तांबडं फुटण्यापूर्वीच
कालिंदीला आपोआप जाग आली. कोंबडा अजून आरवला नव्हता. एकदम नवीन गोष्टीला सामोरं
जायचं म्हणून अस्वस्थ वाटत होतं. दिवसभर अंग मोडून काम केलं असलं तरी रात्री शांत
झोप झाली नव्हती. ती उठून आवराआवर करू लागली, तर आजी पण जाग्या झाल्या. म्हणाल्या,
“एवढी चिंता नकोस करू. होईल सगळं नीट. मी काही आयुष्यभर पुरणार नाही. एवढी मोठी
जमीन आणि दोन लहान मुलं, सहा आणि आठ वर्षांची. कुणाची तरी सोबत लागणारच आहे.” तीच
तर चिंता होती तिला. इच्छुक माणूस शेतीच्या लोभाने तर येणार नाही ना? “अगं
शेतीतल्या उत्पन्नाची अपेक्षा तर असणारच. कमाई कुणाला नको असते? बाकी चांगला आहे
का ते बघायचं.”
बाहेरून दिसणार नाही असं
दरवाज्याच्या बऱ्याच आत उभं राहून ती शेतातल्या काळ्या मातीतली घराकडे येणारी सरळ
पायवाट न्याहाळत होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात उंच शिडशिडीत तो घराकडे येताना
दिसला, खांद्यावर आणि हातात सहजतेनं सामान घेऊन चालणारा. जवळ आला, तसा तिला त्याचा
गोरा, नाकेला, बारीक डोळ्यांचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. चेहऱ्यावर आशा आणि चौकस
भाव तरळत होते. कालिंदी स्वागताला दरवाज्यावर आली. तिच्या सुबक, सावळ्या, टपोऱ्या
डोळ्यांच्या मूर्तीकडे पाहून त्याने मंद स्मित केलं आणि म्हणाला, “मी श्रीरंग.”
शेतातच घरापासून थोड्या
अंतरावरच्या दोन कौलारू खोल्यांमध्ये श्रीरंगची सोय केली होती. येते दोन महिने तरी
तो तिथेच राहणार होता. ह्या प्रांतातल्या प्रथेनुसार विवाह ठरवण्यापूर्वी स्त्री
किंवा पुरुष दुसऱ्याच्या शेतावर काही महिने जाऊन राहत असत. कामाची पद्धत, स्वभाव
आणि वागणं पटल्यास विवाह होत असे. आयुष्यात पुन्हा एकदा लग्नाचा विचार करावा
लागेल, असं कधी चुकूनही कालिंदीला वाटलं नव्हतं आणि आता ह्या टप्प्यावर तिच्या
योग्य आणि लग्नासाठी इच्छुक असे पंचक्रोशीत दोनच पुरुष उरले होते. पंचायतीत
ठरल्यानुसार पहिल्यांदा श्रीरंग आला.
तिने त्याची
मुलांशी-आजींशी ओळख करून दिली. पण नव्या माणसाशी लगेच मैत्री होणार नव्हती, एक
प्रकारचं अवघडलेपण जाणवत होतं. उन्हाळा अजून संपायचं नाव घेत नव्हता. पावसापूर्वी
कालिंदीने जमेल तेवढी जमीन नांगरली होती. पण सगळ्या जमिनीचं काम करणं तिच्या
आवाक्याबाहेरचं होतं. श्रीरंगने चार-आठ दिवसांत धडाधड सगळी जमीन नांगरून काढली.
आंतरपीक पद्धतीबद्दल त्याला बरीच माहिती होती. कुठे बाजरी-तूर लावायची आणि कुठे डाळिंब-मिरची
घ्यायची ते त्याला बरोबर माहीत होतं. बियाणांची नीट पारख होती. तिला नवऱ्याची आठवण
आली. ह्या जमिनीवर किती जीव होता त्याचा! त्याच जमिनीवर आता हा राबतोय, घाम
गाळतोय. तिच्या डोळ्यांत कौतुक दाटून आलं. आभाळात ढग जमू लागले होते. पावसाची चाहूल
लागली होती. दोघांनी मिळून पेरणी सुरू केली.
श्रीरंगला फक्त शेतीतलीच माहिती होती असं
नाही. तो बरेच प्रांत फिरला होता. वेगवेगळे लोक, त्यांच्या चालीरीती, तिथल्या
आठवणी असा मोठा खजिना होता त्याच्याकडे. रेशमी वाऱ्याबरोबर त्याच्या गप्पा वाहत असत आणि कालिंदी,
मुलं त्यात हरवून जात. आता रोज पावसाच्या सरी बरसू लागल्या होत्या. ओल्या मातीचा
पदर बाजूला सारत कोवळे अंकुर बाहेर डोकावू लागले होते. सगळं शेत जिवंत वाटू लागलं
होतं. अशा हिरवाईला पाहिलं, की पुन्हा एकदा स्वप्नांचा हात धरावासा वाटू लागे.
एका केशरी संध्याकाळी कालिंदी
वाढत्या शेतातून चालत होती. दोन्ही बाजूंना मिरच्यांची पांढरी फुलं खाली वाकून
स्वत:मध्येच हरवली होती. ढगामागून हलकाच चंद्र बाहेर येत होता आणि संध्याकाळचा गार
वारा ती श्वासांत भरून घेत होती. तेवढ्यात तिला लांब बांधापाशी कुणाचा तरी
हसण्या-खिदळण्याचा आवाज आला. ती पुढे चालत गेली. श्रीरंगबरोबर शेजाऱचा सात वर्षांचा
मुलगा चेंडू खेळत होता. तिच्या शेतात, तिच्या नवऱ्याच्या शेतात! अचानक मस्तकात
वेदनेच्या ठिणग्या उडू लागल्या. शक्य तितक्या शांतपणे तिने श्रीरंगला खेळ सोडून
परत बोलावलं. अंधुक प्रकाशात तो हसतमुखाने तिच्याकडे चालत येत होता. त्याच्याकडे
बघत बघत ती स्वत:ला समजावत होती, “त्याला माहीत नसेल बहुतेक.” “आणि शेवटी ते लहान
मूल आहे.” तरी पण तिची कानशिलं तापली होती, घसा कोरडा पडला होता आणि डोळ्यांतून
कडथ धारा लागल्या होत्या. शरीर काहीही ऐकण्याच्या स्थितीत उरलं नव्हतं.
शेजारच्या कुटुंबाचा
कायमच त्यांच्या जमिनीवर डोळा होता. तिच्या सासऱ्यांनी म्हणे पूर्वी अर्धा एकर
जमीन शेजाऱ्याच्या घशात जाऊ दिली होती, उगीच रोजची कटकट नको म्हणून. पण अशा
लोकांपुढे कितीही तुकडे टाकले, तरी ते शांत होत नाहीत. उलट अजून शिरजोर होतात.
नंतरच्या पिढीने अजूनच हातपाय पसरायला सुरू केले आणि जमिनीत घुसू लागले.
कालिंदीच्या नवऱ्याने विरोध केला तर शेजारचा गुंड मारामारीवर उतरला. लोखंडी सळईने
डोक्यावर असा भयानक वार केला, की त्याने तिच्या नवऱ्याचे प्राणच घेतले. तो गुंड
गेला तुरुंगात. पण तिच्या काळजावर कायमची भेग पडली. त्या गुंडाचा मुलगाच तिथे
चेंडू खेळत होता. श्रीरंगला सगळं माहीत होतं म्हणे. तरीसुद्धा? आता मात्र वर्मी
घाव बसला तिच्या.
श्रीरंगच्या नाकावर
त्याची बुद्धिमत्ता विराजमान झाली होती. “निरागस लहान मूल ते. आलं ह्या बाजूला
खेळायला तर काय बिघडलं?”
आजचं निरागस मूल उद्या
मोठा दांडगट तरुण होईल. लहानपणापासून इथे खेळल्याने उद्या ही जमीन आपलीच समजू लागला
तर काय, अशी चिंता तिच्या पोटात होती.
“मुलगा वडिलांसारखा होईल, असं गृहित धरता येईल
का? कुणी काही वडील निवडून जन्माला येत नाही”, श्रीरंग म्हणाला.
तिला समजत नव्हतं, की
एवढा शहाणा आहे, तर हे कसं कळत नाही की बापावर जाणारच नाही ह्याची तरी कुठे खात्री
आहे? जन्म हातात नसला, तरी ज्या घरात वाढतोय आणि तिथे जे काही शिकतोय त्याचा
परिणाम होतच असेल ना?
कालिंदीला काही त्या
मुलावर सूड उगवायचा नव्हता, पण ती सावध राहणार होती.
श्रीरंगला मात्र प्रेमाचे
उमाळे येत होते. मैत्री-प्रेमाच्या वर्षावाने सगळा भूतकाळ गाडून टाकायचा होता. “कटुतेने
कटुता वाढते. आपण मैत्रीची सुरुवात करायला हवी”, असा मोठेपणा घ्यायचा त्याने
प्रयत्न केला. पण काळजीपूर्वक पाऊलं टाकण्याला कटुता मानणारा त्याचा खुजेपणाच तिला
उठून दिसला. श्रीरंग तात्त्विकता, बुद्धिप्रामाण्य, वैचारिकता असे दोन-दोन वेढे
घेत तिच्यासाठी गुटी उगाळत होता आणि अबोध बाळ होऊन चाटण घ्यायला तिने नकार दिला होता.
जो माणूस स्वत:च्या तत्त्वज्ञानाच्या दर्पात दुसऱ्याच्या सात्विक भावना आणि सखोल
वेदना नाकारतो, त्याची बुद्धिमत्ता तिला कस्पटासमान वाटू लागली. स्वत:चा मोठेपणा
दाखवण्याची त्याला इतकी हौस, की त्या वरवंट्याखाली काही रगडलं गेलं, तरी तो सरळ
डोळेझाक करत होता! श्रीरंग म्हणाला, “तो मुलगा सुद्धा बिन बापाचाच वाढतोय! त्याची
तरी काय चूक?” शेजाऱच्या मुलासाठी ओथंबणारी त्याची संवेदनशीलता तिच्याच उंबऱ्यात
कशी काय शुष्क होते? त्या मुलाचा कळवळा येतो, पण तिची पोरं उघडी पडलेली दिसत नाहीत?
दंभ. दंभाचीच घट्ट वीण होती त्याच्या व्यक्तिमत्त्वाला.
श्रीरंगला निरोप दिल्यावर
काही दिवस भकास निवांतपणात गेले आणि मग मोहन आला. अंगाने भरलेला, हसऱ्या-गोल
चेहऱ्याचा आणि तिच्यासारखाच सावळा. चेहऱ्यावर लहान मुलासारखे भाव, प्रचंड बडबडा
आणि उत्साही. थकवा त्याला माहीतच नव्हता. आल्या-आल्या तो आजींच्या पाया पडला.
म्हणाला, “खूप सोसलंत तुम्ही या वयात. मला माहीत आहे सगळं. जाणीव आहे त्याची.
तुम्ही माझ्या आईसारख्या. मी सगळं व्यवस्थित करेन इथं.” मुलांना घरातून बाहेर नेलं
आणि म्हणाला, “खेळू या भरपूर, स्नायू बळकट करा! नव्या गोष्टी शिका आणि जोशात रहा.”
दोन्ही मुलं कंटाळ्याची जळमटं झटकून पहाटेच उठून धावपळ करू लागली.
एकटीने सगळं करताना
कालिंदीची इतकी दमछाक होत होती, की तिला मुलांकडे विशेष लक्ष देणं जमलंच नव्हतं.
मोहन इतकं मनापासून मुलांकडे बघत होता, ते पाहून भरून आलं तिला. वडिलांची जागा
कुणीच घेत नसतं. पण इतक्या तळमळीने करणारं कुणीतरी असण्याची खूप आवश्यकता होती.
एके दिवशी मोहन मुलांना घरामागच्या डाळिंबाच्या मागे असलेल्या शांतरम्य टेकडीवर
घेऊन गेला. “ही टेकडी एवढी फुललेली हिरवीगार कशी असते माहितीय?”, मोहनने विचारलं.
मुलांना माहीत नव्हतं. त्याने मोठ्या कौतुकाने तिथे खणलेले चर आणि दगडी बांध दाखवले.
म्हणाला, “खूप वर्षांपूर्वी ओसाड, कोरडी होती ही टेकडी. अगदी रुक्ष. पण तुमचे
आजोबा म्हणजे मुलुखावेगळा माणूस. त्या काळी त्यांनी इथे पहिल्यांदा पाणी आणि माती
अडवली, पाणी जिरवलं आणि हा परिसर पाचूसारखा हिरवा केला! तीस-पस्तीस वर्षांपूर्वी.
तेव्हा अख्ख्या पंचक्रोशीत कुणी असं पाणी अडविण्याबद्दल ऐकलं सुद्धा नव्हतं!” फुलं
उमलल्यासारख्या मुलांच्या भुवया उंचावल्या. मोहन पुढे म्हणाला, “त्यांची नातवंडं
आहात तुम्ही. खूप पुढे जायचंय तुम्हाला. बरंच काही करून दाखवायचंय.”
डाळिंबाच्या गुंजेसारख्या
लालेलाल कळ्या निरखत कालिंदी उभी होती. ह्यातूनच नंतर फुलांच्या चांदण्या उमलतात. बाहेर
चांदणी, त्याच्या आत रेशीम धागे आणि मधोमध गाभ्यात ठिपक्यांसारखे मोती. कधी उमलणार
ह्या चांदण्या? तिला लांबून अस्पष्ट आवाज ऐकू आला, घोषणांसारखा. निळ्याशार
आकाशाच्या पार्श्वभूमीवर हिरव्या टेकडीच्या उतारावरून उजळल्या चेहऱ्याने मोहन आणि
दोन्ही मुलं लयबद्ध धावत शेताकडे येत होती. त्यांचे पाय ठेक्यात पडत होते. जवळ येऊ
लागले, तसं तिला त्यांचं गाणं स्पष्ट ऐकू येऊ लागलं.
“घाम गाळुनी ओसाडीतही बीज अंकुरे
चला बांधू या स्वप्नामधली सुखमंदिरे
कोवळ्या मनात अमुच्या उत्साहाचे झरे
पंख फुटता आशेचे, अनंत नभ अपुरे”
स्फुरण चढलेल्या त्या
तिघांना पाहून कालिंदी प्रसन्न हसली. “काय काय पाहिलं टेकडीवर?”, तिने सहजच विचारलं.
मोहन म्हणाला, “चर पाहिले, बांध पाहिले. शेळ्या पण दिसल्या खूप, गवत खायला
आलेल्या.” तिला एकदम काटा बोचल्यासारखं झालं. “गवत? शेळी तर पाला खाते.” “तेच ते,
पालाच म्हणायचं होतं मला”, असं म्हणत घाईघाईने तो मुलांना घेऊन पुढे गेला.
मोहनकडून किती शिकू आणि
किती नको, असं झालं होतं मुलांना. मोहन म्हणाला, “जमीन ही आईच असते
दुसरी. आपण तिचं रक्षण करायला पाहिजे. मला तुमच्या वडिलांबद्दल माहीत आहे सगळं.”
त्याने मुलांना घेऊन शेताला कुंपण घालायला सुरुवात केली. इवल्या इवल्या हाताला
जमेल तसा भार मुलं वाहू लागली, खड्डे खणू लागली. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत
तिघं कुंपणाच्या कामात गुंतून गेले. दिवेलागणीनंतर तो सगळ्यांना वरती आकाश
दाखवायचा. म्हणायचा, “हे ग्रह-तारे बघा. ज्ञानी लोकांना हे बघून पर्जन्यवृष्टीचा
अंदाज येतो. चार-चार महिने आधीच कळतं, की पाऊस नक्की कधी येणार आणि किती होणार.
त्यावरून मग पेरणी ठरवायची.” कालिंदीला शंका येई, “असं असेल का खरंच? करून पाहिलं
आहे का कुणी?”
घरामागे लावलेली मिरच्या-डाळिंबं
मोहनकडे सोपवली होती आणि समोरचा तुरी-बाजरीचा भाग कालिंदी बघत होती. बाजरीच्या
सोन्याच्या कणसांना प्रेमळ वारा डोलवत-खेळवत राही आणि ते कणसांचे तुरेही त्याच्या
तालावर चमकदार सळसळ करत. ही कणसं आता कोरडी होऊन तयार झाली होती. पानं पिवळी आणि
खरखरीत होऊ लागली होती. तिने त्यांची कापणी सुरू केली. एकेक ओळ कापून झाली की ती जावळ
काढलेल्या गोंडस बाळासारखी दिसू लागे. पलिकडे सोनसळी कणसांचे ढीगच्या ढीग पडू
लागले. त्यांच्याकडे पाहून श्रम हलके होत. “आता डाळिंबंही तयार होतील लवकरच”,
तिच्या मनात विचार आला आणि ती उत्सुकतेने घरामागच्या डाळिंबाच्या बागेकडे
गेली. “कुठेच फळ धरलं नाही?” घाईघाईने तिची नजर झाडं, फांद्या, पानांवरून भिरभिरत
जमिनीवर स्थिरावली. क्षणभर तिचा श्वासच थांबला. सगळीकडे डाळिंबाच्या चांदण्यांचा
सडा पडला होता. फुलं गळून मातीमोल झाली होती. “मोहन? मोहन!”, ती धावत सुटली,
“डाळिंबाला पाणी कधी दिलं होतंस?” तो शेताला कुंपण घालण्यात असा गर्क झाला होता,
की त्याला बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं! “कुंपण घातलेल्या जमिनीचं करायचं काय जर त्यावर
काही पिकवता येत नसेल तर? खायचं काय?”, तिचा संताप संताप झाला. “शेतीतलं खरंच काही
कळतं तरी का ह्याला?”
संध्याकाळी मुलं मातीत
बरबटून आली. छोट्याला थोडंसं लागलंही होतं. कालिंदीला वाटलं, की बरीच कामं केली
असतील त्यांनी. तर शेजारच्या मुलाशी मारामारी करून आले होते दोघं.
“मारामारी?” तिला धक्का
बसला.
“तो आपल्या शेतात आला
होता.”
“समज द्यायची आणि परत
पाठवायचं. हात उचललात तुम्ही?”
मोहनकडे पाहून ती
म्हणाली, “तू शिकवलंस हे?”
मोहन इतिहासातून शिकणारा
माणूस होता. त्याला मुलांना असं बलवान बनवायचं होतं, की त्यांच्या वाटेला जायची
कुणाची हिंमत नको व्हायला. “आज धडा शिकल्यावर परत येणार नाही तो इकडे. त्या
लोकांना सांगून समजतं का?”, मोहनचा आवाज चढला होता, नाकपुड्या फुगल्या होत्या.
“माझी मुलं गुंड नकोत
व्हायला, त्या लोकांसारखी”, ती ‘त्या’वर जोर देऊन म्हणाली. “तोंडाने बोलून प्रश्न
सोडवायला शिकू देत त्यांना.”
त्याला खात्री होती, की
मऊ लागल्यावर लोक कोपराने खणतील. त्याला समजत नव्हतं, की हिला त्याच त्याच चुका का
करायच्या आहेत!
“मुलांमध्ये सामर्थ्य
अवश्य असावं. खंबीर व्हावं त्यांनी. पण बचावासाठी. आक्रमकता, गुंडपणा नकोय मला.
त्यांना सन्मानाने आणि अभिमानाने सभ्य, समंजस आयुष्य जगू दे”, कालिंदीने स्पष्ट
केलं.
मोहन तिच्यापुढे हतबुद्ध होऊन
म्हणाला, “तू चुकते आहेस आणि तुला ते कळेल, तेव्हा उशीर झालेला असेल.”
तिला
त्याच्याकडे बघून प्रश्न पडला, की स्वत:च्या मतांबद्दल कुणाला इतकी खात्री कशी काय
असू शकते, तेही काम नीट झेपत नसताना!
पावसाळा खरं तर संपला
होता. पण आभाळात ढग दाटून आले, अचानक भरून आलं. विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस
सुरू आला. अवकाळी पाऊस. रपारप अंगावर आला आणि तुरीला त्याने झोडपून काढलं. सगळी
पिवळी फुलं खुडून टाकली एकाच फटक्यात. हाताशी आलेली तूर गेली. पाणी नाही म्हणून
डाळिंबाने माना टाकल्या होत्या आणि आता पावसाचा रेटा एवढा, की तुरी हेलपाटून
गेल्या. ह्या अशा दोन टोकांत अगदी दशा झाली उभ्या पिकाची. नंतरचे काही दिवस
दूरपर्यंत हताश धुकं पसरलं होतं.
बरेच दिवस उलटून गेले.
थंडी वाढू लागली होती. पिकं काढल्यावर सगळं रखरखीत चिडीचूप झालं होतं. आजुबाजूला
सगळीकडे रंग बदलत होते. हिरव्याचा पिवळा, पिवळ्याचा सोनेरी आणि सोनेरीचा तांबूस होत
होता. पक्ष्यांचे खेळ मात्र चालू होते. चिमण्यांची भांडणं, कावळ्याचं सावध हुडक्या
घेणं आणि साळुंक्यांचं मातीत बसणं. रात्री जेवणं झाल्यावर काटक्यांची शेकोटी
पेटवून आजी, मुलं आणि कालिंदी त्या उबेला बसत असत. आकाशात चंद्राचा ढगांबरोबर खेळ,
स्निग्ध चांदण्या, समोर लालसर केशरी ज्वाला आणि सोबतीला सुकलेल्या आठवणी. तिसरा
कुणी नवीन माणूस येईलही आपल्या गावात आणि असूही शकेल हवा तसा, कदाचित. किंवा मुलंच
मोठी होऊन येतील हाताशी आणि मग पडणारच नाही कुणाची गरज. कदाचित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा