भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने गेल्या महिन्यात “वेदांची तोंडओळख” असा तीन आठवड्यांचा (१८ दिवस) प्रशिक्षण वर्ग ठेवला होता. घरबसल्या नेटवरून शिकायचं असल्यामुळे मला त्यात सहभागी होता आलं, हे खूपच चांगलं झालं. वेदांबद्दल त्यांच्या नावाखेरीज काहीच माहिती नसल्यामुळे “हे आहे तरी काय” अशा उत्सुकतेपोटी मला ह्या वर्गाला जाण्याची इच्छा होती. त्यातून काहीतरी दिव्य ज्ञान मिळणार आहे, असा संस्कृती-अभिमान अजिबात नव्हता आणि धार्मिक दृष्टिकोन तर त्याहूनही नव्हता. भारतीय संस्कृती आणि इतिहासाबाबत थोडी उत्सुकता, जिज्ञासा असाच उद्देश होता आणि तो सफल झाला. :) :)
वेदांचा अभ्यास करणे, समजून घेणे असा काहींचा दृष्टिकोन असतो. तर “गुण गाईन आवडी” म्हणत वेदांचा प्रचार-प्रसार करणे, असा एक वेगळा हेतू असू शकतो. वेदांकडे चिकित्सक दृष्टीने आणि “अभ्यासाचा विषय” म्हणून बघणारे डॉ. थिटे (ते पूर्वी पुणे विद्यापीठात संस्कृत आणि प्राकृतचे विभागप्रमुख होते) आणि डॉ. बहुलकर ह्यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकांचीही काही व्याख्याने ऐकायला मिळाली. एकूण अठरा दिवसांमध्ये काय काय समजलं, त्याचं सार सांगणं जरा लांबलचक आणि अवघडच होईल. म्हणून मला ज्या विशेष वाटल्या, रोचक वाटल्या, त्या गोष्टी अशा :
१. विद् म्हणजे ज्ञान. ह्या धातूपासून वेद हा शब्द आला आहे. संहिता (सूक्तांचा संग्रह) आणि ब्राह्मणे (सूक्तांचं गद्य स्पष्टीकरण) मिळून वेद होतात. ह्या ब्राह्मणांमध्येच आरण्यके आणि उपनिषदे येतात. वेद हे अपौरुषेय आहेत, अशी समजूत होती. म्हणजे ते मनुष्यनिर्मित नाहीत. कधी ते ब्रह्माकडून आले आहेत, असं मानलं जातं. तर कधी ते अनादि-अनंत मानले जातात. पण खरं तर वसिष्ठ, विश्वामित्र, वामदेव अशा वेगवेगळ्या ऋषींची (किंवा त्या घराण्यांची) सूक्तं ऋग्वेदाच्या मंडलांमध्ये आहेत.
२. महाभारताला ‘इतिहास’ संबोधलं गेलेलं आहे. त्याला पाचवा वेदही म्हणतात आणि गीतेला उपनिषद. एका विशिष्ट अधिकाराचं साहित्य हे वेदाच्या योग्यतेला पोहोचतं. त्यामुळे नवनवे वेद येऊ शकतात आणि म्हणून वेद अनंत आहेत, असं मानलं जातं.
३. ऋग्वेद हा साधारण आताच्या पंजाबच्या भागात, सिंधू आणि आता लुप्त झालेली सरस्वती ह्या नद्यांच्या मधल्या भागात रचला गेला आहे. वेदांमध्ये बियासचं नाव “विपाश्” असं आहे तर सतलज नदीचं नाव “शुतुद्री”.
४. ऋग्वेदाच्या काळाबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहेच. शिवाय त्याबद्दल एकवाक्यता होणं हे जवळ जवळ अशक्य आहे. इ. स. पूर्व १००० पासून ते इ. स. पूर्व ४५०० वर्षे अशी वेगवेगळी मतं अभ्यासकांनी दिलेली आहेत. ह्या वर्गामध्ये त्यांनी इ. स. पूर्व २५००-२००० असा काळ धरलेला होता.
५. वेद हे बऱ्याच काळात (शतकांमध्ये) रचले गेले आहेत. ते एका काळातले नाहीत, एका स्थानातले नाहीत आणि एका माणसाचे/कुळाचेही नाहीत. ऋग्वेदात गंगेचा उल्लेख नाही. नंतरच्या काळात अजून पूर्वेला सरकल्यावर गंगा-यमुना येतात. ऋग्वेदात भात आणि वाघाचाही उल्लेख नाही. सातूचा (बार्ली) उल्लेख आहे. नंतरच्या वेदांमध्ये मात्र तांदळाचा उल्लेख येतो. शेती अगदी कमी आहे. पशुपालन हाच मुख्य व्यवसाय आहे. सर्व मोठ्या व्यवहारांसाठी मुख्यत: बैल किंवा सोनं देण्याबाबत सांगितलं आहे. गुरांसाठी लढायाही होत असत.
६. कोणत्याही धार्मिक साहित्याप्रमाणे वेदांमध्येसुद्धा तीन प्रकारच्या गोष्टी आहेत – दंतकथा किंवा दैवतकथा (mythology), कर्मकांड आणि नीतिशास्त्र. ह्या सर्वच गोष्टी त्या काळाला अनुसरून आहेत. तीन प्रकारचा विचार ह्यात आढळतो – काही शास्त्रीय गोष्टी (कार्यकारणभाव असलेल्या), काही जादुई गोष्टी (कार्यकारणभाव नसलेल्या – उदा. एखाद्या पक्ष्याला बघितल्यामुळे अमुक एक घडतं) आणि काही देवाला सर्वोच्च मानून केलेला विचार.
७. ऋग्वेद ही मनुष्याच्या ज्ञानाची उपलब्ध असलेली सगळ्यात जुनी ग्रंथसंपदा आहे. “त्या काळासाठी” त्यातलं ज्ञान, विचार, भाषा ही खूपच पुढारलेली होती. उदा. वैदिक काळात गणिताचं, खगोलशास्त्राचं काही मूलभूत ज्ञान त्यांना झालं होतं. चांद्रमास आणि सूर्यमासातला फरक आणि आकडेमोड माहीत होती. अधिकमासाची संकल्पना होती. यज्ञाची व्यवस्था करताना विटा रचत असत. विटा कशा बनवायच्या, भाजायच्या असं तंत्र त्यांना अवगत होतं. रथ तयार करता येत होते. रथांच्या शर्यतींचा उल्लेख आहे. त्या काळातल्या जगासाठी ते नक्कीच पुढारलेलं होतं. मात्र सध्याच्या काळातल्या ज्ञानाशी त्याची तुलना करता येणार नाही. अशी तुलना अगदी व्यर्थ आहे.
८. वेद हे पूर्वी मौखिक परंपरेने जतन केले गेले आणि बरेच नंतर लिहिले गेले. त्या काळी लिखाणाचं साहित्य मिळवणं, लिहिणं आणि लिहिलेल्या गोष्टी नंतर जतन करणं हे सगळंच इतकं अवघड होतं, की पाठ करून जतन करणं हे त्यापेक्षा सोपं होतं. कदाचित लेखनकला वेदांच्या नंतर विकसित झाली असू शकेल. अजून एक गोष्ट म्हणजे लिखित साहित्याचा वापर कराव्या लागणाऱ्याला कमी दर्जाचा विद्वान समजलं जाई. फक्त वैदिकच नाही तर बौद्ध, जैन साहित्याचीही मौखिक परंपराच होती.
९. ऋग्वेदात जातीव्यवस्थेचा उल्लेख नाही. फक्त एका सूक्तात वर्णांचा उल्लेख आहे. पण ते सूक्त नंतरच्या काळातलं आहे. स्त्रियांना खूप महत्त्व नसलं, तरी हीन लेखलेलंही नाही. सगळे यज्ञ नवरा-बायकोने मिळून एकत्रपणेच करायचे आहेत. बायको नसेल तर नवऱ्याला एकट्याला यज्ञ करता येत नाही.
१०. ऋग्वेदात सगळ्यात जास्त महत्त्व अग्नीला आहे, मग इंद्राला आणि मग इतर. त्या काळी अन्न शिजवायला, प्रकाश आणि उष्णता मिळवायला अग्नी इतका महत्त्वाचा होता, की सगळ्यात जास्त महत्त्व त्याचंच असणं स्वाभाविक होतं. इंद्र हा त्यांचा सेनापती होता, रक्षणकर्ता होता. म्हणून त्यालाही खूप महत्त्वाचं स्थान होतं. विष्णू, रुद्र ह्यांना त्यामानाने फारसं महत्त्व नव्हतं. संस्कृती कशी बदलत जाते, ते बघणं मनोरंजक आहे. आज हजारो वर्षांनंतर इंद्राची किंवा अग्नीची मंदिरं कुठे दिसत नाहीत. पण शिव आणि विष्णूची मात्र असंख्य मंदिरं आहेत!
११. वैदिक संस्कृत ही अभिजात संस्कृतपेक्षा (म्हणजे कालिदासाची आणि आपल्याला परिचित असलेली) थोडी वेगळी आणि जास्त समृद्ध आहे. साधारण दहा टक्के फरक आहे, असं म्हणता येईल. आताच्या संस्कृतमध्ये नसलेली “ळ” आणि “ळ्ह” अशी अक्षरं त्यात आहेत! साधारण २००० वर्षांपूर्वी पहिल्यांदा “संस्कृत” असा उल्लेख येतो. त्याआधीच्या भाषेला सगळीकडे फक्त “भाषा” असं म्हटलेलं आहे. पाणिनीने सुद्धा “भाषा” असंच म्हटलं आहे.
१२. यज्ञासाठी सगळीकडे ‘सोम’ वनस्पती आणि सोमरसाचं खूप महत्त्व विशद केलेलं आहे. ही वनस्पती नक्की कोणती, ते आता सांगता येत नाही. इराणी लोकांमध्ये सुद्धा ह्या वनस्पतीचं महत्त्व आहे. तिथे तिला “सोम” ऐवजी “होम” म्हटलं आहे. पण सोमरस म्हणजे मद्य नाही. मद्याला “मद्य” किंवा “सुरा” म्हटलेलं आहे.
१३. वेदांमधल्या दैवतकथा (mythology) ह्या प्रवाही, बदलणाऱ्या आहेत. इंद्र हा आधी नेता होता, त्याच्या शौर्यकथा आहेत. मग कालांतराने त्याचं दैवत झालं आणि आता तर काही विशेष महत्त्वही उरलं नाही. एकूणच ह्या प्रवाही संस्कृतीने यज्ञाकडून मूर्तिपूजेकडे आणि प्राण्यांच्या आहुतीपासून शाकाहाराकडे प्रवास केलेला आहे.
१४. ऋग्वेदातील सूक्तांमध्ये संवादसूक्त आहेत. ह्या संवादांचा बऱ्याचदा संदर्भ लागत नाही आणि नंतरच्या काळातल्या साहित्यावरून त्याचा अर्थ लावला जातो. उदा. विश्वामित्र-नदी संवादसूक्तात बियास आणि सतलजच्या (विपाश् आणि शुतुद्री) संगमाच्या ठिकाणी पूर आला आहे आणि विश्वामित्राचा नदीशी संवाद होतो आहे. त्याच्याबरोबर “भारत” लोक आहेत. नंतरच्या काळातील साहित्यावरून हा दाशराज्ञ युद्धाच्या वेळचा संवाद असल्याचं लक्षात येतं. (हे महाभारताच्या बऱ्याच आधी झालेलं मोठं युद्ध आहे). नंतरच्या काळातल्या प्रसिद्ध संस्कृत नाट्यपरंपरेची बीजं अशा संवाद सूक्तांमध्ये दिसतात.
१५. ऋग्वेदातलं ‘नासदीय सूक्त’ हे खूप महत्त्वाचं आणि सुंदर आहे. विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घ्यायचा प्रयत्न त्यात केलेला आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे विश्वनिर्मितीचं श्रेय इथे परमेश्वराला दिलेलं नाही, तर देवसुद्धा विश्वनिर्मितीनंतरच आल्याचं म्हटलं आहे! त्यात वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला आहे. सुरुवातीला काय होतं? असत् होतं की सत् होतं? की अवकाश होता? की खोल पाणी होतं? आणि मग असं म्हटलंय, की ह्याबद्दल खात्रीपूर्वक काही सांगता येणार नाही. देवही नंतर आले. त्यामुळे परमेश्वरालाही हे माहीत असेल की नाही, ते सांगता येणार नाही! ह्यातून खरं तर अज्ञेयवाद (agnosticism) डोकावतो. हे सूक्त ही ह्या प्रशिक्षण वर्गातली मला सगळ्यात जास्त आवडलेली, भावलेली गोष्ट आहे.
१६. यजुर्वेद मुख्यत: यज्ञ, आहुती आणि कर्मकांडांशी संबंधित आहे. कुणी यज्ञ करायचा, कोणत्या दिवशी (उदा. पौर्णिमा), कोणतं नक्षत्र असताना, कुठल्या दिशेला, रचना काय, मंत्र कोणते, आहुती कशाची असे भारंभार तपशील दिलेले आहेत. लोणी, तूप अशा गोष्टी तर अग्नीत टाकायचेच. शिवाय बकरीसारख्या प्राण्यांची आहुतीही दिली जायची. अश्वमेध यज्ञात घोड्याची आहुती दिली जायची. पुरुषमेध यज्ञात माणसाची आहुती द्यायचे की ती प्रतीकात्मक आहुती असायची, ह्यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. कालांतराने हिंसा कमी होऊन पिष्टपशूंची (पिठाचे प्राणी) आहुती द्यायला सुरुवात झाली. आजकाल जे काही लोक यज्ञ करतात (हे प्रमाणही कमीच आहे), त्यात जवळजवळ सगळीकडे पिष्टपशूच असतात.
१७. सामवेद हा मुख्यत: भारतीय संगीताचा पाया म्हणून ओळखला जातो. साम म्हणजे गायले जाणारे मंत्र किंवा ऋचा. ह्यातले बहुतेक मंत्र हे ऋग्वेदातलेच आहेत. एकच मंत्र वेगवेगळ्या चालीत गाता येतो. गंधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद मानला जातो. सामवेदातल्या छांदोग्य उपनिषदात ओंकाराचा उल्लेख पहिल्यांदा आला आहे. ऋग्वेदात तीन ‘उच्चार’ (accents) आहेत. मात्र सामवेदात पहिल्यांदा सात स्वर येतात. त्यांची आज असलेलीच गांधार, पंचम, धैवत अशी सगळी नावं आहेत. आजच्या संगीतापेक्षा त्याचा आविष्कार बराच वेगळा असला तरी काही तत्वं सारखी आहेत. रागांच्या जशा काही वेळा असतात, तसं सामगान कधी गायचं त्या वेळांचाही उल्लेख आहे. सामवेदात बासरीचा उल्लेख आहे. ‘गात्रवीणा’ म्हणून बोटांच्या पेरावर स्वर दाखवायची पद्धत होती.
१८. अथर्ववेदातून त्या काळातल्या दैनंदिन जीवनाची, त्यातल्या वेगवेगळ्या अंगांची माहिती मिळते. काही शुभ आणि माहितीपूर्ण गोष्टी आहेत; तशाच जादूटोणा, चेटूक अशा गोष्टीही खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. इतर कुठल्याही वेदापेक्षा अथर्व वेदात चेटूकविद्येवर जास्त भर आहे. गोत्र, ग्राम, जन, राष्ट्र असे (प्रशासकीय) विभाग केलेले दिसून येतात. शेती, पशुपालन आणि द्यूत (जुगार) ह्यांचा उपजीविकेची साधनं म्हणून उल्लेख आहे. चांगला पाऊस पडू देत म्हणून ढगाला म्हटलेले मंत्र आहेत, पिकावर टोळ येऊ नयेत म्हणून मंत्र आहेत. तसंच द्युतात जिंकावं म्हणून करायची कर्मकांडं आहेत. उदा. द्यूताचे फासे दही आणि मधात ठेवणे! चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मंत्र आहेत. तसंच कुटुंबातल्या सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं, राग जावा, इतर टोळ्यांशी युद्ध होऊ नये अशा सगळ्यासाठी मंत्र आहेत. आवडलेली स्त्री (किंवा पुरुष) वश व्हावी म्हणून, सवतीचं वाईट व्हावं म्हणून, बाळंतपण नीट व्हावं म्हणून, मूल जगावं म्हणून, मुलगा व्हावा म्हणून अशा शेकडो गोष्टींसाठी मंत्र आणि कर्मकांडं दिली आहेत. त्या काळच्या बऱ्याच सामाजिक, राजकीय आणि तात्त्विक गोष्टी ह्या वेदातून लक्षात येतात. मुलीच्या लग्नापूर्वी वडिलांची सत्ता आणि नंतर नवऱ्याची अशी संकल्पना स्पष्ट आहे. म्हणूनच लग्नात कन्यादान आहे. आजही प्रचलित असलेले कन्यादान, लाजा यज्ञ, सप्तपदी हे सगळे विधी अथर्ववेदात येतात.
१९. आयुर्वेदाची बीजं अथर्ववेदात आहेत. शरीराच्या आतल्या बऱ्याच अवयवांची माहिती त्यांना होती. कोणत्या रोगांवर कोणत्या वनस्पती वापरायच्या ह्याचा विचार केलेला आहे. वनस्पतींचं वर्गीकरणही केलेलं आहे. अर्थातच इथेही मंत्र, कर्मकांडं आहेतच. उदा. कुठले मणी बांधून कुठला रोग बरा होतो, ह्यासारखे उपचार बरेच आहेत.
वेदांचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या संस्था, विद्यापीठं आहेत. त्यांच्या अभ्यासात जिज्ञासा, कुतूहल, इतिहास आणि संस्कृती समजून घेण्याची इच्छा आणि तळमळ दिसते. त्याबद्दल मला आदरच आहे. मात्र आजही बऱ्याच ठिकाणी वेदपाठशाळा आहेत. त्यात रोज नऊ-दहा तास अभ्यास करून १२-१३ वर्षं शिक्षण घेतल्यावर एक वेद शिकून होतो. हे शिक्षण पुराण काळातल्या मौखिक परंपरेनुसार चालतं. वेदात पारंगत झालेल्यांना ‘वेदमूर्ती’ अशी पदवी मिळते. लहान म्हणजे दहा-बारा वर्षांच्या मुलांना अशा वेदपाठशाळांमध्ये पाठवून त्यांना आधुनिक शिक्षणापासून वंचित ठेवणं मला तरी खूपच चुकीचं वाटलं. अभ्यासक लोकांना अभ्यास करायला मौखिक परंपरांची मदत झाली. उच्चार किंवा सामगान समजून घेता आले. पण ह्या काळात ती परंपरा सुरू ठेवण्यामागची भूमिका, कार्यकारणभाव मला अनाकलनीय आहे. ज्यांच्याकडे ह्या परंपरेचं ज्ञान आहे, त्यांच्या सगळ्यांच्या शेकडो चित्रफिती तयार करून ठेवता येतील. ऐतिहासिक ऐवज म्हणून जपता येईल. अभ्यास-संशोधनाला वापरता येईल. पण हजारो वर्षांपूर्वीची शिक्षणपद्धती तशीच सुरू ठेवणं मला तरी समजू शकलेलं नाही.
बऱ्याच लोकांना वेदांची माहिती घेताना “आपण” तेव्हा एवढा विचार केला होता, “आपल्याला” अमुकतमुक माहीत होतं, असा अभिमान वाटत असतो. मला अर्थातच असं काही वाटत नाही. ह्या देशात हजारो वर्षांत एवढा संकर झाला आहे, की स्वत:ला “आपण” म्हणून नासदीय सूक्तांसारख्या गोष्टींचा अभिमानही कुणी वाटून घेऊ नये किंवा प्राण्यांच्या आहुत्यांबद्दल अपराधी, क्षमायाचकही होऊ नये, असं वाटतं. समजा असा काही संकर झाला जरी नसता, तरी जन्म हा शेवटी जीवशास्त्रीय आणि भौगोलिक अपघात आहे. त्यामुळे हजारो वर्षांपूर्वीच्या ह्या देशात राहणाऱ्या माणसाने त्याच्या आजुबाजूच्या गोष्टींकडे कसं बघितलं, त्याचा काय अर्थ लावला आणि तो कसा जगला; ह्याच्या उत्सुकतेपलीकडे त्यात अभिमान किंवा अस्मिता मला तरी वाटत नाही.
ह्या प्रशिक्षणातून अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे प्राच्यविद्येबाबत एखादा लेख वाचणं किंवा एखादं पुस्तक वाचणं, कधी सहलीला गेल्यावर एखाद्या इतिहासकालीन ठिकाणाला भेट देऊन तिथलं सगळं उत्साह-कौतुकाने पाहणं इतपतच मला त्याची आवड आहे. त्याहून जास्त काही मला ह्या विषयात रस नाही. यजुर्वेदासारख्या कर्मकांडांनी भरलेल्या साहित्याची तर नावडच आहे. शिवाय इतरत्रही चेटूक, मंत्र, कर्मकांडे ह्यांचा डोंगर पोखरून नासदीय सूक्तासारखा देखणा उंदीर काढायची माझी वृत्ती नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे असा अभ्यास करून ह्या विषयाची तोंडओळख माझ्यासारख्या लोकांना करून देणाऱ्या सर्व तज्ज्ञांबद्दल मला चांगलाच आदर-कौतुक वाटून मी हा वर्ग संपवला.