गप्पांमध्ये पुन्हा पुन्हा
उंचच उंच मनोरे
प्रश्न घ्यायचेच नाहीत
तर कसली उत्तरे?
रोज नव्या आकड्यांमधून
रोज नवं पीक काढतात
आणि वणव्याच्या वेगाने
प्रत्येक स्क्रीन भरून टाकतात
पण घेतलीय ना इतिहासाची पताका हाती?
मग आता गपगुमान जायचं आपण सती
पडदे लावून, भिंती घालून
गरिबी ठेवतात झाकून
चार धेंडांचं कल्याण करताना
वनं काढतात कापून
पोराबाळांना देतात
दूषित हवा, घाण पाणी
आणि रंगवून सांगतात
प्लास्टिक-सिमेंटची कहाणी
पण घेतलीय ना इतिहासाची पताका हाती?
मग आता गपगुमान जायचं आपण सती
विरोध केला असेल तर
भल्यालाही बसते काठी
ज्याच्याशी हाडवैर केलं
त्यालाच मारतात मिठी
आपल्याशी होता वायदा
भलत्याचा झाला फायदा
एवढा एकच, म्हणत म्हणत
दरवेळेस नवाच सौदा
पण घेतलीय ना इतिहासाची पताका हाती?
मग आता गपगुमान जायचं आपण सती
वास्तवाचे विदारक चित्र.. तरी आशावादी.खूप छान.
उत्तर द्याहटवाधन्यवाद! आशावादी?
हटवा