बुधवार, १५ जुलै, २०२०

मेंदूबद्दल विलक्षण काही - भाग ५ - मी आणि तू

डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहायला घेतले आहेत. आज पाचवा म्हणजे शेवटून दुसरा भाग.

भाग ५ : मी आणि तू

आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी काय काय लागतं? सकस आहार, भरपूर पाणी, पुरेसा ऑक्सिजन हे तर झालंच. पण अजून एक गोष्ट आपल्या मेंदूला खूप आवश्यक असते – माणसं. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्या मज्जापेशींच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला इतरांच्या मज्जापेशींची गरज पडते. आपण आपलं कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आपल्याला भेटणारे लोक ह्यांच्याशी संवाद तर साधतोच. शिवाय ह्या सगळ्यांना भेटणाऱ्या लोकांशीही आपण अप्रत्यक्ष संवाद साधत असतो.

मेंदूवरचं बहुतेक संशोधन हे एकेका मेंदूवर होत असतं. पण आपल्या मेंदूच्या बऱ्याच क्रिया ह्या संवादाशी संबंधित असतात, इतरांशी संबंधित असतात. आपण एकमेकांवर छाप पाडायला बघतो, एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो, कल्पनांचं आदान-प्रदान करतो. एका प्रयोगात चित्रफितीत त्रिकोण, गोल अशा आकृत्या इकडून तिकडे जाताना, एकमेकांच्या मागे जाताना दाखवल्या आहेत. लोकांना ते दाखवून त्याचा अर्थ विचारला, की ते त्यात वेगवेगळ्या भावना बघू लागतात. “मोठा त्रिकोण दांडगट आहे” किंवा “गोल घाबरलेला आहे” असा काहीतरी अर्थ लावतात. कारण भूमितीच्या आकृत्या सुद्धा एखादी कथा आणि एकमेकांशी संवाद असल्यासारख्या आपण पाहतो. ते आपल्या मेंदूसाठी खूप महत्त्वाचं असतं. आपण सारखी मतं बनवत असतो – हा विश्वासू वाटतो का, ती मदत करेल का आणि अशीच कितीतरी.

ही अशी मतं बनवायला आपण कधी शिकतो? एका वर्षापेक्षा लहान बाळांना घेऊन एक प्रयोग केलेला दाखवला आहे. छोटी छोटी बाळं त्यांच्या आयांच्या मांडीवर बसून एक कठपुतळीचा छोटासा खेळ बघतात. त्यात एक बदक एक डबा उघडायचा प्रयत्न करत असतं. एक अस्वल (टेडी बेअर) त्याला डबा उघडायला मदत करतं. आणि दुसरं अस्वल येऊन बदकाला ढकलून डबा बंद करतं. हा खेळ झाल्यावर दोन्ही अस्वलं त्या बाळांना खेळायला आणून दिली जातात. प्रत्येक बाळाने मदत करणारं अस्वलच खेळायला घेतलं! विश्वास कुणावर ठेवायचा, मत कसं बनवायचं हे आपल्याला उपजतच माहीत असतं. मात्र जसजसे आपण मोठे होतो, तसतसं हे माणूस वाचणं, ओळखणं क्लिष्ट होत जातं. एकमेकांचा अंदाज येणं, हावभाव आणि उद्देश समजू शकणं अशा सगळ्या गोष्टींवरच समाज चालतो.

आपल्याला एखाद्याच्या चेहऱ्यावरचे भाव समजायला फक्त ३३ मिलिसेकंद लागतात, म्हणजे ३३/१००० सेकंद. हे भाव समजण्याचे संकेत अगदी सूक्ष्म असतात आणि त्यावरची प्रक्रिया मात्र खूप वेगाने होते. आपल्या नकळत हे वेगाने घडत असतं. आपण जे हावभाव बघतो, त्यांचं प्रतिबिंब आपोआप आपल्या चेहऱ्यावर उमटत असतं आणि त्यामुळे आपल्याला त्या भाव-भावना समजायला सोपं जातं. बोटॉक्स हे खरं म्हणजे एक विष आहे. तरीसुद्धा लोक ते चेहऱ्यावर, कपाळावर टोचून घेतात. त्यामुळे आपले स्नायू बधीर होतात आणि स्नायूंची हालचाल होत नसल्यामुळे चेहऱ्यावरच्या आठ्या, सुरकुत्या दिसत नाहीत. तरुण दिसण्यासाठी लोक हे बोटॉक्स करून घेतात. अशा बोटॉक्स केलेल्या लोकांवरचा एक प्रयोग दाखवला आहे. बोटॉक्सवाल्या लोकांचा चेहरा पुरेसा हलत नसल्यामुळे त्यांच्या भावना आपल्याला समजायला अवघड जातंच. शिवाय त्यांनाही इतरांच्या भावना समजायला अवघड जातं. कारण दुसऱ्याच्या भावनांचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर नीट उमटत नाही. स्नायू बधीर झाल्याने भावना प्रतिबिंबित व्हायला आणि म्हणून समजायलाही मर्यादा येते.

आपण जेव्हा चित्रपट बघतो, तेव्हा आपल्याला ते खोटं आहे हे माहीत असूनही आपण त्यात अगदी समरस होतो. आपल्याला रडू फुटतं. स्वत: दु:ख भोगणं आणि दु:ख बघणं ह्या दोन्ही वेळेला मेंदूचे तेच (वेदनेचे) भाग काम करतात. त्यामुळे ते आपल्यालाच वेदना झाल्याच्या “सदृश” असतं. आपण जणू ती व्यक्तिरेखाच होतो आणि तिच्या दृष्टिकोनातून बघू लागतो.

इराणमध्ये कैदेत ४०० दिवस एकटं ठेवलेल्या अमेरिकन बाईची कथा दाखवली आहे. एकटेपणाचा कसा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, ते पहायला मिळतं. नेहमीच्या सामान्य आयुष्यातही आपल्याला कशातून वगळलं, बाहेर काढलं की माणसाला वाईट वाटतं. आपण लोकांशी जोडले जाण्याचा, सामील होण्याचा प्रयत्न करत असतो. आपले छंद, फॅशन, आपल्याला आवडणारे खेळ, आवडणारे खेळाडू ह्या सगळ्यांतून आपण कुठल्यातरी गटाचा भाग बनत असतो. आपण कोण आहे ते घडवण्याचं काम आपल्या आजुबाजूच्या गोष्टी, आपले गट करत असतात. गटाने राहूनच माणसाने मोठमोठ्या संस्कृती निर्माण केल्या आहेत. पण ह्या गटांचा एक मोठा तोटा आहे. आपण ज्या ज्या गटांचा भाग असतो, त्या प्रत्येक गटामागे आपण दुसऱ्या कुठल्यातरी गटाचा भाग नसतो (वंश, धर्म, जात) आणि प्रश्न तिथे सुरू होतो. गटात नसण्यातून, “बाहेरचा” असण्यातून मोठमोठे संहार होतात. नाझींनी जो जनसंहार, वंशहत्या केल्या; तशा भयानक घटना माणसाच्या इतिहासात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी होत आल्या आहेत. कशामुळे असं होतं? मनोरुग्ण नसलेले, सामान्य लोक आपल्या शेजाऱ्याला, आपल्या शाळेतल्या वर्गमित्राला कसे काय क्रूरपणे मारून टाकतात? ह्याचं इतिहास, राजकारण, अर्थकारण अशा विविध अंगांनी विश्लेषण होत असतंच. पण ह्याला अजून एका चष्म्यातून पाहण्याची गरज आहे. मेंदूच्या विज्ञानातूनही ते समजून घेतलं पाहिजे.

एका प्रयोगात लोकांना चित्रफितीत वेगवेगळे हात दाखवले. त्या हातांवर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्युइश आणि नास्तिक अशा चिठ्ठया चिकटवलेल्या होत्या. एकेका हातात इंजेक्शनची सुई खुपसल्याचं दाखवून मेंदूच्या प्रतिक्रिया मोजल्या. स्वत:च्या गटातल्या हातांबाबत मेंदूने मोठ्या प्रतिक्रिया दिल्या. तर इतर गटांबाबत काही परिणाम झाला नाही. हा प्रश्न फक्त धर्माचाच नाही. नास्तिकांनाही नास्तिक हात बघताना दु:ख झालं आणि इतर हातांबाबत निर्विकार प्रतिक्रिया आल्या. आपला मेंदू माणूस आणि वस्तू ह्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतो. दुसऱ्या गटांना जेव्हा प्रतिक्रिया येत नाही, तेव्हा मनात त्यांचं वस्तूकरण झालेलं असतं. मोठमोठे नरसंहार होतात, तेव्हा मोठ्या प्रमाणावर सगळ्या समाजात एखाद्या गटाकडे माणूस म्हणून बघणं कमी कमी होत गेलेलं असतं. त्यांना वस्तू, अडथळा म्हणून बघितलं जातं. त्यांच्याबद्दल मेंदूमध्ये प्रतिक्रिया येणं बंद होतं, संवेदनशीलता थांबते. हे कसं काय घडतं? अफवा पसरवून, एखाद्या गटाबद्दल खोट्या गोष्टी वारंवार सांगून आणि मोठ्या प्रमाणावर प्रचार करून.

ह्याला काही उत्तर आहे का? मार्टिन ल्युथर किंगच्या हत्येनंतर एका अमेरिकन शिक्षिकेने केलेला प्रयोग दाखवला आहे. गोऱ्या मुलांना काळी मुलं “वेगळी” वाटतात म्हणून ह्या शिक्षिकेने त्यांना सांगितलं, की निळ्या डोळ्यांची मुलं तपकिरी डोळ्यांच्या मुलांपेक्षा चांगली आहेत आणि त्यांचे वेगळे गट केले. काही वेळापूर्वी जे मित्र होते, त्यांना निळ्या डोळ्यांची मुलं लगेच हिडीसफिडीस करू लागली आणि तपकिरी डोळ्यांच्या मुलांमध्ये आपण पराभूत असल्याची भावना निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी शिक्षिकेने सांगितलं, की “काल चूक झाली होती. खरं तर तपकिरी डोळ्यांची मुलं निळ्या डोळ्यांच्या मुलांपेक्षा जास्त चांगली आहेत!” ह्या सगळ्या अनुभवामुळे मुलांचा दृष्टिकोनच बदलला. जसं डोळ्याच्या रंगावरून माणसांत भेद करू नये, तसा त्वचेच्या रंगावरूनही करू नये हे तर मुलं शिकलीच. शिवाय, दुसऱ्या दिवशी कोण जास्त चांगलं हे बदलल्यामुळे हे असले नियम, प्रथा ह्यांना काही अर्थ नसतो आणि ते कसेही वाटेल तसे ठरवलेले असतात आणि खरे नसतात; हेही मुलांच्या लक्षात आलं. मुलांना लहानपणापासून असे दृष्टिकोन शिकवायला हवे. माणसाची समाजप्रिय वृत्ती त्याचं भविष्य उज्ज्वल घडवू शकते. आपण सगळेच एकमेकांना जोडलेले आहोत, एकमेकांमुळे आहोत.

लवकरच सहावा म्हणजेच शेवटचा भाग J J

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा