सुट्टीसाठी
मधे मुलगा घरी आला होता आणि मी त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालण्याच्या
मागे लागले होते. हे खायचं का ते, भाजी कुठली इ. प्रश्न त्याला विचारू लागल्यावर
तो सहजच म्हणाला, “तू सगळ्या आयांसारखा स्वयंपाक काय करायला लागलीस?” आणि मला
खाड्कन जाणवलं, की मी स्वयंपाकात रस घेऊ लागलेय! त्याच्या आणि माझ्यासाठीही हे
माझं नवं रूप होतं!
स्वयंपाक, पाककला अशा
गोष्टींचं मला कधीच प्रेम नव्हतं. लहानपणापासून मी आजुबाजूला मुली-बायकांचं एका
विशिष्ट प्रकारे मूल्यमापन होताना पाहिलं, पहिलं म्हणजे अर्थातच तिचं रूप आणि
दुसरं म्हणजे तिच्या हातचे पदार्थ. बस्स. बाकी कशाला फारशी किंमत नव्हती. हो, म्हणजे स्वभावाने शांत, गरीब, आज्ञाधारक असण्यालाही
महत्त्व होतं. पण निदान अगदी छोट्या मुलींच्या तरी बडबडीचं, हजरजबाबीपणाचं आणि
चौकसपणाचं कौतुक होत असे. मला इतक्या स्पष्ट शब्दांत तेव्हा कळलं नसावं, पण बाईची
ओळख तिच्या रूपात आणि स्वयंपाकात कोंबण्याचा मला मनापासून राग होता. दोन बायका
भेटल्या, की एकतर साड्या-दागिने अशा विषयांवर तरी बोलायच्या किंवा
खाद्यपदार्थांवर. म्हणजे बायकांना ज्यात कोंबलं होतं, तिथे त्या आनंदाने पाय पसरून
बसल्या होत्या! आजही मला बायकांच्या अशा कुठल्या गटात काही कारणाने जायची वेळ आली,
की तोंडाला कुलुप घालून बसते. म्हणून मी कधी नटलेही नाही आणि स्वयंपाकही शिकले
नाही. मुलींनी शिकायलाच हवा म्हटल्यामुळे मी स्वयंपाक शिकले तर नाहीच, पण एक नावडच
निर्माण झाली.
आता
फेसबुकच्या जमान्यात कितीतरी जणी हौसेने “घरी केलंय” म्हणून दिवाळीच्या फराळाचे
फोटो टाकत असतात. पण मी लहानपणापासून अशा बऱ्याच बायका पाहिल्या होत्या, की ज्यांचा
दिवाळीचे पदार्थ करून किंवा पाहुण्या-रावळ्यांचं करून अक्षरशः पिट्टा पडत असे आणि
त्या अगदी वैतागलेल्या, कावलेल्या असायच्या. चकल्या, शेव असली तळणं करून त्या
वासाने फराळाची इच्छा सुद्धा उरत नसे. प्रत्येक सण म्हणजे काहीतरी विधी-पूजा आणि
स्वयंपाक – कधी गुढी उभी करा, कधी गौरी आणा आणि मग नैवेद्याचा स्वयंपाक. कधी सण
म्हणून घरातली बाई मस्त हसत-खेळत निवांत बसून कशाचा तरी आनंद घेतीय, असं काही
नव्हतंच तेव्हा. त्यामुळे मी या पाककलेचा (आणि पूजा-अर्चांचा) चांगलाच धसका घेतला
होता. स्वयंपाकातला आनंद, कलात्मकता, स्वयंपाकघरात रमून जाणं इ. संकल्पना मला
पूर्वी अजिबात माहीत नव्हत्या. मी चांगली तिशीत असताना कुणीतरी म्हणालं, की “cooking is so therapeutic and
healing” तेव्हा मला
चांगलाच धक्का बसला होता. पिढ्यानपिढ्या बायकांच्या मागे जे लचांड लागलेलं आहे आणि
जे तिने चांगलंच करणं अपेक्षित असल्याने त्यात काही कौतुक-कृतज्ञता नाही, ते
एखादीला मन:शांती देणारं, ताणनिवारक वगैरे वाटावं हे ऐकून मी थक्कच झाले होते!
माझे
एक दूरचे काका “खाऊन खाऊन पेशवाई बुडाली” असं म्हणायचे. ते माझ्या लहानपणीच
डोक्यात बसलं होतं. आपल्याकडे वेगवेगळी यंत्रं-तंत्रं नाही, पण वेगवेगळे पदार्थ मात्र
जमले होते बनवायला, ह्याची चांगलीच खंत वाटायची. त्यात “चवणे” किंवा “खवय्ये” नवरे
आणि “सुगरण” बायका असली वर्णनं ऐकून अगदी कान किटले होते. संसाराचा असला भंपक प्रकार मला जमणार नव्हता. लग्नानंतर मी आणि नवरा मिळून प्रयोग करत करत
गरजेपुरता स्वयंपाक शिकलो होतो. त्याला माझ्या मानाने कमी नावड होती. म्हणजे हौस
नव्हती, पण नावडही नव्हती. त्यामुळे माझी चांगलीच सोय झाली आणि मी मुलं
होईपर्यंत रूढार्थाने संसाराला लागलेच नाही! मग मुलांसाठी मी हळूहळू वेगवेगळे पदार्थ कसे करत
गेले, ते माझं मलाही कळलं नाही. तरी पण स्वयंपाक, खाद्यसंस्कृती असल्या गप्पांपासून
मी चार हात दूरच राहिले. तो मला नको असलेला प्रांत होता. कुणी “जेवायला काय आवडतं”
असं म्हटलं, की मी कौतुकाने “जोवर मला करावं लागत नाही, तोवर काहीही” असं म्हणत
असे.
आणि
आता अचानक मुलगा म्हणाला, तेव्हा जाणवलं, की आपण ह्यात लक्ष घालतोय! शिवाय, तो
मागेच लागला, “सांग ना काय झालं तुला” म्हणून! आणि मग मला शोधावं लागलं. तो लहान
होता आणि माझ्याबरोबर असायचा, तेव्हा त्याच्याबरोबर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी
असायच्या. त्याला काही शिकव, त्याला बाहेर ने, एखाद्या प्रदर्शनाला घेऊन जा अशा.
आता दिवसेंदिवस त्या कमी होणार आहेत. अजूनही आम्ही तीच पुस्तकं वाचतो आणि पुस्तकं,
सिनेमे आणि घडामोडींवर चर्चा करतो. पण त्याच्यासाठी काही पदार्थ करा, त्याला इथून
खाऊचा डबा पाठवा ही एकच गोष्ट बहुधा बरीच वर्षं करता येईल. फोनवरच्या
गप्पांखेरीज हीच एक करता
येण्याजोगी गोष्ट आहे. “सगळ्या आयांना” बहुतेक हे उमगत असावं. कशामुळे का होईना,
ह्या प्राचीन कलेकडे आता जरा चांगल्या चष्म्यातून बघता येतंय हे तसं चांगलंच झालं!