"लॅटिन अमेरिकेत जन्माला आलेल्या जादुई वास्तववादाला (मॅजिकल रिअलिझम )आपल्या लेखनकृतींमधून एका वेगळ्या उंचीवर नेणारे प्रख्यात कोलंबियन लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्केझ यांच्या एका गाजलेल्या लघुकथेचा प्राजक्ता महाजन यांनी केलेला हा अनुवाद."
'मिळून साऱ्याजणी'च्या फेब्रुवारी २०२१ च्या अंकात हा अनुवाद प्रकाशित झालेला आहे.
पावसाचा आज तिसरा दिवस. त्यांनी घरात इतके खेकडे मारले होते, की त्या उग्र वासामुळेच बाळाला रात्रभर ताप होता की काय असं त्यांना वाटू लागलं. म्हणून मागच्या अंगणातल्या साचलेल्या पाण्यातून वाट काढत पलायो ते खेकडे समुद्रात टाकायला निघाला. मंगळवारपासूनच जगावर शोककळा पसरल्यासारखं दिसत होतं. समुद्र आणि आभाळ एकाच राखाडी रंगात माखलेले होते आणि चांदण्या रात्री रुपेरी दिसणाऱ्या रेतीचा नुसता चिखल झाला होता, सडक्या शिंपल्यांचा लगदा. खेकडे टाकून पलायो घरी परतत होता, तेव्हा भर दिवसाच इतकं अंधारून आलं होतं, की त्याला अंगणाजवळ नक्की कसली हालचाल आहे, कोण कण्हत आहे ते नीट दिसेना.जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा त्याला तिथं चिखलात पालथा पडलेला म्हातारा दिसला, जख्ख म्हातारा. कितीही प्रयत्न केला, तरी त्याच्या अगडबंब पंखांमुळे त्याला उठता येत नव्हतं.
हे भयंकर दृश्य पाहून भेदरलेला पलायो धावतच त्याची बायको एलिझेंडाकडे गेला. ती बाळाच्या कपाळावर पट्ट्या ठेवत होती. तिला त्याने घाईघाईने मागच्या अंगणात आणलं. ते दोघंही थिजून गेल्यासारखे त्या म्हाताऱ्या शरीराकडे बघत राहिले. एखाद्या भिकाऱ्यासारखे कपडे होते त्याचे. तोंडात फारसे दात नव्हते आणि टकलावर अगदी तुरळक पांढरे केस उरले होते. पावसात भिजून चिंब झालेला हा बिचारा म्हातारबाबा कधी काळी दिमाखदार असेल का, अशी शंकाही मनाला शिवत नव्हती. त्याचे विशाल, लांबसडक पंख कुरतडलेले, चिखलात माखलेले आणि अगदी अजागळ दिसत होते. पलायो आणि एलिझेंडा त्याच्याकडे इतका वेळ इतकं लक्षपूर्वक बघत राहिले, की थोड्याच वेळात त्याची नवलाई संपून तो अगदी ओळखीचा वाटू लागला. मग त्यांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. एखाद्या नावाड्यासारख्या मजबूत आवाजात त्याने भलत्याच भाषेत काहीतरी उत्तर दिलं. ती अनाकलनीय भाषा ऐकून त्या दोघांनी पंखांबद्दल काही विचारायचा नाद सोडून दिला आणि वादळात कुठलंतरी परदेशी जहाज बुडाल्यावर वाचलेला हा जीव असणार असं अनुमान काढलं. नंतर त्यांनी शेजारच्या बाईला त्याला बघायला बोलावलं. तिच्याकडे आयुष्याचं सगळं ज्ञान होतं. एका कटाक्षात सगळं तिच्या लक्षात आलं. ती म्हणाली, “हा तर देवदूत आहे. तुमच्या बाळासाठी आला असणार. पण बिचारा इतका म्हाताराय, की पावसाने अगदी दुर्दशा झाली हो त्याची.”
‘पलायोकडे हाडा-मांसाचा देवदूत ठेवला आहे’ ही बातमी दुसऱ्या दिवशी वाऱ्यासारखी पसरली. खरं तर पहिल्याच दिवशी शेजारच्या ज्ञानी बाईने त्यांना सांगितलं होतं, की ह्या काळातले देवदूत म्हणजे कुठल्यातरी दैवी कारस्थानातले फरारी लोक असतात. पण त्याला मारून टाकायचा काही त्यांचा जीव झाला नाही. सगळा दिवस पलायो हातात काठी घेऊन स्वयंपाकघरातून त्याच्यावर लक्ष ठेवून होता. शेवटी रात्री झोपायला जाण्यापूर्वी त्याने म्हाताऱ्याला चिखलातून फरफटत नेऊन कोंबड्यांच्या मोठ्या खुराड्यात जाळीमागे कुलुपात टाकून दिलं. मध्यरात्री पाऊस थांबला, तेव्हा पलायो आणि एलिझेंडा खेकडे मारत होते. थोड्या वेळाने बाळ उठलं, तेव्हा त्याचा ताप पूर्ण उतरला होता आणि ते आता दूधही पिऊ लागलं होतं. त्यामुळे त्यांना इतकं महान वाटलं, की त्यांनी तीन दिवस पुरेल एवढं अन्न-पाणी बरोबर देऊन ह्या देवदूताला नावेत घालून समुद्रात सोडून द्यायचं ठरवलं. पुढे तो आणि त्याचं नशीब. पण पहाटे तांबडं फुटताना ते अंगणात गेले, तर गल्लीतल्या लोकांचा जमावच खुराड्यापुढे जमला होता. असा दैवी जीव बघून आदर वाटणं तर दूरच, लोक त्याला जाळीतून अन्न फेकत होते. सर्कशीतल्या प्राण्यासारखं त्याच्याकडे बघत होते.
सकाळी सातच्या सुमारास फादर गोंझागा आले. तोपर्यंत पहाटपेक्षा जरा कमी थिल्लर लोकही आले होते आणि “ह्याचं पुढे काय करावं” अशी चर्चा करत होते. जे अगदीच साधे सरळ होते, त्यांना वाटत होतं, की ह्याला जगाचा प्रमुख करावं. त्यांच्याहून बरे लोक म्हणाले, की ह्याला सैन्यप्रमुख करावं म्हणजे सगळी युद्धं जिंकता येतील. काही शहाणे तर म्हणू लागले, की ह्याच्यामुळे पंख असलेल्या हुशार लोकांचा वंश सुरू करता येईल आणि मग पृथ्वीवरचे असे जीव अख्ख्या विश्वावर राज्य करतील. फादर गोंझागा हे फादर होण्यापूर्वी लाकूडतोडीचं काम करत असत. त्यांनी जाळीजवळ जाऊन आतल्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि लगेच खुराड्याचं दार उघडायला सांगितलं. आतल्या गोंधळलेल्या कोंबड्यांमध्ये बिचारा म्हातारा त्यांना अगडबंब क्षीण कोंबडीसारखाच दिसला. फळांची सालं, टरफलं अशा कचऱ्यातच एका कोपऱ्यात पडून तो सूर्यप्रकाशात स्वतःचे पंख वाळवत होता. फादर गोंझागा आत जाऊन त्याला लॅटिनमध्ये “सुप्रभात” म्हणाले. जगरीतीची काहीच कल्पना नसल्यामुळे तो त्याच्या थकलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत कोणत्यातरी अगम्य भाषेत पुटपुटला. फादरना तेव्हाच शंका आली, की हा तोतया असणार. एकतर ह्याला देवाची भाषा येत नाही आणि दुसरं म्हणजे देवाचं काम करणाऱ्या फादरशी कसं बोलावं, हेही माहीत नाही. त्यांनी अजून जवळ जाऊन पाहिलं तर तो खूपच माणसासारखा वाटला. खुराड्याचा वास त्याच्या अंगाला येत होता. पंखांची वादळात वाताहत झाली होतीच, शिवाय त्यावर गोचिडंही बसली होती. त्याच्यामध्ये तेजस्वी देवदूताचं कुठलंच लक्षण नव्हतं. फादर खुराड्याच्या बाहेर आले आणि लोकांना म्हणाले, “इतक्या भाबडेपणाने त्याच्याकडे पाहू नका. भोळ्या, बेसावध लोकांना सैतान फसवत असतो, हे लक्षात ठेवा. पंख आहेत म्हणून ससाणा आणि विमान एकच ठरत नाहीत. तर नुसत्या पंखांवरून कुणी देवदूत कसा होईल?” ते ह्याबद्दल बिशपना पत्र लिहिणार आहेत, असं फादर गोंझागांनी सगळ्यांना सांगितलं आणि मग पुढे बिशप पोपना आणि पोप विश्वाच्या सर्वोच्च न्यायालयाला हे कळवतील, अशी ग्वाही दिली.
फादरच्या मताचा लोकांवर फारसा परिणाम झाला नाही. बातमी अशा वेगाने पसरली होती, की थोड्याच वेळात तिथे बाजार भरल्यासारखं दिसू लागलं आणि नंतर तर जमाव आवरायला शस्त्रधारी सैनिक बोलवावे लागले. नाहीतर गर्दीच्या रेट्याने पलायोचं घरच पडलं असतं. ह्या गर्दीने बाजार भरवून असा कचरा केला होता, की झाडून झाडून आपला मणका तुटतो की काय असं एलिझेंडाला वाटू लागलं. पण नंतर तिला चांगली युक्ती सुचली. घराला कुंपण घालून पाच सेंट प्रवेशमूल्य ठेवावं, असं तिने ठरवलं.
दूरदूरच्या अंतरावरून लोक उत्सुकतेने येत होते. उडता डोंबारी दाखवणारी मंडळी खेळ करायला गावात आली. गर्दीवरून डोंबाऱ्याने उडूनही दाखवलं. पण तिकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. कारण त्याचे पंख देवदूताचे नाही, तर वटवाघळाचे होते. दुर्दैवी, आजारी माणसं मोठ्या आशेने देवदूताच्या दर्शनाला येत होती. लहानपणापासून स्वत:च्या हृदयाचे ठोके मोजणारी आणि मोजून मोजून सगळे अंक संपून गेलेली गरीब बाई, ताऱ्यांच्या आवाजामुळे झोपू न शकणारा पोर्तुगीज मनुष्य, दिवसभरात केलेल्या सगळ्या गोष्टी रात्री झोपेत चालून नष्ट करणारा माणूस असे कितीतरी. फारसा गंभीर आजार नसलेलेही काही येत असत. पृथ्वीला थरथरवणारी भयंकर दुर्घटना घडलेला तो काळ होता. अशा काळातही पलायो आणि एलिझेंडा मात्र थकलेले पण आनंदात होते. कारण एका आठवड्यातच त्यांच्या खोल्या पैशांनी भरून गेल्या होत्या आणि बाहेर भाविकांची रांग पार क्षितिजापर्यंत गेली होती.
ह्या ‘देवदूत’ कार्यक्रमात तो देवदूत स्वत: सोडला, तर बाकी सगळे सहभागी झाले होते. तो बिचारा त्याला दिलेल्या घरट्याची सवय करून घ्यायच्या प्रयत्नात होता. जाळीजवळ बाहेरच्या बाजूने विधिवत ठेवलेले तेलाचे दिवे आणि मेणबत्त्यांमुळे त्याला नुसतं भट्टीत बसल्यासारखं होत होतं. शेजारच्या ज्ञानी बाईचं म्हणणं होतं, की देवदूतांना खायला डांबराच्या गोळ्या देत असतात. म्हणून लोकांनी त्याला डांबराच्या गोळ्या खाऊ घालायचा प्रयत्न केला. पण त्याने काही त्या खाल्ल्या नाहीत. काहींनी त्याला पोपसाठी असतं तसं जेवण द्यायचा प्रयत्न केला. पण त्याने तेही नाकारलं. तो देवदूत होता म्हणून नाकारलं की तो वांग्याचं मऊ भरीत खाणारा म्हातारबाबा होता म्हणून नाकारलं, कोणास ठाऊक. प्रचंड सोशिकपणा हा एकमेव दैवी गुण त्याच्यात दिसत होता. सुरुवातीच्या काळात तर त्याने खूपच सोसलं. त्याच्या पंखांवरची गोचिडं टिपायसाठी कोंबड्या त्याला टोची मारायच्या. पंगू लोक त्यांच्या अपंग भागावरून फिरवायसाठी त्याची पिसं उपटायचे. अगदी दयाळू लोक सुद्धा तो उठून उभा राहावा आणि आपल्याला नीट दिसावा म्हणून त्याला दगड मारत असत. एकदा तो बरेच तास निपचित पडून होता, तेव्हा तो मेला की काय असं वाटून लोकांनी त्याला गरम सळईने डागण्या दिल्या; तेव्हा मात्र तो उठून उभा राहिला होता. कळवळून उठला बिचारा. डोळ्यांत अश्रू होते. त्याच्या अभेद्य भाषेत तो काहीतरी म्हणाला आणि त्याने पंख फडफडले. त्या फडफडीतून अशी वावटळ आली, की त्यातून कोंबड्यांची विष्ठा, चंद्रावरची धूळ आणि भीतीचं चमत्कारिक वादळ दूरवर पसरलं. ह्या प्रतिक्रियेत राग नाही, तर वेदना होती असं बहुतेकांना वाटलं. पण तरीही त्यानंतर कुणी त्याच्या वाटे गेलं नाही. त्याची शांतता म्हणजे धीरोदात्त नायकपण नसून, ते एक विसावलेलं वादळ होतं, हे बहुतेकांच्या लक्षात आलं.
‘हा पकडलेला जीव कोण’ ह्याबाबतच्या अंतिम निर्णयाची वाट फादर गोंझागा अगदी विनम्रपणे पाहत होते आणि गर्दीच्या थिल्लरपणाला जरा चापही लावत होते. पण रोमहून येणाऱ्या पत्रांमध्ये कसलीच निकड दिसत नव्हती. त्याला बेंबी आहे का, त्याच्या भाषेचं आर्मेइक भाषेशी साधर्म्य आहे का, तो टाचणीच्या टोकावर मावेल का, तो पंख असलेला नॉर्वेचा माणूस तर नाही ना असल्या प्रश्नांमध्येच वेळ घालवत ते उशीर करत होते. ही पत्रं अनंत काळापर्यंत अशीच येत-जात राहिली असती. पण लवकरच एका वेगळ्या घटनेने फादरची ह्या चक्रातून सुटका केली.
गावात वेगवेगळे कलाकार येत असायचेच. त्यात आता एक डोंबाऱ्याचा नवीनच गट आला. त्यातल्या बाईला आई-वडिलांचं न ऐकल्यामुळे कोळी व्हायचा शाप मिळाला होता. भलीमोठी कीटक झाली होती ती, बोकडाच्या आकाराची. जाळं विणण्याखेरीज दुसरं काहीच करता येत नाही अशी. तिला बघायला देवदूतापेक्षा कमी पैसे लागत होते. शिवाय तिची ही भयंकर अवस्था समजून घेण्यासाठी तिला कुठलेही प्रश्न विचारता येत होते आणि सगळ्या बाजूंनी नीट बघताही येत होतं. पण खरं तर तिच्या भयानक रूपापेक्षा ती स्वतःची जी हृदयद्रावक कहाणी सांगायची, ते ऐकून लोकांच्या आतड्याला पीळ पडायचा. पोरसवदाच असताना ती आई-वडिलांना न सांगता नाच करायला घरातून गुपचूप बाहेर गेली. परवानगी नसताना तिने रात्रभर नाच केला. नंतर रानातून परत येत होती तेव्हा विजेचा प्रचंड कडकडाट होऊन आभाळच दुभंगलं आणि आभाळाच्या त्या खाचेतून गंधकाचा भयंकर लोळ तिच्या अंगावर पडून ती एकदम कोळीच झाली. दयाळू लोक तिच्या तोंडात मांसाचे तुकडे फेकायचे आणि त्याच्यावरच तिचं पोषण व्हायचं. तिचं ते दुर्दैवी रूप, तिच्या आयुष्यातलं मानवी सत्य आणि त्या चुकीमुळे वाट्याला आलेले भोग ह्या सगळ्यापुढे कुणी अलौकिक, दैवी देवदूत आपोआपच फिका पडणार होता. शिवाय, देवदूतामुळे जे चमत्कार झाले असं वाटत होतं, ते सगळे विचित्रच होते. म्हणजे कसं, की आंधळ्याला दृष्टी येण्याऐवजी तीन नवीन दात आले; अपंगाला चालता आलं नाही, पण छोटी लॉटरी लागली आणि महारोग्याच्या जखमांमधून सूर्यफुलं उगवली. ह्या असल्या थट्टा केल्यासारख्या सांत्वनपर चमत्कारांमुळे आधीच देवदूत मनातून उतरू लागला होता. त्यात आता ह्या कोळी झालेल्या बाईने त्याची उरलीसुरली हवाही काढून घेतली. त्यामुळे पलायोचं अंगण पूर्वीसारखं रिकामं झालं आणि फादर गोंझागाचा निद्रानाशही एकदाचा बरा झाला.
पलायो आणि एलिझेंडाला दु:ख होण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांनी आधीच खोऱ्याने पैसे जमा करून ठेवले होते. नव्या संपत्तीतून त्यांनी दोन मजली भव्य हवेली बांधली आणि त्याभोवती सुंदर बाग केली. खेकडे आत येऊ नयेत म्हणून जाळी लावली आणि देवदूत येऊ नयेत म्हणून खिडक्यांना लोखंडी सळया लावल्या. पलायोने नोकरी सोडून दिली आणि सशांची पैदास करायला सुरुवात केली. एलिझेंडाने उंची रेशमी कपडे आणि उंच टाचांचे महागडे जोडे आणले. कोंबड्यांचं खुराडं सोडलं तर सगळ्या घरादाराचा कायापालट झाला होता. अधूनमधून ते खुराडं औषध टाकून धुवायचे आणि वास जावा म्हणून तिथे धूप जाळायचे. देवदूतासाठी नाही, तर त्या वासाने नव्या सुंदर घराला आधीच्या जुन्या घराची कळा आल्यासारखं वाटायचं म्हणून. सुरुवातीला जेव्हा त्यांचं बाळ चालायला लागलं, तेव्हा ते त्याला खुराड्यापाशी जाऊ देत नसत. पण हळूहळू त्यांची भीती कमी झाली आणि त्या वासाचीही त्यांना सवय झाली. त्या लहान पोराला दुसरा दात येण्यापूर्वीच तो जिथे खुराड्याची जाळी तुटली होती तिथून आत जाऊ लागला. देवदूत त्या लहान पोरापासूनही अलिप्तच राहिला. पण त्या लहानग्याने काढलेल्या खोड्या मात्र त्याने एखाद्या गरीब कुत्र्याप्रमाणे निमूटपणे सहन केल्या. नंतर त्या दोघांनाही एकाच वेळी कांजिण्या आल्या. मुलाला बघायला आलेल्या डॉक्टरला देवदूतालाही तपासायचा मोह झाला. त्याच्या हृदयातून आणि मूत्रपिंडातून इतके चित्रविचित्र आवाज येत होते, की हा कसा काय जिवंत आहे, अशा विचाराने डॉक्टर चक्रावून गेला. पंख बघितल्यावर तर त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला. त्या मनुष्य-शरीराला ते इतके सहज आलेले होते, की सगळ्याच माणसांना असे पंख का नसतात हेच त्याला समजेना.
पलायोचं मूल शाळेत जाऊ लागण्यापूर्वीच कधीतरी ते खुराडं पूर्ण मोडून पडलं. ऊन-पावसाने ते कधीचंच मोडकळीला आलं होतं. देवदूत सगळीकडे खुरडत खुरडत फिरायला लागला. तो झोपायच्या खोलीत दिसला म्हणून त्याला झाडू घेऊन हाकलावं, तर पुढच्या मिनिटाला तो स्वयंपाकघरात असायचा. “कुठेही बघावं तर तो आहेच तिथे. एकटाच आहे का चार-सहा देवदूत झालेत ह्याचे”, असं त्यांना वाटू लागलं. वैतागलेली एलिझेंडा म्हणाली, “देवदूतांनी भरलेल्या घरात राहणं आता अगदी असह्य झालंय.” तो आता फारसं काही खाऊ शकत नव्हता. त्याच्या वृद्ध डोळ्यांना धुरकट दिसत असल्यामुळे तो सगळीकडे धडकत चालायचा. आता त्याच्याकडे शेवटच्या काही पिसांचे बुडखे सोडून फारसं काही उरलं नव्हतं. शेवटी पलायोने त्याला पडवीत झोपू दिलं आणि त्याच्या अंगावर एक पांघरुण टाकलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की त्याला रात्री ताप भरायचा आणि तो तापात भ्रमिष्टासारखा नॉर्वेजियनमध्ये काहीतरी बडबडायचा. मग मात्र त्यांना चांगलीच चिंता वाटू लागली. त्यांना वाटलं की आता हा मरणार आणि मेलेल्या देवदूताचं नक्की काय करायचं असतं, हे शेजारच्या ज्ञानी बाईलाही माहीत नव्हतं.
तरीसुद्धा कडाक्याच्या थंडीत तो तग धरून राहिला. एवढंच नाही तर जसजसा हिवाळा संपू लागला तशी त्याची तब्येत सुधारू लागली. कुणाला दिसणार नाही असा एका कोपऱ्यात तो बरेच दिवस निपचित पडून राहिला. हळूहळू त्याच्या पंखांवर थोराड राठ पिसं येऊ लागली, वार्धक्याच्या उदास खुणा असल्यासारखी. पण ते बदल कसले आहेत ते त्याला माहीत असणार आणि म्हणूनच त्याने ते कुणाच्या नजरेस पडू दिले नाहीत. कुणी ऐकत नसेल तेव्हा रात्रीच्या चांदण्यात तो समुद्राची गाणी गाऊ लागला. एक दिवस एलिझेंडा सकाळी स्वयंपाक करत होती तेव्हा समुद्रावरून जोराचा वारा आत शिरला. म्हणून ती खिडकीपाशी गेली तर तिला देवदूत उडायची खटपट करताना दिसला. त्याला धड काही जमत नव्हतं. पंखांच्या विचित्र फडफडीमुळे आजूबाजूला पडझड होणार असं वाटत होतं. पण शेवटी कशीबशी त्याने जमीन सोडली आणि त्याचे वृद्ध पंख हलवत तो निघाला. उडत उडत जेव्हा तो शेवटच्या घरांपलीकडे गेला तेव्हा तिने हुश्श म्हटलं, त्याच्यासाठी आणि स्वत:साठीही. ती त्याच्याकडे बघतच राहिली. तो दूरवर दिसेनासा झाला तरीही ती त्याला बघतच होती. कारण आता तो डोकेदुखी नव्हता. आता तो समुद्रातल्या क्षितिजावरचा काल्पनिक ठिपका होता.
मूळ कथा : गॅब्रिएल गार्सिया मार्केझ
अनुवाद : प्राजक्ता महाजन