गडद निळ्या रंगाचा चुणीदार, गाठ मारून तिरकी बांधलेली पातळ झिरझिरीत ओढणी, तेल लावून, विंचरून घातलेली लांबसडक वेणी अशी सुमीची ठेंगणी अशक्त सावळी मूर्ती फाटक उघडून लगबगीने आत शिरली. तीन किलोमीटर चालत आली होती ती. तिने तिच्या जुनाट पर्समधून किल्ली काढली आणि ऑफिसचं कुलुप उघडलं. सगळे लोक यायच्या आधी दोन मजली बंगला झाडून-पुसून स्वच्छ करायचा होता. आज साहेबही येणार होते. म्हणजे बाल्कनीही स्वच्छ धुवून काढायची होती. इतर लोक येण्यापूर्वी ती मस्त मोकळेपणाने वावरत असे आणि धडाधड कामं करत असे. पण एकेकजण येऊ लागला, की मानेवर खडा ठेवल्यासारखी मान गोठून जायची. सगळ्या हालचालींना एक अवघडलेपण यायचं. कुणी काही विचारलं, तरी आवाज खोल जायचा. शक्यतो कमीच बोलायची ती.
तिच्याशी आणि साहेबांच्या
ड्रायव्हरशी सोडून सगळे एकमेकांशी जास्ती करून इंग्रजीतच बोलायचे. पांढऱ्या चकाकत्या
लॅपटॉपवर इंग्रजीत लिहायचे. जास्ती करून मुली आणि बायकाच होत्या ऑफिसात. तीनच
पुरुष होते. कुठली तरी संस्था आहे म्हणे. सामाजिक काम करतात. खूप चांगलं काम आहे म्हणतात.
पण इंग्रजीतलं तिला काय कळणार? तशी सुमी शाळेत गेली होती. आठवीपर्यंत शाळाही
शिकली. मग त्याच्यानंतर खूप अवघड परीक्षा, नापासही करायचे. नंतर सुटलीच शाळा. सुमी
शाळेत मराठी लिहाय-वाचायला शिकली. पण सगळ्यात जास्त काही शिकली असेल, तर आपल्याला डोकंच
कमीय आणि आपण उगी कुठे डोकं लावू नये, हेच शिकली. आता हे प्रशस्थ ऑफिसच बघा ना. ती
लिहाय-वाचायला शिकल्याचा इथे काही फायदा आहे का? सगळे हुशार, डोकंवाले लोक फाडफाड
इंग्रजी बोलून इथे काम करतात.
सुमीची झाडलोट झाली होती.
ऑफिस आता गजबजलं होतं. तिने सगळ्यांसाठी चहा केला. नंतर कपबश्या धुतल्या. तेवढ्यात
साहेबांची भव्य रथासारखी जीप फाटकातून आत आली. पन्नाशीला आलेले
साहेब खाली उतरले. त्यांना छाती पुढे काढून चालायची सवय होती. वयामुळे पोटही पुढे
यायचंच. आत येताना ते आजुबाजूला कटाक्ष टाकत. कुंड्या नीट ठेवल्या आहेत ना?
झाडांना पाणी नीट घातलं जातंय ना? त्यांच्या मागेच लगबगीने त्यांच्या लॅपटॉपची
पिशवी घेऊन ड्रायव्हर आला. एखाद्या सम्राटाच्या ऐटीत ते सभोवती नजर टाकत वरती
त्यांच्या खोलीत गेले. ते आले, की सुमीला खूपच दडपण जाणवायचं. तिने ड्रायव्हरला
विचारलं, “चहा ठेवू का साहेबांचा?” त्याने निरोप आणला, की “आज कॉफी कर.”
साहेब नेहमी इथे नसायचे.
कधी परदेशी जायचे, कधी दिल्ली, कधी बंगलोर असे फिरत असायचे. दौऱ्यावरून आल्यावर
मात्र सलग आठ-पंधरा दिवस इथेच असायचे. आले, की सगळ्यांना गोळा करून तासन् तास बैठकी घ्यायचे.
मग दर दोन तासाला सगळ्यांना चहा, कधी काही खायला असं चालायचं. साहेब तसे गप्पिष्ट
होते. परदेशी कुठे जाऊन आले, दिल्लीत कुणाला भेटले असे सगळे किस्से बैठकीत रंगवून
सांगायचे. कधी कधी त्यांच्या लाडक्या कुत्र्याच्या गंमतीजमती सांगायचे. सांगता
सांगता सभोवार नजर फिरवून आपल्याला दाद मिळतेय ना, असं बघायचे आणि मनातल्या मनात
सुखावून जायचे. साहेब तसे रसिक होते. आपल्या विनोदावर कोण फिदा होऊन हसतेय,
कुणाच्या गालाला खळी पडतेय आणि कोण लटक्या आश्चर्याने डोळे विस्फारतीय हे सगळं ते
भिरभिरत्या नजरेने पटापट टिपायचे. कुणाचे सुशोभित काळेभोर डोळे, कुणाचं केसाच्या
बटांशी खेळणं तर कुणाचे बिनबाह्यांचे रसरशीत दंड. साहेबांना एखाद्या पुष्पवाटिकेत
बसल्यासारखं वाटायचं.
सुमी कॉफी करून वरती घेऊन
गेली. साहेबांनी लॅपटॉपवरची नजर क्षणभर वर केली आणि मानेनेच “ठीक” असं सांगितलं.
त्यांच्या नजरेत एक थंड नापसंती होती. टेबलवर कॉफी ठेवून सुमी खाली आली. तिला
त्यांच्या नजरेतला तो भाव आवडायचा नाही. साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल.
ड्रायव्हर सुट्टीवर होता आणि साहेबांना भेटायला ऑफिसमध्ये कुणीतरी येणार होतं.
येणाऱ्या माणसाला नीट पत्ता सापडेना. साहेबांनी सुमीला सांगितलं, की गल्लीच्या
तोंडाशी जा आणि पाहुण्यांना घेऊन ये. सुमी निघाली तसं साहेबांनी फोनवर पाहुण्यांना
सांगितलं, “एक मुलगी पाठवतोय तुम्हांला घ्यायला. लाल कपडे, किडकिडीत, साडे चार
फुटी.” आणि तिच्याकडे बघून विनोद केल्यासारखे हसले होते. सुमी चांगली पाच फुटाच्या
जवळ होती. लहान चणीची होती. कुणी कुणी तिला शाळकरी समजायचे. पण साडे चार फुटी
नक्कीच नव्हती आणि समजा असती जरी, तरी त्यात साहेबांनी असं हसण्यासारखं काय होतं? तेव्हापासून
तिला साहेबांची नजर जास्त चांगली समजायला लागली होती. “तू कुणी नाहीस”, असं त्यात
स्पष्ट लिहिलेलं असायचं.
पण सुमी तिला काय वाटतं,
ते कधी कुणाकडे बोलली नाही. तिला आठवलं, की आजी नेहमी म्हणायची, “पोरीची जात म्हणजे दिसायला बरी असावी लागते बाई!” ज्या दिवशी सुमीला सगळ्यात जास्त वेदना झाल्या होत्या,
तेव्हाही आजी हेच आणि एवढंच म्हणाली होती. सुमी दहा-अकरा वर्षांची होती तेव्हाची
गोष्ट. तिला आइस्क्रीम खावंसं खूप वाटत होतं म्हणून तिने आईचे पैसे घेतले आणि
गुपचूप बाहेर जाऊन आइस्क्रीम खाऊन आली. आईच्या लक्षात आलं तेव्हा सुमी म्हणाली, “मी
नाही घेतले पैसे.” आता मात्र तिच्या आईचा पारा चांगलाच चढला. आई स्वयंपाक करत
होती. तिने सांडशी उचलली. विस्तवात चांगली लाललाल तापवली आणि संतापाने सुमीला
म्हणाली, “बोलशील पुन्हा खोटं? याच जिभेने खोटं बोललीस ना?” आणि तिने सुमीच्या
जिभेला सरळ चटकाच दिला. सुमी जिवाच्या आकांताने किंचाळली. ऊर फुटून रडली. कित्येक
दिवस तिला नीट जेवता-खाताही येत नव्हतं. तेव्हा तिची आजी तिच्या आईला रागवली, “काही
अक्कल आहे का तुला? सांडशी चुकून ओठाला लागली असती, गालाला लागली असती, डाग राहिला
असता म्हंजे? पोरीची जात ती. बरी दिसायला नको?”
सुमीची दिवसभराची कामं
संपली होती. दिवसभर खूप गरम होत होतं, घामाच्या धारा लागत होत्या. संध्याकाळ होऊ
लागली तसं आभाळ भरून येऊ लागलं. एकेकजण घाईघाईने घरी जाऊ लागला, लागली. पण साहेब
कुठल्यातरी मोठ्या फोनकॉलवर तास झाला तरी बोलत होते. त्यामुळे ऑफिस बंद करता
येईना. ती अडकून पडली. जोराचा वारा सुटला. एकदम अंधारून आलं. विजा कडकडायला
लागल्या आणि वळवाचा रपरप पाऊस सुरू झाला. तिच्याकडे छत्री पण नव्हती. आता इथे किती
वेळ अडकून पडणार कुणास ठाऊक, असं तिला झालं. तेवढ्यात साहेब काम संपवून वरून खाली
उतरले. ड्रायव्हर म्हणाला, “साहेब, जाता जाता हिला घरी सोडून जाऊ या का? खूप दूर
नाही, तीन किलोमीटरच जायचं.” साहेबांनी मानेनेच त्याला परवानगी दिली आणि उपकृत केलं.
साहेब तसे मोठ्या मनाचेच होते.
भल्या थोरल्या जीपमध्ये
सुमी एकदम अवघडूनच बसली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं. जीप पुढे जाताना बाजूने
चालणाऱ्यांच्या अंगावर फर्रफर्र फवारे उडत होते. आता तर दिवेही गेले होते. पाच
मिनिटांत सुमीची वस्ती आली सुद्धा. गटारं पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत
होती. ड्रायव्हर म्हणाला, “इथं सोडू का? ह्याच्यापुढं गाडी जाणार नाही.” सुमीसाठी
हेच खूप होतं. ती घाईघाईने उतरली. तिने तिची झिरझिरीत ओढणी काही उपयोग नसताना
उगीचच डोक्यावर घेतली आणि गाडी वळवेपर्यंत ती त्या फाटक्या वस्तीत दिसेनाशी सुद्धा
झाली. साहेबांनी ही वस्ती पाहिली आणि त्या अंधुक प्रकाशातही त्यांना ओळख पटली. ते
वीस-बावीस वर्षांपूर्वी इथेच आले होते.
तेव्हा ते साहेब नव्हते.
तो तरुण जयंता होता, अमेरिकेत शिकून नुकताच परत आला होता. त्याला सूट-बूट घालून कुठल्या
कंपनीत नोकरी करण्याची अजिबात इच्छा नव्हती. जे मनापासून वाटतं, जे बदलायलाच हवं
तेच तो करणार होता. त्याचे काही जुने मित्र-मैत्रिणी मानवाधिकारासाठी झटत होते. असाच
एकदा एका मैत्रिणीचा फोन आला “तू येतोस का” म्हणून आणि जयंता ह्या वस्तीत आला
होता. कोण बरं तरुण होता त्या वस्तीतला? महादू. महादूला कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी
सरकारी लोक घेऊन चालले होते. त्याला पैसे देणार होते आणि त्याची बायको रडत होती.
जयंता हिरिरीने मध्ये पडला. जयंता कमालीचा स्वातंत्र्यवादी होता. महादूला एक मूल
होतं. त्यानंतर शस्त्रक्रिया करायची की नाही, हा निर्णय घेण्याचं त्याला आणि
त्याच्या बायकोला पूर्ण स्वातंत्र्य हवं. महादूसारखा दारुडा माणूस पैशासाठी तयार
होतो, तेव्हा त्याने खरंच स्वतंत्रपणे मनापासून निर्णय घेतला असं म्हणता येईल का? “लोकशिक्षण
करा, समजावून सांगा आणि निर्णय त्या माणसावर सोडा”; असं त्याचं स्पष्ट मत होतं.
जयंताने त्या सरकारी लोकांना हाकलून लावलं. महादूच्या बायकोने येऊन जयंताचे पायच
धरले होते! साहेबांना हे सगळं आठवून त्यांच्या डोळ्यांत अभिमान तरळू लागला. कुणी
आई-बाप व्हायचं आणि कुणी नाही, ह्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायलाच पाहिजे. महादू
अजून तिथेच राहत असेल का? सुमीला तो माहीत असेल का? साहेबांची जीप त्यांच्या घरी
पोहोचली.
महादूला नंतर वर्षभरातच
सुमी झाली. ती तीन वर्षांची असतानाच तो दारू पिऊन पिऊन रक्ताच्या उलट्या करून
मेला. सुमीच्या वाट्याला कुठलंच स्वातंत्र्य आलं नाही. व्यवस्थित खायला मिळण्याचं
स्वातंत्र्य. शरीराची धड वाढ होण्याचं स्वातंत्र्य. धुण्या-भांड्याची कामं न करता “नुसतं”
शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य. आईची मारहाण न सोसता लहान मूल असण्याचं स्वातंत्र्य.
जयंताचे प्रतिष्ठित स्वातंत्र्यवादी साहेब झाले आणि सुमीची नगण्य चिपाड मोलकरीण.
मन दुविधेत पडले. कोणाला स्वातंत्र्य कोणावर त्या मुळे दु:ख!
उत्तर द्याहटवाजयंता स्वत:ला स्वातंत्र्यवादी मानतो... आजही आणि त्याला समजलेलं नाही, की जिथे अगदी मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं, असा जीव निर्माण करण्यात त्याचा हातभार आहे.
हटवाहोय पण ती जवाबदारी सुमी च्या आई वडिलांची. You would be patronising someone by telling them to have/not have children. Surely?
उत्तर द्याहटवाSo where as onlookers we feel for Sumi, what is the right thing to do?! That’s why I felt torn.
उत्तर द्याहटवाTrue... my question is what would you choose? Jayanta and many like him are so sure of themselves.
उत्तर द्याहटवाThe fact that she had such a lousy life is a result of many circumstances that are very wrong. A lot of women are in that situation even without intervention of someone like Jayanta?
उत्तर द्याहटवाYes, but without addressing the circumstances, can you just focus on the freedom to choose (in isolation)? Should you fight for the freedom of irresponsible people? Especially, when someone else has to pay the cost?
उत्तर द्याहटवाI would be very wary of assuming I know better than someone else. By making that decision (Child or not child) for someone would be patronising in my view. I’d rather and more constructively advise the father to a rehab program. Taking this kind of freedom away is a short step from many more divisive decisions for a perceived irresponsible person. How and who would draw the line. I am torn from inside for Sumi. But the cause of that does not seem to be that she was born rather that the society is all worryingly wrong about some things..
उत्तर द्याहटवाI guess we differ on this :) :). Freedom comes with responsibility. It doesn't make sense for me to exercise the freedom if we (parents and the society) are unable to carry out the responsibility well.
उत्तर द्याहटवाIf the story is able to ask this question and makes feel torn, I feel good as a writer.