मंगळवार, १९ मे, २०२०

कथा - लोप


प्रिय अप्पा,

आज आत्ता भल्या पहाटेच जाग आली आणि पहिल्यांदा डोळ्यांसमोर तुम्हीच आलात. बऱ्याचदा नीट झोप लागतच नाही. मला आठवतंय, मी साधारण दहा वर्षांची असेन तेव्हापासून तुम्ही मला पहाटे उठवून तुमच्याबरोबर टेकडीवर फिरायला नेऊ लागलात. सुरुवातीला खूप जिवावर यायचं, पण नंतर सवय झाली. परत येताना आपण गप्पा मारायचो. तुम्ही मला झाडं ओळखायला शिकवली. वाटेवर एके ठिकाणी पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. मी फुलं वेचायचे. अजून तांबडं फुटलं नाहीये. पण थोड्या वेळाने इथल्या खिडकीतून खालचा प्राजक्त स्पष्ट दिसू लागेल. माझ्यातली फुलं वेचण्याची उमका मात्र कधीच आटून गेली आहे. तुमच्या व्यक्तिमत्वातली प्रसन्नताही कधी हरवत गेली, ते कळलंच नाही.

मला वेगवेगळे प्रसंग आठवत राहतात. तुम्ही भेट म्हणून सगळ्यांना नेहमी पुस्तकंच आणायचात. कपडे आणणं कायम आईकडे असायचं. जेव्हा माझ्या सातवीच्या स्कॉलरशिपचा निकाल लागला आणि मला स्कॉलरशिप मिळाली नाही, त्या दिवशी मात्र तुम्ही मला बाहेर घेऊन गेलात आणि आपण माझ्या पसंतीचा चांगल्यातला फ्रॉक घेऊन आलो! तुम्ही आणि मी तेवढी एकदाच कपडे खरेदी केली असेल ना? मला वाटतं, माझ्या लग्नाच्या खरेदीलाही तुम्ही नव्हता. खरं तर अगदी साधं, छोटं लग्न होतं माझं. (तुमच्या मुलीचं अजून कसं असणार?) खरेदीही खूपच कमी होती. पण तुम्हांला एकूणच कपडे, दागिने, खरेदी अशा कशाशी कधी कर्तव्य नव्हतं. तुमचीच लेक असल्याने मलाही फारसा सोस नव्हता, खरं तर. आता मात्र कधी कधी प्रश्न पडतो, की मी खरंच तशी होते की तुमच्या प्रभावामुळे मला तसं वाटायचं? माझं लग्न होईपर्यंत आणि त्यानंतरही मी आई होईपर्यंत मी बरीचशी तुमच्यासारखीच होते, अप्पा. मग मी नंतर बदलत गेले का? का मला स्वत:ला गवसत गेले? मी मूळची कदाचित नसेनच तुमच्यासारखी. पण तुमच्या सावलीत ते समजलं नसेल?

लहानपणी मला तुम्ही चालता-बोलता ज्ञानकोश वाटायचात. एखाद्या शब्दाचा अर्थ असो, एखादा लेखक असो, कवितेची ओळ असो किंवा इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग असो; तुम्हांला सगळंच माहीत असायचं. तेव्हा कुठे संगणक क्रांती आणि इंटरनेटचा काळ होता? आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हांलाच विचारायचो. तुम्हांलाही सांगाय-शिकवायची आवड होती. ओळखीचे, आजुबाजूचे लोक जेव्हा “तुझ्या वडिलांना विचार, त्यांना माहीत असेल” असं विश्वासाने म्हणायचे, तेव्हा केवढा अभिमान वाटायचा मला! मग मी जसजशी मोठी झाले, कॉलेजला गेले, तसं मला वाटू लागलं, की ह्यात मला अभिमान वाटण्यासारखं काय आहे? मी तुमची मुलगी आहे, ह्यात माझं काय कर्तृत्व? उलट तुमच्यासारख्या प्राध्यापक-विचारवंताच्या घरी जन्म होऊनही मी कशात काही चमक दाखवली नाही, म्हणून वाटली तर खंतच वाटायला हवी.

तुमचा अभ्यास, तुमची विश्लेषणं-व्याख्यानांनी सगळेच भारावून गेलेले असायचे – तुमचे विद्यार्थी, तुमचे सहकारी आणि आम्ही घरचे लोक. आईला तर ‘नवरा हाच गुरू’ असं काहीसं वाटायचं. आम्ही दोघी बहिणीही कळत-नकळत तुमचा शब्द प्रमाण मानत वाढलो. सगळीकडे तुमच्याच विचारधारेचे विद्वान लोक होते त्या काळी. त्यामुळे  तुम्हांला आणि तुमच्या मित्रांना “काहीतरी चुकतही असेल” अशी कधी जाणीवच झाली नाही का, अप्पा? ताई आणि महेंद्र अमेरिकेला स्थायिक झाले, तेव्हा काय वाटलं तुम्हांला? तुमच्या सगळ्याच मित्र-सहकाऱ्यांच्या मुला-मुलींनी तुम्हा सगळ्यांना जी अंगभूत दुष्ट वाटायची, त्या अमेरिकेचा रस्ता का धरला? मी तुम्हांला कधी हे थेट विचारलंच नाही. पण माझ्या स्वतंत्र विचारांची ती सुरुवात असावी. रशिया पडला-फुटला, तेव्हा तुम्हांला मनापासून वाईट वाटलं होतं. तुम्ही त्याचं बरेच दिवस बरंच काही विश्लेषण सांगायचात. मला अर्थातच ते सगळं पटतही होतं तेव्हा. रशियाने नीट अंमलबजावणी केली नाही, औद्योगिक क्रांती व्हायच्या आधीच ही क्रांती झाली असं बरंच काही तुम्ही सांगितलं होतं. पण मार्क्सवरचा तुमचा विश्वास अढळ राहिला. समाजवादाला तुम्ही दूर नाही सारलं. की परतीचा मार्गच उरला नव्हता?

आई आणि तुम्ही ताईकडे अमेरिकेला जाऊन आलात, तेव्हा तुम्ही मोकळेपणाने तिथल्या नागरी व्यवस्थांचं, स्वच्छतेचं आणि एकूणच दर्जाचं कौतुक केलं होतं. तितक्याच सच्चेपणाने त्यांच्या वारेमाप उधळपट्टीवर आणि ‘वापरा-फेकावर टीकाही केली. चांगल्याला मनापासून चांगलं म्हणावं, वाईटाला नि:संकोच वाईट असा निखळपणा  टिकून होता तोवर तुमचा. मग गेल्या काही वर्षांत इतका कडवटपणा कशाने आला, अप्पा? तुमच्या व्यक्तिमत्वाचा एकेक सुंदर पैलू हळूहळू त्या कडवटपणात विरघळत गेला.

स्वयंपाक करायची वेळ कधी तुमच्यावर आली नव्हती. तुम्ही निवृत्त झाल्यावर मी तुम्हांला म्हणाले, की “आता स्वयंपाक शिकू शकता तुम्ही. आईचंही वय झालंय. तिलाही मदत होईल.” त्या काळी तुम्ही माझं ऐकून घेण्याच्या, मान्य करण्याच्या मन:स्थितीत होतात. अगदी स्वयंपाक नाही, तरी चहा कर, ताक कर, भाजी निवड अशी कामं तुम्ही करू लागलात. प्रेमाने करायचात, आदळआपट न करता. आईबरोबर तुमचा प्रेमळपणाही देवाघरी गेला बहुतेक. तिला तुमचे सामाजिक-राजकीय विचार, तुमची मतं मान्यच असायची. घरगुती गोष्टी तुम्ही तिच्या तंत्राने करत होता. कुठे आव्हान नाही, कसला वाद-विवाद नाही. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्याबरोबर गप्पा मारणं, एकत्र राहणं असं काही माहीतच नव्हतं तुम्हांला. ती गेल्यावर मी तुम्हांला थोडंसं तुमच्या मनाविरुद्धच इथे घेऊन आले. सांगलीहून पुण्याला, मित्रांपासून दूर. वयानुसार तुमचा हट्टीपणा वाढलेलाच होता. त्यात तुम्हांला समाजवाद विरोधी जावई भेटला. तुम्ही नुसते चिडचिड करायचा, अप्पा. “हा देश रसातळाला चालला आहे. काळ कठीण आहे.” हे एकच पालुपद धरून बसलात तुम्ही.

तुमचं वय हा एक प्रश्न असेल, आईचं जाणंही असेल, इथे रहायला आवडतही नसेल. पण तुमचं खरं दु:ख वेगळंच होतं. जे लोक तुम्हांला कधीही आवडले, पटले नाहीत; त्यांना लोकांनी पाठिंबा दिला हे तुम्हांला मान्य झालं नाही. जे कधी सत्तेत येणार नाहीत अशी तुम्ही आयुष्यभर खात्री बाळगली, नेमके ते सत्तेवर आले. त्या लोकांनीही चुका केल्या, जनतेचा अपेक्षाभंग केला. पण हे सगळं होण्याआधीच तुम्ही इथे यादवी माजल्यासारखा गोंधळ सुरू केला. आनंद तुम्हांला रोज सकाळी आलं घालून चहा करून द्यायचा. “जावयाच्या हातचा चहा छान” म्हणून सुरुवातीला कौतुक होतं तुम्हांला. पण एकदा त्याने तुम्हांला मार्क्सची सैद्धांतिक चूक काय सांगितली आणि तो तुमच्या मनातूनच उतरला! तुम्हाला खरोखरीच दु:ख व्हायचं, की “सध्याचे” लोक समाजात विष कालवत आहेत, लोकांमध्ये फूट पाडत आहेत आणि तुम्ही ते परत परत सांगायचात. ते चुकीचं वागत्तात, हे मला मान्यच होतं. पण फूट सगळ्यांनीच पाडली आहे आणि विष सगळ्यांनीच पेरलं आहे, हे मी तुम्हांला सांगत होते. जातीचं राजकारण करणं, जातीवरून तिकिटं देणं अशा प्रथा तुमच्या आवडत्या लोकांनी सुरू केल्या हे सगळं सांगायचा मी खूप प्रयत्न केला. पण तुम्हांला ते का दिसत नव्हतं? दुसरं कुणी असतं, तर मी सरळ ‘ढोंगी’ म्हणाले असते. पण तुम्हांला तर कधीच खोटेपणा चालायचा नाही. मी दहावीचे गुण साडेसत्याऐंशीऐवजी अठ्ठ्याऐंशी टक्के सांगितलेलं सुद्धा तुम्हांला पटलं नव्हतं आणि आता मात्र तुम्हांला सगळीकडे निवडक गोष्टी दिसू लागल्या.

जगात असे खूप लोक आहेत, जे कुत्र्या-मांजरांचे मुके घेतात, पोटच्या पोरासारखे त्यांचे लाड करतात आणि त्याच वेळी कोंबडी-बकरीपासून ते गाई-डुकरापर्यंत सगळ्यांचं मांस मिटक्या मारत खातात. त्यांना त्यांच्या वागण्यात कुठलीच विसंगती जाणवत नाही. उलट त्यातले काही महाभाग पाळीव प्राण्यांसाठीच्या संस्थांना देणग्या देतात आणि स्वत:च्या नैतिकतेबद्दल समाधानी असतात. तुमचं आणि तुमच्या मित्रांचं तसं झालं होतं. तुम्हांला तुमच्या विसंगती समजत नव्हत्या आणि जो कुणी त्या दाखवायला जाईल, तो तुमच्या नजरेत फितूर, जातीयवादी होत होता. तुमची लेकच असल्यामुळे मला असलं लेबल चिकटलं नसलं, तरीही मी तुमची निराशा नक्कीच केली होती. तुमच्या सर्व मित्रमंडळींच्या हातात फोन होता आणि तुमच्या गटात निवडक, एका बाजूच्या बातम्या फिरत असायच्या. त्या वाचून रोज तुमची निराशा वाढत होती. त्यातल्या बऱ्याचशा खऱ्या होत्या, खरोखरीच निराशाजनक होत्या. पण तुमच्याकडे फक्त निवडक गोष्टीच यायच्या. तुम्ही काही एका विचारसरणीवर श्रद्धा ठेवून बाजू निवडली होती. पण या देशातल्या बहुसंख्य लोकांनी ते ज्या घरात जन्मले, ज्या जात-धर्म-भाषेत जन्मले, त्यावरून बाजू ठरवली होती आणि मग प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या बाजूनेच पाहिली. तशीच सांगितली. निवडक. रोजच्या ह्या निराशेच्या माऱ्याने तुम्ही पार खचून गेलात हो, अप्पा.

तुमचं मग सुरू असायचं, की मी माझा माझा एकटा राहतो, कधी म्हणायचात की वृद्धाश्रमात जातो. “इथे मन रमत नाही, कंटाळा आला”, असं तर चालूच असायचं. कधी मित्रांना सांगायचात, की “माझ्यासाठी सांगलीला चांगला वृद्धाश्रम शोधा.” खरं तर, इथं घरात नात होती. तुम्ही तिच्याशी खूप गप्पा मारू शकत होतात, तुमची चांगली गट्टी जमली असती. पण वेगवेगळे किस्से सांगणारे, झाडं-फुलं दाखवणारे, गाण्यांमध्ये हरवून जाणारे अप्पा तिला इथे भेटलेच नाहीत. फोनवरचा मजकूर, वृत्तपत्रं-टीव्हीच्या बातम्या-चर्चा ह्यातच तुम्ही बुडून गेलात, हताश आणि चिंताग्रस्त होत गेलात.

एकीकडे तुमचा वृद्धाश्रमाचा ध्यास वाढत होता आणि दुसरीकडे कोरोनाच्या बातम्या येऊन थडकू लागल्या. तुम्ही आमच्याबरोबर शब्दश: अडकलात. बाहेर फिरणंही बंद झालं. मजुरांचे हाल बघून तुमचं हृदय अगदी पिळवटून गेलं. उपाशीपोटी शेकडो मैल चालणारे मजूर. कुणाबरोबर पोरंबाळं, कधी गरोदर बायका. कुणी चिरडून मेले, कुणी अतिश्रमाने जीव सोडला. श्रीमंतांनी विमानातून आणलेल्या रोगाचं ओझं खांद्यावर घेऊन रणरणत्या उन्हात पायपीट करणारे लाखो फाटके जीव बघून तुम्ही व्याकूळ झालात. आमचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आर्थिक मदत तर सगळेच करत होते. आनंद आणि त्याच्या मित्रांचा गट वेगवेगळ्या ठिकाणी किराणा पोहोचवत होते, अन्नवाटप करत होते. मजूर, एकटे राहणारे वृद्ध लोक, सर्कशीत काम करणारे लोक. सगळीकडे तो नुसता फिरत होता. तुम्हांला घास घेताना वाईट वाटायचं, की “आपण भाज्या-फळं खातोय. लोकांना धान्य मिळत नाही.” मी म्हणाले, “खा अप्पा. तुम्ही न खाल्ल्याने मजुरांना मिळणार आहे का? उलट, शेतकऱ्यालाही पैसे मिळणार नाहीत.”  नात इंटरनेटवर शिकते, ऑनलाईन शाळा चालते ते बघूनही तुम्हांला चिंता वाटली, “पालिकेच्या शाळांमधल्या मुलांचं काय?” तंत्रज्ञान आलंच नाही, तर सगळीकडे कसं पोहोचणार? इथवर आलंय, हळूहळू सगळीकडे पसरतंय. काही चांगलं दिसण्याची तुमची क्षमता संपून गेली होती. आनंद इतक्या लोकांपर्यंत मदत पोहोचवत होता! मला वाटायचं, ते बघून तरी तुम्हांला जरा बरं वाटेल...पण तुमच्या नैराश्यात घट झाली नाही. त्याच्या बाहेर जाण्यातूनच बहुधा तुम्हांला कोरोनाची लागण झाली असेल.

मी छोटी होते ना, तेव्हा तुमच्याशिवायच्या जगाची कधी कल्पनाही नव्हती केली. चुकूनही मनात तसा विचार आलेला सहन व्हायचा नाही. मग आई गेल्यावर मी कधीतरी मान्य केलं, की तुमचं वय झालंय. तुम्हीही जाल एक दिवस. पण दिवसेंदिवस तुम्ही इतके दु:खी राहू लागलात, की नंतर नंतर मला वाटू लागलं की तुम्ही आहात खरं.. पण तुमच्या असण्याला, जगण्याला काय अर्थ उरलाय? तुमच्यातले मला माहीत असलेले अप्पा तर कधीच लोप पावले आहेत. कधी कधी वाटायचं, अजून दु:ख आणि ग्लानी वाढण्यापूर्वीच तुमची सुटका व्हावी. एखाद्या दिवशी तुम्ही कुठल्या विनोदावर खूप हसलात किंवा एखादा पदार्थ कौतुकाने खाल्लात, की वाटायचं आज कधी नव्हे ते प्रसन्न दिसले.. अशा चेहऱ्यानेच जावेत. परिस्थिती तुम्ही बदलू शकणार नव्हता. तुम्हांला मान्यही करायची नव्हती. तुम्ही जीवनातली सगळी मौज हरवून दिवस काढत होतात. शेवटी सुटलात. पण तुम्ही कोरोनाशी झुंजत हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही विलगीकरण म्हणून घरात असे आपण अडकून पडलो होतो. आपली भेट होणार नव्हती. फोनवर तुम्ही खूप क्षीण वाटलात. बोलताना धाप लागत होती. नंतर तर ते बोलणंही बंद झालं. तुम्हांला काय वाटत होतं शेवटी? सुखी, प्रेमळ कुटुंब होतं तुमचं, यशस्वी प्राध्यापक होता तुम्ही. भरल्या घरात, सांस्कृतिक समृद्धीत जगलात. थोडंफार फिरून आलात. जग बघितलं. ह्याचं काही समाधान वाटलं का तुम्हांला? तृप्त होऊन डोळे मिटले का तुम्ही? शेवटच्या क्षणी लेकी-नातवंडांची आठवण झाली का तुम्हांला? की बायकोची? की तुमचं बालपण आठवलं? मला कधीच कळणार नाही ते. कमीत कमी वेदनेत तुमची लवकरात लवकर सुटका व्हावी, एवढीच माझी इच्छा होती. अंत्यदर्शन असं काही होणारच नव्हतं. माझ्यासाठी ते खूप वेदनादायी होतं. तुम्हांला शेवटचं शांत, शमलेलं, स्थिर असं एकवार बघायचं होतं. पण तेही घडलं नाही. तुमच्या शेवटच्या काळातली प्रत्येक गोष्ट अशी कल्पनेपलीकडेच घडत गेली.

मी दुसरीत असताना एकदा खोटं बोलले होते, की मी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेत पहिली आले. माझी चित्रकला माहीत असल्यामुळे, तुम्हांला ती थाप आहे हे लगेचच लक्षात आलं. तुम्ही मला प्रेमाने मांडीवर घेऊन म्हणालात, “तुला वाटतं, तू पहिली यावीस असं... हो ना? म्हणून तू तशी कल्पना केलीस. छान आहे तुझी कल्पना.” आता तुम्हीच माझी कल्पना झालात, अप्पा. चहा पिताना, गाणी ऐकताना, झाडी बघताना तुम्ही माझ्या बरोबर असता. आनंदात असता. आपण उत्साहाने गप्पा मारत असतो.

तुमची लाडकी लेक,

मनु


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा