आतून हादरवून टाकणारं
समोर येतं काही
मन एकदम सुन्न होतं
शरीर बधिर होई
अवघड असतात असले क्षण
मग सर्र सारायचे बाजूला
एक सोयीचा शब्द शिंपडून
स्वच्छ करायचं मनाला
'पण' हा तो शब्द
'पण' ते असंच दुसरं माहीत आहे का?
'पण' ते असंच दुसरं खुपलं होतं का?
'पण' मग जुने हिशोब पाहिले आहेत का?
'पण' अशाने विरुद्ध बाजूचं फावणार आहे का?
मग असाच 'पण' शोधणाऱ्या
सगळ्यांनी गोळा व्हायचं
एकमेकांना हात देऊन
ठाम राहायला बळ द्यायचं
दुसरीकडे असतातच टपून बसलेले
दु:ख झालं म्हणतानाही डाव साधणारे
खिन्नता दूर सारून जोश चढलेले
त्वेषाने एकेकावर तुटून पडणारे
आपण मात्र तिसऱ्या कोपऱ्यात
गपगुमान उभं राहायचं
कुणी काही म्हटलं तरी
कोडगेपणाने हसत राहायचं
चार दिवसाने शांत होईलच
आपण मोकळे नाचरेपणा करायला
"वडा खाल्ला, चहा प्यायला"
मोठ्या अप्रुपाने सांगायला