मंगळवार, १ मार्च, २०२२

माय बॉडी - एका लावण्यवतीच्या नजरेतून तिचा देह

'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या मार्च २०२२ च्या महिला दिन विशेषांकात प्रकाशित झालेला एमिली राटाकाव्स्की यांनी लिहिलेल्या 'माय बॉडी' पुस्तकावरचा हा लेख.)

एमिली राटाकाव्स्की ही हॉलिवूडची जगप्रसिद्ध मॉडेल आहे. बिकिनी आणि अंतर्वस्त्रांच्या जाहिरातींसाठी अतिशय प्रसिद्ध आणि यशस्वी असणाऱ्या ह्या तीस वर्षीय मॉडेलने लिहिलेल्या स्त्रीवादी म्हणता येईल अशा लेखांचे ‘माय बॉडी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. क्षणभर आपला गोंधळ होतो, की बिकिनी मॉडेल आणि स्त्रीवादी लेख हे आपण बरोबर वाचत आहोत ना? आणि त्यामुळेच हे पुस्तक वाचण्याची आणि एका अपरिचित जगातले अनुभव समजून घेण्याची उत्सुकता होती. स्वत:च्या शरीराची जाणीव, त्याचा उपयोग आणि त्याबद्दल काय काय वाटत राहिले, समजत गेले ह्याबद्दल तर हे पुस्तक आहेच. त्याखेरीज एक रूपवती लहान मुलगी वयात येताना, स्वतःच्या पायावर उभी राहताना आणि नंतर टक्केटोणपे खात, चुकतमाकत प्रगल्भ होतानाचा हा (न संपलेला) प्रवास आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिकेने स्पष्ट केले आहे, की अजूनही तिला सगळी उत्तरे सापडलेली नाहीत. वेगवेगळे प्रश्न पडणे, अनुभवांचा अर्थ लावणे, वास्तवाला सामोरे जाणे आणि बदलत गेलेल्या संकल्पना तपासून पाहणे अशा प्रकारचे हे लेखन आहे. तिच्याच भाषेत सांगायचे तर, “पुरुषांच्या नजरा, माझे घेतले गेलेले असंख्य फोटो आणि मी माझी इतर स्त्रियांशी केलेली तुलना अशा वेगवेगळ्या आरशांमध्ये मी स्वत:ला बघत आले आहे. त्या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.” अगदी लहान असल्यापासून आपण सुंदर आहोत अशी एमिलीला जाणीव झालेली होती. मुख्यतः तिच्या देखण्या आईने तिला ‘ती जन्मल्या दिवशीही किती सुंदर दिसत होती’ अशासारख्या बऱ्याच आठवणी सांगितल्या होत्या. आईने इतर मुली-बायकांच्या रुपाबद्दल केलेली शेरेबाजी तिने लहानपणापासून ऐकली होती आणि रोज रात्री झोपताना डोळे मिटल्यावर “देवा, मला जगातली सगळ्यात सुंदर मुलगी बनव” अशी प्रार्थना केली होती. “सुंदर दिसणे सगळ्यात महत्त्वाचे असते आणि त्याच्या बऱ्याच खालच्या पातळीवर ‘सुंदर नाही, पण पुरुषांना आवडणारी’ स्त्री असते. पण काहीच नसणे, म्हणजे अगदी अदृश्यच असल्यासारखे असणे खूप वाईट”, असे ती लहान असतानाच शिकली होती. बारा-तेरा वयात एमिलीने कपड्यांच्या छापील चित्रांसाठी मॉडेलिंग सुरू केले. आई-वडिलांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन होते. आई तिला शूटिंगला घेऊन जात असे. सौंदर्याचा वारसा आईकडून आला होता आणि आईला त्याचा अभिमानही होता. कॉलेजच्या पहिल्या वर्षानंतर तिने शिक्षण सोडून दिले आणि पूर्ण वेळ मॉडेलिंग सुरू केले. घर आधीच - शाळा संपली तेव्हा - सोडले होते. मॉडेलिंगमधून मिळणारे पैसे आणि पैशामुळे येणारे स्वातंत्र्य आणि मोकळीक हा मुद्दा तिच्यासाठी महत्त्वाचा होताच. त्याखेरीज डोक्यावर भले मोठे शैक्षणिक कर्ज घेऊन कॉलेजला गेलेल्या आणि शिक्षण संपल्यावरही धड नोकरी न मिळालेल्या तिच्याहून मोठ्या मुली तिला आजूबाजूला दिसत होत्या. अशातच तिला एकदा पोटाचा आजार झाला आणि त्यामुळे तिचे वजन साडे चार किलोने कमी झाले. त्यानंतर तिला जास्त कामे मिळू लागली, तिच्या रूपाची मागणी वाढली. मग तिने तो कमी वजनाचा बांधा प्रयत्नपूर्वक तसाच राखला. बऱ्याचदा ती जेवत नसे, काळी कॉफी पिऊन उपाशीच राहत असे. शरीराचे आरोग्य, पोषक, संतुलित आहार अशा गोष्टी तिच्या खिजगणतीतही नव्हत्या. बिकिनी आणि अंतर्वस्त्रांच्या मॉडेलिंगची बरीच कामे आणि पैसे तिला मिळू लागले. त्यानंतर ब्लर्ड लाईन्स नावाचा एक म्युझिक व्हिडिओ आला आणि ती एका रात्रीत जगप्रसिद्ध झाली. ह्या व्हिडिओत ती पहिल्यांदा जवळजवळ विवस्त्र अवस्थेत दिसली आहे. ह्या कामासाठी तिच्याशी संपर्क साधणारी आणि तिने हे काम करावे असे पटवून देणारी एक स्त्री दिग्दर्शक होती, हे वाचल्यावर धक्का बसतो. व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर ‘स्त्रीला वस्तूसारखे दाखवण्या’बाबतचे प्रश्न एमिलीला विचारले गेले. पण “मला विवस्त्र असण्यात काही वावगं वाटत नसेल आणि माझ्या शरीराबाबत आत्मविश्वास असेल, तर तुम्ही मला काय करायचं हे सांगणारे कोण? निवड करण्याचं स्वातंत्र्य म्हणजेच स्त्रीवाद”, अशा शब्दांत तिने माध्यमांना उत्तरे दिली आणि तेव्हा तिला तसे प्रामाणिकपणे वाटतही होते. “सगळ्याच स्त्रियांचं काही ना काही प्रमाणात वस्तूकरण होतच असतं. निदान माझ्या वस्तूकरणाचा निर्णय आणि निवड मी करते आहे आणि हेच माझं सक्षमीकरण आहे”, असे त्या काळी तिला वाटायचे. यथावकाश त्यात बदल झाला आणि आज अर्थातच तिला तसे वाटत नाही. स्त्री असणे म्हणजे काय आणि वस्तू असणे म्हणजे काय? एमिलीने स्वत:च्या शरीराला तिचे सामर्थ्य, बलस्थान समजायचे की साधन, वस्तू समजायचे हा प्रश्न आणि संघर्ष तिच्या लेखनात ठळकपणे जाणवतो. तिच्या देहामुळेच आज तिला एवढे यश, प्रसिद्धी, चाहते आणि तिच्या मध्यमवर्गीय आई-वडिलांनी कधी कल्पनाही केली नव्हती एवढी संपत्ती मिळालेली आहे. त्यातून मिळालेले स्वातंत्र्य, क्षमता आणि अगदी हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी ह्या गोष्टी पाहता ते बलस्थानच वाटू लागते. पण हे सगळे सामर्थ्य आणि क्षमता तिला पुरुषांच्या नजरेने दिलेली आहे. जो काही पैसा, प्रतिष्ठा तिला मिळाली आहे; ते तिचा देह पुरुषांना बघायला आवडल्यामुळे मिळाली आहे. भांडवलशाही आणि पितृसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीने तिची ही किंमत ठरवली आहे. अशावेळी ह्याला खरेच स्वत:चे सक्षमीकरण म्हणता येईल का, असा प्रश्न तिला आज पडतो. सत्ता शेवटी पुरुषांकडेच आहे आणि सत्तेत असलेल्या पुरुषांना आवडलेल्या आणि त्यांनी निवडलेल्या स्त्रिया यशस्वी होताना दिसतात. ह्या स्त्रिया पुरुषांच्या ऋणातही असतात. एमिलीच्या प्रतिमा कुणाच्या मालकीच्या असतात, ते वाचून आपल्याला धक्का बसतो. पापराझ्झी कुठल्याही परवानगीशिवाय फोटो घेतात आणि छापतात, हे सगळ्यांना माहीतच आहे. अशाच एका छायाचित्रकाराने तिच्या नकळत घेतलेला एक फोटो तिला आवडला आणि म्हणून तिने तो तिच्या इन्स्टाग्रामवर टाकला. तर त्या माणसाने “त्याच्या परवानगीशिवाय” तिने तो फोटो समाजमाध्यमावर टाकला म्हणून तिच्यावर दीड लाख डॉलरचा दावा ठोकला! एका प्रसिद्ध कलाकाराने तिच्या इन्स्टाग्रामवरचा फोटो आणि त्यावर त्याने केलेली टिप्पणी असे मोठ्या आकाराच्या कॅनव्हासवर छापून ऐंशी हजार डॉलरला एक असे ‘इन्स्टाग्राम आर्ट’ म्हणून विकले! परवानगी वगैरे तर दूरच, उलट इतक्या मोठ्या कलाकाराने ह्यासाठी तिचे फोटो निवडल्याबद्दल तिला आनंद व्हावा आणि तिने कृतकृत्य व्हावे, अशीच प्रत्येकाची अपेक्षा होती. अशी अजूनही उदाहरणे वाचून आपली मती कुंठित होते. प्रतिमा कुणाची, त्याचा वापर कोण करते, सत्ता कुणाकडे, कला कशाला म्हणायचे ह्या सगळ्याबद्दल कुणाचाही गोंधळ उडावा, असे हे अनुभव आहेत. मॉडेलिंग हा लेखनाचा मुख्य विषय असला तरी शरीराचे इतर अनुभवही पुस्तकात लिहिलेले आहेत. स्पामध्ये जाणवणारे शरीराचे अस्तित्व, डॉक्टरकडे गेल्यावर होणारी देहाची जाणीव आणि सगळ्यात शेवटी आई होतानाचा बाळंतपणाचा अनुभव अशी देहाची वेगवेगळी रूपे आणि भावना वेगवेगळ्या लेखांत आलेले आहेत आणि तरीही एमिली स्वत:ला देहापासून कशी अलिप्त ठेवते तेही सांगितले आहे. वेगवेगळ्या शूटिंगला गेल्यावर सांगतील तेव्हा कपडे उतरवणे, म्हणतील त्या मुद्रेत, हावभावात उभे राहणे, लोकांनी तिचे फोटो घेणे, टेपने अंगाची मापे घेणे हे सगळे इतके सहज, नेहमीचे, सवयीचे झालेले आहे, की बऱ्याचदा ती स्वत:च्या शरीराकडे तटस्थपणे बघत असते. ती स्वत: शरीरापेक्षा वेगळी आहे, अशी तिची भावना असते. अतिशय प्रामाणिक, पारदर्शी आणि प्रभावी असे हे लेखन आहे. लेखनातून एमिली राटाकाव्स्कीने तिचे व्यक्तिमत्त्व, तिचे बाईपण, तिचे माणूसपण अधोरेखित केले आहे. तिचा देह आणि तिच्या अगणित प्रतिमा ह्याच्या पलीकडे ती कोण आहे, त्याची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला आहे. पण अडचण अशी आहे, की ‘लेखक’ म्हणून समोर येताना त्या लेखनाचा विषय पुन्हा ‘देह’ हाच आहे. एक प्रकारच्या चक्रव्यूहात ती अडकल्यासारखी वाटते. आत तर शिरली आहे, पण लावण्यवतीच्या प्रतिमेतून आता बाहेर येणे अवघड आहे. तिने व्यवसायाचे जे क्षेत्र निवडले आहे, त्या क्षेत्रातल्या कामकाजावर, पद्धतींवर टीका केली आहे, आक्षेप घेतलेला आहे. पण तिला अजून तरी प्रश्नांची उत्तरे सापडलेली नाहीत आणि अजून तरी तिने हे क्षेत्र सोडलेलेही नाही. आपण स्वत:ही ह्या प्रश्नाचा भाग आहोत आणि जबाबदार आहोत, ह्याची जाणीव तिला झालेली आहे. पण त्यातून बाहेर पडता आलेले नाही. कदाचित लेखन ही पहिली पायरी असेल, सुरुवात असेल. त्यादृष्टीने हे पुस्तक ही नक्कीच चांगली, मोलाची सुरुवात आहे, असे म्हणता येईल.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा