शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

कथा - स्वातंत्र्य

 गडद निळ्या रंगाचा चुणीदार, गाठ मारून तिरकी बांधलेली पातळ झिरझिरीत ओढणी, तेल लावून, विंचरून घातलेली लांबसडक वेणी अशी सुमीची ठेंगणी अशक्त सावळी मूर्ती फाटक उघडून लगबगीने आत शिरली. तीन किलोमीटर चालत आली होती ती. तिने तिच्या जुनाट पर्समधून किल्ली काढली आणि ऑफिसचं कुलुप उघडलं. सगळे लोक यायच्या आधी दोन मजली बंगला झाडून-पुसून स्वच्छ करायचा होता. आज साहेबही येणार होते. म्हणजे बाल्कनीही स्वच्छ धुवून काढायची होती. इतर लोक येण्यापूर्वी ती मस्त मोकळेपणाने वावरत असे आणि धडाधड कामं करत असे. पण एकेकजण येऊ लागला, की मानेवर खडा ठेवल्यासारखी मान गोठून जायची. सगळ्या हालचालींना एक अवघडलेपण यायचं. कुणी काही विचारलं, तरी आवाज खोल जायचा. शक्यतो कमीच बोलायची ती.

तिच्याशी आणि साहेबांच्या ड्रायव्हरशी सोडून सगळे एकमेकांशी जास्ती करून इंग्रजीतच बोलायचे. पांढऱ्या चकाकत्या लॅपटॉपवर इंग्रजीत लिहायचे. जास्ती करून मुली आणि बायकाच होत्या ऑफिसात. तीनच पुरुष होते. कुठली तरी संस्था आहे म्हणे. सामाजिक काम करतात. खूप चांगलं काम आहे म्हणतात. पण इंग्रजीतलं तिला काय कळणार? तशी सुमी शाळेत गेली होती. आठवीपर्यंत शाळाही शिकली. मग त्याच्यानंतर खूप अवघड परीक्षा, नापासही करायचे. नंतर सुटलीच शाळा. सुमी शाळेत मराठी लिहाय-वाचायला शिकली. पण सगळ्यात जास्त काही शिकली असेल, तर आपल्याला डोकंच कमीय आणि आपण उगी कुठे डोकं लावू नये, हेच शिकली. आता हे प्रशस्थ ऑफिसच बघा ना. ती लिहाय-वाचायला शिकल्याचा इथे काही फायदा आहे का? सगळे हुशार, डोकंवाले लोक फाडफाड इंग्रजी बोलून इथे काम करतात.

सुमीची झाडलोट झाली होती. ऑफिस आता गजबजलं होतं. तिने सगळ्यांसाठी चहा केला. नंतर कपबश्या धुतल्या. तेवढ्यात साहेबांची भव्य रथासारखी जीप फाटकातून आत आली. पन्नाशीला आलेले साहेब खाली उतरले. त्यांना छाती पुढे काढून चालायची सवय होती. वयामुळे पोटही पुढे यायचंच. आत येताना ते आजुबाजूला कटाक्ष टाकत. कुंड्या नीट ठेवल्या आहेत ना? झाडांना पाणी नीट घातलं जातंय ना? त्यांच्या मागेच लगबगीने त्यांच्या लॅपटॉपची पिशवी घेऊन ड्रायव्हर आला. एखाद्या सम्राटाच्या ऐटीत ते सभोवती नजर टाकत वरती त्यांच्या खोलीत गेले. ते आले, की सुमीला खूपच दडपण जाणवायचं. तिने ड्रायव्हरला विचारलं, “चहा ठेवू का साहेबांचा?” त्याने निरोप आणला, की “आज कॉफी कर.”

साहेब नेहमी इथे नसायचे. कधी परदेशी जायचे, कधी दिल्ली, कधी बंगलोर असे फिरत असायचे. दौऱ्यावरून आल्यावर मात्र सलग आठ-पंधरा दिवस इथेच असायचे. आले, की सगळ्यांना गोळा करून तासन् तास बैठकी घ्यायचे. मग दर दोन तासाला सगळ्यांना चहा, कधी काही खायला असं चालायचं. साहेब तसे गप्पिष्ट होते. परदेशी कुठे जाऊन आले, दिल्लीत कुणाला भेटले असे सगळे किस्से बैठकीत रंगवून सांगायचे. कधी कधी त्यांच्या लाडक्या कुत्र्याच्या गंमतीजमती सांगायचे. सांगता सांगता सभोवार नजर फिरवून आपल्याला दाद मिळतेय ना, असं बघायचे आणि मनातल्या मनात सुखावून जायचे. साहेब तसे रसिक होते. आपल्या विनोदावर कोण फिदा होऊन हसतेय, कुणाच्या गालाला खळी पडतेय आणि कोण लटक्या आश्चर्याने डोळे विस्फारतीय हे सगळं ते भिरभिरत्या नजरेने पटापट टिपायचे. कुणाचे सुशोभित काळेभोर डोळे, कुणाचं केसाच्या बटांशी खेळणं तर कुणाचे बिनबाह्यांचे रसरशीत दंड. साहेबांना एखाद्या पुष्पवाटिकेत बसल्यासारखं वाटायचं.

सुमी कॉफी करून वरती घेऊन गेली. साहेबांनी लॅपटॉपवरची नजर क्षणभर वर केली आणि मानेनेच “ठीक” असं सांगितलं. त्यांच्या नजरेत एक थंड नापसंती होती. टेबलवर कॉफी ठेवून सुमी खाली आली. तिला त्यांच्या नजरेतला तो भाव आवडायचा नाही. साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. ड्रायव्हर सुट्टीवर होता आणि साहेबांना भेटायला ऑफिसमध्ये कुणीतरी येणार होतं. येणाऱ्या माणसाला नीट पत्ता सापडेना. साहेबांनी सुमीला सांगितलं, की गल्लीच्या तोंडाशी जा आणि पाहुण्यांना घेऊन ये. सुमी निघाली तसं साहेबांनी फोनवर पाहुण्यांना सांगितलं, “एक मुलगी पाठवतोय तुम्हांला घ्यायला. लाल कपडे, किडकिडीत, साडे चार फुटी.” आणि तिच्याकडे बघून विनोद केल्यासारखे हसले होते. सुमी चांगली पाच फुटाच्या जवळ होती. लहान चणीची होती. कुणी कुणी तिला शाळकरी समजायचे. पण साडे चार फुटी नक्कीच नव्हती आणि समजा असती जरी, तरी त्यात साहेबांनी असं हसण्यासारखं काय होतं? तेव्हापासून तिला साहेबांची नजर जास्त चांगली समजायला लागली होती. “तू कुणी नाहीस”, असं त्यात स्पष्ट लिहिलेलं असायचं.

पण सुमी तिला काय वाटतं, ते कधी कुणाकडे बोलली नाही. तिला आठवलं, की आजी नेहमी म्हणायची, “पोरीची जात म्हणजे दिसायला बरी असावी लागते बाई!” ज्या दिवशी सुमीला सगळ्यात जास्त वेदना झाल्या होत्या, तेव्हाही आजी हेच आणि एवढंच म्हणाली होती. सुमी दहा-अकरा वर्षांची होती तेव्हाची गोष्ट. तिला आइस्क्रीम खावंसं खूप वाटत होतं म्हणून तिने आईचे पैसे घेतले आणि गुपचूप बाहेर जाऊन आइस्क्रीम खाऊन आली. आईच्या लक्षात आलं तेव्हा सुमी म्हणाली, “मी नाही घेतले पैसे.” आता मात्र तिच्या आईचा पारा चांगलाच चढला. आई स्वयंपाक करत होती. तिने सांडशी उचलली. विस्तवात चांगली लाललाल तापवली आणि संतापाने सुमीला म्हणाली, “बोलशील पुन्हा खोटं? याच जिभेने खोटं बोललीस ना?” आणि तिने सुमीच्या जिभेला सरळ चटकाच दिला. सुमी जिवाच्या आकांताने किंचाळली. ऊर फुटून रडली. कित्येक दिवस तिला नीट जेवता-खाताही येत नव्हतं. तेव्हा तिची आजी तिच्या आईला रागवली, “काही अक्कल आहे का तुला? सांडशी चुकून ओठाला लागली असती, गालाला लागली असती, डाग राहिला असता म्हंजे? पोरीची जात ती. बरी दिसायला नको?”

सुमीची दिवसभराची कामं संपली होती. दिवसभर खूप गरम होत होतं, घामाच्या धारा लागत होत्या. संध्याकाळ होऊ लागली तसं आभाळ भरून येऊ लागलं. एकेकजण घाईघाईने घरी जाऊ लागला, लागली. पण साहेब कुठल्यातरी मोठ्या फोनकॉलवर तास झाला तरी बोलत होते. त्यामुळे ऑफिस बंद करता येईना. ती अडकून पडली. जोराचा वारा सुटला. एकदम अंधारून आलं. विजा कडकडायला लागल्या आणि वळवाचा रपरप पाऊस सुरू झाला. तिच्याकडे छत्री पण नव्हती. आता इथे किती वेळ अडकून पडणार कुणास ठाऊक, असं तिला झालं. तेवढ्यात साहेब काम संपवून वरून खाली उतरले. ड्रायव्हर म्हणाला, “साहेब, जाता जाता हिला घरी सोडून जाऊ या का? खूप दूर नाही, तीन किलोमीटरच जायचं.” साहेबांनी मानेनेच त्याला परवानगी दिली आणि उपकृत केलं. साहेब तसे मोठ्या मनाचेच होते.

भल्या थोरल्या जीपमध्ये सुमी एकदम अवघडूनच बसली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं. जीप पुढे जाताना बाजूने चालणाऱ्यांच्या अंगावर फर्रफर्र फवारे उडत होते. आता तर दिवेही गेले होते. पाच मिनिटांत सुमीची वस्ती आली सुद्धा. गटारं पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत होती. ड्रायव्हर म्हणाला, “इथं सोडू का? ह्याच्यापुढं गाडी जाणार नाही.” सुमीसाठी हेच खूप होतं. ती घाईघाईने उतरली. तिने तिची झिरझिरीत ओढणी काही उपयोग नसताना उगीचच डोक्यावर घेतली आणि गाडी वळवेपर्यंत ती त्या फाटक्या वस्तीत दिसेनाशी सुद्धा झाली. साहेबांनी ही वस्ती पाहिली आणि त्या अंधुक प्रकाशातही त्यांना ओळख पटली. ते वीस-बावीस वर्षांपूर्वी इथेच आले होते.

तेव्हा ते साहेब नव्हते. तो तरुण जयंता होता, अमेरिकेत शिकून नुकताच परत आला होता. त्याला सूट-बूट घालून कुठल्या कंपनीत नोकरी करण्याची अजिबात इच्छा नव्हती. जे मनापासून वाटतं, जे बदलायलाच हवं तेच तो करणार होता. त्याचे काही जुने मित्र-मैत्रिणी मानवाधिकारासाठी झटत होते. असाच एकदा एका मैत्रिणीचा फोन आला “तू येतोस का” म्हणून आणि जयंता ह्या वस्तीत आला होता. कोण बरं तरुण होता त्या वस्तीतला? महादू. महादूला कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी सरकारी लोक घेऊन चालले होते. त्याला पैसे देणार होते आणि त्याची बायको रडत होती. जयंता हिरिरीने मध्ये पडला. जयंता कमालीचा स्वातंत्र्यवादी होता. महादूला एक मूल होतं. त्यानंतर शस्त्रक्रिया करायची की नाही, हा निर्णय घेण्याचं त्याला आणि त्याच्या बायकोला पूर्ण स्वातंत्र्य हवं. महादूसारखा दारुडा माणूस पैशासाठी तयार होतो, तेव्हा त्याने खरंच स्वतंत्रपणे मनापासून निर्णय घेतला असं म्हणता येईल का? “लोकशिक्षण करा, समजावून सांगा आणि निर्णय त्या माणसावर सोडा”; असं त्याचं स्पष्ट मत होतं. जयंताने त्या सरकारी लोकांना हाकलून लावलं. महादूच्या बायकोने येऊन जयंताचे पायच धरले होते! साहेबांना हे सगळं आठवून त्यांच्या डोळ्यांत अभिमान तरळू लागला. कुणी आई-बाप व्हायचं आणि कुणी नाही, ह्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायलाच पाहिजे. महादू अजून तिथेच राहत असेल का? सुमीला तो माहीत असेल का? साहेबांची जीप त्यांच्या घरी पोहोचली.

महादूला नंतर वर्षभरातच सुमी झाली. ती तीन वर्षांची असतानाच तो दारू पिऊन पिऊन रक्ताच्या उलट्या करून मेला. सुमीच्या वाट्याला कुठलंच स्वातंत्र्य आलं नाही. व्यवस्थित खायला मिळण्याचं स्वातंत्र्य. शरीराची धड वाढ होण्याचं स्वातंत्र्य. धुण्या-भांड्याची कामं न करता “नुसतं” शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य. आईची मारहाण न सोसता लहान मूल असण्याचं स्वातंत्र्य. जयंताचे प्रतिष्ठित स्वातंत्र्यवादी साहेब झाले आणि सुमीची नगण्य चिपाड मोलकरीण.

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

प्राण्यांच्या समजेबाबत आपली समज

फ्रान्स डी वाल नावाचे डच-अमेरिकन इथॉलॉजिस्ट (प्राणी-वर्तनाचे अभ्यासक) आहेत. प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याला वाटतो तितका आणि तसा फरक आहे का, हे तपासायला लावणारं त्यांनी एक आगळंवेगळं आणि लांबलचक शीर्षकाचं पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे - Are We Smart Enough To Know How Smart Animals Are – प्राण्यांची हुशारी समजण्याइतके आपण हुशार आहोत का? माणसाला ज्या क्षमता “फक्त” स्वत:मध्येच आहेत असं वाटत आलं आहे, त्या आकस्मिक आलेल्या नसून त्याच्या खाणाखुणा वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये कशा दिसतात, त्याचे वेगवेगळे किस्से आणि प्रयोग ह्यात वाचायला मिळतात.

गेल्या शतकातल्या वैज्ञानिकांचा प्राण्यांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास नव्हता. प्राण्यांना भावना असतात किंवा त्यांच्या मनात हेतू असू शकतो असं मानणं अशास्त्रीय, स्वप्नाळू धरलं जायचं, लोककथा म्हणून हिणवलं जायचं. प्राणी फक्त वर्तमानात जगू शकतात आणि भविष्याचा विचार करू शकत नाहीत, अशी त्यांची ठाम समजूत होती. त्यात दोन विचारधारा होत्या. पहिली म्हणजे, प्राणी हे घटनांना प्रतिसाद देणारं जणू यंत्र आहेत आणि ‘बक्षीस मिळवा’, ‘शिक्षा टाळा’ ह्या दोन गोष्टींसाठीच ते काम करतात. दुसरी म्हणजे, जनुकांमधून ज्या सहजप्रेरणा आलेल्या असतात, त्यावर चालणारं, स्वत: विचार करू न शकणारं यंत्र म्हणजे प्राणी. पण गेल्या काही दशकांमध्ये वैज्ञानिक प्राणी-वर्तनाकडे मोकळ्या मनाने पाहू लागले आहेत. आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये भिन्न प्रकारच्या बुद्धिमत्ता नसून एकाच प्रकारच्या बुद्धिमत्तेमधली ही तफावत आहे, अशी नवी धारणा येऊ लागली आहे.

आपण जेव्हा प्राणी आणि निसर्ग बघतो, अभ्यासतो तेव्हा त्या अभ्यासाला आपल्या दृष्टिकोनाच्या, आपल्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीच्या मर्यादा पडतात. त्या त्या प्राण्याचं जग लक्षात न घेता माणसाच्या चष्म्यातून पाहायला गेल्यावर गल्लत होते. उदाहरणार्थ, खारीला एक ते दहा अंक मोजता येतात का, ह्यावरून तिची बुद्धिमत्ता तपासण्याला काहीच अर्थ नाही. कारण तिच्या जगात अशा मोजणीची तिला आवश्यकताच भासत नाही. पण खारीचं लपवलेले दाणे शोधण्याचं कौशल्य मात्र कौतुक करण्यासारखं आहे. क्लार्क्स नटक्रॅकर किंवा क्लार्क्स क्रो म्हणून ओळखला जाणारा एक कावळ्यासारखा पक्षी आहे. तो शरद ऋतूत पाइनच्या हजारो बिया (pine nuts) एक चौरस मैल एवढ्या मोठ्या भागात शेकडो वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवतो आणि नंतर हिवाळ्यात बरोबर त्या शोधून खातो. ह्या लपवण्या-शोधण्याच्या कौशल्यात आपला ह्या पक्ष्यापुढे किंवा खारीपुढे अजिबात निभाव लागणार नाही! त्यामुळे प्रत्येक प्राण्याचं जग, त्याच्या गरजा आणि त्याची शरीररचना हे सगळं विचारात घेऊन त्याच्या क्षमता अभ्यासायला हव्या, असं लेखक मानतात. पुस्तकातल्या शेकडो प्रयोग आणि किश्शांपैकी मी काही थोड्यांचाच इथे उल्लेख करणार आहे. मला जे विशेष भावले, ते इथे देत आहे.

