आहे आणि ते करताना जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतीतल्या वेगवेगळ्या दुर्मिळ पदार्थांची सफरही घडवली आहे. माणसाने पुन्हा फळे-कंदमुळे खाऊन राहावे, असे नाही. पण त्या पद्धतीतून जे शिकता आले ते जपणे, जैववैविध्य टिकवणे, वेगवेगळे अन्नपदार्थ जपणे आणि खाणे एवढे आपण नक्कीच करू शकतो.     


मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

ध्रुवीकरणाचे युग

साधना साप्ताहिक "कर्तव्यसाधना" असे पोर्टल चालवते. त्यावर माझा "ध्रुवीकरणाचे युग" हा लेख आला आहे.

प्रकाशित लेख इथे पाहता येईल. तोच लेख इथे देत आहे.


अमेरिकन  पत्रकार आणि संपादक एझ्रा क्लाईन ह्यांनी अमेरिकेत वाढत चाललेल्या राजकीय ध्रुवीकरणावर Why We’re Polarized - आपले  ध्रुवीकरण का झाले आहे - असे पुस्तक लिहिलेले आहे. पुस्तक अमेरिकन समाज आणि राजकारण ह्याबद्दल असले तरी ध्रुवीकरण जगात बऱ्याच ठिकाणी आणि आपल्याकडेही वाढलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचून अमेरिकेच्या संदर्भातले विवेचन समजून घेण्याची उत्सुकता होती. 


अमेरिकेत मुख्यतः दोन राजकीय पक्ष आहेत - डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. १९६० पूर्वी वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक गटांमधले लोक दोन्ही पक्षांमध्ये साधारण सारखेच विभागलेले होते आणि त्यामुळे कुठल्याच पक्षावर एखाद्या गटाची पकड नव्हती. दोन्ही पक्ष कुठल्याही विशिष्ट गटांना टोकाचा विरोध किंवा टोकाचे समर्थन देत नव्हते. पण डेमोक्रॅटिक पक्षाने नागरी हक्क कायदा संमत करून वर्ण, लिंग आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही अशी योजना केल्यापासून ध्रुवीकरणाला हळूहळू सुरुवात झाली. सध्याच्या काळात तर मतदानाचा कल वर्ण, वंश आणि धर्मावरून लक्षात येतो. दोन्ही पक्षांचा दृष्टिकोन नुसता वेगवेगळाच नाही तर एकमेकांना प्रखर विरोध करणारा, कट्टर आणि टोकाचा होतो आहे. लोकांच्या अस्मितांचे रूपांतर राजकीय कट्टरतेमध्ये झालेले आहे.   


अमेरिकेचे रंग-रूप बदलते आहे. २०१३ सालापासून असा बदल झाला आहे, की  अमेरिकेत जन्म घेणारी बहुसंख्य बाळे गोरी नसतात, म्हणजेच गोऱ्या सोडून इतर वंशांच्या बाळांची संख्या गोऱ्या बाळांपेक्षा जास्त असते. २०३० साली अमेरिकेच्या लोकसंख्यावाढीचे मुख्य कारण बाहेरून येणारे लोक हे असेल. त्यांची संख्या अमेरिकेत जन्मणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असेल. एवढेच नाही, तर २०४५ मध्ये अमेरिकेत  गोऱ्या वंशाच्या लोकांपेक्षा इतर सर्व वंशांच्या लोकांची एकत्र संख्या जास्त असेल म्हणजेच सध्याचे अल्पसंख्याक समुदाय एकत्रितपणे बहुसंख्य ठरतील. वंशांनुसार लोकसंख्या बघितली, तर भविष्यात फक्त गोऱ्या लोकांची संख्या घटत जाणार आहे आणि इतर सर्व वंशांची संख्या वाढत जाणार आहे. स्वतःला निधर्मी म्हणवणारे म्हणजेच “आम्ही कोणत्याच धर्माचे नाही” असे म्हणणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढते आहे. अशा आणि एवढ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांचा अर्थातच मानसिकतेवर आणि निवडणुकांवरही परिणाम होतो. काही गटांना भीती, दडपण आणि धोका वाटतो. तर काहींना आशा आणि समाधान वाटते. त्यातूनच ध्रुवीकरणाला गती मिळते. 


जो आपल्याला माहीत आहे आणि ज्याच्यावर आपण प्रेम करत आलो आहोत, तो देश अभूतपूर्व बदलून जातो आहे, त्याचा कायापालट होतो आहे असे जाणवू लागले, की असुरक्षित वाटू लागते, चिंता वाटू लागते. पूर्वी महत्त्वाच्या नसलेल्या अस्मिता टोकदार होऊ लागतात. ह्याचा फायदा कुठला ना कुठला पक्ष किंवा राजकीय नेता घेणारच आहे - हा नाही तर दुसरा.           


एझ्रा क्लाईन ह्यांनी वेगवेगळे अभ्यास आणि संशोधनांची माहिती देऊन ध्रुवीकरणाचा मानसशास्त्राशी असलेला संबंध  स्पष्ट केलेला आहे. टोळीचा सदस्य असणे, दुसऱ्या टोळीला विरोध करणे, त्यांचा द्वेष करणे आणि त्यांना हरवण्याची इच्छा असणे ह्या सगळ्या मनुष्याच्या उपजत वृत्ती आहेत. बऱ्याचदा लोकांना वाटते, की आपण ध्येय-धोरणे समजावून घेऊन विचारपूर्वक बाजू निवडतो. पण खरे म्हणजे बऱ्याचवेळा आपण जो पक्ष निवडतो त्याचा आपल्या स्वभावाशी, आवडी-निवडींशी संबंध असतो. काही लोकांना बदल आवडतो, तर काहींना परंपरा जपायच्या असतात. काहींना नियम आणि शिस्त आवडते तर काही लोकांचा सैल, सोप्या गोष्टींकडे कल असतो. काहींवर जगातल्या भयानक, क्रूर गोष्टींचा खूप परिणाम होतो तर इतरांवर तेवढा होत नाही.  ह्यातल्या काही आवडीनिवडी  नैसर्गिक असतात तर काही संस्कारांमुळे घडतात. अर्थात, ह्यातले कुठलेच स्वभावविशेष चांगले किंवा वाईट असतात असे नाही. समाज म्हणून आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनांची आणि स्वभावाची गरज असते. वैविध्यामुळे आपण टिकून आहोत. सध्याच्या काळात मनुष्यस्वभाव आणि मानसशास्त्र बदललेले नाही, तर त्याची राजकारणाशी जी सांगड घातली जाते आहे, ती नवीन आहे. पूर्वी राजकारण हा मुख्यतः व्यवहार होता, आता ती लोकांची ओळख, त्यांच्या टोळीची ओळख आणि अस्मिता झाली आहे.  


पण माणसाची ओळख ही फक्त राजकीय भूमिकांइतकीच असते का? आपली अनेक अंगे असतात. आपण एखाद्या राजकीय पक्षाचे असतो. त्याखेरीज  एखाद्या खेळाचे चाहते असतो, त्याचवेळी आपण पालकही असतो, एखाद्या क्षेत्रात काम करणारे असतो, एखाद्या शाळेचे माजी विद्यार्थी असतो. आपल्या ह्या इतर अस्मिता राजकीय अस्मितांसारख्या कट्टर नाहीत. त्या अस्मिता आपण राजकारणात वापरल्या तर ध्रुवीकरण सौम्य होईल. उदा. एक पालक म्हणून,  एक निसर्गप्रेमी म्हणून, त्या दृष्टीने मतदान करता येऊ शकेल. पण प्रत्यक्षात उलट घडत आहे. राजकीय अस्मिता इतर सर्व अंगांवर कुरघोडी करत आहेत. आपल्या राजकीय भूमिकांचा आपल्या इतर अंगांवर आणि मैत्रीवर परिणाम होऊ लागला आहे. राजकीय अस्मितेमुळे वाटणारी जवळीक ही इतर ध्येय-धोरणांपेक्षा महत्त्वाची ठरू लागली आहे. एका प्रयोगात असे दिसून आले, की  विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना त्यांच्या गुणांऐवजी ते कोणत्या पक्षाचे काम करतात ह्याला महत्त्व दिले गेले. वंशभेद आणि लिंगभेदापेक्षाही राजकीय मतभेदावर आधारित भेदभाव तीव्र झाला आहे. आपण एकमेकांशी कसे वागतो एवढेच फक्त राजकीय अस्मिता ठरवत नाहीत, तर आपल्या एकूणच जीवनदृष्टीवर त्यांचा परिणाम होतो आहे.   

 

खरे तर परराष्ट्र धोरण, शैक्षणिक धोरणापासून ते अणुऊर्जेपर्यंत  वेगवेगळ्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि सखोल अभ्यास लागणाऱ्या विषयांवर सामान्य नागरिकाला निर्णय घेता येईल इतके काही माहीत नसते (आपल्याला हे सगळे कळते असे आपल्याला वाटत असले तरी). त्यामुळे आपल्या कळत-नकळत आपण योग्य निर्णय घेण्याचे काम आपल्या आवडत्या पक्षावर सोडलेले असते आणि आपली मूल्ये, तत्त्वे ह्यावरून आपण आपला पक्ष निवडलेला असतो. ही मूल्ये अर्थातच आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमुळे आपल्याला महत्त्वाची वाटत असतात. पण राजकीय पक्ष मात्र त्यांचे निर्णय सत्तेसाठी घेत असतात. मग हुशार आणि अभ्यासू नागरिकांचे काय? तर प्रयोगांमध्ये असे दिसून आले, की हे लोक त्यांची हुशारी योग्य निर्णयासाठी वापरण्याऐवजी त्यांच्या पक्षाच्या समर्थनासाठी वापरतात. अस्मिता जेव्हा पणाला लागलेल्या असतात, तेव्हा आपली तर्कबुद्धी गहाण पडते. 


ध्रुवीकरण ही होऊन गेलेली प्रक्रिया नसून ती अजूनही सुरू आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. माहितीयुगात इंटरनेटवर नुसतीच खूप माहिती मिळते असे नाही तर माहितीची निवडही करता येते. त्यामुळे बातम्या देणारी वृत्तपत्रे आणि वाहिन्याही त्याच्याशी स्पर्धा करतात. पत्रकारांना कारकीर्द घडवायची असते आणि वाहिन्यांना उत्पन्न मिळवायचे असते. लोकांचे लक्ष वेधून घेताना, जास्तीत जास्त प्रेक्षक मिळवताना माध्यमे सनसनाटीला महत्त्व देतात. त्यातूनच माध्यमे अस्मिता पेटवतात, भावना भडकवतात आणि लोकांच्या मनात संशय,असुरक्षितता निर्माण करतात. माध्यमांचे ध्रुवीकरण होतेच, शिवाय ते लोकांच्या ध्रुवीकरणात भर घालतात. राजकीय नेतेही सनसनाटी विधाने करून माध्यमांना वापरून घेतात, स्वत:चे बातमीमूल्य वाढवतात आणि त्यातून ध्रुवीकरण वाढवतात.   


समाजमाध्यमे तुम्हांला आवडणाऱ्या बातम्या दाखवतात हे जरी खरे असले तरी विरुद्ध बाजूच्या बातम्या वाचल्या-पाहिल्यावर काय होते? त्यातून वेगळा विचार  किंवा भूमिका सौम्य होण्याऐवजी लोकांना राग येतो आणि ते लगेच त्या मुद्द्यांचे खंडन सुरू करतात. प्रयोगांमधून हे सिद्ध झाले आहे. कुंपणावरचे मतदार आता कमी होत चालले आहेत. इतकेच नाही, तर राजकीय पक्षांचे महत्त्वही कमी होत जाऊन आपापल्या विचारसरणीचा कट्टरपणा वाढत चालला आहे. राजकीय पक्षांना ज्या देणग्या मिळतात, त्यातही जे छोटे, सामान्य देणगीदार असतात ते ध्रुवीकरणामुळे देणग्या देतात आणि अर्थातच जे मोठमोठे, श्रीमंत देणगीदार असतात ते त्यांच्या व्यवसायासाठी, कामासाठी (म्हणजेच एक प्रकारे लाच म्हणून) देणग्या देतात. कुणी अस्मितेत गुंतवणूक करतात तर कुणी व्यवसायात. ध्रुवीकरणाच्या आगीत तेल ओतणाऱ्या नेत्यांना मोठया प्रमाणात निधी उभा करता येतो. नेता आवडला नाही, तरी विरुद्ध बाजू नको म्हणून लोक त्याला मत देतात. राजकीय नेते आता त्यांच्या गुणांमुळे निवडले जात  नाहीत, तर विरोधी पक्षाबद्दलच्या द्वेषामुळे निवडले जातात. त्यामुळे आपल्याला  पाठिंबा मिळवण्यापेक्षा दुसऱ्याबद्दल संताप निर्माण करणे हे ध्येय झाले आहे. अशा परिस्थितीत परस्परविरोधी पक्षांनी चर्चा करून, समजुतीने काही चांगली धोरणे ठरविणे, काही तडजोडी करून सगळ्यांची सहमती मिळविणे ह्या गोष्टी दुरापास्त होत चाललेल्या आहेत. अमेरिकेत अध्यक्ष एका पक्षाचा आणि संसदेत बहुमत दुसऱ्या पक्षाचे असे असू शकते आणि अशावेळी सहमती, तडजोडी करून मार्ग काढणे अपेक्षित असते. 


ध्रुवीकरणाबद्दल सगळे स्पष्टीकरण दिल्यावर लेखकाने डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षातला फरकही स्पष्ट केलेला आहे.  ध्रुवीकरण दोघांचेही झाले असले तरी डेमोक्रॅटिक पक्षाला फ्लू झाला असेल तर रिपब्लिकन पक्षाला न्यूमोनिया झाल्याचे मत लेखकाने मांडले आहे. वेगवेगळ्या वंशांचे, धर्मांचे लोक डेमोक्रॅटिक पक्षात एकत्र आल्याने ते जास्त वैविध्यपूर्ण झाले तर एकाच वंशाचे लोक रिपब्लिकन पक्षात एकत्र आल्याने ते जास्त  एकजिनसी आणि जहाल  झाले.   


पुस्तकातले  सगळ्यात शेवटचे प्रकरण हे ध्रुवीकरणाला कसे सामोरे जायचे  ह्यावर लिहिलेले आहे. ध्रुवीकरण हे दरवेळी वाईटच असते असे नाही, असे लेखकाला वाटते. ध्रुवीकरणापूर्वीच्या अमेरिकेत नागरी हक्क कायदा नव्हता, आजच्यापेक्षा बराच जास्त अन्याय आणि उपेक्षा होती. ध्रुवीकरणाच्या विरुद्ध गोष्ट सहमतीच असते असे  नाही, तर बऱ्याचदा ते खच्चीकरण असते.  ध्रुवीकरणातून राजकीय मतभिन्नता व्यक्त होते आहे. अर्थात, ह्याचा अर्थ असा नाही की ध्रुवीकरणाच्या आव्हानांकडे  दुर्लक्ष करावे. पण पुस्तकात विशद केल्याप्रमाणे राजकीय, तांत्रिक, सामाजिक, मानसिक अशा बऱ्याच गोष्टींमुळे ध्रुवीकरण राहणारच आहे. अशा परिस्थितीत राजकीय व्यवस्था कशा चालवायच्या ह्याचा विचार करणे भाग आहे. लेखकाने त्यासाठी अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीत आणि अर्थसंकल्प संमत करण्याबाबत काही बदल सुचवले आहेत. अमेरिकेची घटना लिहिली गेली तेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्पर्धा होती आणि त्यांत समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता. आता नव्या काळासाठी नवा समतोल शोधावा लागेल, असे लेखकाला वाटते. त्याखेरीज, राजकारणात आपला वापर तर होत नाही ना, ह्याबाबत नागरिकांना सजग राहायला सुचवले आहे. माणसाला अस्मिता असणारच आहेत. आपल्या राजकीय सोडून ज्या इतर अस्मिता असतात उदा. खेळाडू, शाकाहारी, विद्यार्थी ह्यासारख्या अस्मितांना  महत्त्व दिले पाहिजे. राजकारण आणि राजकीय बातम्या, चर्चा ह्यावरचा वेळ मर्यादित ठेवला पाहिजे. राजकारणाखेरीज अनेक महत्त्वाच्या, रचनात्मक गोष्टी आयुष्यात असतात.   


राजकीय पत्रकारितेचा मोठा अनुभव असलेल्या  एझ्रा क्लाईन ह्यांचे हे  पुस्तक वाचल्यावर  ध्रुवीकरणाबाबत बऱ्याच संकल्पना स्पष्ट होतात आणि ही काही तात्पुरती किंवा समाजमाध्यमांपुरती गोष्ट नाही, हे लक्षात येते. पुस्तक अमेरिकेवरच आहे. पण त्यानिमित्ताने जगातल्या इतर काही राष्ट्रांमधल्या ध्रुवीकरणाचाही थोडाफार धांडोळा घेतला असता तर अजून आवडले असते. पुस्तक वाचताना ह्यातले मुद्दे भारताला कसे आणि कुठे लागू पडतात अशी मनातल्या मनात तुलना होत राहते आणि आपल्या देशातल्या राजकारणाची संगती लावायला मदत होते.


मंगळवार, १ मार्च, २०२२

माय बॉडी - एका लावण्यवतीच्या नजरेतून तिचा देह

'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या मार्च २०२२ च्या महिला दिन विशेषांकात प्रकाशित झालेला एमिली राटाकाव्स्की यांनी लिहिलेल्या 'माय बॉडी' पुस्तकावरचा हा लेख.)

एमिली राटाकाव्स्की ही हॉलिवूडची जगप्रसिद्ध मॉडेल आहे. बिकिनी आणि अंतर्वस्त्रांच्या जाहिरातींसाठी अतिशय प्रसिद्ध आणि यशस्वी असणाऱ्या ह्या तीस वर्षीय मॉडेलने लिहिलेल्या स्त्रीवादी म्हणता येईल अशा लेखांचे ‘माय बॉडी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. क्षणभर आपला गोंधळ होतो, की बिकिनी मॉडेल आणि स्त्रीवादी लेख हे आपण बरोबर वाचत आहोत ना? आणि त्यामुळेच हे पुस्तक वाचण्याची आणि एका अपरिचित जगातले अनुभव समजून घेण्याची उत्सुकता होती. स्वत:च्या शरीराची जाणीव, त्याचा उपयोग आणि त्याबद्दल काय काय वाटत राहिले, समजत गेले ह्याबद्दल तर हे पुस्तक आहेच. त्याखेरीज एक रूपवती लहान मुलगी वयात येताना, स्वतःच्या पायावर उभी राहताना आणि नंतर टक्केटोणपे खात, चुकतमाकत प्रगल्भ होतानाचा हा (न संपलेला) प्रवास आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिकेने स्पष्ट केले आहे, की अजूनही तिला सगळी उत्तरे सापडलेली नाहीत. वेगवेगळे प्रश्न पडणे, अनुभवांचा अर्थ लावणे, वास्तवाला सामोरे जाणे आणि बदलत गेलेल्या संकल्पना तपासून पाहणे अशा प्रकारचे हे लेखन आहे. तिच्याच भाषेत सांगायचे तर, “पुरुषांच्या नजरा, माझे घेतले गेलेले असंख्य फोटो आणि मी माझी इतर स्त्रियांशी केलेली तुलना अशा वेगवेगळ्या आरशांमध्ये मी स्वत:ला बघत आले आहे. त्या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.” अगदी लहान असल्यापासून आपण सुंदर आहोत अशी एमिलीला जाणीव झालेली होती. मुख्यतः तिच्या देखण्या आईने तिला ‘ती जन्मल्या दिवशीही किती सुंदर दिसत होती’ अशासारख्या बऱ्याच आठवणी सांगितल्या होत्या. आईने इतर मुली-बायकांच्या रुपाबद्दल केलेली शेरेबाजी तिने लहानपणापासून ऐकली होती आणि रोज रात्री झोपताना डोळे मिटल्यावर “देवा, मला जगातली सगळ्यात सुंदर मुलगी बनव” अशी प्रार्थना केली होती. “सुंदर दिसणे सगळ्यात महत्त्वाचे असते आणि त्याच्या बऱ्याच खालच्या पातळीवर ‘सुंदर नाही, पण पुरुषांना आवडणारी’ स्त्री असते. पण काहीच नसणे, म्हणजे अगदी अदृश्यच असल्यासारखे असणे खूप वाईट”, असे ती लहान असतानाच शिकली होती. बारा-तेरा वयात एमिलीने कपड्यांच्या छापील चित्रांसाठी मॉडेलिंग सुरू केले. आई-वडिलांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन होते. आई तिला शूटिंगला घेऊन जात असे. सौंदर्याचा वारसा आईकडून आला होता आणि आईला त्याचा अभिमानही होता. कॉलेजच्या पहिल्या वर्षानंतर तिने शिक्षण सोडून दिले आणि पूर्ण वेळ मॉडेलिंग सुरू केले. घर आधीच - शाळा संपली तेव्हा - सोडले होते. मॉडेलिंगमधून मिळणारे पैसे आणि पैशामुळे येणारे स्वातंत्र्य आणि मोकळीक हा मुद्दा तिच्यासाठी महत्त्वाचा होताच. त्याखेरीज डोक्यावर भले मोठे शैक्षणिक कर्ज घेऊन कॉलेजला गेलेल्या आणि शिक्षण संपल्यावरही धड नोकरी न मिळालेल्या तिच्याहून मोठ्या मुली तिला आजूबाजूला दिसत होत्या. अशातच तिला एकदा पोटाचा आजार झाला आणि त्यामुळे तिचे वजन साडे चार किलोने कमी झाले. त्यानंतर तिला जास्त कामे मिळू लागली, तिच्या रूपाची मागणी वाढली. मग तिने तो कमी वजनाचा बांधा प्रयत्नपूर्वक तसाच राखला. बऱ्याचदा ती जेवत नसे, काळी कॉफी पिऊन उपाशीच राहत असे. शरीराचे आरोग्य, पोषक, संतुलित आहार अशा गोष्टी तिच्या खिजगणतीतही नव्हत्या. बिकिनी आणि अंतर्वस्त्रांच्या मॉडेलिंगची बरीच कामे आणि पैसे तिला मिळू लागले. त्यानंतर ब्लर्ड लाईन्स नावाचा एक म्युझिक व्हिडिओ आला आणि ती एका रात्रीत जगप्रसिद्ध झाली. ह्या व्हिडिओत ती पहिल्यांदा जवळजवळ विवस्त्र अवस्थेत दिसली आहे. ह्या कामासाठी तिच्याशी संपर्क साधणारी आणि तिने हे काम करावे असे पटवून देणारी एक स्त्री दिग्दर्शक होती, हे वाचल्यावर धक्का बसतो. व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर ‘स्त्रीला वस्तूसारखे दाखवण्या’बाबतचे प्रश्न एमिलीला विचारले गेले. पण “मला विवस्त्र असण्यात काही वावगं वाटत नसेल आणि माझ्या शरीराबाबत आत्मविश्वास असेल, तर तुम्ही मला काय करायचं हे सांगणारे कोण? निवड करण्याचं स्वातंत्र्य म्हणजेच स्त्रीवाद”, अशा शब्दांत तिने माध्यमांना उत्तरे दिली आणि तेव्हा तिला तसे प्रामाणिकपणे वाटतही होते. “सगळ्याच स्त्रियांचं काही ना काही प्रमाणात वस्तूकरण होतच असतं. निदान माझ्या वस्तूकरणाचा निर्णय आणि निवड मी करते आहे आणि हेच माझं सक्षमीकरण आहे”, असे त्या काळी तिला वाटायचे. यथावकाश त्यात बदल झाला आणि आज अर्थातच तिला तसे वाटत नाही. स्त्री असणे म्हणजे काय आणि वस्तू असणे म्हणजे काय? एमिलीने स्वत:च्या शरीराला तिचे सामर्थ्य, बलस्थान समजायचे की साधन, वस्तू समजायचे हा प्रश्न आणि संघर्ष तिच्या लेखनात ठळकपणे जाणवतो. तिच्या देहामुळेच आज तिला एवढे यश, प्रसिद्धी, चाहते आणि तिच्या मध्यमवर्गीय आई-वडिलांनी कधी कल्पनाही केली नव्हती एवढी संपत्ती मिळालेली आहे. त्यातून मिळालेले स्वातंत्र्य, क्षमता आणि अगदी हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी ह्या गोष्टी पाहता ते बलस्थानच वाटू लागते. पण हे सगळे सामर्थ्य आणि क्षमता तिला पुरुषांच्या नजरेने दिलेली आहे. जो काही पैसा, प्रतिष्ठा तिला मिळाली आहे; ते तिचा देह पुरुषांना बघायला आवडल्यामुळे मिळाली आहे. भांडवलशाही आणि पितृसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीने तिची ही किंमत ठरवली आहे. अशावेळी ह्याला खरेच स्वत:चे सक्षमीकरण म्हणता येईल का, असा प्रश्न तिला आज पडतो. सत्ता शेवटी पुरुषांकडेच आहे आणि सत्तेत असलेल्या पुरुषांना आवडलेल्या आणि त्यांनी निवडलेल्या स्त्रिया यशस्वी होताना दिसतात. ह्या स्त्रिया पुरुषांच्या ऋणातही असतात. एमिलीच्या प्रतिमा कुणाच्या मालकीच्या असतात, ते वाचून आपल्याला धक्का बसतो. पापराझ्झी कुठल्याही परवानगीशिवाय फोटो घेतात आणि छापतात, हे सगळ्यांना माहीतच आहे. अशाच एका छायाचित्रकाराने तिच्या नकळत घेतलेला एक फोटो तिला आवडला आणि म्हणून तिने तो तिच्या इन्स्टाग्रामवर टाकला. तर त्या माणसाने “त्याच्या परवानगीशिवाय” तिने तो फोटो समाजमाध्यमावर टाकला म्हणून तिच्यावर दीड लाख डॉलरचा दावा ठोकला! एका प्रसिद्ध कलाकाराने तिच्या इन्स्टाग्रामवरचा फोटो आणि त्यावर त्याने केलेली टिप्पणी असे मोठ्या आकाराच्या कॅनव्हासवर छापून ऐंशी हजार डॉलरला एक असे ‘इन्स्टाग्राम आर्ट’ म्हणून विकले! परवानगी वगैरे तर दूरच, उलट इतक्या मोठ्या कलाकाराने ह्यासाठी तिचे फोटो निवडल्याबद्दल तिला आनंद व्हावा आणि तिने कृतकृत्य व्हावे, अशीच प्रत्येकाची अपेक्षा होती. अशी अजूनही उदाहरणे वाचून आपली मती कुंठित होते. प्रतिमा कुणाची, त्याचा वापर कोण करते, सत्ता कुणाकडे, कला कशाला म्हणायचे ह्या सगळ्याबद्दल कुणाचाही गोंधळ उडावा, असे हे अनुभव आहेत. मॉडेलिंग हा लेखनाचा मुख्य विषय असला तरी शरीराचे इतर अनुभवही पुस्तकात लिहिलेले आहेत. स्पामध्ये जाणवणारे शरीराचे अस्तित्व, डॉक्टरकडे गेल्यावर होणारी देहाची जाणीव आणि सगळ्यात शेवटी आई होतानाचा बाळंतपणाचा अनुभव अशी देहाची वेगवेगळी रूपे आणि भावना वेगवेगळ्या लेखांत आलेले आहेत आणि तरीही एमिली स्वत:ला देहापासून कशी अलिप्त ठेवते तेही सांगितले आहे. वेगवेगळ्या शूटिंगला गेल्यावर सांगतील तेव्हा कपडे उतरवणे, म्हणतील त्या मुद्रेत, हावभावात उभे राहणे, लोकांनी तिचे फोटो घेणे, टेपने अंगाची मापे घेणे हे सगळे इतके सहज, नेहमीचे, सवयीचे झालेले आहे, की बऱ्याचदा ती स्वत:च्या शरीराकडे तटस्थपणे बघत असते. ती स्वत: शरीरापेक्षा वेगळी आहे, अशी तिची भावना असते. अतिशय प्रामाणिक, पारदर्शी आणि प्रभावी असे हे लेखन आहे. लेखनातून एमिली राटाकाव्स्कीने तिचे व्यक्तिमत्त्व, तिचे बाईपण, तिचे माणूसपण अधोरेखित केले आहे. तिचा देह आणि तिच्या अगणित प्रतिमा ह्याच्या पलीकडे ती कोण आहे, त्याची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला आहे. पण अडचण अशी आहे, की ‘लेखक’ म्हणून समोर येताना त्या लेखनाचा विषय पुन्हा ‘देह’ हाच आहे. एक प्रकारच्या चक्रव्यूहात ती अडकल्यासारखी वाटते. आत तर शिरली आहे, पण लावण्यवतीच्या प्रतिमेतून आता बाहेर येणे अवघड आहे. तिने व्यवसायाचे जे क्षेत्र निवडले आहे, त्या क्षेत्रातल्या कामकाजावर, पद्धतींवर टीका केली आहे, आक्षेप घेतलेला आहे. पण तिला अजून तरी प्रश्नांची उत्तरे सापडलेली नाहीत आणि अजून तरी तिने हे क्षेत्र सोडलेलेही नाही. आपण स्वत:ही ह्या प्रश्नाचा भाग आहोत आणि जबाबदार आहोत, ह्याची जाणीव तिला झालेली आहे. पण त्यातून बाहेर पडता आलेले नाही. कदाचित लेखन ही पहिली पायरी असेल, सुरुवात असेल. त्यादृष्टीने हे पुस्तक ही नक्कीच चांगली, मोलाची सुरुवात आहे, असे म्हणता येईल.






रविवार, ६ जून, २०२१

पर्यावरणावरील महासंकट आणि त्यावरचे उपाय - बिल गेट्स ह्यांचे नवे पुस्तक

 ५ जूनला 'साप्ताहिक सकाळ'च्या पर्यावरण दिन विशेषांकात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची वेब आवृत्ती  इथे वाचता येईल.  'साप्ताहिक सकाळ'मध्ये शब्दसंख्या मर्यादित असल्यामुळे लेख जरा संक्षिप्त केला होता. मूळ विस्तारित लेख इथे देत आहे.

गेल्या सुमारे पन्नास वर्षांत जगावर प्रभाव पाडणारा विलक्षण माणूस म्हणजे बिल गेट्स. ह्या माणसाचे  पहिले  रूप बहुतेक सगळ्यांच्या परिचयाचे  आहे. संगणक क्रांतीतील  त्यांचे  योगदान आणि त्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले, ते त्यांचे  पहिले  रूप. दुसरे  रूप त्याहूनही जास्त  लोकोत्तर आहे. ह्या दुसऱ्या रूपात आपल्या अफाट संपत्तीतला ९५% भाग समाजकार्यासाठी द्यायचा निश्चय करून  गरीब देशांमधून  क्षय, मलेरिया, पोलिओ अशा रोगांचे  उच्चाटन करण्यासाठी झटताना आपण त्यांना पाहिले  आणि आता त्यांच्या तिसऱ्या रूपात त्यांनी 'पर्यावरण' हा विषय हाती घेतलेला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी   How To Avoid A Climate Disaster: The Solutions We Have And The Breakthroughs We Need (पर्यावरणावरचे  संकट कसे  टाळता येईल? आपल्याकडची उत्तरे  आणि नव्या वाटांची गरज ) हे पुस्तक लिहिले आहे आणि नुकतेच फेब्रुवारीत ते प्रकाशित झाले आहे.  आलिशान मोठ्या घरात राहणारा, विमानाने फिरणारा अतिश्रीमंत माणूस पर्यावरणाबद्दल कशाला बोलतो, असा प्रश्न लोक उपस्थित करतात. लोकांचा आक्षेप मान्य करूनही गेट्स ह्यांनी सांगितले आहे, की हे पुस्तक बरीच वर्षे अभ्यास करून माहितीपूर्वक, विचारपूर्वक  लिहिलेले आहे आणि ते स्वत:च्या आयुष्यात नेहमी शिकत आणि बदल करत आलेले आहेत.    

आपण सगळे मिळून दरवर्षी ५१ अब्ज टन (म्हणजे  ५१ वर ९ शून्ये!) एवढे उष्णता-धारक वायू वातावरणात सोडतो आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतेच  आहे. आपल्याला जर पृथ्वीवरचा  विनाश थांबवायचा असेल, तर हे प्रमाण २०५० सालापर्यंत  शून्यावर आणावे  लागेल, हे पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते स्पष्ट करतात. वातावरणातले  प्रदूषण आणि कर्ब-उत्सर्जन "कमी करणे" हे ध्येय नसून "शून्य करणे" हेच ध्येय आवश्यक आहे. नळाची धार कमी केली तरी बादली (थोड्या उशिरा का होईना) भरून वाहतेच. त्यामुळे जिथे नळ बंद करायचा असतो, तिथे बंदच करावा लागतो. कमी करून भागत नाही. करोना काळातही हे उत्सर्जन फक्त ५ टक्क्यांनीच कमी झाले. म्हणजे शून्यावर आणणे हे कसे  प्रचंड गोवर्धन पर्वत उचलण्याचे काम आहे, ते लक्षात येते.  तरीही माणसाने पूर्वी कधीही सोडवला नाही असा हा पर्यावरणाचा प्रश्न आणि तोही  इतक्या वेगाने सोडविण्याबाबत ते आशावादी आहेत. ह्या  प्रश्नाचा सर्व अंगांनी धांडोळा घेऊन पुस्तकाच्या शेवटी ते शून्याकडे  (शून्य उत्सर्जनाकडे) जाण्याचा ढोबळ आराखडा सांगतात.     

 आपण जो कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात सोडतो, त्यातला २०% वायू पुढची १०,००० वर्षे वातावरणात तसाच राहतो! त्यामुळे आपल्याला नुसतीच शून्याकडे वाटचाल करून भागणार नाही, तर पूर्वी उत्सर्जित केलेले  उष्णता-धारक वायू काढून घेण्याची व्यवस्थाही कधी ना कधी करावी लागणार आहे. औद्योगिकक्रांतीच्या आधीच्या काळाशी तुलना केली, तर पृथ्वीचे  आजचे  तापमान एक  अंश सेल्सिअसने वाढलेले  आहे. आपण जर उत्सर्जन थांबवू शकलो नाही, तर २०५० पर्यंत हे तापमान १.५ ते ३ अंशांनी वाढेल आणि २१०० सालापर्यंत ४ ते ८ अंशांनी वाढेल. शिवाय, १.५ आणि २ अंशांमध्ये अर्ध्या अंशाचा फरक असला, तरी २ अंश तापमान वाढल्यावर होणारी हानी मात्र १.५ अंशाच्या हानीच्या दुप्पट असणार आहे. दुप्पट लोकांच्या आयुष्यावर त्याचे भयानक परिणाम होणार आहेत. 

 

जगाची लोकसंख्या (स्थिर होण्यापूर्वी) मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आजही जगातल्या ८० कोटी लोकांकडे वीज नाही. बऱ्याच गरीब देशांमध्ये खूप मोठ्या लोकसंख्येला धड घरे नाहीत. ह्या  सगळ्या लोकांना व्यवस्थित राहणीमान मिळू नये, असे  म्हणताच येणार नाही. जगात सगळ्यांना प्रगती करता यायला हवी, सुविधा मिळायला हव्या. गरिबी निर्मूलनाचे स्वागत करायला हवे. त्यामुळे उत्सर्जन वाढतच जाणार आहे. उदाहरणार्थ, येत्या ४० वर्षांमध्ये जगात प्रचंड प्रमाणावर बांधकाम होणार आहे आणि इमारती उभ्या राहणार आहेत. दर महिन्याला एक नवे न्यूयॉर्क शहर उभे केल्याइतकी  बांधकामे जगात पुढची चाळीस वर्षे होत राहणार आहेत. त्यामुळे वापर कमी करून उत्सर्जन थांबवू, असे मानण्याला काही अर्थ नाही. जे संसाधनांचा  भरमसाट  वापर करतात, त्यांनी तो कमी केलाच पाहिजे. पण त्याचवेळी  संपूर्ण जगाचा वस्तूंचा, विजेचा आणि वाहतुकीचा वापर वाढतच जाणार आहे हे समजून घ्यावे लागेल आणि त्यानुसार मार्ग काढावा लागेल.  

आपण वर्षाला जे ५१ अब्ज टन उत्सर्जन करतो, त्यातले ३१% उत्पादन क्षेत्रातून (स्टील, सिमेंट, प्लास्टिक इ.)२७% ऊर्जा क्षेत्रातून (कोळसा, नैसर्गिक वायू ), १८% शेती आणि पशुपालनातून, १६% वाहतुकीतून (विमान, जहाजे, गाड्या) आणि ६%  इमारती उबदार किंवा थंड राखण्यातून होते.  

ऊर्जा - जगातली ४०% ऊर्जानिर्मिती  कोळशापासून होते. गेली ३० वर्षे हे प्रमाण साधारण असेच आहे. कारण त्याला मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान मिळत राहते. २०१८ साली जगाने ४०० अब्ज  डॉलर्स  हे  पारंपरिक ऊर्जेवर 'अनुदान' म्हणून खर्च केले आहेत.  सौर ऊर्जा, पवन ऊर्जा ह्यावर चर्चा करून त्यांचे प्रमाण कसे वाढवता येईल, त्यातली आव्हाने कोणती, त्यात अजून कुठले नवे संशोधन लागेल  हे  तर विस्ताराने  सांगितले आहेच.  पण शून्यावर जायचे असल्यास अणुऊर्जेला पर्याय नाही, हेही नि:संदिग्धपणे सांगितलेले आहे. अणुऊर्जा जास्तीत जास्त सुरक्षित कशी करता येईल ह्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तिला विरोध करण्यावर भर दिला जातो, हे दुर्दैवी आणि चुकीचे आहे असे  गेट्स ह्यांनी स्पष्ट शब्दांत मांडलेले आहे. अणुऊर्जेचे प्रश्न सोडवणारे नव्या पद्धतीचे रूपक (model)  त्यांनी महासंगणक वापरून शोधले आहे.

उत्पादन क्षेत्र - स्टील, सिमेंट, काँक्रीट, प्लास्टिक, काच ह्या वस्तूंचे उत्पादन थांबवणे अशक्य आहे. उलट वाढत्या लोकसंख्येमुळे ते वाढत जाणार आहे. उत्पादन प्रक्रियेसाठी जी प्रचंड वीज आणि उष्णता लागते, ती अपारंपरिक  स्रोत  किंवा अणुऊर्जेपासून मिळवावी लागेल.  त्याखेरीज स्टील आणि सिमेंट तयार करताना ज्या रासायनिक क्रिया होतात, त्यातून कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडतो, तो पकडून बंदिस्त करावा लागेल. ह्याला कार्बन-कैद म्हणतात.  उत्सर्जन कमी करणारे आणि चांगल्या क्षमतेने कार्बन-कैद करणारे कोणते मार्ग असू शकतात, त्यात काय संशोधन चालू आहे ह्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे.   

शेती आणि पशुपालन  - शेती आणि कुरणांसाठी जी जंगलतोड होते, त्यातून १.६ अब्ज टन   कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात वाढतो. युरोप आणि आशियातल्या श्रीमंत देशांमध्ये २०% अन्न वाया जाते, फेकले जाते. अमेरिकेत हा आकडा ४०% वर जातो. हे  फेकलेले अन्न सडते आणि त्यातून मिथेन वायूचे उत्सर्जन होते. हा मिथेन  ३.३ अब्ज  टन  कार्बन डाय ऑक्साईडएवढी उष्णता निर्माण करतो. २१०० सालापर्यंत पृथ्वीची लोकसंख्या ४०% ने वाढणार आहे. पण  अन्नाची मागणी मात्र त्याहून बरीच जास्त वाढणार आहे. कारण जशी आर्थिक परिस्थिती सुधारते, तसे लोक जास्त अन्न घेतात आणि जास्त मांसाहार करतात. मांसाहारासाठी (प्राण्यांना खाऊ घालायला) जास्त पीक घ्यावे लागते.  अन्नाची मागणी ७०% ने वाढेल असा  अंदाज आहे. त्यामुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या जातींवर संशोधन करणेदुष्काळात, पुरात टिकणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करणे इथपासून ते  उत्सर्जन न करणारी खते तयार करणे आणि प्रतिमांसाचे पदार्थ तयार करणे अशा विविध पातळीवर काय काय प्रयत्न सुरू आहेत आणि अजून किती लढाई बाकी आहे ते वाचायला मिळते. प्रतिमांस म्हणजे मांस असल्यासारखे दिसते आणि  चवीलाही तसेच  लागते; पण ते शाकाहारी असते. स्वत: गेट्स मांसाहारी बर्गर आणि प्रतिमांसाचे बर्गर ह्यातला फरक ओळखू शकले नाहीत, त्याबद्दल ते सांगतात. मांसाहारासाठी पशुपालन आणि त्यातून मोठ्या प्रमाणात  मिथेन उत्सर्जन होत असल्यामुळे  प्रतिमांसाचा वापर वाढवणे महत्त्वाचे  आहे.

वाहतूक - पेट्रोल हे अतिशय शक्तिशाली आणि त्यामानाने स्वस्त स्फोटक द्रव्य आहे. जैविक इंधने (biofuels), हायड्रोकार्बन इंधने, त्यांचे तंत्रज्ञान, त्याच्या किंमती, त्यातले नवीन संशोधन आणि आव्हाने  ह्या सगळ्याची विस्ताराने चर्चा केली आहे.  इलेक्ट्रिक गाड्या (वीजनिर्मिती हरित तंत्रज्ञानाने केली असल्यास) चांगल्या आहेत आणि  त्यांचा वापर वाढवत न्यावा लागेल. पण मोठ्या वाहनांना आणि लांब पल्ल्यासाठी हे तंत्रज्ञान वापरताना मर्यादा पडतात. विमान उड्डाण करते, तेव्हा त्याच्या एकूण वजनातले २० ते ४० टक्के  वजन हे इंधनाचे असते. जेट इंधनाऐवजी तेवढीच ऊर्जा देणाऱ्या जर बॅटरी वापरायच्या  ठरवल्या, तर त्या बॅटरीजचे वजन जेट इंधनाच्या तब्बल  ३५ पट असेल. म्हणजे वजन इतके जास्त होऊ शकते, की उड्डाणच करता येणार नाही! अशी आव्हाने, त्याला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानात नवकल्पना येण्याची, संशोधनाची गरज आणि त्याबाबत आपण कुठवर पोहोचलो आहोत, हे सगळे ते सोप्या भाषेत उलगडून सांगतात.   

तापमान राखणे  (इमारती उबदार किंवा थंड राखणे)  -  नवीन बांधकामे करताना तापमान राखणाऱ्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा  आणि  थंड प्रदेशांमध्ये पाणी घरे गरम ठेवण्यासाठी कोणती ऊर्जा आणि कशी वापरावी, ह्याचे विवेचन केलेले आहे. विकसनशील देशांमध्ये वातानुकूलन वापरण्याचे प्रमाण किती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे, त्याला  किती प्रचंड ऊर्जा लागणार आहे आणि त्यासाठी स्वच्छ (प्रदूषण न करणारी) वीज कशी आवश्यक आहे ह्याचेही तपशील वाचायला मिळतात.

जसजशी जगातली गरिबी कमी होत जाणार आहे, तसतसे उत्सर्जन वाढत जाणार आहे. म्हणून आपल्याला नवीन तंत्रज्ञान, कल्पकता, संशोधन ह्यांची नितांत गरज आहे. गरीबांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारत उत्सर्जन शून्याकडे नेण्याची कसरत करावी लागणार आहे. शून्याकडे जाण्याचा पल्ला एका रात्रीतून साध्य होणार नाही. त्यासाठी काही दशकांचे अथक परिश्रम लागणार आहेत. मधल्या काळात (आतापासूनच) आपल्याला तापमानवाढीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.  दुर्दैवाने तापमानवाढीला जे फारसे कारणीभूत नाहीत अशा गरीबांना ह्याचा सगळ्यात जास्त फटका बसतो आहे आणि बसणार आहे. ह्या  बदलांमुळे दुष्काळ आणि पूर वारंवार येत राहणार आहेत. टोळधाडींना पोषक वातावरण तयार होत त्यांची संख्या वाढत जाणार आहे. हवेतला आणि जमिनीतला ओलावा आटत जाऊन कोरड्या शेतजमिनींमुळे पिकांचे नुकसान होणार आहे. आफ्रिका आणि दक्षिण आशियातल्या शेतकऱ्यांना हलाखीचे दिवस येणार आहेत. उत्सर्जनात आफ्रिकेचा वाटा सध्या फक्त २% आहे. पण सगळ्यात जास्त झळ त्यांना पोहोचणार आहे. त्यामुळे तिथे मदत करण्यावर भर द्यायला हवा. जिथे राहताच येणार नाही, त्या किनारपट्टीच्या लोकांची कायमची वेगळी सोय करावी लागेल. दुष्काळात आणि पुरात टिकून राहणाऱ्या पिकांच्या जाती विकसित कराव्या लागतील. आपत्कालीन परिस्थिती हाताळायच्या आणि लोकांचे पुनर्वसन करायच्या व्यवस्था तयार ठेवाव्या लागतील.

 गेट्स हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले आहेत म्हणून ते ह्या प्रश्नाचे उत्तर तंत्रज्ञानात शोधतात असे वाटू शकते. पण प्रश्नाची व्यापकता आणि आकडेवारी ह्या सगळ्यांतून ते हे सिद्ध करून दाखवतात, की नवीन तंत्रज्ञान शोधणे आणि तंत्रज्ञानाचा विकास करणे ह्याखेरीज हा प्रश्न सुटणे अशक्य आहे. "फक्त" तंत्रज्ञान पुरेसे नाही. पण तंत्रज्ञानाशिवाय शून्याकडे जाताच येणार नाही.  तंत्रज्ञानाबरोबरच सरकारी  धोरणांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. सरकारने ह्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या  संशोधनात कशी गुंतवणूक केली पाहिजे, ते सांगितले आहे. आज आपण वापरत असलेले इंटरनेट, महत्त्वाची औषधे, फोनमधला जीपीएस ह्या सर्व तंत्रज्ञानांमध्ये सुरुवातीला सरकारी  गुंतवणूकच होती.  त्याखेरीज पर्यावरणपूरक गोष्टींचा प्रसार होईल अशी आर्थिक धोरणे आखून मागणी वाढवली पाहिजे. 

आज जी करोनाची जागतिक महामारी आली आहे, तशी येऊ शकते हे माहीत असूनही आपण सगळे गाफील राहिलो आणि परिस्थिती अवघड झाली. निदान पर्यावरणाच्या बाबतीत तरी आपण आताच पाऊले उचलणे गरजेचे आहे. नवे संशोधन, नवकल्पना ह्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. खूप मोठ्या प्रमाणावर प्रयोग करावे लागतात, चाचण्या घ्याव्या लागतात. अशा जटिल प्रश्नांसाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, राज्यशास्त्र अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम व्हावे  लागते. त्यांचा समन्वय साधावा लागतो. प्रायोगिक तत्त्वावर चाललेल्या गोष्टी सिद्धता टप्प्यातून विस्तार टप्प्याकडे न्याव्या लागतात. फक्त तंत्रज्ञानात अभिकल्पना आणून थांबता येत नाही, तर व्यवसायाच्या पद्धतीपायाभूत सुविधा, मागणी-पुरवठ्याच्या पद्धती, विक्री व्यवस्था ह्या सगळ्या मोठया प्रमाणात  बदलणार आहेत. तिथे प्रत्येक ठिकाणी कल्पकता आणि निर्मितीक्षमता लागणार आहे. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक गाड्यांना ठिकठिकाणी चार्जिंगची व्यवस्था लागेल. सौरऊर्जा साठवायच्या आणि वाहून नेण्याच्या नव्या पद्धती लागतील. कार्बन-कैद पद्धत वापरायची तर त्याचे नियम लागतील. तसे कायदे करावे लागतील. अंमलबजावणीची व्यवस्था लागेल. शिवाय सर्व नव्या गोष्टी सगळ्यांनी वापरण्याइतक्या स्वस्त कराव्या लागतील. त्यासाठी मागणी वाढवावी लागेल. मागणी वाढलीकी तंत्रज्ञान स्वस्त होते.       

गेट्स ह्यांनी सुचवलेला आराखडा असा -  

१. संशोधनावरचा सरकारी खर्च पाचपट करा

२. सरकार आणि उद्योगधंद्यांनी एकत्र काम करा - उद्योगांनीही गुंतवणूक करा 

३. सर्व सरकारी कामे आणि प्रकल्पांसाठी फक्त हरित तंत्रज्ञान वापरलेल्याच वस्तू, इंधन विकत घ्या आणि मागणी निर्माण करा 

४. कार्बन कर लावा आणि हरित तंत्रज्ञान वापरणाऱ्या उद्योगांना सवलती द्या

५. नव्या तंत्रज्ञानासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करा

६. हरित ऊर्जा, हरित इंधने आणि हरित उत्पादनाची मानके तयार करून जाहीर करा   

७. नवे कायदे, करपद्धती आणि व्यापारी व्यवस्था तयार करा 

८. हे सर्व देशांनी मिळून करायचे काम आहे आणि त्यासाठी श्रीमंत राष्ट्रांनी पुढाकार घेऊन सुरुवात करा

९. वेगवेगळ्या देशांनी एकमेकांशी व्यापार करताना हरित तंत्रज्ञानाच्या अटी घाला 

१०. ह्यासाठीची धोरणे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक अशा सर्व पातळ्यांवर वेगाने राबवा

बिल गेट्स हे पॅरिस पर्यावरण कराराच्या वेळी उपस्थित आणि सक्रिय होते. पर्यावरणाशी संबंधित धोरणे राबवावीत ह्यासाठी ते  वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संपर्क आणि संवाद करत असतात. नवीन तंत्रज्ञान आणि अभिकल्पना पुढे याव्यात म्हणून गेट्स ह्यांनी स्वत: वेगवेगळ्या संशोधनांना अर्थसाहाय्य दिलेले आहे आणि गुंतवणुकी केलेल्या आहेत. सुरक्षित अणुऊर्जा तयार करणारी कंपनी काढून त्याचा प्रयोग करण्याची सिद्धता केलेली आहे. जगभरातल्या २८ अतिश्रीमंत लोकांना घेऊन breakthroughenergy.org   नावाची संस्था सुरू केली आहे. ह्यात जेफ बोझोस, जॅक मा अशांचा सहभाग आहे. ह्याद्वारे  हे लोक नवीन हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक करतात.

पण आपण सामान्य माणसे काय करणार? तर आपल्यालाही करण्यासारख्या गोष्टी त्यांनी सुचवल्या आहेत. आपण सगळे नागरिक आणि ग्राहक असतोच. शिवाय आपल्यापैकी काहीजण काम करणारे किंवा काम देणारेही असतो. ह्या सर्व भूमिकांमध्ये आपण शक्य ते करायला पाहिजे. आपल्या कामाच्या ठिकाणी हरित तंत्रज्ञान वापरावे म्हणून आपण मागणी आणि पाठपुरावा  करू शकतो. आपले स्थानिक राजकारणी, अधिकारी ह्यांना पत्र लिहू शकतो. निवडणुकीत हा मुद्दा यावा म्हणून दबावगट तयार करू शकतो. ग्राहक म्हणून मांसाहार कमी करू शकतो, प्रतिमांस खाऊ शकतो. ज्यांना गाडी घ्यायची आहे, ते इलेक्ट्रिक गाडी घेऊ शकतात. थोडासा खर्च जास्त झाला तरीही हरित तंत्रज्ञानाच्या वस्तू , ऊर्जा आपण वापरू  शकतो. आपण मागणी वाढवल्यावरच हे स्वस्त होणार आहे.

हे पुस्तक अगदी  सरळ, सोपे आणि थेट मुद्द्याला हात घालणारे आहे. मनोरंजक व्हावे म्हणून उगीचच  किस्से, विनोद घालायला बघायचे आणि त्यात विषयाचा नेमकेपणा गमावून बसायचे, असे अजिबात केलेले नाही. बरीच आकडेवारी आणि तंत्रज्ञान सोपे करून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू सफल झालेला आहे आणि हे सगळे करताना कुठेही कंटाळवाणे झालेले नाही. पर्यावरणाचा गुंतागुंतीचा व्यापक प्रश्न आणि त्याचे बहुपदरी महत्त्वाकांक्षी उत्तर ह्याचा विस्तृत पट ह्यातून आपल्याला चांगला समजतो. महत्त्वाच्या विषयावरचे महत्त्वाचे पुस्तक वाचल्याचे समाधान मिळते. 

-------

कार्बन-कैद ( स्पष्टीकरण )

 कार्बन कैद करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ज्या प्रक्रियांमधून कार्बन डाय ऑक्साइड बाहेर निघतो, तिथेच तो पकडून कैद करायचा आणि दुसरी म्हणजे थेट हवेतून कार्बन डाय   ऑक्साइड मिळवून तो पकडून बंदिस्त करायचा. त्याचे द्रवात रूपांतर करून तो कुठेतरी साठवून ठेवावा लागतो. हा साठा किती, कुठे करणार आणि त्याची किंमत, परिणाम असे प्रश्न आहेतच. आता ह्या वायूचा घनरूपात कार्बन करण्याचेही तंत्रज्ञान आले आहे.