गुरुवार, ३० जुलै, २०२०

हळूच चावी मारण्याची जादू – नज

वर्तणूक अर्थशास्त्रातल्या (behavior economics) कामासाठी २०१७ साली रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. अर्थशास्त्र आणि मानसशास्त्रातला पूल त्यांनी बांधला असल्याचं म्हटलं जातं. थेलर ह्यांनी कॅस सनस्टाइन यांच्यासमवेत Nudge नावाचं चांगल्या निर्णयांसाठी काय काय करता येईल, त्याबद्दल रोजच्या व्यवहारात उपयोगी पडणारं एक चांगलं पुस्तक लिहिलं आहे. Nudge म्हणजे अगदी हलकासा धक्का, आपण ज्याला हळूच चावी मारणं म्हणतो तसा! लोकांनी चांगले निर्णय घ्यावेत म्हणून का आणि कोणत्या चाव्या मारता येतील, ह्याबद्दल हे पुस्तक आहे. अगदी छोट्या-छोट्या, क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचा आपल्या निर्णयांवर कसा प्रभाव पडतो, ते वाचून आपण थक्क होतो.


पुस्तकाच्या सुरुवातीला वर्तणूक अर्थशास्त्रातल्या काही संकल्पना आणि शब्द स्पष्ट केले आहेत. त्यानंतर काही तत्वे स्पष्ट केली आहेत आणि शेवटी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा वापर कसा करता येईल ते सांगितलं आहे. सुरुवातीलाच  निवड रचनाकार’ (choice architect) असा नवा शब्द आपल्याला समजतो. गोष्टी कशा मांडल्या आहेत, त्यांची रचना कशी आहे; त्याचा माणसाच्या निर्णयावर, निवडीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, शाळेच्या कॅन्टीनमध्ये मेनू अजिबात न बदलता कुठे कोणता पदार्थ ठेवला आहे, त्याच्या फक्त जागा बदलल्या तरी मुलांनी खाण्यासाठी काय निवडलं, त्यात २५% बदल दिसून आला. म्हणजेच मांडणी, रचना बदलून लोकांच्या निवडीवर प्रभाव टाकता येतो. असे प्रभाव टाकणारे, रचना ठरवणारे सगळे लोक “निवड रचनाकार” असतात. आपण बरेचजण बऱ्याच वेळा निवड रचनाकार असतो आणि आपल्याला ते माहीतही नसतं! कोणता अभ्यासक्रम निवडायचा त्याचे पर्याय मुलांना सांगणारे पालक, रुग्णांना वेगवेगळ्या उपचारपद्धती सांगणारे डॉक्टर किंवा निवडणुकीत मतपत्रिका तयार करणारे लोक हे सगळे खरं म्हणजे निवड रचनाकारच असतात. कधी कळत, कधी नकळत.

लेखकांच्या मते “तटस्थ रचना” अशी काही नसतेच. प्रत्येक छोट्या गोष्टीचा कसा प्रभाव पडतो, ते बऱ्याच उदाहरणांनी दाखवलं आहे. जसं वास्तुरचनाकाराला इमारतीसाठी कुठलीतरी एक रचना ठरवावीच लागणार आहे, तसंच कॅन्टीन चालवणाऱ्यालाही पदार्थांची कुठली ना कुठली मांडणी करावीच लागणार आहे आणि तिचा प्रभाव पडणं अटळ आहे. मग ती मांडणी ठरवताना मुलं जास्त पौष्टिक पदार्थ निवडतील, अशा पद्धतीने का करू नये? म्हणजेच पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी मुलांना एक हलकासा धक्का, हळूच चावी का मारू नये? आणि मग आपली पुढच्या संकल्पनेशी ओळख होते, “स्वातंत्र्यवादी पालकवाद” (libertarian paternalism). ही या पुस्तकातली मध्यवर्ती संकल्पना आहे. पालकवाद म्हणजे पालकत्वाच्या भूमिकेतून दुसऱ्याच्या चांगल्यासाठी त्याच्या वर्तनाचं नियंत्रण करत असल्याचा दावा’ करणं. सरकारने खूप जास्त नियम करणं, हा लोकांना पालकवाद वाटतो. ह्यात लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो. मग पालकवाद स्वातंत्र्यवादी कसा असेल? ह्यात विरोधाभास नाही का? लेखकांच्या मते, या संकल्पनेत लोक निवड करायला स्वतंत्र आहेत. लोकांना स्वत:लाच ज्या गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या वाटतात, त्यासाठी त्यांना उद्युक्त करावं, तशी रचना करावी; पण निवडीचं स्वातंत्र्य अबाधित राखावं म्हणजे ‘स्वातंत्र्यवादी पालकवाद’.

स्वातंत्र्यवादी पालकवादाचं एक उत्तम उदाहरण अवयव दानाबद्दल आहे. जास्तीत जास्त लोकांनी अवयव दान केलं पाहिजे, हे तर खरंच आहे. प्रत्येक देशात लाखो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. खूप लोकांचा प्रतीक्षेत असतानाच मृत्यू होतो. अमेरिकेसारख्या देशांत चालक परवान्याच्या अर्जावर (driving license) “अवयव दानासाठी माझी संमती आहे” असं एक कलम लिहिलेलं असतं आणि त्या पुढे तुम्ही जर लिहिलं, तर तुमची संमती आहे, असं मानलं जातं. जर्मनीतही असंच आहे. याउलट काही देशांमध्ये (उदा. ऑस्ट्रिया) अवयव दानासाठी माझी संमती नाही” असं कलम असतं आणि तुम्ही जर लिहिलं, तर तुमची संमती नाही असं मानलं जातं. म्हणजे दोन्हीकडचा आपसूक पर्याय (default option) एकमेकाच्या विरुद्ध आहे. अमेरिकेत आणि जर्मनीत तुम्ही काहीच केलं नाही, तर तुमची संमती नाही असं मानतात. पण ऑस्ट्रियात मात्र तुम्ही स्वत:हून नकार दिला नाही, तर तुमची संमती गृहित धरली जाते. जर्मनीत फक्त १२% लोकांनी अवयव दानाला संमती दिली आहे, तर ऑस्ट्रियात ९९% लोकांनी! फक्त आपसूक पर्याय बदलून आणि अर्जाची रचना बदलून केवढा प्रचंड फरक पडू शकतो! मनुष्य स्वभावात बरंच जडत्व असतं. ‘आहे ते असू दे, कशाला बदलायचं’ अशी वृत्ती असते. त्याचा विचार करून रचना करता येते आणि जास्तीत जास्त लोकांना अवयव दानासाठी उद्युक्त करता येतं. लोकांना कुठल्या दिशेला वळवायचं, ते ठरवणारा पालकवाद इथे आहे. पण तो खूप सौम्य आणि स्वातंत्र्य हिरावून न घेता, काहीही न लादता आलेला आहे.

“दुसऱ्याने काय करायचं ते तुम्ही ठरवू नका”, असं स्वातंत्र्यवादी लोकांचं म्हणणं असतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा पालकवाद मान्य नसतो. अशा टीकाकारांना लेखकांनी तीन मुद्दे सांगितले आहेत. पहिला म्हणजे, लोक नेहमी स्वत:च्या भल्याचा, तर्कसंगत निर्णय घेऊ शकतात, हा मोठाच भ्रम आहे. दुसरा असा, की लोकांच्या निर्णयावर प्रभाव न टाकणं, ही अशक्य गोष्ट आहे. जे काही धोरण असेल, जी काही रचना असेल तिचा प्रभाव पडणारच आहे. तिसरा मुद्दा असा, की पालकवाद म्हणजे जबरदस्ती असं दरवेळी नसतं. स्वातंत्र्य मान्य करणारा, जबरदस्ती न करणारा पालकवाद आपण मोकळ्या मनाने बघितला पाहिजे.

माणूस कसा विचार करतो आणि कसा निर्णय घेतो, ह्याबद्दल विस्ताराने आणि उदाहरणं देऊन या पुस्तकात लिहिलं आहे. हा भाग बराचसा डॅनियल कहनेमन आणि अमोस ट्वरस्की ह्यांच्या अभ्यासावर आधारित आहे. निर्णय घेताना भावनांचा कसा परिणाम होतो, आधी ऐकलेल्या गोष्टीचा पुढच्या संबंध नसलेल्या गोष्टीवरही कसा प्रभाव पडतो असे बरेच मनोरंजक प्रयोग वाचायला मिळतात. इथे मोजक्याच गोष्टी देत आहे. पहिलं म्हणजे, माणसाला आपल्या क्षमता आहेत त्यापेक्षा जास्त वाटत असतात. अमेरिकेतल्या ९०% वाहनचालकांना ते सरासरीपेक्षा जास्त चांगले चालक आहेत, असं वाटतं (इथे लक्षात घेतलं पाहिजे, की सरासरीची व्याख्याच अशी आहे की सुमारे ५०% लोक सरासरीच्या वर आणि ५०% सरासरीच्या खाली असतात). तसंच ९४% प्राध्यापकांना ते सरासरीपेक्षा जास्त चांगलं शिकवतात असं वाटतं. अजून एक मनोरंजक गोष्ट म्हणजे माणसाच्या मनात फायद्यापेक्षा तितक्याच किमतीच्या तोट्याचं महत्त्व दुप्पट असतं. उदाहरणार्थ, वीज वाचवलीत तर वर्षाला तुमचे वीस हजार रुपये वाचतील” असं सांगण्याऐवजी “वीज वाचवली नाहीत, तर वर्षाकाठी तुम्ही वीस हजार रुपये गमवाल, तुमचं वीस हजाराचं नुकसान होईल” असं सांगितल्यावर लोकांचा वीजवापर बराच कमी होतो.

माणूस कसा निर्णय घेतो, त्याच्यावर कशाकशाचा आणि कुणाकुणाचा प्रभाव पडतो हे समजून घेतलं तर शासन, वेगवेगळ्या संस्था किंवा कंपन्या लोकांना चांगल्या (किंवा वाईट!) कामांसाठी उद्युक्त करू शकतात, त्यासाठी हलके धक्के देऊ शकतात. त्याचा वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल. चांगलं आरोग्य, चांगली आर्थिक परिस्थिती, पर्यावरण अशा कितीतरी क्षेत्रांत चांगल्या रचना करून सुधारणा होऊ शकतील. पैशांच्या बाबतीत बचत कशात करावी, निवृत्तीनंतरची व्यवस्था काय, भविष्य निर्वाह निधी इ. गोष्टी सामान्य माणसाला निर्णय घेण्यासाठी सोप्या नाहीत. ह्यात जास्तीत जास्त माहिती सोप्या स्वरुपात उपलब्ध करायला हवीच. शिवाय, कंपन्यांनी भविष्याच्या बचतीचे योग्य आपसूक पर्याय (default options) दिले पाहिजेत. आरोग्याच्या बाबतीतही काय काय करता येईल, त्याच्या नव्या कल्पना वाचायला मिळतात. उदा. - आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्या नियमित व्यायामशाळेत जाणाऱ्यांना काही सूट देऊ शकतात. चांगलं आरोग्य राखण्यासाठी ही एक उत्तम रचना आहे. त्यातून लोकांबरोबरच विमा कंपनीलाही फायदा होणार आहे.

पर्यावरणासाठी एका स्वतंत्र विभागात बऱ्याच कल्पना सुचवल्या आहेत. उदा. कीटकनाशक, खतं आणि इतर फवाऱ्यांवर त्यातले धोके आणि परिणामांची स्पष्ट माहिती लिहिणे. वातानुकूलनावर (A.C.) त्याच्या तपमानाबरोबरच त्याने वीज किती घेतली ते दाखवण्याची व्यवस्था करणे. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी खूप प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची “काळी यादी” तयार करून जाहीर करणे. प्रत्येक कंपन्यांचे उत्सर्जनाचे आकडे सरकारी संकेतस्थळावर जाहीर करण्याचा कायदा करणे. प्रत्येक गाडीच्या मागे जिथे गाडीचा क्रमांक असतो, तिथेच त्या गाडीतून काय किती उत्सर्जन होतं, त्याचे आकडे दिसण्याची व्यवस्था असणे. अशा बऱ्याच दिसायला साध्या-सोप्या गोष्टी सुद्धा खूप काही परिणाम साधू शकतात! आपण हे सगळं ताबडतोब करायला हवं, असं वाटून जातं.

पुस्तकाच्या शेवटी वेगवेगळ्या छोट्या छोट्या चाव्यांची (nudges) बरीच यादी दिली आहे आणि अशा अनेक कल्पनांसाठी www.Nudges.org हे संकेतस्थळही केलेलं आहे. आपल्याला जर अशा काही नवीन कल्पना सुचल्या तर आपणही ह्या संकेतस्थळावर जाऊन त्यात भर घालू शकतो. अजून एका Stikk.com नावाच्या संकेतस्थळाचीही माहिती मिळते. आपण स्वत:च केलेले निश्चय तडीस नेण्यासाठी हे संकेतस्थळ आहे. पैसे भरून (किंवा न भरता) आपला शब्द पाळण्याच्या इथे काही युक्त्या आहेत. उदाहरणार्थ, एखाद्याला वजन कमी करायचं असेल किंवा धुम्रपान सोडायचं असेल, तर तसा निश्चय करून तिथे काही पैसे भरायचे आणि तो निश्चय तडीस गेला, तर पैसे परत मिळणार. नाहीतर ते पैसे एका सेवाभावी संस्थेला देणगी म्हणून जाणार. ह्या गोष्टी गटाने किंवा पैसे न भरता करण्याच्याही काही योजना आहेत. स्वत:च स्वत:ला चावी मारण्याची ही सोय आहे.

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात, नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रत्येक गोष्टीसाठी खूप सारे पर्याय उपलब्ध असताना निवड करणं बऱ्याचदा क्लिष्ट होऊन बसतं. शिवाय खूप वेळा आपल्याला चांगलं वाटतं तेही तडीला नेणं जमत नाही. अशा काळात आपल्या स्वातंत्र्याला धक्का न लावता चांगल्या गोष्टींना उद्युक्त करणाऱ्या रचना हव्या आहेत, असं लेखक मानतात. पण ह्याच तत्त्वांचा कुणी गैरवापर केला तर? लेखकांना वाटतं, की असा गैरवापर आज ना उद्या लक्षात येतोच आणि तसं करणाऱ्यांना त्याचे परिणामही भोगावे लागतात.

माझ्यासाठी तरी मला हे पुस्तक वाचताना नव्या संकल्पना, कल्पना आणि बऱ्याच युक्त्या शिकायला मिळाल्या. “आपण असं का करतो” अशी काही बाबतीत स्पष्टताही मिळाली. मुख्य म्हणजे, वेगळं काय करता येईल, छोट्या छोट्या गोष्टींनी काय बदलता येईल अशा दिशेने विचार करायची सुरुवात झाली.

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा