मंगळवार, ३० जून, २०२०

मेंदूबद्दल विलक्षण काही - भाग १ - वास्तव


डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जापेशी वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. ईगलमन त्यात मेंदूची गुपितं उलगडून दाखवतात. वेगवेगळे प्रयोग, घटना ह्यांच्या आधारे आपण कसा विचार करतो, कशा भावना अनुभवतो त्याची ही थक्क करणारी कहाणी आहे, आपल्या आत दडलेल्या गूढ विश्वाची ओळख करून देणारी. पुस्तक वाचनाचा अनुभव विलक्षण आहे. चित्रफीतही खासच आहे. हा लेख फक्त त्याची ओळख करून देण्यासाठी आहे. प्रत्यक्ष वाचनाला किंवा बघण्याला हा काही पर्याय नाही. सहा भागांवर सहा लेख लिहायचा विचार आहे. आज पहिला भाग.

भाग १ : वास्तव

वास्तव म्हणजे काय, त्याचा वेध ह्या भागात घेतला आहे. खरं तर वास्तवाला रंग, गंध, चव, आवाज असं काहीच नसतं. आपण अनुभवतो ते वास्तव आपल्या मेंदूने रचलेलं असतं. साधारण दीड किलो वजनाचा मेंदू नावाचा हा मऊ, लिबलिबीत पदार्थ वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांकडून माहिती घेऊन “वास्तव” नावाची कथा रचत असतो. आपल्या अवयवांना होणाऱ्या जाणिवांचं विद्युत-रासायनिक संकेतां(signal)मध्ये रूपांतर होतं आणि मज्जापेशींमधून ते मेंदूला पोहोचतात. मानवी मेंदूत १००,०००,०००,००० एवढ्या मज्जापेशी असतात. दर क्षणाला ह्या मज्जापेशी इतर हजारो मज्जापेशींना संकेत पाठवत असतात. ह्या सगळ्या जंजाळात मेंदू काही नमुने (patterns) शोधत असतो आणि त्यातून आपली वास्तवता साकार होते – आपल्या डोक्यात!

साडेतीन वयात दृष्टी गेलेल्या आणि प्रौढ असताना नव्या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया करून दृष्टी मिळालेल्या एका माणसाचं उदाहरण दाखवलं आहे. डोळे पूर्ण बरे होऊनही त्या माणसाला आजही आपल्यासारखं सगळं दिसत नाही. चेहरे ओळखायला त्रास होतो. चेहऱ्यावरचे भाव कळत नाहीत, कागदावरची अक्षरे वाचता येत नाहीत. असं कसं झालं? आपण जेव्हा बघतो, तेव्हा रंग, हालचाल, आकार हे सगळं एकत्र करून आपल्या मेंदूत त्याचं चित्र तयार होत असतं. हे चित्र तयार करणारा भाग वर्षानुवर्षे न वापरल्यामुळे तो ऐकणे, स्पर्श अशा इतर ज्ञानेन्द्रियांसाठी मेंदूने वापरायला घेतला. त्यामुळे डोळे पूर्णपणे बरे होऊनही दृष्टी पूर्ववत झाली नाही. “बघणे” ही फक्त डोळ्यांची कृती नसते. लहान मूल बघायला शिकताना त्याला स्पर्शाचीही जोड देत असतं. त्यातून जवळ-दूर, डावं-उजवं अशी दृष्टीची समज तयार होत जाते. ह्यासंबंधीचे वेगवेगळे प्रयोग दाखवले आहेत.

धावण्याच्या शर्यतीत बंदुकीचा आवाज झाल्याक्षणी सगळे धावू लागतात, असं वाटतं. पण प्रत्यक्षात बंदूक चालणे आणि धावण्याच्या सुरुवातीच्या क्रियेत ०.२ (दोन दशांश) सेकंदाचा अवधी जातो. प्रक्रिया करून समजण्यासाठी तेवढा वेळ मेंदूला लागतो. खरं तर प्रकाश हा आवाजापेक्षा वेगाने प्रवास करतो. मग बंदुकीऐवजी शर्यतीसाठी दिवा ठेवला तर? दिवा लागला की धावायचं! दिवा लावून प्रयोग केल्यावर असं लक्षात आलं, की दिवा वापरल्यावर धावणं सुरू करायला बंदुकीपेक्षा जास्त वेळ लागला! मेंदूची दृश्यप्रक्रिया जास्त किचकट आणि वेळखाऊ आहे. आवाज त्यामानाने लवकर समजतो. मग आपण जेव्हा टाळी वाजवतो, तेव्हा दृश्य आणि आवाज एकाच वेळी कसा दिसतो/ऐकू येतो? दिसण्याआधी आवाज ऐकू यायला हवा ना? मेंदू आपली गंमत करतो – तो संकलन करून, आवाज आणि दृश्याचा मेळ जमवून दोन्ही एकाचवेळी दाखवतो आणि एकत्र असल्याचा आभास निर्माण करतो! हे करायला त्याला अर्धा सेकंद लागतो. म्हणजे आपण जी टाळी अनुभवतो, ती अर्ध्या सेकंदापूर्वीची असते. थोडक्यात, आपण भूतकाळात जगत असतो.

ह्या सगळ्यात अजून एक गंमत असते. आपल्याला मेंदू जे वास्तव दाखवतो, ते फक्त बाहेरून येणाऱ्या संकेतांवरच (signals) नाही, तर आपल्या आतल्या नकाशावरही अवलंबून असतं. आपण जेव्हा फोनच्या कॅमेऱ्याने एखादी चित्रफीत तयार करतो आणि ते करताना फोन हलवतो, तेव्हा आपल्या चित्रफितीत झटके बसल्यासारखं दिसतं. पण आपले डोळे तर आजुबाजूला बघताना खूप हलतात. तरीही आपल्याला सगळ्या वस्तू स्थिर कशा काय दिसतात? आपल्या मनात आजुबाजूचं – आपल्या घराचं, परिसराचं चित्र असतं, नकाशा असतो. तो वारंवार बघून जास्तीत जास्त नेटका केला जातो. तो आतला नकाशा आणि बाहेरून येणाऱ्या संवेदना एकत्र करून, संकलित करून हा मेंदू आपल्याला स्थिर, धक्के-झटके नसलेला परिसर दाखवत असतो! 'वास्तवता' ही त्याने रचलेली गोष्ट असते आणि त्यात आपल्या आतल्या समजुती, धारणा ह्यांना खूप महत्त्व असतं.

जगात विद्युतचुंबकीय लहरींचा खूप मोठा पट्टा आहे. त्यातल्या आपल्याला फक्त तांबड्या ते जांभळ्या दिसतात. आपल्याला रेडिओ लहरी, मायक्रो लहरी, क्ष किरणं अशा कित्येक गोष्टी जाणवत नाहीत. म्हणजे वास्तवातला खूप खूप छोटा भाग आपल्याला जाणवतो आणि त्यावर आपण “आपलं वास्तव” रचतो. कुत्र्यांना आपल्यापेक्षा जास्त वास आणि कमी रंग जाणवतात. वटवाघळांना वेगळ्या लहरी समजतात. म्हणजेच प्रत्येक प्राण्याचं वेगळं वास्तव आहे किंवा प्रत्येक प्राण्याकडे वास्तवाचा वेगळा तुकडा आहे. शिवाय मनुष्यप्राण्यांमध्येही ज्याच्या त्याच्या मेंदूने सांगितलेली वास्तवाच्या तुकड्याची प्रत्येकाकडे अनन्य गोष्ट आहे.

लवकरच भाग २ :) :)