माल्कम ग्लॅडवेल हे नावाजलेले लेखक आहेत. वेगवेगळ्या घटना, प्रयोग आणि संशोधनांचा आढावा घेऊन, त्यात काही सामायिक सूत्र शोधून त्याआधारे काही नवीन विचार, विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. गेल्या सुमारे पंधरा वर्षांमध्ये मी त्यांची The Tipping Point, Blink, Outliers आणि David and Goliath अशी चार पुस्तकं वाचली होती. नुकतंच त्यांचं नवीन आलेलं Talking to Strangers – What We Should Know about the People We Don’t Know हे पुस्तक वाचलं. रोचक पद्धतीने एकेक घटना किंवा प्रयोग खुलवत नेणं आणि त्यातून विषयाचा एकेक पैलू उलगडत नेणं, ही खास ग्लॅडवेल शैली इथेही दिसते.
सर्वसाधारणपणे आपल्याला असं वाटतं, की एखाद्याला प्रत्यक्ष बघून, भेटून आपल्याला त्या माणसाचा बऱ्यापैकी अंदाज येतो. समोरच्या अनोळखी माणसाचा चेहरा, डोळे बघून, त्याच्याशी बोलून तो माणूस कसा आहे त्याची साधारण कल्पना आपल्याला येते, असं आपण समजतो. म्हणून तर प्रत्यक्ष मुलाखत घेऊन आपण कोणाला नोकरी द्यायची किंवा कोणाला कामाला ठेवायचं, ते ठरवतो. आपल्याकडे तर वर्षानुवर्षं असं एक-दोन भेटीत लोक लग्नही ठरवत/करत आले आहेत. आपलं हे गृहितक कसं चुकीचं आहे आणि अनोळखी माणूस समजून घेणं किती गुंतागुंतीचं आणि अवघड काम आहे, ह्याबद्दल ग्लॅडवेल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे.ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलेन (आणि इतर
अधिकारी) हिटलरला प्रत्यक्ष भेटूनही त्यांना त्याच्या मनसुब्याचा अजिबात अंदाज आला
नाही. त्याउलट, जे नेते हिटलरला कधीच भेटले नव्हते, त्यांना मात्र त्याच्या
हेतूबद्दल (रास्त) शंका होत्या. दुसरं उदाहरण म्हणजे अमेरिकी गुप्तचर खात्यातले
(CIA) काही हेर प्रत्यक्षात क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोसाठी काम करत होते आणि
त्याचा अमेरिकन अधिकाऱ्यांना अनेक वर्षं थांगपत्ता लागला नाही. अशी बरीच उदाहरणं
ग्लॅडवेल देतात. आरोपीशी
बोलून, त्याच्याकडे बघून ‘जामीन द्यायचा की नाही’ हा निर्णय घेणाऱ्या
न्यायाधीशांपेक्षा आरोपीला न बघणारा संगणकाचा प्रोग्राम कुणाला जामीन द्यायला हरकत
नाही, हा निर्णय जास्त चांगल्या प्रकारे घेतो; हे सिद्ध झालेलं आहे. ग्लॅडवेल
आपल्यासमोर मुख्यत: दोन प्रश्न उभे करतात. पहिला म्हणजे, ‘समोरचा माणूस आपल्या
तोंडावर साफ खोटं बोलतो आहे, हे आपल्याला कसं कळत नाही?’ आणि दुसरा प्रश्न असा, की
‘काही वेळेला एखाद्या माणसाला न भेटलेल्या लोकांना भेटलेल्यांपेक्षा त्याचा चांगला
आडाखा कसा काय बांधता येतो?’. वेगवेगळी उदाहरणं आणि संशोधनाच्या आधारे पुस्तकात
ह्या प्रश्नांचा धांडोळा घेतलेला आहे.
आपसूक खरं वाटणे – एका प्रयोगात काही तरुणांची चाचणी परीक्षा घेतली. ह्या परीक्षेत मुद्दाम
पर्यवेक्षक मध्येच बाहेर गेला आणि प्रयोगासाठी आधीच नेमलेल्या एका तरुणाने “आपण
उत्तरं बघू” असं इतरांना सुचवलं. काहींनी बघितली, काहींनी नाही. परीक्षेनंतर
“तुम्ही कॉपी केली का” अशा मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचं चित्रण केलं. मुलाखतीत
काही लोक खरं बोलले आणि काही खोटं. ह्या चित्रफिती बघून किती लोकांना मुलाखतीतला
तरुण खरं बोलतो का खोटं हे समजतं, त्याचा अभ्यास केला. फक्त ५४% वेळा लोकांना समोरचा खरं बोलतो का खोटं, ते ओळखू
आलं. हे म्हणजे अनियत (random) तर्कापेक्षा थोडंसंच जास्त आहे. पण त्यात गंमत अशी
आहे, की खरं बोलणारा माणूस “खरं बोलतो” हे लोकांना ५०% हून खूप जास्त वेळा समजतं.
पण खोटं बोलणारा “खोटं बोलतो आहे” हे मात्र ३०% हूनही कमी वेळा ओळखायला येतं.
ह्याचं मुख्य कारण म्हणजे समोरचा खरं बोलतो, असं आपल्याला आपसूकच वाटतं. जोपर्यंत
शंका घेण्यासारखं काही वेगळं वाटत नाही, तोपर्यंत “माणूस खरंच बोलतो आहे” असं आपण
धरून चालतो. शंका आल्यावरही आधी आपला संशयाचा फायदा देण्याकडे कल असतो. पुरेशा
शंका आल्यावर, शंकांचा एक विशिष्ट टप्पा (threshold) पार केल्यावरच आपल्याला समोरचा खोटं बोलतो आहे, असं वाटतं. पोलिस, न्यायालय
अशा खात्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही खोटं बोलणारा सहज ओळखता येत नाही. “आपसूक
खरं वाटणे” ह्या मनुष्यस्वभावामुळे काही फसगती होतात, काही धोके निर्माण होतात. पण
परस्परांवर विश्वास नसेल, प्रत्येक बाबतीत संशय येत असेल तर समाज चालूच शकणार
नाही, माणूस काही घडवूच शकणार नाही. म्हणून आपला स्वभाव असा झालेला आहे.
पारदर्शकतेचा अभाव – आपल्याला जेव्हा एखादा माणूस माहिती नसतो, तेव्हा आपण त्याचे हावभाव,
देहबोली आणि त्याच्या वागण्यावरून त्याच्याबद्दल आपलं मत बनवतो. आपण असं मानून
चालतो, की माणसाच्या मनात जे आहे त्याचं प्रतिबिंब त्याच्या हावभावात दिसतं.
थोडक्यात म्हणजे, माणसाचा चेहरा आणि देहबोली पारदर्शक आहेत, असं आपल्याला वाटतं
आणि इथेच मोठी गफलत होते.
सर्जिओ हारिलो नावाच्या एका
मानववंशशास्त्रज्ञाने वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला, की
वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्याच हावभावांचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. उदा. आठ्या घातलेल्या माणसाचा फोटो बघून बहुतेक स्पॅनिश लोक
त्याला “रागावलेला” म्हणाले. तर प्रशांत महासागरातल्या ट्रोब्रिअंड नावाच्या बेटावरच्या
बऱ्याच लोकांना तो “घाबरलेला” वाटला. स्मितहास्य असलेला फोटो सर्व स्पॅनिश लोकांना
आनंदी वाटला. ट्रोब्रिअंड बेटावर मात्र फक्त ५८% लोकांना तो आनंदी वाटला. एकाच
संस्कृतीत सुद्धा आपल्याला एकमेकांचे जसे हावभाव अपेक्षित असतात, तसे प्रत्यक्षात बऱ्याचदा
दिसत नाहीत. आतल्या भावना आणि बाहेरचे हावभाव जेव्हा जुळतात, तेव्हा तिथे
पारदर्शकता असते असं लेखकाने म्हटलं आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी हे जुळत नाही,
पारदर्शकतेचा अभाव असतो. त्यामुळे चेहरा बघून माणूस समजत नाही.
जोडी जुळणे – माणसाचं वागणं हे त्याची परिस्थिती, आजुबाजूचं वातावरण ह्यावर अवलंबून असतं. ते विचारात न घेता माणसाला सुटं बघता
येत नाही. त्याच्या वागण्याची त्याच्या वातावरणाशी जोडी जुळलेली असते. ही जोडी
बदलली म्हणजेच परिस्थिती/वातावरण बदललं, तर त्याचं वागणंही बदलतं. हे लक्षात न आल्यामुळेही
दुसऱ्याला ओळखण्यात, समजून घेण्यात आपण चूक करतो.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये
घराघरांत स्वयंपाकासाठी पाईपने जो गॅस येत असे, तो विषारी असायचा. त्या काळी
आत्महत्या करणारे बरेच लोक (जवळ जवळ ४४%) हा गॅस वापरून आत्महत्या करत असत.
साठच्या दशकापासून त्यांनी हळूहळू हा गॅस बदलून त्या जागी नैसर्गिक वायू (फारसा
विषारी नसलेला) द्यायला सुरू केला. १९७६ सालापर्यंत सर्व ठिकाणी हा बदल करून झाला.
ह्या काळात आत्महत्यांचं प्रमाण पण कमी कमी होत गेलं. कमी झालेली आकडेवारी ही गॅस
वापरून आत्महत्या करणाऱ्या लोकांची होती. म्हणजेच ज्यांना आत्महत्या करायची होती,
पण घरात विषारी गॅस उपलब्ध नव्हता; त्यांनी आत्महत्येसाठी दुसरा मार्ग शोधला नाही.
कॅलिफोर्नियातल्या गोल्डन गेट पुलावरून उडी मारून खूप लोक आत्महत्या करतात. एका
अभ्यासात असं दिसून आलं, की त्या पुलावरून उडी मारताना थांबवलेल्या ५१५ लोकांपैकी
फक्त २५ लोकांनी (५% हूनही कमी) नंतर दुसऱ्या मार्गाने स्वत:चं आयुष्य संपवलं. आत्महत्येची
सुद्धा कशाशी तरी सांगड घातलेली असते, जोडी जुळलेली असते. ती काढून घेतली, तर
आत्महत्या टाळली जाऊ शकते. माणसाच्या वागण्याची संदर्भचौकट महत्त्वाची असते.
थोडक्यात म्हणजे, अनोळखी माणूस समजून घेताना आपसूक खरं मानल्याने आणि पारदर्शकता नसल्याने चुका होतातच. शिवाय त्या माणसाबरोबर त्याची संदर्भचौकट बघावी लागते. त्याचं जग, त्याची संस्कृती समजावी लागते. नाहीतर मोठ्या गैरसमजुती होतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की आपल्याला निसर्गतःच, अन्त:प्रेरणेने बरंच काही समजतं. पण खरं तर प्रत्यक्ष जग खूप गुंतागुंतीचं, क्लिष्ट आणि अवघड असतं. चित्रदर्शी वर्णनं, एकमेकांत गुंफलेल्या रंजक कथा आणि त्यांचं विश्लेषण करत करत ग्लॅडवेल आपल्याला त्यांचे हे सिद्धांत आणि निष्कर्ष सांगतात. पण ह्या पुस्तकात खूप काही नवीन शिकल्यासारखं वाटत नाही. पुस्तक चांगलं आहे. पण त्यांच्या खूप चांगल्या, प्रभावी पुस्तकांमध्ये हे मोडत नाही, असं वाटलं.
Great! Got to know one more book because of you!!
उत्तर द्याहटवाThanks :) :)
उत्तर द्याहटवा