पांगला हा आज वारा
पांगलेला जीव सारा
काय खुपते शोधताहे
मांडुनी मी शब्दपसारा
केवड्याचा गंध विरला
लख्ख टपोरा दव ओघळला
एकेक लाट फुटताना
बांध पुरता ठिसूळ झाला
कितीक पाहिल्या, कितीक जगल्या
चहुबाजूंच्या सगळ्या नजरा
आत वळुनी शोधताहे
आज मांडुनी शब्दपसारा
पांगला हा आज वारा
पांगलेला जीव सारा
काय खुपते शोधताहे
मांडुनी मी शब्दपसारा
केवड्याचा गंध विरला
लख्ख टपोरा दव ओघळला
एकेक लाट फुटताना
बांध पुरता ठिसूळ झाला
कितीक पाहिल्या, कितीक जगल्या
चहुबाजूंच्या सगळ्या नजरा
आत वळुनी शोधताहे
आज मांडुनी शब्दपसारा
अज्ञाताची भूल भूल
कोण कुठले खूर उधळले
आसमंती धूळ धूळ
आतुनी पोखरला तरीही
उभा शांत तो माड आहे
सृष्टीच्या नियंत्यावरची
भिस्त त्याची गाढ आहे
अजूनही घन वळतील
येतील आवेग सरी
कोंब फुटायचा तर थोडी
आस पेरुनी ठेव उरी
Eating to Extinction ह्या पुस्तकाचा मी लिहिलेला परिचय महाराष्ट्र टाइम्समध्ये आला आहे. प्रकाशित लेख इथे पाहता येईल. तोच लेख इथे देत आहे.
डॅन सालाडिनो हे पत्रकार आणि बीबीसीवर खाद्यपदार्थांचे कार्यक्रम प्रसारित करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे गेल्या वर्षी Eating to Extinction (अन्न नामशेष करणारी खाद्यपद्धत) असे पुस्तक आले आहे. जगात दुर्मिळ होत चाललेले अन्नपदार्थ (त्यांच्या जाती) आणि ते वाचवण्याची आवश्यकता असा ह्या पुस्तकाचा विषय आहे. जग जवळ आले आहे आणि त्यामुळे जगातल्या खाद्यपद्धतीत, खाद्यसंस्कृतीत एक प्रकारचा सारखेपणा, समानता येत चालली आहे. त्यातले वैविध्य आणि प्रादेशिक ओळख लोप पावते आहे. आपल्याला वाटते, की आपल्या पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा आपल्या खाण्यात कितीतरी वैविध्य आले आहे. अमेरिकेसारखे बर्गर, इटलीसारखा पास्टा आणि अवकाडोसारखी परदेशी फळे आता भारतात खाता येतात. आपल्या पूर्वजांना हे सगळे माहीतही नव्हते. पण खाण्यातले हे वैविध्य एकाच प्रकारचे आहे. जगभर एकाच ‘साच्यातले’ वैविध्य दिसते आहे. आता बऱ्याचशा देशांमध्ये तोच कोकाकोला, तोच पिझ्झाहट पिझ्झा मिळतो.
खाद्यपदार्थांमधले वैविध्य संपले म्हणजे काय? तर मनुष्यप्राण्याच्या आहारात पूर्वी ६००० वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश होता. आता माणसाच्या आहारातले निम्मे उष्मांक (कॅलरीज्) हे गहू, तांदूळ आणि मका ह्या ३ पदार्थांपासून येतात. त्यात बटाटा, साखर (ऊस आणि बीट), तेल ह्यांचा समावेश केल्यास माणसाचे ७५% उष्मांक अशा मोजक्या वनस्पतींपासून येतात. पूर्वी माणूस जिथे राहायचा तिथले हवामान, माती, पाणी, भौगोलिक परिस्थिती ह्यानुसार बदलणारी पिके, फळे, भाज्या आणि प्राणी त्याच्या आहारात असायचे. पण हरितक्रांतीनंतरचे जग आमूलाग्र बदलले आहे. जगातली बहुतेक बियाणे ही फक्त चार कंपन्यांच्या ताब्यात आहेत. जगभर दुधाचे चीज तयार करायला जे जीवाणू वापरतात त्यातले निम्मे फक्त एका कंपनीचे आहेत. पूर्वी प्रत्येक ठिकाणी चीज तयार करताना तिथले स्थानिक जीवाणू वापरले जायचे. जगात केळ्याच्या सुमारे १५०० जाती आहेत (आणि बऱ्याच नामशेष झाल्या आहेत). तरीही जगात पिकवली आणि विकली जाणारी निम्मी केळी ही कॅव्हेंडिश ह्या एकाच जातीची आहेत. जगातल्या दुग्धव्यवसायात बहुतांश गायी होलस्टाइन ह्या एकाच जातीच्या आहेत. असा साचेबद्ध आणि एकसुरीपणा मनुष्याच्या आहारात पूर्वी कधीच नव्हता. १९५० साली डेन्मार्कमध्ये २५०० वर्षांपूर्वीच्या मनुष्याचा मृतदेह बर्फाखाली चांगल्या अवस्थेत मिळाला, तेव्हा त्याच्या पोटातल्या खिरीमध्ये चाळीस वेगवेगळ्या झाडांच्या बिया आढळल्या!
जंगलातल्या रानभाज्या, फळे, कंदमुळे ह्यात कितीतरी जास्त वैविध्य आणि पोषणमूल्य होते. आता पृथ्वीवरची एक तृतियांश जमीन लागवडीखाली आहे. त्यातली २५% पिकांसाठी आणि ७५% गुरांना चराईसाठी वापरली जाते. दिवसागणिक ही लागवडीची जमीन अजून अजून जंगले गिळंकृत करते आहे आणि एकाच वाणाची पिके आणि एकाच जातीचे प्राणी वाढवते आहे. ह्यातून जमिनीचा दर्जा खालावतो आहे, प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जाती नामशेष होत आहेत, पोषणमूल्य आणि आहाराचा दर्जा खालावतो आहे आणि कितीतरी वनस्पतींची माहिती, खाद्यपदार्थ, पाककृती आणि वेगवेगळ्या चवी लयाला जात आहेत. वैविध्य घालवून एकाच वाणाची पिके घेतल्यामुळे संकटकाळ महाकठीण होणार आहे. सगळ्यात जास्त वापरली जाणारी जात एखाद्या नव्या रोगासमोर किंवा तापमान बदलामुळे तग धरू शकली नाही तर अन्नधान्याचा भीषण प्रश्न कसा उभा राहू शकतो, ते सालाडिनो स्पष्ट करतात. तीच गत प्राण्यांचीही होऊ शकते.
प्रश्नाची ओळख करून दिल्यानंतर पुस्तकातल्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जगातल्या वेगवेगळ्या भागातले दुर्मिळ होत चाललेले अन्न, त्याचा इतिहास आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न, धडपडणारे लोक ह्याबद्दल सालाडिनो माहिती देतात. टांझानियाच्या जंगलातले मध, ऑस्ट्रेलियाच्या मूळ रहिवाशांचे मुख्य अन्न असलेले मरनॉन्ग नावाचे कंद आणि इथिओपियातून जगभर पोहोचलेली कॉफीची जंगली झाडे असा कितीतरी खजिना ते आपल्यापुढे उघडून ठेवतात. मेघालयातली ‘मेमांग नारंग’ नावाची संत्र्यासारखी फळं, तिथली जैवविविधता आणि तिथून जगभर पसरताना ‘नारंग’ शब्दात बदल होत होत तयार झालेला ‘ऑरेंज’ हा शब्द अशी कितीतरी माहिती आपल्याला थक्क करत राहते.
सगळ्या गोष्टी सोप्या आणि सारख्या करण्याच्या अट्टहासामुळे पर्यावरण, शेती, खाद्यसंस्कृती, आहार, आरोग्य ह्या सगळ्यांवर कसा परिणाम होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा एकमेकींशी निगडित आहेत, ते ह्या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत विशद केले आहे आणि ते करताना जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतीतल्या वेगवेगळ्या दुर्मिळ पदार्थांची सफरही घडवली आहे. माणसाने पुन्हा फळे-कंदमुळे खाऊन राहावे, असे नाही. पण त्या पद्धतीतून जे शिकता आले ते जपणे, जैववैविध्य टिकवणे, वेगवेगळे अन्नपदार्थ जपणे आणि खाणे एवढे आपण नक्कीच करू शकतो.
साधना साप्ताहिक "कर्तव्यसाधना" असे पोर्टल चालवते. त्यावर माझा "ध्रुवीकरणाचे युग" हा लेख आला आहे.
प्रकाशित लेख इथे पाहता येईल. तोच लेख इथे देत आहे.
अमेरिकन पत्रकार आणि संपादक एझ्रा क्लाईन ह्यांनी अमेरिकेत वाढत चाललेल्या राजकीय ध्रुवीकरणावर Why We’re Polarized - आपले ध्रुवीकरण का झाले आहे - असे पुस्तक लिहिलेले आहे. पुस्तक अमेरिकन समाज आणि राजकारण ह्याबद्दल असले तरी ध्रुवीकरण जगात बऱ्याच ठिकाणी आणि आपल्याकडेही वाढलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचून अमेरिकेच्या संदर्भातले विवेचन समजून घेण्याची उत्सुकता होती.
अमेरिकेत मुख्यतः दोन राजकीय पक्ष आहेत - डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. १९६० पूर्वी वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक गटांमधले लोक दोन्ही पक्षांमध्ये साधारण सारखेच विभागलेले होते आणि त्यामुळे कुठल्याच पक्षावर एखाद्या गटाची पकड नव्हती. दोन्ही पक्ष कुठल्याही विशिष्ट गटांना टोकाचा विरोध किंवा टोकाचे समर्थन देत नव्हते. पण डेमोक्रॅटिक पक्षाने नागरी हक्क कायदा संमत करून वर्ण, लिंग आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही अशी योजना केल्यापासून ध्रुवीकरणाला हळूहळू सुरुवात झाली. सध्याच्या काळात तर मतदानाचा कल वर्ण, वंश आणि धर्मावरून लक्षात येतो. दोन्ही पक्षांचा दृष्टिकोन नुसता वेगवेगळाच नाही तर एकमेकांना प्रखर विरोध करणारा, कट्टर आणि टोकाचा होतो आहे. लोकांच्या अस्मितांचे रूपांतर राजकीय कट्टरतेमध्ये झालेले आहे.
अमेरिकेचे रंग-रूप बदलते आहे. २०१३ सालापासून असा बदल झाला आहे, की अमेरिकेत जन्म घेणारी बहुसंख्य बाळे गोरी नसतात, म्हणजेच गोऱ्या सोडून इतर वंशांच्या बाळांची संख्या गोऱ्या बाळांपेक्षा जास्त असते. २०३० साली अमेरिकेच्या लोकसंख्यावाढीचे मुख्य कारण बाहेरून येणारे लोक हे असेल. त्यांची संख्या अमेरिकेत जन्मणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असेल. एवढेच नाही, तर २०४५ मध्ये अमेरिकेत गोऱ्या वंशाच्या लोकांपेक्षा इतर सर्व वंशांच्या लोकांची एकत्र संख्या जास्त असेल म्हणजेच सध्याचे अल्पसंख्याक समुदाय एकत्रितपणे बहुसंख्य ठरतील. वंशांनुसार लोकसंख्या बघितली, तर भविष्यात फक्त गोऱ्या लोकांची संख्या घटत जाणार आहे आणि इतर सर्व वंशांची संख्या वाढत जाणार आहे. स्वतःला निधर्मी म्हणवणारे म्हणजेच “आम्ही कोणत्याच धर्माचे नाही” असे म्हणणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढते आहे. अशा आणि एवढ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांचा अर्थातच मानसिकतेवर आणि निवडणुकांवरही परिणाम होतो. काही गटांना भीती, दडपण आणि धोका वाटतो. तर काहींना आशा आणि समाधान वाटते. त्यातूनच ध्रुवीकरणाला गती मिळते.
जो आपल्याला माहीत आहे आणि ज्याच्यावर आपण प्रेम करत आलो आहोत, तो देश अभूतपूर्व बदलून जातो आहे, त्याचा कायापालट होतो आहे असे जाणवू लागले, की असुरक्षित वाटू लागते, चिंता वाटू लागते. पूर्वी महत्त्वाच्या नसलेल्या अस्मिता टोकदार होऊ लागतात. ह्याचा फायदा कुठला ना कुठला पक्ष किंवा राजकीय नेता घेणारच आहे - हा नाही तर दुसरा.
एझ्रा क्लाईन ह्यांनी वेगवेगळे अभ्यास आणि संशोधनांची माहिती देऊन ध्रुवीकरणाचा मानसशास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट केलेला आहे. टोळीचा सदस्य असणे, दुसऱ्या टोळीला विरोध करणे, त्यांचा द्वेष करणे आणि त्यांना हरवण्याची इच्छा असणे ह्या सगळ्या मनुष्याच्या उपजत वृत्ती आहेत. बऱ्याचदा लोकांना वाटते, की आपण ध्येय-धोरणे समजावून घेऊन विचारपूर्वक बाजू निवडतो. पण खरे म्हणजे बऱ्याचवेळा आपण जो पक्ष निवडतो त्याचा आपल्या स्वभावाशी, आवडी-निवडींशी संबंध असतो. काही लोकांना बदल आवडतो, तर काहींना परंपरा जपायच्या असतात. काहींना नियम आणि शिस्त आवडते तर काही लोकांचा सैल, सोप्या गोष्टींकडे कल असतो. काहींवर जगातल्या भयानक, क्रूर गोष्टींचा खूप परिणाम होतो तर इतरांवर तेवढा होत नाही. ह्यातल्या काही आवडीनिवडी नैसर्गिक असतात तर काही संस्कारांमुळे घडतात. अर्थात, ह्यातले कुठलेच स्वभावविशेष चांगले किंवा वाईट असतात असे नाही. समाज म्हणून आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनांची आणि स्वभावाची गरज असते. वैविध्यामुळे आपण टिकून आहोत. सध्याच्या काळात मनुष्यस्वभाव आणि मानसशास्त्र बदललेले नाही, तर त्याची राजकारणाशी जी सांगड घातली जाते आहे, ती नवीन आहे. पूर्वी राजकारण हा मुख्यतः व्यवहार होता, आता ती लोकांची ओळख, त्यांच्या टोळीची ओळख आणि अस्मिता झाली आहे.
पण माणसाची ओळख ही फक्त राजकीय भूमिकांइतकीच असते का? आपली अनेक अंगे असतात. आपण एखाद्या राजकीय पक्षाचे असतो. त्याखेरीज एखाद्या खेळाचे चाहते असतो, त्याचवेळी आपण पालकही असतो, एखाद्या क्षेत्रात काम करणारे असतो, एखाद्या शाळेचे माजी विद्यार्थी असतो. आपल्या ह्या इतर अस्मिता राजकीय अस्मितांसारख्या कट्टर नाहीत. त्या अस्मिता आपण राजकारणात वापरल्या तर ध्रुवीकरण सौम्य होईल. उदा. एक पालक म्हणून, एक निसर्गप्रेमी म्हणून, त्या दृष्टीने मतदान करता येऊ शकेल. पण प्रत्यक्षात उलट घडत आहे. राजकीय अस्मिता इतर सर्व अंगांवर कुरघोडी करत आहेत. आपल्या राजकीय भूमिकांचा आपल्या इतर अंगांवर आणि मैत्रीवर परिणाम होऊ लागला आहे. राजकीय अस्मितेमुळे वाटणारी जवळीक ही इतर ध्येय-धोरणांपेक्षा महत्त्वाची ठरू लागली आहे. एका प्रयोगात असे दिसून आले, की विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना त्यांच्या गुणांऐवजी ते कोणत्या पक्षाचे काम करतात ह्याला महत्त्व दिले गेले. वंशभेद आणि लिंगभेदापेक्षाही राजकीय मतभेदावर आधारित भेदभाव तीव्र झाला आहे. आपण एकमेकांशी कसे वागतो एवढेच फक्त राजकीय अस्मिता ठरवत नाहीत, तर आपल्या एकूणच जीवनदृष्टीवर त्यांचा परिणाम होतो आहे.
खरे तर परराष्ट्र धोरण, शैक्षणिक धोरणापासून ते अणुऊर्जेपर्यंत वेगवेगळ्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि सखोल अभ्यास लागणाऱ्या विषयांवर सामान्य नागरिकाला निर्णय घेता येईल इतके काही माहीत नसते (आपल्याला हे सगळे कळते असे आपल्याला वाटत असले तरी). त्यामुळे आपल्या कळत-नकळत आपण योग्य निर्णय घेण्याचे काम आपल्या आवडत्या पक्षावर सोडलेले असते आणि आपली मूल्ये, तत्त्वे ह्यावरून आपण आपला पक्ष निवडलेला असतो. ही मूल्ये अर्थातच आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमुळे आपल्याला महत्त्वाची वाटत असतात. पण राजकीय पक्ष मात्र त्यांचे निर्णय सत्तेसाठी घेत असतात. मग हुशार आणि अभ्यासू नागरिकांचे काय? तर प्रयोगांमध्ये असे दिसून आले, की हे लोक त्यांची हुशारी योग्य निर्णयासाठी वापरण्याऐवजी त्यांच्या पक्षाच्या समर्थनासाठी वापरतात. अस्मिता जेव्हा पणाला लागलेल्या असतात, तेव्हा आपली तर्कबुद्धी गहाण पडते.
ध्रुवीकरण ही होऊन गेलेली प्रक्रिया नसून ती अजूनही सुरू आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. माहितीयुगात इंटरनेटवर नुसतीच खूप माहिती मिळते असे नाही तर माहितीची निवडही करता येते. त्यामुळे बातम्या देणारी वृत्तपत्रे आणि वाहिन्याही त्याच्याशी स्पर्धा करतात. पत्रकारांना कारकीर्द घडवायची असते आणि वाहिन्यांना उत्पन्न मिळवायचे असते. लोकांचे लक्ष वेधून घेताना, जास्तीत जास्त प्रेक्षक मिळवताना माध्यमे सनसनाटीला महत्त्व देतात. त्यातूनच माध्यमे अस्मिता पेटवतात, भावना भडकवतात आणि लोकांच्या मनात संशय,असुरक्षितता निर्माण करतात. माध्यमांचे ध्रुवीकरण होतेच, शिवाय ते लोकांच्या ध्रुवीकरणात भर घालतात. राजकीय नेतेही सनसनाटी विधाने करून माध्यमांना वापरून घेतात, स्वत:चे बातमीमूल्य वाढवतात आणि त्यातून ध्रुवीकरण वाढवतात.
समाजमाध्यमे तुम्हांला आवडणाऱ्या बातम्या दाखवतात हे जरी खरे असले तरी विरुद्ध बाजूच्या बातम्या वाचल्या-पाहिल्यावर काय होते? त्यातून वेगळा विचार किंवा भूमिका सौम्य होण्याऐवजी लोकांना राग येतो आणि ते लगेच त्या मुद्द्यांचे खंडन सुरू करतात. प्रयोगांमधून हे सिद्ध झाले आहे. कुंपणावरचे मतदार आता कमी होत चालले आहेत. इतकेच नाही, तर राजकीय पक्षांचे महत्त्वही कमी होत जाऊन आपापल्या विचारसरणीचा कट्टरपणा वाढत चालला आहे. राजकीय पक्षांना ज्या देणग्या मिळतात, त्यातही जे छोटे, सामान्य देणगीदार असतात ते ध्रुवीकरणामुळे देणग्या देतात आणि अर्थातच जे मोठमोठे, श्रीमंत देणगीदार असतात ते त्यांच्या व्यवसायासाठी, कामासाठी (म्हणजेच एक प्रकारे लाच म्हणून) देणग्या देतात. कुणी अस्मितेत गुंतवणूक करतात तर कुणी व्यवसायात. ध्रुवीकरणाच्या आगीत तेल ओतणाऱ्या नेत्यांना मोठया प्रमाणात निधी उभा करता येतो. नेता आवडला नाही, तरी विरुद्ध बाजू नको म्हणून लोक त्याला मत देतात. राजकीय नेते आता त्यांच्या गुणांमुळे निवडले जात नाहीत, तर विरोधी पक्षाबद्दलच्या द्वेषामुळे निवडले जातात. त्यामुळे आपल्याला पाठिंबा मिळवण्यापेक्षा दुसऱ्याबद्दल संताप निर्माण करणे हे ध्येय झाले आहे. अशा परिस्थितीत परस्परविरोधी पक्षांनी चर्चा करून, समजुतीने काही चांगली धोरणे ठरविणे, काही तडजोडी करून सगळ्यांची सहमती मिळविणे ह्या गोष्टी दुरापास्त होत चाललेल्या आहेत. अमेरिकेत अध्यक्ष एका पक्षाचा आणि संसदेत बहुमत दुसऱ्या पक्षाचे असे असू शकते आणि अशावेळी सहमती, तडजोडी करून मार्ग काढणे अपेक्षित असते.
ध्रुवीकरणाबद्दल सगळे स्पष्टीकरण दिल्यावर लेखकाने डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षातला फरकही स्पष्ट केलेला आहे. ध्रुवीकरण दोघांचेही झाले असले तरी डेमोक्रॅटिक पक्षाला फ्लू झाला असेल तर रिपब्लिकन पक्षाला न्यूमोनिया झाल्याचे मत लेखकाने मांडले आहे. वेगवेगळ्या वंशांचे, धर्मांचे लोक डेमोक्रॅटिक पक्षात एकत्र आल्याने ते जास्त वैविध्यपूर्ण झाले तर एकाच वंशाचे लोक रिपब्लिकन पक्षात एकत्र आल्याने ते जास्त एकजिनसी आणि जहाल झाले.
पुस्तकातले सगळ्यात शेवटचे प्रकरण हे ध्रुवीकरणाला कसे सामोरे जायचे ह्यावर लिहिलेले आहे. ध्रुवीकरण हे दरवेळी वाईटच असते असे नाही, असे लेखकाला वाटते. ध्रुवीकरणापूर्वीच्या अमेरिकेत नागरी हक्क कायदा नव्हता, आजच्यापेक्षा बराच जास्त अन्याय आणि उपेक्षा होती. ध्रुवीकरणाच्या विरुद्ध गोष्ट सहमतीच असते असे नाही, तर बऱ्याचदा ते खच्चीकरण असते. ध्रुवीकरणातून राजकीय मतभिन्नता व्यक्त होते आहे. अर्थात, ह्याचा अर्थ असा नाही की ध्रुवीकरणाच्या आव्हानांकडे दुर्लक्ष करावे. पण पुस्तकात विशद केल्याप्रमाणे राजकीय, तांत्रिक, सामाजिक, मानसिक अशा बऱ्याच गोष्टींमुळे ध्रुवीकरण राहणारच आहे. अशा परिस्थितीत राजकीय व्यवस्था कशा चालवायच्या ह्याचा विचार करणे भाग आहे. लेखकाने त्यासाठी अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीत आणि अर्थसंकल्प संमत करण्याबाबत काही बदल सुचवले आहेत. अमेरिकेची घटना लिहिली गेली तेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्पर्धा होती आणि त्यांत समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता. आता नव्या काळासाठी नवा समतोल शोधावा लागेल, असे लेखकाला वाटते. त्याखेरीज, राजकारणात आपला वापर तर होत नाही ना, ह्याबाबत नागरिकांना सजग राहायला सुचवले आहे. माणसाला अस्मिता असणारच आहेत. आपल्या राजकीय सोडून ज्या इतर अस्मिता असतात उदा. खेळाडू, शाकाहारी, विद्यार्थी ह्यासारख्या अस्मितांना महत्त्व दिले पाहिजे. राजकारण आणि राजकीय बातम्या, चर्चा ह्यावरचा वेळ मर्यादित ठेवला पाहिजे. राजकारणाखेरीज अनेक महत्त्वाच्या, रचनात्मक गोष्टी आयुष्यात असतात.
राजकीय पत्रकारितेचा मोठा अनुभव असलेल्या एझ्रा क्लाईन ह्यांचे हे पुस्तक वाचल्यावर ध्रुवीकरणाबाबत बऱ्याच संकल्पना स्पष्ट होतात आणि ही काही तात्पुरती किंवा समाजमाध्यमांपुरती गोष्ट नाही, हे लक्षात येते. पुस्तक अमेरिकेवरच आहे. पण त्यानिमित्ताने जगातल्या इतर काही राष्ट्रांमधल्या ध्रुवीकरणाचाही थोडाफार धांडोळा घेतला असता तर अजून आवडले असते. पुस्तक वाचताना ह्यातले मुद्दे भारताला कसे आणि कुठे लागू पडतात अशी मनातल्या मनात तुलना होत राहते आणि आपल्या देशातल्या राजकारणाची संगती लावायला मदत होते.
( 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या मार्च २०२२ च्या महिला दिन विशेषांकात प्रकाशित झालेला एमिली राटाकाव्स्की यांनी लिहिलेल्या 'माय बॉडी' पुस्तकावरचा हा लेख.)
एमिली राटाकाव्स्की ही हॉलिवूडची जगप्रसिद्ध मॉडेल आहे. बिकिनी आणि अंतर्वस्त्रांच्या जाहिरातींसाठी अतिशय प्रसिद्ध आणि यशस्वी असणाऱ्या ह्या तीस वर्षीय मॉडेलने लिहिलेल्या स्त्रीवादी म्हणता येईल अशा लेखांचे ‘माय बॉडी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. क्षणभर आपला गोंधळ होतो, की बिकिनी मॉडेल आणि स्त्रीवादी लेख हे आपण बरोबर वाचत आहोत ना? आणि त्यामुळेच हे पुस्तक वाचण्याची आणि एका अपरिचित जगातले अनुभव समजून घेण्याची उत्सुकता होती. स्वत:च्या शरीराची जाणीव, त्याचा उपयोग आणि त्याबद्दल काय काय वाटत राहिले, समजत गेले ह्याबद्दल तर हे पुस्तक आहेच. त्याखेरीज एक रूपवती लहान मुलगी वयात येताना, स्वतःच्या पायावर उभी राहताना आणि नंतर टक्केटोणपे खात, चुकतमाकत प्रगल्भ होतानाचा हा (न संपलेला) प्रवास आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिकेने स्पष्ट केले आहे, की अजूनही तिला सगळी उत्तरे सापडलेली नाहीत. वेगवेगळे प्रश्न पडणे, अनुभवांचा अर्थ लावणे, वास्तवाला सामोरे जाणे आणि बदलत गेलेल्या संकल्पना तपासून पाहणे अशा प्रकारचे हे लेखन आहे. तिच्याच भाषेत सांगायचे तर, “पुरुषांच्या नजरा, माझे घेतले गेलेले असंख्य फोटो आणि मी माझी इतर स्त्रियांशी केलेली तुलना अशा वेगवेगळ्या आरशांमध्ये मी स्वत:ला बघत आले आहे. त्या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.” अगदी लहान असल्यापासून आपण सुंदर आहोत अशी एमिलीला जाणीव झालेली होती. मुख्यतः तिच्या देखण्या आईने तिला ‘ती जन्मल्या दिवशीही किती सुंदर दिसत होती’ अशासारख्या बऱ्याच आठवणी सांगितल्या होत्या. आईने इतर मुली-बायकांच्या रुपाबद्दल केलेली शेरेबाजी तिने लहानपणापासून ऐकली होती आणि रोज रात्री झोपताना डोळे मिटल्यावर “देवा, मला जगातली सगळ्यात सुंदर मुलगी बनव” अशी प्रार्थना केली होती. “सुंदर दिसणे सगळ्यात महत्त्वाचे असते आणि त्याच्या बऱ्याच खालच्या पातळीवर ‘सुंदर नाही, पण पुरुषांना आवडणारी’ स्त्री असते. पण काहीच नसणे, म्हणजे अगदी अदृश्यच असल्यासारखे असणे खूप वाईट”, असे ती लहान असतानाच शिकली होती. बारा-तेरा वयात एमिलीने कपड्यांच्या छापील चित्रांसाठी मॉडेलिंग सुरू केले. आई-वडिलांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन होते. आई तिला शूटिंगला घेऊन जात असे. सौंदर्याचा वारसा आईकडून आला होता आणि आईला त्याचा अभिमानही होता. कॉलेजच्या पहिल्या वर्षानंतर तिने शिक्षण सोडून दिले आणि पूर्ण वेळ मॉडेलिंग सुरू केले. घर आधीच - शाळा संपली तेव्हा - सोडले होते. मॉडेलिंगमधून मिळणारे पैसे आणि पैशामुळे येणारे स्वातंत्र्य आणि मोकळीक हा मुद्दा तिच्यासाठी महत्त्वाचा होताच. त्याखेरीज डोक्यावर भले मोठे शैक्षणिक कर्ज घेऊन कॉलेजला गेलेल्या आणि शिक्षण संपल्यावरही धड नोकरी न मिळालेल्या तिच्याहून मोठ्या मुली तिला आजूबाजूला दिसत होत्या. अशातच तिला एकदा पोटाचा आजार झाला आणि त्यामुळे तिचे वजन साडे चार किलोने कमी झाले. त्यानंतर तिला जास्त कामे मिळू लागली, तिच्या रूपाची मागणी वाढली. मग तिने तो कमी वजनाचा बांधा प्रयत्नपूर्वक तसाच राखला. बऱ्याचदा ती जेवत नसे, काळी कॉफी पिऊन उपाशीच राहत असे. शरीराचे आरोग्य, पोषक, संतुलित आहार अशा गोष्टी तिच्या खिजगणतीतही नव्हत्या. बिकिनी आणि अंतर्वस्त्रांच्या मॉडेलिंगची बरीच कामे आणि पैसे तिला मिळू लागले. त्यानंतर ब्लर्ड लाईन्स नावाचा एक म्युझिक व्हिडिओ आला आणि ती एका रात्रीत जगप्रसिद्ध झाली. ह्या व्हिडिओत ती पहिल्यांदा जवळजवळ विवस्त्र अवस्थेत दिसली आहे. ह्या कामासाठी तिच्याशी संपर्क साधणारी आणि तिने हे काम करावे असे पटवून देणारी एक स्त्री दिग्दर्शक होती, हे वाचल्यावर धक्का बसतो. व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर ‘स्त्रीला वस्तूसारखे दाखवण्या’बाबतचे प्रश्न एमिलीला विचारले गेले. पण “मला विवस्त्र असण्यात काही वावगं वाटत नसेल आणि माझ्या शरीराबाबत आत्मविश्वास असेल, तर तुम्ही मला काय करायचं हे सांगणारे कोण? निवड करण्याचं स्वातंत्र्य म्हणजेच स्त्रीवाद”, अशा शब्दांत तिने माध्यमांना उत्तरे दिली आणि तेव्हा तिला तसे प्रामाणिकपणे वाटतही होते. “सगळ्याच स्त्रियांचं काही ना काही प्रमाणात वस्तूकरण होतच असतं. निदान माझ्या वस्तूकरणाचा निर्णय आणि निवड मी करते आहे आणि हेच माझं सक्षमीकरण आहे”, असे त्या काळी तिला वाटायचे. यथावकाश त्यात बदल झाला आणि आज अर्थातच तिला तसे वाटत नाही. स्त्री असणे म्हणजे काय आणि वस्तू असणे म्हणजे काय? एमिलीने स्वत:च्या शरीराला तिचे सामर्थ्य, बलस्थान समजायचे की साधन, वस्तू समजायचे हा प्रश्न आणि संघर्ष तिच्या लेखनात ठळकपणे जाणवतो. तिच्या देहामुळेच आज तिला एवढे यश, प्रसिद्धी, चाहते आणि तिच्या मध्यमवर्गीय आई-वडिलांनी कधी कल्पनाही केली नव्हती एवढी संपत्ती मिळालेली आहे. त्यातून मिळालेले स्वातंत्र्य, क्षमता आणि अगदी हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी ह्या गोष्टी पाहता ते बलस्थानच वाटू लागते. पण हे सगळे सामर्थ्य आणि क्षमता तिला पुरुषांच्या नजरेने दिलेली आहे. जो काही पैसा, प्रतिष्ठा तिला मिळाली आहे; ते तिचा देह पुरुषांना बघायला आवडल्यामुळे मिळाली आहे. भांडवलशाही आणि पितृसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीने तिची ही किंमत ठरवली आहे. अशावेळी ह्याला खरेच स्वत:चे सक्षमीकरण म्हणता येईल का, असा प्रश्न तिला आज पडतो. सत्ता शेवटी पुरुषांकडेच आहे आणि सत्तेत असलेल्या पुरुषांना आवडलेल्या आणि त्यांनी निवडलेल्या स्त्रिया यशस्वी होताना दिसतात. ह्या स्त्रिया पुरुषांच्या ऋणातही असतात. एमिलीच्या प्रतिमा कुणाच्या मालकीच्या असतात, ते वाचून आपल्याला धक्का बसतो. पापराझ्झी कुठल्याही परवानगीशिवाय फोटो घेतात आणि छापतात, हे सगळ्यांना माहीतच आहे. अशाच एका छायाचित्रकाराने तिच्या नकळत घेतलेला एक फोटो तिला आवडला आणि म्हणून तिने तो तिच्या इन्स्टाग्रामवर टाकला. तर त्या माणसाने “त्याच्या परवानगीशिवाय” तिने तो फोटो समाजमाध्यमावर टाकला म्हणून तिच्यावर दीड लाख डॉलरचा दावा ठोकला! एका प्रसिद्ध कलाकाराने तिच्या इन्स्टाग्रामवरचा फोटो आणि त्यावर त्याने केलेली टिप्पणी असे मोठ्या आकाराच्या कॅनव्हासवर छापून ऐंशी हजार डॉलरला एक असे ‘इन्स्टाग्राम आर्ट’ म्हणून विकले! परवानगी वगैरे तर दूरच, उलट इतक्या मोठ्या कलाकाराने ह्यासाठी तिचे फोटो निवडल्याबद्दल तिला आनंद व्हावा आणि तिने कृतकृत्य व्हावे, अशीच प्रत्येकाची अपेक्षा होती. अशी अजूनही उदाहरणे वाचून आपली मती कुंठित होते. प्रतिमा कुणाची, त्याचा वापर कोण करते, सत्ता कुणाकडे, कला कशाला म्हणायचे ह्या सगळ्याबद्दल कुणाचाही गोंधळ उडावा, असे हे अनुभव आहेत. मॉडेलिंग हा लेखनाचा मुख्य विषय असला तरी शरीराचे इतर अनुभवही पुस्तकात लिहिलेले आहेत. स्पामध्ये जाणवणारे शरीराचे अस्तित्व, डॉक्टरकडे गेल्यावर होणारी देहाची जाणीव आणि सगळ्यात शेवटी आई होतानाचा बाळंतपणाचा अनुभव अशी देहाची वेगवेगळी रूपे आणि भावना वेगवेगळ्या लेखांत आलेले आहेत आणि तरीही एमिली स्वत:ला देहापासून कशी अलिप्त ठेवते तेही सांगितले आहे. वेगवेगळ्या शूटिंगला गेल्यावर सांगतील तेव्हा कपडे उतरवणे, म्हणतील त्या मुद्रेत, हावभावात उभे राहणे, लोकांनी तिचे फोटो घेणे, टेपने अंगाची मापे घेणे हे सगळे इतके सहज, नेहमीचे, सवयीचे झालेले आहे, की बऱ्याचदा ती स्वत:च्या शरीराकडे तटस्थपणे बघत असते. ती स्वत: शरीरापेक्षा वेगळी आहे, अशी तिची भावना असते. अतिशय प्रामाणिक, पारदर्शी आणि प्रभावी असे हे लेखन आहे. लेखनातून एमिली राटाकाव्स्कीने तिचे व्यक्तिमत्त्व, तिचे बाईपण, तिचे माणूसपण अधोरेखित केले आहे. तिचा देह आणि तिच्या अगणित प्रतिमा ह्याच्या पलीकडे ती कोण आहे, त्याची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला आहे. पण अडचण अशी आहे, की ‘लेखक’ म्हणून समोर येताना त्या लेखनाचा विषय पुन्हा ‘देह’ हाच आहे. एक प्रकारच्या चक्रव्यूहात ती अडकल्यासारखी वाटते. आत तर शिरली आहे, पण लावण्यवतीच्या प्रतिमेतून आता बाहेर येणे अवघड आहे. तिने व्यवसायाचे जे क्षेत्र निवडले आहे, त्या क्षेत्रातल्या कामकाजावर, पद्धतींवर टीका केली आहे, आक्षेप घेतलेला आहे. पण तिला अजून तरी प्रश्नांची उत्तरे सापडलेली नाहीत आणि अजून तरी तिने हे क्षेत्र सोडलेलेही नाही. आपण स्वत:ही ह्या प्रश्नाचा भाग आहोत आणि जबाबदार आहोत, ह्याची जाणीव तिला झालेली आहे. पण त्यातून बाहेर पडता आलेले नाही. कदाचित लेखन ही पहिली पायरी असेल, सुरुवात असेल. त्यादृष्टीने हे पुस्तक ही नक्कीच चांगली, मोलाची सुरुवात आहे, असे म्हणता येईल.