बुधवार, २० मे, २०२६

कविता - विकास

विकास आला, विकास आला काँक्रीटच्या पावलांनी विकास आला

मृगजळी पिसांचा मुकुट घालून आला
मंजुरीचे कागद बगलेत मारून आला
खिशात त्याच्या कंत्राटांचा खुळखुळाट
चारी बाजूंना देवघेवीचा सुळसुळाट
विकास आला, विकास आला
काँक्रीटच्या पावलांनी विकास आला
धुरांची वलयं फुंकत आला
फुगवलेले आकडे भुंकत आला
वनंच्या वनं तुडवत आला
ढोल-नगारे बडवत आला
विकास आला, विकास आला
काँक्रीटच्या पावलांनी विकास आला
टेकड्या-डोंगर फोडत आला
पक्ष्या-पाखरांना झोडत आला
नद्यांत मलमूत्र सोडत आला
सत्तेची री ओढत आला
विकास आला, विकास आला
काँक्रीटच्या पावलांनी विकास आला
विकासाने मोठी हवा केली
सगळी हवा गरम गरम
मित्रमंडळींची वर्णी लावली
खिसेही झाले गरम गरम
व्यवस्था नरम, न्यायही नरम
विकास हा एकमेव परम
विकासाला अंत नाही
त्याला कशाची खंत नाही
आत्मा कधीच शांत नाही
क्षणभरही निवांत नाही
विकास खरं तर नाहीच विकास
त्याच्या रुपात आलाय भस्म्या हव्यास



रविवार, ३ मे, २०२६

कविता - शोक

 


डोळ्यांच्या कस्पट खिडक्या 
आकाशाचे पाहती तुकडे 
दु:खालाही चढतो रंग 
आसवांचे पडती वाटे 

आकड्यांचे माजे काहूर 
त्यांत हरवली नावे 
प्रत्येक हात चाचपतो 
त्याच्या सत्याचे दावे 


दु:खाला कसली बाजू? 
हुंदक्याला कुठली रेषा? 
बोलू दे स्वतःशी तरी
शोकाची पवित्र भाषा 
© प्राजक्ता