फ्रान्स डी वाल नावाचे डच-अमेरिकन इथॉलॉजिस्ट (प्राणी-वर्तनाचे अभ्यासक) आहेत. प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याला वाटतो तितका आणि तसा फरक आहे का, हे तपासायला लावणारं त्यांनी एक आगळंवेगळं आणि लांबलचक शीर्षकाचं पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे - Are We Smart Enough To Know How Smart Animals Are – प्राण्यांची हुशारी समजण्याइतके आपण हुशार आहोत का? माणसाला ज्या क्षमता “फक्त” स्वत:मध्येच आहेत असं वाटत आलं आहे, त्या आकस्मिक आलेल्या नसून त्याच्या खाणाखुणा वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये कशा दिसतात, त्याचे वेगवेगळे किस्से आणि प्रयोग ह्यात वाचायला मिळतात.
गेल्या शतकातल्या वैज्ञानिकांचा
प्राण्यांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास नव्हता. प्राण्यांना भावना असतात किंवा
त्यांच्या मनात हेतू असू शकतो असं मानणं अशास्त्रीय, स्वप्नाळू धरलं जायचं, लोककथा म्हणून हिणवलं
जायचं. प्राणी फक्त वर्तमानात जगू शकतात आणि भविष्याचा विचार करू शकत नाहीत, अशी
त्यांची ठाम समजूत होती. त्यात दोन विचारधारा होत्या. पहिली म्हणजे, प्राणी हे
घटनांना प्रतिसाद देणारं जणू यंत्र आहेत आणि ‘बक्षीस मिळवा’, ‘शिक्षा टाळा’ ह्या
दोन गोष्टींसाठीच ते काम करतात. दुसरी म्हणजे, जनुकांमधून ज्या सहजप्रेरणा आलेल्या
असतात, त्यावर चालणारं, स्वत: विचार करू न शकणारं यंत्र म्हणजे प्राणी. पण गेल्या
काही दशकांमध्ये वैज्ञानिक प्राणी-वर्तनाकडे मोकळ्या मनाने पाहू लागले आहेत. आपल्यामध्ये
आणि प्राण्यांमध्ये भिन्न प्रकारच्या बुद्धिमत्ता नसून एकाच प्रकारच्या
बुद्धिमत्तेमधली ही तफावत आहे, अशी नवी धारणा येऊ लागली आहे.
आपण जेव्हा प्राणी आणि
निसर्ग बघतो, अभ्यासतो तेव्हा त्या अभ्यासाला आपल्या दृष्टिकोनाच्या, आपल्या
प्रश्न विचारण्याच्या पद्धतीच्या मर्यादा पडतात. त्या त्या प्राण्याचं जग लक्षात न
घेता माणसाच्या चष्म्यातून पाहायला गेल्यावर गल्लत होते. उदाहरणार्थ, खारीला एक ते
दहा अंक मोजता येतात का, ह्यावरून तिची बुद्धिमत्ता तपासण्याला काहीच अर्थ नाही.
कारण तिच्या जगात अशा मोजणीची तिला आवश्यकताच भासत नाही. पण खारीचं लपवलेले दाणे
शोधण्याचं कौशल्य मात्र कौतुक करण्यासारखं आहे. क्लार्क्स नटक्रॅकर
किंवा क्लार्क्स क्रो म्हणून ओळखला जाणारा एक कावळ्यासारखा पक्षी आहे. तो शरद ऋतूत
पाइनच्या हजारो बिया (pine nuts) एक चौरस मैल एवढ्या मोठ्या भागात शेकडो
वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवतो आणि नंतर हिवाळ्यात बरोबर त्या शोधून खातो. ह्या
लपवण्या-शोधण्याच्या कौशल्यात आपला ह्या पक्ष्यापुढे किंवा खारीपुढे अजिबात निभाव
लागणार नाही! त्यामुळे प्रत्येक प्राण्याचं जग, त्याच्या गरजा आणि त्याची शरीररचना
हे सगळं विचारात घेऊन त्याच्या क्षमता अभ्यासायला हव्या, असं लेखक मानतात.
पुस्तकातल्या शेकडो प्रयोग आणि किश्शांपैकी मी काही थोड्यांचाच इथे उल्लेख करणार
आहे. मला जे विशेष भावले, ते इथे देत आहे.
आशियाई हत्तींना आरशात
स्वत:चं प्रतिबिंब ओळखता येतं. हॅपी नावाच्या एका हत्तीणीच्या कपाळावर डाव्या
डोळ्याच्या वर तिला नकळत एक पांढरी फुली मारली होती. आरशासमोर गेल्यावर ती स्वत:चं
प्रतिबिंब बघून पुन्हापुन्हा त्या फुलीला पुसायचा प्रयत्न करत होती. तिला आरशात
आपणच आहोत, हे नीट समजलं होतं! आफ्रिकन हत्तींबाबत मात्र हा प्रयोग फसला. त्यांना
सुळे असल्यामुळे ते सुळे आरशावर आपटून आरसे फुटले आणि प्रयोग नीट करता आला नाही.
त्यामुळे त्यांच्या क्षमतेबाबत नक्की काही सांगता येणार नाही. हत्तींबरोबरच एप्स
(चिंपांझी, गोरिला, ओरांगउटान इ.), कावळ्यासारखे असलेले मॅगपाय नावाचे पक्षी
ह्यांनाही स्वत:चं प्रतिबिंब समजतं. ह्याच्याही पुढे जाऊन काही एप्सना आरशात बघून
नटावंसं वाटतं. एका जर्मन प्राणिसंग्रहालयातली ओरांगउटान आरशासमोर उभी राहून
स्वत:ला झाडाच्या पानांनी सजवत असते! चिंपांझी इतर चिंपांझींचे फोटोही ओळखतात.
इतकंच नाही, तर अनोळखी चिंपांझींचे फोटो बघून त्यांना एका कुटुंबातले चिंपांझी
सुद्धा ओळखू येतात. एका प्रौढ चिंपांझीचा फोटो दाखवला आणि त्यानंतर दोन लहान
चिंपांझींचा फोटो दाखवला. त्या दोन लहानग्यांपैकी एक आधीच्या फोटोतलीचं पिल्लू
होतं. अशावेळी त्या आईचं जे पिल्लू आहे, तो फोटो चिंपांझी दाखवतात. पूर्णपणे अनोळखी
चिंपांझींचे फोटो बघून कोण कोणाची आई असेल, कोण कोणाचं बाळ असेल असा तर्क
चिंपांझींना जमतो! म्हणजेच त्यांना नुसते चेहरे ओळखता येत नाहीत, तर मनुष्यासारखी
चेहरेपट्टीची चांगली समज असते.
शंभर वर्षांपूर्वी हान्स
नावाचा घोडा जर्मनीत “हुशार हान्स” म्हणून खूप प्रसिद्ध होता. तो गणिताच्या
आकडेमोडी करायचा, अपूर्णांकाच्या क्रिया सुद्धा करायचा. जमिनीवर स्वत:चं खुर
वाजवून तो उत्तर सांगत असे. उदाहरणार्थ ६० भागिले ४ विचारल्यावर तो १५ वेळा खुर
वाजवत असे. हे त्याला कसं साध्य झालं? हान्सच्या क्षमतांचा नीट अभ्यास केल्यावर
असं लक्षात आलं, की प्रत्यक्षात तो त्याच्या प्रशिक्षकाच्या देहबोलीवरून उत्तर देत
असे. घोडा उत्तरापाशी आला, की प्रशिक्षकाचं ताणलेलं शरीर जरा सैलावायचं,
घोड्याच्या पायाकडे खाली पाहणारी मान वर व्हायची. (हे त्या प्रशिक्षकाच्याही नकळत
व्हायचं.) त्या देहबोलीतला हा बदल बघून घोडा खुर वाजवणं थांबवत असे! काही लोकांनी
ह्याला फसवणूक म्हटलं. पण खरं तर, प्रशिक्षकालाही हे कशामुळे घडतं आहे, त्याचा
पत्ता नव्हता. हान्स गणितात हुशार नसला, तरी देहबोली वाचण्यात मात्र नक्कीच पारंगत
निघाला!
प्राण्यांना अनुमान काढता
येतं का, ते बघणारा एक मजेदार प्रयोग दिला आहे. सेडी नावाच्या चिंपांझीसमोर
प्रयोगशाळेत एका डब्यात केळं आणि एका डब्यात सफरचंद ठेवलं. नंतर सेडीला वेगळीकडे
जरा नादी लावलं आणि मग तिला प्रयोगाशाळेतली एकजण केळं खाताना दिसली. नंतर सेडीला मोकळं
सोडलं तेव्हा तिने जाऊन सफरचंदाचा डबा उघडला! सेडीने दोन अनुमानं काढली होती. एक
म्हणजे, केळं खाणाऱ्या बाईने डब्यातून काढून केळं खाल्लं असणार (तिने प्रत्यक्ष
कुणाला केळं काढताना पाहिलं नव्हतं) आणि दुसरं म्हणजे सफरचंद डब्यात तसंच असणार.
हे काही ती अनुभवाने शिकली नव्हती. अगदी पहिल्याच प्रयोगात तिने असं अनुमान काढलं
आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयोगातही वेगवेगळे बदल केले तरी तिला अनुमान काढता
आलं. चिंपांझीला घटनाक्रम समजतो, तर्क लावून रिकाम्या जागा भरता येतात. चिंपांझी
राजकीय धोरण सुद्धा ठरवतात. सगळ्यात शक्तिमान चिंपांझी टोळीप्रमुख होतो, असं नाही.
छोट्या चणीचा असला, तरी बरेच मित्र आणि बहुतेकांचा पाठिंबा मिळवू शकणाऱ्याला ते पद
मिळणं सोपं जातं. म्हणून आघाड्या करण्यात, पाठिंबा मिळवण्यात ते बराच वेळ आणि
शक्ती खर्च करतात.
कावळे माणसांचे चेहरे
ओळखतात. ज्या माणसांनी प्रयोगासाठी कावळ्यांना पकडून लेबल लावून पुन्हा सोडलं आहे,
त्या माणसांवर कावळे चांगलाच राग काढताना दिसतात. विद्यापीठातल्या शेकडो
माणसांच्या गर्दीतही अशा लोकांना कावळे बरोबर ओळखतात. इतकंच नाही, तर ज्या
कावळ्यांना कधी पकडलं नव्हतं, तेही ह्या लोकांवर चिडलेले असतात आणि त्रास देतात.
म्हणजे कुठली माणसं वाईट आहेत, हे इतर कावळ्यांकडून ते शिकत असतात! मेंढ्याही
एकमेकींचे चेहरे ओळखतात आणि लक्षात ठेवतात. गांधीलमाश्यांचा (wasp) मेंदू खूपच
छोटा असतो, तरी त्या एकमेकींना ओळखतात. चेहरा ओळखण्याची त्यांच्यामध्ये काही वेगळी
व्यवस्था असण्याची शक्यता आहे.
जंगलातल्या चिंपांझींच्या
टोळ्या उपकरणं (tools) तयार करून वापरतात, एकमेकांकडून शिकतात आणि पुढच्या पिढ्या
त्यात सुधारणाही करतात. प्रत्येक टोळी १५ ते २५ प्रकारची वेगवेगळी उपकरणं वापरते.
त्या त्या टोळीची संस्कृती आणि आजुबाजूचा परिसर यानुसार ही उपकरणं बदलतात. गोरिला,
बोनोबो आणि ओरांगउटान असे एप्स तर उपकरणं वापरतातच. त्याखेरीज कावळेही काटक्यांचे
हूक तयार करून हुमण्या पकडतात. इंडोनेशियाजवळच्या समुद्रातले ऑक्टोपस नारळाच्या
करवंट्या गोळा करून ठेवतात. भविष्यात गरज पडेल तेव्हा त्यांचा लपण्यासाठी छलावरण (camouflage) म्हणून ते उपयोग
करतात!
अलेक्स नावाच्या आफ्रिकन
ग्रे पोपटाच्या क्षमता सगळ्यात जास्त थक्क करणाऱ्या आहेत. अलेक्सला रंग, आकार,
वस्तूसाहित्य (लोकर/प्लास्टिक/कागद) ह्यांची तुलना करता यायची आणि मोजताही यायचं.
उदा. एखाद्या ताटात तीन लाल त्रिकोण, चार निळे चौकोन, सहा हिरवे गोल असतील आणि त्यावर
प्रश्न विचारले तर “चौकोन किती आहेत” किंवा “कुठल्या रंगात तीन आहेत” ह्यांची
उत्तरं तो देत असे. तो नुसतं अनुकरण करायचा नाही (पोपटाबाबत तसा समज आहे) किंवा
लक्षात ठेवायचा नाही, तर त्याला आकलन होत असे. त्याच्याबद्दलच्या ह्या चित्रफिती
प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे.
https://www.youtube.com/watch?v=P3w6OYsKJCc
https://www.youtube.com/watch?v=ldYkFdu5FJk
माणसात दिसणारा
सहानुभूती, अडचणीत असणाऱ्याला मदत करणे हा गुण एप्स, डॉल्फिन ह्यांच्यामध्ये दिसून
येतो. कापुचिन माकडांमध्येही हे दिसून येतं. ही माकडं झाडावर राहतात. एखादी गरोदर
माकड जर खाली यायला तयार नसेल, अवघडली असेल तर इतर माकडं जास्त अन्न गोळा करतात
आणि तिला वरती नेऊन देतात. प्रयोगशाळेतही जर एकाच कापुचिन माकडाला अन्न दिलं, तर
तो ते दुसऱ्याबरोबर वाटून घेऊन खातो.
भूतकाळातल्या गोष्टी
लक्षात ठेवणे, त्यानुसार भविष्याची आखणी करणे हे सुद्धा प्राण्यांमध्ये दिसतं.
दुष्काळात पूर्वी पाहिलेलं, कुणाला माहीत नसलेलं एखादं लांबवरचं पाण्याचं ठिकाण
कळपातल्या सगळ्यात मोठ्या, वृद्ध हत्तीणीला माहीत असतं. तिच्यावर विश्वास ठेवून
सगळा कळप पाण्यासाठी दिवसेंदिवस चालत तिथे पोहोचतो. एखाद्या ठिकाणी अन्न मिळणार
असेल तर लांब राहणारी चिंपांझींची टोळी
जवळ राहणाऱ्या टोळीपेक्षा जास्त लवकर उठते
आणि दोन्ही टोळ्या साधारण सारख्याच वेळेला तिथे अन्न गोळा करायला पोहोचतात.
म्हणजे अंतर, प्रवासाला अपेक्षित वेळ आणि नियोजन हे सगळं त्यांना जमलेलं आहे. काही
पक्ष्यांमध्येही ह्या क्षमता दिसून येतात.
अजून एक आपल्याला खास
माणसाचा वाटणारा गुण म्हणजे संतोष-विलंब (delay of gratification). नंतर मिळणाऱ्या
फळासाठी आत्ता संयम बाळगणे, मनावर ताबा ठेवणे. पण हा गुणही एप्स, कावळे अशा काही
प्राण्यांमध्ये दिसून येतो. ग्रिफिन नावाच्या आफ्रिकन ग्रे पोपटावर ह्यासाठी
प्रयोग केले गेले. ग्रिफिनला डाळ दिली आणि “थांब” म्हणून सांगितलं आणि दहा
सेकांदापासून ते पंधरा मिनिटांपर्यंत (ही वेळ दरवेळी बदलत असे) जर तो डाळ न खाता
राहिला, तर त्याला काजू मिळत! नव्वद टक्के वेळेला ग्रिफिनला हा संतोष-विलंब जमला.
त्यासाठी तो वेगवेगळ्या युक्त्या वापरत असे. कधी तो डाळीची वाटी लांब सरकवून देई,
कधी स्वत:शीच बोलून वेळ काढत असे, कधी डोळे मिटून बसत असे तर कधी प्रयोग
करणाऱ्याकडे बघून ओरडत असे, “काजू द्या!”
पाठीचा कणा असलेल्या
प्राण्यांबद्दल बऱ्याचदा आपल्याला माहीत असतं, पण पाठीचा कणा नसलेला, अगदी वेगळा
आणि हुशार प्राणी म्हणजे ऑक्टोपस. आपल्या आणि ऑक्टोपसच्या मेंदूत काही साम्य
नसतं. ऑक्टोपसच्या डोक्यात एक (शरीराच्या मानाने मोठा) मेंदू असतोच. त्याखेरीज प्रत्येक
पायात छोटासा मेंदू असल्यासारखं असतं. प्रत्येक पाय स्वत: निर्णय घेऊ शकतो!
ऑक्टोपसला जर फिरवून झाकण लावायच्या बरणीत ठेवलं, तर तो एका मिनिटात झाकण फिरवून
उघडतो आणि बाहेर येतो. तो त्याला खाऊ घालणाऱ्या माणसाला ओळखतो. सरड्यापेक्षा जास्त
पटापट रंग बदलतो आणि खडक, वनस्पती, वेगवेगळे मासे अशी कितीतरी रूपं धारण करून अगदी
सहज फसवतो! एका प्रयोगात प्राणिसंग्रहालयातला एक माणूस ऑक्टोपसला खाऊ
घालत असे आणि दुसरा कधी कधी छोट्या काडीने हळूच टोचत असे. काही दिवसातच काडी
टोचणारा माणूस दिसला, की तो ऑक्टोपस त्याच्या दिशेने पाण्याचे फवारे उडवू लागला,
दूर जाऊ लागला आणि रंग बदलू लागला. खाऊ घालणाऱ्या माणसाकडे मात्र तो सहज जात असे.
दोघेही संपूर्ण निळ्या रंगाच्या सारख्याच पोषाखात असले, तरी ऑक्टोपस त्यांना बरोबर
ओळखत असे.
माणसाचा मेंदू मोठा आहे
आणि त्याच्यामध्ये चेतना (consciousness)
आहे. प्रौढ मनुष्याच्या मेंदूचं वजन साधारणपणे १.३५
किलो (दीड किलोच्या जवळ) असतं. डॉल्फिनचा मेंदू १.५ किलो वजनाचा, हत्तीचा चार
किलोचा आणि स्पर्म व्हेलचा ८ किलो वजनाचा असतो. मग ह्या प्राण्यांमध्ये
माणसापेक्षा जास्त चेतना आहे का? की चेतना असणं हे मेंदूच्या वजनाऐवजी
मज्जापेशींच्या (neurons) संख्येवर अवलंबून असतं? हत्तीच्या मेंदूत माणसाच्या मेंदूच्या
तिप्पट मज्जापेशी आहेत. पण हत्तीच्या आणि माणसाच्या मेंदूतल्या मज्जापेशींचं वितरण
मात्र वेगवेगळं आहे. एकूणच मेंदू विज्ञानातली बरीच उत्तरं अजून मिळालेली नाहीत.
आजवरचं बुद्धीच्या उत्क्रांतीवरचं काम आणि अभ्यास हा मुख्यत: प्राण्यांच्या
वागण्यावर आणि आपल्या निरीक्षणावर आधारित आहे. पण आता हे बदलू लागलं आहे. येत्या
काही दशकांमध्ये मेंदूविज्ञान ह्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेंदूच्या
कोणत्या रचनेमुळे प्राण्याच्या वागण्यात कोणता बदल होतो, हे समजू शकेल. मनुष्याला
प्रमाण मानून सगळं जग बघण्यापेक्षा प्रत्येक प्राण्याकडे त्याच्या अस्तित्वाच्या
दृष्टीने पाहिलं, तर एक नावीन्याचं, विस्मयाचं नवं दालन उघडू शकेल.
ह्या पुस्तकात लेखकाने
मुख्यत: प्राण्यांचं वागणं, प्रयोग आणि निरीक्षण ह्यावर भर दिला आहे. त्या
वागण्यामागचं विज्ञान फारसं सांगितलेलं नाही. त्यामुळे हे पुस्तक सामान्य वाचकाला
समजायला सोपं आणि मनोरंजक झालं आहे. प्राण्यांना यंत्रवत मानू नका, त्यांना भावना,
बुद्धी असते; त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगा असं लेखक वारंवार सांगतो. ते अगदी
खरंच आहे. पण माझ्या भारतीय मनाला अशा विचाराची विशेष नवलाई वाटली नाही.
मस्त माहिती..👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवायाचा मराठी अनुवाद आहे का?
उत्तर द्याहटवामाझ्या माहितीनुसार अनुवाद झालेला नाही.
उत्तर द्याहटवा