गुरुवार, ३० जुलै, २०२०

हळूच चावी मारण्याची जादू – नज

वर्तणूक अर्थशास्त्रातल्या (behavior economics) कामासाठी २०१७ साली रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. अर्थशास्त्र आणि मानसशास्त्रातला पूल त्यांनी बांधला असल्याचं म्हटलं जातं. थेलर ह्यांनी कॅस सनस्टाइन यांच्यासमवेत Nudge नावाचं चांगल्या निर्णयांसाठी काय काय करता येईल, त्याबद्दल रोजच्या व्यवहारात उपयोगी पडणारं एक चांगलं पुस्तक लिहिलं आहे. Nudge म्हणजे अगदी हलकासा धक्का, आपण ज्याला हळूच चावी मारणं म्हणतो तसा! लोकांनी चांगले निर्णय घ्यावेत म्हणून का आणि कोणत्या चाव्या मारता येतील, ह्याबद्दल हे पुस्तक आहे. अगदी छोट्या-छोट्या, क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचा आपल्या निर्णयांवर कसा प्रभाव पडतो, ते वाचून आपण थक्क होतो.


पुस्तकाच्या सुरुवातीला वर्तणूक अर्थशास्त्रातल्या काही संकल्पना आणि शब्द स्पष्ट केले आहेत. त्यानंतर काही तत्वे स्पष्ट केली आहेत आणि शेवटी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा वापर कसा करता येईल ते सांगितलं आहे. सुरुवातीलाच  निवड रचनाकार’ (choice architect) असा नवा शब्द आपल्याला समजतो. गोष्टी कशा मांडल्या आहेत, त्यांची रचना कशी आहे; त्याचा माणसाच्या निर्णयावर, निवडीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, शाळेच्या कॅन्टीनमध्ये मेनू अजिबात न बदलता कुठे कोणता पदार्थ ठेवला आहे, त्याच्या फक्त जागा बदलल्या तरी मुलांनी खाण्यासाठी काय निवडलं, त्यात २५% बदल दिसून आला. म्हणजेच मांडणी, रचना बदलून लोकांच्या निवडीवर प्रभाव टाकता येतो. असे प्रभाव टाकणारे, रचना ठरवणारे सगळे लोक “निवड रचनाकार” असतात. आपण बरेचजण बऱ्याच वेळा निवड रचनाकार असतो आणि आपल्याला ते माहीतही नसतं! कोणता अभ्यासक्रम निवडायचा त्याचे पर्याय मुलांना सांगणारे पालक, रुग्णांना वेगवेगळ्या उपचारपद्धती सांगणारे डॉक्टर किंवा निवडणुकीत मतपत्रिका तयार करणारे लोक हे सगळे खरं म्हणजे निवड रचनाकारच असतात. कधी कळत, कधी नकळत.

लेखकांच्या मते “तटस्थ रचना” अशी काही नसतेच. प्रत्येक छोट्या गोष्टीचा कसा प्रभाव पडतो, ते बऱ्याच उदाहरणांनी दाखवलं आहे. जसं वास्तुरचनाकाराला इमारतीसाठी कुठलीतरी एक रचना ठरवावीच लागणार आहे, तसंच कॅन्टीन चालवणाऱ्यालाही पदार्थांची कुठली ना कुठली मांडणी करावीच लागणार आहे आणि तिचा प्रभाव पडणं अटळ आहे. मग ती मांडणी ठरवताना मुलं जास्त पौष्टिक पदार्थ निवडतील, अशा पद्धतीने का करू नये? म्हणजेच पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी मुलांना एक हलकासा धक्का, हळूच चावी का मारू नये? आणि मग आपली पुढच्या संकल्पनेशी ओळख होते, “स्वातंत्र्यवादी पालकवाद” (libertarian paternalism). ही या पुस्तकातली मध्यवर्ती संकल्पना आहे. पालकवाद म्हणजे पालकत्वाच्या भूमिकेतून दुसऱ्याच्या चांगल्यासाठी त्याच्या वर्तनाचं नियंत्रण करत असल्याचा दावा’ करणं. सरकारने खूप जास्त नियम करणं, हा लोकांना पालकवाद वाटतो. ह्यात लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो. मग पालकवाद स्वातंत्र्यवादी कसा असेल? ह्यात विरोधाभास नाही का? लेखकांच्या मते, या संकल्पनेत लोक निवड करायला स्वतंत्र आहेत. लोकांना स्वत:लाच ज्या गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या वाटतात, त्यासाठी त्यांना उद्युक्त करावं, तशी रचना करावी; पण निवडीचं स्वातंत्र्य अबाधित राखावं म्हणजे ‘स्वातंत्र्यवादी पालकवाद’.

स्वातंत्र्यवादी पालकवादाचं एक उत्तम उदाहरण अवयव दानाबद्दल आहे. जास्तीत जास्त लोकांनी अवयव दान केलं पाहिजे, हे तर खरंच आहे. प्रत्येक देशात लाखो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. खूप लोकांचा प्रतीक्षेत असतानाच मृत्यू होतो. अमेरिकेसारख्या देशांत चालक परवान्याच्या अर्जावर (driving license) “अवयव दानासाठी माझी संमती आहे” असं एक कलम लिहिलेलं असतं आणि त्या पुढे तुम्ही जर लिहिलं, तर तुमची संमती आहे, असं मानलं जातं. जर्मनीतही असंच आहे. याउलट काही देशांमध्ये (उदा. ऑस्ट्रिया) अवयव दानासाठी माझी संमती नाही” असं कलम असतं आणि तुम्ही जर लिहिलं, तर तुमची संमती नाही असं मानलं जातं. म्हणजे दोन्हीकडचा आपसूक पर्याय (default option) एकमेकाच्या विरुद्ध आहे. अमेरिकेत आणि जर्मनीत तुम्ही काहीच केलं नाही, तर तुमची संमती नाही असं मानतात. पण ऑस्ट्रियात मात्र तुम्ही स्वत:हून नकार दिला नाही, तर तुमची संमती गृहित धरली जाते. जर्मनीत फक्त १२% लोकांनी अवयव दानाला संमती दिली आहे, तर ऑस्ट्रियात ९९% लोकांनी! फक्त आपसूक पर्याय बदलून आणि अर्जाची रचना बदलून केवढा प्रचंड फरक पडू शकतो! मनुष्य स्वभावात बरंच जडत्व असतं. ‘आहे ते असू दे, कशाला बदलायचं’ अशी वृत्ती असते. त्याचा विचार करून रचना करता येते आणि जास्तीत जास्त लोकांना अवयव दानासाठी उद्युक्त करता येतं. लोकांना कुठल्या दिशेला वळवायचं, ते ठरवणारा पालकवाद इथे आहे. पण तो खूप सौम्य आणि स्वातंत्र्य हिरावून न घेता, काहीही न लादता आलेला आहे.

“दुसऱ्याने काय करायचं ते तुम्ही ठरवू नका”, असं स्वातंत्र्यवादी लोकांचं म्हणणं असतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा पालकवाद मान्य नसतो. अशा टीकाकारांना लेखकांनी तीन मुद्दे सांगितले आहेत. पहिला म्हणजे, लोक नेहमी स्वत:च्या भल्याचा, तर्कसंगत निर्णय घेऊ शकतात, हा मोठाच भ्रम आहे. दुसरा असा, की लोकांच्या निर्णयावर प्रभाव न टाकणं, ही अशक्य गोष्ट आहे. जे काही धोरण असेल, जी काही रचना असेल तिचा प्रभाव पडणारच आहे. तिसरा मुद्दा असा, की पालकवाद म्हणजे जबरदस्ती असं दरवेळी नसतं. स्वातंत्र्य मान्य करणारा, जबरदस्ती न करणारा पालकवाद आपण मोकळ्या मनाने बघितला पाहिजे.

माणूस कसा विचार करतो आणि कसा निर्णय घेतो, ह्याबद्दल विस्ताराने आणि उदाहरणं देऊन या पुस्तकात लिहिलं आहे. हा भाग बराचसा डॅनियल कहनेमन आणि अमोस ट्वरस्की ह्यांच्या अभ्यासावर आधारित आहे. निर्णय घेताना भावनांचा कसा परिणाम होतो, आधी ऐकलेल्या गोष्टीचा पुढच्या संबंध नसलेल्या गोष्टीवरही कसा प्रभाव पडतो असे बरेच मनोरंजक प्रयोग वाचायला मिळतात. इथे मोजक्याच गोष्टी देत आहे. पहिलं म्हणजे, माणसाला आपल्या क्षमता आहेत त्यापेक्षा जास्त वाटत असतात. अमेरिकेतल्या ९०% वाहनचालकांना ते सरासरीपेक्षा जास्त चांगले चालक आहेत, असं वाटतं (इथे लक्षात घेतलं पाहिजे, की सरासरीची व्याख्याच अशी आहे की सुमारे ५०% लोक सरासरीच्या वर आणि ५०% सरासरीच्या खाली असतात). तसंच ९४% प्राध्यापकांना ते सरासरीपेक्षा जास्त चांगलं शिकवतात असं वाटतं. अजून एक मनोरंजक गोष्ट म्हणजे माणसाच्या मनात फायद्यापेक्षा तितक्याच किमतीच्या तोट्याचं महत्त्व दुप्पट असतं. उदाहरणार्थ, वीज वाचवलीत तर वर्षाला तुमचे वीस हजार रुपये वाचतील” असं सांगण्याऐवजी “वीज वाचवली नाहीत, तर वर्षाकाठी तुम्ही वीस हजार रुपये गमवाल, तुमचं वीस हजाराचं नुकसान होईल” असं सांगितल्यावर लोकांचा वीजवापर बराच कमी होतो.

माणूस कसा निर्णय घेतो, त्याच्यावर कशाकशाचा आणि कुणाकुणाचा प्रभाव पडतो हे समजून घेतलं तर शासन, वेगवेगळ्या संस्था किंवा कंपन्या लोकांना चांगल्या (किंवा वाईट!) कामांसाठी उद्युक्त करू शकतात, त्यासाठी हलके धक्के देऊ शकतात. त्याचा वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल. चांगलं आरोग्य, चांगली आर्थिक परिस्थिती, पर्यावरण अशा कितीतरी क्षेत्रांत चांगल्या रचना करून सुधारणा होऊ शकतील. पैशांच्या बाबतीत बचत कशात करावी, निवृत्तीनंतरची व्यवस्था काय, भविष्य निर्वाह निधी इ. गोष्टी सामान्य माणसाला निर्णय घेण्यासाठी सोप्या नाहीत. ह्यात जास्तीत जास्त माहिती सोप्या स्वरुपात उपलब्ध करायला हवीच. शिवाय, कंपन्यांनी भविष्याच्या बचतीचे योग्य आपसूक पर्याय (default options) दिले पाहिजेत. आरोग्याच्या बाबतीतही काय काय करता येईल, त्याच्या नव्या कल्पना वाचायला मिळतात. उदा. - आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्या नियमित व्यायामशाळेत जाणाऱ्यांना काही सूट देऊ शकतात. चांगलं आरोग्य राखण्यासाठी ही एक उत्तम रचना आहे. त्यातून लोकांबरोबरच विमा कंपनीलाही फायदा होणार आहे.

पर्यावरणासाठी एका स्वतंत्र विभागात बऱ्याच कल्पना सुचवल्या आहेत. उदा. कीटकनाशक, खतं आणि इतर फवाऱ्यांवर त्यातले धोके आणि परिणामांची स्पष्ट माहिती लिहिणे. वातानुकूलनावर (A.C.) त्याच्या तपमानाबरोबरच त्याने वीज किती घेतली ते दाखवण्याची व्यवस्था करणे. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी खूप प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची “काळी यादी” तयार करून जाहीर करणे. प्रत्येक कंपन्यांचे उत्सर्जनाचे आकडे सरकारी संकेतस्थळावर जाहीर करण्याचा कायदा करणे. प्रत्येक गाडीच्या मागे जिथे गाडीचा क्रमांक असतो, तिथेच त्या गाडीतून काय किती उत्सर्जन होतं, त्याचे आकडे दिसण्याची व्यवस्था असणे. अशा बऱ्याच दिसायला साध्या-सोप्या गोष्टी सुद्धा खूप काही परिणाम साधू शकतात! आपण हे सगळं ताबडतोब करायला हवं, असं वाटून जातं.

पुस्तकाच्या शेवटी वेगवेगळ्या छोट्या छोट्या चाव्यांची (nudges) बरीच यादी दिली आहे आणि अशा अनेक कल्पनांसाठी www.Nudges.org हे संकेतस्थळही केलेलं आहे. आपल्याला जर अशा काही नवीन कल्पना सुचल्या तर आपणही ह्या संकेतस्थळावर जाऊन त्यात भर घालू शकतो. अजून एका Stikk.com नावाच्या संकेतस्थळाचीही माहिती मिळते. आपण स्वत:च केलेले निश्चय तडीस नेण्यासाठी हे संकेतस्थळ आहे. पैसे भरून (किंवा न भरता) आपला शब्द पाळण्याच्या इथे काही युक्त्या आहेत. उदाहरणार्थ, एखाद्याला वजन कमी करायचं असेल किंवा धुम्रपान सोडायचं असेल, तर तसा निश्चय करून तिथे काही पैसे भरायचे आणि तो निश्चय तडीस गेला, तर पैसे परत मिळणार. नाहीतर ते पैसे एका सेवाभावी संस्थेला देणगी म्हणून जाणार. ह्या गोष्टी गटाने किंवा पैसे न भरता करण्याच्याही काही योजना आहेत. स्वत:च स्वत:ला चावी मारण्याची ही सोय आहे.

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात, नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रत्येक गोष्टीसाठी खूप सारे पर्याय उपलब्ध असताना निवड करणं बऱ्याचदा क्लिष्ट होऊन बसतं. शिवाय खूप वेळा आपल्याला चांगलं वाटतं तेही तडीला नेणं जमत नाही. अशा काळात आपल्या स्वातंत्र्याला धक्का न लावता चांगल्या गोष्टींना उद्युक्त करणाऱ्या रचना हव्या आहेत, असं लेखक मानतात. पण ह्याच तत्त्वांचा कुणी गैरवापर केला तर? लेखकांना वाटतं, की असा गैरवापर आज ना उद्या लक्षात येतोच आणि तसं करणाऱ्यांना त्याचे परिणामही भोगावे लागतात.

माझ्यासाठी तरी मला हे पुस्तक वाचताना नव्या संकल्पना, कल्पना आणि बऱ्याच युक्त्या शिकायला मिळाल्या. “आपण असं का करतो” अशी काही बाबतीत स्पष्टताही मिळाली. मुख्य म्हणजे, वेगळं काय करता येईल, छोट्या छोट्या गोष्टींनी काय बदलता येईल अशा दिशेने विचार करायची सुरुवात झाली.

 

 


सोमवार, २० जुलै, २०२०

द होल वूमन

'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या मार्च २००४ च्या महिला दिन विशेषांकात प्रकाशित झालेला जर्मेन ग्रीअर यांनी लिहिलेल्या 'द होल वूमन' पुस्तकावरचा लेख.
हा लेख नंतर एप्रिल २०२० च्या  'मिळून साऱ्याजणी'च्या ऑनलाईन आवृत्तीतही  इथे आला. 





शनिवार, १८ जुलै, २०२०

मेंदूबद्दल विलक्षण काही - भाग ६ - भविष्यात आपण कसे असू?

डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहिले आहेत. आज हा शेवटचा भाग.


भाग ६ : भविष्यात आपण कसे असू?

गेल्या लाख वर्षांत माणसाने पृथ्वीवर कमाल केली आहे. शिकार करून गुहेत राहण्यापासून ते आजचा अंतराळात जाऊ शकणारा, भव्य इमारती बांधू शकणारा आणि सगळं जग जोडू शकणारा असा अविश्वसनीय प्रवास त्याने केला आहे. त्याच्या डोक्यातल्या जेमतेम दीड किलोच्या ओलसर फिकट पदार्थाने हा चमत्कार केला आहे. आता इथून पुढे तो काय काय करू शकेल? कसा असेल? अजून हजार वर्षांनंतरचा माणूस कसा असेल? आपला मेंदू जे आज करतो त्याहून जास्त काही करू शकेल? जीवशास्त्राची नवनव्या तंत्रज्ञानाशी सांगड घातलेलं जग कसं असेल?

आपला मेंदू खूप लवचिक असतो. परिस्थितीनुसार स्वत:ला सहज बदलू शकतो. एका छोट्या मुलीचं उदाहरण दाखवलं आहे. चार वर्षांची असताना तिला राझमुसेन्स सिंड्रोम नावाचा मेंदूवर हल्ला करणारा रोग असल्याचं निदान झालं. ह्यात हळूहळू शरीर लुळं पडून नंतर मृत्यू होतो. दुसरा काही पर्यायच नसल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून मेंदूचा बाधित झालेला म्हणजे जवळपास निम्मा भाग काढून टाकला. त्याचे नक्की काय परिणाम होणार, ठाऊक नव्हतं. ती इतर लहान मुलांसारखीच वाढेल की काही नवे प्रश्न निर्माण होतील, हे सांगणं अवघड होतं. ह्या शस्त्रक्रियेला आता सात वर्षं झाली. आपल्याला आता अकरा वर्षांची गोड मुलगी बघायला मिळते, इतर मुलांसारखीच. शरीराच्या एका बाजूला तिला थोडासा अशक्तपणा जाणवतो. पण बाकी त्रास काहीच नाही. गणित हा तिचा आवडता विषय आहे. तिच्या मेंदूने परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे! अशा उदाहरणांवरून लक्षात येतं, की मेंदू म्हणजे काही पक्की, ताठर अशी व्यवस्था नाही. तर ते बदलत राहणारं, लवचिक असं मोठं गुंतागुंतीचं जिवंत जाळं आहे. तीच तर गंमत आहे! निम्मा भाग काढून टाकला, तर आपला संगणक चालेल का?

आपल्या कानाच्या आत ध्वनिलहरी घेऊन त्यांचं जैवरासायनिक संकेतांमध्ये रूपांतर करणारं हाड असतं. ते चालत नसेल तर तिथे आता छोटं यंत्र बसवायचं तंत्रज्ञान आलेलं आहे. त्याला cochlear implant म्हणतात. त्या यंत्राने पाठवलेले संकेतही समजून घ्यायला आपला मेंदू शिकतो. बाहेरून येणाऱ्या माहितीला काही एक रचना असेल, तर मेंदू त्यातले नमुने शोधतो आणि अर्थ लावतो. ह्यासंबंधी एक प्रयोग दाखवला आहे. काही उपकरणं लावलेलं एक जाकीट एका माणसाला घालायला दिलं आहे. ते घातल्यावर प्रत्येक शब्दासाठी शरीराला काही विशिष्ट कंपनं जाणवतात. घालणाऱ्याला त्यातून काहीच कळत नाही. त्याच्या फोनच्या अॅपवर त्याला चार शब्दांचे पर्याय दिसतात. त्यातला एक निवडायचा. सुरुवातीला सगळं चुकतच असतं. कारण कंपनं होतात, एवढंच काय ते समजत असतं. पण आठ दिवस रोज असं जाकीट घातल्यावर तो माणूस आपोआप बरोबर शब्द ओळखू लागला! त्याचा मेंदू कंपनांची शब्दाशी सांगड घालायला शिकला होता आणि त्याला ते “शिक्षण” जाणवलंही नाही! ह्याचा अर्थ काय? तर माणसाला नवीन इंद्रिये देता येणं शक्य आहे, मेंदू ती हाताळू शकतो. उत्क्रांतीतून मिळालेल्या पंचेंद्रियांवरच थांबायला हवं, असं नाही.

मानेखालचा भाग हलवता येत नसलेल्या एका बाईबद्दल दाखवलं आहे. तिला कृत्रिम हात बसवला आहे आणि तो तिच्या मेंदूशी असा जोडला आहे, की तिच्या मनात हात हलवायचा जसा विचार येईल, तसा तो हलतो. वर वाटला की वर आणि उजवीकडे वाटला, की उजव्या बाजूला. हे संदेशवहन जमलेलं आहे. पुरेसा सराव झाल्यावर तिच्या मेंदूचा अज्ञात भाग तो हात आपोआप हवा तसा हलवेल. मुद्दाम विचार करून हालचाल करावी लागणार नाही. आपल्या नैसर्गिक हातासारखा आपोआप वापरला जाईल. निरोगी माणसाच्या शरीरालाही एखादा नवा, जास्तीचा अवयव बसविण्याच्या शक्यता आता निर्माण झाल्या आहेत.

शरीर नश्वर आहे. मरून जातं. पण मेंदूत असलेले सगळे अनुभव, ज्ञान, शहाणपण ह्या सगळ्याचं काय? आपल्याला मेंदू जर सुरक्षित ठेवता आला आणि त्यातली माहिती वाचता आली, तर तो माणूस गेल्यावरही आपण त्याच्याबरोबर जगू शकतो. “मेंदू जतन करणे” हे संशोधनातलं नवीन क्षेत्र आहे. अमेरिकेत १०० हून जास्त मृत शरीरं -३०० F (उणे तीनशे फॅरनहाइट) तापमानात द्रवरुपी नायट्रोजनमध्ये जतन केली आहेत आणि त्यांना दूरच्या भविष्यात कधीतरी पुन्हा “जागं” करता येईल, अशी त्यांना आशा आहे. ते ठिकाण आणि व्यवस्था आपल्याला दाखवली आहे. पण माणसाचा मेंदू ठेवायला शरीर हवंच, असं काही आहे का? की संगणकात मेंदू राहू शकेल?

आपला मेंदू म्हणजे खरं तर त्यातल्या जोडण्या, कनेक्शन्स. प्रत्येकाच्या जोडण्या अनन्य असतात. सर्वसामान्य मेंदूत ८६००,००,००,००० म्हणजे ८६०० कोटी मज्जापेशी असतात आणि त्याच्या हजारो पटीने जोडण्या असतात. त्या सगळ्या संगणकावर आल्या तर? अमेरिकेत एम् आय टी विद्यापीठात सध्या उंदराचा मेंदू संगणकावर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते सुद्धा खूप आव्हानात्मक आहे. माणसाचा एक मेंदू संगणकात टाकायचा असेल तरी खूप माहिती साठवावी लागेल. सध्या सगळ्या जगात मिळून जेवढी माहिती संगणकावर आहे, जवळजवळ तेवढी माहिती एका मेंदूसाठी साठवावी लागेल आणि शिवाय त्यावर प्रक्रिया करायची क्षमताही लागेल. पण सध्या दर दोन वर्षाला संगणन क्षमता दुप्पट होते आहे. म्हणजे आपल्याला माणसाचा मेंदू हाताळणं भविष्यात शक्य होणार आहे.

आपल्या मज्जापेशींमध्ये काही विशेष आहे का? की फक्त जोडण्या करण्यासाठी आणि संदेशवहनासाठीचं ते एक माध्यम आहे; एक महाजाल उपलब्ध करून देणारं? ह्या पेशींऐवजी वेगळ्या माध्यमाचं महाजाल दिलं तरी सगळं चालू शकेल का? शेवटी मेंदू म्हणजे मज्जापेशी नाहीत, तर मज्जापेशी जे काम करतात ते म्हणजे मेंदू. मग ह्या पेशींऐवजी सर्किटस् आणि ऑक्सिजनऐवजी वीज दिली तर? तो जीवशास्त्रीय मेंदू नसेल, पण वेगळ्या माध्यमात चालणारी ती पूर्णपणे आपलीच आवृत्ती असेल! मग त्यात चेतना (consciousness) येईल का? चेतना म्हणजे नक्की काय? मेंदूच्या वेगवेगळ्या भागात एका ठराविक पातळीच्या वर क्रिया होऊ लागल्या, की चेतनेचा आपोआप उदय होतो का?  की फक्त मज्जापेशींमध्येच तिचा उदय शक्य आहे? हे सगळे प्रश्न सध्या तरी सैद्धांतिक पातळीवर आहेत. अशी एक शक्यता आहे, की आपण हे शरीर सोडलं तरी “अ-जीवशास्त्रीय” (म्हणजे जीवशास्त्रासारखे पेशी नसलेले) प्राणी म्हणून जगत राहू शकतो, अमर होऊ शकतो. आपल्याला संगणकावर टाकून वेगळ्या कुठल्या ग्रहावर, वेगळ्या सूर्यमालेतही पाठवता येऊ शकतं! किंवा हजारो वर्षांपूर्वीच्या काळाचं सदृशीकरण (simulation) करून त्यातही पाठवता येऊ शकतं. एकदा तुम्ही ह्या कल्पना करू लागलात, की अनंत पर्याय समोर येतात आणि मग असा विचार येतो, की आपण हे जे जग अनुभवतो आहोत, हे असं कुठलं कुणीतरी केलेलं सदृशीकरण तर नाही ना? कशावरून हे जग खरं आहे? आणि मग ईगलमन म्हणतात, “हे खरं आहे की सदृशीकरण आहे, हे खात्रीपूर्वक सांगायचा काहीच मार्ग नाही!” आणि आपल्याला दचकायला होतं, अस्वस्थ होतं.

हजारो वर्षं आपण एकसारखं जगलो – जन्मलो, मर्यादा असलेल्या नश्वर शरीरात जगलो आणि मेलो. पण आता आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, की आता आपलं वास्तव विस्तारू शकतं. आपल्या पंचेंद्रियांनी जग समजून घ्यायची जी छोटी खिडकी दिली आहे, ती मोठी करण्याच्या क्षमता आपल्याला गवसू लागल्या आहेत. आपण पुढे कोण होणार, हे आता आपणच ठरवू शकू. उत्क्रांतीची वाट बघावी लागणार नाही.  

हे सहा भाग (आणि पुस्तक) इथे संपतात. पण आपल्यासाठी मात्र स्वत:कडे, जगाकडे आणि भविष्याकडे नव्या दृष्टीने बघायची सुरुवात होते. एक अस्वस्थ सुरुवात. 

बुधवार, १५ जुलै, २०२०

मेंदूबद्दल विलक्षण काही - भाग ५ - मी आणि तू

डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहायला घेतले आहेत. आज पाचवा म्हणजे शेवटून दुसरा भाग.

भाग ५ : मी आणि तू

आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी काय काय लागतं? सकस आहार, भरपूर पाणी, पुरेसा ऑक्सिजन हे तर झालंच. पण अजून एक गोष्ट आपल्या मेंदूला खूप आवश्यक असते – माणसं. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्या मज्जापेशींच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला इतरांच्या मज्जापेशींची गरज पडते. आपण आपलं कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आपल्याला भेटणारे लोक ह्यांच्याशी संवाद तर साधतोच. शिवाय ह्या सगळ्यांना भेटणाऱ्या लोकांशीही आपण अप्रत्यक्ष संवाद साधत असतो.

मेंदूवरचं बहुतेक संशोधन हे एकेका मेंदूवर होत असतं. पण आपल्या मेंदूच्या बऱ्याच क्रिया ह्या संवादाशी संबंधित असतात, इतरांशी संबंधित असतात. आपण एकमेकांवर छाप पाडायला बघतो, एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो, कल्पनांचं आदान-प्रदान करतो. एका प्रयोगात चित्रफितीत त्रिकोण, गोल अशा आकृत्या इकडून तिकडे जाताना, एकमेकांच्या मागे जाताना दाखवल्या आहेत. लोकांना ते दाखवून त्याचा अर्थ विचारला, की ते त्यात वेगवेगळ्या भावना बघू लागतात. “मोठा त्रिकोण दांडगट आहे” किंवा “गोल घाबरलेला आहे” असा काहीतरी अर्थ लावतात. कारण भूमितीच्या आकृत्या सुद्धा एखादी कथा आणि एकमेकांशी संवाद असल्यासारख्या आपण पाहतो. ते आपल्या मेंदूसाठी खूप महत्त्वाचं असतं. आपण सारखी मतं बनवत असतो – हा विश्वासू वाटतो का, ती मदत करेल का आणि अशीच कितीतरी.

ही अशी मतं बनवायला आपण कधी शिकतो? एका वर्षापेक्षा लहान बाळांना घेऊन एक प्रयोग केलेला दाखवला आहे. छोटी छोटी बाळं त्यांच्या आयांच्या मांडीवर बसून एक कठपुतळीचा छोटासा खेळ बघतात. त्यात एक बदक एक डबा उघडायचा प्रयत्न करत असतं. एक अस्वल (टेडी बेअर) त्याला डबा उघडायला मदत करतं. आणि दुसरं अस्वल येऊन बदकाला ढकलून डबा बंद करतं. हा खेळ झाल्यावर दोन्ही अस्वलं त्या बाळांना खेळायला आणून दिली जातात. प्रत्येक बाळाने मदत करणारं अस्वलच खेळायला घेतलं! विश्वास कुणावर ठेवायचा, मत कसं बनवायचं हे आपल्याला उपजतच माहीत असतं. मात्र जसजसे आपण मोठे होतो, तसतसं हे माणूस वाचणं, ओळखणं क्लिष्ट होत जातं. एकमेकांचा अंदाज येणं, हावभाव आणि उद्देश समजू शकणं अशा सगळ्या गोष्टींवरच समाज चालतो.

आपल्याला एखाद्याच्या चेहऱ्यावरचे भाव समजायला फक्त ३३ मिलिसेकंद लागतात, म्हणजे ३३/१००० सेकंद. हे भाव समजण्याचे संकेत अगदी सूक्ष्म असतात आणि त्यावरची प्रक्रिया मात्र खूप वेगाने होते. आपल्या नकळत हे वेगाने घडत असतं. आपण जे हावभाव बघतो, त्यांचं प्रतिबिंब आपोआप आपल्या चेहऱ्यावर उमटत असतं आणि त्यामुळे आपल्याला त्या भाव-भावना समजायला सोपं जातं. बोटॉक्स हे खरं म्हणजे एक विष आहे. तरीसुद्धा लोक ते चेहऱ्यावर, कपाळावर टोचून घेतात. त्यामुळे आपले स्नायू बधीर होतात आणि स्नायूंची हालचाल होत नसल्यामुळे चेहऱ्यावरच्या आठ्या, सुरकुत्या दिसत नाहीत. तरुण दिसण्यासाठी लोक हे बोटॉक्स करून घेतात. अशा बोटॉक्स केलेल्या लोकांवरचा एक प्रयोग दाखवला आहे. बोटॉक्सवाल्या लोकांचा चेहरा पुरेसा हलत नसल्यामुळे त्यांच्या भावना आपल्याला समजायला अवघड जातंच. शिवाय त्यांनाही इतरांच्या भावना समजायला अवघड जातं. कारण दुसऱ्याच्या भावनांचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर नीट उमटत नाही. स्नायू बधीर झाल्याने भावना प्रतिबिंबित व्हायला आणि म्हणून समजायलाही मर्यादा येते.

आपण जेव्हा चित्रपट बघतो, तेव्हा आपल्याला ते खोटं आहे हे माहीत असूनही आपण त्यात अगदी समरस होतो. आपल्याला रडू फुटतं. स्वत: दु:ख भोगणं आणि दु:ख बघणं ह्या दोन्ही वेळेला मेंदूचे तेच (वेदनेचे) भाग काम करतात. त्यामुळे ते आपल्यालाच वेदना झाल्याच्या “सदृश” असतं. आपण जणू ती व्यक्तिरेखाच होतो आणि तिच्या दृष्टिकोनातून बघू लागतो.

इराणमध्ये कैदेत ४०० दिवस एकटं ठेवलेल्या अमेरिकन बाईची कथा दाखवली आहे. एकटेपणाचा कसा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, ते पहायला मिळतं. नेहमीच्या सामान्य आयुष्यातही आपल्याला कशातून वगळलं, बाहेर काढलं की माणसाला वाईट वाटतं. आपण लोकांशी जोडले जाण्याचा, सामील होण्याचा प्रयत्न करत असतो. आपले छंद, फॅशन, आपल्याला आवडणारे खेळ, आवडणारे खेळाडू ह्या सगळ्यांतून आपण कुठल्यातरी गटाचा भाग बनत असतो. आपण कोण आहे ते घडवण्याचं काम आपल्या आजुबाजूच्या गोष्टी, आपले गट करत असतात. गटाने राहूनच माणसाने मोठमोठ्या संस्कृती निर्माण केल्या आहेत. पण ह्या गटांचा एक मोठा तोटा आहे. आपण ज्या ज्या गटांचा भाग असतो, त्या प्रत्येक गटामागे आपण दुसऱ्या कुठल्यातरी गटाचा भाग नसतो (वंश, धर्म, जात) आणि प्रश्न तिथे सुरू होतो. गटात नसण्यातून, “बाहेरचा” असण्यातून मोठमोठे संहार होतात. नाझींनी जो जनसंहार, वंशहत्या केल्या; तशा भयानक घटना माणसाच्या इतिहासात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी होत आल्या आहेत. कशामुळे असं होतं? मनोरुग्ण नसलेले, सामान्य लोक आपल्या शेजाऱ्याला, आपल्या शाळेतल्या वर्गमित्राला कसे काय क्रूरपणे मारून टाकतात? ह्याचं इतिहास, राजकारण, अर्थकारण अशा विविध अंगांनी विश्लेषण होत असतंच. पण ह्याला अजून एका चष्म्यातून पाहण्याची गरज आहे. मेंदूच्या विज्ञानातूनही ते समजून घेतलं पाहिजे.

एका प्रयोगात लोकांना चित्रफितीत वेगवेगळे हात दाखवले. त्या हातांवर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्युइश आणि नास्तिक अशा चिठ्ठया चिकटवलेल्या होत्या. एकेका हातात इंजेक्शनची सुई खुपसल्याचं दाखवून मेंदूच्या प्रतिक्रिया मोजल्या. स्वत:च्या गटातल्या हातांबाबत मेंदूने मोठ्या प्रतिक्रिया दिल्या. तर इतर गटांबाबत काही परिणाम झाला नाही. हा प्रश्न फक्त धर्माचाच नाही. नास्तिकांनाही नास्तिक हात बघताना दु:ख झालं आणि इतर हातांबाबत निर्विकार प्रतिक्रिया आल्या. आपला मेंदू माणूस आणि वस्तू ह्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतो. दुसऱ्या गटांना जेव्हा प्रतिक्रिया येत नाही, तेव्हा मनात त्यांचं वस्तूकरण झालेलं असतं. मोठमोठे नरसंहार होतात, तेव्हा मोठ्या प्रमाणावर सगळ्या समाजात एखाद्या गटाकडे माणूस म्हणून बघणं कमी कमी होत गेलेलं असतं. त्यांना वस्तू, अडथळा म्हणून बघितलं जातं. त्यांच्याबद्दल मेंदूमध्ये प्रतिक्रिया येणं बंद होतं, संवेदनशीलता थांबते. हे कसं काय घडतं? अफवा पसरवून, एखाद्या गटाबद्दल खोट्या गोष्टी वारंवार सांगून आणि मोठ्या प्रमाणावर प्रचार करून.

ह्याला काही उत्तर आहे का? मार्टिन ल्युथर किंगच्या हत्येनंतर एका अमेरिकन शिक्षिकेने केलेला प्रयोग दाखवला आहे. गोऱ्या मुलांना काळी मुलं “वेगळी” वाटतात म्हणून ह्या शिक्षिकेने त्यांना सांगितलं, की निळ्या डोळ्यांची मुलं तपकिरी डोळ्यांच्या मुलांपेक्षा चांगली आहेत आणि त्यांचे वेगळे गट केले. काही वेळापूर्वी जे मित्र होते, त्यांना निळ्या डोळ्यांची मुलं लगेच हिडीसफिडीस करू लागली आणि तपकिरी डोळ्यांच्या मुलांमध्ये आपण पराभूत असल्याची भावना निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी शिक्षिकेने सांगितलं, की “काल चूक झाली होती. खरं तर तपकिरी डोळ्यांची मुलं निळ्या डोळ्यांच्या मुलांपेक्षा जास्त चांगली आहेत!” ह्या सगळ्या अनुभवामुळे मुलांचा दृष्टिकोनच बदलला. जसं डोळ्याच्या रंगावरून माणसांत भेद करू नये, तसा त्वचेच्या रंगावरूनही करू नये हे तर मुलं शिकलीच. शिवाय, दुसऱ्या दिवशी कोण जास्त चांगलं हे बदलल्यामुळे हे असले नियम, प्रथा ह्यांना काही अर्थ नसतो आणि ते कसेही वाटेल तसे ठरवलेले असतात आणि खरे नसतात; हेही मुलांच्या लक्षात आलं. मुलांना लहानपणापासून असे दृष्टिकोन शिकवायला हवे. माणसाची समाजप्रिय वृत्ती त्याचं भविष्य उज्ज्वल घडवू शकते. आपण सगळेच एकमेकांना जोडलेले आहोत, एकमेकांमुळे आहोत.

लवकरच सहावा म्हणजेच शेवटचा भाग J J

रविवार, १२ जुलै, २०२०

मेंदूबद्दल विलक्षण काही - भाग ४ - निर्णय कसा घेतला जातो?

डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहायला घेतले आहेत. आज चौथा भाग.


भाग ४ : निर्णय कसा घेतला जातो?


आपले निर्णय आपल्याला घडवतात. आपण आयुष्यभर पावलोपावली, दर वळणाला जे निर्णय घेतो, जी निवड करतो त्यातून आपलं व्यक्तिमत्व आकार घेतं. हे निर्णय कसे घेतले जातात? आपला मेंदू क्षणोक्षणी निर्णय घेत असतो, काही आपल्याला जाणवतात आणि बरेचसे जाणवतही नाहीत. माहिती मिळवणे, अन्वयार्थ लावणे, वेगवेगळ्या पर्यायांचं मूल्यमापन करणे ह्या क्रिया मेंदूत सतत चालू असतात. आपण जेव्हा दोन पर्यायांमधून एक निवडतो, तेव्हा त्या दोन पर्यायांसाठी मेंदूत मज्जापेशींची दोन जाळी स्पर्धा करत असतात. ह्या दोन जाळ्यांमध्ये संघर्ष सुरू असतो आणि जे जाळं जास्त जोर लावून जिंकतं, तो निर्णय घेतला जातो. पुरणपोळी खायची की बासुंदी, भेळ की वडा-पाव अशा साध्या निर्णयांमध्येही मज्जापेशींची जाळी भांडत असतात आणि आपल्याला ते कळतही नाही. ही वेगवेगळी जाळी म्हणजे आपलेच वेगवेगळे भाग असतात. आपण स्वत:वरच रागावतो, स्वत:चीच समजूत घालतो, स्वत:लाच धीर देतो; तेव्हा कोण बोलत असतं आपल्याशी? आपलेच वेगवेगळे भाग बोलत असतात. आपण एकसंध नसतो.




एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या मज्जापेशींच्या जाळ्यांचा अनुभव घेण्यासाठी ईगलमन एक छोटासा मजेदार प्रयोग दाखवतात. वेगवेगळ्या कागदांवर रंगांची नावं लिहिलेली असतात. उदा. “लाल” असा शब्द हिरव्या रंगात तर “निळा” असा शब्द लाल रंगात लिहिलेला असतो. बघणाऱ्याला त्या शब्दाचा रंग कोणता ते सांगायचं असतं. हे सांगताना थोडीशी तारांबळ उडते. कारण रंग ओळखणारं जाळं आणि शब्द वाचणारं जाळं ह्यांच्यात भांडण होतं. शब्द वाचणाऱ्या भागाला खच्ची करून रंग सांगावा लागतो आणि म्हणून ते थोडंसं अवघड जातं. ह्याबाबत अजूनही काही प्रयोग दाखवले आहेत.


निर्णय कसा होतो, ह्याचा एक प्रयोग दाखवला आहे. एका चित्रफितीत आगगाडीचं छोटं इंजिन रुळावरून येत आहे. त्याचे ब्रेक निकामी झाले आहेत. त्या रुळावर लांबवर इंजिनाकडे लक्ष नसलेले चार मजूर काम करत आहेत. ते इंजिनाखाली मरतील. पण तुमच्याकडे एक कळ आहे. ती दाबून तुम्ही ते इंजिन वेगळ्या रुळांवर वळवू शकता. तिकडे एक मजूर आहे. चार मजूर वाचतील आणि ते करताना एक मरेल. सहभागी झालेल्या प्रत्येकाने कळ दाबण्याचा निर्णय घेतला. आता ह्या प्रयोगात थोडासा बदल केला. आता कळ नाही, दुसरे रुळही नाहीत. तुम्ही जवळच्या टाकीवर उभे आहात आणि तुमच्या शेजारी एक जाड माणूस उभा आहे. तुम्ही जर वरून त्याला इंजिनाच्या वाटेत ढकलून दिलं, तर तो मरेल. पण त्याच्या शरीराच्या अडथळ्यामुळे इंजिन थांबेल आणि मजूर वाचतील. आता मात्र सहभागी झालेल्या प्रत्येकाने न ढकलण्याचा निर्णय घेतला. का बरं? काय बदललं? पहिल्या वेळी हा फक्त गणिताचा प्रश्न होता – एक जीव वाचवायचा की चार! दुसऱ्यावेळी स्वत:च्या हाताने एखाद्याला मृत्यूच्या तोंडी ढकलायचं म्हटल्यावर तिथे भावनिक प्रश्न निर्माण झाला आणि भावना हाताळणारं जाळं कामाला लागलं. त्याने गणिती जाळ्याला हरवलं. जिथे भावनिक गोष्टी दूर सारून निर्णय घेता येतात, तिथे हिंसा सहज, सोपी होते. आधुनिक काळात नव्या तंत्रज्ञानामुळे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ड्रोन अशा गोष्टींमुळे युद्ध करणं सोपं झालं आहे.


निर्णय घेण्यात भावनांचा खूप मोठा वाटा असतो. भावनांचा भाग आपल्या शरीराशी संवाद साधून ती माहितीही वापरत असतो. दरवेळी खूप साऱ्या माहितीवर खोलात विचार करायला वेळ नसतो. अशावेळी शरीर संकेत देऊन मदत करतं. उदा. घाम फुटणे, घशाला कोरड पडणे, स्नायू ताठ होणे, छातीत धडधडणे. आपण रस्ता ओलांडताना एखादं भरधाव वाहन आलं, तर आधी शरीर प्रतिक्रिया देतं आणि मग आपल्याला समजतं. पण दरवेळी शरीराचे संकेत आपल्याला जाणवत नाहीत. खूप सूक्ष्म पातळीवर ते चालू असतं आणि निर्णय त्यानुसार होत असतात. यासंदर्भात एक थक्क करणारा अभ्यास दाखवला आहे. सारखाच गुन्हा आणि सारखीच शिक्षा भोगलेल्या एका कैद्याला न्यायाधीश परोल देतो आणि दुसऱ्याला नाही. अशा प्रकारच्या एक हजार प्रकरणांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं, की जेवणाच्या सुट्टीच्या थोडंसं आधी जे प्रकरण समोर येतं, त्यात परोल नाकारला जातो आणि जेवण झाल्यानंतर जे समोर येतं, त्यात दिला जातो! न्यायाधीशही त्यांच्या शरीरशास्त्रात कैद असतात! सकाळपासून काम केल्यावर जेवायच्या वेळेपर्यंत मेंदूची ऊर्जा कमी होते आणि त्याचा निर्णयावर परिणाम होतो. आपल्या शरीरात होणाऱ्या आणि आपल्याला अजिबात न जाणवणाऱ्या गोष्टी बऱ्याच निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्याला कोणता मुलगा/मुलगी आवडते, त्यातल्या कुणाशी आपण लग्न करतो ह्या सगळ्यात आपलं शरीर, त्यातले हार्मोन्स बरंच काही ठरवत असतात. आपल्याला मात्र आपण विचारपूर्वक, तर्कसंगत निर्णय घेतो, असं वाटत असतं.


राजकीय विचार आणि मतदानही धोरणं बघून, आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांवरून आपण ठरवतो, असं आपल्याला वाटत असतं. पण ह्याबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक प्रयोग पाहायला मिळतो. काही हिंसक दृश्ये दाखवून त्याला माणसाची मज्जासंस्था कशी प्रतिक्रिया देते, त्याची निरीक्षणं नोंदवली जातात. त्याच लोकांकडून नंतर (ह्याच्याशी संबंधित नसलेला वेगळा प्रयोग आहे असं सांगून) राजकीय मतांबद्दल फॉर्म भरून  घेतला जातो. ज्यांना हिंसेबद्दल जास्त घृणा वाटते, ते राजकीयदृष्ट्या उजवीकडे झुकलेले आढळून येतात. हिंसेच्या चित्रांना तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेवरून तुम्ही कुणाला मत देणार हे 
९५% वेळा निश्चितपणे सांगता येतं!


आपल्या वेगवेगळ्या अनुभवांच्या वेळी कमी-जास्त प्रमाणात डोपामाईन हार्मोन आपल्या शरीरात तयार होते. त्यानुसार आपण अनुभवाचं आणि जगाचं मूल्यमापन करत असतो, प्राधान्यक्रम ठरवतो आणि भविष्याबाबत निर्णय घेतो. डोपामाईन जितकं जास्त, तितका अनुभव चांगला. मात्र खूपच जास्त डोपामाईन झाल्यास त्यातून माणूस व्यसनी बनतो. व्यसनमुक्तीसाठी मज्जातंतू विज्ञानाचा कसा उपयोग करून घेता येतो, तेही यासंदर्भात बघायला मिळतं.


विज्ञानातून आता समजलं आहे, की आपण म्हणजे एकच एक विशिष्ट काही नसतो. आपल्यामध्ये परस्परविरोधी, स्पर्धा करणारे बरेच गट असतात. हे जर आपण नीट समजून घेतलं आणि त्याचा उपयोग करून घेतला, तर आपण जास्त चांगले निर्णय घेऊ शकतो.

गुरुवार, ९ जुलै, २०२०

मेंदूबद्दल विलक्षण काही - भाग ३ - कोण नियंता आहे?

डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहायला घेतले आहेत. आज तिसरा भाग.

भाग ३ : कोण नियंता आहे?

आपण ज्या गोष्टी करतो, जे निर्णय घेतो, आपले विचार, आपल्या श्रद्धा हे सगळं कोण ठरवतं? ह्या सगळ्याची सूत्रं आपल्या मेंदूच्या अज्ञात, अबोध भागात (unconscious) असतात आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. आपण जेव्हा झोपेतून जागे होतो, तेव्हा आपल्या मेंदूचा ज्ञात भाग (conscious), जाणिवा जाग्या होतात आणि आपल्याला वाटतं, की आपल्या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण ह्या ज्ञात भागाकडेच आहे!

आपल्याला ज्या सहज वाटतात आणि आपण ज्या आपोआप करतो, त्या सगळ्या गोष्टी खरं तर अवघड असतात आणि मेंदूचा अबोध भाग त्या करत असतो आणि ते आपल्याला जाणवतही नाही. उदा. चालणे, सायकल चालवणे, क्रिकेट खेळताना समोरचा चेंडू क्षणार्धात बरोब्बर मारणे. जर आपल्या मेंदूचा ज्ञात भाग ही कामं करू लागला, तर त्याला चेंडू बघून निर्णय घ्यायला आणि हात हलवायला खूप वेळ लागेल आणि कष्ट पडतील. तोवर चेंडू कुठल्या कुठे निघून जाईल! आपल्या सर्व शारीरिक क्रिया किंवा खेळ खेळणे ह्यांत तोल, अंतर आणि वेगाचं भान, स्नायूंच्या हालचाली, त्यांचा ताळमेळ हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचं असतं. पण आपल्या ज्ञात मेंदूला ते जाणवत नाही.

एका छोट्या मुलाचं उदाहरण दाखवलं आहे. ८-१० वर्षांचा मुलगा २-३ वर्षं सराव केल्यामुळे पाच सेकंदांमध्येच कपांचा एक विशिष्ट मनोरा रचतो. त्याच्याच शेजारी ईगलमन स्वत: तसाच मनोरा रचत असतात. त्यांना मात्र हे करायला जास्त वेळ आणि प्रयत्न करावे लागतात. दोघांच्याही मेंदूचा आलेख (EEG) घेतला जातो. त्यात ईगलमन यांच्या मेंदूत बऱ्याच क्रिया होताना दिसतात, तर त्या मुलाचा मेंदू मात्र विश्रांतीच्या स्थितीत दिसतो. पाच सेकंदाइतक्या वेगाने करण्यासाठी खरं तर त्याने जास्त क्रिया करायला हव्या होत्या ना? पण तसं होत नाही. बराच काळ सराव केल्यामुळे मनोरा रचण्याचं कौशल्य त्या मुलाच्या अंगवळणी (खरं म्हणजे मेंदुवळणी) पडलेलं आहे. मेंदूच्या रचनेत त्यासाठी आवश्यक बदल झालेले आहेत आणि म्हणून त्याला त्यासाठी फारशा क्रिया कराव्या लागत नाहीत.

चालण्यापासून ते गाठ बांधण्यापर्यंतच्या रोजच्या शेकडो गोष्टी आपल्या अशाच मेंदुवळणी (hard-wired) पडलेल्या आहेत, आपल्या मेंदूच्या रचनेत त्यासाठी बदल झालेले आहेत. आपण ह्या गोष्टी (शिकून झाल्यावर) जाणीवपूर्वक करत नाही. आपल्या मेंदूचा अज्ञात भाग त्या आपल्या नकळत करत राहतो. असामान्य कष्ट आणि सराव करून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी  सुद्धा आपल्या मेंदूत भिनू शकतात, मेंदूच्या रचनेचा भाग होऊ शकतात. कुठलाही दोर किंवा मदत न घेता शेकडो फूट उंचीच्या कडे-कपारी चढणाऱ्या माणसाचं उदाहरण दाखवलं आहे. विचार न करता, भीतीची जाणीव न होता, आपोआप असं चढणं त्याला साध्य झालेलं आहे. अशा स्थितीला बरेचसे मोठमोठे खेळाडू, वादक, कलाकार पोहोचत असतात. त्यांच्या कलेत, खेळात ते संपूर्णपणे बुडून जाऊ शकतात. ध्यानस्थ बसल्यावरही अशी अवस्था प्राप्त होते – तंद्री, समाधी लागलेली अवस्था. त्यात परमानंद अनुभवता येतो.

बऱ्याचदा आपल्याला आपण जाणीवपूर्वक, विचार करून निर्णय घेतो आहोत असं वाटत असतं. पण प्रत्यक्षात आपला अज्ञात, अबोध भाग त्या निर्णयांना दिशा देत असतो. ह्याबाबतचे मनोरंजक प्रयोग दाखवले आहेत. काही गोष्टी ऐकून आपण चांगलेच चकित होतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या आईबद्दल बोलताना गरम कॉफीचे घुटके घेत असू तर जास्त आपुलकीने बोलतो आणि थंड कॉफी घेत असू तर (तुलनेने) कमी आपुलकीने बोलतो. पेयाच्या उबेचा नात्याच्या भावनेवर परिणाम होतो. तसंच आपण जर शेजारी सॅनिटायझर घेऊन बसलो असू, तर आपली राजकीय मतं जरा पुराणमतवादाकडे (conservative) झुकू लागतात. सॅनिटायझरमुळे आपली बाहेरच्या धोक्यांची जाणीव तीव्र होते.

आपल्या मेंदूचा अज्ञात, अबोध भाग एवढं नियंत्रण ठेवतोच आहे, तर आपण फक्त आपोआप चालणारे नेणिवेतलेच प्राणी का नाही झालो? हा ज्ञात भाग, ह्या जाणिवा कशासाठी आल्या? जेव्हा काही अनपेक्षित सामोरं येतं, तेव्हा ह्या ज्ञात भागाची गरज पडते. तो अंदाज घेतो, अर्थ लावतो. समोरची नवी गोष्ट संधी आहे की धोका, ते ठरवतो. त्याखेरीज आपल्या मनातली जी आंदोलनं, द्विधा मन:स्थिती असते, त्यात निर्णय घेण्याचं काम ह्या जाणिवा, ज्ञात भाग करतो. म्हणजे आवडता पदार्थ दिसतो आहे पण डॉक्टरांनी आहार नियंत्रण सांगितलं आहे, अशावेळी हा भाग निर्णय घेतो. एखाद्या मोठ्या कंपनीचा किंवा संस्थेचा प्रमुख असल्यासारखा हा भाग मेंदूच्या वेगवेगळ्या भागात जे मतभेद असतात, त्याचा निवाडा करतो. अत्यंत गुंतागुंतीच्या क्लिष्ट अशा मेंदूच्या कामाचा आरसा म्हणून हा ज्ञात भाग काम करतो आणि भविष्याचं नियोजनही करतो. ह्या भागाच्या ह्या क्षमतांमुळेच माणूस हा पृथ्वीवरचा सर्वांत सामर्थ्यशाली प्राणी ठरला आहे.

आपण जो विचार करतो, जे निर्णय घेतो, ते आपल्या मेंदूवर अवलंबून असतं. आपल्या मेंदूची रचना आपली जनुकं आणि आजुबाजूच्या वातावरणानुसार घडते. आपलं कुटुंब, शाळा, परिसर, संस्कृती, संस्कार आणि आपली जनुकं अशा सगळ्याच्या समुच्चयातून आपला मेंदू घडतो आणि तो आपले विचार आणि वर्तणूक ठरवतो. म्हणजे आपलं स्वातंत्र्य खरं तर खूपच मर्यादित असतं आणि आपण कुठे जन्मलो ह्यावर खूप काही अवलंबून असतं. आपल्याला खरोखरी मुक्त इच्छा (free will) तरी आहे का? की हे सगळं आपल्या मेंदूत कोरल्यानुसार होतं आहे? ह्यावर निर्णायक प्रयोग अजून तरी आपल्याला करता आलेला नाही आणि म्हणून हा मुक्त इच्छेचा प्रश्न अनुत्तरितच आहे.

आपल्याला जेवढं आकाश दिसतं तेच विश्व आहे, असं पूर्वी माणसाला वाटत असे. पण आता आपल्याला विश्वाच्या अमर्यादतेची ओळख झाली आहे. तसंच आपल्या मेंदूच्या ज्ञात भागापलीकडे एक “आतलं” अथांग विश्व आहे आणि आता कुठे आपल्याला त्याची फक्त झलक माहीत झाली आहे. थोडक्यात, पिक्चर अभी बाकी है!


शनिवार, ४ जुलै, २०२०

मेंदूबद्दल विलक्षण काही - भाग २ - आपण स्वत: म्हणजे काय?


डेव्हिड ईगलमन नावाचे एक अमेरिकन मज्जा वैज्ञानिक (neuroscientist) आहेत. त्यांचं मेंदूवर “The Brain” नावाचं एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यावर आधारित नंतर सहा भागांची (प्रत्येकी एक तास) चित्रफीतही आली. सहा भागांवर सहा लेख लिहायला घेतले आहेत. आज दुसरा भाग.

भाग २ : आपण स्वत: म्हणजे काय?


मेंदूची रचना आणि काम इतकं अजब आणि गुंतागुंतीचं आहे, की आपण थक्क होऊन जातो! पण आपल्याला असं चकित करणारा मेंदू म्हणजे खरं तर आपण स्वत:च आहोत. आपलं आयुष्य आपल्या मेंदूला घडवत असतं आणि आपला मेंदू आपलं आयुष्य घडवत असतो ... ह्यातूनच आपण “आपण” होत असतो. आपली ओळख, अस्मिता घडत असते.

बहुतेक प्राणी हे जन्मल्यानंतर काही तासांत किंवा काही दिवसांतच चालू/पोहू शकतात. माणसाला मात्र साध्या साध्या गोष्टी करायलाही बराच काळ जावा लागतो. कारण माणसाच्या मेंदूची जन्माच्या वेळी पूर्ण वाढ झालेली नसते. आयता, तयार मेंदू घेऊन जन्मण्याऐवजी आजुबाजूच्या परिस्थितीनुसार शिकत, जुळवून घेत माणसाचा मेंदू घडत जातो. मेंदूची वाढ होते म्हणजे नवीन पेशी नाहीत तयार होत. आहेत त्याच पेशींमध्ये नव्या जोडण्या (connections) तयार होतात. आपण दोन वर्षांचे होतो, तेव्हा प्रत्येक मज्जापेशीच्या वेगवेगळ्या मज्जापेशींशी किमान १५००० जोडण्या झालेल्या असतात. प्रौढ माणसांतल्या मेंदूपेक्षा ह्या दुप्पट असतात. जसजशा आपण नवीन गोष्टी शिकत जातो, तशा तिकडे लक्ष केंद्रित करताना ह्या जोडण्या कमी कमी होत जातात. आपल्याला येणारे अनुभव आणि आपला आजुबाजूच्या परिसराशी येणारा संबंध ह्यातून आपला मेंदू घडत असतो आणि आपण जे काही होतो, घडतो ते आपल्या मेंदूतून कोणत्या जोडण्या निघून गेल्या, त्यावर ठरत असतं!

एका अमेरिकन जोडप्याने रोमेनियाच्या अनाथाश्रमातून चार वर्षांची असताना दत्तक घेतलेल्या आणि आता विशीत असलेल्या तीन मुलांची कहाणी आपल्याला दाखवली आहे. अगदी लहान वयात दुर्लक्ष आणि हेळसांड झाल्यामुळे मेंदूच्या रचनेवर (physical structure) परिणाम झालेला आहे. मेंदूचा आकार कमी असणे, भाषा शिकायला उशीर होणे, सरासरीपेक्षा कमी बुद्ध्यांक, मज्जापेशींच्या क्रिया कमी असणे असे खूप दुष्परिणाम झाले आहेत. ह्या तिन्ही मुलांसाठी शालेय शिक्षण कठीण होतं. आई-वडील आणि शिक्षकांनी त्यांच्यासाठी विशेष मेहनत घेतली आणि अजूनही त्यांच्यासाठी सगळं सरळ, सोपं झालेलं नाही. लहान वयात अनुभव आणि संवाद मिळाला नाही, तर मेंदूच्या क्षमतेवर दूरगामी परिणाम होतात. दोन वर्षं वयाआधी जर दत्तक मूल घरी कुटुंबाबरोबर राहू लागलं, तर मात्र बहुतेक समस्यांचं निराकरण होऊ शकतं.

जसा आजुबाजूच्या वातावरणामुळे मेंदूत बदल होतो, तसाच काही ठराविक वेळापत्रकानुसारही बदल होतो. उदाहरणार्थ, पौगंडावस्था! ह्या वयात मेंदूत मोठे बदल होतात. संयम कमी असतो, स्वत:बद्दलची जाणीव तीव्र होते. पूर्वी असा समज होता, की साधारण विशीपर्यंत आपल्या मेंदूच्या रचनेतले सगळे बदल होऊन जातात. पण आता नवीन संशोधनात असं सिद्ध झालं आहे, की प्रौढ वयातही मेंदूत मोठे बदल होऊ शकतात. ह्यासाठी लंडन शहरातल्या टॅक्सी चालकांचं उदाहरण दिलं आहे. लंडनमध्ये टॅक्सी चालवण्यासाठी एक चाचणी द्यावी लागते. त्यासाठी सुमारे २४,००० रस्ते आणि ५०,००० ठिकाणं लक्षात ठेवावी लागतात. हे काही सोपं काम नाही. ह्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या लोकांचे आधी, प्रशिक्षण काळात आणि नंतर मेंदूंचे स्कॅन करून निरीक्षणं घेतली, तेव्हा त्यांच्या अवकाशीय स्मरणशक्तीचा (spatial memory) भाग आकाराने वाढलेला आढळला. एखादं वाद्य वाजवायला शिकल्यावरही मेंदूत बदल होतात. आपण कोण आहोत आणि कोण होऊ शकतो, हे सतत बदलत असतं, शब्दश: आकार घेत असतं. आपण करत असलेलं काम, प्रेमात पडणं, आई-बाप होणं, आपले मित्र-मैत्रिणी ह्या सगळ्यांचा आपल्या मेंदूवर परिणाम होत असतो आणि त्यामुळे आयुष्यभर आपण बदलत राहतो.
  
सगळं बदलत असलं, तरी एक गोष्ट मात्र नेहमी आपल्याबरोबर असते – आपल्या आठवणी. पण आठवणी तरी स्थिर असतात का? खरं तर आठवणी हळूहळू पुसट होत जातात. त्यातले तपशील निसटून जातात. जुन्या आठवणींच्या मज्जापेशी इतर आठवणींना वापरल्या जातात. दरवेळी जेव्हा आपण एखादी घटना आठवतो, तेव्हा ती घटना पुन्हा नव्याने डोक्यात उभी करतो. त्यामुळे तीच घटना वेगळ्या प्रकारे आठवू शकते. आपलं वर्तमान, सध्याची स्थिती त्या आठवणीवर प्रभाव टाकते आणि ती आठवण थोडीशी बदलते. काय झालं, इतरांनी त्याबद्दल काय सांगितलं आणि आजच्या मला त्याबद्दल काय वाटतं ह्या सगळ्यांमधून ती आठवण नव्याने साकार होत असते. आठवणींमध्ये जसे फेरफार होतात, तसंच एखादी न घडलेली घटनाही आपल्या डोक्यात आठवण म्हणून सोडता येऊ शकते! तीन खरोखरी घडलेल्या घटना आणि एक काल्पनिक घटना अशी चर्चा करून काल्पनिक गोष्टींच्या आठवणी कशा खऱ्या वाटू लागल्या, त्यासंबंधीचे प्रयोग दाखवले आहेत. आठवणी म्हणजे फक्त भूतकाळाचा पट नसतो, तर भविष्यात काय घडू शकतं ह्याची समज येण्याची ती व्यवस्था असते. म्हणून भूतकाळ आणि भविष्यकाळासाठी मेंदूचा एकच भाग वापरला जातो.

आता माणसाचं आयुष्यमान वाढल्यामुळे वृद्धपणाचे प्रश्नही वाढले आहेत. पार्किनसन्स, अल्झायमर्स ह्यांसारखे रोग मेंदूवर हल्ला चढवतात. पण वेगवेगळ्या प्रयोगांमधून असं सिद्ध झालं आहे, की आपण मन आणि शरीर जर कार्यरत ठेवलं, तर ह्या हल्ल्यांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. मेंदूचा काही भाग जरी निकामी झाला, तरी कार्यरत माणसाचा मेंदू नवीन वेगवेगळे उपाय काढून नीट चालत राहतो.

आपण “आपण” असतो, म्हणजे नक्की काय असतं? आपली आपल्याला असणारी ओळख, जाणीव आणि आपल्यातली चेतना म्हणजे काय? आपण मेल्यावरही आपल्या मेंदूतल्या कोट्यवधी मज्जापेशी तिथेच असतात. पण आपण मात्र नसतो. मग काय संपतं? तर ह्या मज्जापेशींचं काम थांबतं. आपण म्हणजे मज्जापेशींचं अस्तित्व नव्हे, तर आपण म्हणजे मज्जापेशींची कामगिरी! एखाद्या वाद्यवृंदात जसे सगळे वादक एकमेकांशी ताळमेळ राखून एकलय होऊन संगीत सादर करतात, तसं ह्या हजारो कोटी मज्जापेशींचं  सादरीकरण म्हणजे आपण, आपली स्वत:बद्दलची जाणीव, आपल्यातली चेतना. आपण गाढ झोपेत असतो, तेव्हाही ह्या मज्जापेशी काम करत असतात, पण वेगळ्या तालात. त्यामुळे आपल्याला जाणीव नसते. त्या पुन्हा त्यांच्या नेहमीच्या तालात आल्या आणि त्यांनी सूर लावला, की आपल्याला जाग येते.

आपण जसे असतो, आपल्या मज्जापेशींच्या जोडण्या जशा असतात, तसं आपल्यासाठी जग असतं. तसा आपण जगाचा, जगण्याचा अर्थ लावतो. प्रत्येक मेंदूमधल्या ह्या जोडण्या वेगळ्या असतात, अनन्य असतात आणि म्हणूनच प्रत्येक माणूस वेगळा असतो. ना आपल्यासारखा कुणी झालाय, ना कुणी होणार आहे. आपल्यासारखे आपणच – एकमेव, अद्वितीय.