शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

कथा - प्रवास


त्याने डोळे उघडले आणि काळ्या मिट्ट अंधारात आजुबाजूला बघायचा प्रयत्न केला. हळूहळू अंधुकसं दिसू लागलं. कुठली तरी गुहा होती, अरुंद, लहान. तिला थोडीशी फट. नुसते आल्यासारखे आत डोकावणारे प्रकाशाचे तुरळक कण. तो कुठून आला होता? इथे कसा आला? कोण आहे? माहीत नाही. त्याला कशाचंच स्मरण नव्हतं. आत खूप अडचण होत होती, कुणीतरी त्याला आत कोंबल्यासारखं वाटत होतं. अंगात फारशी ताकद नव्हती. पण बाहेर तर पडावं लागणारच होतं. सर्व शक्तीनिशी त्याने जोर लावला. रेटा देत राहिला आणि फट मोठीमोठी होत शेवटी भिंतीला भगदाड पडलं! तो बाहेर आला, उजेडात. पहिल्यांदाच. लख्ख प्रकाशात त्याचे डोळे दीपून गेले. मान खाली करत त्याने डोळे किलकिले केले आणि हळूहळू डोळे उघडताना पहिल्यांदा दिसला तो पायाखालच्या मातीचा तांबूस दिमाखदार रंग आणि थोडी पुढे नजर गेली तशी त्या मातीवर डोलणारी गवताची पोपटी पाती दिसू लागली. लांबच लांब पसरलेल्या त्या पोपटी लुसलुशीत गालिचांवर कुठे नाजुक पिवळी आणि कुठे नाजुक पांढरी नक्षी. त्यापुढे थोडी बसकी झुडुपं, थोडे दणकट खडक, थोडे अस्ताव्यस्त ओंडके. नंतर गर्द झाडी, तिच्या उदरात एक छोटं जग सांभाळणारी आणि त्यानंतर दूर दूरपर्यंत टेकड्या, डोंगर आणि पर्वताच्या रांगा. त्या शिखरांवर पांघरलेलं तलम केशरी आकाश, हळूहळू पिवळं-पांढरं होत होत अथांग निळाई झालेलं. पाहता क्षणी तो प्रेमात पडला. गवताच्या कुरणातून चालत चालत तो पुढे गेला, त्या गवतपात्यांच्या इवल्या इवल्या कणसांमधून, मंद ओल्या सुगंधामधून. तेवढ्यात त्याला एका झुडुपाआड हालचाल जाणवली.

काळेभोर टपोरे डोळे त्याच्याकडे निरखून पाहत होते. तो थबकला, त्या सोनेरी कांतीकडे त्याने विश्वासाने पाहिलं आणि लगेच त्यांची मैत्री झाली. तो ह्या जगात अगदीच नवखा आणि मृगाला मात्र खडान् खडा माहिती होती. इथून पुढे तो ह्या मृगाचं बोट धरून चालणार होता. मृगाने सांगितलं, की खायला कुठे मिळतं, नदीचं थंडगार पाणी कुठल्या ठिकाणी जाऊन प्यायचं, कुठल्या ऋतूत काय करायचं, हिंस्त्र प्राणी कुठले, कुठे त्यांचं भय असतं, कुठे सुरक्षित असतं. प्रत्येक परिस्थितीत तगून राहायला शिकवलं त्याने. मृग वेगवेगळे धडे देत राहिला.
“इथे प्रत्येकजण आपलं बघतो, आपणही तेच करायचं. बाकी जगाचा फार विचार करायचा नाही. आपण आहोत, तर जग आहे.”

“समोर येईल त्याला वाचता आलं पाहिजे, जोखता आलं पाहिजे. तो का आलाय? त्याला काय हवंय?”

त्याला माहीत नव्हतं, की आपण खाण्या-पिण्या, खेळण्या-झोपण्याखेरीज अजून काय करायचं असतं! इथे कशासाठी आलोय आपण? मृगाने सांगितलं, की ह्या टेकड्या ओलांडून खूप पुढे जायचं, मग मोठे डोंगर लागतात. तेही ओलांडून पुढे पर्वतरांग लागते. त्यात वर-वर चढत राहायचं. कठीण वाटांवरून चालत राहायचं. मग एक अत्युच्च शिखर आहे, पांढरं शुभ्र, हिमाच्छादित. सगळ्यात वरचं ठिकाण. असं उंचावर, की हात वर केल्यावर स्वर्गच लागेल हाताला. सगळ्यात सुंदर. तिथली हवा निराळी, प्रकाश वेगळा. वरून खालचं सगळं जग एकदम एका नजरेत दिसतं, छोटं छोटं झालेलं. छोट्या छोट्या टेकड्या, टिकलीसारख्या वनराया, नदी-नाल्यांच्या चमचमत्या रेघा- सगळं रोमांचकारी! ताऱ्यांमध्ये राहायला गेल्यासारखं वाटतं. तिथे आजवर जे झपाटलेले सगळे पोहोचले, त्यांच्यासारखं आपण व्हायचं. त्या सगळ्या विलक्षण जगाचा भाग व्हायचं!

मृगाने सांगितलं, की ह्यात साहस आहे, आव्हान आहे, भारावलेपण आहे आणि तो त्याच्याबरोबर प्रवासाला निघाला. उत्साहाला उधाण आलं. एक अनामिक हुरहूर जाणवू लागली. पण जमेल का हे आपल्याला? मृग म्हणाला, “जमेल म्हटलं तरच जमतं. आपल्याला जमणार आहे. आपण शिखारासाठीच आहोत. आपण स्वत:ला ताणायचं आणि आपल्या क्षमता वापरायच्या. चल माझ्याबरोबर.” त्यांनी वाटचाल सुरू केली. हिरव्या-निळ्या, लाल-सोनेरी रंगांनी नटलेल्या डोंगर-दऱ्या, गगनचुंबी शिखरं - सगळी कल्पनाच इतकी सुंदर वाटत होती, तर प्रत्यक्षात किती भव्य असेल! त्यांनी कुरणं पार केली आणि वनरायांच्या दिशेने ते चालू लागले. बाजूने नदी होती. मृग पुढे धावत होता आणि तो सारखा मागे पडत होता. “अशाने आपण इथेच अडकून राहू. वाऱ्यासारखं जाता आलं पाहिजे”, मृग सांगू लागला. मृगाची चिडचिड आणि त्याची दमछाक होत होती. त्याची फरफट सुरू झाली. “तुला काही झेपेल, असं वाटत नाही”, मृग तुच्छतेने म्हणाला. अधूनमधून शिंगं उगारू लागला. पावलागणिक त्याचा उत्साह आटू लागला.

एका रात्री तो दमून-भागून झोपी गेला. अंग ठसठसत होतं. डोळा कधी लागला तेही कळलं नाही. रात्रीच्या गार वाऱ्यात त्याने अंग आक्रसून घेतलं होतं. पहाटेच्या सोनेरी किरणांनी त्याला हलकंच कुरवाळलं, तसं त्याने डोळे उघडले आणि पहिला विचार त्याच्या डोक्यात आला, “मला का नाही जमत मृग सांगतो ते?” जवळच झुळूझुळू वाहणारी नदी होती. मऊ ओलसर गवतातून चालत तो नदीकाठी गेला आणि त्याने पाण्यात नीट डोकावून पाहिलं. पहिल्यांदाच त्याने स्वत:ला नीट निरखून पाहिलं. आजवर तो फक्त घाईघाईने पाणी प्यायचा. आजुबाजूला कुणी भयंकर प्राणी नाही ना, असं एकीकडे बघायचं आणि दुसरीकडे घाईघाईने घोट घ्यायचे. आज पहिल्यांदाच तो पाणी प्यायला नाही, तर स्वत:कडे बघायला आला होता. तो अजिबातच मृगासारखा नव्हता. मृगाच्या पायांत ताकद होती, भुरळ घालणारी झळाळती कांती होती आणि त्याहून सुंदर डोळे होते. त्याच्याकडे असं काहीच नव्हतं – किडमिडे पाय, उदासवाणा रंग आणि अगदी क्षुल्लक डोळे. तो वेगळा होता. तो अंतर्बाह्य कुणी दुसराच होता. कोण होता? माहीत नाही. पण तो मृग नक्कीच नव्हता. तो मृगाबरोबर, त्याच्या वेगाने धावणार नव्हता. ते त्याला जमणारच नव्हतं. त्याने मृगाचा निरोप घ्यायचं ठरवलं.

घाटदार वळण घेऊन एकीकडे नदी वाहत होती आणि बाजूला काही उंच तर काही डेरेदार वृक्षांची गर्द झाडी होती. आता पहिल्यांदाच तो एकट्याने प्रवास करत होता. ह्या झाडीतून पुढे टेकड्या, डोंगर लागणार होते. शांत वयस्क वृक्ष, त्यांना बिलगलेल्या लडिवाळ वेली, साचलेला पाचोळा, तांबडी माती असं सगळं बघत बघत, अंदाज घेत तो एकेक पाऊल पुढे टाकत होता. दूरवर लांबट हिरव्या पानांआडून त्याला गोड गाणं ऐकू येऊ लागलं. इतका गोडवा त्याने कधीच ऐकला नव्हता. त्याने पावसाचा नाद ऐकला होता, वाऱ्याचं संगीत अनुभवलं होतं. नदीची झुळझुळ, भुंग्यांची रुणझुण आणि पक्ष्यांची किलबिल ऐकली होती. पण हे काहीतरी वेगळंच होतं. तो आवाजाच्या दिशेने पुढे पुढे चालत गेला. आंब्याच्या फांदीवर बसून ती स्वच्छ मोकळ्या आवाजात कुहू-कुहू गात होती. झळाळता काळा कुळकुळीत रंग, गुंजेचे लाल डोळे. आंब्याच्या मोहोराचा घमघमाट पसरला होता. पानांच्या गर्दीत लपून असं स्वत:शीच मनापासून कोण गातं? बाहेर येऊन मिरवणं नाही, एवढा गोड गळा असून लक्ष वेधणं नाही... तो तिच्या प्रेमातच पडला. तिथेच गुंतून गेला.

इतक्या लवकर इतकी गाढ मैत्री कशी काय होते? हे सगळं होणारच होतं का, असंच? विधिलिखित? तो मागणी करत असे आणि ती त्याला गाऊन दाखवी. ती तल्लीन होऊन गात राहायची आणि तो भान हरपून ऐकत राही. किती सहजसुंदर ही देवाण-घेवाण, अगदी तिच्या गळ्यातल्या तानेसारखी! तिच्या गाण्यात त्याने किती काय काय जगून घेतलं – प्रेम तर होतंच, पण श्रद्धाही अनुभवली. सौंदर्य तर होतंच, पण शांतीही अनुभवली. आपण म्हणतो, ते ती गाते आणि ती गाते, ते हृदयाला भिडतं अशा स्वर्गीय आनंदात तो बुडून गेला.

आपण अख्खं आयुष्य एकत्र असायला हवं, असं त्याला वाटू लागलं. त्याने त्याचा मुक्काम गवताच्या कुरणांवरून झाडाच्या फांद्यांवर हलवावा आणि दोघांनी झाडा-पानांमधून मजल दरमजल करत त्या पर्वत शिखरांकडे प्रवास करत राहावा. पोहोचू किंवा नाही पोहोचणार. पण सोबत पुढे जावं. पण ती म्हणाली, की तिला पर्वत शिखरांकडे जाण्यात अजिबात रस नाही. मग त्याचीही तिकडे जाण्याची ओढ हळूहळू कमी होऊ लागली. शिखरांवर असं काय आहे? जे आहे, ते इथेच आहे. दूरवर पसरलेली हिरवी वनराई, मोहोराच्या घमघमाटाने भारून गेलेलं वातावरण आणि त्यात तिचं मंजुळ गाणं. हेच त्याच्या दुनियेतलं विश्व आहे. हे सगळं सुंदर आहे. हे असंच धरून ठेवावं, गोठवून ठेवावं.

तिला नुसतं ऐकतच राहावं असं त्याला वाटे. पण हळूहळू तो मनातल्या मनात तिच्याशी बोलू लागला, “गाणं तुझा श्वास आहे. पण मला गाता येत नाही. नाचावंसं वाटतं मला. तू नाचशील माझ्याबरोबर, गिरक्या घेत, बेभान होऊन? ढगांकडे बघत राहावंसं वाटतं. ढगांचे उत्कट रंग आणि गूढ आकार शेजारी बसून बघशील तू माझ्याबरोबर? पावसाचा एकेक थेंब पाण्यात पडून मोठं वलय होत असताना हरवशील माझ्याबरोबर नदीच्या काठी?”

त्याला तिच्याशी खूप काही बोलावंसं वाटे. त्याच्या गुहेबद्दल. तो तिथून बाहेर आला तो काळ. त्याचं वेडेपण, त्याचं भाबडेपण, भारावलेपण. तिला काय वाटेल त्याबद्दल? त्याला वाटतो तसा हळवेपणा वाटेल का? तिने भावूक व्हावं असं त्याचं म्हणणं नव्हतं. पण ती कोरड्या चेहऱ्याने नुसतं ऐकत राहील का? मग तर त्याला खूपच वाईट वाटेल तिला सांगितल्याबद्दल. तिच्या कोरडेपणाची भीती वाटे त्याला आणि मग मूकच होऊन जाई तो. त्याला असं नेहमीच मुरड घालत जगायला लागेल का? त्याला खरंच हवा होता का हा असा सहवास? जसा त्याला हवा होता, तसा सहवास तिचा नव्हता. जो तिचा होता, तो त्याच्या स्वप्नातला नव्हता. मग तरीही त्याला तिचा, तिचाच का हवा होता? कसली ओढ होती ही? हे असं न उलगडणारं कोडं पडलं की उगीचच त्यात काहीतरी दिव्यत्व, भव्यत्व त्याला जाणवू लागे आणि सुखावून जाई तो त्याच्याच मनाच्या भव्यतेने.

तिच्यामध्ये त्याला अगणित सुंदर गोष्टी दिसत. पण तिला दिसतं का त्याच्यात काही विशेष? त्याचा आवाज तर अगदीच भसाडा होता. पण दुसरं काही विशेष दिसतं का तिला? खरं तर, त्यालाच त्याच्यात काही विशेष वाटत नव्हतं. म्हणजे तो खरंच इतका नगण्य होता, की तो तिच्या नजरेने जग पाहत असल्याचा हा परिणाम होता? तिला कुठलं तरी नवं जग शोधायचं होतं. कुठे, ते तिने सांगितलं नव्हतं. तिच्या लाल डोळ्यांमधली गुपितं त्याला कधी वाचता आली नाहीत. आणि जरी त्याला समजला असता तिचा मार्ग, तरी त्याच्यामध्ये आता कुठली आस उरली नव्हती. त्यामुळे संपणारच होतं सगळं. ती म्हणाली, “प्रत्येक गोष्ट कधीतरी संपणारच.” त्याला कधीच इतका कोरडेपणा जमला नव्हता.

आधी तो दगडच झाला. मोठ्या वडाच्या सावलीत पारंब्या लपेटून गवतात तोंड खुपसून दिवसच्या दिवस नुसता लोळत राहिला. काही दिवसांनी त्याला वाटू लागलं, की “आठवणी तर आहेतच आपल्याकडे. जगायला आठवणी पुरेशा आहेत.”  मग तो उठला, भटकू लागला, जेवू-खाऊ लागला. पण सगळ्यात तिचं पार्श्वसंगीत असायचं. दरवेळी, दर ठिकाणी तिचा आवाज बरोबर असायचा आणि शेवटी आठवणी अंगावर ओढूनही झोप नाही लागायची. सुंदर आठवणी होत्या, तशा दुखऱ्याही होत्या. किंबहुना दुखऱ्याच जास्त होत्या. नकोच ती आवर्तनं. त्यापेक्षा स्वप्नं सुंदर असतात. एकदा डोळे मिटले, की आपल्याला हवं ते बघावं. खरं तर त्याला नीट काही जमतच नव्हतं.

एकदा असंच भटकताना त्याला म्हातारी वानर भेटली. म्हणाली, “इथे काय करतोस? जा, जाऊन डोंगर पादाक्रांत कर. उंच उंच शिखरांची स्वप्नं बघ.” त्याला आता शिखरं सर करायची उमेद उरली नव्हती आणि वेळही उलटून गेली होती. कोकिळेच्या भोवताली रमला नसता, तर आता डोंगरांजवळ असला असता. आता निघून काय साधणार होतं? आता इथेच काहीतरी करायला लागेल, कुणाची तरी साथ शोधता येईल. म्हातारीला काही हे रुचलं नाही. तरुण असताना तिला शुभ्र शिखरं खुणावत होती. पण वाटेत एक सवंगडी भेटला आणि ती ह्या वनातच थांबली. पाच मुलं झाली. तिच्या दुधावर तर वाढलीच. पण तिच्या आशा-आकांक्षाही त्यांनी पिऊन घेतल्या. त्यांच्यासाठी सगळं सोडलं. नंतर सगळी कृतघ्न निघाली. खंतावू नये, असा एकही नाही. कुटुंबातला आनंद म्हणजे मृगजळ वाटे तिला. त्यापेक्षा स्वप्नांच्या मागे धावली असती, उंच उंच गेली असती आणि अभिमानाने जगली असती. आजही ती सकाळी जेव्हा डोळे उघडते, तेव्हा पहिल्यांदा तिची नजर दूरवरच्या उंच शिखराकडे जाते. खोल गेलेल्या डोळ्यांमध्ये आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये हलकीशी चमक तरळून जाते. “अजूनही जमेल तुला. नक्की जमेल. शक्य तेवढं जात राहायचं रोज. थांबायचं नाही”, तिने त्याला समजावलं.

“खरंच जमेल मला?”, त्याने विचार केला. कुणी चांगलं काही सांगितलं, की विश्वास ठेवणं इतकं अवघड का बरं जातं? मृगाचं तुच्छ बोलणं लगेच खरं वाटायचं. तरी पण तो निघाला. पुढे चालू लागला. डोक्यातलं वादळ शांत ठेवायचं असेल तर चालत राहिलेलं बरं. जंगल तुडवता तुडवता त्याची शक्ती वाढू लागली होती. उत्साह वाटू लागला होता. तरी पण सलत असलेल्या काट्यासारखा एक प्रश्न मनातून जातच नव्हता, “मग ती का गायची माझ्यासाठी? मी सांगेन ते गाणं का बरं म्हणायची?” गुंता सुटत नव्हता. हा काट्याचा सल म्हणजे विचित्र आजार होता – ना धड बरा होणारा, ना जीवावर बेतणारा.

आता त्याला टेकड्या लागल्या होत्या. चालण्यात आनंद वाटत होता. चढण चढताना तो लांब लांब उड्या मारू लागला. हे एक नवीनच काही जमू लागलं, हवेत उडल्यासारखं! जंगल विरळ होऊ लागलं आणि गारवा वाढू लागला. खाली दऱ्या दिसू लागल्या. दिवसभराच्या प्रवासानंतर संध्याकाळी तो गवतफुलांच्या गालिच्यावर विसावत असे. दूरवरची हिमशिखरं सूर्यकिरणांत तेजस्वी अग्निकुंडासारखी दिसत. अशाच एका गूढ उजळवणाऱ्या संध्याकाळी त्याला अचानक चमकून गेलं, “मी करत असलेल्या कौतुकासाठी ती गात होती, माझ्यासाठी नाही. मला ती आवडते, हे तिला आवडलं होतं.” सगळं अगदी स्पष्ट झालं. गुंता सुटला होता. रात्रीच्या स्वच्छ निरभ्र आकाशात एकेक नक्षत्र उगवू लागलं आणि अवघा आसमंत उजळून गेला.

आता त्याला गती आली होती. अनामिक आनंद जाणवत होता. शुभ्र शिखरांची वाट स्पष्ट दिसत होती. तिथं पोहोचण्याची खात्री पटू लागली होती. आत्मविश्वास वाढत होता. तो जणू तरंगत चालला होता. मधल्याच एका डोंगराच्या वळणावर त्याला एक वेगळीच अनवट वाट दिसली. ही हिमशिखरांकडे नव्हती जात. एका वेगळ्याच दिशेला जाणारं वळण लागलं होतं त्याला. समोर उंच शिखरं दिसत होती. आवाक्यात आली होती. पण का कुणास ठाऊक त्याच्या मनाला ही वेगळीच वाट खुणावू लागली आणि अनावर ओढीने तो तिकडे वळला सुद्धा. त्याची द्विधा अवस्था झाली नाही. त्याला निर्णय घ्यावा लागला नाही. आशा-निराशा, आठवणी-स्वप्नं सगळी तिथेच टाकून त्याने नवी वाट धरली आणि तो पुढे पुढे जाऊ लागला. सोबतीला भणाणता वारा, निरामय  वातावरण आणि हिरवा सुगंध. सळसळत्या उत्साहात तो झपाटल्यासारखा झेपावत होता. कुठे ते माहीत नाही. प्रवासाच्या अंगभूत आनंदात पुढे पुढे जात होता. नि:शब्द प्रवास. डोक्यातले आवाज थांबले होते. स्वत:शीही बोलायची गरज उरली नव्हती. एकेक डोंगर सर झाले, कडे-कपारी मागे पडल्या.

ह्या प्रवासाला एक नाद आला होता, एक ताल आला होता. त्याला स्वत:ला एक छानसा डौल आला होता. छाती पुढे काढणारी सहज ऐट आली होती. तो आतून आतून फुलून येत होता. त्याला सर्वांगच नवीन जाणवत होतं. एके दिवशी त्याला पाण्याचा घुमणारा आश्वस्त आवाज ऐकू येऊ लागला. त्याने त्याच्या समोरचा डोंगर ओलांडला आणि  पाहिलं, तर पुढच्या डोंगरावरून शुभ्र धबधबा कोसळत होता. कडेकपारींतल्या जलधारा मनसोक्त उड्या मारून खालच्या निळ्या तळ्यात मिसळून जात होत्या. सगळीकडे तुषार उडत होते. तळ्यामध्ये डोंगरा-धबधब्याचं हलतं प्रतिबिंब दिसत होतं. त्याने तळ्याकडे डोळे भरून पाहिलं. त्या तळ्याची निळाई त्याला स्वत:मध्ये जाणवू लागली. त्याची कांती सुद्धा पाण्यासारखी चमचमत होती. तो आवेगाने खाली दरीतल्या तळ्याकडे झेपावला आणि उडतच खाली गेला. त्याने तळ्यात वाकून निरखून पाहिलं. झगमगत्या रंगांची मखमली कांती आणि डोक्यावर निळा राजेशाही तुरा! त्याला आनंदाचं उधाण आलं. त्याच्या अंगाअंगातून देखणा भव्य पिसारा फुलला आणि त्यातल्या शेकडो गर्द जांभळ्या डोळ्यांमधून त्याने स्वत:कडेच आश्चर्याने पाहिलं. मयूर होता तो, आलिशान, रूपसंपन्न मयूर. तो मृगासारखा धावणार नव्हता, कोकिळेसारखा गाणारही नव्हता. तो त्याच्या अलौकिक सौंदर्याच्या अंगभूत डौलाने बेभान नाचणार होता. अंगात भिनलेल्या लय-तालावर दृष्ट लागण्यासारखा पदन्यास करणार होता. स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी. सहजभाव म्हणून. चराचरातून त्याला संगीत ऐकू येऊ लागलं. त्याने नृत्य सुरू केलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा