गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

कथा - नवी लय



पाठराखे असावेत तसे दोन्ही बाजूला घनदाट हिरवे दणकट डोंगर आणि त्यामध्ये रांगोळीची ठसठशीत रेघ वाटावी अशी चमकदार निळी नदी. ही रोज नवी होते. हिच्या काठावर डोलणारी झुडुपं, तिथे रेंगाळणारा पाचोळा, हवेत भिरभिरणारे रंगीबेरंगी वेडे कीटक आणि त्यांच्या बरोबर तरंगायला आलेली गवतावरची हलकी पिसं. डेरेदार वृक्षांच्या प्रेमळ फांद्यांवरून माकडांच्या टोळ्यांना हे सगळं अनिमिष नेत्रांनी रोज बघत बसायला प्रचंड आवडायचं. जगातलं सौन्दर्य म्हणून जे काय असेल, तर ती ही नदी.

ही नदीच इथलं जीवन आहे. किती किती जीवांना ती घर देते, न्हाऊ-माखू घालते, खाऊ-पिऊ घालते आणि कुरवाळून कवेत घेते! तिच्या अंगा-खांद्यावर बागडणाऱ्या मासोळ्या म्हणजे नुसता उत्सव. झगमगीत पिवळ्या, तलम केशरी, झिरझिरीत चंदेरी, लुसलुशीत लाल, झिळमिळ जांभळ्या - मासोळ्याच मासोळ्या. पण या आनंदधामाला एक दृष्ट लागली होती. रखरखीत, खडबडीत, अक्राळविक्राळ सुसरींची. त्यांची थंड नजर आणि उघड्या तोंडाची न संपणारी हाव बघून माकडांच्या पोटात ढवळून निघायचं. का इतक्या भाबड्या जगाला असा शाप असावा?

मासोळ्यांइतका निरुपद्रवी जीव शोधून सापडणार नाही. शतकानुशतकं, युगानुयुगं उलटली, त्या कधी कुणावर हल्ला करायला गेल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या त्यांच्यात गट करून ढकला-ढकली केली असेल. पण रक्ताची चव आणि हाव त्यांच्या गावी नव्हती. पाण्याच्या धारेत डोळे मिटून लोळणारे, चुबुक चुबुक आवाज करत पिटुकल्या उड्या मारणारे आणि शेपट्या हलवत बेभान नाचणारे वेडे जीव होते ते. सुसरी मात्र इथे फक्त पोटासाठी आल्या नव्हत्या. दबा धरून मासोळ्यांवर बारीक लक्ष ठेवायच्या. अचानक हल्ला करून माना पिरगळायच्या. एकाच घासात संपवून टाकायच्या नाहीत. धारदार दातांनी लचके तोडायच्या, रक्तबंबाळ करून तडफड बघत बसायच्या आणि हालहाल करून मारायच्या. यातना दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नसे. माकडांचा जीव तळमळू लागला. असा उघड्या डोळ्यांनी किती काळ आपण हा विनाश बघणार? सुसरींचा नायनाट करायला हवा. अगदी आत आत खोलवर हे उमजत गेलं, की आता आपल्याला जगायचं, तर या मासोळ्यांसाठी, या नदीसाठी. हेच आपलं व्रत. सुसरी संपायला हव्या.

मग माकडांनी ह्यावर एकत्र येऊन विचार-चर्चा सुरू केल्या. सोपं नव्हतं अशा मोठ्या सुसर-साम्राज्याला उलथून टाकणं. अजून माकडं लागणार होती. त्यांनी डोंगर-दऱ्या पालथ्या घालायला सुरुवात केली. अजून बऱ्याच टोळ्या सापडल्या तिथे, स्वत:च्याच जगण्यात गुंतून गेलेल्या. त्यातल्या एकेकाला जागं केलं. नदी, मासोळ्या, त्यांचं अतीव सुंदर विश्व आणि त्याला नख लावणाऱ्या सुसरी हे सगळं प्रत्यक्ष दाखवलं. आता पुढे जायला हवं होतं. शेकडो माकडं एकदम नदीकाठी जमा झाली आणि मोठमोठ्यांदा सुसरींचा निषेध करू लागली. हा नित्याचाच कार्यक्रम झाला. आता मागे हटायचं नव्हतं. रोज सकाळी सूर्यकिरण येताच नदी लखलखीत दिसू लागे आणि तिच्याकाठी दवाचे मोती मिरवत वाऱ्यावर डोलणाऱ्या पोपटी गवतावर हळूहळू माकडं जमा होऊ लागत. एक भारून गेलेलं वातावरण तयार होत असे. लालसर किरणांच्या गुलालात रंगलेल्या ध्येयवेड्या टोळ्याच्या टोळ्या तहानभूक विसरून चढ्या स्वरात घोषणा देत असत. सुसरींना त्याने काडीमात्र फरक पडत नसे. त्यांच्या जगाला धक्का लावण्याची कुणाचीच शामत नव्हती. त्यामुळे काठावरच्या मोर्चांकडे त्यांनी ना कधी लक्ष दिलं, ना कधी पाण्याबाहेर येऊन आव्हान दिलं. आपला रुंद जबडा कसा भरत राहायचा अशा एकमेव उद्देशाने त्या राज्य करत असत.

माकडांना खूप अस्वस्थ होऊ लागलं. अपयशावर तोडगा लगेच काढावा लागतो. नाहीतर त्याची सवय होऊन जाते आणि मग आग पटापट विझू लागते. एका मध्यमवयीन, विचारी माकडाने हे ओळखलं होतं. जमा झालेल्या ह्या टोळ्यांना लवकरच काहीतरी कार्यक्रम द्यायला हवा. नाहीतर धबधब्याच्या पाण्यातली शक्ती वरून खाली पडल्यावर निघून जाते, तसं व्हायचं! त्याने सगळ्या माकडांना एकत्र केलं आणि जाहीर केलं, की आपण आता पुढची पाऊलं उचलायला तयार आहोत. आपण नदीत उतरण्यात शहाणपण नाही. आपण सुसरींना नदीबाहेर काढायचं आणि हल्ला करून मारायचं. दोन-चार दांडगट माकडं पुढे झाली आणि म्हणाली, की आम्ही मोठमोठाले अगडबंब धोंडे जमा करतो. सुसरी बाहेर आल्या, की जोर लावून वेगाने त्यांच्यावर ढकलायचे. वेचून वेचून चेचून काढू, ठेचून काढू! हळूहळू नदीकिनारी वेगवेगळ्या आकारांचे, लहानमोठे, ओबडधोबड धोंडे जमा होऊ लागले. संधिप्रकाशात ते धोंडे नदीकिनारी ध्यानस्थ बसलेल्या आकृत्यांसारखे दिसू लागले. सुसरींच्या नायनाटाची शक्ती त्यांच्यात जाणवू लागली.

आता सगळ्यात अवघड काम होतं ते सुसरींना बाहेर काढायचं. माकडांच्या चर्चांमागून चर्चा झडल्या. बैठकांमागून बैठका झाल्या. काहींना आवेश चढला, कुणी पोटतिडकीने बोलले तर कुणी शून्यात बघत मूक झाले. कुणाला मनापासून पटत होतं, कुणाला खोलवर खटकत होतं तर कुणाला शंकांनी ग्रासलं होतं. शेवटी मात्र एकजुटीने पुढे जायचं ठरलं. एकदा ध्येयाची कास आणि स्वप्नांची आस धरली की सर्व मतभेद-मनभेद गळून पडतात. आपला स्व विस्तारत जातो आणि आपण आपला गटच होतो. कुठल्या प्रश्नांची, शंकाकुशंकांची आपल्या एकीला दृष्ट लागत नाही.

कामाला सुरुवात झाली. वाटून दिलेली कामं सगळे चोखपणे करू लागले. रानातून मोठमोठे भक्कम बांबू जमा झाले. काही माकडं नदीकाठच्या धोंड्यांजवळ खड्डे करून त्यात बांबू रोवू लागली. खुंटा हलवून घट्ट आहे ना ते बघू लागली. कुणी झाडांच्या तपकिरी साली सोलल्या, दगडाने चेचून चपट्या केल्या. त्याचे ओलसर पिवळट दोर तयार केले आणि ते बांबूंना बांधले. सापळे तयार होत होते. वेगवेगळ्या रंगांच्या पुष्कळ बिया जमा केल्या आणि त्यांची लालूच दाखवून रानकोंबड्या आणल्या. मग घट्ट पकडीने एकेका कोंबडीला एकेका बांबूला बांधलं. कोंबड्यांनी केविलवाणी फडफड आणि असहाय्य धडपड करून पाहिली. पण त्यांचे पायच करकचून बांधलेले होते बांबूंना. अडकलेल्या बिचाऱ्या कोंबड्यांना बघून काही माकडांच्या मनाची तगमग होऊ लागली. त्यांना त्यांच्या मित्रांनी धीर दिला. कोंबड्यांना काही होणार नाही. त्यांना धक्काही लागणार नाही. हे सगळं फक्त सुसरींना बाहेर काढण्यासाठी आहे. त्या कोंबड्यांच्या मोहाने बांबूंकडे येणार आणि त्या बांबूंच्या शेजारीच असलेल्या धोंड्यांमागे आपण दोघा-दोघांनी दबा धरून बसायचं. नदीबाहेर वेग कमी असतो सुसरीचा. ती टप्प्यात आली की जोर लावून तिच्यावर धोंडा लोटायचा. एकच जिव्हारी घाव आणि खेळ संपणार. कोंबडीपर्यंत ती पोहोचणारच नाही.

सगळी माकडं आपापली जागा घेऊन धोंड्यांमागे लपून बसली. काही झाडांवरून नजर ठेवून होती. सगळीकडे गूढ शांतता पसरली होती. ऊन चढू लागलं होतं. मधून अधून संथ वारा पाचोळा हलवत होता. झाडांच्या फांद्या-पानं डोलल्यासारखी वाटत होती. नदी शांत होती. लाल चोचीच्या राखाडी कोंबड्या मलूल होऊन पडल्या होत्या. माकडांच्या डोळ्यांत चिंता आणि आशा एकत्र दाटल्या होत्या. इतक्यात पाण्यापाशी चाहूल जाणवली आणि त्यातून तीक्ष्ण दातांच्या रूंद जबड्याचा काळपट त्रिकोणी चेहरा बाहेर आला आणि त्याच्यामागे सरपटत एक धिप्पाड लांबच लांब चिलखताचा देह. धड-धड-धड-धड. माकडांना त्यांचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. शांतपणे सुसर एका कोंबडीच्या दिशेने पुढे सरकू लागली. कोंबडीची तगमग वाढू लागली. जशी सुसर समोर दिसू लागली, तशी कोंबडी जिवाच्या आकांताने ओरडू लागली. तिचा श्वास कोंडल्यासारखा झाला. तिने डोळे मिटून गेले. एवढ्यात अचानक धाडकन मोठा आवाज झाला. एका प्रक्षुब्ध पाषाणाने एका अजस्त्र हिंसेला गाडलं होतं. दोन माकडांच्या एका जबरदस्त रेट्याने आज पहिला विजय मिळवला होता! सगळी माकडं एकत्र गोळा झाली आणि एकच जल्लोष सुरू झाला. अशक्य ते शक्य होऊ शकतं! जे स्वप्नातही बघायची हिंमत होत नव्हती, ते प्रत्यक्ष साकारलं होतं! यश असं दिसत असतं तर... अंगातला कण न् कण नाचू लागला होता. उर भरभरून श्वास घेतला आणि गिरक्या घेत चहुबाजूंना पाहिलं तर सगळी सृष्टी जिवंत झालेली दिसत होती.

आणि अचानक या भारलेल्या वातावरणात काही निपचित दृष्टीस पडलं. कोंबडी मरून पडली होती. धोंडा अचूक सुसरीवर लोटला होता. पण भीतीच्या तीव्र झटक्याने तिने जीव सोडला होता. माकडांच्या अंगांवर अस्वस्थ शहारे येऊ लागले. काहीजण भांबावले, आता काय? आता हे काम थांबवावं लागेल का? धोंडे जमा केलेली दांडगट माकडं पुढे आली, “थांबायचं कशाला? इतके दिवस एवढे कष्ट घेऊन हे सगळं जमवून आणलंय. आता थांबता येत नसतं आणि आपण काही कोंबडी मारलेली नाही. तिची तीच मेलीय.” बहुतेकांनी होकार दिला. काही ना काही अडचणी येतच असतात. म्हणून काही लगेच थांबायचं नसतं.

प्रत्येकाने पुन्हा आपापली जागा घेतली. डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवलं. सुसरीचं भीषण रूप समोर दिसताच कोंबडीने आर्त किंकाळी फोडली. धोंडा धपकन् सुसरीच्या डोक्यात पडला, तिचा पुरता चेंदामेंदा झाला. कोंबडीने नि:श्वास सोडला, ती वाचली होती! एका प्रेमळ माकडाने तिच्या पायाच्या गाठी सोडून टाकल्या आणि तिला मोकळं केलं. ती मुक्त होऊन पसार झाली. सगळ्यांच्या डोळ्यांत विश्वास साकळला. शेवटी कशावर का होईना विश्वास ठेवावाच लागतो. नाहीतर आपण एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही. आता जे ठरलंय, ते तडीस नेऊनच थांबायचं. प्रश्न नाही, शंका नाही आणि पुनर्विचार तर नाहीच नाही.

आता सगळं आपोआप सराईतपणे घडू लागलं. धोंड्यांमागे कर्तव्यदक्ष हात, झाडांच्या फांद्यांवरून इशारे, सुसरींचं रौद्र रूप, कोंबड्यांचा टाहो, एकच वर्मी घाव आणि मग शुष्क शांतता. चक्रं फिरत राहिली. अशा धुमश्चक्रीत कधी धोंडा पडण्यापूर्वीच सुसरीने कोंबडीचा घास घेतला, कधी धोंडा सुसर आणि कोंबडी दोघींवर एकदम पडला, कधी कोंबडी थोडक्यात वाचली तर कधी तिने धसक्यानेच प्राण सोडला. शेवटची सुसर संपवली तोपर्यंत किनाऱ्यावर रक्ता-मांसाचा ओंगळ वास पसरू लागला होता. माकडांच्या उग्र घामाने तो अजूनच अंगावर येऊ लागला.
सांजवेळ होऊ लागली, सावल्या जमिनीत विलिन होऊ लागल्या. पावसाची भुरभुर सुरू झाली. उरलेल्या कोंबड्या सोडून देऊन सगळी माकडं डेरेदार वृक्षांच्या कुशीत एकत्र जमा झाली आणि हळूहळू एकेक आवाज उमटू लागला.... “कोंबड्या मारायचा अधिकार आपल्याला कुणी दिला?”
“चांगल्या कामातली ती आहुती होती.”
“आपल्याला नदीतली हिंसा बघवत नाही म्हणून केलं ना हे? मग आपणही हिंसा करायची?”
“आपण हिंसा करायला उतरलो नव्हतो, ती झाली.”
“आपण मासोळ्यांच्या जगात सुख परत आणलं, नदीचा दाह संपवला.”
“भाबड्या कोंबड्यांना बळी देऊन?”
“मासोळ्या वाचवायचा दुसरा कुठला मार्ग होता का कुणाकडे? ह्यापेक्षा चांगला?”
“आपण शोधायला हवा होता.”
“आपण निषेध करून पाहिला होता. त्याने काही झालं नाही.”
“नदीच्या प्रवाहात आता आनंदी संगीत उमलणार आहे, त्याचा आनंद कसा नाही होऊ शकत?”
अंधार पडला होता. पाऊस वाढू लागला. मधूनच लखकन् वीज चमकायची.
“कोंबड्या वाचवायच्या नाहीत आणि मासोळ्या वाचवायच्या असं का?”
“कोंबड्या मारायच्या नव्हत्याच. त्यांची आहुती पडली खरं, पण कोल्हया-लांडग्यांनी तसाही त्यांचा फडशा पाडला असताच.”
“ते नैसर्गिक आहे. इथे आपण आपल्या डोक्यावर पाप घेतलं.”
“निसर्गाने पाप केलेलं ठीक आहे? निसर्गाने पाप केलं, की नशीब म्हणायचं आणि आपण हस्तक्षेप केला, की पाप म्हणायचं?”
“असेल ते उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं का? काहीच बदलायचं नाही?”
“आपण सुसरीच का संपवल्या? कोल्हे-लांडगे का नाही?”
“एक तरी संपवलं ना? त्याचं समाधान का नाही?”
“मासोळ्यांबद्दलच का एवढा जिव्हाळा?”
“कुणाबद्दलच जिव्हाळा नसणं जास्त चांगलं आहे का? तसा तर मग सुसरींना आणि कोल्ह्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.”
“हे सगळं कुणी ठरवायचं? कसं ठरवायचं?”
“पुन्हा नवीन सुसरी आल्या तर आपण पुन्हा बळी देणार का? कुणाचा?”
“ह्या अशा कोंबड्या मारून आपल्या संवेदना मंदावल्या तर? आपण भरकटत गेलो तर, पाचोळ्यासारखे? दिशाशून्य?”


वारा पांगला होता. पाऊस आता धो-धो कोसळू लागला. फांद्या-पानांना ओलांडून त्याने माकडांना न्हाऊ घातलं. सर्वांग धुवून काढलं. आता ओलेत्याने उद्याकडे बघायचं होतं. डोंगरांतून पाण्याचे लोटच्या लोट खाली येऊ लागले. त्यात भग्न सुसरींचा चिखल, कोंबड्यांची विखुरलेली पिसं आणि रक्ताची थारोळी मिसळून ते गढूळ लोट निर्विकार वेगाने, काळोखाच्या साक्षीने नदीत मिसळत गेले. उदरात सगळं सामावून घेत नदीचा प्रवाह नव्या लयीत पुढे वाहत राहिला.






गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

रुची बदल

सुट्टीसाठी मधे मुलगा घरी आला होता आणि मी त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालण्याच्या मागे लागले होते. हे खायचं का ते, भाजी कुठली इ. प्रश्न त्याला विचारू लागल्यावर तो सहजच म्हणाला, “तू सगळ्या आयांसारखा स्वयंपाक काय करायला लागलीस?” आणि मला खाड्कन जाणवलं, की मी स्वयंपाकात रस घेऊ लागलेय! त्याच्या आणि माझ्यासाठीही हे माझं नवं रूप होतं! 

स्वयंपाक, पाककला अशा गोष्टींचं मला कधीच प्रेम नव्हतं. लहानपणापासून मी आजुबाजूला मुली-बायकांचं एका विशिष्ट प्रकारे मूल्यमापन होताना पाहिलं, पहिलं म्हणजे अर्थातच तिचं रूप आणि दुसरं म्हणजे तिच्या हातचे पदार्थ. बस्स. बाकी कशाला फारशी किंमत नव्हती. हो, म्हणजे स्वभावाने शांत, गरीब, आज्ञाधारक असण्यालाही महत्त्व होतं. पण निदान अगदी छोट्या मुलींच्या तरी बडबडीचं, हजरजबाबीपणाचं आणि चौकसपणाचं कौतुक होत असे. मला इतक्या स्पष्ट शब्दांत तेव्हा कळलं नसावं, पण बाईची ओळख तिच्या रूपात आणि स्वयंपाकात कोंबण्याचा मला मनापासून राग होता. दोन बायका भेटल्या, की एकतर साड्या-दागिने अशा विषयांवर तरी बोलायच्या किंवा खाद्यपदार्थांवर. म्हणजे बायकांना ज्यात कोंबलं होतं, तिथे त्या आनंदाने पाय पसरून बसल्या होत्या! आजही मला बायकांच्या अशा कुठल्या गटात काही कारणाने जायची वेळ आली, की तोंडाला कुलुप घालून बसते. म्हणून मी कधी नटलेही नाही आणि स्वयंपाकही शिकले नाही. मुलींनी शिकायलाच हवा म्हटल्यामुळे मी स्वयंपाक शिकले तर नाहीच, पण एक नावडच निर्माण झाली.

आता फेसबुकच्या जमान्यात कितीतरी जणी हौसेने “घरी केलंय” म्हणून दिवाळीच्या फराळाचे फोटो टाकत असतात. पण मी लहानपणापासून अशा बऱ्याच बायका पाहिल्या होत्या, की ज्यांचा दिवाळीचे पदार्थ करून किंवा पाहुण्या-रावळ्यांचं करून अक्षरशः पिट्टा पडत असे आणि त्या अगदी वैतागलेल्या, कावलेल्या असायच्या. चकल्या, शेव असली तळणं करून त्या वासाने फराळाची इच्छा सुद्धा उरत नसे. प्रत्येक सण म्हणजे काहीतरी विधी-पूजा आणि स्वयंपाक – कधी गुढी उभी करा, कधी गौरी आणा आणि मग नैवेद्याचा स्वयंपाक. कधी सण म्हणून घरातली बाई मस्त हसत-खेळत निवांत बसून कशाचा तरी आनंद घेतीय, असं काही नव्हतंच तेव्हा. त्यामुळे मी या पाककलेचा (आणि पूजा-अर्चांचा) चांगलाच धसका घेतला होता. स्वयंपाकातला आनंद, कलात्मकता, स्वयंपाकघरात रमून जाणं इ. संकल्पना मला पूर्वी अजिबात माहीत नव्हत्या. मी चांगली तिशीत असताना कुणीतरी म्हणालं, की cooking is so therapeutic and healing” तेव्हा मला चांगलाच धक्का बसला होता. पिढ्यानपिढ्या बायकांच्या मागे जे लचांड लागलेलं आहे आणि जे तिने चांगलंच करणं अपेक्षित असल्याने त्यात काही कौतुक-कृतज्ञता नाही, ते एखादीला मन:शांती देणारं, ताणनिवारक वगैरे वाटावं हे ऐकून मी थक्कच झाले होते!

माझे एक दूरचे काका “खाऊन खाऊन पेशवाई बुडाली” असं म्हणायचे. ते माझ्या लहानपणीच डोक्यात बसलं होतं. आपल्याकडे वेगवेगळी यंत्रं-तंत्रं नाही, पण वेगवेगळे पदार्थ मात्र जमले होते बनवायला, ह्याची चांगलीच खंत वाटायची. त्यात “चवणे” किंवा “खवय्ये” नवरे आणि “सुगरण” बायका असली वर्णनं ऐकून अगदी कान किटले होते. संसाराचा असला भंपक प्रकार मला जमणार नव्हता. लग्नानंतर मी आणि नवरा मिळून प्रयोग करत करत गरजेपुरता स्वयंपाक शिकलो होतो. त्याला माझ्या मानाने कमी नावड होती. म्हणजे हौस नव्हती, पण नावडही नव्हती. त्यामुळे माझी चांगलीच सोय झाली आणि मी मुलं होईपर्यंत रूढार्थाने संसाराला लागलेच नाही! मग मुलांसाठी मी हळूहळू वेगवेगळे पदार्थ कसे करत गेले, ते माझं मलाही कळलं नाही. तरी पण स्वयंपाक, खाद्यसंस्कृती असल्या गप्पांपासून मी चार हात दूरच राहिले. तो मला नको असलेला प्रांत होता. कुणी “जेवायला काय आवडतं” असं म्हटलं, की मी कौतुकाने “जोवर मला करावं लागत नाही, तोवर काहीही” असं म्हणत असे.

आणि आता अचानक मुलगा म्हणाला, तेव्हा जाणवलं, की आपण ह्यात लक्ष घालतोय! शिवाय, तो मागेच लागला, “सांग ना काय झालं तुला” म्हणून! आणि मग मला शोधावं लागलं. तो लहान होता आणि माझ्याबरोबर असायचा, तेव्हा त्याच्याबरोबर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असायच्या. त्याला काही शिकव, त्याला बाहेर ने, एखाद्या प्रदर्शनाला घेऊन जा अशा. आता दिवसेंदिवस त्या कमी होणार आहेत. अजूनही आम्ही तीच पुस्तकं वाचतो आणि पुस्तकं, सिनेमे आणि घडामोडींवर चर्चा करतो. पण त्याच्यासाठी काही पदार्थ करा, त्याला इथून खाऊचा डबा पाठवा ही एकच गोष्ट बहुधा बरीच वर्षं करता येईल. फोनवरच्या गप्पांखेरीज हीच एक करता येण्याजोगी गोष्ट आहे. “सगळ्या आयांना” बहुतेक हे उमगत असावं. कशामुळे का होईना, ह्या प्राचीन कलेकडे आता जरा चांगल्या चष्म्यातून बघता येतंय हे तसं चांगलंच झालं!

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

आमुच्या बागेत व्हा.. (भाग २)


मुनियाच (मनोली) नाही, तर बाकीही बरेच जण रोज हक्काने येतात, विश्वासाने इथे बसून जातात त्याचा एक वेगळाच आनंद आहे. लहान मूल जसं हक्काने आपल्या खांद्यावर मान टेकवतं तसं. एकदा उन्हाळ्यात आंब्याच्या साली आणि थोडासा खराब झालेला भाग असाच एका कुंडीत टाकला होता (माझा सगळाच ओला कचरा खत होण्यासाठी कुंडीत जातो). तर शीळ घालत बुलबुल आला आणि तो आंबा, सालीला चिकटलेला गर असं खाऊन गेला! तेव्हापासून मी त्याच्यासाठी नेहमीच त्या कुंडीत खाऊ ठेवू लागले – पपईच्या साली, चिक्कूचा खराब भाग, सफरचंदाचा मधला बियांजवळचा भाग असा एका ठराविक कुंडीत टाकते. स्वारी रोज येते. गोडशी शीळ घालून आल्याची वर्दी देते. आधी बसून सगळीकडे बघून अंदाज घेते आणि मग कुंडीत जाऊन खाऊ खाते. आजकाल तर जोडी येऊ लागली आहे!



अजून एक रोज न चुकता खाऊ खायला (म्हणजे प्यायला) येणारा म्हणजे पिटुकला सूर्यपक्षी – sunbird. लोटेन नावाच्या श्रीलंकेत काम करणाऱ्या डच गव्हर्नरमुळे ह्याला Loten’s Sunbird असं नाव पडलं. अशा चिमुकल्या, नाजुक आवाजाच्या पक्ष्याला ‘सूर्यपक्षी’ का म्हणावंसं वाटलं, कोण जाणे! तर ह्याचा खाऊ म्हणजे फुलांतला मध. ज्या फुलांचा आपल्याला वास येत नाही, अशा जास्वंद, गणेशवेल इ. फुलांचाही तो मध शोषून घेतो. त्याच्या बोटभर शरीराच्या मानाने लांब म्हणावी अशी अरुंद बाकदार चोच फुलात घालून आणि कधी कधी उलटा लटकून तो मध पिताना दिसतो. म्हणून त्याचं ‘पुष्पंधय’ हे संस्कृत नाव जास्त अर्थपूर्ण वाटतं. झाडाजवळ, फुलांजवळ आला की बसण्यापूर्वी तो आधी हेलिकॉप्टरसारखा एका ठिकाणी हवेत थांबतो. इंग्लिशमध्ये hover म्हणतात तसा आणि मग मध घ्यायला बसतो. मादी वरून तपकिरी आणि खालून फिकट पिवळी दिसते, तर नर चमकदार काळा आणि पाठीवर, मानेपाशी निळी-जांभळी चकाकी असते. त्यांचं बारीक आवाज करत येणं, जास्वंदीपासून सोनटक्क्यापर्यंत मिनिटभरात भिरभिरत चंचलपणे फिरणं, हे सगळं रोज बघण्याचा आता छंदच जडला आहे.




सकाळी ६-६:१५ ला किंवा दुपारी ३ च्या सुमाराला बऱ्याचदा आमच्या बाल्कनीच्या भिंतीवर, एका ठराविक ठिकाणीच जोडीने बसलेले दिसतात ते चिमुकले, काळसर आणि गोबरे-गोबरे swifts. काळा रंग असा आहे, की लांबून त्यांचे काळे डोळे दिसतच नाहीत. ह्यांना मराठीत दुर्बल म्हणतात म्हणे! काहीतरीच नाव आहे. तर ह्यांना झाडाच्या फांदीला किंवा एखाद्या दांडीला पकडून बसता येत नाही. म्हणून ते भिंतीवर बसलेले असतात. माझ्या घरी येईपर्यंत मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं.



बाकी साळुंक्या, चिमण्या, कावळे पण रोज येतच असतात. पोपट लांबून दिसतात. रोज थवेच्या थवे उडताना दिसतात. बिल्डिंगच्या भिंतीवर पण असतात. पण अजून कधी बाल्कनीत नाही आले. माझ्याकडे मिरची आहे, डाळिंबं येतात. तरी नाही आले. पारवे मात्र सगळ्यांनाच नकोसे झालेत आणि मी पण त्यांना हाकलत राहते.

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

आमुच्या बागेत व्हा लडिवाळ तुम्ही पाखरे


पूर्वीपेक्षा झाडं कमी झाली, चिमण्या आणि इतर पक्षी दिसणं दुर्मिळ झालं असं म्हणतात आणि ते खरंही आहे. पण गंमत म्हणजे मला लहानपणी दिसले, भेटले त्यापेक्षा कितीतरी जास्त पक्षी आता रोज भेटतात. माझ्या मुलीला ८ वर्षाच्या वयात जेवढे पक्षी रोज दिसतात, तेवढे त्या वयात मला ऐकूनही माहीत नव्हते. माझ्या लहानपणी मी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी राहिले, तिथं आजुबाजूला जागा असली, तरी त्या काळी मी कुणाला झाडं लावताना पाहिलं नव्हतं – तसा काही विचारही बोलला, ऐकल्याचं आठवत नाही. आता “झाडं लावा” अशी निदान तोंडपाटीलकी करणारे तरी बरेच दिसतात.


तर सध्या माझ्याकडे मुनियांचं बाळंतपण सुरू आहे. हे आमच्याकडचं दुसरं. पहिलं बाळंतपण गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालं. ह्या मुनियांना मराठीत खरं तर ‘ठिपकेवाली मनोली’ असं नाव आहे. गेल्या खेपेला सुरुवातीला अचानक बागेत मुनिया दिसू लागल्या. एक-दोन दिवसांतच दिवसभर लिंबात खुडखुड सुरू केली. (हे बाल्कनीतल्या मोठ्या कुंडीत लिंबाचं कचऱ्यातून आपोआप उगवलेलं झाड. लिंबू आहे की मोसंबी हेही माहीत नाही. कारण अजून तरी त्याला काही फळ आलेलं नाही. हे जणू ह्या मुनियांसाठीच उगवून आलेलं आहे). पहिल्यांदाच मी त्यांची अशी धावपळ पाहिली. इवलुशा चोचीत गवताची लांबलचक पाती खालून आणत होत्या. एकजण आत जाऊन घरटं बांधतो/ते आणि दुसरा/री पाती आणून देतो आणि बाहेर राखणीला थांबतो. कोण 'ती' आणि कोण 'तो', ते काही कळत नाही. दोघे सारखेच दिसतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोरदार हे बांधकाम चालू होतं आणि दोनच दिवसांत घरट्याचा बऱ्यापैकी आकार दिसू लागला. एका पाईपच्या आडोशाला लिंबाच्या झाडात पटकन दिसणार नाही असं हे हिरव्या पात्यांचं वेटोळाकार घरटं. त्याला थोडंसं खालच्या बाजूला छोटंसं बीळ होतं, ये-जा करायला. चिमण्या सुद्धा मावणार नाहीत इतकं छोटं! त्यामुळे आतली अंडी आणि नंतर आलेली बाळं बाहेरून दिसायचा काही प्रश्नच नव्हता.





घरटं  बांधून झाल्यावर साधारण महिन्याने आतून चिवचिव ऐकू येऊ लागली आणि आम्हांला कळलं, की आत पिल्लं आहेत आता. आई-बाबा दोघं मिळून संगोपन करत होते. चोचीत खाऊ घेऊन येत, आधी थोड्या अंतरावर दांडीवर बसून इकडे-तिकडे बघून अंदाज घेत आणि मग हळुच घरट्यात शिरत. आई किंवा बाबा घरट्यात आला, की एकदम आवाज सुरू व्हायचा – गलका! असा आवाज ऐकायला येऊ लागल्यानंतर १२-१३ दिवसांनी अचानक एका सकाळी टवटवीत, उद्योगी पिल्लं बाल्कनीत उडताना, इकडे-तिकडे करताना दिसू लागली. माझ्या अपेक्षेपेक्षा बरीच मोठी होती, जवळ जवळ त्यांच्या आई-वडिलांएवढी! पंख फुटलेली, बाल्कनीतल्या बाल्कनीत उडता येणारी. फक्त त्यांच्या छातीवर पांढरे ठिपके नव्हते. एका कुंडीतून दुसरीत जा, काडी चोचीत धर, जोरजोरात कंठशोष करून बघ असा ह्या चौकस बाळांचा खेळ चालू होता आणि त्यामुळे आम्ही तर बाल्कनीत जाणंच बंद केलं होतं. मात्र एक उद्योगी बाळ चक्क आमच्या बैठकीच्या खोलीत येऊन बैठकीवर बसून गेलं! कसली भीती म्हणून ठाऊक नव्हती त्याला! मी दरवाजा सताड उघडून त्याच्या बाहेर जाण्याची वाट बघत बसले आणि साहेब जेव्हा सुखरूप स्वगृही परतले, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. दुसऱ्या एका पिल्लाने मला षोडशा देतात अगदी तशी स्टाईलमध्ये मागे वळून फोटोसाठी pose दिली आहे – अगदी नखरेल J .




पिल्लं बाहेर आल्यावर साधारण ३ दिवसांतच सगळी सामसूम झाली – पिल्लं आणि आई-बाबा सगळे रिकामं घरटं मागे ठेवून निघून गेले. यंदा पुन्हा जोडी आली, त्याच लिंबात नवं घरटं बांधायला. तेव्हा पाऊस विशेष झाला नव्हता आणि खाली फारसं गवत नव्हतं. त्यामुळे त्यांनी आमच्या गवती चहाची बरीच पाती वापरली. मोठ्या कष्टाने एकेक पातं तोडून घरटं बांधलं आहे, सध्या चिवचिव ऐकू येते आहे. लवकरच नवी बाळं हुंदडू लागतील..