शनिवार, ४ जुलै, २०२०

मेंदूबद्दल विलक्षण काही - भाग २ - आपण स्वत: म्हणजे काय?


डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहायला घेतले आहेत. आज दुसरा भाग.

भाग २ : आपण स्वत: म्हणजे काय?


मेंदूची रचना आणि काम इतकं अजब आणि गुंतागुंतीचं आहे, की आपण थक्क होऊन जातो! पण आपल्याला असं चकित करणारा मेंदू म्हणजे खरं तर आपण स्वत:च आहोत. आपलं आयुष्य आपल्या मेंदूला घडवत असतं आणि आपला मेंदू आपलं आयुष्य घडवत असतो ... ह्यातूनच आपण “आपण” होत असतो. आपली ओळख, अस्मिता घडत असते.

बहुतेक प्राणी हे जन्मल्यानंतर काही तासांत किंवा काही दिवसांतच चालू/पोहू शकतात. माणसाला मात्र साध्या साध्या गोष्टी करायलाही बराच काळ जावा लागतो. कारण माणसाच्या मेंदूची जन्माच्या वेळी पूर्ण वाढ झालेली नसते. आयता, तयार मेंदू घेऊन जन्मण्याऐवजी आजुबाजूच्या परिस्थितीनुसार शिकत, जुळवून घेत माणसाचा मेंदू घडत जातो. मेंदूची वाढ होते म्हणजे नवीन पेशी नाहीत तयार होत. आहेत त्याच पेशींमध्ये नव्या जोडण्या (connections) तयार होतात. आपण दोन वर्षांचे होतो, तेव्हा प्रत्येक मज्जापेशीच्या वेगवेगळ्या मज्जापेशींशी किमान १५००० जोडण्या झालेल्या असतात. प्रौढ माणसांतल्या मेंदूपेक्षा ह्या दुप्पट असतात. जसजशा आपण नवीन गोष्टी शिकत जातो, तशा तिकडे लक्ष केंद्रित करताना ह्या जोडण्या कमी कमी होत जातात. आपल्याला येणारे अनुभव आणि आपला आजुबाजूच्या परिसराशी येणारा संबंध ह्यातून आपला मेंदू घडत असतो आणि आपण जे काही होतो, घडतो ते आपल्या मेंदूतून कोणत्या जोडण्या निघून गेल्या, त्यावर ठरत असतं!

एका अमेरिकन जोडप्याने रोमेनियाच्या अनाथाश्रमातून चार वर्षांची असताना दत्तक घेतलेल्या आणि आता विशीत असलेल्या तीन मुलांची कहाणी आपल्याला दाखवली आहे. अगदी लहान वयात दुर्लक्ष आणि हेळसांड झाल्यामुळे मेंदूच्या रचनेवर (physical structure) परिणाम झालेला आहे. मेंदूचा आकार कमी असणे, भाषा शिकायला उशीर होणे, सरासरीपेक्षा कमी बुद्ध्यांक, मज्जापेशींच्या क्रिया कमी असणे असे खूप दुष्परिणाम झाले आहेत. ह्या तिन्ही मुलांसाठी शालेय शिक्षण कठीण होतं. आई-वडील आणि शिक्षकांनी त्यांच्यासाठी विशेष मेहनत घेतली आणि अजूनही त्यांच्यासाठी सगळं सरळ, सोपं झालेलं नाही. लहान वयात अनुभव आणि संवाद मिळाला नाही, तर मेंदूच्या क्षमतेवर दूरगामी परिणाम होतात. दोन वर्षं वयाआधी जर दत्तक मूल घरी कुटुंबाबरोबर राहू लागलं, तर मात्र बहुतेक समस्यांचं निराकरण होऊ शकतं.

जसा आजुबाजूच्या वातावरणामुळे मेंदूत बदल होतो, तसाच काही ठराविक वेळापत्रकानुसारही बदल होतो. उदाहरणार्थ, पौगंडावस्था! ह्या वयात मेंदूत मोठे बदल होतात. संयम कमी असतो, स्वत:बद्दलची जाणीव तीव्र होते. पूर्वी असा समज होता, की साधारण विशीपर्यंत आपल्या मेंदूच्या रचनेतले सगळे बदल होऊन जातात. पण आता नवीन संशोधनात असं सिद्ध झालं आहे, की प्रौढ वयातही मेंदूत मोठे बदल होऊ शकतात. ह्यासाठी लंडन शहरातल्या टॅक्सी चालकांचं उदाहरण दिलं आहे. लंडनमध्ये टॅक्सी चालवण्यासाठी एक चाचणी द्यावी लागते. त्यासाठी सुमारे २४,००० रस्ते आणि ५०,००० ठिकाणं लक्षात ठेवावी लागतात. हे काही सोपं काम नाही. ह्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या लोकांचे आधी, प्रशिक्षण काळात आणि नंतर मेंदूंचे स्कॅन करून निरीक्षणं घेतली, तेव्हा त्यांच्या अवकाशीय स्मरणशक्तीचा (spatial memory) भाग आकाराने वाढलेला आढळला. एखादं वाद्य वाजवायला शिकल्यावरही मेंदूत बदल होतात. आपण कोण आहोत आणि कोण होऊ शकतो, हे सतत बदलत असतं, शब्दश: आकार घेत असतं. आपण करत असलेलं काम, प्रेमात पडणं, आई-बाप होणं, आपले मित्र-मैत्रिणी ह्या सगळ्यांचा आपल्या मेंदूवर परिणाम होत असतो आणि त्यामुळे आयुष्यभर आपण बदलत राहतो.
  
सगळं बदलत असलं, तरी एक गोष्ट मात्र नेहमी आपल्याबरोबर असते – आपल्या आठवणी. पण आठवणी तरी स्थिर असतात का? खरं तर आठवणी हळूहळू पुसट होत जातात. त्यातले तपशील निसटून जातात. जुन्या आठवणींच्या मज्जापेशी इतर आठवणींना वापरल्या जातात. दरवेळी जेव्हा आपण एखादी घटना आठवतो, तेव्हा ती घटना पुन्हा नव्याने डोक्यात उभी करतो. त्यामुळे तीच घटना वेगळ्या प्रकारे आठवू शकते. आपलं वर्तमान, सध्याची स्थिती त्या आठवणीवर प्रभाव टाकते आणि ती आठवण थोडीशी बदलते. काय झालं, इतरांनी त्याबद्दल काय सांगितलं आणि आजच्या मला त्याबद्दल काय वाटतं ह्या सगळ्यांमधून ती आठवण नव्याने साकार होत असते. आठवणींमध्ये जसे फेरफार होतात, तसंच एखादी न घडलेली घटनाही आपल्या डोक्यात आठवण म्हणून सोडता येऊ शकते! तीन खरोखरी घडलेल्या घटना आणि एक काल्पनिक घटना अशी चर्चा करून काल्पनिक गोष्टींच्या आठवणी कशा खऱ्या वाटू लागल्या, त्यासंबंधीचे प्रयोग दाखवले आहेत. आठवणी म्हणजे फक्त भूतकाळाचा पट नसतो, तर भविष्यात काय घडू शकतं ह्याची समज येण्याची ती व्यवस्था असते. म्हणून भूतकाळ आणि भविष्यकाळासाठी मेंदूचा एकच भाग वापरला जातो.

आता माणसाचं आयुष्यमान वाढल्यामुळे वृद्धपणाचे प्रश्नही वाढले आहेत. पार्किनसन्स, अल्झायमर्स ह्यांसारखे रोग मेंदूवर हल्ला चढवतात. पण वेगवेगळ्या प्रयोगांमधून असं सिद्ध झालं आहे, की आपण मन आणि शरीर जर कार्यरत ठेवलं, तर ह्या हल्ल्यांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. मेंदूचा काही भाग जरी निकामी झाला, तरी कार्यरत माणसाचा मेंदू नवीन वेगवेगळे उपाय काढून नीट चालत राहतो.

आपण “आपण” असतो, म्हणजे नक्की काय असतं? आपली आपल्याला असणारी ओळख, जाणीव आणि आपल्यातली चेतना म्हणजे काय? आपण मेल्यावरही आपल्या मेंदूतल्या कोट्यवधी मज्जापेशी तिथेच असतात. पण आपण मात्र नसतो. मग काय संपतं? तर ह्या मज्जापेशींचं काम थांबतं. आपण म्हणजे मज्जापेशींचं अस्तित्व नव्हे, तर आपण म्हणजे मज्जापेशींची कामगिरी! एखाद्या वाद्यवृंदात जसे सगळे वादक एकमेकांशी ताळमेळ राखून एकलय होऊन संगीत सादर करतात, तसं ह्या हजारो कोटी मज्जापेशींचं  सादरीकरण म्हणजे आपण, आपली स्वत:बद्दलची जाणीव, आपल्यातली चेतना. आपण गाढ झोपेत असतो, तेव्हाही ह्या मज्जापेशी काम करत असतात, पण वेगळ्या तालात. त्यामुळे आपल्याला जाणीव नसते. त्या पुन्हा त्यांच्या नेहमीच्या तालात आल्या आणि त्यांनी सूर लावला, की आपल्याला जाग येते.

आपण जसे असतो, आपल्या मज्जापेशींच्या जोडण्या जशा असतात, तसं आपल्यासाठी जग असतं. तसा आपण जगाचा, जगण्याचा अर्थ लावतो. प्रत्येक मेंदूमधल्या ह्या जोडण्या वेगळ्या असतात, अनन्य असतात आणि म्हणूनच प्रत्येक माणूस वेगळा असतो. ना आपल्यासारखा कुणी झालाय, ना कुणी होणार आहे. आपल्यासारखे आपणच – एकमेव, अद्वितीय.

४ टिप्पण्या: