गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

कविता - एक थेंब

 

अवशेषच धरून बसावे 
इतकी उत्कट सय नाही 
हौसेने घाव मिरवावे 
एवढं वेडं वय नाही 

पूर्वजांना क्षमा केल्यावर 
पाचोळा उडून जातो 
पिल्लांना मुक्त करताच  
झरा पुन्हा वाहू लागतो 

लगटणारा वारा देतो 
नवा शाप शोधाचा 
घे मागून काजव्याला 
एक थेंब तेजाचा 

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

कविता - मुक्त

      
वीज लखकन् चमकावी 
कात अवघी गळून पडावी 
इवल्या इवल्या अपेक्षांची 
धूळ फुंकून उडवून द्यावी 

गुंफलेल्या खुळ्या समजुती 
तलम शेला पांघरावा 
असेच अनवाणी चालावे  
 गर्द मातीचा ओलावा 

पानगळ नाही सख्या ही 
कापूस तरंगे शेवरीचा 
वेग नाही, आवेग नाही 
हाच वारा मुक्ततेचा