रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

नवे मार्ग कसे सुचतात? कल्पकतेचा इतिहास

 

सुमारे दहा वर्षांपूर्वी स्टीव्हन जॉन्सन ह्यांचं “Where Good Ideas Come From: The Natural History of Innovation” असं पुस्तक आलं होतं. वाचायला खूप सोपं, मनोरंजक आणि कल्पकतेबद्दल नव्या संकल्पना शिकवणारं असं हे पुस्तक आहे. खरं तर हे पुस्तक मी पाच-सहा वर्षांपूर्वीच वाचलं होतं. आता त्यावर लिखाण करायचं म्हणून पुन्हा एकदा उघडलं. विलक्षण बुद्धिमत्तेच्या लोकांना अचानक दिवा पेटल्यासारखं काहीतरी जगावेगळं सुचतं आणि त्यातून नवकल्पना, नवमार्ग (innovations) जन्मतात, असा एक सामान्यत: समज असतो. ‘कल्पकता’ ही काहीतरी दिव्य, अद्भूत गोष्ट आहे, असं मानायला आपल्याला खूप आवडतं. परंतु कल्पकता ही एकमेकांच्या कल्पनांवर, संवादावर आणि आजुबाजूच्या पोषक वातावरणावर कशी अवलंबून असते, ते वेगवेगळ्या उदाहरणांमधून आणि अभ्यासातून लेखकाने स्पष्ट केलं आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाने शहरं आणि इंटरनेटमध्ये कशा नवकल्पना, अभिकल्पना आकार घेतात ते स्पष्ट केलं आहे आणि मग कल्पकता कुठे कुठे आणि कशामुळे आकार घेते, वाढीस लागते त्या गोष्टी, त्याचे नमुने (patterns) ह्यांचा पुस्तकभर धांडोळा घेतला आहे. नावीन्याचा शोध घेताना निसर्ग आणि मानवी संस्कृती ह्या दोन्हीचा विचार केलेला आहे आणि सात प्रमुख मुद्दे सांगितले आहेत.

१.     लगतची शक्यता – १६११ साली जगातल्या चार वेगळ्या देशात राहणाऱ्या चार शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे सूर्यावरचे डाग शोधले. ऑक्सिजन वेगळा करणे, टेलिफोन, वाफेचे इंजिन अशा शेकडो गोष्टींना एकापेक्षा जास्त “स्वतंत्र” जनक आहेत. अशा १४८ शोधांचा अभ्यास करून १९२० साली “शोध अटळ आहेत का?” असा निबंधच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातल्या संशोधकांनी लिहिला होता. ह्याचं कारण असं, की नवे शोध कुठून आकाशातून पडत नाहीत. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, त्याचे घटक, काही पद्धती ह्या अस्तित्वात असतात आणि त्यामुळे त्यावर अवलंबून “त्याच्यालगतची” कल्पना, शोध सुचत असतो – लगतचा, शेजारचा, जवळचा. त्याच्या अलीकडचे शोध, कल्पना अस्तित्वात असल्या तरच त्या कल्पनेसाठी लागणारं वातावरण मिळतं. एक दार पुढच्या खोलीत उघडतं. तिथे गेल्यावर अजून पुढची दारं सापडतात. ती उघडून अजून पुढे जाता येतं. लेखकाने ह्याची वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. एकोणिसाव्या शतकात चार्ल्स बॅबेजने “ॲनॅलिटिकल इंजिन” अशी कल्पना मांडली होती. प्रोग्राम करता येणारा तो पहिला संगणक ठरला असता. अत्यंत विलक्षण अशी ही कल्पना प्रत्यक्षात यायला पुढची शंभर वर्षे जावी लागली. कारण ती त्या काळातल्या “लगतच्या शक्यतां”च्या खूपच पुढे होती. त्यासाठी लागणारं व्हॅक्युमट्यूबसारखं इलेक्ट्रॉनिक्स विकसित झाल्याखेरीज संगणक प्रत्यक्षात येणं शक्य झालं नाही.

२.     द्रवासारखं जाळं – रसायनशास्त्रात पदार्थाच्या तीन स्थिती दिलेल्या असतात – घन, द्रव, वायू. “वायू” अवस्थेत रेणू इतके दूर पसरलेले असतात, की प्रक्रिया होणं सोपं नसतं. घन अवस्थेत हालचालच होत नाही म्हणून प्रक्रिया होणं अवघड जातं. प्रक्रिया होऊन काही नवीन हाती लागण्यासाठी द्रवरूप ही सगळ्यात चांगली अवस्था आहे. रेणू सहज फिरू शकतात, एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतात; मात्र वायूइतकी अस्थिरता आणि अनागोंदी नसते. परिस्थिती जेव्हा द्रवासारखी असते, तशी संस्कृती आणि वातावरण असतं, तेव्हा नवनवे मार्ग सापडतात आणि शोध लागतात. मानवी मेंदूत सुद्धा मज्जापेशींच्या लवचिक जाळ्यामधून नव्या कल्पना सुचतात. कल्पक लोकांचा वेगवेगळ्या कल्पक लोकांशी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क येतो तेव्हा अभिकल्पना उदयाला येतात. एकाच्या कल्पनेवर आधारित दुसऱ्याला पुढची कल्पना सुचत असते किंवा दोन वेगवेगळ्या लोकांच्या संबंधांतून, संवादातून एखादी नवीच कल्पना जन्म घेते. म्हणून शहरांमध्ये नवीन कल्पना जास्त प्रमाणात जन्माला येतात. ज्या कंपन्यांमध्ये, देशांमध्ये मोकळेपणा असतो, निरनिराळ्या लोकांशी संपर्क आणि संवाद साधण्याची संस्कृती असते, तिथे बरेच नवे शोध लागतात. वेगवेगळ्या लोकांच्या अशा लवचिक जाळ्यामधून, एकमेकाला जोडलं गेल्यामुळे नव्या कल्पना उदयाला येतात. इटलीमध्ये बाजाराच्या छोट्या शहरांमधून लोकांचा कसा एकमेकांशी संपर्क वाढला आणि त्यातून कसं पुनरुत्थान झालं त्याचं उदाहरण लेखकाने दिलं आहे. एकट्या माणसाकडून काही विशेष घडण्याची शक्यता कमी असते. त्यापेक्षा विचारांच्या, कल्पनांच्या आदानप्रदानातून अभिनव काही निर्माण होत असतं.

३.     मनात कुठेतरी वाटणं आणि योगायोग – अगदी स्पष्ट अशी अंतर्दृष्टी अचानक मिळत नसते. मनात कुठेतरी काहीतरी वाटत असतं. बऱ्याचदा अस्पष्ट, अपूर्ण अशा काही कल्पना असतात. बराच काळ मनात राहिलेल्या अशा गोष्टी इतरांशी झालेल्या संपर्क-संवादामुळे नीट आकार घेऊ लागतात. आपल्या अपूर्ण कल्पनांचा दुसऱ्याच्या अपूर्ण कल्पनांशी कुठेतरी मेळ बसतो आणि त्यातून काहीतरी नवीन अर्थपूर्ण कल्पना साकार होते. एका अपूर्ण कल्पनेला, काहीतरी वाटण्याला दुसरं पूरक काही सापडणं हा योगायोगाचा भाग असतो. अर्थात, तुम्ही जितका लोकसंग्रह वाढवाल आणि जितकं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटाल, तितकी अशा योगायोगाची शक्यता वाढत जाते. लेखकाने डार्विनचं उदाहरण दिलं आहे. डार्विन ह्यांच्या वहीमधल्या १८३५ पासूनच्या नोंदी आणि निरीक्षणं पाहिली, तर उत्क्रांतीच्या सर्व संकल्पना त्यात होत्या. परंतु १८३८ मध्ये त्यांनी माल्थस ह्यांचा लोकसंख्येवरचा निबंध वाचला आणि मग त्यांना अचानक उत्क्रांतीच्या सिद्धांताची जाणीव झाली. तो निबंध वाचेपर्यंत उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांच्या लक्षातच आला नव्हता! त्यांच्या मनात जी जवळजवळ तयार झाली होती, ती कल्पना एका निबंधवाचनाने पूर्णत्वाला नेली, जणू तो कोड्यातला शेवटचा तुकडा होता.

बऱ्याचदा आपण असं ऐकतो-वाचतो, की स्वप्नात एखादा शोध लागलेला असतो किंवा कल्पना सुचलेली असते. पण हे विचार किंवा अपूर्ण कल्पना बरेच दिवस आपल्या मनात (कधी नेणिवेत) सुरू असतात आणि झोपेत अशा अपूर्ण कल्पना किंवा आठवणींची दुसऱ्या पूरक कल्पनेशी जोडणी होते. मज्जापेशींच्या लवचिक जाळ्यामधला हा छानसा योगायोग असतो. आपण आपल्या डोक्यातले असे योगायोग मुद्दाम जुळवून आणू शकतो का? लेखकाने म्हटलंय, ही ह्यासाठी फिरायला जाणे हा एक चांगला उपाय आहे. फिरताना किंवा अंघोळ करताना चांगल्या कल्पना सुचतात.

४.     त्रुटी (error) – नवीन शोध लागतो, तेव्हा अचानक काहीतरी अनपेक्षित सुचतं किंवा घडतं आणि माणूस टाळी वाजवून “आहा” म्हणतो, असं काहीसं बऱ्याचदा आपल्या डोळ्यांसमोर असतं. पण बऱ्याचदा अशा “अपघाती” घटना एखाद्या त्रुटीमुळे घडलेल्या असतात आणि ती त्रुटी/चूक घडण्यापूर्वी सुद्धा खूप काम आणि प्रयत्न चालू असतात. लुई डगेअरने आयोडाइज्ड सिल्व्हर प्लेटवर प्रतिमा तयार करायचे प्रयत्न बरीच वर्षं केले होते. १८३० मध्ये  अशाच एका अपयशी प्रयोगानंतर त्याने त्या प्लेटस् एका कपाटात ठेवून दिल्या. त्या कपाटात बरीच रसायनं होती. दुसरे दिवशी सकाळी त्याला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. कपाटात सांडलेल्या पाऱ्याच्या वाफांमुळे त्या प्लेटस् वर स्पष्ट प्रतिमा उमटली होती! ह्यातूनच फोटोग्राफीचा (छायाचित्रण) जन्म झाला! छायाचित्रण, प्रतिजैविके (antibiotics), पेसमेकर्स अशा कित्येक गोष्टी अशा चुकांमधून साकारल्या आहेत. ह्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे अशा घटनांकडे बघताना “चूक” म्हणून सोडून देण्याऐवजी त्यांचं व्यवस्थित निरीक्षण करण्यात आलं!  बरोबर असलेला माणूस एके ठिकाणीच थांबून राहतो. चुका मात्र आपल्याला अन्वेषण करायला भाग पाडतात. खूपच कडक शिस्तीच्या वातावरणापेक्षा जरा मोकळं, वेगवेगळ्या लोकांशी संबंध येणारं, चुकण्याची, चुकांमधून शिकण्याची आणि त्यातून नवीनच काही जोडण्या हाती लागण्याची संधी देणारं वातावरण नव्या कल्पनांसाठी जास्त पोषक असतं.

५.     कार्यांतर – कार्यांतर म्हणजे एका क्षेत्रातली कल्पना दुसऱ्या क्षेत्रात वापरली जाते. हा शब्द आधी उत्क्रांतीसाठी वापरण्यात आला. शरीराच्या तापमानाचं नियमन करण्यासाठी अस्तित्वात आलेली पक्ष्यांची पिसं नंतर उडण्यासाठी वापरली जाऊ लागली. त्यांचा नवा उपयोग सापडला, कार्य बदललं, कार्यांतर झालं. लेखकाने छापखान्याचा शोध लावणाऱ्या गटेनबर्गचं उदाहरण दिलं आहे. वाईन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राचा (प्रेसचा) गटेनबर्गने शब्द छापायला उपयोग करून घेतला. त्याने काहीतरी अभिनव कल्पना काढली नाही, तर अस्तित्वात असलेलं तंत्र नव्या गोष्टीसाठी वापरायची युक्ती त्याने शोधली. वाईनचं यंत्र आणि शब्द छापणे ह्या दोन कल्पना त्याला जोडता आल्या! संशोधकांना एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करता यावी म्हणून सुरू झालेलं इंटरनेट आता कार्यांतर होऊन खरेदीपासून शिक्षणापर्यंत सगळ्यासाठी वापरलं जाऊ लागलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी जर संबंध ठेवले, संवाद साधला तर एका क्षेत्रातल्या कल्पना दुसरीकडे वापरायला मदत होते.

६.     मंच – नवीन काही शोधण्यासाठी कोणता मंच उपलब्ध आहे, तेही महत्त्वाचं असतं. ज्या विद्यापीठांमध्ये चांगल्या प्रयोगशाळा, जिज्ञासू वृत्तीला उत्तेजन आणि तज्ज्ञ सहकारी असतात, तिथे बरंच नवनवीन संशोधन होत असतं. हर्ली, चेन आणि करीम अशा तीन तरुणांनी फक्त सहा महिन्यांमध्ये ‘युट्यूब’ तयार केलं. असं नवीन काही तयार करण्यासाठीचा मंच त्यांना मिळाला. त्यासाठी लागणारे सगळे घटक त्यांच्याकडे होते – इंटरनेट, चित्रफीत चालवू शकणारा अडोबीचा फ्लॅश प्लॅटफॉर्म आणि जावास्क्रिप्ट ही भाषा. ह्या घटकांच्या एका आगळ्यावेगळ्या मिश्रणातून सगळ्या जगावर प्रभाव पाडणारं ‘युट्यूब’ जन्माला आलं. केवळ तंत्रज्ञानातच नाही, तर निसर्गात, संस्कृतीत आणि कलेच्या क्षेत्रातही उपलब्ध मंचावर आधारित नव्या कल्पना कशा येतात, ह्याची लेखकाने बरीच उदाहरणं दिलेली आहेत. 

बऱ्याच नवीन शोधांचा आणि नव्या मार्गांचा अभ्यास करून लेखकाने असा निष्कर्ष काढला आहे, की गेल्या पाचशे वर्षांमध्ये अभिनव कल्पना शोधण्यामध्ये मोठा फरक झाला आहे. पूर्वी एकेकटा माणूस आणि मुख्यत: ज्ञान मिळवण्यासाठी शोध घेत असे. आता जास्तीत जास्त नवे शोध हे अनेक व्यक्तींनी मिळून केलेले, त्यांच्या संपर्कजालातून साकारलेले असतात. आताच्या नवकल्पनेमागे ज्ञान किंवा पैसे ह्यापैकी कुठलीही प्रेरणा असू शकते. कल्पकता जोपासताना स्पर्धा आणि सहकार्य हे दोन्ही आवश्यक असतात. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र अस्तित्वात असू शकतात. वर्षावने (rain forests), मोठी शहरे, इंटरनेट ह्या सर्व ठिकाणी स्पर्धाही असते आणि सहकार्यही असतं आणि त्यातूनच नावीन्य वाढीस लागतं. विविध लोकांच्या मोठ्या जाळ्यामध्ये वेगवेगळे अनियत (random) संपर्क होतात, कल्पनांचं आदानप्रदान होऊन अपूर्ण कल्पना सिद्धीस जातात किंवा कल्पनांचं कार्यांतर होतं, कधी फलदायी चुका होतात आणि लगतच्या शक्यता प्रत्यक्षात उतरतात. 

पुस्तकातल्या वेगवेगळ्या शोधांच्या कथा मनोरंजक तर आहेतच. शिवाय प्रोत्साहन देणाऱ्याही आहेत. ओघवत्या, चित्रदर्शी शैलीत बऱ्याच कथा, उदाहरणं सांगत एकेक सिद्धांत स्पष्ट केल्यामुळे पुस्तक वाचायला मजा येते.  


गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

कथा - दुर्बीण

आज सरांचा मुख्याध्यापक म्हणून पहिला दिवस. ह्या दिवसाची ते कित्येक वर्षं आतुरतेने वाट पाहत होते. आधीचे मुख्याध्यापक कालच निवृत्त झाले. त्यांनी शाळेसाठी काहीच धड केलं नाही आणि सरांनी काही प्रयत्न केलेलाही त्यांना आवडायचा नाही. सरांनी आज शाळेचं नवं पर्व सुरू करायचा निश्चय केला होता. त्यांनी सगळ्या शाळेसमोर भाषण करून त्यांचं स्वप्न सांगितलं, “मुलांना नुसतं लिहायवाचायला आलं, गणितं करता आली म्हणजे शिक्षण होत नाही. आपल्याला त्यांना वेगवेगळे अनुभव द्यायचे आहेत. ह्याची सुरुवात म्हणून आपण आपल्या शाळेत एक मोठी दुर्बीण आणणार आहोत. विश्वाच्या अफाट पसाऱ्याची जाणीव मुलांना झाली पाहिजे. आकाशाशी त्यांचं नातं जडलं पाहिजे. आपल्या शाळेतून खगोलतज्ज्ञ निर्माण झाले पाहिजेत.” आपल्या शाळेत असं काही होऊ शकतं, असा कधी विचारही कुणी केला नव्हता. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. विज्ञानाच्या शिक्षकांना तर भरूनच आलं.

सरांनी विज्ञानाच्या शिक्षकांना बोलावून त्यांना योजना नीट समजावून सांगितली. सरांनी स्वत:च पुढाकार घेतला होता. पुढच्या आठवड्यात शहरातून दुर्बिणवाला माणूस सरांना भेटायला आला.  तो म्हणाला, “शाळेसाठी म्हणजे तुम्हांला डोब्सोनियनच चांगला राहील.” विज्ञानाच्या शिक्षकांना नक्की काही समजलं नाही. पण सर ‘हो’ म्हणाले म्हणून त्यांनीही मान डोलावली. मग पुढे तो म्हणाला, ह्यात आरसा असणार, न्यूटोनियन.” विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, “आणि भिंग?” दुर्बिणवाला म्हणाला, “नाही, ह्यात भिंग नसतं.” सर म्हणाले, “बरोबर! काय किंमत म्हणता?”

तरी तीस-पस्तीस हजारापर्यंत जाईल बघा आठ इंचाला.”

“आठ इंच?”

“आता शाळेला म्हणजे आठ इंचाचा तरी लागेलच की आरसा! आणि शहरातून आणून पोचवायचा खर्च वेगळा.”

“इथं वरती गच्चीवर लावून द्याल ना?”

“निरीक्षणाच्या वेळी फक्त वर न्यायची दुर्बीण. एरव्ही पावसापाण्यात खराब होणार, सर.”

“वरती नेऊन लावायची?”

“हो, तुम्हांला काय बघायचं तशी लावायची, जुळवून घ्यायची. आकाशाचा नकाशा वाचायचा आणि तशी लावायची. म्हणजे मग ग्रह, तारे बघता येतील.”

दुर्बिणवाल्याला “आमचं नक्की काय ठरेल ते कळवू” असं म्हणून सरांनी पाठवून दिलं. सर आणि विज्ञानशिक्षक विचारात पडले. एवढा खर्च करायचा आणि हा माणूस आठ इंचाचंच आणणार म्हणतो काहीतरी. सरांनी विज्ञानशिक्षकांना आकाशाच्या नकाशाबद्दल विचारलं, तर त्यांनी कधी पाहिलाही नव्हता तो. कसा वाचायचा आणि काय करायचं, हे कुणालाच माहिती नव्हतं.  एवढा खर्च करून आकाशातलं काय कसं बघायचं, हा प्रश्नच होता. नुसत्या शाळेतच नाही, तर अख्ख्या गावात बातमी पसरली होती, की इथे दुर्बीण बसणार, मुलांना आकाश निरीक्षणाची संधी मिळणार. उत्सुकता वाढली होती, अपेक्षा उंचावलेल्या होत्या. नव्या सरांबद्दल आदर पसरला होता. आता मागे सरकायला जागाच नव्हती.

सरांनी ठरवलं, की आता वेगळा विचार केला पाहिजे. आपल्याला नवनवीन सुचत राहिलं पाहिजे. शाळेच्या गच्चीवर एक अडगळीची मोठी खोली होती. सरांनी ती एकदम रिकामी आणि स्वच्छ करून घेतली. रविवारी सुट्टीच्या दिवशी चित्रकलेचे शिक्षक आणि विज्ञानशिक्षक असं दोघांनी मिळून सरांच्या मार्गदर्शनाखाली गच्चीवरच्या खोलीत मोठ्या कामगिरीला सुरुवात केली. विज्ञानाच्या पुस्तकातली ग्रह-ताऱ्यांची चित्रं बघायची आणि रात्री अंधारात चमकणाऱ्या रंगाने छतावर, भिंतीवर रंगवायची. दिवसा हा रंग पांढरटच दिसतो. त्यामुळे पांढऱ्या छतावर आणि भिंतीवर रंगवलेलं काही कुणाला कळायची शक्यता नव्हती. तीन वेगवेगळे चमकणारे रंग होते. अंधारात हिरवट दिसणारा एक, दुसरा गुलाबी-लालसर आणि तिसरा केशरी दिसणारा. गुरूला आणि शनीला केशरी घेतला, मंगळाला गुलाबीसर. आता शुक्राला हिरवट करावं का? पुस्तकात तर पांढरा होता. मग शुक्र रद्दच केला. हिरव्या रंगाचं काय करायचं? त्याचा छान शेपटीवाला धूमकेतू काढला. चंद्राच्या तर कला असतात. रोज वेगळा दिसतो. मग कुठला आकार काढायचा? सर म्हणाले, “चंद्र डोळ्याला दिसतच असतो चांगला. तो दुर्बिणीतून दाखवायची गरज नाही.”  थोडीफार नक्षत्रंही काढली. नक्षत्रांचे रंग काही कुठे पुस्तकात नव्हते. कुठलाही कुठेही देऊन रंग वापरून टाकले.

रंगकाम झाल्यावर एक सुतार बोलवून ह्या गच्चीवरच्या खोलीच्या दाराला गोल भोक पाडून घेतलं. चांगली हातभर लांबीची, दीड इंच व्यासाची नळी त्यात बसवून घेतली. भोकापेक्षा नळी लहान होती. नळीच्या बाजूला कड्या लावून ती भोकात अशी बसवली, की खाली-वर, उजवी-डावीकडे फिरवता येईल. सुताराला जास्तीचे पैसे दिले, जरा दमही भरला. शाळेची इथून पुढची सगळी दुरुस्तीची कामं त्यालाच मिळणार होती. त्यामुळे तसाही तो ह्याबद्दल कुठे काही बोलणार नव्हता. आता रोज रात्री थोड्या थोड्या मुलांना ग्रह-तारे दाखवायचं ठरलं. दिवसा गच्चीला कुलुप असणार होतं. त्यांची ही गावातली शाळा सातवीपर्यंतच होती. मोठी मुलं असती तर उगीच डोकेदुखी झाली असती.

मुलांना आकाश दाखवायची जबाबदारी विज्ञानाच्या शिक्षकांवर होती. पहिल्या रात्री त्यांच्या पोटात चांगलंच डचमळायला लागलं. सरांनी त्यांना धीर दिला. आत्मविश्वासाने पुढे जायला सांगितलं. आकाश बघायसाठी गच्चीवर पूर्ण अंधार केला होता. जिन्यातले दिवे पण बंद ठेवले होते. विज्ञानाचे शिक्षक वरती नळी धरून थांबले होते. चित्रकलेचे शिक्षक खालून एकावेळी दोन दोन मुलांना वर पाठवायचे. विज्ञानशिक्षक नळीतून दाखवायचे, “हा गुरू बघा. बाजूला त्याचे छोटे छोटे चंद्र.” मुलांचं बघून झालं, की ते नळीत बघून नळी शनीकडे फिरवायचे आणि पुन्हा मुलांना दाखवायचे, “कडी दिसली का शनीची?” मुलं पण भारावून गेली होती, धन्य झाली होती! अमावस्या होती. अंधार पांघरून सगळं सुरळीत पार पडलं.

पहिले दोन दिवस नीट पार पडल्यावर विज्ञानाच्या शिक्षकांच्या जिवात जीव आला. ते जरा मोकळेपणाने फिरू लागले. तिसऱ्या दिवशी मुलांना आकाश दाखवत असताना अचानक वारा सुटला. विजा चमकू लागल्या. ढग दाटून आले. नळीतून मंगळ बघताना एक आगाऊ कार्टं म्हणालं, “विजा चमकताना पण मंगळ छान दिसतोय की!” दुसरा म्हणाला, “आता भिजेल का हो दुर्बीण?” तसं विज्ञानशिक्षकाने एकेकाला खालीच हाकललं. “पाऊस येणारे. बास झालं आता”, म्हणून दटावलं.

दुसऱ्या दिवशी मुलांची आपापसांत चर्चा सुरू झाली.  कुणी म्हटलं, “दुर्बीण गच्चीवरच्या खोलीला लावली आहे.” कुणी म्हटलं, “खोलीला लावून आकाश दिसेल का?” अजून एक म्हणाला, “वीज चमकली, तेव्हा मी नक्की पाहिलं. खोलीच्या दाराला दुर्बीण लावलीय.” एक हुशार मुलगा म्हणाला, “ती नळी खोलीच्या छताला जोडलेली असणार. छताला भिंग बसवलंय.” मग गावातही ह्यावर चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी अफवा पसरल्या, की “सरांनी खोलीच्या आकाराची मोठीच्या मोठी दुर्बीण आणलीय.” काही म्हणाले, “आपल्या राज्यातली सगळ्यात मोठी दुर्बीण आपल्याच गावात आहे.” कुणी कुणी म्हणू लागले, की “पुढच्या महिन्यात चंद्रग्रहण आहे. दुर्बिणीतून बघायला पाहिजे.” काही पालक विचारू लागले, “आम्हांला मिळेल का दुर्बीण बघायला?” विज्ञानशिक्षकांना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत धडधडू लागलं. सारखा घाम फुटू लागला. सरांची देहबोलीच अशी असायची, की त्यांना कुणी काही विचारणार नव्हतं. एक प्रकारचा दरारा आणि आदर वाटायचा लोकांना. पण विज्ञानशिक्षकांकडे वेगवेगळे प्रश्न आणि चौकश्या येऊ लागल्या.  

शेवटी हिंमत करून विज्ञानशिक्षक मुख्याध्यापकांकडे गेले आणि आपली सगळी चिंता आणि परिस्थिती त्यांना सांगितली. सरांना नेहमी काही नवीन सुचत असे. त्यांनी ह्याच्यावर तोडगा काढायचं ठरवलं. गच्चीवरचं आकाशनिरीक्षण ताबडतोब थांबवलं आणि पुढच्याच आठवड्यात सर्व पालक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठा समारंभ ठेवला. गावातल्या मूर्तिकाराकडून तातडीने चांगली तीन फूट उंचीची देखणी मूर्ती तयार करून घेतली. ती सरांच्या कार्यालयाबाहेरच्या चार फुटाच्या कठड्यावर ठेवली. त्यामुळे अनावरण झाल्यावर सात फुटासारखा परिणाम साधणार होता. मूर्तीच्या मागच्या भिंतीवर मोठमोठे रंगीबेरंगी माहितीपूर्ण तक्ते लावून घेतले. समारंभाच्या दिवशी सगळ्या पालक-शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सरांनी मूर्तीवरचं कापड काढून त्या सुंदर मूर्तीचं अनावरण केलं, मूर्तीला हार घातला आणि भाषण सुरू केलं, “ही मूर्ती पाहिलीत? हे आर्यभट्ट आहेत. थोर गणिती आणि खगोलशास्त्राचे प्रणेते. १५०० वर्षांपूर्वी त्यांनी खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहिला. त्यांना त्या काळी पृथ्वी गोल असल्याचं समजलं होतं. त्यांनी पृथ्वीला कदंबाच्या फुलासारखी म्हटलं होतं!” मुलं आणि पालक थक्क झाले! इतक्या थोर शास्त्रज्ञाबद्दल त्यांना आधी काहीच माहिती नव्हती. सर म्हणाले, “ह्या मूर्तीमागे तुम्हांला पुष्कळ तक्ते बघायला मिळतील. ती चित्रं बघा, माहिती वाचा आणि समजून घ्या. नुसते ग्रह-तारेच नाही तर आकाशगंगा, कृष्णविवर असं सगळं शिका. आपली दुर्बीण परवाच्या वादळी पावसामुळे बिघडली आहे. पण काही हरकत नाही. त्यामुळे आपलं शिक्षण थांबत नसतं. वाचनालयात पुस्तकं आहेत. शाळेत उत्तम शिक्षक आहेत. आपल्याला आर्यभट्टाचा समृद्ध वारसा पुढे चालवायचा आहे. आपल्यामध्येही त्याचा अंश आहे.” टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. सरांचे शब्द ऐकून मुलांचं दुरापास्त वाटणारं उज्ज्वल भविष्य डोळ्यांसमोर आवाक्यात दिसू लागलं, दुर्बिणीतून पाहिल्यासारखं.