मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

कविता - माणसं उघडी पडतात

 माणसं उघडी पडतात.

दरवेळी शब्दांतून नव्हे
कधी हास्याच्या फटीतून
कधी लपवता न आलेल्या आनंदातून
तर कधी विनोदाच्या जातकुळीतून
माणसं उघडी पडतात.
प्रेत थंड होण्याआधीच
सिद्धान्त सादर करतात
शोकाच्याही चितेवर
पोळ्या भाजायला येतात
अशा निलाजरेपणात माणसं उघडी पडतात
याचा गुन्हा असेल
तर अवघी जमात गुन्हेगार;
त्याने केला असेल
तर तो एकटाच भरकटलेला
स्वतःच्याच दर्पात माणसं उघडी पडतात
काही हिंसांना अश्रू फुटतात
काही अन्याय बोचू लागतात
बाकी सगळे अपरिहार्य असते
पोकळ अस्मितेची घमेंड चढते
दुभंगलेली माणसं उघडी पडतात.
कशासाठी आपल्याकडे वेळ असतो
कधी आपण स्वत:चीच पाठ थोपटतो
कुणासमोर आपण त्यांच्यासारखं बोलतो
कुणासमोर आपण ताठ उभे राहतो
कुणाशी आपण जवळीक साधू पाहतो
कुणाला भेटून आपण हताश होतो
चुकलेले आडाखे , अर्धवट शहाणपण
भाबड्या कल्पना नि लख्ख अपुरेपण
आपणच आपल्यासमोर उघडे पडतो...
© प्राजक्ता