मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

कविता - आरशांचा महाल

वादळासारखं नाही घुसत ते 

गडगडाट, कडकडाट करत नाही 

धुक्यासारखं हळूहळू पसरत असतं

आपण गाढ साखरझोपेत  

जाग येते तेव्हा सगळं धूसर दिसतं 

आपला उजेड झाकोळलेला 

आपला रस्ता बुडालेला  


आधी नुसती कुजबूज असते 

"हे विकलेले, ते फितूर"

मग रोज येतात कथनं

मित्रांकडून, शेजाऱ्यांकडून 

लिहून आलं म्हणजे खरं असणार 

चित्र आहे म्हणजे तथ्य असणार 

मग आवाज वाढत जातो 

मोठमोठ्याने घुमू लागतो 

माध्यमांमधून, रस्त्यावरून

घडी बसलेल्या व्यवस्थांमधून

सगळा भोवताल होयबाची वाडी

आरशांच्या महालात एकच एक चेहरा 

चारी बाजूंना प्रतिध्वनी, प्रतिबिंब 

भोवळ आणणारा चमचमाट, झगमगाट 


आपला चेहरा हरवलेला 

आतला हुंकारही ऐकू येत नाही 

शोधायची धडपड कराल का?

मोकळं आकाश मागाल का?

तुमच्या कपाळी "कारस्थान" असं लिहिलं जाईल 

तुमच्या द्रोहाचे नगरात फलक उभे राहतील 


भव्य मंदिर अजूनही उभं आहे, 

त्यावर कुठलाच घाव नाही 

एकेक खांब मात्र आतून पोखरतो  

स्तोत्रांचा आवाज वाढत जातो 

सगळं सुरक्षित, सगळं मंगल आहे 

डोलारा उभा तोवर आलबेल आहे  

डोलारा कोसळण्यापूर्वी जमा होतील का, 

धुकं झाडून टाकणारे लखलखीत किरण? 




गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

कविता - नदी हरवते शहरातून

 नदी हरवते शहरातून

हळूहळू ओढेही बुजती

मोजती मासे घटका

दूषित पाणी अन् माती


सांडपाणी आणि कचरा 

आवळती  रोजच गळा 

जन म्हणती माता-देवी 

आणिली  उतरती कळा   

नदी हरवते शहरातून...  


पक्ष्यांची घरटी होती

ती झाडे तोडली कोणी

एकेक प्रकल्पामागे

मुरतेच वेगळे पाणी

नदी हरवते शहरातून...


या सिमेंटी विकासाने 

नित पारा चढता राही 

का घटती घटती होते  

त्या नदीतटी वनराई 

नदी हरवते शहरातून..

कवी ग्रेस आणि पं. हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्याबद्दल आदर व्यक्त करून ... जे उघड्या डोळ्यांना दिसतं आणि मनापासून वाटतं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ तंबोऱ्यावर प्रियदर्शन सहस्रबुद्धे  भावपूर्ण गायला आहे. चैतन्य केतने दृश्य माध्यमातून वास्तव समोर ठेवलं आहे.
सहजच, स्क्रोल करत करत किंवा घाईघाईने ऐकाय-बघायचं हे गाणं नाही. वेळ आणि लक्ष देऊन, शांततेत, आपण स्वतःशीच प्रामाणिकपणे समजून घ्यायचं हे गाणं आहे. कदाचित, आपण नदीशी जोडले जाऊ. कदाचित, खोलवर काही जाणवेल. कदाचित . ...