मुनियाच (मनोली) नाही, तर बाकीही बरेच जण रोज हक्काने येतात, विश्वासाने इथे बसून जातात त्याचा एक वेगळाच आनंद आहे. लहान मूल जसं हक्काने आपल्या खांद्यावर मान टेकवतं तसं. एकदा उन्हाळ्यात आंब्याच्या साली आणि थोडासा खराब झालेला भाग असाच एका कुंडीत टाकला होता (माझा सगळाच ओला कचरा खत होण्यासाठी कुंडीत जातो). तर शीळ घालत बुलबुल आला आणि तो आंबा, सालीला चिकटलेला गर असं खाऊन गेला! तेव्हापासून मी त्याच्यासाठी नेहमीच त्या कुंडीत खाऊ ठेवू लागले – पपईच्या साली, चिक्कूचा खराब भाग, सफरचंदाचा मधला बियांजवळचा भाग असा एका ठराविक कुंडीत टाकते. स्वारी रोज येते. गोडशी शीळ घालून आल्याची वर्दी देते. आधी बसून सगळीकडे बघून अंदाज घेते आणि मग कुंडीत जाऊन खाऊ खाते. आजकाल तर जोडी येऊ लागली आहे!
अजून एक रोज न चुकता खाऊ खायला (म्हणजे प्यायला) येणारा म्हणजे पिटुकला सूर्यपक्षी – sunbird. लोटेन नावाच्या श्रीलंकेत काम करणाऱ्या डच गव्हर्नरमुळे ह्याला Loten’s Sunbird असं नाव पडलं. अशा चिमुकल्या, नाजुक आवाजाच्या पक्ष्याला ‘सूर्यपक्षी’ का म्हणावंसं वाटलं, कोण जाणे! तर ह्याचा खाऊ म्हणजे फुलांतला मध. ज्या फुलांचा आपल्याला वास येत नाही, अशा जास्वंद, गणेशवेल इ. फुलांचाही तो मध शोषून घेतो. त्याच्या बोटभर शरीराच्या मानाने लांब म्हणावी अशी अरुंद बाकदार चोच फुलात घालून आणि कधी कधी उलटा लटकून तो मध पिताना दिसतो. म्हणून त्याचं ‘पुष्पंधय’ हे संस्कृत नाव जास्त अर्थपूर्ण वाटतं. झाडाजवळ, फुलांजवळ आला की बसण्यापूर्वी तो आधी हेलिकॉप्टरसारखा एका ठिकाणी हवेत थांबतो. इंग्लिशमध्ये hover म्हणतात तसा आणि मग मध घ्यायला बसतो. मादी वरून तपकिरी आणि खालून फिकट पिवळी दिसते, तर नर चमकदार काळा आणि पाठीवर, मानेपाशी निळी-जांभळी चकाकी असते. त्यांचं बारीक आवाज करत येणं, जास्वंदीपासून सोनटक्क्यापर्यंत मिनिटभरात भिरभिरत चंचलपणे फिरणं, हे सगळं रोज बघण्याचा आता छंदच जडला आहे.
सकाळी ६-६:१५ ला किंवा दुपारी ३ च्या सुमाराला बऱ्याचदा आमच्या बाल्कनीच्या भिंतीवर, एका ठराविक ठिकाणीच जोडीने बसलेले दिसतात ते चिमुकले, काळसर आणि गोबरे-गोबरे swifts. काळा रंग असा आहे, की लांबून त्यांचे काळे डोळे दिसतच नाहीत. ह्यांना मराठीत दुर्बल म्हणतात म्हणे! काहीतरीच नाव आहे. तर ह्यांना झाडाच्या फांदीला किंवा एखाद्या दांडीला पकडून बसता येत नाही. म्हणून ते भिंतीवर बसलेले असतात. माझ्या घरी येईपर्यंत मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं.
बाकी साळुंक्या, चिमण्या, कावळे पण रोज येतच असतात. पोपट लांबून दिसतात. रोज थवेच्या थवे उडताना दिसतात. बिल्डिंगच्या भिंतीवर पण असतात. पण अजून कधी बाल्कनीत नाही आले. माझ्याकडे मिरची आहे, डाळिंबं येतात. तरी नाही आले. पारवे मात्र सगळ्यांनाच नकोसे झालेत आणि मी पण त्यांना हाकलत राहते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा