मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

कविता - संवाद

 

फोनवर वाचा नि पुढे ढकला 
गहाण टाका आपल्या अकला 
मत, विचार झटपट करा 
सगळं सोपं-सपाट करा  

बाजू तर ठरलेलीच आहे 
आता सांगा काय घडलं 
मुद्दे, शब्द तयारच होते  
पहा त्यांना कसं झोडलं 
अतिशहाण्या, दीडशहाण्यांना   
बडवून सरळसोट करा 
सगळं सोपं-सपाट करा  

कामधंदा नंतर बघू 
आधी हिशोब चुकते करा 
कीड पसरवणाऱ्या ढोंग्यांना 
आधी समोर झुकते करा 
रोज त्यांच्या नांग्या ठेचणे 
हीच आता वहिवाट धरा 
सगळं सोपं-सपाट करा  

आपल्याकडे सत्य आहे 
त्यांना झाला आहे भ्रम 
सत्ता त्यांना वापरून घेते 
वेडे करती फुकाचे श्रम 
आपण मात्र तत्त्वांची
झपाटलेली वाट धरा 
सगळं सोपं-सपाट करा  

मी म्हणतो तेच प्रश्न 
मी सांगतो तीच उत्तरे 
त्या लोकांच्या लायकीची मी 
वेशीवरती टांगतो लक्तरे 
माझ्या उदात्त ध्येयाचा 
तुम्ही सुद्धा हात धरा 
सगळं सोपं-सपाट करा 
सगळं सोपं-सपाट करा 

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

कविता - निर्विकार

 

लांबलेला पावसाळा 
आणि दाटलेला उमाळा 
दिवस आता मोजताहे 
गोठलेल्या सांजवेळा 

कभिन्न कातळ भोवताल 
शब्द नको, नको सुरताल 
इच्छा-निरिच्छा गुंफणारा 
नकोच गोफाचा खेळ 

शांत श्वास नि मिटले डोळे 
नितळ निर्विकार हळुहळु 
निवळशंख निळा निर्झर 
आत पाझरेल झुळुझुळु  

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

कविता - शांती

 

केशरी किरणांची पुसट प्रभा फाकलेली

ताडमाड हिरवाई पाण्याशी वाकलेली

कोमल सुकुमार कळी दव-दुलईत झोपलेली

चिवचिवत्या रानालाही लय एक साधलेली


निळाईत पाण्याच्या एकेक सल बुडावा

शांत हा आसमंत श्वासात भरून यावा 

जाणीव हरपावी, काळ इथे थांबावा

झिरपावा हृदयतळी मंद गारवा

झिरपावा हृदयतळी मंद गारवा

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

कविता - स्वीकार

 

एकेक दार ओलांडताना 

वाकणे, अजून वाकणे 

खांबठोक रहावे तर 

संपणे, थिजून संपणे 



दिवे जीव ओतलेले  

गंगेत वाहत्या सोडणे 

आणि सूर अंतरीचे 

वाऱ्यासवे विरून जाणे 



किनारा नाहीच येथे  

गोल फिरत राहणे 

आणि सुगंध मातीचा

हाती धरू पाहणे 

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

कविता - शोध

पांगला हा आज वारा 

पांगलेला जीव सारा 

काय खुपते शोधताहे 

मांडुनी मी शब्दपसारा 


केवड्याचा गंध विरला 

लख्ख टपोरा दव ओघळला 

एकेक लाट फुटताना 

बांध पुरता ठिसूळ झाला


कितीक पाहिल्या, कितीक जगल्या 

चहुबाजूंच्या सगळ्या नजरा 

आत वळुनी  शोधताहे 

आज मांडुनी शब्दपसारा 

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

कविता - अज्ञात


झेप घेई पक्षी स्वभावे 

अज्ञाताची भूल भूल 

कोण कुठले खूर उधळले 

आसमंती धूळ धूळ 


आतुनी पोखरला तरीही  

उभा शांत तो माड आहे 

सृष्टीच्या नियंत्यावरची 

भिस्त त्याची गाढ आहे 


अजूनही घन वळतील 

येतील आवेग सरी 

कोंब फुटायचा तर थोडी 

आस पेरुनी ठेव उरी 

 



शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

नामशेष होणारे अन्न

 Eating to Extinction ह्या पुस्तकाचा मी लिहिलेला परिचय महाराष्ट्र टाइम्समध्ये आला आहे. प्रकाशित लेख इथे पाहता येईल. तोच लेख इथे देत आहे.

   डॅन सालाडिनो हे पत्रकार आणि बीबीसीवर खाद्यपदार्थांचे कार्यक्रम प्रसारित करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे  गेल्या वर्षी Eating to Extinction (अन्न नामशेष करणारी खाद्यपद्धत) असे पुस्तक आले आहे. जगात दुर्मिळ होत चाललेले अन्नपदार्थ (त्यांच्या जाती) आणि ते वाचवण्याची आवश्यकता असा  ह्या पुस्तकाचा विषय आहे. जग जवळ आले आहे आणि त्यामुळे जगातल्या खाद्यपद्धतीत, खाद्यसंस्कृतीत एक प्रकारचा सारखेपणा, समानता येत चालली आहे. त्यातले वैविध्य आणि प्रादेशिक ओळख लोप पावते आहे. आपल्याला वाटते, की आपल्या पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा आपल्या खाण्यात कितीतरी वैविध्य आले आहे. अमेरिकेसारखे बर्गर, इटलीसारखा पास्टा आणि अवकाडोसारखी परदेशी फळे आता भारतात खाता येतात. आपल्या पूर्वजांना हे सगळे माहीतही नव्हते. पण खाण्यातले हे वैविध्य एकाच प्रकारचे आहे. जगभर एकाच ‘साच्यातले’ वैविध्य दिसते आहे. आता बऱ्याचशा देशांमध्ये तोच कोकाकोला, तोच पिझ्झाहट पिझ्झा मिळतो.


खाद्यपदार्थांमधले वैविध्य संपले म्हणजे काय? तर मनुष्यप्राण्याच्या आहारात पूर्वी ६००० वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश होता. आता माणसाच्या आहारातले निम्मे उष्मांक (कॅलरीज्) हे गहू, तांदूळ आणि मका ह्या ३ पदार्थांपासून येतात. त्यात बटाटा, साखर (ऊस आणि बीट), तेल ह्यांचा समावेश केल्यास माणसाचे ७५% उष्मांक अशा मोजक्या वनस्पतींपासून येतात. पूर्वी माणूस जिथे राहायचा तिथले हवामान, माती, पाणी, भौगोलिक परिस्थिती ह्यानुसार बदलणारी पिके, फळे, भाज्या आणि प्राणी त्याच्या आहारात असायचे. पण हरितक्रांतीनंतरचे जग आमूलाग्र बदलले आहे. जगातली बहुतेक बियाणे ही फक्त चार कंपन्यांच्या ताब्यात आहेत. जगभर दुधाचे चीज तयार करायला जे जीवाणू वापरतात त्यातले निम्मे फक्त एका कंपनीचे आहेत. पूर्वी प्रत्येक ठिकाणी चीज तयार करताना तिथले स्थानिक जीवाणू वापरले जायचे. जगात केळ्याच्या सुमारे १५०० जाती आहेत (आणि बऱ्याच नामशेष झाल्या आहेत). तरीही जगात पिकवली आणि विकली जाणारी निम्मी केळी ही कॅव्हेंडिश ह्या एकाच जातीची आहेत. जगातल्या दुग्धव्यवसायात बहुतांश गायी होलस्टाइन ह्या एकाच जातीच्या आहेत. असा साचेबद्ध आणि एकसुरीपणा मनुष्याच्या आहारात पूर्वी कधीच नव्हता. १९५० साली डेन्मार्कमध्ये २५०० वर्षांपूर्वीच्या मनुष्याचा मृतदेह बर्फाखाली चांगल्या अवस्थेत मिळाला, तेव्हा त्याच्या पोटातल्या खिरीमध्ये चाळीस वेगवेगळ्या झाडांच्या बिया आढळल्या! 

जंगलातल्या रानभाज्या, फळे, कंदमुळे ह्यात कितीतरी जास्त वैविध्य आणि पोषणमूल्य होते. आता पृथ्वीवरची एक तृतियांश जमीन लागवडीखाली आहे. त्यातली २५% पिकांसाठी आणि ७५% गुरांना चराईसाठी वापरली जाते. दिवसागणिक ही लागवडीची जमीन अजून अजून जंगले गिळंकृत करते आहे आणि एकाच वाणाची पिके आणि एकाच जातीचे प्राणी वाढवते आहे. ह्यातून जमिनीचा दर्जा खालावतो आहे, प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जाती  नामशेष होत आहेत, पोषणमूल्य आणि आहाराचा दर्जा खालावतो आहे आणि कितीतरी वनस्पतींची माहिती, खाद्यपदार्थ, पाककृती आणि वेगवेगळ्या चवी लयाला जात आहेत. वैविध्य घालवून एकाच वाणाची पिके घेतल्यामुळे संकटकाळ महाकठीण होणार आहे. सगळ्यात जास्त वापरली जाणारी जात एखाद्या नव्या रोगासमोर किंवा तापमान बदलामुळे तग धरू शकली नाही तर अन्नधान्याचा भीषण प्रश्न कसा उभा राहू शकतो, ते सालाडिनो स्पष्ट करतात. तीच गत प्राण्यांचीही होऊ शकते. 

प्रश्नाची ओळख करून दिल्यानंतर पुस्तकातल्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जगातल्या वेगवेगळ्या भागातले दुर्मिळ होत चाललेले अन्न, त्याचा इतिहास आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न, धडपडणारे लोक ह्याबद्दल सालाडिनो माहिती देतात. टांझानियाच्या जंगलातले मध, ऑस्ट्रेलियाच्या मूळ रहिवाशांचे मुख्य अन्न असलेले मरनॉन्ग नावाचे कंद आणि इथिओपियातून जगभर पोहोचलेली कॉफीची जंगली झाडे असा कितीतरी खजिना ते आपल्यापुढे उघडून ठेवतात. मेघालयातली ‘मेमांग नारंग’ नावाची संत्र्यासारखी फळं, तिथली जैवविविधता आणि तिथून जगभर पसरताना ‘नारंग’ शब्दात बदल होत होत तयार झालेला ‘ऑरेंज’ हा शब्द अशी कितीतरी माहिती आपल्याला थक्क करत राहते.  

सगळ्या गोष्टी सोप्या आणि सारख्या करण्याच्या अट्टहासामुळे पर्यावरण, शेती, खाद्यसंस्कृती, आहार, आरोग्य ह्या सगळ्यांवर कसा परिणाम होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा एकमेकींशी निगडित आहेत, ते ह्या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत विशद केले आहे आणि ते करताना जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतीतल्या वेगवेगळ्या दुर्मिळ पदार्थांची सफरही घडवली आहे. माणसाने पुन्हा फळे-कंदमुळे खाऊन राहावे, असे नाही. पण त्या पद्धतीतून जे शिकता आले ते जपणे, जैववैविध्य टिकवणे, वेगवेगळे अन्नपदार्थ जपणे आणि खाणे एवढे आपण नक्कीच करू शकतो.