खालच्या मजल्यावरच्या
मेसमध्ये चहा पिऊन अनिकेत नुकताच वर आला. बेसिनपाशी जाऊन त्याने गार पाणी तोंडावर मारलं, चेहरा धुतला आणि खोलीकडे
निघाला. वाटेत समोरून येणारा मुलगा त्याच्याकडे संशयाने बघत असल्याचं त्याला
जाणवलं. बघून न बघितल्यासारखं करत तो खोलीत शिरला. त्याला सभेला जायचं होतं. नंदन
बजावून गेला होता, “ऐनवेळी हातपाय गाळू नकोस!” नंदन आणि तो गेली दोन वर्षं होस्टेलच्या
ह्या खोलीत राहत होते. नंदनला काय योग्य, काय नाही ते सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ
ठाऊक होतं. ठाम होता तो त्याच्या विचारांवर. भरभरून बोलायचा, पोटतिडकीने. नंदन
सभेच्या आयोजकांमध्ये होता आणि तयारी करायला सकाळपासूनच गेला होता.
अनिकेतने कंगवा घेऊन
त्याच्या अरुंद कपाळावरच्या बटा मागे सारायला सुरुवात केली. आरशात पाहिलं. नुकतंच
मिसरूड फुटलेला नववीतला अनिकेत त्याला आठवला, गोरटेला गुणी बाळ. तेव्हा नुकताच नवीन
कायदा आला होता, ‘संपूर्ण न्याय सूत्र’ – संन्यासू. त्यासाठी अभ्यासक्रमात बदल
केले होते. मुलांना संन्यासू समजावा म्हणून देशभर सगळ्या शाळांमध्ये दर आठवड्याला
दोन तास त्याचे वर्ग घेतले जात. पांढरा शुभ्र शर्ट आणि गडद निळी शॉर्ट घालून दुसऱ्या
बाकावर बसलेला अनिकेत. गोल चेहऱ्याच्या चष्मेवाल्या बाई विचारत होत्या, “झाडाची
वाढ कशाकशावर अवलंबून असते?” टपोऱ्या स्वच्छ अक्षरात मन लावून तो वहीत लिहित होता,
“बी, माती, पाणी, सूर्यप्रकाश.” बाई सांगत होत्या, “उगम आणि पर्यावरण, दोन्ही महत्त्वाचं. भोवतालची
परिस्थिती बघा. एखाद्या पक्ष्याने बी खाल्लं, तर उगवेल का रोप? उगवलेलं रोप शेळीने
खाल्लं, तर वाढेल का ते? तिथून नवा रस्ता होणार असेल आणि सगळी जमीन साफ करून डांबर
टाकलं तर जगेल का झाड?” अनिकेतने लिहिलं, “झाडाच्या वाढीत माती आणि बियाणाबरोबरच
आजुबाजूच्या परिस्थितीचा वाटा असतो.”
फोनचा
बीप वाजला. नंदनने सगळ्या गटाला मेसेज पाठवला होता, “जरा लवकर निघा. इथे पोलिस
बंदोबस्त, सुरक्षा तपासणीमध्ये आत यायला वेळ लागेल." अनिकेत तयारच होता. त्याच्या
पोटात थोडंसं डचमळल्यासारखं वाटत होतं. “चहा नको होता प्यायला”, तो मनाशीच
म्हणाला. पोटात असाच
गोळा आला होता दहावीत वर्गासमोर बोलताना. संन्यासूच्या तासाला बाई एकेकाला वर्गासमोर
बोलायला लावत. अनिकेतने खालच्या पट्टीत सुरुवात केली होती, पण नंतर स्थिरावला. म्हणाला,
“आपण आपल्या वडिलोपार्जित घरात राहतो. वारसाहक्काने आलेल्या जमिनी, व्यवसाय,
संपत्ती लोकांना चालते. मात्र त्या जमिनी, ते व्यवसाय उभे करताना ज्या काही गोष्टी
घडल्या असतील, त्याची जबाबदारी आजवर कुणीच घेत नव्हतं. ती घेण्याची व्यवस्था
म्हणजेच संन्यासू.” वर्गात वाजलेल्या टाळ्या त्याला आजही स्पष्ट ऐकायला येत
होत्या.
खोलीचं
दार तर नाही ना वाजलं? कुणी बोलवायला येईल का? की बघायला येतील, तो जाणारे का
म्हणून? प्रश्न विचारतील का त्याला? त्याला नाही आवडायचं असं कुणी सामोरं येऊन
प्रश्न विचारलेलं. नंदनचं वेगळं होतं. त्याला उधाणच यायचं कुणी काही विचारलं की!
एकेका मुद्द्यावर एकेकाला मैदानात घेऊन बडवून काढण्यात त्याला एक वेगळाच आनंद
व्हायचा, समुद्राचा खोल नाद पिऊन घेतल्यासारखा. पण अनिकेतला मात्र त्याने कधी असं
लोळवलं नव्हतं. आव्हान देणारा नव्हताच अनिकेत. नंदनच्या मतांचा झंझावात तो
कौतुका-आश्चर्याने ऐकत राही.
अगदी
नवेच होते विद्यापीठात दोघे, तेव्हा रात्री खोलीत नंदनने पहिल्यांदा विचारलं होतं
त्याला, “तू अठरा पूर्ण आहेस ना? मग संन्यासू कार्ड असेल तुझं.” ते तर घ्यावंच
लागे सगळ्यांना. “किती नोंदी आहेत तुझ्या कार्डावर?” अनिकेत म्हणाला, “तीन.”
त्याच्या आजोबांची, आईच्या वडिलांची, शेती होती. पूर्वीच्या काळी शेतमजुरांना कमी रोजंदारीवर
राबवून घ्यायचे, ती एक नोंद. दुसरी शाळेची. खेळायला मोठं-मोकळं पटांगण, अद्ययावत प्रयोगशाळा,
दर्जेदार वाचनालय अशी शाळा होती. मात्र संस्थेला शाळेसाठी ती जमीन देताना त्यात
घोटाळा झालेला होता. शाळेत जसं उत्तम शिक्षण मिळालं, तशी ह्या घोटाळ्यामुळे नोंदही
आली सगळ्या विद्यार्थ्यांच्या कार्डावर. तिसरी नोंद तर सगळ्या मुलग्यांना येणारच
होती. अजूनही आपला समाज पितृसत्ताक आहे. त्याचे सगळ्या मुलग्या-पुरुषांना
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे होतातच. पुरुषांकडून होणाऱ्या अन्यायाची तिसरी नोंद.
“तुला
चीड येत नाही ह्याची? आयुष्यभर तू ह्या नोंदींच्या पॉइंटस् नुसार जास्त फी भरणार,
जास्त कर भरणार, मरेपर्यंत. प्रत्येक
ठिकाणी तुला कमी प्राधान्य मिळणार”, नंदनने नजर रोखून विचारलं.
अनिकेतला
अन्यायाची चीड माहीत होती. न्यायाची कशी काय चीड येते? सुखवस्तू घरात गेलेलं
बालपण, शाळेतलं उत्तम शिक्षण पण आयुष्यभर पुरणारच होतं ना!
“उद्या
तू एखाद्या कंपनीत नोकरीला लागशील. पगार मिळेल, बोनस मिळेल. कंपनीने मोठं प्रदूषण
केलं, की चौथी नोंद येईल”, नंदन बोलतच होता.
आता
अशी नोंद होण्यात काय गैर आहे? उलट ह्या व्यवस्थेमुळे प्रदूषण करण्याची शक्यता कमीच
होईल. धरणग्रस्तांना, शोषित लोकांना ह्या करातूनच तर पैसे जातात. पण अनिकेतने नंदनपुढे
तोंड उघडलं नाही. खोटं बोलून पकडलं गेलेलं लहान मूल जसं गोडशा अपराधी चेहऱ्याने
आईकडे बघतं, तसा शांतपणे तो नंदनकडे बघत राहिला. तेव्हाच ठरलं, की नंदनचे फटकारे
कधीच अनिकेतच्या वाट्याला येणार नव्हते.
अनिकेतने
फोन आणि पाकीट घेतलं. पाकिटात संन्यासू कार्ड असल्याची खात्री करून घेतली. खोलीला
कुलुप घातलं. जिन्यात कुणी भेटलं आणि काही विचारलं तर? नंदन म्हणतो, “मुळात एका
चुकीचं परिमार्जन दुसऱ्या चुकीने होत नसतं आणि तू मुलगा म्हणून जन्माला आलास त्यात
तुझी काय चूक?” नंदन बोलू लागला, की सगळं जग त्याला दिसतं, तसंच आपल्याला दिसतं,
एकदम स्पष्ट. त्याच्यावर वनमाळींचा प्रभाव होता. वनमाळी तरुणांचे नेते होते.
संन्यासूविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. नंदनसारखे बरेच तरुण त्यांच्या मागे
होते. नंदन त्यांची भाषणं सगळ्यांना पाठवत असे. अनिकेतने पण त्यांची काही भाषणं
पाहिली होती. वनमाळी
म्हणजे मोठं कपाळ, उजळ रंग, सोनेरी काड्यांचा चष्मा, त्याच्या मागचे भेदक डोळे आणि
अगदी शांत, अभिनिवेशशून्य
बोलण्याची शैली. “सूड आणि न्याय ह्यांत फरक करायला पाहिजे.” ऐकणारा स्तब्ध होत
असे. “एका निरपराधी माणसावर अन्याय झाला, त्याचं परिमार्जन कसं करायचं? दुसऱ्या
निरपराधी माणसाला शिक्षा देऊन ते होणार नाही.” त्यांचं भाषण म्हणजे गणितातल्या
प्रमेयासारखं. काहीतरी नवीन, काहीतरी विलक्षण. ते सिद्ध केलेलं असतं आणि तरीही पूर्णपणे
समजत नाही आपल्याला. पण ऐकताना समजल्यासारखं वाटतं आणि ते बरोबर असतं. “संन्यासू
हा विपरीत न्याय आहे. अन्यायाची प्रतिक्रिया ही न्यायाकडे नेणारी हवी, जास्तीच्या
अन्यायाकडे नाही.” अनिकेतला ही भाषणं महान वाटत, जीव दडपून जाईल इतकी महान.
खांदे
पडलेला अनिकेत उदास जिना उतरत खाली आला आणि त्याने सायकल काढली. खाली मान घालून
त्याने पॅडल मारायला सुरुवात केली. उन्हं उतरू लागली होती. थोडासा वाराही वाहत
होता. तरीपण घाम येत होता खूप. सायकल चालवल्यामुळे असेल किंवा चिंताच पाझरत असतील
अंगातल्या. वनमाळींची सभा म्हणजे हजारोंची गर्दी. कुणी त्यांचे विचार मनापासून
पटणारे, कुणी त्या बुद्धिमत्तेने भारावलेले, तर कुणी भाषणाचा डोक्याला ताण वाटणारे. पण सगळे
संन्यासूग्रस्त. दरिद्री
टपऱ्या, भडक दुकानं पार करून अनिकेत उजवीकडे वळला आणि रस्त्याने एकदम रूप पालटलं.
स्वच्छ चकचकाट, नीटस दुकानांमधून सरपटत हा रस्ता सभेच्या मैदानाकडे चालला होता. गर्दी
वाढत होती. पण गुदमरवणारे, घुसमटवणारे घोळके नव्हते ते. सगळे अनोळखी चेहरे ओळखीचे
वाटत होते. हाताला थोडासा कंप सुटला त्याच्या. “पहिल्यांदाच सभेला जाणार म्हणून असेल”,
तो स्वत:लाच म्हणाला.
मध्येच
त्याला शाळेतल्या चष्मेवाल्या बाई आठवल्या. “तू मुलगा आहेस, त्यात तुझं काय
कर्तृत्व? त्याच्या वडिलांचं मोठं घर आहे, त्यात त्याचं काय योगदान? या सगळ्या रॅंडम
गोष्टी आहेत. यादृच्छिक म्हणतात त्याला. कुणी झोपडपट्टीत जन्माला येतो. का? फक्त
नशिबामुळे. या रॅंडमनेसचे परिणाम आपण कमी करतोय. नशिबाची भरपाई करतोय या
कायद्याने.”
सभेच्या
बाहेर पार्किंगसाठी भलं मोठं पटांगण होतं. तिथून सभेचं व्यासपीठ दिसतही नव्हतं. चार
चाकी गाड्या वेगळीकडे, दुचाक्या वेगळीकडे. सायकलींसाठी वेगळा मोठा भाग. काळ्या,
निळ्या, लाल शेकडो सायकली दिल्या जागी रांगेत नाकानीट उभ्या होत्या. त्यातच
अनिकेतची सायकल मिसळून गेली. घोळकेच्या घोळके आत चालले होते. काही एकांडे
शिलेदारही होते. आज नुसती भाषणं नव्हती. सभेमध्ये संन्यासूचा निषेध आणि विरोध
होणार होता. त्यासाठी खास अॅप काढलं होतं. त्यावरून सभेच्या ठिकाणी आपापला निषेध
सगळ्यांनी नोंदवायचा होता. “निषेध केल्यामुळे तुमच्या संन्यासू कार्डावर नवीन नोंद
होणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका”, नंदनने प्रत्येकाला सांगितलं होतं. ते
फक्त विरोध करणाऱ्यांची यादी ठेवणार होते. किती लोकांचा विरोध आहे, जनमत काय आहे
ते समजून घेण्यासाठी. सुरक्षा पडताळणीच्या ठिकाणी प्रत्येकाचं नाव लिहिणार होते.
म्हणजे
अनिकेतचं नाव सरकारी यादीत जाणार, संन्यासू विरोधक म्हणून. सगळ्या जगापुढे.
त्याच्या कपाळावर कायमचा शिक्का बसणार. त्याला भेटेल त्या प्रत्येकाला त्याच्या
कपाळावर वाचता येईल, नव्हे ते वाचतीलच – “न्यायाचा विरोधक.” त्याला आवडणारी, डोळ्यांत
चमक असलेली बडबडी मुलगी भुवया उंचावत म्हणेल, “तू विरोधक आहेस?” आणि वर्गातला तो
हसरा मित्र, त्याचे वडील भूमिहीन आहेत, तो? त्याच्यासमोर कसं जायचं? कशी नजर
भिडवायची? आई-वडील चिंता करतील, “तू आता त्या यादीत गेलास, तुला उद्या नोकरी
मिळायला त्रास होईल रे!” त्याच्याकडे ना नंदनचा आत्मविश्वास होता, ना वक्तृत्व. त्याचे
पाय थिजून गेले. त्याचा वठलेला वृक्ष झाला – ना जागेवरून हलता येत होतं, ना
अभिव्यक्तीची पालवी फुटत होती.
पटांगणातल्या
वाहनांवर जांभळट संध्याकाळ उतरू लागली होती. एकेक वाहन अंधुक होऊ लागलं. अनिकेतने
फोन बंद केला. आता कुणी त्याच्याशी बोलू शकणार नाही, संपर्क करणार नाही. तोही
अंधुक झाला. दूर आत सभा सुरू झाली होती. सभेचा आवाज ऐकू येत होता. पण शब्द कळत
नव्हते. अवघ्या आसमंतात स्वप्नील काही निनादत होतं, हजारो लोकांच्या हृदयाचा नादब्रह्म
असावा तो. अनिकेतला त्याने वेढून टाकलं, लपेटून टाकलं. तो आत असायला हवा होता.
त्याला वनमाळींना प्रत्यक्ष बघायचं होतं, ऐकायचं होतं. न्यायाची ती अवघड परिभाषा
समजून घ्यायची होती. निषेध करायचा होता, घोषणा द्यायच्या होत्या, आतल्या गर्दीतला
एक आवाज व्हायचं होतं. पण वठलेल्या वृक्षाच्या इच्छा अशाच गारठून जात असतात.
अडकलेल्या श्वासासारख्या - ना आत जातात, ना बाहेर पडतात. असाच आहे तो, त्याचा
पिंडच असा आहे. असा पिंड असणं रॅंडम आहे, यादृच्छिक. त्याला काही भरपाई नाही.