कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ११ मार्च, २०२१

कथा - अगडबंब पंखांचा म्हातारा

"लॅटिन अमेरिकेत जन्माला आलेल्या जादुई वास्तववादाला  (मॅजिकल रिअलिझम )आपल्या लेखनकृतींमधून एका वेगळ्या उंचीवर नेणारे प्रख्यात कोलंबियन लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्केझ यांच्या एका गाजलेल्या लघुकथेचा प्राजक्ता महाजन यांनी केलेला हा अनुवाद."

'मिळून साऱ्याजणी'च्या फेब्रुवारी २०२१ च्या अंकात हा अनुवाद प्रकाशित झालेला आहे.  

पावसाचा आज तिसरा दिवस. त्यांनी घरात इतके खेकडे मारले होते, की त्या उग्र वासामुळेच बाळाला रात्रभर ताप होता की काय असं त्यांना वाटू लागलं. म्हणून मागच्या अंगणातल्या साचलेल्या पाण्यातून वाट काढत पलायो ते खेकडे समुद्रात टाकायला निघाला. मंगळवारपासूनच जगावर शोककळा पसरल्यासारखं दिसत होतं. समुद्र आणि आभाळ एकाच राखाडी रंगात माखलेले होते आणि चांदण्या रात्री रुपेरी दिसणाऱ्या रेतीचा नुसता चिखल झाला होता, सडक्या शिंपल्यांचा लगदा. खेकडे टाकून पलायो घरी परतत होता, तेव्हा भर दिवसाच इतकं अंधारून आलं होतं, की त्याला अंगणाजवळ नक्की कसली हालचाल आहे, कोण कण्हत आहे ते नीट दिसेना.जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा त्याला तिथं चिखलात पालथा पडलेला म्हातारा दिसला, जख्ख म्हातारा. कितीही प्रयत्न केला, तरी त्याच्या अगडबंब पंखांमुळे त्याला उठता येत नव्हतं.

हे भयंकर दृश्य पाहून भेदरलेला पलायो धावतच त्याची बायको एलिझेंडाकडे गेला. ती बाळाच्या कपाळावर पट्ट्या ठेवत होती. तिला त्याने घाईघाईने मागच्या अंगणात आणलं. ते दोघंही थिजून गेल्यासारखे त्या म्हाताऱ्या शरीराकडे बघत राहिले. एखाद्या भिकाऱ्यासारखे कपडे होते त्याचे. तोंडात फारसे दात नव्हते आणि टकलावर अगदी तुरळक पांढरे केस उरले होते. पावसात भिजून चिंब झालेला हा बिचारा म्हातारबाबा कधी काळी दिमाखदार असेल का, अशी शंकाही मनाला शिवत नव्हती. त्याचे विशाल, लांबसडक पंख कुरतडलेले, चिखलात माखलेले आणि अगदी अजागळ दिसत होते. पलायो आणि एलिझेंडा त्याच्याकडे इतका वेळ इतकं लक्षपूर्वक बघत राहिले, की थोड्याच वेळात त्याची नवलाई संपून तो अगदी ओळखीचा वाटू लागला. मग त्यांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. एखाद्या नावाड्यासारख्या मजबूत आवाजात त्याने भलत्याच भाषेत काहीतरी उत्तर दिलं. ती अनाकलनीय भाषा ऐकून त्या दोघांनी पंखांबद्दल काही विचारायचा नाद सोडून दिला आणि वादळात कुठलंतरी परदेशी जहाज बुडाल्यावर वाचलेला हा जीव असणार असं अनुमान काढलं. नंतर त्यांनी शेजारच्या बाईला त्याला बघायला बोलावलं. तिच्याकडे आयुष्याचं सगळं ज्ञान होतं. एका कटाक्षात सगळं तिच्या लक्षात आलं. ती म्हणाली, “हा तर देवदूत आहे. तुमच्या बाळासाठी आला असणार. पण बिचारा इतका म्हाताराय, की पावसाने अगदी दुर्दशा झाली हो त्याची.”

‘पलायोकडे हाडा-मांसाचा देवदूत ठेवला आहे’ ही बातमी दुसऱ्या दिवशी वाऱ्यासारखी पसरली. खरं तर पहिल्याच दिवशी शेजारच्या ज्ञानी बाईने त्यांना सांगितलं होतं, की ह्या काळातले देवदूत म्हणजे कुठल्यातरी दैवी कारस्थानातले फरारी लोक असतात. पण त्याला मारून टाकायचा काही त्यांचा जीव झाला नाही. सगळा दिवस पलायो हातात काठी घेऊन स्वयंपाकघरातून त्याच्यावर लक्ष ठेवून होता. शेवटी रात्री झोपायला जाण्यापूर्वी त्याने म्हाताऱ्याला चिखलातून फरफटत नेऊन कोंबड्यांच्या मोठ्या खुराड्यात जाळीमागे कुलुपात टाकून दिलं. मध्यरात्री पाऊस थांबला, तेव्हा पलायो आणि एलिझेंडा खेकडे मारत होते. थोड्या वेळाने बाळ उठलं, तेव्हा त्याचा ताप पूर्ण उतरला होता आणि ते आता दूधही पिऊ लागलं होतं. त्यामुळे त्यांना इतकं महान वाटलं, की त्यांनी तीन दिवस पुरेल एवढं अन्न-पाणी बरोबर देऊन ह्या देवदूताला नावेत घालून समुद्रात सोडून द्यायचं ठरवलं. पुढे तो आणि त्याचं नशीब. पण पहाटे तांबडं फुटताना ते अंगणात गेले, तर गल्लीतल्या लोकांचा जमावच खुराड्यापुढे जमला होता. असा दैवी जीव बघून आदर वाटणं तर दूरच, लोक त्याला जाळीतून अन्न फेकत होते. सर्कशीतल्या प्राण्यासारखं त्याच्याकडे बघत होते.

सकाळी सातच्या सुमारास फादर गोंझागा आले. तोपर्यंत पहाटपेक्षा जरा कमी थिल्लर लोकही आले होते आणि “ह्याचं पुढे काय करावं” अशी चर्चा करत होते. जे अगदीच साधे सरळ होते, त्यांना वाटत होतं, की ह्याला जगाचा प्रमुख करावं. त्यांच्याहून बरे लोक म्हणाले, की ह्याला सैन्यप्रमुख करावं म्हणजे सगळी युद्धं जिंकता येतील. काही शहाणे तर म्हणू लागले, की ह्याच्यामुळे पंख असलेल्या हुशार लोकांचा वंश सुरू करता येईल आणि मग पृथ्वीवरचे असे जीव अख्ख्या विश्वावर राज्य करतील. फादर गोंझागा हे फादर होण्यापूर्वी लाकूडतोडीचं काम करत असत. त्यांनी जाळीजवळ जाऊन आतल्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि लगेच खुराड्याचं दार उघडायला सांगितलं. आतल्या गोंधळलेल्या कोंबड्यांमध्ये बिचारा म्हातारा त्यांना अगडबंब क्षीण कोंबडीसारखाच दिसला. फळांची सालं, टरफलं अशा कचऱ्यातच एका कोपऱ्यात पडून तो सूर्यप्रकाशात स्वतःचे पंख वाळवत होता. फादर गोंझागा आत जाऊन त्याला लॅटिनमध्ये “सुप्रभात” म्हणाले. जगरीतीची काहीच कल्पना नसल्यामुळे तो त्याच्या थकलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत कोणत्यातरी अगम्य भाषेत पुटपुटला. फादरना तेव्हाच शंका आली, की हा तोतया असणार. एकतर ह्याला देवाची भाषा येत नाही आणि दुसरं म्हणजे देवाचं काम करणाऱ्या फादरशी कसं बोलावं, हेही माहीत नाही. त्यांनी अजून जवळ जाऊन पाहिलं तर तो खूपच माणसासारखा वाटला. खुराड्याचा वास त्याच्या अंगाला येत होता. पंखांची वादळात वाताहत झाली होतीच, शिवाय त्यावर गोचिडंही बसली होती. त्याच्यामध्ये तेजस्वी देवदूताचं कुठलंच लक्षण नव्हतं. फादर खुराड्याच्या बाहेर आले आणि लोकांना म्हणाले, “इतक्या भाबडेपणाने त्याच्याकडे पाहू नका. भोळ्या, बेसावध लोकांना सैतान फसवत असतो, हे लक्षात ठेवा. पंख आहेत म्हणून ससाणा आणि विमान एकच ठरत नाहीत. तर नुसत्या पंखांवरून कुणी देवदूत कसा होईल?” ते ह्याबद्दल बिशपना पत्र लिहिणार आहेत, असं फादर गोंझागांनी सगळ्यांना सांगितलं आणि मग पुढे बिशप पोपना आणि पोप विश्वाच्या सर्वोच्च न्यायालयाला हे कळवतील, अशी ग्वाही दिली.

फादरच्या मताचा लोकांवर फारसा परिणाम झाला नाही. बातमी अशा वेगाने पसरली होती, की थोड्याच वेळात तिथे बाजार भरल्यासारखं दिसू लागलं आणि नंतर तर जमाव आवरायला शस्त्रधारी सैनिक बोलवावे लागले. नाहीतर गर्दीच्या रेट्याने पलायोचं घरच पडलं असतं. ह्या गर्दीने बाजार भरवून असा कचरा केला होता, की झाडून झाडून आपला मणका तुटतो की काय असं एलिझेंडाला वाटू लागलं. पण नंतर तिला चांगली युक्ती सुचली. घराला कुंपण घालून पाच सेंट प्रवेशमूल्य ठेवावं, असं तिने ठरवलं.

दूरदूरच्या अंतरावरून लोक उत्सुकतेने येत होते. उडता डोंबारी दाखवणारी मंडळी खेळ करायला गावात आली. गर्दीवरून डोंबाऱ्याने उडूनही दाखवलं. पण तिकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. कारण त्याचे पंख देवदूताचे नाही, तर वटवाघळाचे होते. दुर्दैवी, आजारी माणसं मोठ्या आशेने देवदूताच्या दर्शनाला येत होती. लहानपणापासून स्वत:च्या हृदयाचे ठोके मोजणारी आणि मोजून मोजून सगळे अंक संपून गेलेली गरीब बाई, ताऱ्यांच्या आवाजामुळे झोपू न शकणारा पोर्तुगीज मनुष्य, दिवसभरात केलेल्या सगळ्या गोष्टी रात्री झोपेत चालून नष्ट करणारा माणूस असे कितीतरी. फारसा गंभीर आजार नसलेलेही काही येत असत. पृथ्वीला थरथरवणारी भयंकर दुर्घटना घडलेला तो काळ होता. अशा काळातही पलायो आणि एलिझेंडा मात्र थकलेले पण आनंदात होते. कारण एका आठवड्यातच त्यांच्या खोल्या पैशांनी भरून गेल्या होत्या आणि बाहेर भाविकांची रांग पार क्षितिजापर्यंत गेली होती.

ह्या ‘देवदूत’ कार्यक्रमात तो देवदूत स्वत: सोडला, तर बाकी सगळे सहभागी झाले होते. तो बिचारा त्याला दिलेल्या घरट्याची सवय करून घ्यायच्या प्रयत्नात होता. जाळीजवळ बाहेरच्या बाजूने विधिवत ठेवलेले तेलाचे दिवे आणि मेणबत्त्यांमुळे त्याला नुसतं भट्टीत बसल्यासारखं होत होतं. शेजारच्या ज्ञानी बाईचं म्हणणं होतं, की देवदूतांना खायला डांबराच्या गोळ्या देत असतात. म्हणून लोकांनी त्याला डांबराच्या गोळ्या खाऊ घालायचा प्रयत्न केला. पण त्याने काही त्या खाल्ल्या नाहीत. काहींनी त्याला पोपसाठी असतं तसं जेवण द्यायचा प्रयत्न केला. पण त्याने तेही नाकारलं. तो देवदूत होता म्हणून नाकारलं की तो वांग्याचं मऊ भरीत खाणारा म्हातारबाबा होता म्हणून नाकारलं, कोणास ठाऊक. प्रचंड सोशिकपणा हा एकमेव दैवी गुण त्याच्यात दिसत होता. सुरुवातीच्या काळात तर त्याने खूपच सोसलं. त्याच्या पंखांवरची गोचिडं टिपायसाठी कोंबड्या त्याला टोची मारायच्या. पंगू लोक त्यांच्या अपंग भागावरून फिरवायसाठी त्याची पिसं उपटायचे. अगदी दयाळू लोक सुद्धा तो उठून उभा राहावा आणि आपल्याला नीट दिसावा म्हणून त्याला दगड मारत असत. एकदा तो बरेच तास निपचित पडून होता, तेव्हा तो मेला की काय असं वाटून लोकांनी त्याला गरम सळईने डागण्या दिल्या; तेव्हा मात्र तो उठून उभा राहिला होता. कळवळून उठला बिचारा. डोळ्यांत अश्रू होते. त्याच्या अभेद्य भाषेत तो काहीतरी म्हणाला आणि त्याने पंख फडफडले. त्या फडफडीतून अशी वावटळ आली, की त्यातून कोंबड्यांची विष्ठा, चंद्रावरची धूळ आणि भीतीचं चमत्कारिक वादळ दूरवर पसरलं. ह्या प्रतिक्रियेत राग नाही, तर वेदना होती असं बहुतेकांना वाटलं. पण तरीही त्यानंतर कुणी त्याच्या वाटे गेलं नाही. त्याची शांतता म्हणजे धीरोदात्त नायकपण नसून, ते एक विसावलेलं वादळ होतं, हे बहुतेकांच्या लक्षात आलं.

‘हा पकडलेला जीव कोण’ ह्याबाबतच्या अंतिम निर्णयाची वाट फादर गोंझागा अगदी विनम्रपणे पाहत होते आणि गर्दीच्या थिल्लरपणाला जरा चापही लावत होते. पण रोमहून येणाऱ्या पत्रांमध्ये कसलीच निकड दिसत नव्हती. त्याला बेंबी आहे का, त्याच्या भाषेचं आर्मेइक भाषेशी साधर्म्य आहे का, तो टाचणीच्या टोकावर मावेल का, तो पंख असलेला नॉर्वेचा माणूस तर नाही ना असल्या प्रश्नांमध्येच वेळ घालवत ते उशीर करत होते. ही पत्रं अनंत काळापर्यंत अशीच येत-जात राहिली असती. पण लवकरच एका वेगळ्या घटनेने फादरची ह्या चक्रातून सुटका केली.

गावात वेगवेगळे कलाकार येत असायचेच. त्यात आता एक डोंबाऱ्याचा नवीनच गट आला. त्यातल्या बाईला आई-वडिलांचं न ऐकल्यामुळे कोळी व्हायचा शाप मिळाला होता. भलीमोठी कीटक झाली होती ती, बोकडाच्या आकाराची. जाळं विणण्याखेरीज दुसरं काहीच करता येत नाही अशी. तिला बघायला देवदूतापेक्षा कमी पैसे लागत होते. शिवाय तिची ही भयंकर अवस्था समजून घेण्यासाठी तिला कुठलेही प्रश्न विचारता येत होते आणि सगळ्या बाजूंनी नीट बघताही येत होतं. पण खरं तर तिच्या भयानक रूपापेक्षा ती स्वतःची जी हृदयद्रावक कहाणी सांगायची, ते ऐकून लोकांच्या आतड्याला पीळ पडायचा. पोरसवदाच असताना ती आई-वडिलांना न सांगता नाच करायला घरातून गुपचूप बाहेर गेली. परवानगी नसताना तिने रात्रभर नाच केला. नंतर रानातून परत येत होती तेव्हा विजेचा प्रचंड कडकडाट होऊन आभाळच दुभंगलं आणि आभाळाच्या त्या खाचेतून गंधकाचा भयंकर लोळ तिच्या अंगावर पडून ती एकदम कोळीच झाली. दयाळू लोक तिच्या तोंडात मांसाचे तुकडे फेकायचे आणि त्याच्यावरच तिचं पोषण व्हायचं. तिचं ते दुर्दैवी रूप, तिच्या आयुष्यातलं मानवी सत्य आणि त्या चुकीमुळे वाट्याला आलेले भोग ह्या सगळ्यापुढे कुणी अलौकिक, दैवी देवदूत आपोआपच फिका पडणार होता. शिवाय, देवदूतामुळे जे चमत्कार झाले असं वाटत होतं, ते सगळे विचित्रच होते. म्हणजे कसं, की आंधळ्याला दृष्टी येण्याऐवजी तीन नवीन दात आले; अपंगाला चालता आलं नाही, पण छोटी लॉटरी लागली आणि महारोग्याच्या जखमांमधून सूर्यफुलं उगवली. ह्या असल्या थट्टा केल्यासारख्या सांत्वनपर चमत्कारांमुळे आधीच देवदूत मनातून उतरू लागला होता. त्यात आता ह्या कोळी झालेल्या बाईने त्याची उरलीसुरली हवाही काढून घेतली. त्यामुळे पलायोचं अंगण पूर्वीसारखं रिकामं झालं आणि फादर गोंझागाचा निद्रानाशही एकदाचा बरा झाला.

पलायो आणि एलिझेंडाला दु:ख होण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांनी आधीच खोऱ्याने पैसे जमा करून ठेवले होते. नव्या संपत्तीतून त्यांनी दोन मजली भव्य हवेली बांधली आणि त्याभोवती सुंदर बाग केली. खेकडे आत येऊ नयेत म्हणून जाळी लावली आणि देवदूत येऊ नयेत म्हणून खिडक्यांना लोखंडी सळया लावल्या. पलायोने नोकरी सोडून दिली आणि सशांची पैदास करायला सुरुवात केली. एलिझेंडाने उंची रेशमी कपडे आणि उंच टाचांचे महागडे जोडे आणले. कोंबड्यांचं खुराडं सोडलं तर सगळ्या घरादाराचा कायापालट झाला होता. अधूनमधून ते खुराडं औषध टाकून धुवायचे आणि वास जावा म्हणून तिथे धूप जाळायचे. देवदूतासाठी नाही, तर त्या वासाने नव्या सुंदर घराला आधीच्या जुन्या घराची कळा आल्यासारखं वाटायचं म्हणून. सुरुवातीला जेव्हा त्यांचं बाळ चालायला लागलं, तेव्हा ते त्याला खुराड्यापाशी जाऊ देत नसत. पण हळूहळू त्यांची भीती कमी झाली आणि त्या वासाचीही त्यांना सवय झाली. त्या लहान पोराला दुसरा दात येण्यापूर्वीच तो जिथे खुराड्याची जाळी तुटली होती तिथून आत जाऊ लागला. देवदूत त्या लहान पोरापासूनही अलिप्तच राहिला. पण त्या लहानग्याने काढलेल्या खोड्या मात्र त्याने एखाद्या गरीब कुत्र्याप्रमाणे निमूटपणे सहन केल्या. नंतर त्या दोघांनाही एकाच वेळी कांजिण्या आल्या. मुलाला बघायला आलेल्या डॉक्टरला देवदूतालाही तपासायचा मोह झाला. त्याच्या हृदयातून आणि मूत्रपिंडातून इतके चित्रविचित्र आवाज येत होते, की हा कसा काय जिवंत आहे, अशा विचाराने डॉक्टर चक्रावून गेला. पंख बघितल्यावर तर त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला. त्या मनुष्य-शरीराला ते इतके सहज आलेले होते, की सगळ्याच माणसांना असे पंख का नसतात हेच त्याला समजेना.

पलायोचं मूल शाळेत जाऊ लागण्यापूर्वीच कधीतरी ते खुराडं पूर्ण मोडून पडलं. ऊन-पावसाने ते कधीचंच मोडकळीला आलं होतं. देवदूत सगळीकडे खुरडत खुरडत फिरायला लागला. तो झोपायच्या खोलीत दिसला म्हणून त्याला झाडू घेऊन हाकलावं, तर पुढच्या मिनिटाला तो स्वयंपाकघरात असायचा. “कुठेही बघावं तर तो आहेच तिथे. एकटाच आहे का चार-सहा देवदूत झालेत ह्याचे”, असं त्यांना वाटू लागलं. वैतागलेली एलिझेंडा म्हणाली, “देवदूतांनी भरलेल्या घरात राहणं आता अगदी असह्य झालंय.” तो आता फारसं काही खाऊ शकत नव्हता. त्याच्या वृद्ध डोळ्यांना धुरकट दिसत असल्यामुळे तो सगळीकडे धडकत चालायचा. आता त्याच्याकडे शेवटच्या काही पिसांचे बुडखे सोडून फारसं काही उरलं नव्हतं. शेवटी पलायोने त्याला पडवीत झोपू दिलं आणि त्याच्या अंगावर एक पांघरुण टाकलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की त्याला रात्री ताप भरायचा आणि तो तापात भ्रमिष्टासारखा नॉर्वेजियनमध्ये काहीतरी बडबडायचा. मग मात्र त्यांना चांगलीच चिंता वाटू लागली. त्यांना वाटलं की आता हा मरणार आणि मेलेल्या देवदूताचं नक्की काय करायचं असतं, हे शेजारच्या ज्ञानी बाईलाही माहीत नव्हतं.

तरीसुद्धा कडाक्याच्या थंडीत तो तग धरून राहिला. एवढंच नाही तर जसजसा हिवाळा संपू लागला तशी त्याची तब्येत सुधारू लागली. कुणाला दिसणार नाही असा एका कोपऱ्यात तो बरेच दिवस निपचित पडून राहिला. हळूहळू त्याच्या पंखांवर थोराड राठ पिसं येऊ लागली, वार्धक्याच्या उदास खुणा असल्यासारखी. पण ते बदल कसले आहेत ते त्याला माहीत असणार आणि म्हणूनच त्याने ते कुणाच्या नजरेस पडू दिले नाहीत. कुणी ऐकत नसेल तेव्हा रात्रीच्या चांदण्यात तो समुद्राची गाणी गाऊ लागला. एक दिवस एलिझेंडा सकाळी स्वयंपाक करत होती तेव्हा समुद्रावरून जोराचा वारा आत शिरला. म्हणून ती खिडकीपाशी गेली तर तिला देवदूत उडायची खटपट करताना दिसला. त्याला धड काही जमत नव्हतं. पंखांच्या विचित्र फडफडीमुळे आजूबाजूला पडझड होणार असं वाटत होतं. पण शेवटी कशीबशी त्याने जमीन सोडली आणि त्याचे वृद्ध पंख हलवत तो निघाला. उडत उडत जेव्हा तो शेवटच्या घरांपलीकडे गेला तेव्हा तिने हुश्श म्हटलं, त्याच्यासाठी आणि स्वत:साठीही. ती त्याच्याकडे बघतच राहिली. तो दूरवर दिसेनासा झाला तरीही ती त्याला बघतच होती. कारण आता तो डोकेदुखी नव्हता. आता तो समुद्रातल्या क्षितिजावरचा काल्पनिक ठिपका होता.

मूळ कथा : गॅब्रिएल गार्सिया मार्केझ
अनुवाद : प्राजक्ता महाजन 


शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

कथा - पत्रांचे तुकडे

 ताईला लिहिलेल्या पत्रांचे भाग/तुकडे


जुलै १९९०

प्रिय ताई,

आता कॉलेजमध्ये माझं चांगलं बस्तान बसलं आहे. माझ्या रूममेटशी मैत्री झाली आहे. तिची एक गंमत आहे. ती स्वत:बद्दल “मी आली, मी गेली, मी जेवली” असं म्हणते. मी तिला ह्याबद्दल विचारलं, तर म्हणाली, “आमच्याकडे असंच म्हणतात.” सुरुवातीला कानाला फार खटकायचं. पण आता सवय झाली आहे.


ऑगस्ट १९९१

प्रिय ताई,

यंदा अभ्यास मला आवडायला लागलाय. शिकवणारे सगळे चांगले आहेत. मला सगळ्यांसमोर इंग्लिशमध्ये शंका कशी विचारायची ते सुचत नाही. मग मी लेक्चर संपल्यावर जाऊन मराठीत शंका विचारते. बहुतेक सगळे माझ्याशी मराठीत बोलतात. आमचे एक धाडधाड इंग्लिश बोलणारे सर मराठी मात्र “आनी-पानी” प्रकारचं बोलतात! मला आश्चर्यच वाटलं. इतकं शिकलेला, प्राध्यापकी करणारा माणूस मराठी शुद्ध कसं काय नाही बोलू शकत? पण शिकवतात मात्र एकदम छान! सगळ्या संकल्पना अगदी स्पष्ट होतात. आम्ही इथे संकल्पना किंवा कन्सेप्ट वगैरे म्हणत नाही, फंडाज् म्हणतो!!


जानेवारी १९९२

प्रिय ताई,

तुला मी मागे अमोलबद्दल सांगितलेलं आठवतंय का? माझा मित्र, खूप वाचणारा आणि सामाजिक उपक्रमांत भाग घेणारा? तर परवा त्याचा आणि माझा कडाक्याचा वाद झाला. तो मला म्हणाला, “तू बोलतेस ते मराठी बरोबर, शुद्ध आणि बाकीच्यांचं अशुद्ध असं तू कोण ठरवणार? लोकशाहीच्या तत्त्वानुसार मतदान घेतलं तर तुझंच चूक निघेल.” आता भाषा, व्याकरण ही काय मतदान करायची गोष्ट आहे का? प्रत्येक गोष्टीचं मानक ठरलेलं असतं. ‘कोण म्हणतं टक्का दिला’ अशा नावाचं एक नाटक आहे म्हणे. त्यातला नायक हा आपण ज्याला अशुद्ध, खेडवळ म्हणतो तसं बोलत असतो आणि नंतर तो एकदा आपल्यासारखं शुद्ध बोलून दाखवतो आणि म्हणतो, “मला असं बोलायला येतं. पण मी तुमच्यासारखं का बोलू? मी माझीच भाषा बोलणार.” मला काही हे पटलं नाही. प्रत्येकाने स्वत:चीच भाषा बोलायची म्हणजे काय? भाषा काय एकेकट्याची असते का? अशाने मराठीचा काही दर्जाच उरणार नाही.


एप्रिल १९९२

प्रिय ताई,

परीक्षेपूर्वीचं हे माझं शेवटचं पत्र. आता ह्यानंतर सुट्टीत प्रत्यक्षच भेटू. १० दिवसांपूर्वी मी आणि अनु शनिवार-रविवार एका पाड्यावर जाऊन आलो. अमोल आणि त्याची मित्रमंडळी आळीपाळीने शनि-रवि तिथे जाऊन लहान मुलांना शिकवत असतात. ह्यावेळी अमोलबरोबर आम्ही पण गेलो. खूप मजा आली. पहिल्यांदाच त्या मुलांना भेटतेय, असं अजिबात वाटलं नाही. मुलांना शिकवताना माझ्या लक्षात आलं, की त्यांना श, ष आणि क्ष तला फरक शिकवणं जवळ जवळ अशक्य आहे. का एवढी क्लिष्ट केलीय आपण भाषा? आपण भाषा सोपी करायला हवी, शिकणं आनंददायी नको का? आणि ‘श’-‘ष’ उच्चार असे किती लोकांना माहिती आहेत? शिवाय ऱ्हस्व, दीर्घ म्हणजे मुलांचा छळ आहे नुसता. अमोल म्हणतो, की एकच वेलांटी आणि एकच उकार भाषेत ठेवला पाहिजे – फक्त दीर्घ. दीर्घ नाही, दुसरा! सोपं करायला हवं. पटतंय ना तुला? 


ऑक्टोबर १९९२

प्रिय ताई,

तू लिहिलंस तसं झालंय खरं माझं. माझ्या बोलण्यात हिंदी-इंग्लिश शब्दांचा खूप भरणा झालाय आजकाल. त्यामुळे पत्रातही तसं येत असेल. आजकाल अशा मिक्स लँग्वेजचाच जमाना आला आहे. त्याला हिंग्लिश (हिंदी-इंग्लिश) आणि इंगराठी (इंग्लिश-मराठी) म्हणतात. मला आता इतक्या वेगवेगळ्या ठिकाणचे मित्र-मैत्रिणी आहेत, की आम्ही असं सगळं मिक्स करूनच बोलतो! मला वाटतं, की आपण पूर्वी भाषेच्या बाबतीत उगीचच खूप सोवळे होतो. कधी ‘त्रास झाला’ म्हणायचं, कधी ‘वाईट वाटलं’ म्हणायचं आणि कधी ‘दु:ख झालं’ म्हणायचं असा कीस काढत बसायचो. आपल्या घरात आणि शाळेत अशा प्रत्येक शब्दाचा किती बाऊ करायचे ना? आता मला वाटतं, की भाषा हे शेवटी विचार, भावना पोचवण्याचं साधन आहे. तुम्हांला मुद्दा कळला, भावना पोचल्या की झालं! कशाला तो शब्दच्छल. तुला बहुतेक पटणार नाही – पण चलता है गं ताई! 


जानेवारी १९९३

प्रिय ताई,

माझं सध्या खूप बिझी झालंय सगळं. सेमिनार, प्रोजेक्ट, कॅम्पस इंटरव्ह्यू. मी इंग्लिश बोलायची सॉलिड प्रॅक्टिस करतेय आणि जमायला लागलंय बरंचसं. पण आता त्यामुळं मराठीची लेव्हल घसरतेय... रागावू नकोस बरं का मला! तुझ्या सहवासात आले की सुधारेल परत.


सप्टेंबर १९९४

प्रिय ताई,

ऑफिसमध्ये माझं चांगलं चाललंय. खूप शिकायला मिळतंय. नवीन टेक्नॉलॉजी आहे म्हणून अभ्यासही करत असते. माझा बॉस साउथ इंडियन आहे आणि क्लायंट अमेरिकेचा. त्यामुळे इंग्लिश बोलावंच लागतं. आता चांगला कॉन्फिडन्स वाढलाय. मी आता get आणि gate च्या उच्चारातला फरक शिकलेय. आपल्याकडे दोन्हीला “गेट” असं असल्यामुळे मला हे पूर्वी माहितीच नव्हतं. बॉस म्हणतो, “तू इंग्लिशमध्ये विचार करायला शिकलं पाहिजेस.” तो म्हणतो, की नीट लिहिता-बोलता येणं is must! It really matters. नुसत्या टेक्नॉलॉजीने भागत नसतं. बाकी मजेत.


