रविवार, ६ जून, २०२१

पर्यावरणावरील महासंकट आणि त्यावरचे उपाय - बिल गेट्स ह्यांचे नवे पुस्तक

 ५ जूनला 'साप्ताहिक सकाळ'च्या पर्यावरण दिन विशेषांकात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची वेब आवृत्ती  इथे वाचता येईल.  'साप्ताहिक सकाळ'मध्ये शब्दसंख्या मर्यादित असल्यामुळे लेख जरा संक्षिप्त केला होता. मूळ विस्तारित लेख इथे देत आहे.

गेल्या सुमारे पन्नास वर्षांत जगावर प्रभाव पाडणारा विलक्षण माणूस म्हणजे बिल गेट्स. ह्या माणसाचे  पहिले  रूप बहुतेक सगळ्यांच्या परिचयाचे  आहे. संगणक क्रांतीतील  त्यांचे  योगदान आणि त्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले, ते त्यांचे  पहिले  रूप. दुसरे  रूप त्याहूनही जास्त  लोकोत्तर आहे. ह्या दुसऱ्या रूपात आपल्या अफाट संपत्तीतला ९५% भाग समाजकार्यासाठी द्यायचा निश्चय करून  गरीब देशांमधून  क्षय, मलेरिया, पोलिओ अशा रोगांचे  उच्चाटन करण्यासाठी झटताना आपण त्यांना पाहिले  आणि आता त्यांच्या तिसऱ्या रूपात त्यांनी 'पर्यावरण' हा विषय हाती घेतलेला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी   How To Avoid A Climate Disaster: The Solutions We Have And The Breakthroughs We Need (पर्यावरणावरचे  संकट कसे  टाळता येईल? आपल्याकडची उत्तरे  आणि नव्या वाटांची गरज ) हे पुस्तक लिहिले आहे आणि नुकतेच फेब्रुवारीत ते प्रकाशित झाले आहे.  आलिशान मोठ्या घरात राहणारा, विमानाने फिरणारा अतिश्रीमंत माणूस पर्यावरणाबद्दल कशाला बोलतो, असा प्रश्न लोक उपस्थित करतात. लोकांचा आक्षेप मान्य करूनही गेट्स ह्यांनी सांगितले आहे, की हे पुस्तक बरीच वर्षे अभ्यास करून माहितीपूर्वक, विचारपूर्वक  लिहिलेले आहे आणि ते स्वत:च्या आयुष्यात नेहमी शिकत आणि बदल करत आलेले आहेत.    

आपण सगळे मिळून दरवर्षी ५१ अब्ज टन (म्हणजे  ५१ वर ९ शून्ये!) एवढे उष्णता-धारक वायू वातावरणात सोडतो आणि हे प्रमाण दरवर्षी वाढतेच  आहे. आपल्याला जर पृथ्वीवरचा  विनाश थांबवायचा असेल, तर हे प्रमाण २०५० सालापर्यंत  शून्यावर आणावे  लागेल, हे पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते स्पष्ट करतात. वातावरणातले  प्रदूषण आणि कर्ब-उत्सर्जन "कमी करणे" हे ध्येय नसून "शून्य करणे" हेच ध्येय आवश्यक आहे. नळाची धार कमी केली तरी बादली (थोड्या उशिरा का होईना) भरून वाहतेच. त्यामुळे जिथे नळ बंद करायचा असतो, तिथे बंदच करावा लागतो. कमी करून भागत नाही. करोना काळातही हे उत्सर्जन फक्त ५ टक्क्यांनीच कमी झाले. म्हणजे शून्यावर आणणे हे कसे  प्रचंड गोवर्धन पर्वत उचलण्याचे काम आहे, ते लक्षात येते.  तरीही माणसाने पूर्वी कधीही सोडवला नाही असा हा पर्यावरणाचा प्रश्न आणि तोही  इतक्या वेगाने सोडविण्याबाबत ते आशावादी आहेत. ह्या  प्रश्नाचा सर्व अंगांनी धांडोळा घेऊन पुस्तकाच्या शेवटी ते शून्याकडे  (शून्य उत्सर्जनाकडे) जाण्याचा ढोबळ आराखडा सांगतात.     

 आपण जो कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात सोडतो, त्यातला २०% वायू पुढची १०,००० वर्षे वातावरणात तसाच राहतो! त्यामुळे आपल्याला नुसतीच शून्याकडे वाटचाल करून भागणार नाही, तर पूर्वी उत्सर्जित केलेले  उष्णता-धारक वायू काढून घेण्याची व्यवस्थाही कधी ना कधी करावी लागणार आहे. औद्योगिकक्रांतीच्या आधीच्या काळाशी तुलना केली, तर पृथ्वीचे  आजचे  तापमान एक  अंश सेल्सिअसने वाढलेले  आहे. आपण जर उत्सर्जन थांबवू शकलो नाही, तर २०५० पर्यंत हे तापमान १.५ ते ३ अंशांनी वाढेल आणि २१०० सालापर्यंत ४ ते ८ अंशांनी वाढेल. शिवाय, १.५ आणि २ अंशांमध्ये अर्ध्या अंशाचा फरक असला, तरी २ अंश तापमान वाढल्यावर होणारी हानी मात्र १.५ अंशाच्या हानीच्या दुप्पट असणार आहे. दुप्पट लोकांच्या आयुष्यावर त्याचे भयानक परिणाम होणार आहेत. 

 

जगाची लोकसंख्या (स्थिर होण्यापूर्वी) मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आजही जगातल्या ८० कोटी लोकांकडे वीज नाही. बऱ्याच गरीब देशांमध्ये खूप मोठ्या लोकसंख्येला धड घरे नाहीत. ह्या  सगळ्या लोकांना व्यवस्थित राहणीमान मिळू नये, असे  म्हणताच येणार नाही. जगात सगळ्यांना प्रगती करता यायला हवी, सुविधा मिळायला हव्या. गरिबी निर्मूलनाचे स्वागत करायला हवे. त्यामुळे उत्सर्जन वाढतच जाणार आहे. उदाहरणार्थ, येत्या ४० वर्षांमध्ये जगात प्रचंड प्रमाणावर बांधकाम होणार आहे आणि इमारती उभ्या राहणार आहेत. दर महिन्याला एक नवे न्यूयॉर्क शहर उभे केल्याइतकी  बांधकामे जगात पुढची चाळीस वर्षे होत राहणार आहेत. त्यामुळे वापर कमी करून उत्सर्जन थांबवू, असे मानण्याला काही अर्थ नाही. जे संसाधनांचा  भरमसाट  वापर करतात, त्यांनी तो कमी केलाच पाहिजे. पण त्याचवेळी  संपूर्ण जगाचा वस्तूंचा, विजेचा आणि वाहतुकीचा वापर वाढतच जाणार आहे हे समजून घ्यावे लागेल आणि त्यानुसार मार्ग काढावा लागेल.  

आपण वर्षाला जे ५१ अब्ज टन उत्सर्जन करतो, त्यातले ३१% उत्पादन क्षेत्रातून (स्टील, सिमेंट, प्लास्टिक इ.)२७% ऊर्जा क्षेत्रातून (कोळसा, नैसर्गिक वायू ), १८% शेती आणि पशुपालनातून, १६% वाहतुकीतून (विमान, जहाजे, गाड्या) आणि ६%  इमारती उबदार किंवा थंड राखण्यातून होते.  

ऊर्जा - जगातली ४०% ऊर्जानिर्मिती  कोळशापासून होते. गेली ३० वर्षे हे प्रमाण साधारण असेच आहे. कारण त्याला मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान मिळत राहते. २०१८ साली जगाने ४०० अब्ज  डॉलर्स  हे  पारंपरिक ऊर्जेवर 'अनुदान' म्हणून खर्च केले आहेत.  सौर ऊर्जा, पवन ऊर्जा ह्यावर चर्चा करून त्यांचे प्रमाण कसे वाढवता येईल, त्यातली आव्हाने कोणती, त्यात अजून कुठले नवे संशोधन लागेल  हे  तर विस्ताराने  सांगितले आहेच.  पण शून्यावर जायचे असल्यास अणुऊर्जेला पर्याय नाही, हेही नि:संदिग्धपणे सांगितलेले आहे. अणुऊर्जा जास्तीत जास्त सुरक्षित कशी करता येईल ह्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तिला विरोध करण्यावर भर दिला जातो, हे दुर्दैवी आणि चुकीचे आहे असे  गेट्स ह्यांनी स्पष्ट शब्दांत मांडलेले आहे. अणुऊर्जेचे प्रश्न सोडवणारे नव्या पद्धतीचे रूपक (model)  त्यांनी महासंगणक वापरून शोधले आहे.

उत्पादन क्षेत्र - स्टील, सिमेंट, काँक्रीट, प्लास्टिक, काच ह्या वस्तूंचे उत्पादन थांबवणे अशक्य आहे. उलट वाढत्या लोकसंख्येमुळे ते वाढत जाणार आहे. उत्पादन प्रक्रियेसाठी जी प्रचंड वीज आणि उष्णता लागते, ती अपारंपरिक  स्रोत  किंवा अणुऊर्जेपासून मिळवावी लागेल.  त्याखेरीज स्टील आणि सिमेंट तयार करताना ज्या रासायनिक क्रिया होतात, त्यातून कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडतो, तो पकडून बंदिस्त करावा लागेल. ह्याला कार्बन-कैद म्हणतात.  उत्सर्जन कमी करणारे आणि चांगल्या क्षमतेने कार्बन-कैद करणारे कोणते मार्ग असू शकतात, त्यात काय संशोधन चालू आहे ह्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे.   

शेती आणि पशुपालन  - शेती आणि कुरणांसाठी जी जंगलतोड होते, त्यातून १.६ अब्ज टन   कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात वाढतो. युरोप आणि आशियातल्या श्रीमंत देशांमध्ये २०% अन्न वाया जाते, फेकले जाते. अमेरिकेत हा आकडा ४०% वर जातो. हे  फेकलेले अन्न सडते आणि त्यातून मिथेन वायूचे उत्सर्जन होते. हा मिथेन  ३.३ अब्ज  टन  कार्बन डाय ऑक्साईडएवढी उष्णता निर्माण करतो. २१०० सालापर्यंत पृथ्वीची लोकसंख्या ४०% ने वाढणार आहे. पण  अन्नाची मागणी मात्र त्याहून बरीच जास्त वाढणार आहे. कारण जशी आर्थिक परिस्थिती सुधारते, तसे लोक जास्त अन्न घेतात आणि जास्त मांसाहार करतात. मांसाहारासाठी (प्राण्यांना खाऊ घालायला) जास्त पीक घ्यावे लागते.  अन्नाची मागणी ७०% ने वाढेल असा  अंदाज आहे. त्यामुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या जातींवर संशोधन करणेदुष्काळात, पुरात टिकणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करणे इथपासून ते  उत्सर्जन न करणारी खते तयार करणे आणि प्रतिमांसाचे पदार्थ तयार करणे अशा विविध पातळीवर काय काय प्रयत्न सुरू आहेत आणि अजून किती लढाई बाकी आहे ते वाचायला मिळते. प्रतिमांस म्हणजे मांस असल्यासारखे दिसते आणि  चवीलाही तसेच  लागते; पण ते शाकाहारी असते. स्वत: गेट्स मांसाहारी बर्गर आणि प्रतिमांसाचे बर्गर ह्यातला फरक ओळखू शकले नाहीत, त्याबद्दल ते सांगतात. मांसाहारासाठी पशुपालन आणि त्यातून मोठ्या प्रमाणात  मिथेन उत्सर्जन होत असल्यामुळे  प्रतिमांसाचा वापर वाढवणे महत्त्वाचे  आहे.

वाहतूक - पेट्रोल हे अतिशय शक्तिशाली आणि त्यामानाने स्वस्त स्फोटक द्रव्य आहे. जैविक इंधने (biofuels), हायड्रोकार्बन इंधने, त्यांचे तंत्रज्ञान, त्याच्या किंमती, त्यातले नवीन संशोधन आणि आव्हाने  ह्या सगळ्याची विस्ताराने चर्चा केली आहे.  इलेक्ट्रिक गाड्या (वीजनिर्मिती हरित तंत्रज्ञानाने केली असल्यास) चांगल्या आहेत आणि  त्यांचा वापर वाढवत न्यावा लागेल. पण मोठ्या वाहनांना आणि लांब पल्ल्यासाठी हे तंत्रज्ञान वापरताना मर्यादा पडतात. विमान उड्डाण करते, तेव्हा त्याच्या एकूण वजनातले २० ते ४० टक्के  वजन हे इंधनाचे असते. जेट इंधनाऐवजी तेवढीच ऊर्जा देणाऱ्या जर बॅटरी वापरायच्या  ठरवल्या, तर त्या बॅटरीजचे वजन जेट इंधनाच्या तब्बल  ३५ पट असेल. म्हणजे वजन इतके जास्त होऊ शकते, की उड्डाणच करता येणार नाही! अशी आव्हाने, त्याला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानात नवकल्पना येण्याची, संशोधनाची गरज आणि त्याबाबत आपण कुठवर पोहोचलो आहोत, हे सगळे ते सोप्या भाषेत उलगडून सांगतात.   

तापमान राखणे  (इमारती उबदार किंवा थंड राखणे)  -  नवीन बांधकामे करताना तापमान राखणाऱ्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा  आणि  थंड प्रदेशांमध्ये पाणी घरे गरम ठेवण्यासाठी कोणती ऊर्जा आणि कशी वापरावी, ह्याचे विवेचन केलेले आहे. विकसनशील देशांमध्ये वातानुकूलन वापरण्याचे प्रमाण किती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे, त्याला  किती प्रचंड ऊर्जा लागणार आहे आणि त्यासाठी स्वच्छ (प्रदूषण न करणारी) वीज कशी आवश्यक आहे ह्याचेही तपशील वाचायला मिळतात.

जसजशी जगातली गरिबी कमी होत जाणार आहे, तसतसे उत्सर्जन वाढत जाणार आहे. म्हणून आपल्याला नवीन तंत्रज्ञान, कल्पकता, संशोधन ह्यांची नितांत गरज आहे. गरीबांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारत उत्सर्जन शून्याकडे नेण्याची कसरत करावी लागणार आहे. शून्याकडे जाण्याचा पल्ला एका रात्रीतून साध्य होणार नाही. त्यासाठी काही दशकांचे अथक परिश्रम लागणार आहेत. मधल्या काळात (आतापासूनच) आपल्याला तापमानवाढीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.  दुर्दैवाने तापमानवाढीला जे फारसे कारणीभूत नाहीत अशा गरीबांना ह्याचा सगळ्यात जास्त फटका बसतो आहे आणि बसणार आहे. ह्या  बदलांमुळे दुष्काळ आणि पूर वारंवार येत राहणार आहेत. टोळधाडींना पोषक वातावरण तयार होत त्यांची संख्या वाढत जाणार आहे. हवेतला आणि जमिनीतला ओलावा आटत जाऊन कोरड्या शेतजमिनींमुळे पिकांचे नुकसान होणार आहे. आफ्रिका आणि दक्षिण आशियातल्या शेतकऱ्यांना हलाखीचे दिवस येणार आहेत. उत्सर्जनात आफ्रिकेचा वाटा सध्या फक्त २% आहे. पण सगळ्यात जास्त झळ त्यांना पोहोचणार आहे. त्यामुळे तिथे मदत करण्यावर भर द्यायला हवा. जिथे राहताच येणार नाही, त्या किनारपट्टीच्या लोकांची कायमची वेगळी सोय करावी लागेल. दुष्काळात आणि पुरात टिकून राहणाऱ्या पिकांच्या जाती विकसित कराव्या लागतील. आपत्कालीन परिस्थिती हाताळायच्या आणि लोकांचे पुनर्वसन करायच्या व्यवस्था तयार ठेवाव्या लागतील.

 गेट्स हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले आहेत म्हणून ते ह्या प्रश्नाचे उत्तर तंत्रज्ञानात शोधतात असे वाटू शकते. पण प्रश्नाची व्यापकता आणि आकडेवारी ह्या सगळ्यांतून ते हे सिद्ध करून दाखवतात, की नवीन तंत्रज्ञान शोधणे आणि तंत्रज्ञानाचा विकास करणे ह्याखेरीज हा प्रश्न सुटणे अशक्य आहे. "फक्त" तंत्रज्ञान पुरेसे नाही. पण तंत्रज्ञानाशिवाय शून्याकडे जाताच येणार नाही.  तंत्रज्ञानाबरोबरच सरकारी  धोरणांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. सरकारने ह्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या  संशोधनात कशी गुंतवणूक केली पाहिजे, ते सांगितले आहे. आज आपण वापरत असलेले इंटरनेट, महत्त्वाची औषधे, फोनमधला जीपीएस ह्या सर्व तंत्रज्ञानांमध्ये सुरुवातीला सरकारी  गुंतवणूकच होती.  त्याखेरीज पर्यावरणपूरक गोष्टींचा प्रसार होईल अशी आर्थिक धोरणे आखून मागणी वाढवली पाहिजे. 

आज जी करोनाची जागतिक महामारी आली आहे, तशी येऊ शकते हे माहीत असूनही आपण सगळे गाफील राहिलो आणि परिस्थिती अवघड झाली. निदान पर्यावरणाच्या बाबतीत तरी आपण आताच पाऊले उचलणे गरजेचे आहे. नवे संशोधन, नवकल्पना ह्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. खूप मोठ्या प्रमाणावर प्रयोग करावे लागतात, चाचण्या घ्याव्या लागतात. अशा जटिल प्रश्नांसाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, राज्यशास्त्र अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम व्हावे  लागते. त्यांचा समन्वय साधावा लागतो. प्रायोगिक तत्त्वावर चाललेल्या गोष्टी सिद्धता टप्प्यातून विस्तार टप्प्याकडे न्याव्या लागतात. फक्त तंत्रज्ञानात अभिकल्पना आणून थांबता येत नाही, तर व्यवसायाच्या पद्धतीपायाभूत सुविधा, मागणी-पुरवठ्याच्या पद्धती, विक्री व्यवस्था ह्या सगळ्या मोठया प्रमाणात  बदलणार आहेत. तिथे प्रत्येक ठिकाणी कल्पकता आणि निर्मितीक्षमता लागणार आहे. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक गाड्यांना ठिकठिकाणी चार्जिंगची व्यवस्था लागेल. सौरऊर्जा साठवायच्या आणि वाहून नेण्याच्या नव्या पद्धती लागतील. कार्बन-कैद पद्धत वापरायची तर त्याचे नियम लागतील. तसे कायदे करावे लागतील. अंमलबजावणीची व्यवस्था लागेल. शिवाय सर्व नव्या गोष्टी सगळ्यांनी वापरण्याइतक्या स्वस्त कराव्या लागतील. त्यासाठी मागणी वाढवावी लागेल. मागणी वाढलीकी तंत्रज्ञान स्वस्त होते.       

गेट्स ह्यांनी सुचवलेला आराखडा असा -  

१. संशोधनावरचा सरकारी खर्च पाचपट करा

२. सरकार आणि उद्योगधंद्यांनी एकत्र काम करा - उद्योगांनीही गुंतवणूक करा 

३. सर्व सरकारी कामे आणि प्रकल्पांसाठी फक्त हरित तंत्रज्ञान वापरलेल्याच वस्तू, इंधन विकत घ्या आणि मागणी निर्माण करा 

४. कार्बन कर लावा आणि हरित तंत्रज्ञान वापरणाऱ्या उद्योगांना सवलती द्या

५. नव्या तंत्रज्ञानासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करा

६. हरित ऊर्जा, हरित इंधने आणि हरित उत्पादनाची मानके तयार करून जाहीर करा   

७. नवे कायदे, करपद्धती आणि व्यापारी व्यवस्था तयार करा 

८. हे सर्व देशांनी मिळून करायचे काम आहे आणि त्यासाठी श्रीमंत राष्ट्रांनी पुढाकार घेऊन सुरुवात करा

९. वेगवेगळ्या देशांनी एकमेकांशी व्यापार करताना हरित तंत्रज्ञानाच्या अटी घाला 

१०. ह्यासाठीची धोरणे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक अशा सर्व पातळ्यांवर वेगाने राबवा

बिल गेट्स हे पॅरिस पर्यावरण कराराच्या वेळी उपस्थित आणि सक्रिय होते. पर्यावरणाशी संबंधित धोरणे राबवावीत ह्यासाठी ते  वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संपर्क आणि संवाद करत असतात. नवीन तंत्रज्ञान आणि अभिकल्पना पुढे याव्यात म्हणून गेट्स ह्यांनी स्वत: वेगवेगळ्या संशोधनांना अर्थसाहाय्य दिलेले आहे आणि गुंतवणुकी केलेल्या आहेत. सुरक्षित अणुऊर्जा तयार करणारी कंपनी काढून त्याचा प्रयोग करण्याची सिद्धता केलेली आहे. जगभरातल्या २८ अतिश्रीमंत लोकांना घेऊन breakthroughenergy.org   नावाची संस्था सुरू केली आहे. ह्यात जेफ बोझोस, जॅक मा अशांचा सहभाग आहे. ह्याद्वारे  हे लोक नवीन हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक करतात.

पण आपण सामान्य माणसे काय करणार? तर आपल्यालाही करण्यासारख्या गोष्टी त्यांनी सुचवल्या आहेत. आपण सगळे नागरिक आणि ग्राहक असतोच. शिवाय आपल्यापैकी काहीजण काम करणारे किंवा काम देणारेही असतो. ह्या सर्व भूमिकांमध्ये आपण शक्य ते करायला पाहिजे. आपल्या कामाच्या ठिकाणी हरित तंत्रज्ञान वापरावे म्हणून आपण मागणी आणि पाठपुरावा  करू शकतो. आपले स्थानिक राजकारणी, अधिकारी ह्यांना पत्र लिहू शकतो. निवडणुकीत हा मुद्दा यावा म्हणून दबावगट तयार करू शकतो. ग्राहक म्हणून मांसाहार कमी करू शकतो, प्रतिमांस खाऊ शकतो. ज्यांना गाडी घ्यायची आहे, ते इलेक्ट्रिक गाडी घेऊ शकतात. थोडासा खर्च जास्त झाला तरीही हरित तंत्रज्ञानाच्या वस्तू , ऊर्जा आपण वापरू  शकतो. आपण मागणी वाढवल्यावरच हे स्वस्त होणार आहे.

हे पुस्तक अगदी  सरळ, सोपे आणि थेट मुद्द्याला हात घालणारे आहे. मनोरंजक व्हावे म्हणून उगीचच  किस्से, विनोद घालायला बघायचे आणि त्यात विषयाचा नेमकेपणा गमावून बसायचे, असे अजिबात केलेले नाही. बरीच आकडेवारी आणि तंत्रज्ञान सोपे करून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू सफल झालेला आहे आणि हे सगळे करताना कुठेही कंटाळवाणे झालेले नाही. पर्यावरणाचा गुंतागुंतीचा व्यापक प्रश्न आणि त्याचे बहुपदरी महत्त्वाकांक्षी उत्तर ह्याचा विस्तृत पट ह्यातून आपल्याला चांगला समजतो. महत्त्वाच्या विषयावरचे महत्त्वाचे पुस्तक वाचल्याचे समाधान मिळते. 

-------

कार्बन-कैद ( स्पष्टीकरण )

 कार्बन कैद करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ज्या प्रक्रियांमधून कार्बन डाय ऑक्साइड बाहेर निघतो, तिथेच तो पकडून कैद करायचा आणि दुसरी म्हणजे थेट हवेतून कार्बन डाय   ऑक्साइड मिळवून तो पकडून बंदिस्त करायचा. त्याचे द्रवात रूपांतर करून तो कुठेतरी साठवून ठेवावा लागतो. हा साठा किती, कुठे करणार आणि त्याची किंमत, परिणाम असे प्रश्न आहेतच. आता ह्या वायूचा घनरूपात कार्बन करण्याचेही तंत्रज्ञान आले आहे.