लघुकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लघुकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

कथा - पाहुणे

उषाताई नेहमीप्रमाणे गजर वाजायच्या आधीच जाग्या झाल्या. ह्या वयात झोपेचं जरा अवघडच झालं होतं. दोन वाजता जाग येते, पुन्हा चार वाजता येते आणि शेवटी साडे पाचला जाग आल्यावर त्या सहाच्या गजरासाठी न थांबताच उठतात. एकटीला घर खायला उठतं. अगदी जिवावर येतं एकटीसाठी चहा करून प्यायला. पण नेमकी आता मेली झोप लागत नाही. वीणा तान्ही होती आणि पहाटेच उठून दुधासाठी रडायची, तेव्हा मात्र पापणी अगदी उचलायची नाही.

चहा पिऊन झाडांना पाणी घालून त्या रोज फिरायला जातात. घरातून बाहेर पडत राहावं लागतं, चालत राहावं लागतं. आपणच आपल्याला गुंतवून ठेवावं लागतं. चहा पिऊन त्या बाल्कनीत आल्या. वठलेली कृष्णतुळस बघून त्यांना आज पुन्हा हळहळ वाटली. तिथे नजर गेली, की पुन्हा त्यांच्या मनात तिचा निकोप गंध दरवळू लागे. पानं, मंजिऱ्या निस्तेज पांढरट पडून गळून गेल्या होत्या. पण आता तिच्या आजुबाजूला इवली इवली चार-सहा जिज्ञासू रोपं उगवून आलेली दिसत होती. उषाताईंनी हलक्या हाताने त्यांना हळुवार पाणी पाजलं आणि क्षणभर त्यांना अगदी धन्य वाटलं. त्यांच्या जिवणीची हसल्यासारखी हालचाल झाली आणि त्यांच्या ओघळू लागलेल्या सावळ्या गालाला खळी पडली.  

आज काही त्या फिरायला जाणार नव्हत्या. उद्या अमेरिकेहून नातवंडं येणार म्हणून त्यांना बरीच कामं करायची होती आणि थकवाही यायला नको होता. कालच दुकानदाराने किराणा आणून दिला होता. आज त्या थोडी तयारी करून ठेवणार होत्या. पुरण करायचं होतं, मोदकाचं सारण करायचं होतं. अशी सगळी तयारी करून त्या फ्रिजमध्ये पदार्थ ठेवून देणार होत्या. मुलं दहा दिवस इथे राहणार होती. नंतर आठ दिवस तिकडच्या आजी-आजोबांकडे आणि मग परत जाणार होती. मुलांसाठी आणि मुलांबरोबर काय काय करायचं, त्याची सारखी आखणी, उजळणी त्या मनाशी करत होत्या. त्याचे अजुनाजून तपशील ठरवत होत्या. नाश्त्याला त्यांना गोड घावन द्यायचं आणि म्हणायचं, “हा इथला पॅनकेक.” वीणाची पेटी त्यांना द्यायची आणि म्हणायचं, “हा तुमच्या आईचा हार्मोनियम. पियानोसारखा दोन हातांनी नाही, एकाच हाताने वाजवायचा बरं का! दुसरा हात मागे भात्याला.” रोज भारतीय पदार्थ खाऊन कंटाळतील म्हणून मध्येच एक दिवस पास्ता करायचा.

एका माणसाचा स्वयंपाक तो किती असणार! उषाताईंनी स्वत:साठी थालीपीठ लावलं आणि मोदकाचं सारण करायला घेतलं. दुसरीकडे पुरणाची डाळ लावली शिजायला. तेवढ्यात कामाला सविता आली. तिच्याकडून सगळं घर चकचकीत करून घेतलं त्यांनी आणि बजावलं, “आता दहा दिवस अजिबात दांडी मारू नकोस हं!” तिलाही एक थालीपीठ दिलं खायला. सविताने विचारलं, “आता किती वर्षाची झाली ओ मुलं?”

“मोठा बारा वर्षाचाय, धाकटा होईल आता दहाचा.”

“थोरला वीणाताईंसारखा दिसतो ना?”

“थोडासा दिसतो, रंग तिचा घेतलाय त्याने. दोघांमध्येही थोडाफार भास आहे तिचा”, असं म्हणता म्हणता भरून आलं त्यांना. स्वत:ला सावरत त्या म्हणाल्या, “वीणा अगदी तिच्या वडिलांसारखी दिसायची. सगळे मला म्हणायचे, की पितृमुखी मुलगी भाग्यवान असते. कसलं भाग्य आलं वाट्याला? भरल्या ताटावरून उठून निघून गेली बघ.” आता मात्र कंठ दाटून आला त्यांचा आणि डोळे भरून आले.

“शांत व्हा आजी. आता मुलांसमोर खंबीर ऱ्हायचं ना तुमाला?”

पावसाची अचानक मोठी सर येऊन लगेचच थांबावी तशा उषाताई शांत झाल्या. सविताही पुढच्या कामांना निघून गेली. वीणा म्हणजे नुसता चैतन्याचा झरा होती. कधी लाजणं माहीत नाही, कशाचा संकोच नाही. लहानपणापासून पुढे होऊन सगळ्यात भाग घेणारी. कशात कधी मागे राहणं माहीत नव्हतं. आणि इथेही अशी पुढे निघून गेली, रांग मोडून पुढे गेली! वडिलांची लाडकी होती खूप. घाईघाईने गेली त्यांना भेटायला. दीड वर्ष होऊन गेलं तरी उषाताईंना खरं वाटत नव्हतं. काही जखमा कधीच भरून येणार नसतात.

वीणाच्या आजारपणात उषाताई तिच्याकडे जाऊन राहिल्या होत्या. तिला ‘बरी होशील’, असं सांगत होत्या. पण तिसऱ्या टप्प्यावरचा कॅन्सर बरा होण्याची शक्यता फारशी नसल्याचं तिलाही माहीत असावं बहुतेक. उसनं अवसान आणून त्यांनी तिचं आणि नातवंडांचं खूप केलं आणि त्यांच्याइतकंच देवेननेही केलं. बायको-मुलांसाठी दिवसरात्र तो झटला होता.  नंतरही त्या दोन महिने तिथेच होत्या. देवेन आणि मुलांची घडी बसवत होत्या, धीराने उभ्या होत्या. मुलं त्यांना आणि देवेनला बिलगली होती. पण कुणी कितीही केलं, तरी आईची सर येते का; असं उषाताईंना राहून राहून वाटे. त्यांचा पाय निघत नव्हताच. पण त्या देशात त्यांना अजून राहताही येणार नव्हतं.

इकडे परत आल्या आणि मग मात्र त्यांचा धीर सुटला. ह्या रिकाम्या घरात कितीतरी वेळा त्या ओक्साबोक्शी रडल्या. अमेरिकेला जायच्या आधी पण त्या इथे एकट्याच राहात होत्या. पण तेव्हा हे घर जिवंत वाटायचं. आता सगळं भकास झालं, सगळी रयाच निघून गेली. वीणाच्या जन्मापासून त्यांच्या आयुष्यात खरोखरीच वीणा झंकारत होती. इतका उत्साह, इतका आनंद, इतकं समाधान त्यांनी कधी अनुभवलं नव्हतं आणि आता अचानक आयुष्यातलं संगीतच हरवलं. उषाताईंच्या डोक्यातली विचाराची घरघर कधी थांबायचीच नाही. एकच एक मूल असू नये म्हणतात, तेच बरोबर होतं का? चुकलंच होतं का आपलं? पण वीणाला खूप अभिमान होता आपले आई-वडील ‘त्या’ काळी एका मुलीवर थांबले म्हणून! आणि झालं जरी असतं तिच्या पाठीवर दुसरं मूल, तरी त्याने दु:ख कमी होणार होतं का? भळभळ थांबणार होती का? करवतीच्या दातांसारखे हे प्रश्न त्यांना चिरत राहायचे.

देवेनने त्याचा शब्द पाळला होता. वीणा जशी दर आठवड्याला व्हिडिओ कॉल करायची, तसाच तो उषाताईंची नातवंडांशी भेट घडवून आणायचा. उषाताईंकडे बोलण्यासारखं काय असणार? त्या आपल्या ‘पाऊस संपला’, ‘थंडी पडली’ असं काहीतरी सांगायच्या. मुलांचं ऐकण्यातच आनंद असायचा. मुलं काही ना काही सांगत राहायची. काढलेली चित्रं दाखव, कधी काही जादू करून दाखव, शाळेत कशी छान ग्रेड मिळाली ते सांग असं चालायचं. ह्या एका संवादासाठी आठवडा ढकलत राहायचा. सगळ्या पाकळ्या गळून गेल्या तरी कुठल्या ना कुठल्या धाग्याने जीवन तुम्हांला कसं बांधून ठेवतं!

आज दिवसभर बरीच कामं करून उषाताई जरा थकल्या होत्या. सोफ्यावर जरा वेळ शांत बसल्या तर तिथे बसल्या बसल्याच डोळा लागला. डोळे उघडले तेव्हा निळीसावळी संध्याकाळ पसरली होती. वातावरण जडशीळ झालं होतं. सगळं अंधुक अंधुक दिसत होतं. उठून त्यांनी चष्मा घातला आणि देवापुढे दिवा लावला. तुळशीपाशीही दिवा ठेवला. त्या मंद केशरी प्रकाशात तुळशीची बाळं अगदी रेखीव, नितळ दिसत होती. त्यांना नुसतं बघूनच उषाताईंचे डोळे निवले आणि मनातल्या मनात त्या “इडा-पीडा टळो” असं म्हणाल्या. आजुबाजूच्या एकेका घरात हळूहळू दिवे लागत होते. आता दोन घास पोटात ढकलायचे, आवराआवर करायची आणि लवकरच झोपायचं असं त्यांनी ठरवलं. पहाटेच त्यांची बछडी येणार होती!

अंथरुणावर पडल्या तेव्हा त्यांना झोप लागेना. नेहमीसारखा नागाचा मोठा फणा काढून चिंता समोर उभ्या राहिल्या. आजकाल हे रोजचं झालं होतं. मन पुन्हा पुन्हा म्हणायचं, की मुलांना आता इथेच ठेवून घ्यायचं. आईनंतर तितक्या तळमळीने फक्त आजीच करू शकते सगळं. ह्या वयातही जमेल. एकदा ठरवलं की हत्तीचं बळ येईल अंगात. शिवाय आपल्याकडे कामाला बायकाही मिळतात. त्यामुळे काही अवघड नाही. तिकडच्या एवढं मोठं घर नाही, तिकडे जास्त सुविधा असतात; हेही खरंच. पण आपल्याकडेही चांगलं शिक्षण मिळतं. लहान आहेत तोवर राहतील इथे, आजीच्या पंखाखाली. मग कॉलेजला जातील तिकडच्या देशात. मोठीही होतील तोवर. चाळिशीतला देवेन म्हणजे तसा तरुणच म्हणायचा. तो त्याच्या डोळ्यांनीच आयुष्याकडे बघणार. तीन-चार महिने झाले त्याला एक मैत्रीणही भेटली होती. फिलिपिनो होती कुणी. अजून लग्नाचं काही ठरलं नसलं, तरी वर्षभरात करतील, असं उषाताईंना वाटत होतं. तसं देवेनने त्यांच्यापासून काही लपवलं नव्हतं कधी. पण कोण कुठली वेगळ्या संस्कृतीची बाई येईल घरात आणि ही सोन्यासारखी मुलं अगदी बिचारी होऊन जातील! ह्याच एका चिंतेची कबुतरं रोज फिरून फिरून घिरट्या घालत होती. त्या अजून कुणाशी – मैत्रिणी-बहिणीशी - ह्यावर बोलल्या नव्हत्या. पण आता त्यांचं ठरलं, की देवेनशी बोलायचं. कसंही करून मुलांना आपल्याकडेच ठेवून घ्यायचं. “मुलं राहतील इकडे”, अशी स्वत:चीच समजूत घातली, की मग त्यांना झोप लागत असे. आजही हाच विचार पांघरून त्या झोपी जाणार होत्या.

थोडा वेळ गेला आणि उषाताईंना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत अडकल्यासारखं, गुदमरल्यासारखं वाटू लागलं. आतून काहीतरी आवळल्यासारखं झालं. त्या हेलपाटत उठून बसल्या. जीव अगदी घाबराघुबरा झाला. उशाशी ठेवलेलं पाणी कसंबसं प्यायल्या आणि एक उबळ आली. घशात तिखट तिखट जाणवलं, करपट ढेकरा आल्या आणि त्यांनी हुश्श म्हटलं. पित्तच होतं साधं. थालीपीठ सोसलं नसेल बहुतेक. पण त्या पाच मिनिटांच्या प्रसंगाने त्यांना हादरवून सोडलं, खऱ्या अर्थाने जागं केलं. उषाताईंच्या लक्षात आलं, की आपला काही भरवसा नाही. आज आहे, उद्या नाही. नश्वरता अशी आतून आतून जाणवत असते तर! अचानक एखाद्या मोठ्या लाटेने थडकावं आणि सगळं धुवून स्वच्छ करावं, तसं झालं. एकदा मुलं इथं राहू लागली, की त्यांच्या स्वत:च्याच घरात पाहुणी होतील ती. उषाताईंचं काही बरंवाईट झालं, तर देवेनच्या नव्या संसारात प्रवेश करणं किती अवघड होईल मुलांना! कल्पनेने सुद्धा पीळ पडतो पोटात. आधी तिकडची रोपं आणून इथे रुजवायची आणि नंतर पुन्हा इथून तिथे हलवायची? त्यांना स्वत:चा वेडा हट्ट सोडावा लागणार होता. आता ह्या वयात समंजस स्वीकार करण्याखेरीज दुसरं काय हातात होतं? हळवेपणाचे झरे तर पाझरणारच होते, मनाविरुद्ध वाहणारच होते. पण आता ते सगळं आत वळवायचं. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाला भिजवायचं नाही. “तुमच्या तुमच्याच घरी रहा, बाळांनो! आजीकडे चार दिवस पाहुण्यासारखे या, कोडकौतुक करून घ्या आणि पुन्हा आपल्या घरी जा”, उषाताई स्वत:शीच मोठ्यांदा म्हणाल्या आणि गाढ झोपी गेल्या. निरभ्र आकाशात अष्टमीचा अर्धा चंद्र शांत तेवत राहिला.

रात्रीची गडद मखमली दुलई बाजूला सारत पहाट वर येऊ लागली होती. वातावरणात लालसर मोहिनी जाणवू लागली होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि हलका वारा. उषाताईंची लगबग सुरू होती. कधीही दार वाजेल म्हणून त्या तयारीतच होत्या आणि तसं ते वाजलंही. दार उघडलं तेव्हा समोर देवेनबरोबर दोन्ही हसतमुख गोंडस पिल्लं उभी होती. आपापलं सामान सांभाळणारी. कॉलवरती दिसतात त्यापेक्षा कितीतरी उंच आणि मोठी वाटणारी. थोरल्याचा वीणासारखाच झळाळता गोरा रंग, तशीच जिवणी, तेच हास्य. धाकट्याच्या सावळ्या लाघवी चेहऱ्यावर उठून दिसणारे वीणाचे काळेभोर बोलके डोळे. उषाताईंनी दोघांकडे डोळे भरून पाहिलं आणि झटकन त्यांना कुशीत घेतलं. त्यांच्या घशात मोठा आवंढा आला, नाकाचा शेंडा लाल झाला आणि नकळत डोळे भरून वाहू लागले. त्यांच्या घराचा कण न् कण जिवंत झाला, भारला गेला, आतून आतून उमलून आला. त्यांच्या अवघ्या घराचं फुलांनी मोहरलेलं चाफ्याचं झाड झालं.

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

कथा - दुर्बीण

आज सरांचा मुख्याध्यापक म्हणून पहिला दिवस. ह्या दिवसाची ते कित्येक वर्षं आतुरतेने वाट पाहत होते. आधीचे मुख्याध्यापक कालच निवृत्त झाले. त्यांनी शाळेसाठी काहीच धड केलं नाही आणि सरांनी काही प्रयत्न केलेलाही त्यांना आवडायचा नाही. सरांनी आज शाळेचं नवं पर्व सुरू करायचा निश्चय केला होता. त्यांनी सगळ्या शाळेसमोर भाषण करून त्यांचं स्वप्न सांगितलं, “मुलांना नुसतं लिहायवाचायला आलं, गणितं करता आली म्हणजे शिक्षण होत नाही. आपल्याला त्यांना वेगवेगळे अनुभव द्यायचे आहेत. ह्याची सुरुवात म्हणून आपण आपल्या शाळेत एक मोठी दुर्बीण आणणार आहोत. विश्वाच्या अफाट पसाऱ्याची जाणीव मुलांना झाली पाहिजे. आकाशाशी त्यांचं नातं जडलं पाहिजे. आपल्या शाळेतून खगोलतज्ज्ञ निर्माण झाले पाहिजेत.” आपल्या शाळेत असं काही होऊ शकतं, असा कधी विचारही कुणी केला नव्हता. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. विज्ञानाच्या शिक्षकांना तर भरूनच आलं.

सरांनी विज्ञानाच्या शिक्षकांना बोलावून त्यांना योजना नीट समजावून सांगितली. सरांनी स्वत:च पुढाकार घेतला होता. पुढच्या आठवड्यात शहरातून दुर्बिणवाला माणूस सरांना भेटायला आला.  तो म्हणाला, “शाळेसाठी म्हणजे तुम्हांला डोब्सोनियनच चांगला राहील.” विज्ञानाच्या शिक्षकांना नक्की काही समजलं नाही. पण सर ‘हो’ म्हणाले म्हणून त्यांनीही मान डोलावली. मग पुढे तो म्हणाला, ह्यात आरसा असणार, न्यूटोनियन.” विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, “आणि भिंग?” दुर्बिणवाला म्हणाला, “नाही, ह्यात भिंग नसतं.” सर म्हणाले, “बरोबर! काय किंमत म्हणता?”

तरी तीस-पस्तीस हजारापर्यंत जाईल बघा आठ इंचाला.”

“आठ इंच?”

“आता शाळेला म्हणजे आठ इंचाचा तरी लागेलच की आरसा! आणि शहरातून आणून पोचवायचा खर्च वेगळा.”

“इथं वरती गच्चीवर लावून द्याल ना?”

“निरीक्षणाच्या वेळी फक्त वर न्यायची दुर्बीण. एरव्ही पावसापाण्यात खराब होणार, सर.”

“वरती नेऊन लावायची?”

“हो, तुम्हांला काय बघायचं तशी लावायची, जुळवून घ्यायची. आकाशाचा नकाशा वाचायचा आणि तशी लावायची. म्हणजे मग ग्रह, तारे बघता येतील.”

दुर्बिणवाल्याला “आमचं नक्की काय ठरेल ते कळवू” असं म्हणून सरांनी पाठवून दिलं. सर आणि विज्ञानशिक्षक विचारात पडले. एवढा खर्च करायचा आणि हा माणूस आठ इंचाचंच आणणार म्हणतो काहीतरी. सरांनी विज्ञानशिक्षकांना आकाशाच्या नकाशाबद्दल विचारलं, तर त्यांनी कधी पाहिलाही नव्हता तो. कसा वाचायचा आणि काय करायचं, हे कुणालाच माहिती नव्हतं.  एवढा खर्च करून आकाशातलं काय कसं बघायचं, हा प्रश्नच होता. नुसत्या शाळेतच नाही, तर अख्ख्या गावात बातमी पसरली होती, की इथे दुर्बीण बसणार, मुलांना आकाश निरीक्षणाची संधी मिळणार. उत्सुकता वाढली होती, अपेक्षा उंचावलेल्या होत्या. नव्या सरांबद्दल आदर पसरला होता. आता मागे सरकायला जागाच नव्हती.

सरांनी ठरवलं, की आता वेगळा विचार केला पाहिजे. आपल्याला नवनवीन सुचत राहिलं पाहिजे. शाळेच्या गच्चीवर एक अडगळीची मोठी खोली होती. सरांनी ती एकदम रिकामी आणि स्वच्छ करून घेतली. रविवारी सुट्टीच्या दिवशी चित्रकलेचे शिक्षक आणि विज्ञानशिक्षक असं दोघांनी मिळून सरांच्या मार्गदर्शनाखाली गच्चीवरच्या खोलीत मोठ्या कामगिरीला सुरुवात केली. विज्ञानाच्या पुस्तकातली ग्रह-ताऱ्यांची चित्रं बघायची आणि रात्री अंधारात चमकणाऱ्या रंगाने छतावर, भिंतीवर रंगवायची. दिवसा हा रंग पांढरटच दिसतो. त्यामुळे पांढऱ्या छतावर आणि भिंतीवर रंगवलेलं काही कुणाला कळायची शक्यता नव्हती. तीन वेगवेगळे चमकणारे रंग होते. अंधारात हिरवट दिसणारा एक, दुसरा गुलाबी-लालसर आणि तिसरा केशरी दिसणारा. गुरूला आणि शनीला केशरी घेतला, मंगळाला गुलाबीसर. आता शुक्राला हिरवट करावं का? पुस्तकात तर पांढरा होता. मग शुक्र रद्दच केला. हिरव्या रंगाचं काय करायचं? त्याचा छान शेपटीवाला धूमकेतू काढला. चंद्राच्या तर कला असतात. रोज वेगळा दिसतो. मग कुठला आकार काढायचा? सर म्हणाले, “चंद्र डोळ्याला दिसतच असतो चांगला. तो दुर्बिणीतून दाखवायची गरज नाही.”  थोडीफार नक्षत्रंही काढली. नक्षत्रांचे रंग काही कुठे पुस्तकात नव्हते. कुठलाही कुठेही देऊन रंग वापरून टाकले.

रंगकाम झाल्यावर एक सुतार बोलवून ह्या गच्चीवरच्या खोलीच्या दाराला गोल भोक पाडून घेतलं. चांगली हातभर लांबीची, दीड इंच व्यासाची नळी त्यात बसवून घेतली. भोकापेक्षा नळी लहान होती. नळीच्या बाजूला कड्या लावून ती भोकात अशी बसवली, की खाली-वर, उजवी-डावीकडे फिरवता येईल. सुताराला जास्तीचे पैसे दिले, जरा दमही भरला. शाळेची इथून पुढची सगळी दुरुस्तीची कामं त्यालाच मिळणार होती. त्यामुळे तसाही तो ह्याबद्दल कुठे काही बोलणार नव्हता. आता रोज रात्री थोड्या थोड्या मुलांना ग्रह-तारे दाखवायचं ठरलं. दिवसा गच्चीला कुलुप असणार होतं. त्यांची ही गावातली शाळा सातवीपर्यंतच होती. मोठी मुलं असती तर उगीच डोकेदुखी झाली असती.

मुलांना आकाश दाखवायची जबाबदारी विज्ञानाच्या शिक्षकांवर होती. पहिल्या रात्री त्यांच्या पोटात चांगलंच डचमळायला लागलं. सरांनी त्यांना धीर दिला. आत्मविश्वासाने पुढे जायला सांगितलं. आकाश बघायसाठी गच्चीवर पूर्ण अंधार केला होता. जिन्यातले दिवे पण बंद ठेवले होते. विज्ञानाचे शिक्षक वरती नळी धरून थांबले होते. चित्रकलेचे शिक्षक खालून एकावेळी दोन दोन मुलांना वर पाठवायचे. विज्ञानशिक्षक नळीतून दाखवायचे, “हा गुरू बघा. बाजूला त्याचे छोटे छोटे चंद्र.” मुलांचं बघून झालं, की ते नळीत बघून नळी शनीकडे फिरवायचे आणि पुन्हा मुलांना दाखवायचे, “कडी दिसली का शनीची?” मुलं पण भारावून गेली होती, धन्य झाली होती! अमावस्या होती. अंधार पांघरून सगळं सुरळीत पार पडलं.

पहिले दोन दिवस नीट पार पडल्यावर विज्ञानाच्या शिक्षकांच्या जिवात जीव आला. ते जरा मोकळेपणाने फिरू लागले. तिसऱ्या दिवशी मुलांना आकाश दाखवत असताना अचानक वारा सुटला. विजा चमकू लागल्या. ढग दाटून आले. नळीतून मंगळ बघताना एक आगाऊ कार्टं म्हणालं, “विजा चमकताना पण मंगळ छान दिसतोय की!” दुसरा म्हणाला, “आता भिजेल का हो दुर्बीण?” तसं विज्ञानशिक्षकाने एकेकाला खालीच हाकललं. “पाऊस येणारे. बास झालं आता”, म्हणून दटावलं.

दुसऱ्या दिवशी मुलांची आपापसांत चर्चा सुरू झाली.  कुणी म्हटलं, “दुर्बीण गच्चीवरच्या खोलीला लावली आहे.” कुणी म्हटलं, “खोलीला लावून आकाश दिसेल का?” अजून एक म्हणाला, “वीज चमकली, तेव्हा मी नक्की पाहिलं. खोलीच्या दाराला दुर्बीण लावलीय.” एक हुशार मुलगा म्हणाला, “ती नळी खोलीच्या छताला जोडलेली असणार. छताला भिंग बसवलंय.” मग गावातही ह्यावर चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी अफवा पसरल्या, की “सरांनी खोलीच्या आकाराची मोठीच्या मोठी दुर्बीण आणलीय.” काही म्हणाले, “आपल्या राज्यातली सगळ्यात मोठी दुर्बीण आपल्याच गावात आहे.” कुणी कुणी म्हणू लागले, की “पुढच्या महिन्यात चंद्रग्रहण आहे. दुर्बिणीतून बघायला पाहिजे.” काही पालक विचारू लागले, “आम्हांला मिळेल का दुर्बीण बघायला?” विज्ञानशिक्षकांना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत धडधडू लागलं. सारखा घाम फुटू लागला. सरांची देहबोलीच अशी असायची, की त्यांना कुणी काही विचारणार नव्हतं. एक प्रकारचा दरारा आणि आदर वाटायचा लोकांना. पण विज्ञानशिक्षकांकडे वेगवेगळे प्रश्न आणि चौकश्या येऊ लागल्या.  

शेवटी हिंमत करून विज्ञानशिक्षक मुख्याध्यापकांकडे गेले आणि आपली सगळी चिंता आणि परिस्थिती त्यांना सांगितली. सरांना नेहमी काही नवीन सुचत असे. त्यांनी ह्याच्यावर तोडगा काढायचं ठरवलं. गच्चीवरचं आकाशनिरीक्षण ताबडतोब थांबवलं आणि पुढच्याच आठवड्यात सर्व पालक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठा समारंभ ठेवला. गावातल्या मूर्तिकाराकडून तातडीने चांगली तीन फूट उंचीची देखणी मूर्ती तयार करून घेतली. ती सरांच्या कार्यालयाबाहेरच्या चार फुटाच्या कठड्यावर ठेवली. त्यामुळे अनावरण झाल्यावर सात फुटासारखा परिणाम साधणार होता. मूर्तीच्या मागच्या भिंतीवर मोठमोठे रंगीबेरंगी माहितीपूर्ण तक्ते लावून घेतले. समारंभाच्या दिवशी सगळ्या पालक-शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सरांनी मूर्तीवरचं कापड काढून त्या सुंदर मूर्तीचं अनावरण केलं, मूर्तीला हार घातला आणि भाषण सुरू केलं, “ही मूर्ती पाहिलीत? हे आर्यभट्ट आहेत. थोर गणिती आणि खगोलशास्त्राचे प्रणेते. १५०० वर्षांपूर्वी त्यांनी खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहिला. त्यांना त्या काळी पृथ्वी गोल असल्याचं समजलं होतं. त्यांनी पृथ्वीला कदंबाच्या फुलासारखी म्हटलं होतं!” मुलं आणि पालक थक्क झाले! इतक्या थोर शास्त्रज्ञाबद्दल त्यांना आधी काहीच माहिती नव्हती. सर म्हणाले, “ह्या मूर्तीमागे तुम्हांला पुष्कळ तक्ते बघायला मिळतील. ती चित्रं बघा, माहिती वाचा आणि समजून घ्या. नुसते ग्रह-तारेच नाही तर आकाशगंगा, कृष्णविवर असं सगळं शिका. आपली दुर्बीण परवाच्या वादळी पावसामुळे बिघडली आहे. पण काही हरकत नाही. त्यामुळे आपलं शिक्षण थांबत नसतं. वाचनालयात पुस्तकं आहेत. शाळेत उत्तम शिक्षक आहेत. आपल्याला आर्यभट्टाचा समृद्ध वारसा पुढे चालवायचा आहे. आपल्यामध्येही त्याचा अंश आहे.” टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. सरांचे शब्द ऐकून मुलांचं दुरापास्त वाटणारं उज्ज्वल भविष्य डोळ्यांसमोर आवाक्यात दिसू लागलं, दुर्बिणीतून पाहिल्यासारखं.

  

मंगळवार, १९ मे, २०२०

कथा - लोप


प्रिय अप्पा,

आज आत्ता भल्या पहाटेच जाग आली आणि पहिल्यांदा डोळ्यांसमोर तुम्हीच आलात. बऱ्याचदा नीट झोप लागतच नाही. मला आठवतंय, मी साधारण दहा वर्षांची असेन तेव्हापासून तुम्ही मला पहाटे उठवून तुमच्याबरोबर टेकडीवर फिरायला नेऊ लागलात. सुरुवातीला खूप जिवावर यायचं, पण नंतर सवय झाली. परत येताना आपण गप्पा मारायचो. तुम्ही मला झाडं ओळखायला शिकवली. वाटेवर एके ठिकाणी पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. मी फुलं वेचायचे. अजून तांबडं फुटलं नाहीये. पण थोड्या वेळाने इथल्या खिडकीतून खालचा प्राजक्त स्पष्ट दिसू लागेल. माझ्यातली फुलं वेचण्याची उमका मात्र कधीच आटून गेली आहे. तुमच्या व्यक्तिमत्वातली प्रसन्नताही कधी हरवत गेली, ते कळलंच नाही.

मला वेगवेगळे प्रसंग आठवत राहतात. तुम्ही भेट म्हणून सगळ्यांना नेहमी पुस्तकंच आणायचात. कपडे आणणं कायम आईकडे असायचं. जेव्हा माझ्या सातवीच्या स्कॉलरशिपचा निकाल लागला आणि मला स्कॉलरशिप मिळाली नाही, त्या दिवशी मात्र तुम्ही मला बाहेर घेऊन गेलात आणि आपण माझ्या पसंतीचा चांगल्यातला फ्रॉक घेऊन आलो! तुम्ही आणि मी तेवढी एकदाच कपडे खरेदी केली असेल ना? मला वाटतं, माझ्या लग्नाच्या खरेदीलाही तुम्ही नव्हता. खरं तर अगदी साधं, छोटं लग्न होतं माझं. (तुमच्या मुलीचं अजून कसं असणार?) खरेदीही खूपच कमी होती. पण तुम्हांला एकूणच कपडे, दागिने, खरेदी अशा कशाशी कधी कर्तव्य नव्हतं. तुमचीच लेक असल्याने मलाही फारसा सोस नव्हता, खरं तर. आता मात्र कधी कधी प्रश्न पडतो, की मी खरंच तशी होते की तुमच्या प्रभावामुळे मला तसं वाटायचं? माझं लग्न होईपर्यंत आणि त्यानंतरही मी आई होईपर्यंत मी बरीचशी तुमच्यासारखीच होते, अप्पा. मग मी नंतर बदलत गेले का? का मला स्वत:ला गवसत गेले? मी मूळची कदाचित नसेनच तुमच्यासारखी. पण तुमच्या सावलीत ते समजलं नसेल?

लहानपणी मला तुम्ही चालता-बोलता ज्ञानकोश वाटायचात. एखाद्या शब्दाचा अर्थ असो, एखादा लेखक असो, कवितेची ओळ असो किंवा इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग असो; तुम्हांला सगळंच माहीत असायचं. तेव्हा कुठे संगणक क्रांती आणि इंटरनेटचा काळ होता? आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हांलाच विचारायचो. तुम्हांलाही सांगाय-शिकवायची आवड होती. ओळखीचे, आजुबाजूचे लोक जेव्हा “तुझ्या वडिलांना विचार, त्यांना माहीत असेल” असं विश्वासाने म्हणायचे, तेव्हा केवढा अभिमान वाटायचा मला! मग मी जसजशी मोठी झाले, कॉलेजला गेले, तसं मला वाटू लागलं, की ह्यात मला अभिमान वाटण्यासारखं काय आहे? मी तुमची मुलगी आहे, ह्यात माझं काय कर्तृत्व? उलट तुमच्यासारख्या प्राध्यापक-विचारवंताच्या घरी जन्म होऊनही मी कशात काही चमक दाखवली नाही, म्हणून वाटली तर खंतच वाटायला हवी.

तुमचा अभ्यास, तुमची विश्लेषणं-व्याख्यानांनी सगळेच भारावून गेलेले असायचे – तुमचे विद्यार्थी, तुमचे सहकारी आणि आम्ही घरचे लोक. आईला तर ‘नवरा हाच गुरू’ असं काहीसं वाटायचं. आम्ही दोघी बहिणीही कळत-नकळत तुमचा शब्द प्रमाण मानत वाढलो. सगळीकडे तुमच्याच विचारधारेचे विद्वान लोक होते त्या काळी. त्यामुळे  तुम्हांला आणि तुमच्या मित्रांना “काहीतरी चुकतही असेल” अशी कधी जाणीवच झाली नाही का, अप्पा? ताई आणि महेंद्र अमेरिकेला स्थायिक झाले, तेव्हा काय वाटलं तुम्हांला? तुमच्या सगळ्याच मित्र-सहकाऱ्यांच्या मुला-मुलींनी तुम्हा सगळ्यांना जी अंगभूत दुष्ट वाटायची, त्या अमेरिकेचा रस्ता का धरला? मी तुम्हांला कधी हे थेट विचारलंच नाही. पण माझ्या स्वतंत्र विचारांची ती सुरुवात असावी. रशिया पडला-फुटला, तेव्हा तुम्हांला मनापासून वाईट वाटलं होतं. तुम्ही त्याचं बरेच दिवस बरंच काही विश्लेषण सांगायचात. मला अर्थातच ते सगळं पटतही होतं तेव्हा. रशियाने नीट अंमलबजावणी केली नाही, औद्योगिक क्रांती व्हायच्या आधीच ही क्रांती झाली असं बरंच काही तुम्ही सांगितलं होतं. पण मार्क्सवरचा तुमचा विश्वास अढळ राहिला. समाजवादाला तुम्ही दूर नाही सारलं. की परतीचा मार्गच उरला नव्हता?

आई आणि तुम्ही ताईकडे अमेरिकेला जाऊन आलात, तेव्हा तुम्ही मोकळेपणाने तिथल्या नागरी व्यवस्थांचं, स्वच्छतेचं आणि एकूणच दर्जाचं कौतुक केलं होतं. तितक्याच सच्चेपणाने त्यांच्या वारेमाप उधळपट्टीवर आणि ‘वापरा-फेकावर टीकाही केली. चांगल्याला मनापासून चांगलं म्हणावं, वाईटाला नि:संकोच वाईट असा निखळपणा  टिकून होता तोवर तुमचा. मग गेल्या काही वर्षांत इतका कडवटपणा कशाने आला, अप्पा? तुमच्या व्यक्तिमत्वाचा एकेक सुंदर पैलू हळूहळू त्या कडवटपणात विरघळत गेला.

स्वयंपाक करायची वेळ कधी तुमच्यावर आली नव्हती. तुम्ही निवृत्त झाल्यावर मी तुम्हांला म्हणाले, की “आता स्वयंपाक शिकू शकता तुम्ही. आईचंही वय झालंय. तिलाही मदत होईल.” त्या काळी तुम्ही माझं ऐकून घेण्याच्या, मान्य करण्याच्या मन:स्थितीत होतात. अगदी स्वयंपाक नाही, तरी चहा कर, ताक कर, भाजी निवड अशी कामं तुम्ही करू लागलात. प्रेमाने करायचात, आदळआपट न करता. आईबरोबर तुमचा प्रेमळपणाही देवाघरी गेला बहुतेक. तिला तुमचे सामाजिक-राजकीय विचार, तुमची मतं मान्यच असायची. घरगुती गोष्टी तुम्ही तिच्या तंत्राने करत होता. कुठे आव्हान नाही, कसला वाद-विवाद नाही. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्याबरोबर गप्पा मारणं, एकत्र राहणं असं काही माहीतच नव्हतं तुम्हांला. ती गेल्यावर मी तुम्हांला थोडंसं तुमच्या मनाविरुद्धच इथे घेऊन आले. सांगलीहून पुण्याला, मित्रांपासून दूर. वयानुसार तुमचा हट्टीपणा वाढलेलाच होता. त्यात तुम्हांला समाजवाद विरोधी जावई भेटला. तुम्ही नुसते चिडचिड करायचा, अप्पा. “हा देश रसातळाला चालला आहे. काळ कठीण आहे.” हे एकच पालुपद धरून बसलात तुम्ही.

तुमचं वय हा एक प्रश्न असेल, आईचं जाणंही असेल, इथे रहायला आवडतही नसेल. पण तुमचं खरं दु:ख वेगळंच होतं. जे लोक तुम्हांला कधीही आवडले, पटले नाहीत; त्यांना लोकांनी पाठिंबा दिला हे तुम्हांला मान्य झालं नाही. जे कधी सत्तेत येणार नाहीत अशी तुम्ही आयुष्यभर खात्री बाळगली, नेमके ते सत्तेवर आले. त्या लोकांनीही चुका केल्या, जनतेचा अपेक्षाभंग केला. पण हे सगळं होण्याआधीच तुम्ही इथे यादवी माजल्यासारखा गोंधळ सुरू केला. आनंद तुम्हांला रोज सकाळी आलं घालून चहा करून द्यायचा. “जावयाच्या हातचा चहा छान” म्हणून सुरुवातीला कौतुक होतं तुम्हांला. पण एकदा त्याने तुम्हांला मार्क्सची सैद्धांतिक चूक काय सांगितली आणि तो तुमच्या मनातूनच उतरला! तुम्हाला खरोखरीच दु:ख व्हायचं, की “सध्याचे” लोक समाजात विष कालवत आहेत, लोकांमध्ये फूट पाडत आहेत आणि तुम्ही ते परत परत सांगायचात. ते चुकीचं वागत्तात, हे मला मान्यच होतं. पण फूट सगळ्यांनीच पाडली आहे आणि विष सगळ्यांनीच पेरलं आहे, हे मी तुम्हांला सांगत होते. जातीचं राजकारण करणं, जातीवरून तिकिटं देणं अशा प्रथा तुमच्या आवडत्या लोकांनी सुरू केल्या हे सगळं सांगायचा मी खूप प्रयत्न केला. पण तुम्हांला ते का दिसत नव्हतं? दुसरं कुणी असतं, तर मी सरळ ‘ढोंगी’ म्हणाले असते. पण तुम्हांला तर कधीच खोटेपणा चालायचा नाही. मी दहावीचे गुण साडेसत्याऐंशीऐवजी अठ्ठ्याऐंशी टक्के सांगितलेलं सुद्धा तुम्हांला पटलं नव्हतं आणि आता मात्र तुम्हांला सगळीकडे निवडक गोष्टी दिसू लागल्या.

जगात असे खूप लोक आहेत, जे कुत्र्या-मांजरांचे मुके घेतात, पोटच्या पोरासारखे त्यांचे लाड करतात आणि त्याच वेळी कोंबडी-बकरीपासून ते गाई-डुकरापर्यंत सगळ्यांचं मांस मिटक्या मारत खातात. त्यांना त्यांच्या वागण्यात कुठलीच विसंगती जाणवत नाही. उलट त्यातले काही महाभाग पाळीव प्राण्यांसाठीच्या संस्थांना देणग्या देतात आणि स्वत:च्या नैतिकतेबद्दल समाधानी असतात. तुमचं आणि तुमच्या मित्रांचं तसं झालं होतं. तुम्हांला तुमच्या विसंगती समजत नव्हत्या आणि जो कुणी त्या दाखवायला जाईल, तो तुमच्या नजरेत फितूर, जातीयवादी होत होता. तुमची लेकच असल्यामुळे मला असलं लेबल चिकटलं नसलं, तरीही मी तुमची निराशा नक्कीच केली होती. तुमच्या सर्व मित्रमंडळींच्या हातात फोन होता आणि तुमच्या गटात निवडक, एका बाजूच्या बातम्या फिरत असायच्या. त्या वाचून रोज तुमची निराशा वाढत होती. त्यातल्या बऱ्याचशा खऱ्या होत्या, खरोखरीच निराशाजनक होत्या. पण तुमच्याकडे फक्त निवडक गोष्टीच यायच्या. तुम्ही काही एका विचारसरणीवर श्रद्धा ठेवून बाजू निवडली होती. पण या देशातल्या बहुसंख्य लोकांनी ते ज्या घरात जन्मले, ज्या जात-धर्म-भाषेत जन्मले, त्यावरून बाजू ठरवली होती आणि मग प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या बाजूनेच पाहिली. तशीच सांगितली. निवडक. रोजच्या ह्या निराशेच्या माऱ्याने तुम्ही पार खचून गेलात हो, अप्पा.

तुमचं मग सुरू असायचं, की मी माझा माझा एकटा राहतो, कधी म्हणायचात की वृद्धाश्रमात जातो. “इथे मन रमत नाही, कंटाळा आला”, असं तर चालूच असायचं. कधी मित्रांना सांगायचात, की “माझ्यासाठी सांगलीला चांगला वृद्धाश्रम शोधा.” खरं तर, इथं घरात नात होती. तुम्ही तिच्याशी खूप गप्पा मारू शकत होतात, तुमची चांगली गट्टी जमली असती. पण वेगवेगळे किस्से सांगणारे, झाडं-फुलं दाखवणारे, गाण्यांमध्ये हरवून जाणारे अप्पा तिला इथे भेटलेच नाहीत. फोनवरचा मजकूर, वृत्तपत्रं-टीव्हीच्या बातम्या-चर्चा ह्यातच तुम्ही बुडून गेलात, हताश आणि चिंताग्रस्त होत गेलात.

एकीकडे तुमचा वृद्धाश्रमाचा ध्यास वाढत होता आणि दुसरीकडे कोरोनाच्या बातम्या येऊन थडकू लागल्या. तुम्ही आमच्याबरोबर शब्दश: अडकलात. बाहेर फिरणंही बंद झालं. मजुरांचे हाल बघून तुमचं हृदय अगदी पिळवटून गेलं. उपाशीपोटी शेकडो मैल चालणारे मजूर. कुणाबरोबर पोरंबाळं, कधी गरोदर बायका. कुणी चिरडून मेले, कुणी अतिश्रमाने जीव सोडला. श्रीमंतांनी विमानातून आणलेल्या रोगाचं ओझं खांद्यावर घेऊन रणरणत्या उन्हात पायपीट करणारे लाखो फाटके जीव बघून तुम्ही व्याकूळ झालात. आमचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आर्थिक मदत तर सगळेच करत होते. आनंद आणि त्याच्या मित्रांचा गट वेगवेगळ्या ठिकाणी किराणा पोहोचवत होते, अन्नवाटप करत होते. मजूर, एकटे राहणारे वृद्ध लोक, सर्कशीत काम करणारे लोक. सगळीकडे तो नुसता फिरत होता. तुम्हांला घास घेताना वाईट वाटायचं, की “आपण भाज्या-फळं खातोय. लोकांना धान्य मिळत नाही.” मी म्हणाले, “खा अप्पा. तुम्ही न खाल्ल्याने मजुरांना मिळणार आहे का? उलट, शेतकऱ्यालाही पैसे मिळणार नाहीत.”  नात इंटरनेटवर शिकते, ऑनलाईन शाळा चालते ते बघूनही तुम्हांला चिंता वाटली, “पालिकेच्या शाळांमधल्या मुलांचं काय?” तंत्रज्ञान आलंच नाही, तर सगळीकडे कसं पोहोचणार? इथवर आलंय, हळूहळू सगळीकडे पसरतंय. काही चांगलं दिसण्याची तुमची क्षमता संपून गेली होती. आनंद इतक्या लोकांपर्यंत मदत पोहोचवत होता! मला वाटायचं, ते बघून तरी तुम्हांला जरा बरं वाटेल...पण तुमच्या नैराश्यात घट झाली नाही. त्याच्या बाहेर जाण्यातूनच बहुधा तुम्हांला कोरोनाची लागण झाली असेल.

मी छोटी होते ना, तेव्हा तुमच्याशिवायच्या जगाची कधी कल्पनाही नव्हती केली. चुकूनही मनात तसा विचार आलेला सहन व्हायचा नाही. मग आई गेल्यावर मी कधीतरी मान्य केलं, की तुमचं वय झालंय. तुम्हीही जाल एक दिवस. पण दिवसेंदिवस तुम्ही इतके दु:खी राहू लागलात, की नंतर नंतर मला वाटू लागलं की तुम्ही आहात खरं.. पण तुमच्या असण्याला, जगण्याला काय अर्थ उरलाय? तुमच्यातले मला माहीत असलेले अप्पा तर कधीच लोप पावले आहेत. कधी कधी वाटायचं, अजून दु:ख आणि ग्लानी वाढण्यापूर्वीच तुमची सुटका व्हावी. एखाद्या दिवशी तुम्ही कुठल्या विनोदावर खूप हसलात किंवा एखादा पदार्थ कौतुकाने खाल्लात, की वाटायचं आज कधी नव्हे ते प्रसन्न दिसले.. अशा चेहऱ्यानेच जावेत. परिस्थिती तुम्ही बदलू शकणार नव्हता. तुम्हांला मान्यही करायची नव्हती. तुम्ही जीवनातली सगळी मौज हरवून दिवस काढत होतात. शेवटी सुटलात. पण तुम्ही कोरोनाशी झुंजत हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही विलगीकरण म्हणून घरात असे आपण अडकून पडलो होतो. आपली भेट होणार नव्हती. फोनवर तुम्ही खूप क्षीण वाटलात. बोलताना धाप लागत होती. नंतर तर ते बोलणंही बंद झालं. तुम्हांला काय वाटत होतं शेवटी? सुखी, प्रेमळ कुटुंब होतं तुमचं, यशस्वी प्राध्यापक होता तुम्ही. भरल्या घरात, सांस्कृतिक समृद्धीत जगलात. थोडंफार फिरून आलात. जग बघितलं. ह्याचं काही समाधान वाटलं का तुम्हांला? तृप्त होऊन डोळे मिटले का तुम्ही? शेवटच्या क्षणी लेकी-नातवंडांची आठवण झाली का तुम्हांला? की बायकोची? की तुमचं बालपण आठवलं? मला कधीच कळणार नाही ते. कमीत कमी वेदनेत तुमची लवकरात लवकर सुटका व्हावी, एवढीच माझी इच्छा होती. अंत्यदर्शन असं काही होणारच नव्हतं. माझ्यासाठी ते खूप वेदनादायी होतं. तुम्हांला शेवटचं शांत, शमलेलं, स्थिर असं एकवार बघायचं होतं. पण तेही घडलं नाही. तुमच्या शेवटच्या काळातली प्रत्येक गोष्ट अशी कल्पनेपलीकडेच घडत गेली.

मी दुसरीत असताना एकदा खोटं बोलले होते, की मी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेत पहिली आले. माझी चित्रकला माहीत असल्यामुळे, तुम्हांला ती थाप आहे हे लगेचच लक्षात आलं. तुम्ही मला प्रेमाने मांडीवर घेऊन म्हणालात, “तुला वाटतं, तू पहिली यावीस असं... हो ना? म्हणून तू तशी कल्पना केलीस. छान आहे तुझी कल्पना.” आता तुम्हीच माझी कल्पना झालात, अप्पा. चहा पिताना, गाणी ऐकताना, झाडी बघताना तुम्ही माझ्या बरोबर असता. आनंदात असता. आपण उत्साहाने गप्पा मारत असतो.

तुमची लाडकी लेक,

मनु


शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

कथा - प्रवास


त्याने डोळे उघडले आणि काळ्या मिट्ट अंधारात आजुबाजूला बघायचा प्रयत्न केला. हळूहळू अंधुकसं दिसू लागलं. कुठली तरी गुहा होती, अरुंद, लहान. तिला थोडीशी फट. नुसते आल्यासारखे आत डोकावणारे प्रकाशाचे तुरळक कण. तो कुठून आला होता? इथे कसा आला? कोण आहे? माहीत नाही. त्याला कशाचंच स्मरण नव्हतं. आत खूप अडचण होत होती, कुणीतरी त्याला आत कोंबल्यासारखं वाटत होतं. अंगात फारशी ताकद नव्हती. पण बाहेर तर पडावं लागणारच होतं. सर्व शक्तीनिशी त्याने जोर लावला. रेटा देत राहिला आणि फट मोठीमोठी होत शेवटी भिंतीला भगदाड पडलं! तो बाहेर आला, उजेडात. पहिल्यांदाच. लख्ख प्रकाशात त्याचे डोळे दीपून गेले. मान खाली करत त्याने डोळे किलकिले केले आणि हळूहळू डोळे उघडताना पहिल्यांदा दिसला तो पायाखालच्या मातीचा तांबूस दिमाखदार रंग आणि थोडी पुढे नजर गेली तशी त्या मातीवर डोलणारी गवताची पोपटी पाती दिसू लागली. लांबच लांब पसरलेल्या त्या पोपटी लुसलुशीत गालिचांवर कुठे नाजुक पिवळी आणि कुठे नाजुक पांढरी नक्षी. त्यापुढे थोडी बसकी झुडुपं, थोडे दणकट खडक, थोडे अस्ताव्यस्त ओंडके. नंतर गर्द झाडी, तिच्या उदरात एक छोटं जग सांभाळणारी आणि त्यानंतर दूर दूरपर्यंत टेकड्या, डोंगर आणि पर्वताच्या रांगा. त्या शिखरांवर पांघरलेलं तलम केशरी आकाश, हळूहळू पिवळं-पांढरं होत होत अथांग निळाई झालेलं. पाहता क्षणी तो प्रेमात पडला. गवताच्या कुरणातून चालत चालत तो पुढे गेला, त्या गवतपात्यांच्या इवल्या इवल्या कणसांमधून, मंद ओल्या सुगंधामधून. तेवढ्यात त्याला एका झुडुपाआड हालचाल जाणवली.

काळेभोर टपोरे डोळे त्याच्याकडे निरखून पाहत होते. तो थबकला, त्या सोनेरी कांतीकडे त्याने विश्वासाने पाहिलं आणि लगेच त्यांची मैत्री झाली. तो ह्या जगात अगदीच नवखा आणि मृगाला मात्र खडान् खडा माहिती होती. इथून पुढे तो ह्या मृगाचं बोट धरून चालणार होता. मृगाने सांगितलं, की खायला कुठे मिळतं, नदीचं थंडगार पाणी कुठल्या ठिकाणी जाऊन प्यायचं, कुठल्या ऋतूत काय करायचं, हिंस्त्र प्राणी कुठले, कुठे त्यांचं भय असतं, कुठे सुरक्षित असतं. प्रत्येक परिस्थितीत तगून राहायला शिकवलं त्याने. मृग वेगवेगळे धडे देत राहिला.
“इथे प्रत्येकजण आपलं बघतो, आपणही तेच करायचं. बाकी जगाचा फार विचार करायचा नाही. आपण आहोत, तर जग आहे.”

“समोर येईल त्याला वाचता आलं पाहिजे, जोखता आलं पाहिजे. तो का आलाय? त्याला काय हवंय?”

त्याला माहीत नव्हतं, की आपण खाण्या-पिण्या, खेळण्या-झोपण्याखेरीज अजून काय करायचं असतं! इथे कशासाठी आलोय आपण? मृगाने सांगितलं, की ह्या टेकड्या ओलांडून खूप पुढे जायचं, मग मोठे डोंगर लागतात. तेही ओलांडून पुढे पर्वतरांग लागते. त्यात वर-वर चढत राहायचं. कठीण वाटांवरून चालत राहायचं. मग एक अत्युच्च शिखर आहे, पांढरं शुभ्र, हिमाच्छादित. सगळ्यात वरचं ठिकाण. असं उंचावर, की हात वर केल्यावर स्वर्गच लागेल हाताला. सगळ्यात सुंदर. तिथली हवा निराळी, प्रकाश वेगळा. वरून खालचं सगळं जग एकदम एका नजरेत दिसतं, छोटं छोटं झालेलं. छोट्या छोट्या टेकड्या, टिकलीसारख्या वनराया, नदी-नाल्यांच्या चमचमत्या रेघा- सगळं रोमांचकारी! ताऱ्यांमध्ये राहायला गेल्यासारखं वाटतं. तिथे आजवर जे झपाटलेले सगळे पोहोचले, त्यांच्यासारखं आपण व्हायचं. त्या सगळ्या विलक्षण जगाचा भाग व्हायचं!

मृगाने सांगितलं, की ह्यात साहस आहे, आव्हान आहे, भारावलेपण आहे आणि तो त्याच्याबरोबर प्रवासाला निघाला. उत्साहाला उधाण आलं. एक अनामिक हुरहूर जाणवू लागली. पण जमेल का हे आपल्याला? मृग म्हणाला, “जमेल म्हटलं तरच जमतं. आपल्याला जमणार आहे. आपण शिखारासाठीच आहोत. आपण स्वत:ला ताणायचं आणि आपल्या क्षमता वापरायच्या. चल माझ्याबरोबर.” त्यांनी वाटचाल सुरू केली. हिरव्या-निळ्या, लाल-सोनेरी रंगांनी नटलेल्या डोंगर-दऱ्या, गगनचुंबी शिखरं - सगळी कल्पनाच इतकी सुंदर वाटत होती, तर प्रत्यक्षात किती भव्य असेल! त्यांनी कुरणं पार केली आणि वनरायांच्या दिशेने ते चालू लागले. बाजूने नदी होती. मृग पुढे धावत होता आणि तो सारखा मागे पडत होता. “अशाने आपण इथेच अडकून राहू. वाऱ्यासारखं जाता आलं पाहिजे”, मृग सांगू लागला. मृगाची चिडचिड आणि त्याची दमछाक होत होती. त्याची फरफट सुरू झाली. “तुला काही झेपेल, असं वाटत नाही”, मृग तुच्छतेने म्हणाला. अधूनमधून शिंगं उगारू लागला. पावलागणिक त्याचा उत्साह आटू लागला.

एका रात्री तो दमून-भागून झोपी गेला. अंग ठसठसत होतं. डोळा कधी लागला तेही कळलं नाही. रात्रीच्या गार वाऱ्यात त्याने अंग आक्रसून घेतलं होतं. पहाटेच्या सोनेरी किरणांनी त्याला हलकंच कुरवाळलं, तसं त्याने डोळे उघडले आणि पहिला विचार त्याच्या डोक्यात आला, “मला का नाही जमत मृग सांगतो ते?” जवळच झुळूझुळू वाहणारी नदी होती. मऊ ओलसर गवतातून चालत तो नदीकाठी गेला आणि त्याने पाण्यात नीट डोकावून पाहिलं. पहिल्यांदाच त्याने स्वत:ला नीट निरखून पाहिलं. आजवर तो फक्त घाईघाईने पाणी प्यायचा. आजुबाजूला कुणी भयंकर प्राणी नाही ना, असं एकीकडे बघायचं आणि दुसरीकडे घाईघाईने घोट घ्यायचे. आज पहिल्यांदाच तो पाणी प्यायला नाही, तर स्वत:कडे बघायला आला होता. तो अजिबातच मृगासारखा नव्हता. मृगाच्या पायांत ताकद होती, भुरळ घालणारी झळाळती कांती होती आणि त्याहून सुंदर डोळे होते. त्याच्याकडे असं काहीच नव्हतं – किडमिडे पाय, उदासवाणा रंग आणि अगदी क्षुल्लक डोळे. तो वेगळा होता. तो अंतर्बाह्य कुणी दुसराच होता. कोण होता? माहीत नाही. पण तो मृग नक्कीच नव्हता. तो मृगाबरोबर, त्याच्या वेगाने धावणार नव्हता. ते त्याला जमणारच नव्हतं. त्याने मृगाचा निरोप घ्यायचं ठरवलं.

घाटदार वळण घेऊन एकीकडे नदी वाहत होती आणि बाजूला काही उंच तर काही डेरेदार वृक्षांची गर्द झाडी होती. आता पहिल्यांदाच तो एकट्याने प्रवास करत होता. ह्या झाडीतून पुढे टेकड्या, डोंगर लागणार होते. शांत वयस्क वृक्ष, त्यांना बिलगलेल्या लडिवाळ वेली, साचलेला पाचोळा, तांबडी माती असं सगळं बघत बघत, अंदाज घेत तो एकेक पाऊल पुढे टाकत होता. दूरवर लांबट हिरव्या पानांआडून त्याला गोड गाणं ऐकू येऊ लागलं. इतका गोडवा त्याने कधीच ऐकला नव्हता. त्याने पावसाचा नाद ऐकला होता, वाऱ्याचं संगीत अनुभवलं होतं. नदीची झुळझुळ, भुंग्यांची रुणझुण आणि पक्ष्यांची किलबिल ऐकली होती. पण हे काहीतरी वेगळंच होतं. तो आवाजाच्या दिशेने पुढे पुढे चालत गेला. आंब्याच्या फांदीवर बसून ती स्वच्छ मोकळ्या आवाजात कुहू-कुहू गात होती. झळाळता काळा कुळकुळीत रंग, गुंजेचे लाल डोळे. आंब्याच्या मोहोराचा घमघमाट पसरला होता. पानांच्या गर्दीत लपून असं स्वत:शीच मनापासून कोण गातं? बाहेर येऊन मिरवणं नाही, एवढा गोड गळा असून लक्ष वेधणं नाही... तो तिच्या प्रेमातच पडला. तिथेच गुंतून गेला.

इतक्या लवकर इतकी गाढ मैत्री कशी काय होते? हे सगळं होणारच होतं का, असंच? विधिलिखित? तो मागणी करत असे आणि ती त्याला गाऊन दाखवी. ती तल्लीन होऊन गात राहायची आणि तो भान हरपून ऐकत राही. किती सहजसुंदर ही देवाण-घेवाण, अगदी तिच्या गळ्यातल्या तानेसारखी! तिच्या गाण्यात त्याने किती काय काय जगून घेतलं – प्रेम तर होतंच, पण श्रद्धाही अनुभवली. सौंदर्य तर होतंच, पण शांतीही अनुभवली. आपण म्हणतो, ते ती गाते आणि ती गाते, ते हृदयाला भिडतं अशा स्वर्गीय आनंदात तो बुडून गेला.

आपण अख्खं आयुष्य एकत्र असायला हवं, असं त्याला वाटू लागलं. त्याने त्याचा मुक्काम गवताच्या कुरणांवरून झाडाच्या फांद्यांवर हलवावा आणि दोघांनी झाडा-पानांमधून मजल दरमजल करत त्या पर्वत शिखरांकडे प्रवास करत राहावा. पोहोचू किंवा नाही पोहोचणार. पण सोबत पुढे जावं. पण ती म्हणाली, की तिला पर्वत शिखरांकडे जाण्यात अजिबात रस नाही. मग त्याचीही तिकडे जाण्याची ओढ हळूहळू कमी होऊ लागली. शिखरांवर असं काय आहे? जे आहे, ते इथेच आहे. दूरवर पसरलेली हिरवी वनराई, मोहोराच्या घमघमाटाने भारून गेलेलं वातावरण आणि त्यात तिचं मंजुळ गाणं. हेच त्याच्या दुनियेतलं विश्व आहे. हे सगळं सुंदर आहे. हे असंच धरून ठेवावं, गोठवून ठेवावं.

तिला नुसतं ऐकतच राहावं असं त्याला वाटे. पण हळूहळू तो मनातल्या मनात तिच्याशी बोलू लागला, “गाणं तुझा श्वास आहे. पण मला गाता येत नाही. नाचावंसं वाटतं मला. तू नाचशील माझ्याबरोबर, गिरक्या घेत, बेभान होऊन? ढगांकडे बघत राहावंसं वाटतं. ढगांचे उत्कट रंग आणि गूढ आकार शेजारी बसून बघशील तू माझ्याबरोबर? पावसाचा एकेक थेंब पाण्यात पडून मोठं वलय होत असताना हरवशील माझ्याबरोबर नदीच्या काठी?”

त्याला तिच्याशी खूप काही बोलावंसं वाटे. त्याच्या गुहेबद्दल. तो तिथून बाहेर आला तो काळ. त्याचं वेडेपण, त्याचं भाबडेपण, भारावलेपण. तिला काय वाटेल त्याबद्दल? त्याला वाटतो तसा हळवेपणा वाटेल का? तिने भावूक व्हावं असं त्याचं म्हणणं नव्हतं. पण ती कोरड्या चेहऱ्याने नुसतं ऐकत राहील का? मग तर त्याला खूपच वाईट वाटेल तिला सांगितल्याबद्दल. तिच्या कोरडेपणाची भीती वाटे त्याला आणि मग मूकच होऊन जाई तो. त्याला असं नेहमीच मुरड घालत जगायला लागेल का? त्याला खरंच हवा होता का हा असा सहवास? जसा त्याला हवा होता, तसा सहवास तिचा नव्हता. जो तिचा होता, तो त्याच्या स्वप्नातला नव्हता. मग तरीही त्याला तिचा, तिचाच का हवा होता? कसली ओढ होती ही? हे असं न उलगडणारं कोडं पडलं की उगीचच त्यात काहीतरी दिव्यत्व, भव्यत्व त्याला जाणवू लागे आणि सुखावून जाई तो त्याच्याच मनाच्या भव्यतेने.

तिच्यामध्ये त्याला अगणित सुंदर गोष्टी दिसत. पण तिला दिसतं का त्याच्यात काही विशेष? त्याचा आवाज तर अगदीच भसाडा होता. पण दुसरं काही विशेष दिसतं का तिला? खरं तर, त्यालाच त्याच्यात काही विशेष वाटत नव्हतं. म्हणजे तो खरंच इतका नगण्य होता, की तो तिच्या नजरेने जग पाहत असल्याचा हा परिणाम होता? तिला कुठलं तरी नवं जग शोधायचं होतं. कुठे, ते तिने सांगितलं नव्हतं. तिच्या लाल डोळ्यांमधली गुपितं त्याला कधी वाचता आली नाहीत. आणि जरी त्याला समजला असता तिचा मार्ग, तरी त्याच्यामध्ये आता कुठली आस उरली नव्हती. त्यामुळे संपणारच होतं सगळं. ती म्हणाली, “प्रत्येक गोष्ट कधीतरी संपणारच.” त्याला कधीच इतका कोरडेपणा जमला नव्हता.

आधी तो दगडच झाला. मोठ्या वडाच्या सावलीत पारंब्या लपेटून गवतात तोंड खुपसून दिवसच्या दिवस नुसता लोळत राहिला. काही दिवसांनी त्याला वाटू लागलं, की “आठवणी तर आहेतच आपल्याकडे. जगायला आठवणी पुरेशा आहेत.”  मग तो उठला, भटकू लागला, जेवू-खाऊ लागला. पण सगळ्यात तिचं पार्श्वसंगीत असायचं. दरवेळी, दर ठिकाणी तिचा आवाज बरोबर असायचा आणि शेवटी आठवणी अंगावर ओढूनही झोप नाही लागायची. सुंदर आठवणी होत्या, तशा दुखऱ्याही होत्या. किंबहुना दुखऱ्याच जास्त होत्या. नकोच ती आवर्तनं. त्यापेक्षा स्वप्नं सुंदर असतात. एकदा डोळे मिटले, की आपल्याला हवं ते बघावं. खरं तर त्याला नीट काही जमतच नव्हतं.

एकदा असंच भटकताना त्याला म्हातारी वानर भेटली. म्हणाली, “इथे काय करतोस? जा, जाऊन डोंगर पादाक्रांत कर. उंच उंच शिखरांची स्वप्नं बघ.” त्याला आता शिखरं सर करायची उमेद उरली नव्हती आणि वेळही उलटून गेली होती. कोकिळेच्या भोवताली रमला नसता, तर आता डोंगरांजवळ असला असता. आता निघून काय साधणार होतं? आता इथेच काहीतरी करायला लागेल, कुणाची तरी साथ शोधता येईल. म्हातारीला काही हे रुचलं नाही. तरुण असताना तिला शुभ्र शिखरं खुणावत होती. पण वाटेत एक सवंगडी भेटला आणि ती ह्या वनातच थांबली. पाच मुलं झाली. तिच्या दुधावर तर वाढलीच. पण तिच्या आशा-आकांक्षाही त्यांनी पिऊन घेतल्या. त्यांच्यासाठी सगळं सोडलं. नंतर सगळी कृतघ्न निघाली. खंतावू नये, असा एकही नाही. कुटुंबातला आनंद म्हणजे मृगजळ वाटे तिला. त्यापेक्षा स्वप्नांच्या मागे धावली असती, उंच उंच गेली असती आणि अभिमानाने जगली असती. आजही ती सकाळी जेव्हा डोळे उघडते, तेव्हा पहिल्यांदा तिची नजर दूरवरच्या उंच शिखराकडे जाते. खोल गेलेल्या डोळ्यांमध्ये आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये हलकीशी चमक तरळून जाते. “अजूनही जमेल तुला. नक्की जमेल. शक्य तेवढं जात राहायचं रोज. थांबायचं नाही”, तिने त्याला समजावलं.

“खरंच जमेल मला?”, त्याने विचार केला. कुणी चांगलं काही सांगितलं, की विश्वास ठेवणं इतकं अवघड का बरं जातं? मृगाचं तुच्छ बोलणं लगेच खरं वाटायचं. तरी पण तो निघाला. पुढे चालू लागला. डोक्यातलं वादळ शांत ठेवायचं असेल तर चालत राहिलेलं बरं. जंगल तुडवता तुडवता त्याची शक्ती वाढू लागली होती. उत्साह वाटू लागला होता. तरी पण सलत असलेल्या काट्यासारखा एक प्रश्न मनातून जातच नव्हता, “मग ती का गायची माझ्यासाठी? मी सांगेन ते गाणं का बरं म्हणायची?” गुंता सुटत नव्हता. हा काट्याचा सल म्हणजे विचित्र आजार होता – ना धड बरा होणारा, ना जीवावर बेतणारा.

आता त्याला टेकड्या लागल्या होत्या. चालण्यात आनंद वाटत होता. चढण चढताना तो लांब लांब उड्या मारू लागला. हे एक नवीनच काही जमू लागलं, हवेत उडल्यासारखं! जंगल विरळ होऊ लागलं आणि गारवा वाढू लागला. खाली दऱ्या दिसू लागल्या. दिवसभराच्या प्रवासानंतर संध्याकाळी तो गवतफुलांच्या गालिच्यावर विसावत असे. दूरवरची हिमशिखरं सूर्यकिरणांत तेजस्वी अग्निकुंडासारखी दिसत. अशाच एका गूढ उजळवणाऱ्या संध्याकाळी त्याला अचानक चमकून गेलं, “मी करत असलेल्या कौतुकासाठी ती गात होती, माझ्यासाठी नाही. मला ती आवडते, हे तिला आवडलं होतं.” सगळं अगदी स्पष्ट झालं. गुंता सुटला होता. रात्रीच्या स्वच्छ निरभ्र आकाशात एकेक नक्षत्र उगवू लागलं आणि अवघा आसमंत उजळून गेला.

आता त्याला गती आली होती. अनामिक आनंद जाणवत होता. शुभ्र शिखरांची वाट स्पष्ट दिसत होती. तिथं पोहोचण्याची खात्री पटू लागली होती. आत्मविश्वास वाढत होता. तो जणू तरंगत चालला होता. मधल्याच एका डोंगराच्या वळणावर त्याला एक वेगळीच अनवट वाट दिसली. ही हिमशिखरांकडे नव्हती जात. एका वेगळ्याच दिशेला जाणारं वळण लागलं होतं त्याला. समोर उंच शिखरं दिसत होती. आवाक्यात आली होती. पण का कुणास ठाऊक त्याच्या मनाला ही वेगळीच वाट खुणावू लागली आणि अनावर ओढीने तो तिकडे वळला सुद्धा. त्याची द्विधा अवस्था झाली नाही. त्याला निर्णय घ्यावा लागला नाही. आशा-निराशा, आठवणी-स्वप्नं सगळी तिथेच टाकून त्याने नवी वाट धरली आणि तो पुढे पुढे जाऊ लागला. सोबतीला भणाणता वारा, निरामय  वातावरण आणि हिरवा सुगंध. सळसळत्या उत्साहात तो झपाटल्यासारखा झेपावत होता. कुठे ते माहीत नाही. प्रवासाच्या अंगभूत आनंदात पुढे पुढे जात होता. नि:शब्द प्रवास. डोक्यातले आवाज थांबले होते. स्वत:शीही बोलायची गरज उरली नव्हती. एकेक डोंगर सर झाले, कडे-कपारी मागे पडल्या.

ह्या प्रवासाला एक नाद आला होता, एक ताल आला होता. त्याला स्वत:ला एक छानसा डौल आला होता. छाती पुढे काढणारी सहज ऐट आली होती. तो आतून आतून फुलून येत होता. त्याला सर्वांगच नवीन जाणवत होतं. एके दिवशी त्याला पाण्याचा घुमणारा आश्वस्त आवाज ऐकू येऊ लागला. त्याने त्याच्या समोरचा डोंगर ओलांडला आणि  पाहिलं, तर पुढच्या डोंगरावरून शुभ्र धबधबा कोसळत होता. कडेकपारींतल्या जलधारा मनसोक्त उड्या मारून खालच्या निळ्या तळ्यात मिसळून जात होत्या. सगळीकडे तुषार उडत होते. तळ्यामध्ये डोंगरा-धबधब्याचं हलतं प्रतिबिंब दिसत होतं. त्याने तळ्याकडे डोळे भरून पाहिलं. त्या तळ्याची निळाई त्याला स्वत:मध्ये जाणवू लागली. त्याची कांती सुद्धा पाण्यासारखी चमचमत होती. तो आवेगाने खाली दरीतल्या तळ्याकडे झेपावला आणि उडतच खाली गेला. त्याने तळ्यात वाकून निरखून पाहिलं. झगमगत्या रंगांची मखमली कांती आणि डोक्यावर निळा राजेशाही तुरा! त्याला आनंदाचं उधाण आलं. त्याच्या अंगाअंगातून देखणा भव्य पिसारा फुलला आणि त्यातल्या शेकडो गर्द जांभळ्या डोळ्यांमधून त्याने स्वत:कडेच आश्चर्याने पाहिलं. मयूर होता तो, आलिशान, रूपसंपन्न मयूर. तो मृगासारखा धावणार नव्हता, कोकिळेसारखा गाणारही नव्हता. तो त्याच्या अलौकिक सौंदर्याच्या अंगभूत डौलाने बेभान नाचणार होता. अंगात भिनलेल्या लय-तालावर दृष्ट लागण्यासारखा पदन्यास करणार होता. स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी. सहजभाव म्हणून. चराचरातून त्याला संगीत ऐकू येऊ लागलं. त्याने नृत्य सुरू केलं.

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

कथा - किंमत


मी एजंट आहे, देवाचा. देवाशप्पथ खरं सांगतो, खोटं नाही. ही जी शक्ती आहे ना मला, त्यात खोटं बोलताच येत नाही. तोंडातून फक्त खरंच निघतं. आता देव जरी झाला, तरी सांभाळू म्हणता सांभाळत नाही सगळं जग एक हाती. हा सगळा गलथानपणा बघून कळतच असेल की तुम्हांलाही. नाही जमत एवढी गुंतागुंत हाताळायला. म्हणून माझ्यासारखे एजंट आहेत मदतीला. तरी पण हे असं अवघडच होऊन बसलंय सगळं. आम्ही नसतो तर काय झालं असतं!

माझं हे लाकडी ऑफिस एका हिरव्यागार टेकडीच्या पायथ्याशी आहे. चारी बाजूंनी छोट्या टेकड्या आणि मध्ये नितळ निळं तळं. ऑफिसमधून बाहेर आलं, की हिरव्या झुडुपांतून तळ्याकडे जाणारी वळणावळणाची पाऊलवाट दिसते आणि पुढे शांत पाण्याची पारदर्शी निळाई. ह्या सगळ्या परिसराला चैत्राचा सौम्य सुगंध येतो. पहाटेच्या वेळी तळ्याच्या पलिकडच्या टेकडीमागून सूर्याच्या किरणांची लालसर चाहूल लागते, ती माझी कामाची वेळ. तीच वेळ असते फक्त जेव्हा क्लायंट इथे येऊ शकतो.

एखादा माणूस (किंवा बाई) एखाद्या गोष्टीने झपाटून जातो, अगदी वेडापिसा होतो. त्याला काहीही करून ती गोष्ट हवीच हवी असते. अस्वस्थ होऊन तो अख्खी रात्र जागून काढतो, तेव्हा अगदी पहाटे तांबडं फुटायच्या आधी त्याला तिकडे थोडासा डोळा लागतो आणि तो इथे माझ्यासमोर हजर होतो. त्याच्या इच्छेत तेवढी तीव्रता असावी लागते. तरच त्याला मागणी घेऊन इथे येता येतं. तो अधीर असतो, बेभान असतो आणि केविलवाणा, लाचार सुद्धा असतो. त्याला फक्त एकच एक गोष्ट दिसत असते, पोपटाच्या डोळ्यासारखी. मी डोळे मिटतो. मला त्या मागणीची किंमत दिसते.

कालच एक चाळिशीतला माणूस आला होता, सावळा, गोल चेहऱ्याचा. पोट सुटलेला, कपाळावरून केस थोडे मागे चाललेला. “कॉलेजमध्ये असल्यापासून दिवसाचे अठरा-अठरा तास काम करतोय. इतक्या लोकांची इतकी कामं करून दिली, खेटे घातले, वरिष्ठांची मर्जी सांभाळली. वीस-पंचवीस वर्षं होऊन गेली, नुसता राबतोय. लोक पुढारी म्हणून ओळखतात, मानतातही. पण जिल्हा पातळीच्या पुढे काही केल्या जाईना झालंय.एवढ्या पहाटेही त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते, डोळे खोल गेले होते. यशासाठी जीव अगदी कासावीस होत होता त्याचा. मी डोळे मिटले. प्रत्येक वळणापाशी कधी दोन, कधी तीन फाटे फुटत होते. त्यातल्या बरोब्बर मोक्याच्या वळणांवरून त्याला पाठवलं, तर यश निश्चित होतं. सगळ्या घटना स्पष्ट होत्या.

मी म्हणालो, “येत्या पाच वर्षांत मोठा नेता होशील, नावारूपाला येशील. पण त्या वाटेवर एका तरुणाचा जीव जाईल. ती किंमत आहे याची. नीट विचार करून सांग. ही किंमत चालणार आहे?”
“माझ्या हातून खून होणार आहे?”
“नाही.”
“मी खुनाची सुपारी देईन?”
“नाही.”
“अपघात? भरधाव गाडी चालवून किंवा..”
“नाही.”
“मग कसा काय मी कुणाला मारणार?”
“याहून जास्त मी काही सांगू शकत नाही.”
तो जरा थांबला. “मी तर मारणार नाही.. ह्या देशात दरवर्षी लाखाच्या वर लोक रस्त्यावर अपघातात जातात. लाखो मलेरियाने जातात. पुढे गेलो, तर किती काय काय करू शकेन! खूप लोकांचं भलं करायचंय मला.”
त्याला थोडंसं गोंधळल्यासारखं झालं, पण मागे फिरण्याचा विचार अगदीच असह्य होता. एकदाचा “हो” म्हणून तो घाईघाईने निघून गेला. “एक वाईट स्वप्न पडलं म्हणायचं आणि हे सगळं विसरून पुढे जायचं”, असं त्याने ठरवलं. एकदा त्याने किंमत मान्य केली, की झालं! माझ्या हातात तसंही काहीच नसतं.

संतोष बावीस वर्षांचा आहे. दहावीनंतर शाळा सोडली. दहावी सुद्धा दोनदा दिल्यावर पास झाला. शाळा कधीच आवडली नव्हती. पट्टीने मारायचे शाळेत. त्याच्या डोक्याला मडकं म्हणायचे, कांदे-बटाटे भरलेत म्हणायचे. घरची दीड एकर शेती. पाऊस-पाणी कमी. आई-वडिलांनी अख्खं आयुष्य शेतीला जुंपून घेतलं आणि दोघं उन्हातान्हात करपून गेले. पण हाती काहीच लागलं नाही. आई दिवसभर करवादत असते, रडबोंबल करते आणि वडील शुष्क गारगोटीच्या डोळ्यांनी शून्यात बघत असतात. एक धाकटा भाऊ आहे, उनाडक्या करत असतो. संतोषचे गावातले मित्र त्याच्यासारखेच, शिक्षण पण त्याच्यासारखंच. पण एक वनखात्यात चौकीदार झाला आणि एक शाळेत शिपाई. त्यांच्या जातीमुळे त्यांना सरकारी नोकऱ्या मिळतात. संतोषच्या जातीला काहीच नाही. त्याला नेहमीच खूप राग येतो. संताप, संताप होतो जीवाचा. त्याच्या जातीचा एक पुढारी आहे तालुक्याला. त्याच्याकडे संतोष कामाला लागला. पडेल ती, सांगतील ती कामं करायची. निरोप द्यायचे, पत्रकं वाटायची, गणपतीत मांडव टाकायचा. नोकरी म्हणाल तर हीच.

संतोषच्या जातीचे असे हजारो-लाखो तरुण-तरुणी आहेत. त्यांना स्वत:च्या भविष्यात अंधारच अंधार दिसतो. ते आता रस्त्यावर आले आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या पटांगणावर गेले तीन दिवस ते उपोषणाला बसले आहेत. काल रात्री एका पुढाऱ्याचं भाषण झालं. त्यानंतर रात्रभर संतोष पटांगणावर बसून जागाच होता. उजाडू लागलं, तसं त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडू लागला. त्याला त्याचा मार्ग स्पष्ट दिसू लागला. तो उठून पटांगणाच्या बाहेर चालतो आहे. कसा जगलास हे महत्त्वाचं, किती ते नाही. संतोष दुकानात गेला आहे. स्वराज्यासाठी सुद्धा कितीतरी मोहरे कामी आले होते. पांढऱ्या रंगाचा प्लास्टिक कॅन घेऊन तो दुकानातून बाहेर पडला आहे. आपण असल्या केविलवाण्या भिकारी आयुष्यासाठी जन्मलेलो नाही. तो पटांगणात परत आला आहे. ध्येयापुढे ना कशाची तमा असते, ना भीती. व्यासपीठासमोर संतोष अंगावर काहीतरी ओतून घेतो आहे. आग आगीला भीत नसते. रॉकेलच्या वासाबरोबर हवेत भीती पसरायला लागली आहे. लोक ओरडू लागले आहेत, गोंधळ सुरू झाला आहे आणि त्यातच एकदम भडका उडाला आहे. संतोष आगीत लपेटला आहे. त्याच्या आयुष्यभराचा संताप ह्या आगीत मिसळून कडाडता केशरी झाला आहे. शरीरातून किंकाळ्या, आक्रोश फुटतो आहे. अंगाची लाहीलाही, असह्य वेदना. ही शेवटची वेदना. आता वेदना संपणार, दु:ख संपणार. कायमचं. हा यज्ञ आहे. यात आहुती देऊन क्रांतीची सुरुवात होणार. या ज्वाळाच त्याच्या जातीवरचा अन्याय जाळून खाक करणार. त्याच्या भावाचं तरी भलं होईल, नोकरी मिळेल. आई-वडिलांना भाऊ बघेल. संतोष हुतात्मा आहे, पहिला हुतात्मा. अभिमानी मरण पत्करणारा योद्धा.

हे असं सगळं तीन वर्षांनी घडणार आहे. एक चिपाड मुलगा करपत जगणार आणि होरपळत मरणार. हा जो माणूस काल येऊन गेला, तो लोकांना भडकवणार आहे, आंदोलन पेटवणार आहे. त्याच्या भाषणानंतर संतोषचा बळी जाणार आहे. मग मागण्या मान्य होतील आणि आंदोलन यशस्वी होईल. त्याच्या पुढच्या एक-दोन वर्षांत ह्याला मोठा नेता म्हणून मान्यता मिळेल. तसं सोपं नाही माझं हे काम. दिवसाची सुरुवातच अशी होते. मग माझ्या छातीत जळजळायला लागतं. छातीत अडकल्यासारखं, कोंडल्यासारखं होतं. हळूहळू ते घशाकडे सरकतं. तडफड होऊ लागते. तळव्यांची, तळपायाची आगआग होते. कसाबसा उठत-बसत, कण्हत-कुथत मी तळ्याकाठी पोहोचतो. नितांत निळाईत स्वत:ला बुडवून टाकतो. गर्द हिरवाई पांघरून घेतो. तरीही दाह कमी होत नाही.

कधी कधी जरा बरा दिवस असतो. फारसा त्रास होत नाही. गेल्या आठवड्यात एका संघटनेचा प्रमुख आला होता. त्याच्या यशाची किंमत तशी सरळ होती. कुणी मरणार बिरणार नव्हतं. फक्त पाच-पन्नास तरणी पोरं-पोरी आयुष्य वाया घालवणार होती. शिक्षण, कामधंदा सोडून बसणार होती. भणंग होणार होती. गडी तयार झाला. आता संघटना वाढेल त्याची. थोरपणाचं बाळसं धरेल तो. किंमत ऐकून सहसा कुणी इच्छेवर पाणी सोडत नाही. पण क्वचित असा कुणी विरळा माणूस भेटलाच, तर मात्र चांगली तरतरी येते. मग मी मस्त डोंगर-दऱ्यात फेरफटका मारून येतो. 

तसा मी काही कायम राहणार नाही. अजून काही वर्षांनी माझं हे ऑफिस, हे तळं आणि मीही बुडून जाणार आहे. सुटणार मी. खूप छळलंय मला जगण्याने. रोजचा मागण्यांचा अविरत ओघ, माझी स्वाभाविक अपरिहार्यता आणि त्यातून देहात शिरणारा दाह, यातना, तीक्ष्ण यातना. एक पहाडासारखा लोट येईल आणि वाहून नेईल सगळं, मोकळं करेल मला. हा दाह बुडून जाईल त्यात आणि माझ्याबरोबर सगळंच शांत होईल. माझ्या लेखी सगळं शांत, सगळं शून्य. अजून काही वर्षं.

काही वर्षांनी हे असं....आकाशात घुसलेली शुभ्र हिमशिखरं वाळवी लागलेल्या झाडासारखी आतून पोखरलेली आहेत. ती एकामागून एक उन्मळून पडत आहेत. ते पांढरेफक्क अश्रू अजस्र सूड घ्यायला समुद्रात धावून येत आहेत. पिसाळलेल्या हत्तीसारखे एकेकाला तुडवत, रगडत निघाले आहेत. छोट्या-छोट्या बेटांचे हिरवे घास घेत पुढे चालले आहेत. आता ह्या लाटांचे विराट स्तंभ गर्जना करत दरारा दाखवायला किनाऱ्यांवर थडकले आहेत. हा उद्रेक जमिनीवर झेपावतो आहे. थिजल्या झाडांना लोळवतो आहे. प्राण्यांना गाडून सडवतो आहे. भुकेल्या, कंगाल लोकांना बेघर करून आत ढकलतो आहे. आता पाण्यातलं तांडव जमिनीवर आलं आहे. दुर्भिक्ष्याच्या दलदलीत मुंग्यांसारख्या माणसांची ढकला-ढकली, खेचाखेची, ओरबाडा-ओरबाडी सुरू झाली आहे. आता एकेकाचा राक्षस होतो आहे. ज्याचा ज्याचा राक्षस होत नाही, त्याला त्याला हे राक्षस टिपून टिपून गिळत आहेत.

हे असं होणार. ही कशाची किंमत? ही कुणा एकाच्या मागणीची नाही. ही कोटी, शतकोटी नर-माद्यांच्या रोजच्या अधाशी मागण्यांची किंमत आहे. हपापलेल्या अगणित नजरांची आहे. झिंग चढलेल्या जड पापण्यांची आहे. स्वत:साठी सगळं काही तुडवणाऱ्या असंख्य उद्दामांची आहे. ढोंगीपणाची झूल चढवून माजलेल्या प्रतिष्ठित बैलांची आहे. मेद चढलेल्या गेंड्यांनी रचलेल्या छल-कपटाची आहे. कुत्र्यासारखी लाळ टपकत “अजून-अजून-अजून-अजून” म्हणणाऱ्या आ वासल्या अनंत तोंडांची आहे. चिकट घाणेरड्या हावेच्या द्रवात लडबडलेल्या डुकरांची आहे. कोटी कोटी हव्यासांचा जो अजगरविळखा बसला आहे, तिची ही किंमत आहे. हे होणार आहे.

बुधवार, २९ जानेवारी, २०२०

कथा - सभा



खालच्या मजल्यावरच्या मेसमध्ये चहा पिऊन अनिकेत नुकताच वर आला. बेसिनपाशी जाऊन त्याने गार पाणी तोंडावर मारलं, चेहरा धुतला आणि खोलीकडे निघाला. वाटेत समोरून येणारा मुलगा त्याच्याकडे संशयाने बघत असल्याचं त्याला जाणवलं. बघून न बघितल्यासारखं करत तो खोलीत शिरला. त्याला सभेला जायचं होतं. नंदन बजावून गेला होता, “ऐनवेळी हातपाय गाळू नकोस!” नंदन आणि तो गेली दोन वर्षं होस्टेलच्या ह्या खोलीत राहत होते. नंदनला काय योग्य, काय नाही ते सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ ठाऊक होतं. ठाम होता तो त्याच्या विचारांवर. भरभरून बोलायचा, पोटतिडकीने. नंदन सभेच्या आयोजकांमध्ये होता आणि तयारी करायला सकाळपासूनच गेला होता.

अनिकेतने कंगवा घेऊन त्याच्या अरुंद कपाळावरच्या बटा मागे सारायला सुरुवात केली. आरशात पाहिलं. नुकतंच मिसरूड फुटलेला नववीतला अनिकेत त्याला आठवला, गोरटेला गुणी बाळ. तेव्हा नुकताच नवीन कायदा आला होता, ‘संपूर्ण न्याय सूत्र’ – संन्यासू. त्यासाठी अभ्यासक्रमात बदल केले होते. मुलांना संन्यासू समजावा म्हणून देशभर सगळ्या शाळांमध्ये दर आठवड्याला दोन तास त्याचे वर्ग घेतले जात. पांढरा शुभ्र शर्ट आणि गडद निळी शॉर्ट घालून दुसऱ्या बाकावर बसलेला अनिकेत. गोल चेहऱ्याच्या चष्मेवाल्या बाई विचारत होत्या, “झाडाची वाढ कशाकशावर अवलंबून असते?” टपोऱ्या स्वच्छ अक्षरात मन लावून तो वहीत लिहित होता, “बी, माती, पाणी, सूर्यप्रकाश.” बाई सांगत होत्या, “उगम आणि पर्यावरण, दोन्ही महत्त्वाचं. भोवतालची परिस्थिती बघा. एखाद्या पक्ष्याने बी खाल्लं, तर उगवेल का रोप? उगवलेलं रोप शेळीने खाल्लं, तर वाढेल का ते? तिथून नवा रस्ता होणार असेल आणि सगळी जमीन साफ करून डांबर टाकलं तर जगेल का झाड?” अनिकेतने लिहिलं, “झाडाच्या वाढीत माती आणि बियाणाबरोबरच आजुबाजूच्या परिस्थितीचा वाटा असतो.”

फोनचा बीप वाजला. नंदनने सगळ्या गटाला मेसेज पाठवला होता, “जरा लवकर निघा. इथे पोलिस बंदोबस्त, सुरक्षा तपासणीमध्ये आत यायला वेळ लागेल." अनिकेत तयारच होता. त्याच्या पोटात थोडंसं डचमळल्यासारखं वाटत होतं. “चहा नको होता प्यायला”, तो मनाशीच म्हणाला. पोटात असाच गोळा आला होता दहावीत वर्गासमोर बोलताना. संन्यासूच्या तासाला बाई एकेकाला वर्गासमोर बोलायला लावत. अनिकेतने खालच्या पट्टीत सुरुवात केली होती, पण नंतर स्थिरावला. म्हणाला, “आपण आपल्या वडिलोपार्जित घरात राहतो. वारसाहक्काने आलेल्या जमिनी, व्यवसाय, संपत्ती लोकांना चालते. मात्र त्या जमिनी, ते व्यवसाय उभे करताना ज्या काही गोष्टी घडल्या असतील, त्याची जबाबदारी आजवर कुणीच घेत नव्हतं. ती घेण्याची व्यवस्था म्हणजेच संन्यासू.” वर्गात वाजलेल्या टाळ्या त्याला आजही स्पष्ट ऐकायला येत होत्या.

खोलीचं दार तर नाही ना वाजलं? कुणी बोलवायला येईल का? की बघायला येतील, तो जाणारे का म्हणून? प्रश्न विचारतील का त्याला? त्याला नाही आवडायचं असं कुणी सामोरं येऊन प्रश्न विचारलेलं. नंदनचं वेगळं होतं. त्याला उधाणच यायचं कुणी काही विचारलं की! एकेका मुद्द्यावर एकेकाला मैदानात घेऊन बडवून काढण्यात त्याला एक वेगळाच आनंद व्हायचा, समुद्राचा खोल नाद पिऊन घेतल्यासारखा. पण अनिकेतला मात्र त्याने कधी असं लोळवलं नव्हतं. आव्हान देणारा नव्हताच अनिकेत. नंदनच्या मतांचा झंझावात तो कौतुका-आश्चर्याने ऐकत राही.

अगदी नवेच होते विद्यापीठात दोघे, तेव्हा रात्री खोलीत नंदनने पहिल्यांदा विचारलं होतं त्याला, “तू अठरा पूर्ण आहेस ना? मग संन्यासू कार्ड असेल तुझं.” ते तर घ्यावंच लागे सगळ्यांना. “किती नोंदी आहेत तुझ्या कार्डावर?” अनिकेत म्हणाला, “तीन.” त्याच्या आजोबांची, आईच्या वडिलांची, शेती होती. पूर्वीच्या काळी शेतमजुरांना कमी रोजंदारीवर राबवून घ्यायचे, ती एक नोंद. दुसरी शाळेची. खेळायला मोठं-मोकळं पटांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, दर्जेदार वाचनालय अशी शाळा होती. मात्र संस्थेला शाळेसाठी ती जमीन देताना त्यात घोटाळा झालेला होता. शाळेत जसं उत्तम शिक्षण मिळालं, तशी ह्या घोटाळ्यामुळे नोंदही आली सगळ्या विद्यार्थ्यांच्या कार्डावर. तिसरी नोंद तर सगळ्या मुलग्यांना येणारच होती. अजूनही आपला समाज पितृसत्ताक आहे. त्याचे सगळ्या मुलग्या-पुरुषांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे होतातच. पुरुषांकडून होणाऱ्या अन्यायाची तिसरी नोंद.

“तुला चीड येत नाही ह्याची? आयुष्यभर तू ह्या नोंदींच्या पॉइंटस् नुसार जास्त फी भरणार, जास्त कर भरणार,  मरेपर्यंत. प्रत्येक ठिकाणी तुला कमी प्राधान्य मिळणार”, नंदनने नजर रोखून विचारलं.
अनिकेतला अन्यायाची चीड माहीत होती. न्यायाची कशी काय चीड येते? सुखवस्तू घरात गेलेलं बालपण, शाळेतलं उत्तम शिक्षण पण आयुष्यभर पुरणारच होतं ना!
“उद्या तू एखाद्या कंपनीत नोकरीला लागशील. पगार मिळेल, बोनस मिळेल. कंपनीने मोठं प्रदूषण केलं, की चौथी नोंद येईल”, नंदन बोलतच होता.
आता अशी नोंद होण्यात काय गैर आहे? उलट ह्या व्यवस्थेमुळे प्रदूषण करण्याची शक्यता कमीच होईल. धरणग्रस्तांना, शोषित लोकांना ह्या करातूनच तर पैसे जातात. पण अनिकेतने नंदनपुढे तोंड उघडलं नाही. खोटं बोलून पकडलं गेलेलं लहान मूल जसं गोडशा अपराधी चेहऱ्याने आईकडे बघतं, तसा शांतपणे तो नंदनकडे बघत राहिला. तेव्हाच ठरलं, की नंदनचे फटकारे कधीच अनिकेतच्या वाट्याला येणार नव्हते.

अनिकेतने फोन आणि पाकीट घेतलं. पाकिटात संन्यासू कार्ड असल्याची खात्री करून घेतली. खोलीला कुलुप घातलं. जिन्यात कुणी भेटलं आणि काही विचारलं तर? नंदन म्हणतो, “मुळात एका चुकीचं परिमार्जन दुसऱ्या चुकीने होत नसतं आणि तू मुलगा म्हणून जन्माला आलास त्यात तुझी काय चूक?” नंदन बोलू लागला, की सगळं जग त्याला दिसतं, तसंच आपल्याला दिसतं, एकदम स्पष्ट. त्याच्यावर वनमाळींचा प्रभाव होता. वनमाळी तरुणांचे नेते होते. संन्यासूविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. नंदनसारखे बरेच तरुण त्यांच्या मागे होते. नंदन त्यांची भाषणं सगळ्यांना पाठवत असे. अनिकेतने पण त्यांची काही भाषणं पाहिली होती. वनमाळी म्हणजे मोठं कपाळ, उजळ रंग, सोनेरी काड्यांचा चष्मा, त्याच्या मागचे भेदक डोळे आणि अगदी शांत, अभिनिवेशशून्य बोलण्याची शैली. “सूड आणि न्याय ह्यांत फरक करायला पाहिजे.” ऐकणारा स्तब्ध होत असे. “एका निरपराधी माणसावर अन्याय झाला, त्याचं परिमार्जन कसं करायचं? दुसऱ्या निरपराधी माणसाला शिक्षा देऊन ते होणार नाही.” त्यांचं भाषण म्हणजे गणितातल्या प्रमेयासारखं. काहीतरी नवीन, काहीतरी विलक्षण. ते सिद्ध केलेलं असतं आणि तरीही पूर्णपणे समजत नाही आपल्याला. पण ऐकताना समजल्यासारखं वाटतं आणि ते बरोबर असतं. “संन्यासू हा विपरीत न्याय आहे. अन्यायाची प्रतिक्रिया ही न्यायाकडे नेणारी हवी, जास्तीच्या अन्यायाकडे नाही.” अनिकेतला ही भाषणं महान वाटत, जीव दडपून जाईल इतकी महान.

खांदे पडलेला अनिकेत उदास जिना उतरत खाली आला आणि त्याने सायकल काढली. खाली मान घालून त्याने पॅडल मारायला सुरुवात केली. उन्हं उतरू लागली होती. थोडासा वाराही वाहत होता. तरीपण घाम येत होता खूप. सायकल चालवल्यामुळे असेल किंवा चिंताच पाझरत असतील अंगातल्या. वनमाळींची सभा म्हणजे हजारोंची गर्दी. कुणी त्यांचे विचार मनापासून पटणारे, कुणी त्या बुद्धिमत्तेने भारावलेले, तर कुणी भाषणाचा डोक्याला ताण वाटणारे. पण सगळे संन्यासूग्रस्त. दरिद्री टपऱ्या, भडक दुकानं पार करून अनिकेत उजवीकडे वळला आणि रस्त्याने एकदम रूप पालटलं. स्वच्छ चकचकाट, नीटस दुकानांमधून सरपटत हा रस्ता सभेच्या मैदानाकडे चालला होता. गर्दी वाढत होती. पण गुदमरवणारे, घुसमटवणारे घोळके नव्हते ते. सगळे अनोळखी चेहरे ओळखीचे वाटत होते. हाताला थोडासा कंप सुटला त्याच्या. “पहिल्यांदाच सभेला जाणार म्हणून असेल”, तो स्वत:लाच म्हणाला.

मध्येच त्याला शाळेतल्या चष्मेवाल्या बाई आठवल्या. “तू मुलगा आहेस, त्यात तुझं काय कर्तृत्व? त्याच्या वडिलांचं मोठं घर आहे, त्यात त्याचं काय योगदान? या सगळ्या रॅंडम गोष्टी आहेत. यादृच्छिक म्हणतात त्याला. कुणी झोपडपट्टीत जन्माला येतो. का? फक्त नशिबामुळे. या रॅंडमनेसचे परिणाम आपण कमी करतोय. नशिबाची भरपाई करतोय या कायद्याने.”

सभेच्या बाहेर पार्किंगसाठी भलं मोठं पटांगण होतं. तिथून सभेचं व्यासपीठ दिसतही नव्हतं. चार चाकी गाड्या वेगळीकडे, दुचाक्या वेगळीकडे. सायकलींसाठी वेगळा मोठा भाग. काळ्या, निळ्या, लाल शेकडो सायकली दिल्या जागी रांगेत नाकानीट उभ्या होत्या. त्यातच अनिकेतची सायकल मिसळून गेली. घोळकेच्या घोळके आत चालले होते. काही एकांडे शिलेदारही होते. आज नुसती भाषणं नव्हती. सभेमध्ये संन्यासूचा निषेध आणि विरोध होणार होता. त्यासाठी खास अॅप काढलं होतं. त्यावरून सभेच्या ठिकाणी आपापला निषेध सगळ्यांनी नोंदवायचा होता. “निषेध केल्यामुळे तुमच्या संन्यासू कार्डावर नवीन नोंद होणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका”, नंदनने प्रत्येकाला सांगितलं होतं. ते फक्त विरोध करणाऱ्यांची यादी ठेवणार होते. किती लोकांचा विरोध आहे, जनमत काय आहे ते समजून घेण्यासाठी. सुरक्षा पडताळणीच्या ठिकाणी प्रत्येकाचं नाव लिहिणार होते.

म्हणजे अनिकेतचं नाव सरकारी यादीत जाणार, संन्यासू विरोधक म्हणून. सगळ्या जगापुढे. त्याच्या कपाळावर कायमचा शिक्का बसणार. त्याला भेटेल त्या प्रत्येकाला त्याच्या कपाळावर वाचता येईल, नव्हे ते वाचतीलच – “न्यायाचा विरोधक.” त्याला आवडणारी, डोळ्यांत चमक असलेली बडबडी मुलगी भुवया उंचावत म्हणेल, “तू विरोधक आहेस?” आणि वर्गातला तो हसरा मित्र, त्याचे वडील भूमिहीन आहेत, तो? त्याच्यासमोर कसं जायचं? कशी नजर भिडवायची? आई-वडील चिंता करतील, “तू आता त्या यादीत गेलास, तुला उद्या नोकरी मिळायला त्रास होईल रे!” त्याच्याकडे ना नंदनचा आत्मविश्वास होता, ना वक्तृत्व. त्याचे पाय थिजून गेले. त्याचा वठलेला वृक्ष झाला – ना जागेवरून हलता येत होतं, ना अभिव्यक्तीची पालवी फुटत होती.

पटांगणातल्या वाहनांवर जांभळट संध्याकाळ उतरू लागली होती. एकेक वाहन अंधुक होऊ लागलं. अनिकेतने फोन बंद केला. आता कुणी त्याच्याशी बोलू शकणार नाही, संपर्क करणार नाही. तोही अंधुक झाला. दूर आत सभा सुरू झाली होती. सभेचा आवाज ऐकू येत होता. पण शब्द कळत नव्हते. अवघ्या आसमंतात स्वप्नील काही निनादत होतं, हजारो लोकांच्या हृदयाचा नादब्रह्म असावा तो. अनिकेतला त्याने वेढून टाकलं, लपेटून टाकलं. तो आत असायला हवा होता. त्याला वनमाळींना प्रत्यक्ष बघायचं होतं, ऐकायचं होतं. न्यायाची ती अवघड परिभाषा समजून घ्यायची होती. निषेध करायचा होता, घोषणा द्यायच्या होत्या, आतल्या गर्दीतला एक आवाज व्हायचं होतं. पण वठलेल्या वृक्षाच्या इच्छा अशाच गारठून जात असतात. अडकलेल्या श्वासासारख्या - ना आत जातात, ना बाहेर पडतात. असाच आहे तो, त्याचा पिंडच असा आहे. असा पिंड असणं रॅंडम आहे, यादृच्छिक. त्याला काही भरपाई नाही.