नोव्हेंबर १९९८

प्रिय ताई,

मी आता इथे छान सेटल झालीय. मला अमेरिकन ॲक्सेंट समजायला फारसा त्रास झाला नाही. पण काही काही वेगळे उच्चार शिकायला मिळाले. उदा. Newark ला नूअर्क म्हणतात आणि मेक्सिकन पदार्थांचे उच्चार तर अजूनच विचित्र “J” ला ह म्हणतात. मी हे सगळं नवीन नवीन शिकतेय आणि मला गंमत वाटतेय. सुरुवातीलाच आनंदने अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यामुळे बाहेर कुठे माझी पंचाईत नाही झाली. तो मला म्हणतो, की तू टीव्ही बघत जा म्हणजे इथल्या phrases पटापट शिकशील. नवरा स्वत:च टीव्ही बघ म्हणत असेल तर काय, मी नुसती लोळतेय सोफ्यावर...


मे १९९९

प्रिय ताई,

आता इथे जॉब मिळालाय मला. तो छान चाललाय. मला खूप आवडतंय इथे. ऑफिसमध्ये माझी एका अमेरिकन मुलीशी मैत्री झालीय. तिचं नाव मार्सी. तिला आपल्या कल्चरमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी पण तिला अमेरिकेबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल बरंच काही विचारत असते. तिने मला v आणि w च्या उच्चारातला फरक सांगितला. w म्हणताना ओठाचा चंबू करत असतात म्हणे! आपल्याला माहितीच नसतं ना – इतकं ग्रेट वाटलं मला समजल्यावर! आता मी what, who, whistle, window अशी प्रॅक्टिस करत असते. मला असं नवीन नवीन शिकायला खूप आवडतं. असे बारकावे समजले, की you start appreciating the language!


जून २०००

प्रिय ताई,

तुझ्याकडे ईमेल आलीय, हे किती छान. आता मी तुला अगदी frequently लिहू शकते ना! इथे आल्यापासून मला खूप जास्त शिस्त लागलीय, especially job मध्ये. म्हणजे टेक्नॉलॉजी तर मला तिकडे पण येत होती. पण प्रत्येक गोष्टीत खोलात जाऊन बघायचं, बारीकसारीक विचार करायचा हे माझं सुधारलं आहे – attention to details. साधं बोलताना पण माझ्यात खूप सुधारणा झाली आहे. मी आता खूप particular झालेय. उदा. मी पूर्वी today night म्हणायचे. आता tonight म्हणते. परवा मी एकाला सांगत होते, की मराठी मिडियमची आहे. तर त्याला खोटंच वाटलं!


जुलै २००२

प्रिय ताई,

आपल्याला भेटून वर्ष होऊन गेलं हे खरंच वाटत नाही. अजून दोन महिन्यांत आई-बाबा येतीलच इथे. माझी तब्येत एकदम मस्त. मी walk ला जाते, balanced diet घेते. सध्या पुस्तक वाचतेय What to Expect  When You Are Expecting. इतकं छान सगळं डिटेलमध्ये दिलं आहे! परवा मी बाळ-बाळंतीण रिलेटेड मराठी शब्द आठवून बघत होते...बाळंतविडा, पाचवी आणि काय काय गं? मला तर आठवतच नाही. तूच कळव ना.. आणि हो, तुझ्या येऊ घातलेल्या भाच्चीसाठी नावही सुचव :) :)


डिसेंबर २००४

प्रिय ताई,

आम्ही मजेत. गार्गी आता खूप बडबड करते. तिच्या नावातला ‘र’ ती अमेरिकन ॲक्सेंटमध्ये म्हणत असल्यामुळे आम्हांला ते खूप फनी वाटतं :) :) . आई, बाबा. दूध आणि पाणी असे चार शब्द सोडले तर बाकी सगळं इंग्लिशमध्येच बोलते. दिवसभर daycare ला असल्यामुळे इंग्लिशच तिची भाषा झाली आहे. काही मित्र-मैत्रिणी मला विचारतात, की तिची मदर टंग कोणती? मी म्हणते, “तिच्या मदरची टंग मराठी असली तरी तिची टंग इंग्लिशच आहे.” :D :D आता लवकरच भेटू! मग तू प्रत्यक्ष बघशील तिला!


सप्टेंबर २००८

प्रिय ताई,

गार्गी आता पहिलीत गेली. तिला शाळा खूप आवडते. इथे भाषा शिकवण्यावर खूप जास्त भर आहे. खूप वेळ देतात, मेहनत घेतात. गार्गी खूप वाचते. वयाच्या मानाने तिची vocab पण खूप जास्त आहे. तिला नवे नवे शब्द, त्यांचे बारकावे शिकायला खूप आवडतं आणि तिची teacher ते शिकवते सुद्धा. Looks like she is a language person – अगदी तिच्या मावशीसारखी!! :) :)


नोव्हेंबर २०१२

प्रिय ताई,

गार्गीला इंग्लिश भाषेचं आणि वाचनाचं किती वेड आहे, ते तुला माहितीच आहे. पण तिला भाषा शिकवतात सुद्धा इतकी छान! म्हणजे भाषेचं सौदर्य, त्यातली समृद्धी या सगळ्याची या वयातच ओळख करून देतात! तिची टीचर सांगते, की सगळीकडे good, nice, happy असं नाही म्हणायचं. वेगवेगळे शब्द वापरा. Use adventurous vocabulary. तिला happy, excited, full of joy, elated, blissful अशा सगळ्याच्या वेगवेगळ्या छटा आत्ताच माहिती झाल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्या छटेनुसार काय वापरायचं ते ती शिकतेय आणि तिला मनापासून आनंद होतोय. ते शब्द, त्या छटा ह्या सगळ्यात तिच्या विचारात पण किती clarity आली आहे! तिला शब्दांचा नाद, वैविध्य असं सगळं जाणवू लागलं आहे. She is in love with the language. She is just like you ताई! मला वाटतं, आता कुठे मला तू समजू लागली आहेस. तुझी ती मराठीवरून होणारी चिडचिड मला उमजू लागली आहे. आता तू काय म्हणतेस, ते मला मोकळेपणाने बघता येतंय. फोन करेनच. बोलू सविस्तर. पण म्हटलं, तुझं बरोबर आहे असं वाटलं तर लगेच सांगून टाकावं :) :) बोलूच!

 


सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

कथा - पाहुणे

उषाताई नेहमीप्रमाणे गजर वाजायच्या आधीच जाग्या झाल्या. ह्या वयात झोपेचं जरा अवघडच झालं होतं. दोन वाजता जाग येते, पुन्हा चार वाजता येते आणि शेवटी साडे पाचला जाग आल्यावर त्या सहाच्या गजरासाठी न थांबताच उठतात. एकटीला घर खायला उठतं. अगदी जिवावर येतं एकटीसाठी चहा करून प्यायला. पण नेमकी आता मेली झोप लागत नाही. वीणा तान्ही होती आणि पहाटेच उठून दुधासाठी रडायची, तेव्हा मात्र पापणी अगदी उचलायची नाही.

चहा पिऊन झाडांना पाणी घालून त्या रोज फिरायला जातात. घरातून बाहेर पडत राहावं लागतं, चालत राहावं लागतं. आपणच आपल्याला गुंतवून ठेवावं लागतं. चहा पिऊन त्या बाल्कनीत आल्या. वठलेली कृष्णतुळस बघून त्यांना आज पुन्हा हळहळ वाटली. तिथे नजर गेली, की पुन्हा त्यांच्या मनात तिचा निकोप गंध दरवळू लागे. पानं, मंजिऱ्या निस्तेज पांढरट पडून गळून गेल्या होत्या. पण आता तिच्या आजुबाजूला इवली इवली चार-सहा जिज्ञासू रोपं उगवून आलेली दिसत होती. उषाताईंनी हलक्या हाताने त्यांना हळुवार पाणी पाजलं आणि क्षणभर त्यांना अगदी धन्य वाटलं. त्यांच्या जिवणीची हसल्यासारखी हालचाल झाली आणि त्यांच्या ओघळू लागलेल्या सावळ्या गालाला खळी पडली.  

आज काही त्या फिरायला जाणार नव्हत्या. उद्या अमेरिकेहून नातवंडं येणार म्हणून त्यांना बरीच कामं करायची होती आणि थकवाही यायला नको होता. कालच दुकानदाराने किराणा आणून दिला होता. आज त्या थोडी तयारी करून ठेवणार होत्या. पुरण करायचं होतं, मोदकाचं सारण करायचं होतं. अशी सगळी तयारी करून त्या फ्रिजमध्ये पदार्थ ठेवून देणार होत्या. मुलं दहा दिवस इथे राहणार होती. नंतर आठ दिवस तिकडच्या आजी-आजोबांकडे आणि मग परत जाणार होती. मुलांसाठी आणि मुलांबरोबर काय काय करायचं, त्याची सारखी आखणी, उजळणी त्या मनाशी करत होत्या. त्याचे अजुनाजून तपशील ठरवत होत्या. नाश्त्याला त्यांना गोड घावन द्यायचं आणि म्हणायचं, “हा इथला पॅनकेक.” वीणाची पेटी त्यांना द्यायची आणि म्हणायचं, “हा तुमच्या आईचा हार्मोनियम. पियानोसारखा दोन हातांनी नाही, एकाच हाताने वाजवायचा बरं का! दुसरा हात मागे भात्याला.” रोज भारतीय पदार्थ खाऊन कंटाळतील म्हणून मध्येच एक दिवस पास्ता करायचा.

एका माणसाचा स्वयंपाक तो किती असणार! उषाताईंनी स्वत:साठी थालीपीठ लावलं आणि मोदकाचं सारण करायला घेतलं. दुसरीकडे पुरणाची डाळ लावली शिजायला. तेवढ्यात कामाला सविता आली. तिच्याकडून सगळं घर चकचकीत करून घेतलं त्यांनी आणि बजावलं, “आता दहा दिवस अजिबात दांडी मारू नकोस हं!” तिलाही एक थालीपीठ दिलं खायला. सविताने विचारलं, “आता किती वर्षाची झाली ओ मुलं?”

“मोठा बारा वर्षाचाय, धाकटा होईल आता दहाचा.”

“थोरला वीणाताईंसारखा दिसतो ना?”

“थोडासा दिसतो, रंग तिचा घेतलाय त्याने. दोघांमध्येही थोडाफार भास आहे तिचा”, असं म्हणता म्हणता भरून आलं त्यांना. स्वत:ला सावरत त्या म्हणाल्या, “वीणा अगदी तिच्या वडिलांसारखी दिसायची. सगळे मला म्हणायचे, की पितृमुखी मुलगी भाग्यवान असते. कसलं भाग्य आलं वाट्याला? भरल्या ताटावरून उठून निघून गेली बघ.” आता मात्र कंठ दाटून आला त्यांचा आणि डोळे भरून आले.

“शांत व्हा आजी. आता मुलांसमोर खंबीर ऱ्हायचं ना तुमाला?”

पावसाची अचानक मोठी सर येऊन लगेचच थांबावी तशा उषाताई शांत झाल्या. सविताही पुढच्या कामांना निघून गेली. वीणा म्हणजे नुसता चैतन्याचा झरा होती. कधी लाजणं माहीत नाही, कशाचा संकोच नाही. लहानपणापासून पुढे होऊन सगळ्यात भाग घेणारी. कशात कधी मागे राहणं माहीत नव्हतं. आणि इथेही अशी पुढे निघून गेली, रांग मोडून पुढे गेली! वडिलांची लाडकी होती खूप. घाईघाईने गेली त्यांना भेटायला. दीड वर्ष होऊन गेलं तरी उषाताईंना खरं वाटत नव्हतं. काही जखमा कधीच भरून येणार नसतात.

वीणाच्या आजारपणात उषाताई तिच्याकडे जाऊन राहिल्या होत्या. तिला ‘बरी होशील’, असं सांगत होत्या. पण तिसऱ्या टप्प्यावरचा कॅन्सर बरा होण्याची शक्यता फारशी नसल्याचं तिलाही माहीत असावं बहुतेक. उसनं अवसान आणून त्यांनी तिचं आणि नातवंडांचं खूप केलं आणि त्यांच्याइतकंच देवेननेही केलं. बायको-मुलांसाठी दिवसरात्र तो झटला होता.  नंतरही त्या दोन महिने तिथेच होत्या. देवेन आणि मुलांची घडी बसवत होत्या, धीराने उभ्या होत्या. मुलं त्यांना आणि देवेनला बिलगली होती. पण कुणी कितीही केलं, तरी आईची सर येते का; असं उषाताईंना राहून राहून वाटे. त्यांचा पाय निघत नव्हताच. पण त्या देशात त्यांना अजून राहताही येणार नव्हतं.

इकडे परत आल्या आणि मग मात्र त्यांचा धीर सुटला. ह्या रिकाम्या घरात कितीतरी वेळा त्या ओक्साबोक्शी रडल्या. अमेरिकेला जायच्या आधी पण त्या इथे एकट्याच राहात होत्या. पण तेव्हा हे घर जिवंत वाटायचं. आता सगळं भकास झालं, सगळी रयाच निघून गेली. वीणाच्या जन्मापासून त्यांच्या आयुष्यात खरोखरीच वीणा झंकारत होती. इतका उत्साह, इतका आनंद, इतकं समाधान त्यांनी कधी अनुभवलं नव्हतं आणि आता अचानक आयुष्यातलं संगीतच हरवलं. उषाताईंच्या डोक्यातली विचाराची घरघर कधी थांबायचीच नाही. एकच एक मूल असू नये म्हणतात, तेच बरोबर होतं का? चुकलंच होतं का आपलं? पण वीणाला खूप अभिमान होता आपले आई-वडील ‘त्या’ काळी एका मुलीवर थांबले म्हणून! आणि झालं जरी असतं तिच्या पाठीवर दुसरं मूल, तरी त्याने दु:ख कमी होणार होतं का? भळभळ थांबणार होती का? करवतीच्या दातांसारखे हे प्रश्न त्यांना चिरत राहायचे.

देवेनने त्याचा शब्द पाळला होता. वीणा जशी दर आठवड्याला व्हिडिओ कॉल करायची, तसाच तो उषाताईंची नातवंडांशी भेट घडवून आणायचा. उषाताईंकडे बोलण्यासारखं काय असणार? त्या आपल्या ‘पाऊस संपला’, ‘थंडी पडली’ असं काहीतरी सांगायच्या. मुलांचं ऐकण्यातच आनंद असायचा. मुलं काही ना काही सांगत राहायची. काढलेली चित्रं दाखव, कधी काही जादू करून दाखव, शाळेत कशी छान ग्रेड मिळाली ते सांग असं चालायचं. ह्या एका संवादासाठी आठवडा ढकलत राहायचा. सगळ्या पाकळ्या गळून गेल्या तरी कुठल्या ना कुठल्या धाग्याने जीवन तुम्हांला कसं बांधून ठेवतं!

आज दिवसभर बरीच कामं करून उषाताई जरा थकल्या होत्या. सोफ्यावर जरा वेळ शांत बसल्या तर तिथे बसल्या बसल्याच डोळा लागला. डोळे उघडले तेव्हा निळीसावळी संध्याकाळ पसरली होती. वातावरण जडशीळ झालं होतं. सगळं अंधुक अंधुक दिसत होतं. उठून त्यांनी चष्मा घातला आणि देवापुढे दिवा लावला. तुळशीपाशीही दिवा ठेवला. त्या मंद केशरी प्रकाशात तुळशीची बाळं अगदी रेखीव, नितळ दिसत होती. त्यांना नुसतं बघूनच उषाताईंचे डोळे निवले आणि मनातल्या मनात त्या “इडा-पीडा टळो” असं म्हणाल्या. आजुबाजूच्या एकेका घरात हळूहळू दिवे लागत होते. आता दोन घास पोटात ढकलायचे, आवराआवर करायची आणि लवकरच झोपायचं असं त्यांनी ठरवलं. पहाटेच त्यांची बछडी येणार होती!

अंथरुणावर पडल्या तेव्हा त्यांना झोप लागेना. नेहमीसारखा नागाचा मोठा फणा काढून चिंता समोर उभ्या राहिल्या. आजकाल हे रोजचं झालं होतं. मन पुन्हा पुन्हा म्हणायचं, की मुलांना आता इथेच ठेवून घ्यायचं. आईनंतर तितक्या तळमळीने फक्त आजीच करू शकते सगळं. ह्या वयातही जमेल. एकदा ठरवलं की हत्तीचं बळ येईल अंगात. शिवाय आपल्याकडे कामाला बायकाही मिळतात. त्यामुळे काही अवघड नाही. तिकडच्या एवढं मोठं घर नाही, तिकडे जास्त सुविधा असतात; हेही खरंच. पण आपल्याकडेही चांगलं शिक्षण मिळतं. लहान आहेत तोवर राहतील इथे, आजीच्या पंखाखाली. मग कॉलेजला जातील तिकडच्या देशात. मोठीही होतील तोवर. चाळिशीतला देवेन म्हणजे तसा तरुणच म्हणायचा. तो त्याच्या डोळ्यांनीच आयुष्याकडे बघणार. तीन-चार महिने झाले त्याला एक मैत्रीणही भेटली होती. फिलिपिनो होती कुणी. अजून लग्नाचं काही ठरलं नसलं, तरी वर्षभरात करतील, असं उषाताईंना वाटत होतं. तसं देवेनने त्यांच्यापासून काही लपवलं नव्हतं कधी. पण कोण कुठली वेगळ्या संस्कृतीची बाई येईल घरात आणि ही सोन्यासारखी मुलं अगदी बिचारी होऊन जातील! ह्याच एका चिंतेची कबुतरं रोज फिरून फिरून घिरट्या घालत होती. त्या अजून कुणाशी – मैत्रिणी-बहिणीशी - ह्यावर बोलल्या नव्हत्या. पण आता त्यांचं ठरलं, की देवेनशी बोलायचं. कसंही करून मुलांना आपल्याकडेच ठेवून घ्यायचं. “मुलं राहतील इकडे”, अशी स्वत:चीच समजूत घातली, की मग त्यांना झोप लागत असे. आजही हाच विचार पांघरून त्या झोपी जाणार होत्या.

थोडा वेळ गेला आणि उषाताईंना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत अडकल्यासारखं, गुदमरल्यासारखं वाटू लागलं. आतून काहीतरी आवळल्यासारखं झालं. त्या हेलपाटत उठून बसल्या. जीव अगदी घाबराघुबरा झाला. उशाशी ठेवलेलं पाणी कसंबसं प्यायल्या आणि एक उबळ आली. घशात तिखट तिखट जाणवलं, करपट ढेकरा आल्या आणि त्यांनी हुश्श म्हटलं. पित्तच होतं साधं. थालीपीठ सोसलं नसेल बहुतेक. पण त्या पाच मिनिटांच्या प्रसंगाने त्यांना हादरवून सोडलं, खऱ्या अर्थाने जागं केलं. उषाताईंच्या लक्षात आलं, की आपला काही भरवसा नाही. आज आहे, उद्या नाही. नश्वरता अशी आतून आतून जाणवत असते तर! अचानक एखाद्या मोठ्या लाटेने थडकावं आणि सगळं धुवून स्वच्छ करावं, तसं झालं. एकदा मुलं इथं राहू लागली, की त्यांच्या स्वत:च्याच घरात पाहुणी होतील ती. उषाताईंचं काही बरंवाईट झालं, तर देवेनच्या नव्या संसारात प्रवेश करणं किती अवघड होईल मुलांना! कल्पनेने सुद्धा पीळ पडतो पोटात. आधी तिकडची रोपं आणून इथे रुजवायची आणि नंतर पुन्हा इथून तिथे हलवायची? त्यांना स्वत:चा वेडा हट्ट सोडावा लागणार होता. आता ह्या वयात समंजस स्वीकार करण्याखेरीज दुसरं काय हातात होतं? हळवेपणाचे झरे तर पाझरणारच होते, मनाविरुद्ध वाहणारच होते. पण आता ते सगळं आत वळवायचं. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाला भिजवायचं नाही. “तुमच्या तुमच्याच घरी रहा, बाळांनो! आजीकडे चार दिवस पाहुण्यासारखे या, कोडकौतुक करून घ्या आणि पुन्हा आपल्या घरी जा”, उषाताई स्वत:शीच मोठ्यांदा म्हणाल्या आणि गाढ झोपी गेल्या. निरभ्र आकाशात अष्टमीचा अर्धा चंद्र शांत तेवत राहिला.

रात्रीची गडद मखमली दुलई बाजूला सारत पहाट वर येऊ लागली होती. वातावरणात लालसर मोहिनी जाणवू लागली होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि हलका वारा. उषाताईंची लगबग सुरू होती. कधीही दार वाजेल म्हणून त्या तयारीतच होत्या आणि तसं ते वाजलंही. दार उघडलं तेव्हा समोर देवेनबरोबर दोन्ही हसतमुख गोंडस पिल्लं उभी होती. आपापलं सामान सांभाळणारी. कॉलवरती दिसतात त्यापेक्षा कितीतरी उंच आणि मोठी वाटणारी. थोरल्याचा वीणासारखाच झळाळता गोरा रंग, तशीच जिवणी, तेच हास्य. धाकट्याच्या सावळ्या लाघवी चेहऱ्यावर उठून दिसणारे वीणाचे काळेभोर बोलके डोळे. उषाताईंनी दोघांकडे डोळे भरून पाहिलं आणि झटकन त्यांना कुशीत घेतलं. त्यांच्या घशात मोठा आवंढा आला, नाकाचा शेंडा लाल झाला आणि नकळत डोळे भरून वाहू लागले. त्यांच्या घराचा कण न् कण जिवंत झाला, भारला गेला, आतून आतून उमलून आला. त्यांच्या अवघ्या घराचं फुलांनी मोहरलेलं चाफ्याचं झाड झालं.

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

कथा - दुर्बीण

आज सरांचा मुख्याध्यापक म्हणून पहिला दिवस. ह्या दिवसाची ते कित्येक वर्षं आतुरतेने वाट पाहत होते. आधीचे मुख्याध्यापक कालच निवृत्त झाले. त्यांनी शाळेसाठी काहीच धड केलं नाही आणि सरांनी काही प्रयत्न केलेलाही त्यांना आवडायचा नाही. सरांनी आज शाळेचं नवं पर्व सुरू करायचा निश्चय केला होता. त्यांनी सगळ्या शाळेसमोर भाषण करून त्यांचं स्वप्न सांगितलं, “मुलांना नुसतं लिहायवाचायला आलं, गणितं करता आली म्हणजे शिक्षण होत नाही. आपल्याला त्यांना वेगवेगळे अनुभव द्यायचे आहेत. ह्याची सुरुवात म्हणून आपण आपल्या शाळेत एक मोठी दुर्बीण आणणार आहोत. विश्वाच्या अफाट पसाऱ्याची जाणीव मुलांना झाली पाहिजे. आकाशाशी त्यांचं नातं जडलं पाहिजे. आपल्या शाळेतून खगोलतज्ज्ञ निर्माण झाले पाहिजेत.” आपल्या शाळेत असं काही होऊ शकतं, असा कधी विचारही कुणी केला नव्हता. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. विज्ञानाच्या शिक्षकांना तर भरूनच आलं.

सरांनी विज्ञानाच्या शिक्षकांना बोलावून त्यांना योजना नीट समजावून सांगितली. सरांनी स्वत:च पुढाकार घेतला होता. पुढच्या आठवड्यात शहरातून दुर्बिणवाला माणूस सरांना भेटायला आला.  तो म्हणाला, “शाळेसाठी म्हणजे तुम्हांला डोब्सोनियनच चांगला राहील.” विज्ञानाच्या शिक्षकांना नक्की काही समजलं नाही. पण सर ‘हो’ म्हणाले म्हणून त्यांनीही मान डोलावली. मग पुढे तो म्हणाला, “ह्यात आरसा असणार, न्यूटोनियन.” विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, “आणि भिंग?” दुर्बिणवाला म्हणाला, “नाही, ह्यात भिंग नसतं.” सर म्हणाले, “बरोबर! काय किंमत म्हणता?”

“तरी तीस-पस्तीस हजारापर्यंत जाईल बघा आठ इंचाला.”

“आठ इंच?”

“आता शाळेला म्हणजे आठ इंचाचा तरी लागेलच की आरसा! आणि शहरातून आणून पोचवायचा खर्च वेगळा.”

“इथं वरती गच्चीवर लावून द्याल ना?”

“निरीक्षणाच्या वेळी फक्त वर न्यायची दुर्बीण. एरव्ही पावसापाण्यात खराब होणार, सर.”

“वरती नेऊन लावायची?”

“हो, तुम्हांला काय बघायचं तशी लावायची, जुळवून घ्यायची. आकाशाचा नकाशा वाचायचा आणि तशी लावायची. म्हणजे मग ग्रह, तारे बघता येतील.”

दुर्बिणवाल्याला “आमचं नक्की काय ठरेल ते कळवू” असं म्हणून सरांनी पाठवून दिलं. सर आणि विज्ञानशिक्षक विचारात पडले. एवढा खर्च करायचा आणि हा माणूस आठ इंचाचंच आणणार म्हणतो काहीतरी. सरांनी विज्ञानशिक्षकांना आकाशाच्या नकाशाबद्दल विचारलं, तर त्यांनी कधी पाहिलाही नव्हता तो. कसा वाचायचा आणि काय करायचं, हे कुणालाच माहिती नव्हतं.  एवढा खर्च करून आकाशातलं काय कसं बघायचं, हा प्रश्नच होता. नुसत्या शाळेतच नाही, तर अख्ख्या गावात बातमी पसरली होती, की इथे दुर्बीण बसणार, मुलांना आकाश निरीक्षणाची संधी मिळणार. उत्सुकता वाढली होती, अपेक्षा उंचावलेल्या होत्या. नव्या सरांबद्दल आदर पसरला होता. आता मागे सरकायला जागाच नव्हती.

सरांनी ठरवलं, की आता वेगळा विचार केला पाहिजे. आपल्याला नवनवीन सुचत राहिलं पाहिजे. शाळेच्या गच्चीवर एक अडगळीची मोठी खोली होती. सरांनी ती एकदम रिकामी आणि स्वच्छ करून घेतली. रविवारी सुट्टीच्या दिवशी चित्रकलेचे शिक्षक आणि विज्ञानशिक्षक असं दोघांनी मिळून सरांच्या मार्गदर्शनाखाली गच्चीवरच्या खोलीत मोठ्या कामगिरीला सुरुवात केली. विज्ञानाच्या पुस्तकातली ग्रह-ताऱ्यांची चित्रं बघायची आणि रात्री अंधारात चमकणाऱ्या रंगाने छतावर, भिंतीवर रंगवायची. दिवसा हा रंग पांढरटच दिसतो. त्यामुळे पांढऱ्या छतावर आणि भिंतीवर रंगवलेलं काही कुणाला कळायची शक्यता नव्हती. तीन वेगवेगळे चमकणारे रंग होते. अंधारात हिरवट दिसणारा एक, दुसरा गुलाबी-लालसर आणि तिसरा केशरी दिसणारा. गुरूला आणि शनीला केशरी घेतला, मंगळाला गुलाबीसर. आता शुक्राला हिरवट करावं का? पुस्तकात तर पांढरा होता. मग शुक्र रद्दच केला. हिरव्या रंगाचं काय करायचं? त्याचा छान शेपटीवाला धूमकेतू काढला. चंद्राच्या तर कला असतात. रोज वेगळा दिसतो. मग कुठला आकार काढायचा? सर म्हणाले, “चंद्र डोळ्याला दिसतच असतो चांगला. तो दुर्बिणीतून दाखवायची गरज नाही.”  थोडीफार नक्षत्रंही काढली. नक्षत्रांचे रंग काही कुठे पुस्तकात नव्हते. कुठलाही कुठेही देऊन रंग वापरून टाकले.

रंगकाम झाल्यावर एक सुतार बोलवून ह्या गच्चीवरच्या खोलीच्या दाराला गोल भोक पाडून घेतलं. चांगली हातभर लांबीची, दीड इंच व्यासाची नळी त्यात बसवून घेतली. भोकापेक्षा नळी लहान होती. नळीच्या बाजूला कड्या लावून ती भोकात अशी बसवली, की खाली-वर, उजवी-डावीकडे फिरवता येईल. सुताराला जास्तीचे पैसे दिले, जरा दमही भरला. शाळेची इथून पुढची सगळी दुरुस्तीची कामं त्यालाच मिळणार होती. त्यामुळे तसाही तो ह्याबद्दल कुठे काही बोलणार नव्हता. आता रोज रात्री थोड्या थोड्या मुलांना ग्रह-तारे दाखवायचं ठरलं. दिवसा गच्चीला कुलुप असणार होतं. त्यांची ही गावातली शाळा सातवीपर्यंतच होती. मोठी मुलं असती तर उगीच डोकेदुखी झाली असती.

मुलांना आकाश दाखवायची जबाबदारी विज्ञानाच्या शिक्षकांवर होती. पहिल्या रात्री त्यांच्या पोटात चांगलंच डचमळायला लागलं. सरांनी त्यांना धीर दिला. आत्मविश्वासाने पुढे जायला सांगितलं. आकाश बघायसाठी गच्चीवर पूर्ण अंधार केला होता. जिन्यातले दिवे पण बंद ठेवले होते. विज्ञानाचे शिक्षक वरती नळी धरून थांबले होते. चित्रकलेचे शिक्षक खालून एकावेळी दोन दोन मुलांना वर पाठवायचे. विज्ञानशिक्षक नळीतून दाखवायचे, “हा गुरू बघा. बाजूला त्याचे छोटे छोटे चंद्र.” मुलांचं बघून झालं, की ते नळीत बघून नळी शनीकडे फिरवायचे आणि पुन्हा मुलांना दाखवायचे, “कडी दिसली का शनीची?” मुलं पण भारावून गेली होती, धन्य झाली होती! अमावस्या होती. अंधार पांघरून सगळं सुरळीत पार पडलं.

पहिले दोन दिवस नीट पार पडल्यावर विज्ञानाच्या शिक्षकांच्या जिवात जीव आला. ते जरा मोकळेपणाने फिरू लागले. तिसऱ्या दिवशी मुलांना आकाश दाखवत असताना अचानक वारा सुटला. विजा चमकू लागल्या. ढग दाटून आले. नळीतून मंगळ बघताना एक आगाऊ कार्टं म्हणालं, “विजा चमकताना पण मंगळ छान दिसतोय की!” दुसरा म्हणाला, “आता भिजेल का हो दुर्बीण?” तसं विज्ञानशिक्षकाने एकेकाला खालीच हाकललं. “पाऊस येणारे. बास झालं आता”, म्हणून दटावलं.

दुसऱ्या दिवशी मुलांची आपापसांत चर्चा सुरू झाली.  कुणी म्हटलं, “दुर्बीण गच्चीवरच्या खोलीला लावली आहे.” कुणी म्हटलं, “खोलीला लावून आकाश दिसेल का?” अजून एक म्हणाला, “वीज चमकली, तेव्हा मी नक्की पाहिलं. खोलीच्या दाराला दुर्बीण लावलीय.” एक हुशार मुलगा म्हणाला, “ती नळी खोलीच्या छताला जोडलेली असणार. छताला भिंग बसवलंय.” मग गावातही ह्यावर चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी अफवा पसरल्या, की “सरांनी खोलीच्या आकाराची मोठीच्या मोठी दुर्बीण आणलीय.” काही म्हणाले, “आपल्या राज्यातली सगळ्यात मोठी दुर्बीण आपल्याच गावात आहे.” कुणी कुणी म्हणू लागले, की “पुढच्या महिन्यात चंद्रग्रहण आहे. दुर्बिणीतून बघायला पाहिजे.” काही पालक विचारू लागले, “आम्हांला मिळेल का दुर्बीण बघायला?” विज्ञानशिक्षकांना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत धडधडू लागलं. सारखा घाम फुटू लागला. सरांची देहबोलीच अशी असायची, की त्यांना कुणी काही विचारणार नव्हतं. एक प्रकारचा दरारा आणि आदर वाटायचा लोकांना. पण विज्ञानशिक्षकांकडे वेगवेगळे प्रश्न आणि चौकश्या येऊ लागल्या.  

शेवटी हिंमत करून विज्ञानशिक्षक मुख्याध्यापकांकडे गेले आणि आपली सगळी चिंता आणि परिस्थिती त्यांना सांगितली. सरांना नेहमी काही नवीन सुचत असे. त्यांनी ह्याच्यावर तोडगा काढायचं ठरवलं. गच्चीवरचं आकाशनिरीक्षण ताबडतोब थांबवलं आणि पुढच्याच आठवड्यात सर्व पालक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठा समारंभ ठेवला. गावातल्या मूर्तिकाराकडून तातडीने चांगली तीन फूट उंचीची देखणी मूर्ती तयार करून घेतली. ती सरांच्या कार्यालयाबाहेरच्या चार फुटाच्या कठड्यावर ठेवली. त्यामुळे अनावरण झाल्यावर सात फुटासारखा परिणाम साधणार होता. मूर्तीच्या मागच्या भिंतीवर मोठमोठे रंगीबेरंगी माहितीपूर्ण तक्ते लावून घेतले. समारंभाच्या दिवशी सगळ्या पालक-शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सरांनी मूर्तीवरचं कापड काढून त्या सुंदर मूर्तीचं अनावरण केलं, मूर्तीला हार घातला आणि भाषण सुरू केलं, “ही मूर्ती पाहिलीत? हे आर्यभट्ट आहेत. थोर गणिती आणि खगोलशास्त्राचे प्रणेते. १५०० वर्षांपूर्वी त्यांनी खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहिला. त्यांना त्या काळी पृथ्वी गोल असल्याचं समजलं होतं. त्यांनी पृथ्वीला कदंबाच्या फुलासारखी म्हटलं होतं!” मुलं आणि पालक थक्क झाले! इतक्या थोर शास्त्रज्ञाबद्दल त्यांना आधी काहीच माहिती नव्हती. सर म्हणाले, “ह्या मूर्तीमागे तुम्हांला पुष्कळ तक्ते बघायला मिळतील. ती चित्रं बघा, माहिती वाचा आणि समजून घ्या. नुसते ग्रह-तारेच नाही तर आकाशगंगा, कृष्णविवर असं सगळं शिका. आपली दुर्बीण परवाच्या वादळी पावसामुळे बिघडली आहे. पण काही हरकत नाही. त्यामुळे आपलं शिक्षण थांबत नसतं. वाचनालयात पुस्तकं आहेत. शाळेत उत्तम शिक्षक आहेत. आपल्याला आर्यभट्टाचा समृद्ध वारसा पुढे चालवायचा आहे. आपल्यामध्येही त्याचा अंश आहे.” टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. सरांचे शब्द ऐकून मुलांचं दुरापास्त वाटणारं उज्ज्वल भविष्य डोळ्यांसमोर आवाक्यात दिसू लागलं, दुर्बिणीतून पाहिल्यासारखं.

  

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

कथा - स्वातंत्र्य

 गडद निळ्या रंगाचा चुणीदार, गाठ मारून तिरकी बांधलेली पातळ झिरझिरीत ओढणी, तेल लावून, विंचरून घातलेली लांबसडक वेणी अशी सुमीची ठेंगणी अशक्त सावळी मूर्ती फाटक उघडून लगबगीने आत शिरली. तीन किलोमीटर चालत आली होती ती. तिने तिच्या जुनाट पर्समधून किल्ली काढली आणि ऑफिसचं कुलुप उघडलं. सगळे लोक यायच्या आधी दोन मजली बंगला झाडून-पुसून स्वच्छ करायचा होता. आज साहेबही येणार होते. म्हणजे बाल्कनीही स्वच्छ धुवून काढायची होती. इतर लोक येण्यापूर्वी ती मस्त मोकळेपणाने वावरत असे आणि धडाधड कामं करत असे. पण एकेकजण येऊ लागला, की मानेवर खडा ठेवल्यासारखी मान गोठून जायची. सगळ्या हालचालींना एक अवघडलेपण यायचं. कुणी काही विचारलं, तरी आवाज खोल जायचा. शक्यतो कमीच बोलायची ती.

तिच्याशी आणि साहेबांच्या ड्रायव्हरशी सोडून सगळे एकमेकांशी जास्ती करून इंग्रजीतच बोलायचे. पांढऱ्या चकाकत्या लॅपटॉपवर इंग्रजीत लिहायचे. जास्ती करून मुली आणि बायकाच होत्या ऑफिसात. तीनच पुरुष होते. कुठली तरी संस्था आहे म्हणे. सामाजिक काम करतात. खूप चांगलं काम आहे म्हणतात. पण इंग्रजीतलं तिला काय कळणार? तशी सुमी शाळेत गेली होती. आठवीपर्यंत शाळाही शिकली. मग त्याच्यानंतर खूप अवघड परीक्षा, नापासही करायचे. नंतर सुटलीच शाळा. सुमी शाळेत मराठी लिहाय-वाचायला शिकली. पण सगळ्यात जास्त काही शिकली असेल, तर आपल्याला डोकंच कमीय आणि आपण उगी कुठे डोकं लावू नये, हेच शिकली. आता हे प्रशस्थ ऑफिसच बघा ना. ती लिहाय-वाचायला शिकल्याचा इथे काही फायदा आहे का? सगळे हुशार, डोकंवाले लोक फाडफाड इंग्रजी बोलून इथे काम करतात.

सुमीची झाडलोट झाली होती. ऑफिस आता गजबजलं होतं. तिने सगळ्यांसाठी चहा केला. नंतर कपबश्या धुतल्या. तेवढ्यात साहेबांची भव्य रथासारखी जीप फाटकातून आत आली. पन्नाशीला आलेले साहेब खाली उतरले. त्यांना छाती पुढे काढून चालायची सवय होती. वयामुळे पोटही पुढे यायचंच. आत येताना ते आजुबाजूला कटाक्ष टाकत. कुंड्या नीट ठेवल्या आहेत ना? झाडांना पाणी नीट घातलं जातंय ना? त्यांच्या मागेच लगबगीने त्यांच्या लॅपटॉपची पिशवी घेऊन ड्रायव्हर आला. एखाद्या सम्राटाच्या ऐटीत ते सभोवती नजर टाकत वरती त्यांच्या खोलीत गेले. ते आले, की सुमीला खूपच दडपण जाणवायचं. तिने ड्रायव्हरला विचारलं, “चहा ठेवू का साहेबांचा?” त्याने निरोप आणला, की “आज कॉफी कर.”

साहेब नेहमी इथे नसायचे. कधी परदेशी जायचे, कधी दिल्ली, कधी बंगलोर असे फिरत असायचे. दौऱ्यावरून आल्यावर मात्र सलग आठ-पंधरा दिवस इथेच असायचे. आले, की सगळ्यांना गोळा करून तासन् तास बैठकी घ्यायचे. मग दर दोन तासाला सगळ्यांना चहा, कधी काही खायला असं चालायचं. साहेब तसे गप्पिष्ट होते. परदेशी कुठे जाऊन आले, दिल्लीत कुणाला भेटले असे सगळे किस्से बैठकीत रंगवून सांगायचे. कधी कधी त्यांच्या लाडक्या कुत्र्याच्या गंमतीजमती सांगायचे. सांगता सांगता सभोवार नजर फिरवून आपल्याला दाद मिळतेय ना, असं बघायचे आणि मनातल्या मनात सुखावून जायचे. साहेब तसे रसिक होते. आपल्या विनोदावर कोण फिदा होऊन हसतेय, कुणाच्या गालाला खळी पडतेय आणि कोण लटक्या आश्चर्याने डोळे विस्फारतीय हे सगळं ते भिरभिरत्या नजरेने पटापट टिपायचे. कुणाचे सुशोभित काळेभोर डोळे, कुणाचं केसाच्या बटांशी खेळणं तर कुणाचे बिनबाह्यांचे रसरशीत दंड. साहेबांना एखाद्या पुष्पवाटिकेत बसल्यासारखं वाटायचं.

सुमी कॉफी करून वरती घेऊन गेली. साहेबांनी लॅपटॉपवरची नजर क्षणभर वर केली आणि मानेनेच “ठीक” असं सांगितलं. त्यांच्या नजरेत एक थंड नापसंती होती. टेबलवर कॉफी ठेवून सुमी खाली आली. तिला त्यांच्या नजरेतला तो भाव आवडायचा नाही. साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. ड्रायव्हर सुट्टीवर होता आणि साहेबांना भेटायला ऑफिसमध्ये कुणीतरी येणार होतं. येणाऱ्या माणसाला नीट पत्ता सापडेना. साहेबांनी सुमीला सांगितलं, की गल्लीच्या तोंडाशी जा आणि पाहुण्यांना घेऊन ये. सुमी निघाली तसं साहेबांनी फोनवर पाहुण्यांना सांगितलं, “एक मुलगी पाठवतोय तुम्हांला घ्यायला. लाल कपडे, किडकिडीत, साडे चार फुटी.” आणि तिच्याकडे बघून विनोद केल्यासारखे हसले होते. सुमी चांगली पाच फुटाच्या जवळ होती. लहान चणीची होती. कुणी कुणी तिला शाळकरी समजायचे. पण साडे चार फुटी नक्कीच नव्हती आणि समजा असती जरी, तरी त्यात साहेबांनी असं हसण्यासारखं काय होतं? तेव्हापासून तिला साहेबांची नजर जास्त चांगली समजायला लागली होती. “तू कुणी नाहीस”, असं त्यात स्पष्ट लिहिलेलं असायचं.

पण सुमी तिला काय वाटतं, ते कधी कुणाकडे बोलली नाही. तिला आठवलं, की आजी नेहमी म्हणायची, “पोरीची जात म्हणजे दिसायला बरी असावी लागते बाई!” ज्या दिवशी सुमीला सगळ्यात जास्त वेदना झाल्या होत्या, तेव्हाही आजी हेच आणि एवढंच म्हणाली होती. सुमी दहा-अकरा वर्षांची होती तेव्हाची गोष्ट. तिला आइस्क्रीम खावंसं खूप वाटत होतं म्हणून तिने आईचे पैसे घेतले आणि गुपचूप बाहेर जाऊन आइस्क्रीम खाऊन आली. आईच्या लक्षात आलं तेव्हा सुमी म्हणाली, “मी नाही घेतले पैसे.” आता मात्र तिच्या आईचा पारा चांगलाच चढला. आई स्वयंपाक करत होती. तिने सांडशी उचलली. विस्तवात चांगली लाललाल तापवली आणि संतापाने सुमीला म्हणाली, “बोलशील पुन्हा खोटं? याच जिभेने खोटं बोललीस ना?” आणि तिने सुमीच्या जिभेला सरळ चटकाच दिला. सुमी जिवाच्या आकांताने किंचाळली. ऊर फुटून रडली. कित्येक दिवस तिला नीट जेवता-खाताही येत नव्हतं. तेव्हा तिची आजी तिच्या आईला रागवली, “काही अक्कल आहे का तुला? सांडशी चुकून ओठाला लागली असती, गालाला लागली असती, डाग राहिला असता म्हंजे? पोरीची जात ती. बरी दिसायला नको?”

सुमीची दिवसभराची कामं संपली होती. दिवसभर खूप गरम होत होतं, घामाच्या धारा लागत होत्या. संध्याकाळ होऊ लागली तसं आभाळ भरून येऊ लागलं. एकेकजण घाईघाईने घरी जाऊ लागला, लागली. पण साहेब कुठल्यातरी मोठ्या फोनकॉलवर तास झाला तरी बोलत होते. त्यामुळे ऑफिस बंद करता येईना. ती अडकून पडली. जोराचा वारा सुटला. एकदम अंधारून आलं. विजा कडकडायला लागल्या आणि वळवाचा रपरप पाऊस सुरू झाला. तिच्याकडे छत्री पण नव्हती. आता इथे किती वेळ अडकून पडणार कुणास ठाऊक, असं तिला झालं. तेवढ्यात साहेब काम संपवून वरून खाली उतरले. ड्रायव्हर म्हणाला, “साहेब, जाता जाता हिला घरी सोडून जाऊ या का? खूप दूर नाही, तीन किलोमीटरच जायचं.” साहेबांनी मानेनेच त्याला परवानगी दिली आणि उपकृत केलं. साहेब तसे मोठ्या मनाचेच होते.

भल्या थोरल्या जीपमध्ये सुमी एकदम अवघडूनच बसली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं. जीप पुढे जाताना बाजूने चालणाऱ्यांच्या अंगावर फर्रफर्र फवारे उडत होते. आता तर दिवेही गेले होते. पाच मिनिटांत सुमीची वस्ती आली सुद्धा. गटारं पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत होती. ड्रायव्हर म्हणाला, “इथं सोडू का? ह्याच्यापुढं गाडी जाणार नाही.” सुमीसाठी हेच खूप होतं. ती घाईघाईने उतरली. तिने तिची झिरझिरीत ओढणी काही उपयोग नसताना उगीचच डोक्यावर घेतली आणि गाडी वळवेपर्यंत ती त्या फाटक्या वस्तीत दिसेनाशी सुद्धा झाली. साहेबांनी ही वस्ती पाहिली आणि त्या अंधुक प्रकाशातही त्यांना ओळख पटली. ते वीस-बावीस वर्षांपूर्वी इथेच आले होते.

तेव्हा ते साहेब नव्हते. तो तरुण जयंता होता, अमेरिकेत शिकून नुकताच परत आला होता. त्याला सूट-बूट घालून कुठल्या कंपनीत नोकरी करण्याची अजिबात इच्छा नव्हती. जे मनापासून वाटतं, जे बदलायलाच हवं तेच तो करणार होता. त्याचे काही जुने मित्र-मैत्रिणी मानवाधिकारासाठी झटत होते. असाच एकदा एका मैत्रिणीचा फोन आला “तू येतोस का” म्हणून आणि जयंता ह्या वस्तीत आला होता. कोण बरं तरुण होता त्या वस्तीतला? महादू. महादूला कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी सरकारी लोक घेऊन चालले होते. त्याला पैसे देणार होते आणि त्याची बायको रडत होती. जयंता हिरिरीने मध्ये पडला. जयंता कमालीचा स्वातंत्र्यवादी होता. महादूला एक मूल होतं. त्यानंतर शस्त्रक्रिया करायची की नाही, हा निर्णय घेण्याचं त्याला आणि त्याच्या बायकोला पूर्ण स्वातंत्र्य हवं. महादूसारखा दारुडा माणूस पैशासाठी तयार होतो, तेव्हा त्याने खरंच स्वतंत्रपणे मनापासून निर्णय घेतला असं म्हणता येईल का? “लोकशिक्षण करा, समजावून सांगा आणि निर्णय त्या माणसावर सोडा”; असं त्याचं स्पष्ट मत होतं. जयंताने त्या सरकारी लोकांना हाकलून लावलं. महादूच्या बायकोने येऊन जयंताचे पायच धरले होते! साहेबांना हे सगळं आठवून त्यांच्या डोळ्यांत अभिमान तरळू लागला. कुणी आई-बाप व्हायचं आणि कुणी नाही, ह्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायलाच पाहिजे. महादू अजून तिथेच राहत असेल का? सुमीला तो माहीत असेल का? साहेबांची जीप त्यांच्या घरी पोहोचली.

महादूला नंतर वर्षभरातच सुमी झाली. ती तीन वर्षांची असतानाच तो दारू पिऊन पिऊन रक्ताच्या उलट्या करून मेला. सुमीच्या वाट्याला कुठलंच स्वातंत्र्य आलं नाही. व्यवस्थित खायला मिळण्याचं स्वातंत्र्य. शरीराची धड वाढ होण्याचं स्वातंत्र्य. धुण्या-भांड्याची कामं न करता “नुसतं” शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य. आईची मारहाण न सोसता लहान मूल असण्याचं स्वातंत्र्य. जयंताचे प्रतिष्ठित स्वातंत्र्यवादी साहेब झाले आणि सुमीची नगण्य चिपाड मोलकरीण.

मंगळवार, १९ मे, २०२०

कथा - लोप


प्रिय अप्पा,

आज आत्ता भल्या पहाटेच जाग आली आणि पहिल्यांदा डोळ्यांसमोर तुम्हीच आलात. बऱ्याचदा नीट झोप लागतच नाही. मला आठवतंय, मी साधारण दहा वर्षांची असेन तेव्हापासून तुम्ही मला पहाटे उठवून तुमच्याबरोबर टेकडीवर फिरायला नेऊ लागलात. सुरुवातीला खूप जिवावर यायचं, पण नंतर सवय झाली. परत येताना आपण गप्पा मारायचो. तुम्ही मला झाडं ओळखायला शिकवली. वाटेवर एके ठिकाणी पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. मी फुलं वेचायचे. अजून तांबडं फुटलं नाहीये. पण थोड्या वेळाने इथल्या खिडकीतून खालचा प्राजक्त स्पष्ट दिसू लागेल. माझ्यातली फुलं वेचण्याची उमका मात्र कधीच आटून गेली आहे. तुमच्या व्यक्तिमत्वातली प्रसन्नताही कधी हरवत गेली, ते कळलंच नाही.

मला वेगवेगळे प्रसंग आठवत राहतात. तुम्ही भेट म्हणून सगळ्यांना नेहमी पुस्तकंच आणायचात. कपडे आणणं कायम आईकडे असायचं. जेव्हा माझ्या सातवीच्या स्कॉलरशिपचा निकाल लागला आणि मला स्कॉलरशिप मिळाली नाही, त्या दिवशी मात्र तुम्ही मला बाहेर घेऊन गेलात आणि आपण माझ्या पसंतीचा चांगल्यातला फ्रॉक घेऊन आलो! तुम्ही आणि मी तेवढी एकदाच कपडे खरेदी केली असेल ना? मला वाटतं, माझ्या लग्नाच्या खरेदीलाही तुम्ही नव्हता. खरं तर अगदी साधं, छोटं लग्न होतं माझं. (तुमच्या मुलीचं अजून कसं असणार?) खरेदीही खूपच कमी होती. पण तुम्हांला एकूणच कपडे, दागिने, खरेदी अशा कशाशी कधी कर्तव्य नव्हतं. तुमचीच लेक असल्याने मलाही फारसा सोस नव्हता, खरं तर. आता मात्र कधी कधी प्रश्न पडतो, की मी खरंच तशी होते की तुमच्या प्रभावामुळे मला तसं वाटायचं? माझं लग्न होईपर्यंत आणि त्यानंतरही मी आई होईपर्यंत मी बरीचशी तुमच्यासारखीच होते, अप्पा. मग मी नंतर बदलत गेले का? का मला स्वत:ला गवसत गेले? मी मूळची कदाचित नसेनच तुमच्यासारखी. पण तुमच्या सावलीत ते समजलं नसेल?

लहानपणी मला तुम्ही चालता-बोलता ज्ञानकोश वाटायचात. एखाद्या शब्दाचा अर्थ असो, एखादा लेखक असो, कवितेची ओळ असो किंवा इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग असो; तुम्हांला सगळंच माहीत असायचं. तेव्हा कुठे संगणक क्रांती आणि इंटरनेटचा काळ होता? आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हांलाच विचारायचो. तुम्हांलाही सांगाय-शिकवायची आवड होती. ओळखीचे, आजुबाजूचे लोक जेव्हा “तुझ्या वडिलांना विचार, त्यांना माहीत असेल” असं विश्वासाने म्हणायचे, तेव्हा केवढा अभिमान वाटायचा मला! मग मी जसजशी मोठी झाले, कॉलेजला गेले, तसं मला वाटू लागलं, की ह्यात मला अभिमान वाटण्यासारखं काय आहे? मी तुमची मुलगी आहे, ह्यात माझं काय कर्तृत्व? उलट तुमच्यासारख्या प्राध्यापक-विचारवंताच्या घरी जन्म होऊनही मी कशात काही चमक दाखवली नाही, म्हणून वाटली तर खंतच वाटायला हवी.

तुमचा अभ्यास, तुमची विश्लेषणं-व्याख्यानांनी सगळेच भारावून गेलेले असायचे – तुमचे विद्यार्थी, तुमचे सहकारी आणि आम्ही घरचे लोक. आईला तर ‘नवरा हाच गुरू’ असं काहीसं वाटायचं. आम्ही दोघी बहिणीही कळत-नकळत तुमचा शब्द प्रमाण मानत वाढलो. सगळीकडे तुमच्याच विचारधारेचे विद्वान लोक होते त्या काळी. त्यामुळे  तुम्हांला आणि तुमच्या मित्रांना “काहीतरी चुकतही असेल” अशी कधी जाणीवच झाली नाही का, अप्पा? ताई आणि महेंद्र अमेरिकेला स्थायिक झाले, तेव्हा काय वाटलं तुम्हांला? तुमच्या सगळ्याच मित्र-सहकाऱ्यांच्या मुला-मुलींनी तुम्हा सगळ्यांना जी अंगभूत दुष्ट वाटायची, त्या अमेरिकेचा रस्ता का धरला? मी तुम्हांला कधी हे थेट विचारलंच नाही. पण माझ्या स्वतंत्र विचारांची ती सुरुवात असावी. रशिया पडला-फुटला, तेव्हा तुम्हांला मनापासून वाईट वाटलं होतं. तुम्ही त्याचं बरेच दिवस बरंच काही विश्लेषण सांगायचात. मला अर्थातच ते सगळं पटतही होतं तेव्हा. रशियाने नीट अंमलबजावणी केली नाही, औद्योगिक क्रांती व्हायच्या आधीच ही क्रांती झाली असं बरंच काही तुम्ही सांगितलं होतं. पण मार्क्सवरचा तुमचा विश्वास अढळ राहिला. समाजवादाला तुम्ही दूर नाही सारलं. की परतीचा मार्गच उरला नव्हता?

आई आणि तुम्ही ताईकडे अमेरिकेला जाऊन आलात, तेव्हा तुम्ही मोकळेपणाने तिथल्या नागरी व्यवस्थांचं, स्वच्छतेचं आणि एकूणच दर्जाचं कौतुक केलं होतं. तितक्याच सच्चेपणाने त्यांच्या वारेमाप उधळपट्टीवर आणि ‘वापरा-फेका’वर टीकाही केली. चांगल्याला मनापासून चांगलं म्हणावं, वाईटाला नि:संकोच वाईट असा निखळपणा  टिकून होता तोवर तुमचा. मग गेल्या काही वर्षांत इतका कडवटपणा कशाने आला, अप्पा? तुमच्या व्यक्तिमत्वाचा एकेक सुंदर पैलू हळूहळू त्या कडवटपणात विरघळत गेला.

स्वयंपाक करायची वेळ कधी तुमच्यावर आली नव्हती. तुम्ही निवृत्त झाल्यावर मी तुम्हांला म्हणाले, की “आता स्वयंपाक शिकू शकता तुम्ही. आईचंही वय झालंय. तिलाही मदत होईल.” त्या काळी तुम्ही माझं ऐकून घेण्याच्या, मान्य करण्याच्या मन:स्थितीत होतात. अगदी स्वयंपाक नाही, तरी चहा कर, ताक कर, भाजी निवड अशी कामं तुम्ही करू लागलात. प्रेमाने करायचात, आदळआपट न करता. आईबरोबर तुमचा प्रेमळपणाही देवाघरी गेला बहुतेक. तिला तुमचे सामाजिक-राजकीय विचार, तुमची मतं मान्यच असायची. घरगुती गोष्टी तुम्ही तिच्या तंत्राने करत होता. कुठे आव्हान नाही, कसला वाद-विवाद नाही. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्याबरोबर गप्पा मारणं, एकत्र राहणं असं काही माहीतच नव्हतं तुम्हांला. ती गेल्यावर मी तुम्हांला थोडंसं तुमच्या मनाविरुद्धच इथे घेऊन आले. सांगलीहून पुण्याला, मित्रांपासून दूर. वयानुसार तुमचा हट्टीपणा वाढलेलाच होता. त्यात तुम्हांला समाजवाद विरोधी जावई भेटला. तुम्ही नुसते चिडचिड करायचा, अप्पा. “हा देश रसातळाला चालला आहे. काळ कठीण आहे.” हे एकच पालुपद धरून बसलात तुम्ही.

तुमचं वय हा एक प्रश्न असेल, आईचं जाणंही असेल, इथे रहायला आवडतही नसेल. पण तुमचं खरं दु:ख वेगळंच होतं. जे लोक तुम्हांला कधीही आवडले, पटले नाहीत; त्यांना लोकांनी पाठिंबा दिला हे तुम्हांला मान्य झालं नाही. जे कधी सत्तेत येणार नाहीत अशी तुम्ही आयुष्यभर खात्री बाळगली, नेमके ते सत्तेवर आले. त्या लोकांनीही चुका केल्या, जनतेचा अपेक्षाभंग केला. पण हे सगळं होण्याआधीच तुम्ही इथे यादवी माजल्यासारखा गोंधळ सुरू केला. आनंद तुम्हांला रोज सकाळी आलं घालून चहा करून द्यायचा. “जावयाच्या हातचा चहा छान” म्हणून सुरुवातीला कौतुक होतं तुम्हांला. पण एकदा त्याने तुम्हांला मार्क्सची सैद्धांतिक चूक काय सांगितली आणि तो तुमच्या मनातूनच उतरला! तुम्हाला खरोखरीच दु:ख व्हायचं, की “सध्याचे” लोक समाजात विष कालवत आहेत, लोकांमध्ये फूट पाडत आहेत आणि तुम्ही ते परत परत सांगायचात. ते चुकीचं वागत्तात, हे मला मान्यच होतं. पण फूट सगळ्यांनीच पाडली आहे आणि विष सगळ्यांनीच पेरलं आहे, हे मी तुम्हांला सांगत होते. जातीचं राजकारण करणं, जातीवरून तिकिटं देणं अशा प्रथा तुमच्या आवडत्या लोकांनी सुरू केल्या हे सगळं सांगायचा मी खूप प्रयत्न केला. पण तुम्हांला ते का दिसत नव्हतं? दुसरं कुणी असतं, तर मी सरळ ‘ढोंगी’ म्हणाले असते. पण तुम्हांला तर कधीच खोटेपणा चालायचा नाही. मी दहावीचे गुण साडेसत्याऐंशीऐवजी अठ्ठ्याऐंशी टक्के सांगितलेलं सुद्धा तुम्हांला पटलं नव्हतं आणि आता मात्र तुम्हांला सगळीकडे निवडक गोष्टी दिसू लागल्या.

जगात असे खूप लोक आहेत, जे कुत्र्या-मांजरांचे मुके घेतात, पोटच्या पोरासारखे त्यांचे लाड करतात आणि त्याच वेळी कोंबडी-बकरीपासून ते गाई-डुकरापर्यंत सगळ्यांचं मांस मिटक्या मारत खातात. त्यांना त्यांच्या वागण्यात कुठलीच विसंगती जाणवत नाही. उलट त्यातले काही महाभाग पाळीव प्राण्यांसाठीच्या संस्थांना देणग्या देतात आणि स्वत:च्या नैतिकतेबद्दल समाधानी असतात. तुमचं आणि तुमच्या मित्रांचं तसं झालं होतं. तुम्हांला तुमच्या विसंगती समजत नव्हत्या आणि जो कुणी त्या दाखवायला जाईल, तो तुमच्या नजरेत फितूर, जातीयवादी होत होता. तुमची लेकच असल्यामुळे मला असलं लेबल चिकटलं नसलं, तरीही मी तुमची निराशा नक्कीच केली होती. तुमच्या सर्व मित्रमंडळींच्या हातात फोन होता आणि तुमच्या गटात निवडक, एका बाजूच्या बातम्या फिरत असायच्या. त्या वाचून रोज तुमची निराशा वाढत होती. त्यातल्या बऱ्याचशा खऱ्या होत्या, खरोखरीच निराशाजनक होत्या. पण तुमच्याकडे फक्त निवडक गोष्टीच यायच्या. तुम्ही काही एका विचारसरणीवर श्रद्धा ठेवून बाजू निवडली होती. पण या देशातल्या बहुसंख्य लोकांनी ते ज्या घरात जन्मले, ज्या जात-धर्म-भाषेत जन्मले, त्यावरून बाजू ठरवली होती आणि मग प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या बाजूनेच पाहिली. तशीच सांगितली. निवडक. रोजच्या ह्या निराशेच्या माऱ्याने तुम्ही पार खचून गेलात हो, अप्पा.

तुमचं मग सुरू असायचं, की मी माझा माझा एकटा राहतो, कधी म्हणायचात की वृद्धाश्रमात जातो. “इथे मन रमत नाही, कंटाळा आला”, असं तर चालूच असायचं. कधी मित्रांना सांगायचात, की “माझ्यासाठी सांगलीला चांगला वृद्धाश्रम शोधा.” खरं तर, इथं घरात नात होती. तुम्ही तिच्याशी खूप गप्पा मारू शकत होतात, तुमची चांगली गट्टी जमली असती. पण वेगवेगळे किस्से सांगणारे, झाडं-फुलं दाखवणारे, गाण्यांमध्ये हरवून जाणारे अप्पा तिला इथे भेटलेच नाहीत. फोनवरचा मजकूर, वृत्तपत्रं-टीव्हीच्या बातम्या-चर्चा ह्यातच तुम्ही बुडून गेलात, हताश आणि चिंताग्रस्त होत गेलात.

एकीकडे तुमचा वृद्धाश्रमाचा ध्यास वाढत होता आणि दुसरीकडे कोरोनाच्या बातम्या येऊन थडकू लागल्या. तुम्ही आमच्याबरोबर शब्दश: अडकलात. बाहेर फिरणंही बंद झालं. मजुरांचे हाल बघून तुमचं हृदय अगदी पिळवटून गेलं. उपाशीपोटी शेकडो मैल चालणारे मजूर. कुणाबरोबर पोरंबाळं, कधी गरोदर बायका. कुणी चिरडून मेले, कुणी अतिश्रमाने जीव सोडला. श्रीमंतांनी विमानातून आणलेल्या रोगाचं ओझं खांद्यावर घेऊन रणरणत्या उन्हात पायपीट करणारे लाखो फाटके जीव बघून तुम्ही व्याकूळ झालात. आमचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आर्थिक मदत तर सगळेच करत होते. आनंद आणि त्याच्या मित्रांचा गट वेगवेगळ्या ठिकाणी किराणा पोहोचवत होते, अन्नवाटप करत होते. मजूर, एकटे राहणारे वृद्ध लोक, सर्कशीत काम करणारे लोक. सगळीकडे तो नुसता फिरत होता. तुम्हांला घास घेताना वाईट वाटायचं, की “आपण भाज्या-फळं खातोय. लोकांना धान्य मिळत नाही.” मी म्हणाले, “खा अप्पा. तुम्ही न खाल्ल्याने मजुरांना मिळणार आहे का? उलट, शेतकऱ्यालाही पैसे मिळणार नाहीत.”  नात इंटरनेटवर शिकते, ऑनलाईन शाळा चालते ते बघूनही तुम्हांला चिंता वाटली, “पालिकेच्या शाळांमधल्या मुलांचं काय?” तंत्रज्ञान आलंच नाही, तर सगळीकडे कसं पोहोचणार? इथवर आलंय, हळूहळू सगळीकडे पसरतंय. काही चांगलं दिसण्याची तुमची क्षमता संपून गेली होती. आनंद इतक्या लोकांपर्यंत मदत पोहोचवत होता! मला वाटायचं, ते बघून तरी तुम्हांला जरा बरं वाटेल...पण तुमच्या नैराश्यात घट झाली नाही. त्याच्या बाहेर जाण्यातूनच बहुधा तुम्हांला कोरोनाची लागण झाली असेल.

मी छोटी होते ना, तेव्हा तुमच्याशिवायच्या जगाची कधी कल्पनाही नव्हती केली. चुकूनही मनात तसा विचार आलेला सहन व्हायचा नाही. मग आई गेल्यावर मी कधीतरी मान्य केलं, की तुमचं वय झालंय. तुम्हीही जाल एक दिवस. पण दिवसेंदिवस तुम्ही इतके दु:खी राहू लागलात, की नंतर नंतर मला वाटू लागलं की तुम्ही आहात खरं.. पण तुमच्या असण्याला, जगण्याला काय अर्थ उरलाय? तुमच्यातले मला माहीत असलेले अप्पा तर कधीच लोप पावले आहेत. कधी कधी वाटायचं, अजून दु:ख आणि ग्लानी वाढण्यापूर्वीच तुमची सुटका व्हावी. एखाद्या दिवशी तुम्ही कुठल्या विनोदावर खूप हसलात किंवा एखादा पदार्थ कौतुकाने खाल्लात, की वाटायचं आज कधी नव्हे ते प्रसन्न दिसले.. अशा चेहऱ्यानेच जावेत. परिस्थिती तुम्ही बदलू शकणार नव्हता. तुम्हांला मान्यही करायची नव्हती. तुम्ही जीवनातली सगळी मौज हरवून दिवस काढत होतात. शेवटी सुटलात. पण तुम्ही कोरोनाशी झुंजत हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही विलगीकरण म्हणून घरात असे आपण अडकून पडलो होतो. आपली भेट होणार नव्हती. फोनवर तुम्ही खूप क्षीण वाटलात. बोलताना धाप लागत होती. नंतर तर ते बोलणंही बंद झालं. तुम्हांला काय वाटत होतं शेवटी? सुखी, प्रेमळ कुटुंब होतं तुमचं, यशस्वी प्राध्यापक होता तुम्ही. भरल्या घरात, सांस्कृतिक समृद्धीत जगलात. थोडंफार फिरून आलात. जग बघितलं. ह्याचं काही समाधान वाटलं का तुम्हांला? तृप्त होऊन डोळे मिटले का तुम्ही? शेवटच्या क्षणी लेकी-नातवंडांची आठवण झाली का तुम्हांला? की बायकोची? की तुमचं बालपण आठवलं? मला कधीच कळणार नाही ते. कमीत कमी वेदनेत तुमची लवकरात लवकर सुटका व्हावी, एवढीच माझी इच्छा होती. अंत्यदर्शन असं काही होणारच नव्हतं. माझ्यासाठी ते खूप वेदनादायी होतं. तुम्हांला शेवटचं शांत, शमलेलं, स्थिर असं एकवार बघायचं होतं. पण तेही घडलं नाही. तुमच्या शेवटच्या काळातली प्रत्येक गोष्ट अशी कल्पनेपलीकडेच घडत गेली.

मी दुसरीत असताना एकदा खोटं बोलले होते, की मी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेत पहिली आले. माझी चित्रकला माहीत असल्यामुळे, तुम्हांला ती थाप आहे हे लगेचच लक्षात आलं. तुम्ही मला प्रेमाने मांडीवर घेऊन म्हणालात, “तुला वाटतं, तू पहिली यावीस असं... हो ना? म्हणून तू तशी कल्पना केलीस. छान आहे तुझी कल्पना.” आता तुम्हीच माझी कल्पना झालात, अप्पा. चहा पिताना, गाणी ऐकताना, झाडी बघताना तुम्ही माझ्या बरोबर असता. आनंदात असता. आपण उत्साहाने गप्पा मारत असतो.

तुमची लाडकी लेक,

मनु


शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

कथा - प्रवास


त्याने डोळे उघडले आणि काळ्या मिट्ट अंधारात आजुबाजूला बघायचा प्रयत्न केला. हळूहळू अंधुकसं दिसू लागलं. कुठली तरी गुहा होती, अरुंद, लहान. तिला थोडीशी फट. नुसते आल्यासारखे आत डोकावणारे प्रकाशाचे तुरळक कण. तो कुठून आला होता? इथे कसा आला? कोण आहे? माहीत नाही. त्याला कशाचंच स्मरण नव्हतं. आत खूप अडचण होत होती, कुणीतरी त्याला आत कोंबल्यासारखं वाटत होतं. अंगात फारशी ताकद नव्हती. पण बाहेर तर पडावं लागणारच होतं. सर्व शक्तीनिशी त्याने जोर लावला. रेटा देत राहिला आणि फट मोठीमोठी होत शेवटी भिंतीला भगदाड पडलं! तो बाहेर आला, उजेडात. पहिल्यांदाच. लख्ख प्रकाशात त्याचे डोळे दीपून गेले. मान खाली करत त्याने डोळे किलकिले केले आणि हळूहळू डोळे उघडताना पहिल्यांदा दिसला तो पायाखालच्या मातीचा तांबूस दिमाखदार रंग आणि थोडी पुढे नजर गेली तशी त्या मातीवर डोलणारी गवताची पोपटी पाती दिसू लागली. लांबच लांब पसरलेल्या त्या पोपटी लुसलुशीत गालिचांवर कुठे नाजुक पिवळी आणि कुठे नाजुक पांढरी नक्षी. त्यापुढे थोडी बसकी झुडुपं, थोडे दणकट खडक, थोडे अस्ताव्यस्त ओंडके. नंतर गर्द झाडी, तिच्या उदरात एक छोटं जग सांभाळणारी आणि त्यानंतर दूर दूरपर्यंत टेकड्या, डोंगर आणि पर्वताच्या रांगा. त्या शिखरांवर पांघरलेलं तलम केशरी आकाश, हळूहळू पिवळं-पांढरं होत होत अथांग निळाई झालेलं. पाहता क्षणी तो प्रेमात पडला. गवताच्या कुरणातून चालत चालत तो पुढे गेला, त्या गवतपात्यांच्या इवल्या इवल्या कणसांमधून, मंद ओल्या सुगंधामधून. तेवढ्यात त्याला एका झुडुपाआड हालचाल जाणवली.

काळेभोर टपोरे डोळे त्याच्याकडे निरखून पाहत होते. तो थबकला, त्या सोनेरी कांतीकडे त्याने विश्वासाने पाहिलं आणि लगेच त्यांची मैत्री झाली. तो ह्या जगात अगदीच नवखा आणि मृगाला मात्र खडान् खडा माहिती होती. इथून पुढे तो ह्या मृगाचं बोट धरून चालणार होता. मृगाने सांगितलं, की खायला कुठे मिळतं, नदीचं थंडगार पाणी कुठल्या ठिकाणी जाऊन प्यायचं, कुठल्या ऋतूत काय करायचं, हिंस्त्र प्राणी कुठले, कुठे त्यांचं भय असतं, कुठे सुरक्षित असतं. प्रत्येक परिस्थितीत तगून राहायला शिकवलं त्याने. मृग वेगवेगळे धडे देत राहिला.
“इथे प्रत्येकजण आपलं बघतो, आपणही तेच करायचं. बाकी जगाचा फार विचार करायचा नाही. आपण आहोत, तर जग आहे.”

“समोर येईल त्याला वाचता आलं पाहिजे, जोखता आलं पाहिजे. तो का आलाय? त्याला काय हवंय?”

त्याला माहीत नव्हतं, की आपण खाण्या-पिण्या, खेळण्या-झोपण्याखेरीज अजून काय करायचं असतं! इथे कशासाठी आलोय आपण? मृगाने सांगितलं, की ह्या टेकड्या ओलांडून खूप पुढे जायचं, मग मोठे डोंगर लागतात. तेही ओलांडून पुढे पर्वतरांग लागते. त्यात वर-वर चढत राहायचं. कठीण वाटांवरून चालत राहायचं. मग एक अत्युच्च शिखर आहे, पांढरं शुभ्र, हिमाच्छादित. सगळ्यात वरचं ठिकाण. असं उंचावर, की हात वर केल्यावर स्वर्गच लागेल हाताला. सगळ्यात सुंदर. तिथली हवा निराळी, प्रकाश वेगळा. वरून खालचं सगळं जग एकदम एका नजरेत दिसतं, छोटं छोटं झालेलं. छोट्या छोट्या टेकड्या, टिकलीसारख्या वनराया, नदी-नाल्यांच्या चमचमत्या रेघा- सगळं रोमांचकारी! ताऱ्यांमध्ये राहायला गेल्यासारखं वाटतं. तिथे आजवर जे झपाटलेले सगळे पोहोचले, त्यांच्यासारखं आपण व्हायचं. त्या सगळ्या विलक्षण जगाचा भाग व्हायचं!

मृगाने सांगितलं, की ह्यात साहस आहे, आव्हान आहे, भारावलेपण आहे आणि तो त्याच्याबरोबर प्रवासाला निघाला. उत्साहाला उधाण आलं. एक अनामिक हुरहूर जाणवू लागली. पण जमेल का हे आपल्याला? मृग म्हणाला, “जमेल म्हटलं तरच जमतं. आपल्याला जमणार आहे. आपण शिखारासाठीच आहोत. आपण स्वत:ला ताणायचं आणि आपल्या क्षमता वापरायच्या. चल माझ्याबरोबर.” त्यांनी वाटचाल सुरू केली. हिरव्या-निळ्या, लाल-सोनेरी रंगांनी नटलेल्या डोंगर-दऱ्या, गगनचुंबी शिखरं - सगळी कल्पनाच इतकी सुंदर वाटत होती, तर प्रत्यक्षात किती भव्य असेल! त्यांनी कुरणं पार केली आणि वनरायांच्या दिशेने ते चालू लागले. बाजूने नदी होती. मृग पुढे धावत होता आणि तो सारखा मागे पडत होता. “अशाने आपण इथेच अडकून राहू. वाऱ्यासारखं जाता आलं पाहिजे”, मृग सांगू लागला. मृगाची चिडचिड आणि त्याची दमछाक होत होती. त्याची फरफट सुरू झाली. “तुला काही झेपेल, असं वाटत नाही”, मृग तुच्छतेने म्हणाला. अधूनमधून शिंगं उगारू लागला. पावलागणिक त्याचा उत्साह आटू लागला.

एका रात्री तो दमून-भागून झोपी गेला. अंग ठसठसत होतं. डोळा कधी लागला तेही कळलं नाही. रात्रीच्या गार वाऱ्यात त्याने अंग आक्रसून घेतलं होतं. पहाटेच्या सोनेरी किरणांनी त्याला हलकंच कुरवाळलं, तसं त्याने डोळे उघडले आणि पहिला विचार त्याच्या डोक्यात आला, “मला का नाही जमत मृग सांगतो ते?” जवळच झुळूझुळू वाहणारी नदी होती. मऊ ओलसर गवतातून चालत तो नदीकाठी गेला आणि त्याने पाण्यात नीट डोकावून पाहिलं. पहिल्यांदाच त्याने स्वत:ला नीट निरखून पाहिलं. आजवर तो फक्त घाईघाईने पाणी प्यायचा. आजुबाजूला कुणी भयंकर प्राणी नाही ना, असं एकीकडे बघायचं आणि दुसरीकडे घाईघाईने घोट घ्यायचे. आज पहिल्यांदाच तो पाणी प्यायला नाही, तर स्वत:कडे बघायला आला होता. तो अजिबातच मृगासारखा नव्हता. मृगाच्या पायांत ताकद होती, भुरळ घालणारी झळाळती कांती होती आणि त्याहून सुंदर डोळे होते. त्याच्याकडे असं काहीच नव्हतं – किडमिडे पाय, उदासवाणा रंग आणि अगदी क्षुल्लक डोळे. तो वेगळा होता. तो अंतर्बाह्य कुणी दुसराच होता. कोण होता? माहीत नाही. पण तो मृग नक्कीच नव्हता. तो मृगाबरोबर, त्याच्या वेगाने धावणार नव्हता. ते त्याला जमणारच नव्हतं. त्याने मृगाचा निरोप घ्यायचं ठरवलं.

घाटदार वळण घेऊन एकीकडे नदी वाहत होती आणि बाजूला काही उंच तर काही डेरेदार वृक्षांची गर्द झाडी होती. आता पहिल्यांदाच तो एकट्याने प्रवास करत होता. ह्या झाडीतून पुढे टेकड्या, डोंगर लागणार होते. शांत वयस्क वृक्ष, त्यांना बिलगलेल्या लडिवाळ वेली, साचलेला पाचोळा, तांबडी माती असं सगळं बघत बघत, अंदाज घेत तो एकेक पाऊल पुढे टाकत होता. दूरवर लांबट हिरव्या पानांआडून त्याला गोड गाणं ऐकू येऊ लागलं. इतका गोडवा त्याने कधीच ऐकला नव्हता. त्याने पावसाचा नाद ऐकला होता, वाऱ्याचं संगीत अनुभवलं होतं. नदीची झुळझुळ, भुंग्यांची रुणझुण आणि पक्ष्यांची किलबिल ऐकली होती. पण हे काहीतरी वेगळंच होतं. तो आवाजाच्या दिशेने पुढे पुढे चालत गेला. आंब्याच्या फांदीवर बसून ती स्वच्छ मोकळ्या आवाजात कुहू-कुहू गात होती. झळाळता काळा कुळकुळीत रंग, गुंजेचे लाल डोळे. आंब्याच्या मोहोराचा घमघमाट पसरला होता. पानांच्या गर्दीत लपून असं स्वत:शीच मनापासून कोण गातं? बाहेर येऊन मिरवणं नाही, एवढा गोड गळा असून लक्ष वेधणं नाही... तो तिच्या प्रेमातच पडला. तिथेच गुंतून गेला.

इतक्या लवकर इतकी गाढ मैत्री कशी काय होते? हे सगळं होणारच होतं का, असंच? विधिलिखित? तो मागणी करत असे आणि ती त्याला गाऊन दाखवी. ती तल्लीन होऊन गात राहायची आणि तो भान हरपून ऐकत राही. किती सहजसुंदर ही देवाण-घेवाण, अगदी तिच्या गळ्यातल्या तानेसारखी! तिच्या गाण्यात त्याने किती काय काय जगून घेतलं – प्रेम तर होतंच, पण श्रद्धाही अनुभवली. सौंदर्य तर होतंच, पण शांतीही अनुभवली. आपण म्हणतो, ते ती गाते आणि ती गाते, ते हृदयाला भिडतं अशा स्वर्गीय आनंदात तो बुडून गेला.

आपण अख्खं आयुष्य एकत्र असायला हवं, असं त्याला वाटू लागलं. त्याने त्याचा मुक्काम गवताच्या कुरणांवरून झाडाच्या फांद्यांवर हलवावा आणि दोघांनी झाडा-पानांमधून मजल दरमजल करत त्या पर्वत शिखरांकडे प्रवास करत राहावा. पोहोचू किंवा नाही पोहोचणार. पण सोबत पुढे जावं. पण ती म्हणाली, की तिला पर्वत शिखरांकडे जाण्यात अजिबात रस नाही. मग त्याचीही तिकडे जाण्याची ओढ हळूहळू कमी होऊ लागली. शिखरांवर असं काय आहे? जे आहे, ते इथेच आहे. दूरवर पसरलेली हिरवी वनराई, मोहोराच्या घमघमाटाने भारून गेलेलं वातावरण आणि त्यात तिचं मंजुळ गाणं. हेच त्याच्या दुनियेतलं विश्व आहे. हे सगळं सुंदर आहे. हे असंच धरून ठेवावं, गोठवून ठेवावं.

तिला नुसतं ऐकतच राहावं असं त्याला वाटे. पण हळूहळू तो मनातल्या मनात तिच्याशी बोलू लागला, “गाणं तुझा श्वास आहे. पण मला गाता येत नाही. नाचावंसं वाटतं मला. तू नाचशील माझ्याबरोबर, गिरक्या घेत, बेभान होऊन? ढगांकडे बघत राहावंसं वाटतं. ढगांचे उत्कट रंग आणि गूढ आकार शेजारी बसून बघशील तू माझ्याबरोबर? पावसाचा एकेक थेंब पाण्यात पडून मोठं वलय होत असताना हरवशील माझ्याबरोबर नदीच्या काठी?”

त्याला तिच्याशी खूप काही बोलावंसं वाटे. त्याच्या गुहेबद्दल. तो तिथून बाहेर आला तो काळ. त्याचं वेडेपण, त्याचं भाबडेपण, भारावलेपण. तिला काय वाटेल त्याबद्दल? त्याला वाटतो तसा हळवेपणा वाटेल का? तिने भावूक व्हावं असं त्याचं म्हणणं नव्हतं. पण ती कोरड्या चेहऱ्याने नुसतं ऐकत राहील का? मग तर त्याला खूपच वाईट वाटेल तिला सांगितल्याबद्दल. तिच्या कोरडेपणाची भीती वाटे त्याला आणि मग मूकच होऊन जाई तो. त्याला असं नेहमीच मुरड घालत जगायला लागेल का? त्याला खरंच हवा होता का हा असा सहवास? जसा त्याला हवा होता, तसा सहवास तिचा नव्हता. जो तिचा होता, तो त्याच्या स्वप्नातला नव्हता. मग तरीही त्याला तिचा, तिचाच का हवा होता? कसली ओढ होती ही? हे असं न उलगडणारं कोडं पडलं की उगीचच त्यात काहीतरी दिव्यत्व, भव्यत्व त्याला जाणवू लागे आणि सुखावून जाई तो त्याच्याच मनाच्या भव्यतेने.

तिच्यामध्ये त्याला अगणित सुंदर गोष्टी दिसत. पण तिला दिसतं का त्याच्यात काही विशेष? त्याचा आवाज तर अगदीच भसाडा होता. पण दुसरं काही विशेष दिसतं का तिला? खरं तर, त्यालाच त्याच्यात काही विशेष वाटत नव्हतं. म्हणजे तो खरंच इतका नगण्य होता, की तो तिच्या नजरेने जग पाहत असल्याचा हा परिणाम होता? तिला कुठलं तरी नवं जग शोधायचं होतं. कुठे, ते तिने सांगितलं नव्हतं. तिच्या लाल डोळ्यांमधली गुपितं त्याला कधी वाचता आली नाहीत. आणि जरी त्याला समजला असता तिचा मार्ग, तरी त्याच्यामध्ये आता कुठली आस उरली नव्हती. त्यामुळे संपणारच होतं सगळं. ती म्हणाली, “प्रत्येक गोष्ट कधीतरी संपणारच.” त्याला कधीच इतका कोरडेपणा जमला नव्हता.

आधी तो दगडच झाला. मोठ्या वडाच्या सावलीत पारंब्या लपेटून गवतात तोंड खुपसून दिवसच्या दिवस नुसता लोळत राहिला. काही दिवसांनी त्याला वाटू लागलं, की “आठवणी तर आहेतच आपल्याकडे. जगायला आठवणी पुरेशा आहेत.”  मग तो उठला, भटकू लागला, जेवू-खाऊ लागला. पण सगळ्यात तिचं पार्श्वसंगीत असायचं. दरवेळी, दर ठिकाणी तिचा आवाज बरोबर असायचा आणि शेवटी आठवणी अंगावर ओढूनही झोप नाही लागायची. सुंदर आठवणी होत्या, तशा दुखऱ्याही होत्या. किंबहुना दुखऱ्याच जास्त होत्या. नकोच ती आवर्तनं. त्यापेक्षा स्वप्नं सुंदर असतात. एकदा डोळे मिटले, की आपल्याला हवं ते बघावं. खरं तर त्याला नीट काही जमतच नव्हतं.

एकदा असंच भटकताना त्याला म्हातारी वानर भेटली. म्हणाली, “इथे काय करतोस? जा, जाऊन डोंगर पादाक्रांत कर. उंच उंच शिखरांची स्वप्नं बघ.” त्याला आता शिखरं सर करायची उमेद उरली नव्हती आणि वेळही उलटून गेली होती. कोकिळेच्या भोवताली रमला नसता, तर आता डोंगरांजवळ असला असता. आता निघून काय साधणार होतं? आता इथेच काहीतरी करायला लागेल, कुणाची तरी साथ शोधता येईल. म्हातारीला काही हे रुचलं नाही. तरुण असताना तिला शुभ्र शिखरं खुणावत होती. पण वाटेत एक सवंगडी भेटला आणि ती ह्या वनातच थांबली. पाच मुलं झाली. तिच्या दुधावर तर वाढलीच. पण तिच्या आशा-आकांक्षाही त्यांनी पिऊन घेतल्या. त्यांच्यासाठी सगळं सोडलं. नंतर सगळी कृतघ्न निघाली. खंतावू नये, असा एकही नाही. कुटुंबातला आनंद म्हणजे मृगजळ वाटे तिला. त्यापेक्षा स्वप्नांच्या मागे धावली असती, उंच उंच गेली असती आणि अभिमानाने जगली असती. आजही ती सकाळी जेव्हा डोळे उघडते, तेव्हा पहिल्यांदा तिची नजर दूरवरच्या उंच शिखराकडे जाते. खोल गेलेल्या डोळ्यांमध्ये आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये हलकीशी चमक तरळून जाते. “अजूनही जमेल तुला. नक्की जमेल. शक्य तेवढं जात राहायचं रोज. थांबायचं नाही”, तिने त्याला समजावलं.

“खरंच जमेल मला?”, त्याने विचार केला. कुणी चांगलं काही सांगितलं, की विश्वास ठेवणं इतकं अवघड का बरं जातं? मृगाचं तुच्छ बोलणं लगेच खरं वाटायचं. तरी पण तो निघाला. पुढे चालू लागला. डोक्यातलं वादळ शांत ठेवायचं असेल तर चालत राहिलेलं बरं. जंगल तुडवता तुडवता त्याची शक्ती वाढू लागली होती. उत्साह वाटू लागला होता. तरी पण सलत असलेल्या काट्यासारखा एक प्रश्न मनातून जातच नव्हता, “मग ती का गायची माझ्यासाठी? मी सांगेन ते गाणं का बरं म्हणायची?” गुंता सुटत नव्हता. हा काट्याचा सल म्हणजे विचित्र आजार होता – ना धड बरा होणारा, ना जीवावर बेतणारा.

आता त्याला टेकड्या लागल्या होत्या. चालण्यात आनंद वाटत होता. चढण चढताना तो लांब लांब उड्या मारू लागला. हे एक नवीनच काही जमू लागलं, हवेत उडल्यासारखं! जंगल विरळ होऊ लागलं आणि गारवा वाढू लागला. खाली दऱ्या दिसू लागल्या. दिवसभराच्या प्रवासानंतर संध्याकाळी तो गवतफुलांच्या गालिच्यावर विसावत असे. दूरवरची हिमशिखरं सूर्यकिरणांत तेजस्वी अग्निकुंडासारखी दिसत. अशाच एका गूढ उजळवणाऱ्या संध्याकाळी त्याला अचानक चमकून गेलं, “मी करत असलेल्या कौतुकासाठी ती गात होती, माझ्यासाठी नाही. मला ती आवडते, हे तिला आवडलं होतं.” सगळं अगदी स्पष्ट झालं. गुंता सुटला होता. रात्रीच्या स्वच्छ निरभ्र आकाशात एकेक नक्षत्र उगवू लागलं आणि अवघा आसमंत उजळून गेला.

आता त्याला गती आली होती. अनामिक आनंद जाणवत होता. शुभ्र शिखरांची वाट स्पष्ट दिसत होती. तिथं पोहोचण्याची खात्री पटू लागली होती. आत्मविश्वास वाढत होता. तो जणू तरंगत चालला होता. मधल्याच एका डोंगराच्या वळणावर त्याला एक वेगळीच अनवट वाट दिसली. ही हिमशिखरांकडे नव्हती जात. एका वेगळ्याच दिशेला जाणारं वळण लागलं होतं त्याला. समोर उंच शिखरं दिसत होती. आवाक्यात आली होती. पण का कुणास ठाऊक त्याच्या मनाला ही वेगळीच वाट खुणावू लागली आणि अनावर ओढीने तो तिकडे वळला सुद्धा. त्याची द्विधा अवस्था झाली नाही. त्याला निर्णय घ्यावा लागला नाही. आशा-निराशा, आठवणी-स्वप्नं सगळी तिथेच टाकून त्याने नवी वाट धरली आणि तो पुढे पुढे जाऊ लागला. सोबतीला भणाणता वारा, निरामय  वातावरण आणि हिरवा सुगंध. सळसळत्या उत्साहात तो झपाटल्यासारखा झेपावत होता. कुठे ते माहीत नाही. प्रवासाच्या अंगभूत आनंदात पुढे पुढे जात होता. नि:शब्द प्रवास. डोक्यातले आवाज थांबले होते. स्वत:शीही बोलायची गरज उरली नव्हती. एकेक डोंगर सर झाले, कडे-कपारी मागे पडल्या.

ह्या प्रवासाला एक नाद आला होता, एक ताल आला होता. त्याला स्वत:ला एक छानसा डौल आला होता. छाती पुढे काढणारी सहज ऐट आली होती. तो आतून आतून फुलून येत होता. त्याला सर्वांगच नवीन जाणवत होतं. एके दिवशी त्याला पाण्याचा घुमणारा आश्वस्त आवाज ऐकू येऊ लागला. त्याने त्याच्या समोरचा डोंगर ओलांडला आणि  पाहिलं, तर पुढच्या डोंगरावरून शुभ्र धबधबा कोसळत होता. कडेकपारींतल्या जलधारा मनसोक्त उड्या मारून खालच्या निळ्या तळ्यात मिसळून जात होत्या. सगळीकडे तुषार उडत होते. तळ्यामध्ये डोंगरा-धबधब्याचं हलतं प्रतिबिंब दिसत होतं. त्याने तळ्याकडे डोळे भरून पाहिलं. त्या तळ्याची निळाई त्याला स्वत:मध्ये जाणवू लागली. त्याची कांती सुद्धा पाण्यासारखी चमचमत होती. तो आवेगाने खाली दरीतल्या तळ्याकडे झेपावला आणि उडतच खाली गेला. त्याने तळ्यात वाकून निरखून पाहिलं. झगमगत्या रंगांची मखमली कांती आणि डोक्यावर निळा राजेशाही तुरा! त्याला आनंदाचं उधाण आलं. त्याच्या अंगाअंगातून देखणा भव्य पिसारा फुलला आणि त्यातल्या शेकडो गर्द जांभळ्या डोळ्यांमधून त्याने स्वत:कडेच आश्चर्याने पाहिलं. मयूर होता तो, आलिशान, रूपसंपन्न मयूर. तो मृगासारखा धावणार नव्हता, कोकिळेसारखा गाणारही नव्हता. तो त्याच्या अलौकिक सौंदर्याच्या अंगभूत डौलाने बेभान नाचणार होता. अंगात भिनलेल्या लय-तालावर दृष्ट लागण्यासारखा पदन्यास करणार होता. स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी. सहजभाव म्हणून. चराचरातून त्याला संगीत ऐकू येऊ लागलं. त्याने नृत्य सुरू केलं.