डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहायला घेतले आहेत. आज तिसरा भाग.
भाग ३ : कोण नियंता आहे?
भाग ३ : कोण नियंता आहे?
आपण ज्या गोष्टी करतो, जे
निर्णय घेतो, आपले विचार, आपल्या श्रद्धा हे सगळं कोण ठरवतं? ह्या सगळ्याची सूत्रं
आपल्या मेंदूच्या अज्ञात, अबोध भागात (unconscious) असतात आणि आपल्याला त्याची
जाणीवही नसते. आपण जेव्हा झोपेतून जागे होतो, तेव्हा आपल्या मेंदूचा ज्ञात भाग (conscious),
जाणिवा जाग्या होतात आणि आपल्याला वाटतं, की आपल्या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण
ह्या ज्ञात भागाकडेच आहे!
आपल्याला ज्या सहज वाटतात
आणि आपण ज्या आपोआप करतो, त्या सगळ्या गोष्टी खरं तर अवघड असतात आणि मेंदूचा अबोध
भाग त्या करत असतो आणि ते आपल्याला जाणवतही नाही. उदा. चालणे, सायकल चालवणे,
क्रिकेट खेळताना समोरचा चेंडू क्षणार्धात बरोब्बर मारणे. जर आपल्या मेंदूचा ज्ञात
भाग ही कामं करू लागला, तर त्याला चेंडू बघून निर्णय घ्यायला आणि हात हलवायला खूप
वेळ लागेल आणि कष्ट पडतील. तोवर चेंडू कुठल्या कुठे निघून जाईल! आपल्या सर्व
शारीरिक क्रिया किंवा खेळ खेळणे ह्यांत तोल, अंतर आणि वेगाचं भान, स्नायूंच्या
हालचाली, त्यांचा ताळमेळ हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचं असतं. पण आपल्या ज्ञात
मेंदूला ते जाणवत नाही.
एका छोट्या मुलाचं उदाहरण
दाखवलं आहे. ८-१० वर्षांचा मुलगा २-३ वर्षं सराव केल्यामुळे पाच सेकंदांमध्येच
कपांचा एक विशिष्ट मनोरा रचतो. त्याच्याच शेजारी ईगलमन स्वत: तसाच मनोरा रचत असतात.
त्यांना मात्र हे करायला जास्त वेळ आणि प्रयत्न करावे लागतात. दोघांच्याही मेंदूचा
आलेख (EEG) घेतला जातो. त्यात ईगलमन यांच्या मेंदूत बऱ्याच क्रिया होताना दिसतात,
तर त्या मुलाचा मेंदू मात्र विश्रांतीच्या स्थितीत दिसतो. पाच सेकंदाइतक्या वेगाने
करण्यासाठी खरं तर त्याने जास्त क्रिया करायला हव्या होत्या ना? पण तसं होत नाही.
बराच काळ सराव केल्यामुळे मनोरा रचण्याचं कौशल्य त्या मुलाच्या अंगवळणी (खरं म्हणजे
मेंदुवळणी) पडलेलं आहे. मेंदूच्या रचनेत त्यासाठी आवश्यक बदल झालेले आहेत आणि
म्हणून त्याला त्यासाठी फारशा क्रिया कराव्या लागत नाहीत.
चालण्यापासून ते गाठ
बांधण्यापर्यंतच्या रोजच्या शेकडो गोष्टी आपल्या अशाच मेंदुवळणी (hard-wired)
पडलेल्या आहेत, आपल्या मेंदूच्या रचनेत त्यासाठी बदल झालेले आहेत. आपण ह्या गोष्टी
(शिकून झाल्यावर) जाणीवपूर्वक करत नाही. आपल्या मेंदूचा अज्ञात भाग त्या आपल्या
नकळत करत राहतो. असामान्य कष्ट आणि सराव करून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्या मेंदूत भिनू शकतात, मेंदूच्या
रचनेचा भाग होऊ शकतात. कुठलाही दोर किंवा मदत न घेता शेकडो फूट उंचीच्या कडे-कपारी
चढणाऱ्या माणसाचं उदाहरण दाखवलं आहे. विचार न करता, भीतीची जाणीव न होता, आपोआप
असं चढणं त्याला साध्य झालेलं आहे. अशा स्थितीला बरेचसे मोठमोठे खेळाडू, वादक,
कलाकार पोहोचत असतात. त्यांच्या कलेत, खेळात ते संपूर्णपणे बुडून जाऊ शकतात.
ध्यानस्थ बसल्यावरही अशी अवस्था प्राप्त होते – तंद्री, समाधी लागलेली अवस्था. त्यात
परमानंद अनुभवता येतो.
बऱ्याचदा आपल्याला आपण
जाणीवपूर्वक, विचार करून निर्णय घेतो आहोत असं वाटत असतं. पण प्रत्यक्षात आपला
अज्ञात, अबोध भाग त्या निर्णयांना दिशा देत असतो. ह्याबाबतचे मनोरंजक प्रयोग
दाखवले आहेत. काही गोष्टी ऐकून आपण चांगलेच चकित होतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या
आईबद्दल बोलताना गरम कॉफीचे घुटके घेत असू तर जास्त आपुलकीने बोलतो आणि थंड कॉफी
घेत असू तर (तुलनेने) कमी आपुलकीने बोलतो. पेयाच्या उबेचा नात्याच्या भावनेवर
परिणाम होतो. तसंच आपण जर शेजारी सॅनिटायझर घेऊन बसलो असू, तर आपली राजकीय मतं जरा
पुराणमतवादाकडे (conservative) झुकू लागतात. सॅनिटायझरमुळे आपली बाहेरच्या धोक्यांची
जाणीव तीव्र होते.
आपल्या मेंदूचा अज्ञात,
अबोध भाग एवढं नियंत्रण ठेवतोच आहे, तर आपण फक्त आपोआप चालणारे नेणिवेतलेच प्राणी
का नाही झालो? हा ज्ञात भाग, ह्या जाणिवा कशासाठी आल्या? जेव्हा काही अनपेक्षित
सामोरं येतं, तेव्हा ह्या ज्ञात भागाची गरज पडते. तो अंदाज घेतो, अर्थ लावतो.
समोरची नवी गोष्ट संधी आहे की धोका, ते ठरवतो. त्याखेरीज आपल्या मनातली जी आंदोलनं,
द्विधा मन:स्थिती असते, त्यात निर्णय घेण्याचं काम ह्या जाणिवा, ज्ञात भाग करतो.
म्हणजे आवडता पदार्थ दिसतो आहे पण डॉक्टरांनी आहार नियंत्रण सांगितलं आहे, अशावेळी
हा भाग निर्णय घेतो. एखाद्या मोठ्या कंपनीचा किंवा संस्थेचा प्रमुख असल्यासारखा हा
भाग मेंदूच्या वेगवेगळ्या भागात जे मतभेद असतात, त्याचा निवाडा करतो. अत्यंत
गुंतागुंतीच्या क्लिष्ट अशा मेंदूच्या कामाचा आरसा म्हणून हा ज्ञात भाग काम करतो
आणि भविष्याचं नियोजनही करतो. ह्या भागाच्या ह्या क्षमतांमुळेच माणूस हा
पृथ्वीवरचा सर्वांत सामर्थ्यशाली प्राणी ठरला आहे.
आपण जो विचार करतो, जे
निर्णय घेतो, ते आपल्या मेंदूवर अवलंबून असतं. आपल्या मेंदूची रचना आपली जनुकं आणि
आजुबाजूच्या वातावरणानुसार घडते. आपलं कुटुंब, शाळा, परिसर, संस्कृती, संस्कार आणि
आपली जनुकं अशा सगळ्याच्या समुच्चयातून आपला मेंदू घडतो आणि तो आपले विचार आणि वर्तणूक
ठरवतो. म्हणजे आपलं स्वातंत्र्य खरं तर खूपच मर्यादित असतं आणि आपण कुठे जन्मलो
ह्यावर खूप काही अवलंबून असतं. आपल्याला खरोखरी मुक्त इच्छा (free will) तरी आहे
का? की हे सगळं आपल्या मेंदूत कोरल्यानुसार होतं आहे? ह्यावर निर्णायक प्रयोग अजून
तरी आपल्याला करता आलेला नाही आणि म्हणून हा मुक्त इच्छेचा प्रश्न अनुत्तरितच आहे.
आपल्याला जेवढं आकाश
दिसतं तेच विश्व आहे, असं पूर्वी माणसाला वाटत असे. पण आता आपल्याला विश्वाच्या
अमर्यादतेची ओळख झाली आहे. तसंच आपल्या मेंदूच्या ज्ञात भागापलीकडे एक “आतलं”
अथांग विश्व आहे आणि आता कुठे आपल्याला त्याची फक्त झलक माहीत झाली आहे. थोडक्यात,
पिक्चर अभी बाकी है!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा