डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहिले आहेत. आज हा शेवटचा भाग.
हजारो वर्षं आपण एकसारखं
जगलो – जन्मलो, मर्यादा असलेल्या नश्वर शरीरात जगलो आणि मेलो. पण आता आपण अशा
टप्प्यावर पोहोचलो आहोत, की आता आपलं वास्तव विस्तारू शकतं. आपल्या पंचेंद्रियांनी
जग समजून घ्यायची जी छोटी खिडकी दिली आहे, ती मोठी करण्याच्या क्षमता आपल्याला
गवसू लागल्या आहेत. आपण पुढे कोण होणार, हे आता आपणच ठरवू शकू. उत्क्रांतीची वाट
बघावी लागणार नाही.
हे सहा भाग (आणि पुस्तक) इथे संपतात. पण आपल्यासाठी मात्र स्वत:कडे, जगाकडे आणि भविष्याकडे नव्या दृष्टीने बघायची सुरुवात होते. एक अस्वस्थ सुरुवात.
भाग ६ : भविष्यात आपण कसे
असू?
गेल्या लाख वर्षांत
माणसाने पृथ्वीवर कमाल केली आहे. शिकार करून गुहेत राहण्यापासून ते आजचा अंतराळात
जाऊ शकणारा, भव्य इमारती बांधू शकणारा आणि सगळं जग जोडू शकणारा असा अविश्वसनीय
प्रवास त्याने केला आहे. त्याच्या डोक्यातल्या जेमतेम दीड किलोच्या ओलसर फिकट पदार्थाने
हा चमत्कार केला आहे. आता इथून पुढे तो काय काय करू शकेल? कसा असेल? अजून हजार
वर्षांनंतरचा माणूस कसा असेल? आपला मेंदू जे आज करतो त्याहून जास्त काही करू शकेल?
जीवशास्त्राची नवनव्या तंत्रज्ञानाशी सांगड घातलेलं जग कसं असेल?
आपला मेंदू खूप लवचिक
असतो. परिस्थितीनुसार स्वत:ला सहज बदलू शकतो. एका छोट्या
मुलीचं उदाहरण दाखवलं आहे. चार वर्षांची असताना तिला राझमुसेन्स सिंड्रोम नावाचा
मेंदूवर हल्ला करणारा रोग असल्याचं निदान झालं. ह्यात हळूहळू शरीर लुळं पडून नंतर
मृत्यू होतो. दुसरा काही पर्यायच नसल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून मेंदूचा
बाधित झालेला म्हणजे जवळपास निम्मा भाग काढून टाकला. त्याचे नक्की काय परिणाम
होणार, ठाऊक नव्हतं. ती इतर लहान मुलांसारखीच वाढेल की काही नवे प्रश्न निर्माण
होतील, हे सांगणं अवघड होतं. ह्या शस्त्रक्रियेला आता सात वर्षं झाली. आपल्याला
आता अकरा वर्षांची गोड मुलगी बघायला मिळते, इतर मुलांसारखीच. शरीराच्या एका बाजूला
तिला थोडासा अशक्तपणा जाणवतो. पण बाकी त्रास काहीच नाही. गणित हा तिचा आवडता विषय
आहे. तिच्या मेंदूने परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे! अशा उदाहरणांवरून लक्षात येतं,
की मेंदू म्हणजे काही पक्की, ताठर अशी व्यवस्था नाही. तर ते बदलत
राहणारं, लवचिक असं मोठं गुंतागुंतीचं जिवंत जाळं आहे. तीच तर गंमत आहे! निम्मा
भाग काढून टाकला, तर आपला संगणक चालेल का?
आपल्या कानाच्या आत
ध्वनिलहरी घेऊन त्यांचं जैवरासायनिक संकेतांमध्ये रूपांतर करणारं हाड असतं. ते चालत
नसेल तर तिथे आता छोटं यंत्र बसवायचं तंत्रज्ञान आलेलं आहे. त्याला cochlear
implant म्हणतात. त्या यंत्राने पाठवलेले संकेतही समजून घ्यायला आपला मेंदू शिकतो.
बाहेरून येणाऱ्या माहितीला काही एक रचना असेल, तर मेंदू त्यातले नमुने शोधतो आणि
अर्थ लावतो. ह्यासंबंधी एक प्रयोग दाखवला आहे. काही उपकरणं लावलेलं एक जाकीट एका
माणसाला घालायला दिलं आहे. ते घातल्यावर प्रत्येक शब्दासाठी शरीराला काही विशिष्ट कंपनं
जाणवतात. घालणाऱ्याला त्यातून काहीच कळत नाही. त्याच्या फोनच्या अॅपवर त्याला चार
शब्दांचे पर्याय दिसतात. त्यातला एक निवडायचा. सुरुवातीला सगळं चुकतच असतं. कारण कंपनं
होतात, एवढंच काय ते समजत असतं. पण आठ दिवस रोज असं जाकीट घातल्यावर तो माणूस आपोआप
बरोबर शब्द ओळखू लागला! त्याचा मेंदू कंपनांची शब्दाशी सांगड घालायला शिकला होता
आणि त्याला ते “शिक्षण” जाणवलंही नाही! ह्याचा अर्थ काय? तर माणसाला नवीन इंद्रिये
देता येणं शक्य आहे, मेंदू ती हाताळू शकतो. उत्क्रांतीतून मिळालेल्या पंचेंद्रियांवरच
थांबायला हवं, असं नाही.
मानेखालचा भाग हलवता येत
नसलेल्या एका बाईबद्दल दाखवलं आहे. तिला कृत्रिम हात बसवला आहे आणि तो तिच्या
मेंदूशी असा जोडला आहे, की तिच्या मनात हात हलवायचा जसा विचार येईल, तसा तो हलतो.
वर वाटला की वर आणि उजवीकडे वाटला, की उजव्या बाजूला. हे संदेशवहन जमलेलं आहे.
पुरेसा सराव झाल्यावर तिच्या मेंदूचा अज्ञात भाग तो हात आपोआप हवा तसा हलवेल.
मुद्दाम विचार करून हालचाल करावी लागणार नाही. आपल्या नैसर्गिक हातासारखा आपोआप
वापरला जाईल. निरोगी माणसाच्या शरीरालाही एखादा नवा, जास्तीचा अवयव बसविण्याच्या
शक्यता आता निर्माण झाल्या आहेत.
शरीर नश्वर आहे. मरून
जातं. पण मेंदूत असलेले सगळे अनुभव, ज्ञान, शहाणपण ह्या सगळ्याचं काय? आपल्याला
मेंदू जर सुरक्षित ठेवता आला आणि त्यातली माहिती वाचता आली, तर तो माणूस
गेल्यावरही आपण त्याच्याबरोबर जगू शकतो. “मेंदू जतन करणे” हे संशोधनातलं नवीन
क्षेत्र आहे. अमेरिकेत १०० हून जास्त मृत शरीरं -३०० F (उणे तीनशे फॅरनहाइट) तापमानात
द्रवरुपी नायट्रोजनमध्ये जतन केली आहेत आणि त्यांना दूरच्या भविष्यात कधीतरी
पुन्हा “जागं” करता येईल, अशी त्यांना आशा आहे. ते ठिकाण आणि व्यवस्था आपल्याला
दाखवली आहे. पण माणसाचा मेंदू ठेवायला शरीर हवंच, असं काही आहे का? की संगणकात
मेंदू राहू शकेल?
आपला मेंदू म्हणजे खरं तर
त्यातल्या जोडण्या, कनेक्शन्स. प्रत्येकाच्या जोडण्या अनन्य असतात. सर्वसामान्य
मेंदूत ८६००,००,००,००० म्हणजे ८६०० कोटी मज्जापेशी असतात आणि त्याच्या हजारो पटीने
जोडण्या असतात. त्या सगळ्या संगणकावर आल्या तर? अमेरिकेत एम् आय टी विद्यापीठात
सध्या उंदराचा मेंदू संगणकावर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते सुद्धा खूप
आव्हानात्मक आहे. माणसाचा एक मेंदू संगणकात टाकायचा असेल तरी खूप माहिती साठवावी लागेल.
सध्या सगळ्या जगात मिळून जेवढी माहिती संगणकावर आहे, जवळजवळ तेवढी माहिती एका
मेंदूसाठी साठवावी लागेल आणि शिवाय त्यावर प्रक्रिया करायची क्षमताही लागेल. पण
सध्या दर दोन वर्षाला संगणन क्षमता दुप्पट होते आहे. म्हणजे आपल्याला माणसाचा
मेंदू हाताळणं भविष्यात शक्य होणार आहे.
आपल्या मज्जापेशींमध्ये
काही विशेष आहे का? की फक्त जोडण्या करण्यासाठी आणि संदेशवहनासाठीचं ते एक माध्यम
आहे; एक महाजाल उपलब्ध करून देणारं? ह्या पेशींऐवजी वेगळ्या माध्यमाचं महाजाल दिलं
तरी सगळं चालू शकेल का? शेवटी मेंदू म्हणजे मज्जापेशी नाहीत, तर मज्जापेशी जे काम
करतात ते म्हणजे मेंदू. मग ह्या पेशींऐवजी सर्किटस् आणि ऑक्सिजनऐवजी वीज दिली तर?
तो जीवशास्त्रीय मेंदू नसेल, पण वेगळ्या माध्यमात चालणारी ती पूर्णपणे आपलीच
आवृत्ती असेल! मग त्यात चेतना (consciousness) येईल का? चेतना म्हणजे नक्की काय? मेंदूच्या
वेगवेगळ्या भागात एका ठराविक पातळीच्या वर क्रिया होऊ लागल्या, की चेतनेचा आपोआप
उदय होतो का? की फक्त मज्जापेशींमध्येच
तिचा उदय शक्य आहे? हे सगळे प्रश्न सध्या तरी सैद्धांतिक पातळीवर आहेत. अशी एक
शक्यता आहे, की आपण हे शरीर सोडलं तरी “अ-जीवशास्त्रीय” (म्हणजे जीवशास्त्रासारखे
पेशी नसलेले) प्राणी म्हणून जगत राहू शकतो, अमर होऊ शकतो. आपल्याला संगणकावर टाकून
वेगळ्या कुठल्या ग्रहावर, वेगळ्या सूर्यमालेतही पाठवता येऊ शकतं! किंवा हजारो
वर्षांपूर्वीच्या काळाचं सदृशीकरण (simulation) करून त्यातही पाठवता येऊ शकतं.
एकदा तुम्ही ह्या कल्पना करू लागलात, की अनंत पर्याय समोर येतात आणि मग असा विचार
येतो, की आपण हे जे जग अनुभवतो आहोत, हे असं कुठलं कुणीतरी केलेलं सदृशीकरण तर
नाही ना? कशावरून हे जग खरं आहे? आणि मग ईगलमन म्हणतात, “हे खरं आहे की सदृशीकरण
आहे, हे खात्रीपूर्वक सांगायचा काहीच मार्ग नाही!” आणि आपल्याला दचकायला होतं,
अस्वस्थ होतं.
हे सहा भाग (आणि पुस्तक) इथे संपतात. पण आपल्यासाठी मात्र स्वत:कडे, जगाकडे आणि भविष्याकडे नव्या दृष्टीने बघायची सुरुवात होते. एक अस्वस्थ सुरुवात.
आपल्या सहा वेगवेगळ्या लेखांमध्ये आपण "मेंदू" या पुस्तकाचा सारांश फारच छान घेतला आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवा