डेव्हिड एपस्टाईन ह्यांचं “Range - Why Generalists Triumph in a Specialist
World” नावाचं, विविधांगी
असण्याचं महत्त्व विशद करणारं पुस्तक नुकतंच वाचलं. आपण किंवा आपल्या
मुलांनी कशात तरी “विशेषज्ञ” व्हावं, अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते आणि त्यासाठी
अगदी लहानपणापासून एखाद्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करून मोठं यश मिळवता येईल, असं त्यांना वाटत
असतं. एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणारी व्यक्ती वेगवेगळी इतर कौशल्ये शिकल्यामुळे
(शिकून सुद्धा नव्हे!) कशी यशस्वी होते, हे स्पष्ट करणं हा ह्या पुस्तकाचा मुख्य
उद्देश आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच रॉजर फेडरर आणि टायगर वूड्स ह्या
दोन महान खेळाडूंच्या जडणघडणीबद्दल लिहिलं आहे. अगदी दोन वर्षांचा असतानाच टायगर
वूड्सला गोल्फचा चेंडू मारता आला आणि चार वर्षांचा असल्यापासून त्याने वडिलांच्या
मार्गदर्शनाखाली गोल्फचं प्रशिक्षण सुरू केलं. त्याउलट फेडरर मात्र लहानपणी बरेच
वेगवेगळे खेळ खेळला – फूटबॉल, बास्केटबॉल, पोहणे, टेबल टेनिस आणि मग हळूहळू त्याचा
टेनिसकडे ओढा वाढत गेला आणि शेवटी त्याने तो खेळ निवडला. वेगवेगळ्या खेळांमधून
त्याची अंगयष्टी तयार झाली, हाता-डोळ्यांचा समन्वय साधला आणि तो एक अष्टपैलू खेळाडू
झाला.
बुद्धिबळातल्या जगप्रसिद्ध पोल्गार भगिनी किंवा टायगर वूड्स
अशी शक्य तितक्या लवकर सुरुवात करून यशाचं शिखर गाठणारी काही उदाहरणं असली, तरी
विरुद्ध बाजूची उदाहरणं जास्त आहेत, असं लेखकाचं म्हणणं आहे. त्याखेरीज,
आयुष्यातली बरीच क्षेत्रं ही बुद्धिबळ किंवा गोल्फइतकी नियमबद्ध आणि सरळ नसतात.
त्यात जास्त घटक, जास्त गुंतागुंत, संदिग्धता आणि बऱ्याच
अज्ञात गोष्टी असतात. अशा वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रातली कौशल्ये नुसती उपयोगीच
नाही, तर आवश्यकही ठरतात. लेखकाने वेगवेगळी वाद्यं शिकलेल्या संगीतकारांची,
वादकांची उदाहरणं दिली आहेत. व्हॅन गॉगसारखा अतिशय महान कलावंत आयुष्यात किती
उशिरा चित्रकलेकडे वळला, ते सांगितलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या
पाहिजेत, प्रयोग करायला हवे आणि त्यातून आपला मार्ग गवसला पाहिजे. लेखकाने ह्याला “चाचपणीचा
काळ” (sampling period) म्हटलं आहे. “लवकरात लवकर आपण क्षेत्र ठरवून, आधी सुरुवात
करून सगळ्यांच्या पुढे जाऊ” अशा विचारसरणीपेक्षा चाचपणीचा काळ कसा महत्त्वाचा आहे,
ह्याची लेखकाने पुष्कळ उदाहरणं दिली आहेत.
पुस्तकात ज्ञानाची ‘खोली’ की ‘रुंदी’ ह्यावर बरीच उदाहरणं
देऊन विस्तृत चर्चा केली आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांची जी भाकितं साफ चुकली, त्याचा
आढावा घेतला आहे. शीतयुद्धाच्या काळातल्या ज्या तज्ज्ञांची विश्लेषणं आणि भाकितं
चुकली, त्याबद्दल अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं, की विशेषज्ञ जितका जास्त
प्रसिद्ध आणि माध्यमांत दिसणारा, तितके त्याचे अंदाज जास्त चुकले होते. फक्त
स्वत:च्याच क्षेत्रावर झापडबंद पद्धतीने लक्ष केंद्रित केल्याचे आणि आजूबाजूच्या
इतर गोष्टींचं अवधान न राखल्याचे हे परिणाम आहेत, असं लेखकाला वाटतं. स्वत:च्या
मतांबद्दल ह्या तज्ज्ञांना पुष्टीग्रह (confirmation bias) असतो आणि म्हणून
त्यांना त्यांची गृहीतं, समजुती तपासता-बदलता येत नाहीत.
ह्याउलट म्हणजे नोबेलविजेत्या कोणत्या शास्त्रज्ञांना स्वत:च्या
विषयाखेरीज इतर विषयांचं ज्ञान होतं, ह्याबद्दलही विस्ताराने सांगितलं आहे. आधी
वैद्यकशास्त्र शिकून नंतर रसायनशास्त्र शिकलेल्या नोबेलविजेत्याला दोन्ही ज्ञानाची
सांगड घातल्याचा कसा फायदा झाला, ते आपल्याला समजतं. चौकटीबाहेरचा विचार करणं, एका
विषयातून आलेली समज, दृष्टी, कल्पना दुसऱ्या विषयात वापरणं हे माणसाचं खरं वैशिष्ट्य
आहे. अशा गोष्टींमध्ये संगणकापेक्षा माणसाचीच गरज भासणार आहे.
“आतला दृष्टिकोन” आणि “बाहेरचा दृष्टिकोन” ह्या विषयावरही
चर्चा केली आहे. एका औषध कंपनीच्या संशोधकांना जे प्रश्न सुटले नाहीत, ते जेव्हा
संकेतस्थळावर देऊन त्यासाठी बक्षीस ठेवलं, तेव्हा जनसहभागातून (crowd sourcing) बाहेरच्या
लोकांनी बरीच चांगली आणि कल्पक उत्तरं सुचवली. एखाद्या क्षेत्राशी संबंध नसलेल्या
लोकांना बाहेरचा, वेगळा दृष्टिकोन असल्यामुळे त्या क्षेत्रातले प्रश्न कसे सुटतात,
ह्याची वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. सखोल ज्ञान असल्याने काही गोष्टी जास्त समजतात,
पण त्या पूर्वग्रहामुळे इतर बऱ्याच गोष्टी नजरेस पडत नाहीत.
पुस्तकात बारा प्रकरणं असली तरी फिरून फिरून
वेगवेगळी उदाहरणं देऊन त्याच गोष्टी परत परत सांगितल्यासारखं वाटतं. वेगवेगळ्या
गोष्टी करून बघाव्या, प्रयोग करत रहावे, झापडबंद विचार करू नये, गृहीतकं तपासत
जावी, चुका करणं महत्त्वाचं असतं, आपलं काम आणि आपली नीट जोडी जमत नसेल तर वेगळ्या
क्षेत्रात जाता येतं आणि तसं करण्यात फायदाच असतो इ. मुद्दे वेगवेगळ्या वळणांनी
येत राहतात. उदाहरणं पुष्कळ असली, तरी हा सगळा वानगीचा पुरावा आहे. प्रत्यक्ष ठोस
आकडेवारी त्यामानाने खूपच कमी दिलेली आहे. बऱ्याचदा असं वाटतं, की ह्यातल्या काही
उदाहरणांचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीनेही करता येऊ शकतं. मात्र माझ्यासारख्या
पन्नाशीच्या तोंडावर उभ्या असलेल्या व्यक्तीला “ह्यानंतरही वेगळं काही करता येईल
आणि त्यात आधीच्या अनुभवांचा फायदाच होईल” अशी प्रेरणा किंवा दिलासा देण्याचं कामही
हे पुस्तक नक्की करतं.