आशियाई हत्तींना आरशात स्वत:चं प्रतिबिंब ओळखता येतं. हॅपी नावाच्या एका हत्तीणीच्या कपाळावर डाव्या डोळ्याच्या वर तिला नकळत एक पांढरी फुली मारली होती. आरशासमोर गेल्यावर ती स्वत:चं प्रतिबिंब बघून पुन्हापुन्हा त्या फुलीला पुसायचा प्रयत्न करत होती. तिला आरशात आपणच आहोत, हे नीट समजलं होतं! आफ्रिकन हत्तींबाबत मात्र हा प्रयोग फसला. त्यांना सुळे असल्यामुळे ते सुळे आरशावर आपटून आरसे फुटले आणि प्रयोग नीट करता आला नाही. त्यामुळे त्यांच्या क्षमतेबाबत नक्की काही सांगता येणार नाही. हत्तींबरोबरच एप्स (चिंपांझी, गोरिला, ओरांगउटान इ.), कावळ्यासारखे असलेले मॅगपाय नावाचे पक्षी ह्यांनाही स्वत:चं प्रतिबिंब समजतं. ह्याच्याही पुढे जाऊन काही एप्सना आरशात बघून नटावंसं वाटतं. एका जर्मन प्राणिसंग्रहालयातली ओरांगउटान आरशासमोर उभी राहून स्वत:ला झाडाच्या पानांनी सजवत असते! चिंपांझी इतर चिंपांझींचे फोटोही ओळखतात. इतकंच नाही, तर अनोळखी चिंपांझींचे फोटो बघून त्यांना एका कुटुंबातले चिंपांझी सुद्धा ओळखू येतात. एका प्रौढ चिंपांझीचा फोटो दाखवला आणि त्यानंतर दोन लहान चिंपांझींचा फोटो दाखवला. त्या दोन लहानग्यांपैकी एक आधीच्या फोटोतलीचं पिल्लू होतं. अशावेळी त्या आईचं जे पिल्लू आहे, तो फोटो चिंपांझी दाखवतात. पूर्णपणे अनोळखी चिंपांझींचे फोटो बघून कोण कोणाची आई असेल, कोण कोणाचं बाळ असेल असा तर्क चिंपांझींना जमतो! म्हणजेच त्यांना नुसते चेहरे ओळखता येत नाहीत, तर मनुष्यासारखी चेहरेपट्टीची चांगली समज असते.

शंभर वर्षांपूर्वी हान्स नावाचा घोडा जर्मनीत “हुशार हान्स” म्हणून खूप प्रसिद्ध होता. तो गणिताच्या आकडेमोडी करायचा, अपूर्णांकाच्या क्रिया सुद्धा करायचा. जमिनीवर स्वत:चं खुर वाजवून तो उत्तर सांगत असे. उदाहरणार्थ ६० भागिले ४ विचारल्यावर तो १५ वेळा खुर वाजवत असे. हे त्याला कसं साध्य झालं? हान्सच्या क्षमतांचा नीट अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं, की प्रत्यक्षात तो त्याच्या प्रशिक्षकाच्या देहबोलीवरून उत्तर देत असे. घोडा उत्तरापाशी आला, की प्रशिक्षकाचं ताणलेलं शरीर जरा सैलावायचं, घोड्याच्या पायाकडे खाली पाहणारी मान वर व्हायची. (हे त्या प्रशिक्षकाच्याही नकळत व्हायचं.) त्या देहबोलीतला हा बदल बघून घोडा खुर वाजवणं थांबवत असे! काही लोकांनी ह्याला फसवणूक म्हटलं. पण खरं तर, प्रशिक्षकालाही हे कशामुळे घडतं आहे, त्याचा पत्ता नव्हता. हान्स गणितात हुशार नसला, तरी देहबोली वाचण्यात मात्र नक्कीच पारंगत निघाला!

प्राण्यांना अनुमान काढता येतं का, ते बघणारा एक मजेदार प्रयोग दिला आहे. सेडी नावाच्या चिंपांझीसमोर प्रयोगशाळेत एका डब्यात केळं आणि एका डब्यात सफरचंद ठेवलं. नंतर सेडीला वेगळीकडे जरा नादी लावलं आणि मग तिला प्रयोगाशाळेतली एकजण केळं खाताना दिसली. नंतर सेडीला मोकळं सोडलं तेव्हा तिने जाऊन सफरचंदाचा डबा उघडला! सेडीने दोन अनुमानं काढली होती. एक म्हणजे, केळं खाणाऱ्या बाईने डब्यातून काढून केळं खाल्लं असणार (तिने प्रत्यक्ष कुणाला केळं काढताना पाहिलं नव्हतं) आणि दुसरं म्हणजे सफरचंद डब्यात तसंच असणार. हे काही ती अनुभवाने शिकली नव्हती. अगदी पहिल्याच प्रयोगात तिने असं अनुमान काढलं आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयोगातही वेगवेगळे बदल केले तरी तिला अनुमान काढता आलं. चिंपांझीला घटनाक्रम समजतो, तर्क लावून रिकाम्या जागा भरता येतात. चिंपांझी राजकीय धोरण सुद्धा ठरवतात. सगळ्यात शक्तिमान चिंपांझी टोळीप्रमुख होतो, असं नाही. छोट्या चणीचा असला, तरी बरेच मित्र आणि बहुतेकांचा पाठिंबा मिळवू शकणाऱ्याला ते पद मिळणं सोपं जातं. म्हणून आघाड्या करण्यात, पाठिंबा मिळवण्यात ते बराच वेळ आणि शक्ती खर्च करतात.

कावळे माणसांचे चेहरे ओळखतात. ज्या माणसांनी प्रयोगासाठी कावळ्यांना पकडून लेबल लावून पुन्हा सोडलं आहे, त्या माणसांवर कावळे चांगलाच राग काढताना दिसतात. विद्यापीठातल्या शेकडो माणसांच्या गर्दीतही अशा लोकांना कावळे बरोबर ओळखतात. इतकंच नाही, तर ज्या कावळ्यांना कधी पकडलं नव्हतं, तेही ह्या लोकांवर चिडलेले असतात आणि त्रास देतात. म्हणजे कुठली माणसं वाईट आहेत, हे इतर कावळ्यांकडून ते शिकत असतात! मेंढ्याही एकमेकींचे चेहरे ओळखतात आणि लक्षात ठेवतात. गांधीलमाश्यांचा (wasp) मेंदू खूपच छोटा असतो, तरी त्या एकमेकींना ओळखतात. चेहरा ओळखण्याची त्यांच्यामध्ये काही वेगळी व्यवस्था असण्याची शक्यता आहे.

जंगलातल्या चिंपांझींच्या टोळ्या उपकरणं (tools) तयार करून वापरतात, एकमेकांकडून शिकतात आणि पुढच्या पिढ्या त्यात सुधारणाही करतात. प्रत्येक टोळी १५ ते २५ प्रकारची वेगवेगळी उपकरणं वापरते. त्या त्या टोळीची संस्कृती आणि आजुबाजूचा परिसर यानुसार ही उपकरणं बदलतात. गोरिला, बोनोबो आणि ओरांगउटान असे एप्स तर उपकरणं वापरतातच. त्याखेरीज कावळेही काटक्यांचे हूक तयार करून हुमण्या पकडतात. इंडोनेशियाजवळच्या समुद्रातले ऑक्टोपस नारळाच्या करवंट्या गोळा करून ठेवतात. भविष्यात गरज पडेल तेव्हा त्यांचा लपण्यासाठी छलावरण (camouflage) म्हणून ते उपयोग करतात!

अलेक्स नावाच्या आफ्रिकन ग्रे पोपटाच्या क्षमता सगळ्यात जास्त थक्क करणाऱ्या आहेत. अलेक्सला रंग, आकार, वस्तूसाहित्य (लोकर/प्लास्टिक/कागद) ह्यांची तुलना करता यायची आणि मोजताही यायचं. उदा. एखाद्या ताटात तीन लाल त्रिकोण, चार निळे चौकोन, सहा हिरवे गोल असतील आणि त्यावर प्रश्न विचारले तर “चौकोन किती आहेत” किंवा “कुठल्या रंगात तीन आहेत” ह्यांची उत्तरं तो देत असे. तो नुसतं अनुकरण करायचा नाही (पोपटाबाबत तसा समज आहे) किंवा लक्षात ठेवायचा नाही, तर त्याला आकलन होत असे. त्याच्याबद्दलच्या ह्या चित्रफिती प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे.

https://www.youtube.com/watch?v=P3w6OYsKJCc

https://www.youtube.com/watch?v=ldYkFdu5FJk

माणसात दिसणारा सहानुभूती, अडचणीत असणाऱ्याला मदत करणे हा गुण एप्स, डॉल्फिन ह्यांच्यामध्ये दिसून येतो. कापुचिन माकडांमध्येही हे दिसून येतं. ही माकडं झाडावर राहतात. एखादी गरोदर माकड जर खाली यायला तयार नसेल, अवघडली असेल तर इतर माकडं जास्त अन्न गोळा करतात आणि तिला वरती नेऊन देतात. प्रयोगशाळेतही जर एकाच कापुचिन माकडाला अन्न दिलं, तर तो ते दुसऱ्याबरोबर वाटून घेऊन खातो.

भूतकाळातल्या गोष्टी लक्षात ठेवणे, त्यानुसार भविष्याची आखणी करणे हे सुद्धा प्राण्यांमध्ये दिसतं. दुष्काळात पूर्वी पाहिलेलं, कुणाला माहीत नसलेलं एखादं लांबवरचं पाण्याचं ठिकाण कळपातल्या सगळ्यात मोठ्या, वृद्ध हत्तीणीला माहीत असतं. तिच्यावर विश्वास ठेवून सगळा कळप पाण्यासाठी दिवसेंदिवस चालत तिथे पोहोचतो. एखाद्या ठिकाणी अन्न मिळणार असेल तर लांब राहणारी  चिंपांझींची टोळी जवळ राहणाऱ्या टोळीपेक्षा जास्त लवकर उठते  आणि दोन्ही टोळ्या साधारण सारख्याच वेळेला तिथे अन्न गोळा करायला पोहोचतात. म्हणजे अंतर, प्रवासाला अपेक्षित वेळ आणि नियोजन हे सगळं त्यांना जमलेलं आहे. काही पक्ष्यांमध्येही ह्या क्षमता दिसून येतात.

अजून एक आपल्याला खास माणसाचा वाटणारा गुण म्हणजे संतोष-विलंब (delay of gratification). नंतर मिळणाऱ्या फळासाठी आत्ता संयम बाळगणे, मनावर ताबा ठेवणे. पण हा गुणही एप्स, कावळे अशा काही प्राण्यांमध्ये दिसून येतो. ग्रिफिन नावाच्या आफ्रिकन ग्रे पोपटावर ह्यासाठी प्रयोग केले गेले. ग्रिफिनला डाळ दिली आणि “थांब” म्हणून सांगितलं आणि दहा सेकांदापासून ते पंधरा मिनिटांपर्यंत (ही वेळ दरवेळी बदलत असे) जर तो डाळ न खाता राहिला, तर त्याला काजू मिळत! नव्वद टक्के वेळेला ग्रिफिनला हा संतोष-विलंब जमला. त्यासाठी तो वेगवेगळ्या युक्त्या वापरत असे. कधी तो डाळीची वाटी लांब सरकवून देई, कधी स्वत:शीच बोलून वेळ काढत असे, कधी डोळे मिटून बसत असे तर कधी प्रयोग करणाऱ्याकडे बघून ओरडत असे, “काजू द्या!”

पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांबद्दल बऱ्याचदा आपल्याला माहीत असतं, पण पाठीचा कणा नसलेला, अगदी वेगळा आणि हुशार प्राणी म्हणजे ऑक्टोपस. आपल्या आणि ऑक्टोपसच्या मेंदूत काही साम्य नसतं. ऑक्टोपसच्या डोक्यात एक (शरीराच्या मानाने मोठा) मेंदू असतोच. त्याखेरीज प्रत्येक पायात छोटासा मेंदू असल्यासारखं असतं. प्रत्येक पाय स्वत: निर्णय घेऊ शकतो! ऑक्टोपसला जर फिरवून झाकण लावायच्या बरणीत ठेवलं, तर तो एका मिनिटात झाकण फिरवून उघडतो आणि बाहेर येतो. तो त्याला खाऊ घालणाऱ्या माणसाला ओळखतो. सरड्यापेक्षा जास्त पटापट रंग बदलतो आणि खडक, वनस्पती, वेगवेगळे मासे अशी कितीतरी रूपं धारण करून अगदी सहज फसवतो! एका प्रयोगात प्राणिसंग्रहालयातला एक माणूस ऑक्टोपसला खाऊ घालत असे आणि दुसरा कधी कधी छोट्या काडीने हळूच टोचत असे. काही दिवसातच काडी टोचणारा माणूस दिसला, की तो ऑक्टोपस त्याच्या दिशेने पाण्याचे फवारे उडवू लागला, दूर जाऊ लागला आणि रंग बदलू लागला. खाऊ घालणाऱ्या माणसाकडे मात्र तो सहज जात असे. दोघेही संपूर्ण निळ्या रंगाच्या सारख्याच पोषाखात असले, तरी ऑक्टोपस त्यांना बरोबर ओळखत असे.

माणसाचा मेंदू मोठा आहे आणि त्याच्यामध्ये चेतना (consciousness) आहे. प्रौढ मनुष्याच्या मेंदूचं वजन साधारणपणे १.३५ किलो (दीड किलोच्या जवळ) असतं. डॉल्फिनचा मेंदू १.५ किलो वजनाचा, हत्तीचा चार किलोचा आणि स्पर्म व्हेलचा ८ किलो वजनाचा असतो. मग ह्या प्राण्यांमध्ये माणसापेक्षा जास्त चेतना आहे का? की चेतना असणं हे मेंदूच्या वजनाऐवजी मज्जापेशींच्या (neurons) संख्येवर अवलंबून असतं? हत्तीच्या मेंदूत माणसाच्या मेंदूच्या तिप्पट मज्जापेशी आहेत. पण हत्तीच्या आणि माणसाच्या मेंदूतल्या मज्जापेशींचं वितरण मात्र वेगवेगळं आहे. एकूणच मेंदू विज्ञानातली बरीच उत्तरं अजून मिळालेली नाहीत. आजवरचं बुद्धीच्या उत्क्रांतीवरचं काम आणि अभ्यास हा मुख्यत: प्राण्यांच्या वागण्यावर आणि आपल्या निरीक्षणावर आधारित आहे. पण आता हे बदलू लागलं आहे. येत्या काही दशकांमध्ये मेंदूविज्ञान ह्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेंदूच्या कोणत्या रचनेमुळे प्राण्याच्या वागण्यात कोणता बदल होतो, हे समजू शकेल. मनुष्याला प्रमाण मानून सगळं जग बघण्यापेक्षा प्रत्येक प्राण्याकडे त्याच्या अस्तित्वाच्या दृष्टीने पाहिलं, तर एक नावीन्याचं, विस्मयाचं नवं दालन उघडू शकेल.

ह्या पुस्तकात लेखकाने मुख्यत: प्राण्यांचं वागणं, प्रयोग आणि निरीक्षण ह्यावर भर दिला आहे. त्या वागण्यामागचं विज्ञान फारसं सांगितलेलं नाही. त्यामुळे हे पुस्तक सामान्य वाचकाला समजायला सोपं आणि मनोरंजक झालं आहे. प्राण्यांना यंत्रवत मानू नका, त्यांना भावना, बुद्धी असते; त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगा असं लेखक वारंवार सांगतो. ते अगदी खरंच आहे. पण माझ्या भारतीय मनाला अशा विचाराची विशेष नवलाई वाटली नाही.