उषाताई नेहमीप्रमाणे गजर वाजायच्या आधीच जाग्या झाल्या. ह्या वयात झोपेचं जरा अवघडच झालं होतं. दोन वाजता जाग येते, पुन्हा चार वाजता येते आणि शेवटी साडे पाचला जाग आल्यावर त्या सहाच्या गजरासाठी न थांबताच उठतात. एकटीला घर खायला उठतं. अगदी जिवावर येतं एकटीसाठी चहा करून प्यायला. पण नेमकी आता मेली झोप लागत नाही. वीणा तान्ही होती आणि पहाटेच उठून दुधासाठी रडायची, तेव्हा मात्र पापणी अगदी उचलायची नाही.
चहा पिऊन झाडांना पाणी घालून त्या रोज फिरायला जातात.
घरातून बाहेर पडत राहावं लागतं, चालत राहावं लागतं. आपणच आपल्याला गुंतवून ठेवावं
लागतं. चहा पिऊन त्या बाल्कनीत आल्या. वठलेली कृष्णतुळस बघून त्यांना आज पुन्हा हळहळ
वाटली. तिथे नजर गेली, की पुन्हा त्यांच्या मनात तिचा निकोप गंध दरवळू लागे. पानं,
मंजिऱ्या निस्तेज पांढरट पडून गळून गेल्या होत्या. पण आता तिच्या आजुबाजूला इवली
इवली चार-सहा जिज्ञासू रोपं उगवून आलेली दिसत होती. उषाताईंनी हलक्या हाताने
त्यांना हळुवार पाणी पाजलं आणि क्षणभर त्यांना अगदी धन्य वाटलं. त्यांच्या जिवणीची
हसल्यासारखी हालचाल झाली आणि त्यांच्या ओघळू लागलेल्या सावळ्या गालाला खळी पडली.
आज काही त्या फिरायला जाणार नव्हत्या. उद्या अमेरिकेहून नातवंडं
येणार म्हणून त्यांना बरीच कामं करायची होती आणि थकवाही यायला नको होता. कालच
दुकानदाराने किराणा आणून दिला होता. आज त्या थोडी तयारी करून ठेवणार होत्या. पुरण करायचं
होतं, मोदकाचं सारण करायचं होतं. अशी सगळी तयारी करून त्या फ्रिजमध्ये पदार्थ ठेवून
देणार होत्या. मुलं दहा दिवस इथे राहणार होती. नंतर आठ दिवस तिकडच्या
आजी-आजोबांकडे आणि मग परत जाणार होती. मुलांसाठी आणि मुलांबरोबर काय काय करायचं,
त्याची सारखी आखणी, उजळणी त्या मनाशी करत होत्या. त्याचे अजुनाजून तपशील ठरवत
होत्या. नाश्त्याला त्यांना गोड घावन द्यायचं आणि म्हणायचं, “हा इथला पॅनकेक.” वीणाची पेटी
त्यांना द्यायची आणि म्हणायचं, “हा तुमच्या आईचा हार्मोनियम. पियानोसारखा दोन
हातांनी नाही, एकाच हाताने वाजवायचा बरं का! दुसरा हात मागे भात्याला.” रोज भारतीय
पदार्थ खाऊन कंटाळतील म्हणून मध्येच एक दिवस पास्ता करायचा.
एका माणसाचा स्वयंपाक तो किती असणार! उषाताईंनी स्वत:साठी
थालीपीठ लावलं आणि मोदकाचं सारण करायला घेतलं. दुसरीकडे पुरणाची डाळ लावली
शिजायला. तेवढ्यात कामाला सविता आली. तिच्याकडून सगळं घर चकचकीत करून घेतलं
त्यांनी आणि बजावलं, “आता दहा दिवस अजिबात दांडी मारू नकोस हं!” तिलाही एक थालीपीठ
दिलं खायला. सविताने विचारलं, “आता किती वर्षाची झाली ओ मुलं?”
“मोठा बारा वर्षाचाय, धाकटा होईल आता दहाचा.”
“थोरला वीणाताईंसारखा दिसतो ना?”
“थोडासा दिसतो, रंग तिचा घेतलाय त्याने. दोघांमध्येही थोडाफार
भास आहे तिचा”, असं म्हणता म्हणता भरून आलं त्यांना. स्वत:ला सावरत त्या
म्हणाल्या, “वीणा अगदी तिच्या वडिलांसारखी दिसायची. सगळे मला म्हणायचे, की
पितृमुखी मुलगी भाग्यवान असते. कसलं भाग्य आलं वाट्याला? भरल्या ताटावरून उठून
निघून गेली बघ.” आता मात्र कंठ दाटून आला त्यांचा आणि डोळे भरून आले.
“शांत व्हा आजी. आता मुलांसमोर खंबीर ऱ्हायचं ना तुमाला?”
पावसाची अचानक मोठी सर येऊन लगेचच थांबावी तशा उषाताई शांत
झाल्या. सविताही पुढच्या कामांना निघून गेली. वीणा म्हणजे नुसता चैतन्याचा झरा
होती. कधी लाजणं माहीत नाही, कशाचा संकोच नाही. लहानपणापासून पुढे होऊन सगळ्यात
भाग घेणारी. कशात कधी मागे राहणं माहीत नव्हतं. आणि इथेही अशी पुढे निघून गेली,
रांग मोडून पुढे गेली! वडिलांची लाडकी होती खूप. घाईघाईने गेली त्यांना भेटायला. दीड
वर्ष होऊन गेलं तरी उषाताईंना खरं वाटत नव्हतं. काही जखमा कधीच भरून येणार नसतात.
वीणाच्या आजारपणात उषाताई तिच्याकडे जाऊन राहिल्या होत्या.
तिला ‘बरी होशील’, असं सांगत होत्या. पण तिसऱ्या टप्प्यावरचा कॅन्सर बरा होण्याची शक्यता
फारशी नसल्याचं तिलाही माहीत असावं बहुतेक. उसनं अवसान आणून त्यांनी तिचं आणि
नातवंडांचं खूप केलं आणि त्यांच्याइतकंच देवेननेही केलं. बायको-मुलांसाठी
दिवसरात्र तो झटला होता. नंतरही त्या दोन महिने तिथेच होत्या. देवेन आणि
मुलांची घडी बसवत होत्या, धीराने उभ्या होत्या. मुलं त्यांना आणि देवेनला बिलगली
होती. पण कुणी कितीही केलं, तरी आईची सर येते का; असं उषाताईंना राहून राहून वाटे.
त्यांचा पाय निघत नव्हताच. पण त्या देशात त्यांना अजून राहताही येणार नव्हतं.
इकडे परत आल्या आणि मग मात्र त्यांचा धीर सुटला. ह्या
रिकाम्या घरात कितीतरी वेळा त्या ओक्साबोक्शी रडल्या. अमेरिकेला जायच्या आधी पण
त्या इथे एकट्याच राहात होत्या. पण तेव्हा हे घर जिवंत वाटायचं. आता सगळं भकास
झालं, सगळी रयाच निघून गेली. वीणाच्या जन्मापासून त्यांच्या आयुष्यात खरोखरीच वीणा
झंकारत होती. इतका उत्साह, इतका आनंद, इतकं समाधान त्यांनी कधी अनुभवलं नव्हतं आणि
आता अचानक आयुष्यातलं संगीतच हरवलं. उषाताईंच्या डोक्यातली विचाराची घरघर कधी
थांबायचीच नाही. एकच एक मूल असू नये म्हणतात, तेच बरोबर होतं का? चुकलंच होतं का
आपलं? पण वीणाला खूप अभिमान होता आपले आई-वडील ‘त्या’ काळी एका मुलीवर थांबले
म्हणून! आणि झालं जरी असतं तिच्या पाठीवर दुसरं मूल, तरी त्याने दु:ख कमी होणार
होतं का? भळभळ थांबणार होती का? करवतीच्या दातांसारखे हे प्रश्न त्यांना चिरत
राहायचे.
देवेनने त्याचा शब्द पाळला होता. वीणा जशी दर आठवड्याला
व्हिडिओ कॉल करायची, तसाच तो उषाताईंची नातवंडांशी भेट घडवून आणायचा. उषाताईंकडे
बोलण्यासारखं काय असणार? त्या आपल्या ‘पाऊस संपला’, ‘थंडी पडली’ असं काहीतरी
सांगायच्या. मुलांचं ऐकण्यातच आनंद असायचा. मुलं काही ना काही सांगत राहायची.
काढलेली चित्रं दाखव, कधी काही जादू करून दाखव, शाळेत कशी छान ग्रेड मिळाली ते
सांग असं चालायचं. ह्या एका संवादासाठी आठवडा ढकलत राहायचा. सगळ्या पाकळ्या गळून
गेल्या तरी कुठल्या ना कुठल्या धाग्याने जीवन तुम्हांला कसं बांधून ठेवतं!
आज दिवसभर बरीच कामं करून उषाताई जरा थकल्या होत्या.
सोफ्यावर जरा वेळ शांत बसल्या तर तिथे बसल्या बसल्याच डोळा लागला. डोळे उघडले तेव्हा
निळीसावळी संध्याकाळ पसरली होती. वातावरण जडशीळ झालं होतं. सगळं अंधुक अंधुक दिसत
होतं. उठून त्यांनी चष्मा घातला आणि देवापुढे दिवा लावला. तुळशीपाशीही दिवा ठेवला.
त्या मंद केशरी प्रकाशात तुळशीची बाळं अगदी रेखीव, नितळ दिसत होती. त्यांना नुसतं
बघूनच उषाताईंचे डोळे निवले आणि मनातल्या मनात त्या “इडा-पीडा टळो” असं म्हणाल्या.
आजुबाजूच्या एकेका घरात हळूहळू दिवे लागत होते. आता दोन घास पोटात ढकलायचे,
आवराआवर करायची आणि लवकरच झोपायचं असं त्यांनी ठरवलं. पहाटेच त्यांची बछडी येणार
होती!
अंथरुणावर पडल्या तेव्हा त्यांना झोप लागेना. नेहमीसारखा नागाचा
मोठा फणा काढून चिंता समोर उभ्या राहिल्या. आजकाल हे रोजचं झालं होतं. मन पुन्हा
पुन्हा म्हणायचं, की मुलांना आता इथेच ठेवून घ्यायचं. आईनंतर तितक्या तळमळीने फक्त
आजीच करू शकते सगळं. ह्या वयातही जमेल. एकदा ठरवलं की हत्तीचं बळ येईल अंगात.
शिवाय आपल्याकडे कामाला बायकाही मिळतात. त्यामुळे काही अवघड नाही. तिकडच्या एवढं
मोठं घर नाही, तिकडे जास्त सुविधा असतात; हेही खरंच. पण आपल्याकडेही चांगलं शिक्षण
मिळतं. लहान आहेत तोवर राहतील इथे, आजीच्या पंखाखाली. मग कॉलेजला जातील तिकडच्या
देशात. मोठीही होतील तोवर. चाळिशीतला देवेन म्हणजे तसा तरुणच म्हणायचा. तो
त्याच्या डोळ्यांनीच आयुष्याकडे बघणार. तीन-चार महिने झाले त्याला एक मैत्रीणही
भेटली होती. फिलिपिनो होती कुणी. अजून लग्नाचं काही ठरलं नसलं, तरी वर्षभरात
करतील, असं उषाताईंना वाटत होतं. तसं देवेनने त्यांच्यापासून काही लपवलं नव्हतं
कधी. पण कोण कुठली वेगळ्या संस्कृतीची बाई येईल घरात आणि ही सोन्यासारखी मुलं अगदी
बिचारी होऊन जातील! ह्याच एका चिंतेची कबुतरं रोज फिरून फिरून घिरट्या घालत होती.
त्या अजून कुणाशी – मैत्रिणी-बहिणीशी - ह्यावर बोलल्या नव्हत्या. पण आता त्यांचं
ठरलं, की देवेनशी बोलायचं. कसंही करून मुलांना आपल्याकडेच ठेवून घ्यायचं. “मुलं राहतील
इकडे”, अशी स्वत:चीच समजूत घातली, की मग त्यांना झोप लागत असे. आजही हाच विचार
पांघरून त्या झोपी जाणार होत्या.
थोडा वेळ गेला आणि उषाताईंना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत
अडकल्यासारखं, गुदमरल्यासारखं वाटू लागलं. आतून काहीतरी आवळल्यासारखं झालं. त्या हेलपाटत
उठून बसल्या. जीव अगदी घाबराघुबरा झाला. उशाशी ठेवलेलं पाणी कसंबसं प्यायल्या आणि
एक उबळ आली. घशात तिखट तिखट जाणवलं, करपट ढेकरा आल्या आणि त्यांनी हुश्श म्हटलं.
पित्तच होतं साधं. थालीपीठ सोसलं नसेल बहुतेक. पण त्या पाच मिनिटांच्या प्रसंगाने
त्यांना हादरवून सोडलं, खऱ्या अर्थाने जागं केलं. उषाताईंच्या लक्षात आलं, की आपला
काही भरवसा नाही. आज आहे, उद्या नाही. नश्वरता अशी आतून आतून जाणवत असते तर! अचानक
एखाद्या मोठ्या लाटेने थडकावं आणि सगळं धुवून स्वच्छ करावं, तसं झालं. एकदा मुलं
इथं राहू लागली, की त्यांच्या स्वत:च्याच घरात पाहुणी होतील ती. उषाताईंचं काही
बरंवाईट झालं, तर देवेनच्या नव्या संसारात प्रवेश करणं किती अवघड होईल मुलांना! कल्पनेने
सुद्धा पीळ पडतो पोटात. आधी तिकडची रोपं आणून इथे रुजवायची आणि नंतर पुन्हा इथून
तिथे हलवायची? त्यांना स्वत:चा वेडा हट्ट सोडावा लागणार होता. आता ह्या वयात समंजस
स्वीकार करण्याखेरीज दुसरं काय हातात होतं? हळवेपणाचे झरे तर पाझरणारच होते,
मनाविरुद्ध वाहणारच होते. पण आता ते सगळं आत वळवायचं. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाला
भिजवायचं नाही. “तुमच्या तुमच्याच घरी रहा, बाळांनो! आजीकडे चार दिवस पाहुण्यासारखे
या, कोडकौतुक करून घ्या आणि पुन्हा आपल्या घरी जा”, उषाताई स्वत:शीच मोठ्यांदा
म्हणाल्या आणि गाढ झोपी गेल्या. निरभ्र आकाशात अष्टमीचा अर्धा चंद्र शांत तेवत
राहिला.
रात्रीची गडद मखमली दुलई बाजूला सारत पहाट वर येऊ लागली
होती. वातावरणात लालसर मोहिनी जाणवू लागली होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि हलका
वारा. उषाताईंची लगबग सुरू होती. कधीही दार वाजेल म्हणून त्या तयारीतच होत्या आणि
तसं ते वाजलंही. दार उघडलं तेव्हा समोर देवेनबरोबर दोन्ही हसतमुख गोंडस पिल्लं उभी
होती. आपापलं सामान सांभाळणारी. कॉलवरती दिसतात त्यापेक्षा कितीतरी उंच आणि मोठी
वाटणारी. थोरल्याचा वीणासारखाच झळाळता गोरा रंग, तशीच जिवणी, तेच हास्य.
धाकट्याच्या सावळ्या लाघवी चेहऱ्यावर उठून दिसणारे वीणाचे काळेभोर बोलके डोळे.
उषाताईंनी दोघांकडे डोळे भरून पाहिलं आणि झटकन त्यांना कुशीत घेतलं. त्यांच्या
घशात मोठा आवंढा आला, नाकाचा शेंडा लाल झाला आणि नकळत डोळे भरून वाहू लागले.
त्यांच्या घराचा कण न् कण जिवंत झाला, भारला गेला, आतून आतून उमलून आला. त्यांच्या अवघ्या
घराचं फुलांनी मोहरलेलं चाफ्याचं झाड झालं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा