रूपक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रूपक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

कथा - दुर्बीण

आज सरांचा मुख्याध्यापक म्हणून पहिला दिवस. ह्या दिवसाची ते कित्येक वर्षं आतुरतेने वाट पाहत होते. आधीचे मुख्याध्यापक कालच निवृत्त झाले. त्यांनी शाळेसाठी काहीच धड केलं नाही आणि सरांनी काही प्रयत्न केलेलाही त्यांना आवडायचा नाही. सरांनी आज शाळेचं नवं पर्व सुरू करायचा निश्चय केला होता. त्यांनी सगळ्या शाळेसमोर भाषण करून त्यांचं स्वप्न सांगितलं, “मुलांना नुसतं लिहायवाचायला आलं, गणितं करता आली म्हणजे शिक्षण होत नाही. आपल्याला त्यांना वेगवेगळे अनुभव द्यायचे आहेत. ह्याची सुरुवात म्हणून आपण आपल्या शाळेत एक मोठी दुर्बीण आणणार आहोत. विश्वाच्या अफाट पसाऱ्याची जाणीव मुलांना झाली पाहिजे. आकाशाशी त्यांचं नातं जडलं पाहिजे. आपल्या शाळेतून खगोलतज्ज्ञ निर्माण झाले पाहिजेत.” आपल्या शाळेत असं काही होऊ शकतं, असा कधी विचारही कुणी केला नव्हता. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. विज्ञानाच्या शिक्षकांना तर भरूनच आलं.

सरांनी विज्ञानाच्या शिक्षकांना बोलावून त्यांना योजना नीट समजावून सांगितली. सरांनी स्वत:च पुढाकार घेतला होता. पुढच्या आठवड्यात शहरातून दुर्बिणवाला माणूस सरांना भेटायला आला.  तो म्हणाला, “शाळेसाठी म्हणजे तुम्हांला डोब्सोनियनच चांगला राहील.” विज्ञानाच्या शिक्षकांना नक्की काही समजलं नाही. पण सर ‘हो’ म्हणाले म्हणून त्यांनीही मान डोलावली. मग पुढे तो म्हणाला, ह्यात आरसा असणार, न्यूटोनियन.” विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, “आणि भिंग?” दुर्बिणवाला म्हणाला, “नाही, ह्यात भिंग नसतं.” सर म्हणाले, “बरोबर! काय किंमत म्हणता?”

तरी तीस-पस्तीस हजारापर्यंत जाईल बघा आठ इंचाला.”

“आठ इंच?”

“आता शाळेला म्हणजे आठ इंचाचा तरी लागेलच की आरसा! आणि शहरातून आणून पोचवायचा खर्च वेगळा.”

“इथं वरती गच्चीवर लावून द्याल ना?”

“निरीक्षणाच्या वेळी फक्त वर न्यायची दुर्बीण. एरव्ही पावसापाण्यात खराब होणार, सर.”

“वरती नेऊन लावायची?”

“हो, तुम्हांला काय बघायचं तशी लावायची, जुळवून घ्यायची. आकाशाचा नकाशा वाचायचा आणि तशी लावायची. म्हणजे मग ग्रह, तारे बघता येतील.”

दुर्बिणवाल्याला “आमचं नक्की काय ठरेल ते कळवू” असं म्हणून सरांनी पाठवून दिलं. सर आणि विज्ञानशिक्षक विचारात पडले. एवढा खर्च करायचा आणि हा माणूस आठ इंचाचंच आणणार म्हणतो काहीतरी. सरांनी विज्ञानशिक्षकांना आकाशाच्या नकाशाबद्दल विचारलं, तर त्यांनी कधी पाहिलाही नव्हता तो. कसा वाचायचा आणि काय करायचं, हे कुणालाच माहिती नव्हतं.  एवढा खर्च करून आकाशातलं काय कसं बघायचं, हा प्रश्नच होता. नुसत्या शाळेतच नाही, तर अख्ख्या गावात बातमी पसरली होती, की इथे दुर्बीण बसणार, मुलांना आकाश निरीक्षणाची संधी मिळणार. उत्सुकता वाढली होती, अपेक्षा उंचावलेल्या होत्या. नव्या सरांबद्दल आदर पसरला होता. आता मागे सरकायला जागाच नव्हती.

सरांनी ठरवलं, की आता वेगळा विचार केला पाहिजे. आपल्याला नवनवीन सुचत राहिलं पाहिजे. शाळेच्या गच्चीवर एक अडगळीची मोठी खोली होती. सरांनी ती एकदम रिकामी आणि स्वच्छ करून घेतली. रविवारी सुट्टीच्या दिवशी चित्रकलेचे शिक्षक आणि विज्ञानशिक्षक असं दोघांनी मिळून सरांच्या मार्गदर्शनाखाली गच्चीवरच्या खोलीत मोठ्या कामगिरीला सुरुवात केली. विज्ञानाच्या पुस्तकातली ग्रह-ताऱ्यांची चित्रं बघायची आणि रात्री अंधारात चमकणाऱ्या रंगाने छतावर, भिंतीवर रंगवायची. दिवसा हा रंग पांढरटच दिसतो. त्यामुळे पांढऱ्या छतावर आणि भिंतीवर रंगवलेलं काही कुणाला कळायची शक्यता नव्हती. तीन वेगवेगळे चमकणारे रंग होते. अंधारात हिरवट दिसणारा एक, दुसरा गुलाबी-लालसर आणि तिसरा केशरी दिसणारा. गुरूला आणि शनीला केशरी घेतला, मंगळाला गुलाबीसर. आता शुक्राला हिरवट करावं का? पुस्तकात तर पांढरा होता. मग शुक्र रद्दच केला. हिरव्या रंगाचं काय करायचं? त्याचा छान शेपटीवाला धूमकेतू काढला. चंद्राच्या तर कला असतात. रोज वेगळा दिसतो. मग कुठला आकार काढायचा? सर म्हणाले, “चंद्र डोळ्याला दिसतच असतो चांगला. तो दुर्बिणीतून दाखवायची गरज नाही.”  थोडीफार नक्षत्रंही काढली. नक्षत्रांचे रंग काही कुठे पुस्तकात नव्हते. कुठलाही कुठेही देऊन रंग वापरून टाकले.

रंगकाम झाल्यावर एक सुतार बोलवून ह्या गच्चीवरच्या खोलीच्या दाराला गोल भोक पाडून घेतलं. चांगली हातभर लांबीची, दीड इंच व्यासाची नळी त्यात बसवून घेतली. भोकापेक्षा नळी लहान होती. नळीच्या बाजूला कड्या लावून ती भोकात अशी बसवली, की खाली-वर, उजवी-डावीकडे फिरवता येईल. सुताराला जास्तीचे पैसे दिले, जरा दमही भरला. शाळेची इथून पुढची सगळी दुरुस्तीची कामं त्यालाच मिळणार होती. त्यामुळे तसाही तो ह्याबद्दल कुठे काही बोलणार नव्हता. आता रोज रात्री थोड्या थोड्या मुलांना ग्रह-तारे दाखवायचं ठरलं. दिवसा गच्चीला कुलुप असणार होतं. त्यांची ही गावातली शाळा सातवीपर्यंतच होती. मोठी मुलं असती तर उगीच डोकेदुखी झाली असती.

मुलांना आकाश दाखवायची जबाबदारी विज्ञानाच्या शिक्षकांवर होती. पहिल्या रात्री त्यांच्या पोटात चांगलंच डचमळायला लागलं. सरांनी त्यांना धीर दिला. आत्मविश्वासाने पुढे जायला सांगितलं. आकाश बघायसाठी गच्चीवर पूर्ण अंधार केला होता. जिन्यातले दिवे पण बंद ठेवले होते. विज्ञानाचे शिक्षक वरती नळी धरून थांबले होते. चित्रकलेचे शिक्षक खालून एकावेळी दोन दोन मुलांना वर पाठवायचे. विज्ञानशिक्षक नळीतून दाखवायचे, “हा गुरू बघा. बाजूला त्याचे छोटे छोटे चंद्र.” मुलांचं बघून झालं, की ते नळीत बघून नळी शनीकडे फिरवायचे आणि पुन्हा मुलांना दाखवायचे, “कडी दिसली का शनीची?” मुलं पण भारावून गेली होती, धन्य झाली होती! अमावस्या होती. अंधार पांघरून सगळं सुरळीत पार पडलं.

पहिले दोन दिवस नीट पार पडल्यावर विज्ञानाच्या शिक्षकांच्या जिवात जीव आला. ते जरा मोकळेपणाने फिरू लागले. तिसऱ्या दिवशी मुलांना आकाश दाखवत असताना अचानक वारा सुटला. विजा चमकू लागल्या. ढग दाटून आले. नळीतून मंगळ बघताना एक आगाऊ कार्टं म्हणालं, “विजा चमकताना पण मंगळ छान दिसतोय की!” दुसरा म्हणाला, “आता भिजेल का हो दुर्बीण?” तसं विज्ञानशिक्षकाने एकेकाला खालीच हाकललं. “पाऊस येणारे. बास झालं आता”, म्हणून दटावलं.

दुसऱ्या दिवशी मुलांची आपापसांत चर्चा सुरू झाली.  कुणी म्हटलं, “दुर्बीण गच्चीवरच्या खोलीला लावली आहे.” कुणी म्हटलं, “खोलीला लावून आकाश दिसेल का?” अजून एक म्हणाला, “वीज चमकली, तेव्हा मी नक्की पाहिलं. खोलीच्या दाराला दुर्बीण लावलीय.” एक हुशार मुलगा म्हणाला, “ती नळी खोलीच्या छताला जोडलेली असणार. छताला भिंग बसवलंय.” मग गावातही ह्यावर चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी अफवा पसरल्या, की “सरांनी खोलीच्या आकाराची मोठीच्या मोठी दुर्बीण आणलीय.” काही म्हणाले, “आपल्या राज्यातली सगळ्यात मोठी दुर्बीण आपल्याच गावात आहे.” कुणी कुणी म्हणू लागले, की “पुढच्या महिन्यात चंद्रग्रहण आहे. दुर्बिणीतून बघायला पाहिजे.” काही पालक विचारू लागले, “आम्हांला मिळेल का दुर्बीण बघायला?” विज्ञानशिक्षकांना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत धडधडू लागलं. सारखा घाम फुटू लागला. सरांची देहबोलीच अशी असायची, की त्यांना कुणी काही विचारणार नव्हतं. एक प्रकारचा दरारा आणि आदर वाटायचा लोकांना. पण विज्ञानशिक्षकांकडे वेगवेगळे प्रश्न आणि चौकश्या येऊ लागल्या.  

शेवटी हिंमत करून विज्ञानशिक्षक मुख्याध्यापकांकडे गेले आणि आपली सगळी चिंता आणि परिस्थिती त्यांना सांगितली. सरांना नेहमी काही नवीन सुचत असे. त्यांनी ह्याच्यावर तोडगा काढायचं ठरवलं. गच्चीवरचं आकाशनिरीक्षण ताबडतोब थांबवलं आणि पुढच्याच आठवड्यात सर्व पालक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठा समारंभ ठेवला. गावातल्या मूर्तिकाराकडून तातडीने चांगली तीन फूट उंचीची देखणी मूर्ती तयार करून घेतली. ती सरांच्या कार्यालयाबाहेरच्या चार फुटाच्या कठड्यावर ठेवली. त्यामुळे अनावरण झाल्यावर सात फुटासारखा परिणाम साधणार होता. मूर्तीच्या मागच्या भिंतीवर मोठमोठे रंगीबेरंगी माहितीपूर्ण तक्ते लावून घेतले. समारंभाच्या दिवशी सगळ्या पालक-शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सरांनी मूर्तीवरचं कापड काढून त्या सुंदर मूर्तीचं अनावरण केलं, मूर्तीला हार घातला आणि भाषण सुरू केलं, “ही मूर्ती पाहिलीत? हे आर्यभट्ट आहेत. थोर गणिती आणि खगोलशास्त्राचे प्रणेते. १५०० वर्षांपूर्वी त्यांनी खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहिला. त्यांना त्या काळी पृथ्वी गोल असल्याचं समजलं होतं. त्यांनी पृथ्वीला कदंबाच्या फुलासारखी म्हटलं होतं!” मुलं आणि पालक थक्क झाले! इतक्या थोर शास्त्रज्ञाबद्दल त्यांना आधी काहीच माहिती नव्हती. सर म्हणाले, “ह्या मूर्तीमागे तुम्हांला पुष्कळ तक्ते बघायला मिळतील. ती चित्रं बघा, माहिती वाचा आणि समजून घ्या. नुसते ग्रह-तारेच नाही तर आकाशगंगा, कृष्णविवर असं सगळं शिका. आपली दुर्बीण परवाच्या वादळी पावसामुळे बिघडली आहे. पण काही हरकत नाही. त्यामुळे आपलं शिक्षण थांबत नसतं. वाचनालयात पुस्तकं आहेत. शाळेत उत्तम शिक्षक आहेत. आपल्याला आर्यभट्टाचा समृद्ध वारसा पुढे चालवायचा आहे. आपल्यामध्येही त्याचा अंश आहे.” टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. सरांचे शब्द ऐकून मुलांचं दुरापास्त वाटणारं उज्ज्वल भविष्य डोळ्यांसमोर आवाक्यात दिसू लागलं, दुर्बिणीतून पाहिल्यासारखं.

  

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

कथा - प्रवास


त्याने डोळे उघडले आणि काळ्या मिट्ट अंधारात आजुबाजूला बघायचा प्रयत्न केला. हळूहळू अंधुकसं दिसू लागलं. कुठली तरी गुहा होती, अरुंद, लहान. तिला थोडीशी फट. नुसते आल्यासारखे आत डोकावणारे प्रकाशाचे तुरळक कण. तो कुठून आला होता? इथे कसा आला? कोण आहे? माहीत नाही. त्याला कशाचंच स्मरण नव्हतं. आत खूप अडचण होत होती, कुणीतरी त्याला आत कोंबल्यासारखं वाटत होतं. अंगात फारशी ताकद नव्हती. पण बाहेर तर पडावं लागणारच होतं. सर्व शक्तीनिशी त्याने जोर लावला. रेटा देत राहिला आणि फट मोठीमोठी होत शेवटी भिंतीला भगदाड पडलं! तो बाहेर आला, उजेडात. पहिल्यांदाच. लख्ख प्रकाशात त्याचे डोळे दीपून गेले. मान खाली करत त्याने डोळे किलकिले केले आणि हळूहळू डोळे उघडताना पहिल्यांदा दिसला तो पायाखालच्या मातीचा तांबूस दिमाखदार रंग आणि थोडी पुढे नजर गेली तशी त्या मातीवर डोलणारी गवताची पोपटी पाती दिसू लागली. लांबच लांब पसरलेल्या त्या पोपटी लुसलुशीत गालिचांवर कुठे नाजुक पिवळी आणि कुठे नाजुक पांढरी नक्षी. त्यापुढे थोडी बसकी झुडुपं, थोडे दणकट खडक, थोडे अस्ताव्यस्त ओंडके. नंतर गर्द झाडी, तिच्या उदरात एक छोटं जग सांभाळणारी आणि त्यानंतर दूर दूरपर्यंत टेकड्या, डोंगर आणि पर्वताच्या रांगा. त्या शिखरांवर पांघरलेलं तलम केशरी आकाश, हळूहळू पिवळं-पांढरं होत होत अथांग निळाई झालेलं. पाहता क्षणी तो प्रेमात पडला. गवताच्या कुरणातून चालत चालत तो पुढे गेला, त्या गवतपात्यांच्या इवल्या इवल्या कणसांमधून, मंद ओल्या सुगंधामधून. तेवढ्यात त्याला एका झुडुपाआड हालचाल जाणवली.

काळेभोर टपोरे डोळे त्याच्याकडे निरखून पाहत होते. तो थबकला, त्या सोनेरी कांतीकडे त्याने विश्वासाने पाहिलं आणि लगेच त्यांची मैत्री झाली. तो ह्या जगात अगदीच नवखा आणि मृगाला मात्र खडान् खडा माहिती होती. इथून पुढे तो ह्या मृगाचं बोट धरून चालणार होता. मृगाने सांगितलं, की खायला कुठे मिळतं, नदीचं थंडगार पाणी कुठल्या ठिकाणी जाऊन प्यायचं, कुठल्या ऋतूत काय करायचं, हिंस्त्र प्राणी कुठले, कुठे त्यांचं भय असतं, कुठे सुरक्षित असतं. प्रत्येक परिस्थितीत तगून राहायला शिकवलं त्याने. मृग वेगवेगळे धडे देत राहिला.
“इथे प्रत्येकजण आपलं बघतो, आपणही तेच करायचं. बाकी जगाचा फार विचार करायचा नाही. आपण आहोत, तर जग आहे.”

“समोर येईल त्याला वाचता आलं पाहिजे, जोखता आलं पाहिजे. तो का आलाय? त्याला काय हवंय?”

त्याला माहीत नव्हतं, की आपण खाण्या-पिण्या, खेळण्या-झोपण्याखेरीज अजून काय करायचं असतं! इथे कशासाठी आलोय आपण? मृगाने सांगितलं, की ह्या टेकड्या ओलांडून खूप पुढे जायचं, मग मोठे डोंगर लागतात. तेही ओलांडून पुढे पर्वतरांग लागते. त्यात वर-वर चढत राहायचं. कठीण वाटांवरून चालत राहायचं. मग एक अत्युच्च शिखर आहे, पांढरं शुभ्र, हिमाच्छादित. सगळ्यात वरचं ठिकाण. असं उंचावर, की हात वर केल्यावर स्वर्गच लागेल हाताला. सगळ्यात सुंदर. तिथली हवा निराळी, प्रकाश वेगळा. वरून खालचं सगळं जग एकदम एका नजरेत दिसतं, छोटं छोटं झालेलं. छोट्या छोट्या टेकड्या, टिकलीसारख्या वनराया, नदी-नाल्यांच्या चमचमत्या रेघा- सगळं रोमांचकारी! ताऱ्यांमध्ये राहायला गेल्यासारखं वाटतं. तिथे आजवर जे झपाटलेले सगळे पोहोचले, त्यांच्यासारखं आपण व्हायचं. त्या सगळ्या विलक्षण जगाचा भाग व्हायचं!

मृगाने सांगितलं, की ह्यात साहस आहे, आव्हान आहे, भारावलेपण आहे आणि तो त्याच्याबरोबर प्रवासाला निघाला. उत्साहाला उधाण आलं. एक अनामिक हुरहूर जाणवू लागली. पण जमेल का हे आपल्याला? मृग म्हणाला, “जमेल म्हटलं तरच जमतं. आपल्याला जमणार आहे. आपण शिखारासाठीच आहोत. आपण स्वत:ला ताणायचं आणि आपल्या क्षमता वापरायच्या. चल माझ्याबरोबर.” त्यांनी वाटचाल सुरू केली. हिरव्या-निळ्या, लाल-सोनेरी रंगांनी नटलेल्या डोंगर-दऱ्या, गगनचुंबी शिखरं - सगळी कल्पनाच इतकी सुंदर वाटत होती, तर प्रत्यक्षात किती भव्य असेल! त्यांनी कुरणं पार केली आणि वनरायांच्या दिशेने ते चालू लागले. बाजूने नदी होती. मृग पुढे धावत होता आणि तो सारखा मागे पडत होता. “अशाने आपण इथेच अडकून राहू. वाऱ्यासारखं जाता आलं पाहिजे”, मृग सांगू लागला. मृगाची चिडचिड आणि त्याची दमछाक होत होती. त्याची फरफट सुरू झाली. “तुला काही झेपेल, असं वाटत नाही”, मृग तुच्छतेने म्हणाला. अधूनमधून शिंगं उगारू लागला. पावलागणिक त्याचा उत्साह आटू लागला.

एका रात्री तो दमून-भागून झोपी गेला. अंग ठसठसत होतं. डोळा कधी लागला तेही कळलं नाही. रात्रीच्या गार वाऱ्यात त्याने अंग आक्रसून घेतलं होतं. पहाटेच्या सोनेरी किरणांनी त्याला हलकंच कुरवाळलं, तसं त्याने डोळे उघडले आणि पहिला विचार त्याच्या डोक्यात आला, “मला का नाही जमत मृग सांगतो ते?” जवळच झुळूझुळू वाहणारी नदी होती. मऊ ओलसर गवतातून चालत तो नदीकाठी गेला आणि त्याने पाण्यात नीट डोकावून पाहिलं. पहिल्यांदाच त्याने स्वत:ला नीट निरखून पाहिलं. आजवर तो फक्त घाईघाईने पाणी प्यायचा. आजुबाजूला कुणी भयंकर प्राणी नाही ना, असं एकीकडे बघायचं आणि दुसरीकडे घाईघाईने घोट घ्यायचे. आज पहिल्यांदाच तो पाणी प्यायला नाही, तर स्वत:कडे बघायला आला होता. तो अजिबातच मृगासारखा नव्हता. मृगाच्या पायांत ताकद होती, भुरळ घालणारी झळाळती कांती होती आणि त्याहून सुंदर डोळे होते. त्याच्याकडे असं काहीच नव्हतं – किडमिडे पाय, उदासवाणा रंग आणि अगदी क्षुल्लक डोळे. तो वेगळा होता. तो अंतर्बाह्य कुणी दुसराच होता. कोण होता? माहीत नाही. पण तो मृग नक्कीच नव्हता. तो मृगाबरोबर, त्याच्या वेगाने धावणार नव्हता. ते त्याला जमणारच नव्हतं. त्याने मृगाचा निरोप घ्यायचं ठरवलं.

घाटदार वळण घेऊन एकीकडे नदी वाहत होती आणि बाजूला काही उंच तर काही डेरेदार वृक्षांची गर्द झाडी होती. आता पहिल्यांदाच तो एकट्याने प्रवास करत होता. ह्या झाडीतून पुढे टेकड्या, डोंगर लागणार होते. शांत वयस्क वृक्ष, त्यांना बिलगलेल्या लडिवाळ वेली, साचलेला पाचोळा, तांबडी माती असं सगळं बघत बघत, अंदाज घेत तो एकेक पाऊल पुढे टाकत होता. दूरवर लांबट हिरव्या पानांआडून त्याला गोड गाणं ऐकू येऊ लागलं. इतका गोडवा त्याने कधीच ऐकला नव्हता. त्याने पावसाचा नाद ऐकला होता, वाऱ्याचं संगीत अनुभवलं होतं. नदीची झुळझुळ, भुंग्यांची रुणझुण आणि पक्ष्यांची किलबिल ऐकली होती. पण हे काहीतरी वेगळंच होतं. तो आवाजाच्या दिशेने पुढे पुढे चालत गेला. आंब्याच्या फांदीवर बसून ती स्वच्छ मोकळ्या आवाजात कुहू-कुहू गात होती. झळाळता काळा कुळकुळीत रंग, गुंजेचे लाल डोळे. आंब्याच्या मोहोराचा घमघमाट पसरला होता. पानांच्या गर्दीत लपून असं स्वत:शीच मनापासून कोण गातं? बाहेर येऊन मिरवणं नाही, एवढा गोड गळा असून लक्ष वेधणं नाही... तो तिच्या प्रेमातच पडला. तिथेच गुंतून गेला.

इतक्या लवकर इतकी गाढ मैत्री कशी काय होते? हे सगळं होणारच होतं का, असंच? विधिलिखित? तो मागणी करत असे आणि ती त्याला गाऊन दाखवी. ती तल्लीन होऊन गात राहायची आणि तो भान हरपून ऐकत राही. किती सहजसुंदर ही देवाण-घेवाण, अगदी तिच्या गळ्यातल्या तानेसारखी! तिच्या गाण्यात त्याने किती काय काय जगून घेतलं – प्रेम तर होतंच, पण श्रद्धाही अनुभवली. सौंदर्य तर होतंच, पण शांतीही अनुभवली. आपण म्हणतो, ते ती गाते आणि ती गाते, ते हृदयाला भिडतं अशा स्वर्गीय आनंदात तो बुडून गेला.

आपण अख्खं आयुष्य एकत्र असायला हवं, असं त्याला वाटू लागलं. त्याने त्याचा मुक्काम गवताच्या कुरणांवरून झाडाच्या फांद्यांवर हलवावा आणि दोघांनी झाडा-पानांमधून मजल दरमजल करत त्या पर्वत शिखरांकडे प्रवास करत राहावा. पोहोचू किंवा नाही पोहोचणार. पण सोबत पुढे जावं. पण ती म्हणाली, की तिला पर्वत शिखरांकडे जाण्यात अजिबात रस नाही. मग त्याचीही तिकडे जाण्याची ओढ हळूहळू कमी होऊ लागली. शिखरांवर असं काय आहे? जे आहे, ते इथेच आहे. दूरवर पसरलेली हिरवी वनराई, मोहोराच्या घमघमाटाने भारून गेलेलं वातावरण आणि त्यात तिचं मंजुळ गाणं. हेच त्याच्या दुनियेतलं विश्व आहे. हे सगळं सुंदर आहे. हे असंच धरून ठेवावं, गोठवून ठेवावं.

तिला नुसतं ऐकतच राहावं असं त्याला वाटे. पण हळूहळू तो मनातल्या मनात तिच्याशी बोलू लागला, “गाणं तुझा श्वास आहे. पण मला गाता येत नाही. नाचावंसं वाटतं मला. तू नाचशील माझ्याबरोबर, गिरक्या घेत, बेभान होऊन? ढगांकडे बघत राहावंसं वाटतं. ढगांचे उत्कट रंग आणि गूढ आकार शेजारी बसून बघशील तू माझ्याबरोबर? पावसाचा एकेक थेंब पाण्यात पडून मोठं वलय होत असताना हरवशील माझ्याबरोबर नदीच्या काठी?”

त्याला तिच्याशी खूप काही बोलावंसं वाटे. त्याच्या गुहेबद्दल. तो तिथून बाहेर आला तो काळ. त्याचं वेडेपण, त्याचं भाबडेपण, भारावलेपण. तिला काय वाटेल त्याबद्दल? त्याला वाटतो तसा हळवेपणा वाटेल का? तिने भावूक व्हावं असं त्याचं म्हणणं नव्हतं. पण ती कोरड्या चेहऱ्याने नुसतं ऐकत राहील का? मग तर त्याला खूपच वाईट वाटेल तिला सांगितल्याबद्दल. तिच्या कोरडेपणाची भीती वाटे त्याला आणि मग मूकच होऊन जाई तो. त्याला असं नेहमीच मुरड घालत जगायला लागेल का? त्याला खरंच हवा होता का हा असा सहवास? जसा त्याला हवा होता, तसा सहवास तिचा नव्हता. जो तिचा होता, तो त्याच्या स्वप्नातला नव्हता. मग तरीही त्याला तिचा, तिचाच का हवा होता? कसली ओढ होती ही? हे असं न उलगडणारं कोडं पडलं की उगीचच त्यात काहीतरी दिव्यत्व, भव्यत्व त्याला जाणवू लागे आणि सुखावून जाई तो त्याच्याच मनाच्या भव्यतेने.

तिच्यामध्ये त्याला अगणित सुंदर गोष्टी दिसत. पण तिला दिसतं का त्याच्यात काही विशेष? त्याचा आवाज तर अगदीच भसाडा होता. पण दुसरं काही विशेष दिसतं का तिला? खरं तर, त्यालाच त्याच्यात काही विशेष वाटत नव्हतं. म्हणजे तो खरंच इतका नगण्य होता, की तो तिच्या नजरेने जग पाहत असल्याचा हा परिणाम होता? तिला कुठलं तरी नवं जग शोधायचं होतं. कुठे, ते तिने सांगितलं नव्हतं. तिच्या लाल डोळ्यांमधली गुपितं त्याला कधी वाचता आली नाहीत. आणि जरी त्याला समजला असता तिचा मार्ग, तरी त्याच्यामध्ये आता कुठली आस उरली नव्हती. त्यामुळे संपणारच होतं सगळं. ती म्हणाली, “प्रत्येक गोष्ट कधीतरी संपणारच.” त्याला कधीच इतका कोरडेपणा जमला नव्हता.

आधी तो दगडच झाला. मोठ्या वडाच्या सावलीत पारंब्या लपेटून गवतात तोंड खुपसून दिवसच्या दिवस नुसता लोळत राहिला. काही दिवसांनी त्याला वाटू लागलं, की “आठवणी तर आहेतच आपल्याकडे. जगायला आठवणी पुरेशा आहेत.”  मग तो उठला, भटकू लागला, जेवू-खाऊ लागला. पण सगळ्यात तिचं पार्श्वसंगीत असायचं. दरवेळी, दर ठिकाणी तिचा आवाज बरोबर असायचा आणि शेवटी आठवणी अंगावर ओढूनही झोप नाही लागायची. सुंदर आठवणी होत्या, तशा दुखऱ्याही होत्या. किंबहुना दुखऱ्याच जास्त होत्या. नकोच ती आवर्तनं. त्यापेक्षा स्वप्नं सुंदर असतात. एकदा डोळे मिटले, की आपल्याला हवं ते बघावं. खरं तर त्याला नीट काही जमतच नव्हतं.

एकदा असंच भटकताना त्याला म्हातारी वानर भेटली. म्हणाली, “इथे काय करतोस? जा, जाऊन डोंगर पादाक्रांत कर. उंच उंच शिखरांची स्वप्नं बघ.” त्याला आता शिखरं सर करायची उमेद उरली नव्हती आणि वेळही उलटून गेली होती. कोकिळेच्या भोवताली रमला नसता, तर आता डोंगरांजवळ असला असता. आता निघून काय साधणार होतं? आता इथेच काहीतरी करायला लागेल, कुणाची तरी साथ शोधता येईल. म्हातारीला काही हे रुचलं नाही. तरुण असताना तिला शुभ्र शिखरं खुणावत होती. पण वाटेत एक सवंगडी भेटला आणि ती ह्या वनातच थांबली. पाच मुलं झाली. तिच्या दुधावर तर वाढलीच. पण तिच्या आशा-आकांक्षाही त्यांनी पिऊन घेतल्या. त्यांच्यासाठी सगळं सोडलं. नंतर सगळी कृतघ्न निघाली. खंतावू नये, असा एकही नाही. कुटुंबातला आनंद म्हणजे मृगजळ वाटे तिला. त्यापेक्षा स्वप्नांच्या मागे धावली असती, उंच उंच गेली असती आणि अभिमानाने जगली असती. आजही ती सकाळी जेव्हा डोळे उघडते, तेव्हा पहिल्यांदा तिची नजर दूरवरच्या उंच शिखराकडे जाते. खोल गेलेल्या डोळ्यांमध्ये आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये हलकीशी चमक तरळून जाते. “अजूनही जमेल तुला. नक्की जमेल. शक्य तेवढं जात राहायचं रोज. थांबायचं नाही”, तिने त्याला समजावलं.

“खरंच जमेल मला?”, त्याने विचार केला. कुणी चांगलं काही सांगितलं, की विश्वास ठेवणं इतकं अवघड का बरं जातं? मृगाचं तुच्छ बोलणं लगेच खरं वाटायचं. तरी पण तो निघाला. पुढे चालू लागला. डोक्यातलं वादळ शांत ठेवायचं असेल तर चालत राहिलेलं बरं. जंगल तुडवता तुडवता त्याची शक्ती वाढू लागली होती. उत्साह वाटू लागला होता. तरी पण सलत असलेल्या काट्यासारखा एक प्रश्न मनातून जातच नव्हता, “मग ती का गायची माझ्यासाठी? मी सांगेन ते गाणं का बरं म्हणायची?” गुंता सुटत नव्हता. हा काट्याचा सल म्हणजे विचित्र आजार होता – ना धड बरा होणारा, ना जीवावर बेतणारा.

आता त्याला टेकड्या लागल्या होत्या. चालण्यात आनंद वाटत होता. चढण चढताना तो लांब लांब उड्या मारू लागला. हे एक नवीनच काही जमू लागलं, हवेत उडल्यासारखं! जंगल विरळ होऊ लागलं आणि गारवा वाढू लागला. खाली दऱ्या दिसू लागल्या. दिवसभराच्या प्रवासानंतर संध्याकाळी तो गवतफुलांच्या गालिच्यावर विसावत असे. दूरवरची हिमशिखरं सूर्यकिरणांत तेजस्वी अग्निकुंडासारखी दिसत. अशाच एका गूढ उजळवणाऱ्या संध्याकाळी त्याला अचानक चमकून गेलं, “मी करत असलेल्या कौतुकासाठी ती गात होती, माझ्यासाठी नाही. मला ती आवडते, हे तिला आवडलं होतं.” सगळं अगदी स्पष्ट झालं. गुंता सुटला होता. रात्रीच्या स्वच्छ निरभ्र आकाशात एकेक नक्षत्र उगवू लागलं आणि अवघा आसमंत उजळून गेला.

आता त्याला गती आली होती. अनामिक आनंद जाणवत होता. शुभ्र शिखरांची वाट स्पष्ट दिसत होती. तिथं पोहोचण्याची खात्री पटू लागली होती. आत्मविश्वास वाढत होता. तो जणू तरंगत चालला होता. मधल्याच एका डोंगराच्या वळणावर त्याला एक वेगळीच अनवट वाट दिसली. ही हिमशिखरांकडे नव्हती जात. एका वेगळ्याच दिशेला जाणारं वळण लागलं होतं त्याला. समोर उंच शिखरं दिसत होती. आवाक्यात आली होती. पण का कुणास ठाऊक त्याच्या मनाला ही वेगळीच वाट खुणावू लागली आणि अनावर ओढीने तो तिकडे वळला सुद्धा. त्याची द्विधा अवस्था झाली नाही. त्याला निर्णय घ्यावा लागला नाही. आशा-निराशा, आठवणी-स्वप्नं सगळी तिथेच टाकून त्याने नवी वाट धरली आणि तो पुढे पुढे जाऊ लागला. सोबतीला भणाणता वारा, निरामय  वातावरण आणि हिरवा सुगंध. सळसळत्या उत्साहात तो झपाटल्यासारखा झेपावत होता. कुठे ते माहीत नाही. प्रवासाच्या अंगभूत आनंदात पुढे पुढे जात होता. नि:शब्द प्रवास. डोक्यातले आवाज थांबले होते. स्वत:शीही बोलायची गरज उरली नव्हती. एकेक डोंगर सर झाले, कडे-कपारी मागे पडल्या.

ह्या प्रवासाला एक नाद आला होता, एक ताल आला होता. त्याला स्वत:ला एक छानसा डौल आला होता. छाती पुढे काढणारी सहज ऐट आली होती. तो आतून आतून फुलून येत होता. त्याला सर्वांगच नवीन जाणवत होतं. एके दिवशी त्याला पाण्याचा घुमणारा आश्वस्त आवाज ऐकू येऊ लागला. त्याने त्याच्या समोरचा डोंगर ओलांडला आणि  पाहिलं, तर पुढच्या डोंगरावरून शुभ्र धबधबा कोसळत होता. कडेकपारींतल्या जलधारा मनसोक्त उड्या मारून खालच्या निळ्या तळ्यात मिसळून जात होत्या. सगळीकडे तुषार उडत होते. तळ्यामध्ये डोंगरा-धबधब्याचं हलतं प्रतिबिंब दिसत होतं. त्याने तळ्याकडे डोळे भरून पाहिलं. त्या तळ्याची निळाई त्याला स्वत:मध्ये जाणवू लागली. त्याची कांती सुद्धा पाण्यासारखी चमचमत होती. तो आवेगाने खाली दरीतल्या तळ्याकडे झेपावला आणि उडतच खाली गेला. त्याने तळ्यात वाकून निरखून पाहिलं. झगमगत्या रंगांची मखमली कांती आणि डोक्यावर निळा राजेशाही तुरा! त्याला आनंदाचं उधाण आलं. त्याच्या अंगाअंगातून देखणा भव्य पिसारा फुलला आणि त्यातल्या शेकडो गर्द जांभळ्या डोळ्यांमधून त्याने स्वत:कडेच आश्चर्याने पाहिलं. मयूर होता तो, आलिशान, रूपसंपन्न मयूर. तो मृगासारखा धावणार नव्हता, कोकिळेसारखा गाणारही नव्हता. तो त्याच्या अलौकिक सौंदर्याच्या अंगभूत डौलाने बेभान नाचणार होता. अंगात भिनलेल्या लय-तालावर दृष्ट लागण्यासारखा पदन्यास करणार होता. स्वत:साठी, स्वत:च्या आनंदासाठी. सहजभाव म्हणून. चराचरातून त्याला संगीत ऐकू येऊ लागलं. त्याने नृत्य सुरू केलं.

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

कथा - निवड


                                              
तांबडं फुटण्यापूर्वीच कालिंदीला आपोआप जाग आली. कोंबडा अजून आरवला नव्हता. एकदम नवीन गोष्टीला सामोरं जायचं म्हणून अस्वस्थ वाटत होतं. दिवसभर अंग मोडून काम केलं असलं तरी रात्री शांत झोप झाली नव्हती. ती उठून आवराआवर करू लागली, तर आजी पण जाग्या झाल्या. म्हणाल्या, “एवढी चिंता नकोस करू. होईल सगळं नीट. मी काही आयुष्यभर पुरणार नाही. एवढी मोठी जमीन आणि दोन लहान मुलं, सहा आणि आठ वर्षांची. कुणाची तरी सोबत लागणारच आहे.” तीच तर चिंता होती तिला. इच्छुक माणूस शेतीच्या लोभाने तर येणार नाही ना? “अगं शेतीतल्या उत्पन्नाची अपेक्षा तर असणारच. कमाई कुणाला नको असते? बाकी चांगला आहे का ते बघायचं.”

बाहेरून दिसणार नाही असं दरवाज्याच्या बऱ्याच आत उभं राहून ती शेतातल्या काळ्या मातीतली घराकडे येणारी सरळ पायवाट न्याहाळत होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात उंच शिडशिडीत तो घराकडे येताना दिसला, खांद्यावर आणि हातात सहजतेनं सामान घेऊन चालणारा. जवळ आला, तसा तिला त्याचा गोरा, नाकेला, बारीक डोळ्यांचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. चेहऱ्यावर आशा आणि चौकस भाव तरळत होते. कालिंदी स्वागताला दरवाज्यावर आली. तिच्या सुबक, सावळ्या, टपोऱ्या डोळ्यांच्या मूर्तीकडे पाहून त्याने मंद स्मित केलं आणि म्हणाला, “मी श्रीरंग.”

शेतातच घरापासून थोड्या अंतरावरच्या दोन कौलारू खोल्यांमध्ये श्रीरंगची सोय केली होती. येते दोन महिने तरी तो तिथेच राहणार होता. ह्या प्रांतातल्या प्रथेनुसार विवाह ठरवण्यापूर्वी स्त्री किंवा पुरुष दुसऱ्याच्या शेतावर काही महिने जाऊन राहत असत. कामाची पद्धत, स्वभाव आणि वागणं पटल्यास विवाह होत असे. आयुष्यात पुन्हा एकदा लग्नाचा विचार करावा लागेल, असं कधी चुकूनही कालिंदीला वाटलं नव्हतं आणि आता ह्या टप्प्यावर तिच्या योग्य आणि लग्नासाठी इच्छुक असे पंचक्रोशीत दोनच पुरुष उरले होते. पंचायतीत ठरल्यानुसार पहिल्यांदा श्रीरंग आला.
तिने त्याची मुलांशी-आजींशी ओळख करून दिली. पण नव्या माणसाशी लगेच मैत्री होणार नव्हती, एक प्रकारचं अवघडलेपण जाणवत होतं. उन्हाळा अजून संपायचं नाव घेत नव्हता. पावसापूर्वी कालिंदीने जमेल तेवढी जमीन नांगरली होती. पण सगळ्या जमिनीचं काम करणं तिच्या आवाक्याबाहेरचं होतं. श्रीरंगने चार-आठ दिवसांत धडाधड सगळी जमीन नांगरून काढली. आंतरपीक पद्धतीबद्दल त्याला बरीच माहिती होती. कुठे बाजरी-तूर लावायची आणि कुठे डाळिंब-मिरची घ्यायची ते त्याला बरोबर माहीत होतं. बियाणांची नीट पारख होती. तिला नवऱ्याची आठवण आली. ह्या जमिनीवर किती जीव होता त्याचा! त्याच जमिनीवर आता हा राबतोय, घाम गाळतोय. तिच्या डोळ्यांत कौतुक दाटून आलं. आभाळात ढग जमू लागले होते. पावसाची चाहूल लागली होती. दोघांनी मिळून पेरणी सुरू केली.

श्रीरंगला फक्त शेतीतलीच माहिती होती असं नाही. तो बरेच प्रांत फिरला होता. वेगवेगळे लोक, त्यांच्या चालीरीती, तिथल्या आठवणी असा मोठा खजिना होता त्याच्याकडे. रेशमी वाऱ्याबरोबर त्याच्या गप्पा वाहत असत आणि कालिंदी, मुलं त्यात हरवून जात. आता रोज पावसाच्या सरी बरसू लागल्या होत्या. ओल्या मातीचा पदर बाजूला सारत कोवळे अंकुर बाहेर डोकावू लागले होते. सगळं शेत जिवंत वाटू लागलं होतं. अशा हिरवाईला पाहिलं, की पुन्हा एकदा स्वप्नांचा हात धरावासा वाटू लागे.

एका केशरी संध्याकाळी कालिंदी वाढत्या शेतातून चालत होती. दोन्ही बाजूंना मिरच्यांची पांढरी फुलं खाली वाकून स्वत:मध्येच हरवली होती. ढगामागून हलकाच चंद्र बाहेर येत होता आणि संध्याकाळचा गार वारा ती श्वासांत भरून घेत होती. तेवढ्यात तिला लांब बांधापाशी कुणाचा तरी हसण्या-खिदळण्याचा आवाज आला. ती पुढे चालत गेली. श्रीरंगबरोबर शेजाऱचा सात वर्षांचा मुलगा चेंडू खेळत होता. तिच्या शेतात, तिच्या नवऱ्याच्या शेतात! अचानक मस्तकात वेदनेच्या ठिणग्या उडू लागल्या. शक्य तितक्या शांतपणे तिने श्रीरंगला खेळ सोडून परत बोलावलं. अंधुक प्रकाशात तो हसतमुखाने तिच्याकडे चालत येत होता. त्याच्याकडे बघत बघत ती स्वत:ला समजावत होती, “त्याला माहीत नसेल बहुतेक.” “आणि शेवटी ते लहान मूल आहे.” तरी पण तिची कानशिलं तापली होती, घसा कोरडा पडला होता आणि डोळ्यांतून कडथ धारा लागल्या होत्या. शरीर काहीही ऐकण्याच्या स्थितीत उरलं नव्हतं.

शेजारच्या कुटुंबाचा कायमच त्यांच्या जमिनीवर डोळा होता. तिच्या सासऱ्यांनी म्हणे पूर्वी अर्धा एकर जमीन शेजाऱ्याच्या घशात जाऊ दिली होती, उगीच रोजची कटकट नको म्हणून. पण अशा लोकांपुढे कितीही तुकडे टाकले, तरी ते शांत होत नाहीत. उलट अजून शिरजोर होतात. नंतरच्या पिढीने अजूनच हातपाय पसरायला सुरू केले आणि जमिनीत घुसू लागले. कालिंदीच्या नवऱ्याने विरोध केला तर शेजारचा गुंड मारामारीवर उतरला. लोखंडी सळईने डोक्यावर असा भयानक वार केला, की त्याने तिच्या नवऱ्याचे प्राणच घेतले. तो गुंड गेला तुरुंगात. पण तिच्या काळजावर कायमची भेग पडली. त्या गुंडाचा मुलगाच तिथे चेंडू खेळत होता. श्रीरंगला सगळं माहीत होतं म्हणे. तरीसुद्धा? आता मात्र वर्मी घाव बसला तिच्या.

श्रीरंगच्या नाकावर त्याची बुद्धिमत्ता विराजमान झाली होती. “निरागस लहान मूल ते. आलं ह्या बाजूला खेळायला तर काय बिघडलं?”
आजचं निरागस मूल उद्या मोठा दांडगट तरुण होईल. लहानपणापासून इथे खेळल्याने उद्या ही जमीन आपलीच समजू लागला तर काय, अशी चिंता तिच्या पोटात होती.
 “मुलगा वडिलांसारखा होईल, असं गृहित धरता येईल का? कुणी काही वडील निवडून जन्माला येत नाही”, श्रीरंग म्हणाला.
तिला समजत नव्हतं, की एवढा शहाणा आहे, तर हे कसं कळत नाही की बापावर जाणारच नाही ह्याची तरी कुठे खात्री आहे? जन्म हातात नसला, तरी ज्या घरात वाढतोय आणि तिथे जे काही शिकतोय त्याचा परिणाम होतच असेल ना?
कालिंदीला काही त्या मुलावर सूड उगवायचा नव्हता, पण ती सावध राहणार होती. 

श्रीरंगला मात्र प्रेमाचे उमाळे येत होते. मैत्री-प्रेमाच्या वर्षावाने सगळा भूतकाळ गाडून टाकायचा होता. “कटुतेने कटुता वाढते. आपण मैत्रीची सुरुवात करायला हवी”, असा मोठेपणा घ्यायचा त्याने प्रयत्न केला. पण काळजीपूर्वक पाऊलं टाकण्याला कटुता मानणारा त्याचा खुजेपणाच तिला उठून दिसला. श्रीरंग तात्त्विकता, बुद्धिप्रामाण्य, वैचारिकता असे दोन-दोन वेढे घेत तिच्यासाठी गुटी उगाळत होता आणि अबोध बाळ होऊन चाटण घ्यायला तिने नकार दिला होता. जो माणूस स्वत:च्या तत्त्वज्ञानाच्या दर्पात दुसऱ्याच्या सात्विक भावना आणि सखोल वेदना नाकारतो, त्याची बुद्धिमत्ता तिला कस्पटासमान वाटू लागली. स्वत:चा मोठेपणा दाखवण्याची त्याला इतकी हौस, की त्या वरवंट्याखाली काही रगडलं गेलं, तरी तो सरळ डोळेझाक करत होता! श्रीरंग म्हणाला, “तो मुलगा सुद्धा बिन बापाचाच वाढतोय! त्याची तरी काय चूक?” शेजाऱच्या मुलासाठी ओथंबणारी त्याची संवेदनशीलता तिच्याच उंबऱ्यात कशी काय शुष्क होते? त्या मुलाचा कळवळा येतो, पण तिची पोरं उघडी पडलेली दिसत नाहीत? दंभ. दंभाचीच घट्ट वीण होती त्याच्या व्यक्तिमत्त्वाला.


श्रीरंगला निरोप दिल्यावर काही दिवस भकास निवांतपणात गेले आणि मग मोहन आला. अंगाने भरलेला, हसऱ्या-गोल चेहऱ्याचा आणि तिच्यासारखाच सावळा. चेहऱ्यावर लहान मुलासारखे भाव, प्रचंड बडबडा आणि उत्साही. थकवा त्याला माहीतच नव्हता. आल्या-आल्या तो आजींच्या पाया पडला. म्हणाला, “खूप सोसलंत तुम्ही या वयात. मला माहीत आहे सगळं. जाणीव आहे त्याची. तुम्ही माझ्या आईसारख्या. मी सगळं व्यवस्थित करेन इथं.” मुलांना घरातून बाहेर नेलं आणि म्हणाला, “खेळू या भरपूर, स्नायू बळकट करा! नव्या गोष्टी शिका आणि जोशात रहा.” दोन्ही मुलं कंटाळ्याची जळमटं झटकून पहाटेच उठून धावपळ करू लागली.

एकटीने सगळं करताना कालिंदीची इतकी दमछाक होत होती, की तिला मुलांकडे विशेष लक्ष देणं जमलंच नव्हतं. मोहन इतकं मनापासून मुलांकडे बघत होता, ते पाहून भरून आलं तिला. वडिलांची जागा कुणीच घेत नसतं. पण इतक्या तळमळीने करणारं कुणीतरी असण्याची खूप आवश्यकता होती. एके दिवशी मोहन मुलांना घरामागच्या डाळिंबाच्या मागे असलेल्या शांतरम्य टेकडीवर घेऊन गेला. “ही टेकडी एवढी फुललेली हिरवीगार कशी असते माहितीय?”, मोहनने विचारलं. मुलांना माहीत नव्हतं. त्याने मोठ्या कौतुकाने तिथे खणलेले चर आणि दगडी बांध दाखवले. म्हणाला, “खूप वर्षांपूर्वी ओसाड, कोरडी होती ही टेकडी. अगदी रुक्ष. पण तुमचे आजोबा म्हणजे मुलुखावेगळा माणूस. त्या काळी त्यांनी इथे पहिल्यांदा पाणी आणि माती अडवली, पाणी जिरवलं आणि हा परिसर पाचूसारखा हिरवा केला! तीस-पस्तीस वर्षांपूर्वी. तेव्हा अख्ख्या पंचक्रोशीत कुणी असं पाणी अडविण्याबद्दल ऐकलं सुद्धा नव्हतं!” फुलं उमलल्यासारख्या मुलांच्या भुवया उंचावल्या. मोहन पुढे म्हणाला, “त्यांची नातवंडं आहात तुम्ही. खूप पुढे जायचंय तुम्हाला. बरंच काही करून दाखवायचंय.”

डाळिंबाच्या गुंजेसारख्या लालेलाल कळ्या निरखत कालिंदी उभी होती. ह्यातूनच नंतर फुलांच्या चांदण्या उमलतात. बाहेर चांदणी, त्याच्या आत रेशीम धागे आणि मधोमध गाभ्यात ठिपक्यांसारखे मोती. कधी उमलणार ह्या चांदण्या? तिला लांबून अस्पष्ट आवाज ऐकू आला, घोषणांसारखा. निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर हिरव्या टेकडीच्या उतारावरून उजळल्या चेहऱ्याने मोहन आणि दोन्ही मुलं लयबद्ध धावत शेताकडे येत होती. त्यांचे पाय ठेक्यात पडत होते. जवळ येऊ लागले, तसं तिला त्यांचं गाणं स्पष्ट ऐकू येऊ लागलं.

“घाम गाळुनी ओसाडीतही बीज अंकुरे
चला बांधू या स्वप्नामधली सुखमंदिरे
कोवळ्या मनात अमुच्या उत्साहाचे झरे
पंख फुटता आशेचे, अनंत नभ अपुरे”

स्फुरण चढलेल्या त्या तिघांना पाहून कालिंदी प्रसन्न हसली. “काय काय पाहिलं टेकडीवर?”, तिने सहजच विचारलं. मोहन म्हणाला, “चर पाहिले, बांध पाहिले. शेळ्या पण दिसल्या खूप, गवत खायला आलेल्या.” तिला एकदम काटा बोचल्यासारखं झालं. “गवत? शेळी तर पाला खाते.” “तेच ते, पालाच म्हणायचं होतं मला”, असं म्हणत घाईघाईने तो मुलांना घेऊन पुढे गेला.

मोहनकडून किती शिकू आणि किती नको, असं झालं होतं मुलांना. मोहन म्हणाला, “जमीन ही आईच असते दुसरी. आपण तिचं रक्षण करायला पाहिजे. मला तुमच्या वडिलांबद्दल माहीत आहे सगळं.” त्याने मुलांना घेऊन शेताला कुंपण घालायला सुरुवात केली. इवल्या इवल्या हाताला जमेल तसा भार मुलं वाहू लागली, खड्डे खणू लागली. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिघं कुंपणाच्या कामात गुंतून गेले. दिवेलागणीनंतर तो सगळ्यांना वरती आकाश दाखवायचा. म्हणायचा, “हे ग्रह-तारे बघा. ज्ञानी लोकांना हे बघून पर्जन्यवृष्टीचा अंदाज येतो. चार-चार महिने आधीच कळतं, की पाऊस नक्की कधी येणार आणि किती होणार. त्यावरून मग पेरणी ठरवायची.” कालिंदीला शंका येई, “असं असेल का खरंच? करून पाहिलं आहे का कुणी?”

घरामागे लावलेली मिरच्या-डाळिंबं मोहनकडे सोपवली होती आणि समोरचा तुरी-बाजरीचा भाग कालिंदी बघत होती. बाजरीच्या सोन्याच्या कणसांना प्रेमळ वारा डोलवत-खेळवत राही आणि ते कणसांचे तुरेही त्याच्या तालावर चमकदार सळसळ करत. ही कणसं आता कोरडी होऊन तयार झाली होती. पानं पिवळी आणि खरखरीत होऊ लागली होती. तिने त्यांची कापणी सुरू केली. एकेक ओळ कापून झाली की ती जावळ काढलेल्या गोंडस बाळासारखी दिसू लागे. पलिकडे सोनसळी कणसांचे ढीगच्या ढीग पडू लागले. त्यांच्याकडे पाहून श्रम हलके होत. “आता डाळिंबंही तयार होतील लवकरच”, तिच्या मनात विचार आला आणि ती उत्सुकतेने घरामागच्या डाळिंबाच्या बागेकडे गेली. “कुठेच फळ धरलं नाही?घाईघाईने तिची नजर झाडं, फांद्या, पानांवरून भिरभिरत जमिनीवर स्थिरावली. क्षणभर तिचा श्वासच थांबला. सगळीकडे डाळिंबाच्या चांदण्यांचा सडा पडला होता. फुलं गळून मातीमोल झाली होती. “मोहन? मोहन!”, ती धावत सुटली, “डाळिंबाला पाणी कधी दिलं होतंस?” तो शेताला कुंपण घालण्यात असा गर्क झाला होता, की त्याला बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं! “कुंपण घातलेल्या जमिनीचं करायचं काय जर त्यावर काही पिकवता येत नसेल तर? खायचं काय?”, तिचा संताप संताप झाला. “शेतीतलं खरंच काही कळतं तरी का ह्याला?”

संध्याकाळी मुलं मातीत बरबटून आली. छोट्याला थोडंसं लागलंही होतं. कालिंदीला वाटलं, की बरीच कामं केली असतील त्यांनी. तर शेजारच्या मुलाशी मारामारी करून आले होते दोघं.
“मारामारी?” तिला धक्का बसला.
“तो आपल्या शेतात आला होता.”
“समज द्यायची आणि परत पाठवायचं. हात उचललात तुम्ही?”
मोहनकडे पाहून ती म्हणाली, “तू शिकवलंस हे?”
मोहन इतिहासातून शिकणारा माणूस होता. त्याला मुलांना असं बलवान बनवायचं होतं, की त्यांच्या वाटेला जायची कुणाची हिंमत नको व्हायला. “आज धडा शिकल्यावर परत येणार नाही तो इकडे. त्या लोकांना सांगून समजतं का?”, मोहनचा आवाज चढला होता, नाकपुड्या फुगल्या होत्या.
“माझी मुलं गुंड नकोत व्हायला, त्या लोकांसारखी”, ती ‘त्या’वर जोर देऊन म्हणाली. “तोंडाने बोलून प्रश्न सोडवायला शिकू देत त्यांना.”
त्याला खात्री होती, की मऊ लागल्यावर लोक कोपराने खणतील. त्याला समजत नव्हतं, की हिला त्याच त्याच चुका का करायच्या आहेत!
“मुलांमध्ये सामर्थ्य अवश्य असावं. खंबीर व्हावं त्यांनी. पण बचावासाठी. आक्रमकता, गुंडपणा नकोय मला. त्यांना सन्मानाने आणि अभिमानाने सभ्य, समंजस आयुष्य जगू दे”, कालिंदीने स्पष्ट केलं.
मोहन तिच्यापुढे हतबुद्ध होऊन म्हणाला, “तू चुकते आहेस आणि तुला ते कळेल, तेव्हा उशीर झालेला असेल.” 
तिला त्याच्याकडे बघून प्रश्न पडला, की स्वत:च्या मतांबद्दल कुणाला इतकी खात्री कशी काय असू शकते, तेही काम नीट झेपत नसताना!

पावसाळा खरं तर संपला होता. पण आभाळात ढग दाटून आले, अचानक भरून आलं. विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस सुरू आला. अवकाळी पाऊस. रपारप अंगावर आला आणि तुरीला त्याने झोडपून काढलं. सगळी पिवळी फुलं खुडून टाकली एकाच फटक्यात. हाताशी आलेली तूर गेली. पाणी नाही म्हणून डाळिंबाने माना टाकल्या होत्या आणि आता पावसाचा रेटा एवढा, की तुरी हेलपाटून गेल्या. ह्या अशा दोन टोकांत अगदी दशा झाली उभ्या पिकाची. नंतरचे काही दिवस दूरपर्यंत हताश धुकं पसरलं होतं.

बरेच दिवस उलटून गेले. थंडी वाढू लागली होती. पिकं काढल्यावर सगळं रखरखीत चिडीचूप झालं होतं. आजुबाजूला सगळीकडे रंग बदलत होते. हिरव्याचा पिवळा, पिवळ्याचा सोनेरी आणि सोनेरीचा तांबूस होत होता. पक्ष्यांचे खेळ मात्र चालू होते. चिमण्यांची भांडणं, कावळ्याचं सावध हुडक्या घेणं आणि साळुंक्यांचं मातीत बसणं. रात्री जेवणं झाल्यावर काटक्यांची शेकोटी पेटवून आजी, मुलं आणि कालिंदी त्या उबेला बसत असत. आकाशात चंद्राचा ढगांबरोबर खेळ, स्निग्ध चांदण्या, समोर लालसर केशरी ज्वाला आणि सोबतीला सुकलेल्या आठवणी. तिसरा कुणी नवीन माणूस येईलही आपल्या गावात आणि असूही शकेल हवा तसा, कदाचित. किंवा मुलंच मोठी होऊन येतील हाताशी आणि मग पडणारच नाही कुणाची गरज. कदाचित.


गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

कथा - नवी लय



पाठराखे असावेत तसे दोन्ही बाजूला घनदाट हिरवे दणकट डोंगर आणि त्यामध्ये रांगोळीची ठसठशीत रेघ वाटावी अशी चमकदार निळी नदी. ही रोज नवी होते. हिच्या काठावर डोलणारी झुडुपं, तिथे रेंगाळणारा पाचोळा, हवेत भिरभिरणारे रंगीबेरंगी वेडे कीटक आणि त्यांच्या बरोबर तरंगायला आलेली गवतावरची हलकी पिसं. डेरेदार वृक्षांच्या प्रेमळ फांद्यांवरून माकडांच्या टोळ्यांना हे सगळं अनिमिष नेत्रांनी रोज बघत बसायला प्रचंड आवडायचं. जगातलं सौन्दर्य म्हणून जे काय असेल, तर ती ही नदी.

ही नदीच इथलं जीवन आहे. किती किती जीवांना ती घर देते, न्हाऊ-माखू घालते, खाऊ-पिऊ घालते आणि कुरवाळून कवेत घेते! तिच्या अंगा-खांद्यावर बागडणाऱ्या मासोळ्या म्हणजे नुसता उत्सव. झगमगीत पिवळ्या, तलम केशरी, झिरझिरीत चंदेरी, लुसलुशीत लाल, झिळमिळ जांभळ्या - मासोळ्याच मासोळ्या. पण या आनंदधामाला एक दृष्ट लागली होती. रखरखीत, खडबडीत, अक्राळविक्राळ सुसरींची. त्यांची थंड नजर आणि उघड्या तोंडाची न संपणारी हाव बघून माकडांच्या पोटात ढवळून निघायचं. का इतक्या भाबड्या जगाला असा शाप असावा?

मासोळ्यांइतका निरुपद्रवी जीव शोधून सापडणार नाही. शतकानुशतकं, युगानुयुगं उलटली, त्या कधी कुणावर हल्ला करायला गेल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या त्यांच्यात गट करून ढकला-ढकली केली असेल. पण रक्ताची चव आणि हाव त्यांच्या गावी नव्हती. पाण्याच्या धारेत डोळे मिटून लोळणारे, चुबुक चुबुक आवाज करत पिटुकल्या उड्या मारणारे आणि शेपट्या हलवत बेभान नाचणारे वेडे जीव होते ते. सुसरी मात्र इथे फक्त पोटासाठी आल्या नव्हत्या. दबा धरून मासोळ्यांवर बारीक लक्ष ठेवायच्या. अचानक हल्ला करून माना पिरगळायच्या. एकाच घासात संपवून टाकायच्या नाहीत. धारदार दातांनी लचके तोडायच्या, रक्तबंबाळ करून तडफड बघत बसायच्या आणि हालहाल करून मारायच्या. यातना दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नसे. माकडांचा जीव तळमळू लागला. असा उघड्या डोळ्यांनी किती काळ आपण हा विनाश बघणार? सुसरींचा नायनाट करायला हवा. अगदी आत आत खोलवर हे उमजत गेलं, की आता आपल्याला जगायचं, तर या मासोळ्यांसाठी, या नदीसाठी. हेच आपलं व्रत. सुसरी संपायला हव्या.

मग माकडांनी ह्यावर एकत्र येऊन विचार-चर्चा सुरू केल्या. सोपं नव्हतं अशा मोठ्या सुसर-साम्राज्याला उलथून टाकणं. अजून माकडं लागणार होती. त्यांनी डोंगर-दऱ्या पालथ्या घालायला सुरुवात केली. अजून बऱ्याच टोळ्या सापडल्या तिथे, स्वत:च्याच जगण्यात गुंतून गेलेल्या. त्यातल्या एकेकाला जागं केलं. नदी, मासोळ्या, त्यांचं अतीव सुंदर विश्व आणि त्याला नख लावणाऱ्या सुसरी हे सगळं प्रत्यक्ष दाखवलं. आता पुढे जायला हवं होतं. शेकडो माकडं एकदम नदीकाठी जमा झाली आणि मोठमोठ्यांदा सुसरींचा निषेध करू लागली. हा नित्याचाच कार्यक्रम झाला. आता मागे हटायचं नव्हतं. रोज सकाळी सूर्यकिरण येताच नदी लखलखीत दिसू लागे आणि तिच्याकाठी दवाचे मोती मिरवत वाऱ्यावर डोलणाऱ्या पोपटी गवतावर हळूहळू माकडं जमा होऊ लागत. एक भारून गेलेलं वातावरण तयार होत असे. लालसर किरणांच्या गुलालात रंगलेल्या ध्येयवेड्या टोळ्याच्या टोळ्या तहानभूक विसरून चढ्या स्वरात घोषणा देत असत. सुसरींना त्याने काडीमात्र फरक पडत नसे. त्यांच्या जगाला धक्का लावण्याची कुणाचीच शामत नव्हती. त्यामुळे काठावरच्या मोर्चांकडे त्यांनी ना कधी लक्ष दिलं, ना कधी पाण्याबाहेर येऊन आव्हान दिलं. आपला रुंद जबडा कसा भरत राहायचा अशा एकमेव उद्देशाने त्या राज्य करत असत.

माकडांना खूप अस्वस्थ होऊ लागलं. अपयशावर तोडगा लगेच काढावा लागतो. नाहीतर त्याची सवय होऊन जाते आणि मग आग पटापट विझू लागते. एका मध्यमवयीन, विचारी माकडाने हे ओळखलं होतं. जमा झालेल्या ह्या टोळ्यांना लवकरच काहीतरी कार्यक्रम द्यायला हवा. नाहीतर धबधब्याच्या पाण्यातली शक्ती वरून खाली पडल्यावर निघून जाते, तसं व्हायचं! त्याने सगळ्या माकडांना एकत्र केलं आणि जाहीर केलं, की आपण आता पुढची पाऊलं उचलायला तयार आहोत. आपण नदीत उतरण्यात शहाणपण नाही. आपण सुसरींना नदीबाहेर काढायचं आणि हल्ला करून मारायचं. दोन-चार दांडगट माकडं पुढे झाली आणि म्हणाली, की आम्ही मोठमोठाले अगडबंब धोंडे जमा करतो. सुसरी बाहेर आल्या, की जोर लावून वेगाने त्यांच्यावर ढकलायचे. वेचून वेचून चेचून काढू, ठेचून काढू! हळूहळू नदीकिनारी वेगवेगळ्या आकारांचे, लहानमोठे, ओबडधोबड धोंडे जमा होऊ लागले. संधिप्रकाशात ते धोंडे नदीकिनारी ध्यानस्थ बसलेल्या आकृत्यांसारखे दिसू लागले. सुसरींच्या नायनाटाची शक्ती त्यांच्यात जाणवू लागली.

आता सगळ्यात अवघड काम होतं ते सुसरींना बाहेर काढायचं. माकडांच्या चर्चांमागून चर्चा झडल्या. बैठकांमागून बैठका झाल्या. काहींना आवेश चढला, कुणी पोटतिडकीने बोलले तर कुणी शून्यात बघत मूक झाले. कुणाला मनापासून पटत होतं, कुणाला खोलवर खटकत होतं तर कुणाला शंकांनी ग्रासलं होतं. शेवटी मात्र एकजुटीने पुढे जायचं ठरलं. एकदा ध्येयाची कास आणि स्वप्नांची आस धरली की सर्व मतभेद-मनभेद गळून पडतात. आपला स्व विस्तारत जातो आणि आपण आपला गटच होतो. कुठल्या प्रश्नांची, शंकाकुशंकांची आपल्या एकीला दृष्ट लागत नाही.

कामाला सुरुवात झाली. वाटून दिलेली कामं सगळे चोखपणे करू लागले. रानातून मोठमोठे भक्कम बांबू जमा झाले. काही माकडं नदीकाठच्या धोंड्यांजवळ खड्डे करून त्यात बांबू रोवू लागली. खुंटा हलवून घट्ट आहे ना ते बघू लागली. कुणी झाडांच्या तपकिरी साली सोलल्या, दगडाने चेचून चपट्या केल्या. त्याचे ओलसर पिवळट दोर तयार केले आणि ते बांबूंना बांधले. सापळे तयार होत होते. वेगवेगळ्या रंगांच्या पुष्कळ बिया जमा केल्या आणि त्यांची लालूच दाखवून रानकोंबड्या आणल्या. मग घट्ट पकडीने एकेका कोंबडीला एकेका बांबूला बांधलं. कोंबड्यांनी केविलवाणी फडफड आणि असहाय्य धडपड करून पाहिली. पण त्यांचे पायच करकचून बांधलेले होते बांबूंना. अडकलेल्या बिचाऱ्या कोंबड्यांना बघून काही माकडांच्या मनाची तगमग होऊ लागली. त्यांना त्यांच्या मित्रांनी धीर दिला. कोंबड्यांना काही होणार नाही. त्यांना धक्काही लागणार नाही. हे सगळं फक्त सुसरींना बाहेर काढण्यासाठी आहे. त्या कोंबड्यांच्या मोहाने बांबूंकडे येणार आणि त्या बांबूंच्या शेजारीच असलेल्या धोंड्यांमागे आपण दोघा-दोघांनी दबा धरून बसायचं. नदीबाहेर वेग कमी असतो सुसरीचा. ती टप्प्यात आली की जोर लावून तिच्यावर धोंडा लोटायचा. एकच जिव्हारी घाव आणि खेळ संपणार. कोंबडीपर्यंत ती पोहोचणारच नाही.

सगळी माकडं आपापली जागा घेऊन धोंड्यांमागे लपून बसली. काही झाडांवरून नजर ठेवून होती. सगळीकडे गूढ शांतता पसरली होती. ऊन चढू लागलं होतं. मधून अधून संथ वारा पाचोळा हलवत होता. झाडांच्या फांद्या-पानं डोलल्यासारखी वाटत होती. नदी शांत होती. लाल चोचीच्या राखाडी कोंबड्या मलूल होऊन पडल्या होत्या. माकडांच्या डोळ्यांत चिंता आणि आशा एकत्र दाटल्या होत्या. इतक्यात पाण्यापाशी चाहूल जाणवली आणि त्यातून तीक्ष्ण दातांच्या रूंद जबड्याचा काळपट त्रिकोणी चेहरा बाहेर आला आणि त्याच्यामागे सरपटत एक धिप्पाड लांबच लांब चिलखताचा देह. धड-धड-धड-धड. माकडांना त्यांचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. शांतपणे सुसर एका कोंबडीच्या दिशेने पुढे सरकू लागली. कोंबडीची तगमग वाढू लागली. जशी सुसर समोर दिसू लागली, तशी कोंबडी जिवाच्या आकांताने ओरडू लागली. तिचा श्वास कोंडल्यासारखा झाला. तिने डोळे मिटून गेले. एवढ्यात अचानक धाडकन मोठा आवाज झाला. एका प्रक्षुब्ध पाषाणाने एका अजस्त्र हिंसेला गाडलं होतं. दोन माकडांच्या एका जबरदस्त रेट्याने आज पहिला विजय मिळवला होता! सगळी माकडं एकत्र गोळा झाली आणि एकच जल्लोष सुरू झाला. अशक्य ते शक्य होऊ शकतं! जे स्वप्नातही बघायची हिंमत होत नव्हती, ते प्रत्यक्ष साकारलं होतं! यश असं दिसत असतं तर... अंगातला कण न् कण नाचू लागला होता. उर भरभरून श्वास घेतला आणि गिरक्या घेत चहुबाजूंना पाहिलं तर सगळी सृष्टी जिवंत झालेली दिसत होती.

आणि अचानक या भारलेल्या वातावरणात काही निपचित दृष्टीस पडलं. कोंबडी मरून पडली होती. धोंडा अचूक सुसरीवर लोटला होता. पण भीतीच्या तीव्र झटक्याने तिने जीव सोडला होता. माकडांच्या अंगांवर अस्वस्थ शहारे येऊ लागले. काहीजण भांबावले, आता काय? आता हे काम थांबवावं लागेल का? धोंडे जमा केलेली दांडगट माकडं पुढे आली, “थांबायचं कशाला? इतके दिवस एवढे कष्ट घेऊन हे सगळं जमवून आणलंय. आता थांबता येत नसतं आणि आपण काही कोंबडी मारलेली नाही. तिची तीच मेलीय.” बहुतेकांनी होकार दिला. काही ना काही अडचणी येतच असतात. म्हणून काही लगेच थांबायचं नसतं.

प्रत्येकाने पुन्हा आपापली जागा घेतली. डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवलं. सुसरीचं भीषण रूप समोर दिसताच कोंबडीने आर्त किंकाळी फोडली. धोंडा धपकन् सुसरीच्या डोक्यात पडला, तिचा पुरता चेंदामेंदा झाला. कोंबडीने नि:श्वास सोडला, ती वाचली होती! एका प्रेमळ माकडाने तिच्या पायाच्या गाठी सोडून टाकल्या आणि तिला मोकळं केलं. ती मुक्त होऊन पसार झाली. सगळ्यांच्या डोळ्यांत विश्वास साकळला. शेवटी कशावर का होईना विश्वास ठेवावाच लागतो. नाहीतर आपण एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही. आता जे ठरलंय, ते तडीस नेऊनच थांबायचं. प्रश्न नाही, शंका नाही आणि पुनर्विचार तर नाहीच नाही.

आता सगळं आपोआप सराईतपणे घडू लागलं. धोंड्यांमागे कर्तव्यदक्ष हात, झाडांच्या फांद्यांवरून इशारे, सुसरींचं रौद्र रूप, कोंबड्यांचा टाहो, एकच वर्मी घाव आणि मग शुष्क शांतता. चक्रं फिरत राहिली. अशा धुमश्चक्रीत कधी धोंडा पडण्यापूर्वीच सुसरीने कोंबडीचा घास घेतला, कधी धोंडा सुसर आणि कोंबडी दोघींवर एकदम पडला, कधी कोंबडी थोडक्यात वाचली तर कधी तिने धसक्यानेच प्राण सोडला. शेवटची सुसर संपवली तोपर्यंत किनाऱ्यावर रक्ता-मांसाचा ओंगळ वास पसरू लागला होता. माकडांच्या उग्र घामाने तो अजूनच अंगावर येऊ लागला.
सांजवेळ होऊ लागली, सावल्या जमिनीत विलिन होऊ लागल्या. पावसाची भुरभुर सुरू झाली. उरलेल्या कोंबड्या सोडून देऊन सगळी माकडं डेरेदार वृक्षांच्या कुशीत एकत्र जमा झाली आणि हळूहळू एकेक आवाज उमटू लागला.... “कोंबड्या मारायचा अधिकार आपल्याला कुणी दिला?”
“चांगल्या कामातली ती आहुती होती.”
“आपल्याला नदीतली हिंसा बघवत नाही म्हणून केलं ना हे? मग आपणही हिंसा करायची?”
“आपण हिंसा करायला उतरलो नव्हतो, ती झाली.”
“आपण मासोळ्यांच्या जगात सुख परत आणलं, नदीचा दाह संपवला.”
“भाबड्या कोंबड्यांना बळी देऊन?”
“मासोळ्या वाचवायचा दुसरा कुठला मार्ग होता का कुणाकडे? ह्यापेक्षा चांगला?”
“आपण शोधायला हवा होता.”
“आपण निषेध करून पाहिला होता. त्याने काही झालं नाही.”
“नदीच्या प्रवाहात आता आनंदी संगीत उमलणार आहे, त्याचा आनंद कसा नाही होऊ शकत?”
अंधार पडला होता. पाऊस वाढू लागला. मधूनच लखकन् वीज चमकायची.
“कोंबड्या वाचवायच्या नाहीत आणि मासोळ्या वाचवायच्या असं का?”
“कोंबड्या मारायच्या नव्हत्याच. त्यांची आहुती पडली खरं, पण कोल्हया-लांडग्यांनी तसाही त्यांचा फडशा पाडला असताच.”
“ते नैसर्गिक आहे. इथे आपण आपल्या डोक्यावर पाप घेतलं.”
“निसर्गाने पाप केलेलं ठीक आहे? निसर्गाने पाप केलं, की नशीब म्हणायचं आणि आपण हस्तक्षेप केला, की पाप म्हणायचं?”
“असेल ते उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं का? काहीच बदलायचं नाही?”
“आपण सुसरीच का संपवल्या? कोल्हे-लांडगे का नाही?”
“एक तरी संपवलं ना? त्याचं समाधान का नाही?”
“मासोळ्यांबद्दलच का एवढा जिव्हाळा?”
“कुणाबद्दलच जिव्हाळा नसणं जास्त चांगलं आहे का? तसा तर मग सुसरींना आणि कोल्ह्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.”
“हे सगळं कुणी ठरवायचं? कसं ठरवायचं?”
“पुन्हा नवीन सुसरी आल्या तर आपण पुन्हा बळी देणार का? कुणाचा?”
“ह्या अशा कोंबड्या मारून आपल्या संवेदना मंदावल्या तर? आपण भरकटत गेलो तर, पाचोळ्यासारखे? दिशाशून्य?”


वारा पांगला होता. पाऊस आता धो-धो कोसळू लागला. फांद्या-पानांना ओलांडून त्याने माकडांना न्हाऊ घातलं. सर्वांग धुवून काढलं. आता ओलेत्याने उद्याकडे बघायचं होतं. डोंगरांतून पाण्याचे लोटच्या लोट खाली येऊ लागले. त्यात भग्न सुसरींचा चिखल, कोंबड्यांची विखुरलेली पिसं आणि रक्ताची थारोळी मिसळून ते गढूळ लोट निर्विकार वेगाने, काळोखाच्या साक्षीने नदीत मिसळत गेले. उदरात सगळं सामावून घेत नदीचा प्रवाह नव्या लयीत पुढे वाहत राहिला.