रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

कविता - अंगण

कधी चांदण्या मोजल्या 

कधी रांगोळ्या मांडल्या 

कधी आधार देऊन 

वेली वर चढवल्या 


कधी बट ओढे झाड 

त्याला लटके रागवावे 

घर बांधति त्या चोची 

तास तास निरखावे 


ऊन पिते मधुमाली 

चढे लाली तिच्या गाली 

पलीकडे रुसलेली 

भली थोरली बकुळी 


वारा झोंबतो चाफ्याला 

मन भरून दरवळ 

पारिजाताचे चांदणे 

सांजवेळेला निर्मळ 


विचारांचे दाट धुके 

इथे पांगते पांगते 

शांत शांत होई काळ 

बीज मातीत निजते  



शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

कविता - हिमालय

नुकताच हिमालयाचा अभ्यासदौरा केला .  त्यानिमित्त ... कविता म्हणावं की नाही,  माहीत नाही. प्रेझेंटेशनच्या निमित्ताने  ठरवून लिहिलेल्या ओळी आहेत . 

हिमालय 


विशाल देशा, शीतल देशा, खडकांच्या देशा 

नाजुक देशा, घडीच्या देशा, हिमाच्याही देशा 


देवदार आणि चीडाच्या सूचिपर्णी देशा 

बुरांशाच्या, केशराच्या दळदारी देशा 


सागरमाथा, धौलागिरीच्या भव्यशिखर देशा  

गंगोत्री नि यमुनोत्रीच्या खळखळत्या देशा 












हिमालय-दशा 

भय इथले संपत नाही, एकेक हिमनदी आटते

कोसळती कडे-दरडी, मन थिजून थिजून जाते 

तो चढत जाई पारा, एकेक जीव  लोपतो

भव्य वनांचा संभार, क्षणाक्षणाला घटतो

प्रवाशांचे येती थवे, प्लास्टिकचे पेव फुटते

झाल्या उंच इमारती आणि नवनवे रस्ते

भय इथले संपत नाही, दूषित पाणी आणि माती

उत्तुंग हिमालयाला विकास-लाटा धडका देती














Garbage Picture by Waste Warriors


बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४

मत हवं? नद्या-झाडे-टेकड्या वाचवा

नदी प्रदूषण, वृक्षतोड आणि टेकड्या फोडणे ह्याबाबत राजकीय उमेदवारांना प्रश्न विचारायला हवे आणि नदी व झाडे हे निवडणुकीच्या जाहीरनाम्यातले महत्त्वाचे विषय असावेत अशी मागणी पुण्यातल्या काही सजग नागरिकांनी केलेली आहे.  त्याबाबत लेख माझा लेख लोकसत्तेत आला आहे. प्रकाशित लेख इथे पाहता येईल. तोच इथे देत आहे.




नुकतीच दिल्लीतली एक बातमी वाचली. दिल्लीचे भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव ह्यांनी यमुनेच्या नदीपात्रात निषेध व्यक्त करण्यासाठी अंघोळ केली आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर पुरळ आले, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि शेवटी त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. मुंबईची मिठी किंवा पुण्याच्या मुळा-मुठेत तर उतरायची कुणी राजकीय व्यक्ती हिंमत करणेही अवघड वाटते. आपल्याकडे नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाली आहेत. “नाद करते” ती नदी, अशी नदी ह्या शब्दाची व्युत्पत्ती धरली जाते. पण आपल्या शहरांमधल्या नद्या नाद (आवाज) करणे सोडाच, धड वाहतही नाहीत. त्या मृत झालेल्या आहेत. त्या काळसर दिसतात. त्यावर घाण तरंगत असते आणि मिथेनचे बुडबुडे येत असतात. नदीच्या जवळ गेल्यास गलिच्छ वासाने मळमळू लागते. ह्या आणि अशा प्रश्नांचे गांभीर्य समजावे म्हणून पुण्यातले काही सजग आणि जबाबदार नागरिक नद्या, झाडे आणि टेकड्या हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा व्हावा असा प्रयत्न करत आहेत. 

आपल्याकडे विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. कुणी जातीवर आधारित, कुणी धर्मावर आधारित तर कुणी आर्थिक लाभावर आधारित मतदान करतात. राजकीय पक्षही अशाच मुद्द्यांवर मते मागतात. पण आपण कुठल्याही जातीचे असू, कुठल्याही धर्माचे असू, गरीब असू की श्रीमंत; आपल्याला सगळ्यांना शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी लागणारच आहे. आपण सगळे श्वास घेणार आहोत, पाणी पिणार आहोत आणि इथल्या मातीतले अन्न खाणार आहोत. हवेचे, पाण्याचे आणि तापमानाचे आपल्या आयुष्यावर, आरोग्यावर आणि भविष्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. एवढेच नाही, तर आपल्या उत्पादनक्षमतेवर आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहेत. त्यामुळे “नद्या, झाडे वाचवा आणि खुर्ची मिळवा” अशी मागणी पुढे येते आहे. ही मागणी करणारे म्हणजे कुणी पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी आहेत किंवा पोट भरल्यामुळे नसते उद्योग सुचणारे लोक आहेत, असे मानायचे कारण नाही. तर ते सगळ्यांसारखेच श्वास घेणारे आणि पाणी पिणारे सामान्य नागरिक आहेत. 

असेच काही नागरिक १० नोव्हेम्बरला पुण्यात औंधला मुळा नदीकाठी जमले होते आणि तिथे त्यांनी त्यांच्या मागण्या आणि जाहीरनामा सर्वांसमोर मांडला. पुण्यात फक्त ३०% सांडपाणी आणि मैल्यावर प्रक्रिया होते. बाकीचे तसेच नदीत सोडले जाते. २०१४ साली जपानच्या सहकार्याने जायका (JICA) प्रकल्प जाहीर झाला आणि ह्यात मुळा-मुठा स्वच्छ, मैलामुक्त होतील असे सांगण्यात आले. अद्यापही त्याचे काम रखडलेलेच आहे. कधी काळी हे काम पूर्ण झालेच तरी  फक्त ६०% सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे.  हे काम मार्गी लावण्याऐवजी करदात्यांचे ४७०० कोटी खर्च करून पुण्यात नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प सुरू केलेला आहे. प्रत्यक्षात सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीकाठचा झाड-झाडोरा नष्ट करून पर्यावरणाचा विध्वंस चालू आहे. ह्यात पहिल्या एक किलोमीटरमध्येच हजारो झाडे कापली आहेत. संपूर्ण प्रकल्प दोन्ही काठ धरून ८८ किलोमीटरचा आहे. ह्यातून १५०० एकर नवीन जमीन तयार करणार आहेत आणि तिथे रेस्टॉरंट्स, वाहनतळ, फूडकोर्ट, जॉगिंग ट्रॅक इ. व्यावसायिक जागा बांधणार आहेत. आश्चर्य वाटेल, पण ह्या प्रकल्पासाठी जनाई मातेचे जुने मंदिर सुद्धा पाडलेले आहे! त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन “नदीकाठ सुशोभीकरण नको, नदी पुनरुज्जीवन हवे”, “व्होट फॉर रिव्हर्स”  अशा घोषणा दिल्या. केवळ मतांसाठी नाही, तर आपल्या भविष्यासाठी राजकीय उमेदवारांनी नदीची जबाबदारी घ्यावी आणि नदीचे पालक व्हावे, अशा मागण्या केल्या. आपले मत नदीला आणि झाडांना, असे जाहीर करण्यात आले.     

भाजपचे २०२४ विधानसभा संकल्पपत्र ह्या दृष्टीने वाचले. ६० पैकी ५४व्या  पानावर वन, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधने  असा विभाग येतो. जेमतेम २ पानांच्या विभागात मजकूर कमी आणि चित्रे जास्त आहेत. त्यात “एक पेड मां के नाम” अशा उपक्रमाचा उल्लेख आहे, पण जुनी झाडे वाचविण्याबद्दल काहीच म्हटलेले नाही. कांदळवन संरक्षणाचाही उल्लेख आहे. नद्या स्वच्छ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रो-बोट प्रणाली वापरण्यात येईल, असे म्हटले आहे. ह्या तंत्रज्ञानाने तरंगता कचरा, प्लास्टिक गोळा करता येते. परंतु नदीत सोडले जाणारे सांडपाणी आणि रासायनिक कचऱ्याबाबत काहीही म्हटलेले नाही. नदीच्या पात्राची धूप रोखण्यासाठी बांबू व व्हेटीवरसारख्या गवतांचा वापर करण्यात येईल, असे म्हटले आहे. आर्थिक तरतुदीचे किंवा अन्य कुठलेही आकडे दिलेले नाहीत. 

महाविकास आघाडीच्या ४८ पानांच्या “महाराष्ट्रनामा”मध्ये तेराव्या पानावर शहरविकास अंतर्गत  प्रदूषणमुक्त महाराष्ट्र, शाश्वत विकास, नेट झीरो, हवामान बदल, टेकड्या वाचविणे इ. उल्लेख येतात. त्यानंतर शाश्वत विकास उद्दिष्टांचा उल्लेख आहे. शहर-नगर विकास विभागात पान क्रमांक २५ वर  “मैला पाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करणार आणि त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणार” असा उल्लेख आहे. मात्र नक्की आकडा दिलेला नाही. कर्बउत्सर्जन कमी करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग असेही उल्लेख आहेत. २७ क्रमांकाच्या पानावर नदीबाबत लिहिले आहे. सर्व झऱ्यांचे मॅपिंग केले जाईल, पाणीपट्टीतील ७०% रक्कम सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येईल आणि पहिल्या टप्प्यात १३१ शहरांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले जातील आणि अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण केले जातील; असे म्हटले आहे. त्यानंतर ३४ आणि ३५ पानांवर पर्यावरण विभाग आहे. त्यात पॅरिस करार, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त नद्या, नद्यांची रेड-ब्लू लाईन, जैवविविधता, शाश्वत विकास असे बरेच मुद्दे मांडलेले आहेत. ह्यात कुठलीही आकडेवारी दिलेली नाही.   

राजकारणी लोक नुसते घोषणा करतात, प्रत्यक्ष काही होणार नाही किंवा शेवटी निवडणुकांचे निकाल अशा नदीसारख्या मुद्द्यांवर थोडीच ठरतात, यांसारखे प्रश्न अर्थातच उपस्थित होतात. पण सगळ्या गोष्टी अशा काळ्या-पांढऱ्या रंगात बघायच्या नसतात आणि ज्या लांब पल्ल्याच्या लढाया असतात, त्या तर नक्कीच अशा प्रकारे बघता येत नाहीत.  प्रत्यक्ष मतदानावर लगेचच परिणाम होईल किंवा नाही होणार. पण जनतेने आपल्या मागण्या मांडणे महत्त्वाचे असते. आज प्रमुख पक्षांच्या जाहीरनाम्यात ‘पर्यावरण’ असा विभाग आला आहे, त्यांना तो घ्यावा लागला आहे. काही नेते आणि पक्ष ह्या विषयावर जाहीर भूमिका घेऊ लागले आहेत, लोकांशी चर्चा करू लागले आहेत. शेकडो मतदार या मुद्द्यावर आपले मत ठरविणार आहेत. जाहीरनाम्यात जे विषय येतात, त्यांचे महत्त्व अधोरेखित होते, त्यावर प्रश्न विचारता येतात, त्याबद्दल जबाबदार धरता येते.  पुढची धोरणे ठरविण्यासाठी आणि आर्थिक तरतुदी करण्यासाठी एक दिशा ठरते. म्हणूनच आपण जास्तीत जास्त संख्येने पर्यावरणासारखे महत्त्वाचे मुद्दे ऐरणीवर आणले पाहिजेत. शेवटी हजार मैलांचा प्रवास एका पावलानेच सुरू होतो.


-प्राजक्ता महाजन  

स्पेनचा विध्वंसक पूर - आपण कधी जागे होणार?

स्पेनच्या विध्वंसक पुरावर सारंग यादवाडकरांबरोबर लिहिलेला माझा लेख १ ० नोव्हेंबर २ ० २ ४ ला लोकसत्तेत आला आहे. प्रकाशित लेख इथे पाहता येईल. तोच इथे देत आहे.



नुकताच ऑक्टोबर २०२४ मध्ये स्पेनमध्ये मुसळधार पाऊस झाला, रस्ते व शहरे जलमय झाली आणि मृतांच्या संख्येने २०० चा आकडा ओलांडला. २०२१ मध्ये असाच अचानक पूर येऊन युरोपमध्ये २५० लोक मृत्युमुखी पडले होते आणि ४६ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. स्पेनच्या आताच्या आर्थिक नुकसानाचे आकडे यथावकाश आपल्याला माहीत होतीलच. पण विकास आणि अर्थव्यवस्थेचा जप करता करता निसर्गाचा विध्वंस केल्याने अर्थव्यवस्थेलाच फटका बसतो आहे, हे आता समोर स्पष्ट दिसू लागले आहे. 


स्पेनमध्ये ढगफुटी होऊन बऱ्याच भागांत एका दिवसात ५ ते ७ इंच पाऊस झाला तर चिवा भागात तब्बल २० इंच पाऊस झाला! अशा ढगफुटीच्या वाढत्या घटना पर्यावरणातील बदलांमुळे होतात, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. भूमध्य समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान यंदा ऑगस्टमध्ये २८ अंश सेल्सियसच्या पुढे गेले होते. त्यामुळे हवेतले बाष्प वाढले आणि पाऊस जास्त तीव्रतेने पडला. हवेचे तापमान जसे वाढेल, तसे ती जास्त बाष्प धरून ठेवते. एका अंशाने तापमान वाढले, की हवा ७% जास्त बाष्प धरून ठेवते. त्यामुळे आता बदलत्या काळात अशा घटना अजूनच वाढणार आहेत. 


स्पेनच्या पुराच्या विदारक चित्रांमध्ये प्रामुख्याने व्हलेन्सियाचे  फोटो दिसत होते. पाण्याने भरलेले, चिखलाने भरलेले रस्ते, पाण्याखाली गेलेल्या गाड्या, कागदी होड्यांसारख्या पाण्यात वाहून मोडकळीला आलेल्या गाड्या अशी कितीतरी चित्रे दिसत होती. २० इंच पाऊस झालेल्या चिवाच्या खालच्या अंगाला समुद्राजवळ व्हलेन्सिया शहर आहे. ह्या शहरातून टुरिया नावाची नदी वाहते. नासाच्या फोटोंमध्ये ह्या टुरियाचे पाणी सगळीकडे पसरलेले दिसले आणि अर्थातच तिच्याबद्दल उत्सुकता वाढली. जसजसे तिच्याबद्दल वाचन केले, तशी धक्कादायक माहिती मिळत गेली आणि एक भयाण वास्तव समोर आले.      


टुरिया नदीच्या काठी व्हलेन्सिया वसलेले होते आणि कुठल्याही प्रदेशाचे असतात तसे ह्या भागाचे ह्या नदीशी सांस्कृतिक बंध होते. व्हलेन्सियातून वाहत ही नदी पुढे भूमध्य समुद्राला मिळत असे. नदीच्या मुखाशी बराच गाळ साचत असल्याने बंदरातील बोटींना ते गैरसोयीचे होते. त्याखेरीज ही काही वर्षभर दुथडी भरून वाहणारी नदी नव्हती. आपल्याकडच्या बऱ्याच नद्यांप्रमाणे वर्षातला बराच काळ एक बारीकसा प्रवाह असलेली बऱ्याचशा कोरड्या पात्राची नदी होती. त्यामुळे “तिला व्हलेन्सियाच्या बाहेर हलवा आणि बंदर मोकळे करा” अशी मागणी १७६५ पासून अधूनमधून उचल खात असे. अशातच ऑक्टोबर १९५७ मध्ये टुरियाला मोठा पूर आला आणि त्यात ८१ लोक मृत्युमुखी पडले. प्रचंड आर्थिक हानी झाली. नदीला व्हलेन्सियातून विस्थापित करायला चांगलेच निमित्त मिळाले. 


एकदा “पूरनियंत्रण” असे नाव दिले, की माणूस नदी आणि तिच्या परिसंस्थेची दैना करायला मोकळा होतो. इथेही तेच झाले. टुरिया नदीवर बांध घालून तिचा मार्ग शहराच्या बाहेर दक्षिणेला वळवला आणि एका आखीव मार्गाने तिला (बंदरापासून लांब) समुद्रात नेऊन सोडले. हा नवा प्रवाह आधीपेक्षा रुंद केला आणि त्याला काठाने तटबंध बांधले. तटबंधांच्या पलीकडे रस्ते आणि त्यापलीकडे उद्योग-व्यवसायाच्या जागा तयार केल्या. शहराच्या मध्यभागात जिथे पूर्वी नदीचे पात्र होते, तिथे वेगवेगळ्या सोयींनी युक्त असे मोठे ‘टुरिया उद्यान’ बांधले. ह्या उद्यानात कारंजे, मनोरंजन क्षेत्र, कॅफे, क्रीडा सुविधा, नृत्याची जागा असे सर्व काही आहे. उद्यानाचे नाव वाचून गंमत वाटते. जिला विस्थापित करून हे उद्यान बांधले, त्या टुरिया नदीचे नाव दिले, की झाले काम. 


हे सगळे बदल करायला प्रचंड खर्च झाला. सात अब्ज पेसेटा (स्पेनचे जुने चलन) खर्च करावे लागले आणि त्यासाठी व्हलेन्सियाच्या नागरिकांना जास्तीचा करही भरावा लागला. ही झाली आर्थिक किंमत. पर्यावरणाची सुद्धा मोठी किंमत मोजावी लागली. नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि भूजलाचे भरण बदलण्यात आले. जुन्या पात्राच्या आजूबाजूला जो झाडझाडोरा होता, प्राण्यांचा अधिवास होता, तो पूर्णपणे नष्ट झाला. नव्याने पात्र आखल्यामुळे त्याजागी पूर्वी जी झाडी आणि परिसंस्था होती, ती पूर्ण नष्ट झाली. नवीन पात्राला तटबंध बांधल्यामुळे नदीला पसरायला कुठेही पूरमैदाने उरली नाहीत. नदीच्या गाळ वाहण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला. 

     


इतका खर्च आणि इतका विध्वंस केल्यावर शेवटी आता पूर आलाच, अगदी प्रलयंकारी वाटेल असा आला आणि जीवित व आर्थिक हानी करून गेला. मग नदीला विस्थापित करून काय साधले? व्हलेन्सियाच्या बातम्यांमध्ये पावसाच्या तीव्रतेचा उल्लेख असतो (ती तर वाढतच जाणार आहे) आणि लोकांना आगाऊ सूचना दिली नाही हेही सांगितले जाते. पण त्याच्या पलीकडे जाऊन स्पॅनिश लोकांना नदीचा विचारही करावाच लागेल. पाण्याला धरून-बांधून काही उपयोग नाही, तर त्याला त्याची जागा देऊनच प्रश्न सुटणार आहेत, हे आधुनिक तत्त्व शिकावे लागेल. “पाण्याविरुद्ध नाही, तर पाण्यासह” जगण्याचे शहर नियोजन करावे लागेल. पावसाच्या वाढत्या तीव्रतेमध्ये नदीला तटबंध बांधून उपयोग होत नाही.  सिमेंट-काँक्रीटमुळे पाणी जिरत-मुरत नाही. पावसाचे पाणी शोषून घेऊन जिरवणारी क्षेत्रे निर्माण करावी लागतात. नदीसाठी पूरमैदाने आणि पाणथळ जागा राखाव्या लागतात. भारतीय लोकांनाही ह्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. आपल्याकडेही बऱ्याच नद्यांना तटबंध बांधणे आणि काठावरच्या परिसंस्था उध्वस्त करून व्यापारी व मनोरंजन केंद्रे बांधण्याच्या योजना सुरू आहेत. “नदीकाठ सुशोभीकरण” अशा नावाने अहमदाबाद, पुणे, लखनौ अशा कितीतरी शहरांत तशी कामेही सुरू आहेत. स्पेनची पूरस्थिती हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे, हे आपण वेळीच ओळखायला हवे.  


सारंग यादवाडकर व प्राजक्ता महाजन, 

puneriverrevival.com सदस्य