शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

कथा - पत्रांचे तुकडे

 ताईला लिहिलेल्या पत्रांचे भाग/तुकडे


जुलै १९९०

प्रिय ताई,

आता कॉलेजमध्ये माझं चांगलं बस्तान बसलं आहे. माझ्या रूममेटशी मैत्री झाली आहे. तिची एक गंमत आहे. ती स्वत:बद्दल “मी आली, मी गेली, मी जेवली” असं म्हणते. मी तिला ह्याबद्दल विचारलं, तर म्हणाली, “आमच्याकडे असंच म्हणतात.” सुरुवातीला कानाला फार खटकायचं. पण आता सवय झाली आहे.


ऑगस्ट १९९१

प्रिय ताई,

यंदा अभ्यास मला आवडायला लागलाय. शिकवणारे सगळे चांगले आहेत. मला सगळ्यांसमोर इंग्लिशमध्ये शंका कशी विचारायची ते सुचत नाही. मग मी लेक्चर संपल्यावर जाऊन मराठीत शंका विचारते. बहुतेक सगळे माझ्याशी मराठीत बोलतात. आमचे एक धाडधाड इंग्लिश बोलणारे सर मराठी मात्र “आनी-पानी” प्रकारचं बोलतात! मला आश्चर्यच वाटलं. इतकं शिकलेला, प्राध्यापकी करणारा माणूस मराठी शुद्ध कसं काय नाही बोलू शकत? पण शिकवतात मात्र एकदम छान! सगळ्या संकल्पना अगदी स्पष्ट होतात. आम्ही इथे संकल्पना किंवा कन्सेप्ट वगैरे म्हणत नाही, फंडाज् म्हणतो!!


जानेवारी १९९२

प्रिय ताई,

तुला मी मागे अमोलबद्दल सांगितलेलं आठवतंय का? माझा मित्र, खूप वाचणारा आणि सामाजिक उपक्रमांत भाग घेणारा? तर परवा त्याचा आणि माझा कडाक्याचा वाद झाला. तो मला म्हणाला, “तू बोलतेस ते मराठी बरोबर, शुद्ध आणि बाकीच्यांचं अशुद्ध असं तू कोण ठरवणार? लोकशाहीच्या तत्त्वानुसार मतदान घेतलं तर तुझंच चूक निघेल.” आता भाषा, व्याकरण ही काय मतदान करायची गोष्ट आहे का? प्रत्येक गोष्टीचं मानक ठरलेलं असतं. ‘कोण म्हणतं टक्का दिला’ अशा नावाचं एक नाटक आहे म्हणे. त्यातला नायक हा आपण ज्याला अशुद्ध, खेडवळ म्हणतो तसं बोलत असतो आणि नंतर तो एकदा आपल्यासारखं शुद्ध बोलून दाखवतो आणि म्हणतो, “मला असं बोलायला येतं. पण मी तुमच्यासारखं का बोलू? मी माझीच भाषा बोलणार.” मला काही हे पटलं नाही. प्रत्येकाने स्वत:चीच भाषा बोलायची म्हणजे काय? भाषा काय एकेकट्याची असते का? अशाने मराठीचा काही दर्जाच उरणार नाही.


एप्रिल १९९२

प्रिय ताई,

परीक्षेपूर्वीचं हे माझं शेवटचं पत्र. आता ह्यानंतर सुट्टीत प्रत्यक्षच भेटू. १० दिवसांपूर्वी मी आणि अनु शनिवार-रविवार एका पाड्यावर जाऊन आलो. अमोल आणि त्याची मित्रमंडळी आळीपाळीने शनि-रवि तिथे जाऊन लहान मुलांना शिकवत असतात. ह्यावेळी अमोलबरोबर आम्ही पण गेलो. खूप मजा आली. पहिल्यांदाच त्या मुलांना भेटतेय, असं अजिबात वाटलं नाही. मुलांना शिकवताना माझ्या लक्षात आलं, की त्यांना श, ष आणि क्ष तला फरक शिकवणं जवळ जवळ अशक्य आहे. का एवढी क्लिष्ट केलीय आपण भाषा? आपण भाषा सोपी करायला हवी, शिकणं आनंददायी नको का? आणि ‘श’-‘ष’ उच्चार असे किती लोकांना माहिती आहेत? शिवाय ऱ्हस्व, दीर्घ म्हणजे मुलांचा छळ आहे नुसता. अमोल म्हणतो, की एकच वेलांटी आणि एकच उकार भाषेत ठेवला पाहिजे – फक्त दीर्घ. दीर्घ नाही, दुसरा! सोपं करायला हवं. पटतंय ना तुला? 


ऑक्टोबर १९९२

प्रिय ताई,

तू लिहिलंस तसं झालंय खरं माझं. माझ्या बोलण्यात हिंदी-इंग्लिश शब्दांचा खूप भरणा झालाय आजकाल. त्यामुळे पत्रातही तसं येत असेल. आजकाल अशा मिक्स लँग्वेजचाच जमाना आला आहे. त्याला हिंग्लिश (हिंदी-इंग्लिश) आणि इंगराठी (इंग्लिश-मराठी) म्हणतात. मला आता इतक्या वेगवेगळ्या ठिकाणचे मित्र-मैत्रिणी आहेत, की आम्ही असं सगळं मिक्स करूनच बोलतो! मला वाटतं, की आपण पूर्वी भाषेच्या बाबतीत उगीचच खूप सोवळे होतो. कधी ‘त्रास झाला’ म्हणायचं, कधी ‘वाईट वाटलं’ म्हणायचं आणि कधी ‘दु:ख झालं’ म्हणायचं असा कीस काढत बसायचो. आपल्या घरात आणि शाळेत अशा प्रत्येक शब्दाचा किती बाऊ करायचे ना? आता मला वाटतं, की भाषा हे शेवटी विचार, भावना पोचवण्याचं साधन आहे. तुम्हांला मुद्दा कळला, भावना पोचल्या की झालं! कशाला तो शब्दच्छल. तुला बहुतेक पटणार नाही – पण चलता है गं ताई! 


जानेवारी १९९३

प्रिय ताई,

माझं सध्या खूप बिझी झालंय सगळं. सेमिनार, प्रोजेक्ट, कॅम्पस इंटरव्ह्यू. मी इंग्लिश बोलायची सॉलिड प्रॅक्टिस करतेय आणि जमायला लागलंय बरंचसं. पण आता त्यामुळं मराठीची लेव्हल घसरतेय... रागावू नकोस बरं का मला! तुझ्या सहवासात आले की सुधारेल परत.


सप्टेंबर १९९४

प्रिय ताई,

ऑफिसमध्ये माझं चांगलं चाललंय. खूप शिकायला मिळतंय. नवीन टेक्नॉलॉजी आहे म्हणून अभ्यासही करत असते. माझा बॉस साउथ इंडियन आहे आणि क्लायंट अमेरिकेचा. त्यामुळे इंग्लिश बोलावंच लागतं. आता चांगला कॉन्फिडन्स वाढलाय. मी आता get आणि gate च्या उच्चारातला फरक शिकलेय. आपल्याकडे दोन्हीला “गेट” असं असल्यामुळे मला हे पूर्वी माहितीच नव्हतं. बॉस म्हणतो, “तू इंग्लिशमध्ये विचार करायला शिकलं पाहिजेस.” तो म्हणतो, की नीट लिहिता-बोलता येणं is must! It really matters. नुसत्या टेक्नॉलॉजीने भागत नसतं. बाकी मजेत.


नोव्हेंबर १९९८

प्रिय ताई,

मी आता इथे छान सेटल झालीय. मला अमेरिकन ॲक्सेंट समजायला फारसा त्रास झाला नाही. पण काही काही वेगळे उच्चार शिकायला मिळाले. उदा. Newark ला नूअर्क म्हणतात आणि मेक्सिकन पदार्थांचे उच्चार तर अजूनच विचित्र “J” ला ह म्हणतात. मी हे सगळं नवीन नवीन शिकतेय आणि मला गंमत वाटतेय. सुरुवातीलाच आनंदने अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यामुळे बाहेर कुठे माझी पंचाईत नाही झाली. तो मला म्हणतो, की तू टीव्ही बघत जा म्हणजे इथल्या phrases पटापट शिकशील. नवरा स्वत:च टीव्ही बघ म्हणत असेल तर काय, मी नुसती लोळतेय सोफ्यावर...


मे १९९९

प्रिय ताई,

आता इथे जॉब मिळालाय मला. तो छान चाललाय. मला खूप आवडतंय इथे. ऑफिसमध्ये माझी एका अमेरिकन मुलीशी मैत्री झालीय. तिचं नाव मार्सी. तिला आपल्या कल्चरमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी पण तिला अमेरिकेबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल बरंच काही विचारत असते. तिने मला v आणि w च्या उच्चारातला फरक सांगितला. w म्हणताना ओठाचा चंबू करत असतात म्हणे! आपल्याला माहितीच नसतं ना – इतकं ग्रेट वाटलं मला समजल्यावर! आता मी what, who, whistle, window अशी प्रॅक्टिस करत असते. मला असं नवीन नवीन शिकायला खूप आवडतं. असे बारकावे समजले, की you start appreciating the language!


जून २०००

प्रिय ताई,

तुझ्याकडे ईमेल आलीय, हे किती छान. आता मी तुला अगदी frequently लिहू शकते ना! इथे आल्यापासून मला खूप जास्त शिस्त लागलीय, especially job मध्ये. म्हणजे टेक्नॉलॉजी तर मला तिकडे पण येत होती. पण प्रत्येक गोष्टीत खोलात जाऊन बघायचं, बारीकसारीक विचार करायचा हे माझं सुधारलं आहे – attention to details. साधं बोलताना पण माझ्यात खूप सुधारणा झाली आहे. मी आता खूप particular झालेय. उदा. मी पूर्वी today night म्हणायचे. आता tonight म्हणते. परवा मी एकाला सांगत होते, की मराठी मिडियमची आहे. तर त्याला खोटंच वाटलं!


जुलै २००२

प्रिय ताई,

आपल्याला भेटून वर्ष होऊन गेलं हे खरंच वाटत नाही. अजून दोन महिन्यांत आई-बाबा येतीलच इथे. माझी तब्येत एकदम मस्त. मी walk ला जाते, balanced diet घेते. सध्या पुस्तक वाचतेय What to Expect  When You Are Expecting. इतकं छान सगळं डिटेलमध्ये दिलं आहे! परवा मी बाळ-बाळंतीण रिलेटेड मराठी शब्द आठवून बघत होते...बाळंतविडा, पाचवी आणि काय काय गं? मला तर आठवतच नाही. तूच कळव ना.. आणि हो, तुझ्या येऊ घातलेल्या भाच्चीसाठी नावही सुचव :) :)


डिसेंबर २००४

प्रिय ताई,

आम्ही मजेत. गार्गी आता खूप बडबड करते. तिच्या नावातला ‘र’ ती अमेरिकन ॲक्सेंटमध्ये म्हणत असल्यामुळे आम्हांला ते खूप फनी वाटतं :) :) . आई, बाबा. दूध आणि पाणी असे चार शब्द सोडले तर बाकी सगळं इंग्लिशमध्येच बोलते. दिवसभर daycare ला असल्यामुळे इंग्लिशच तिची भाषा झाली आहे. काही मित्र-मैत्रिणी मला विचारतात, की तिची मदर टंग कोणती? मी म्हणते, “तिच्या मदरची टंग मराठी असली तरी तिची टंग इंग्लिशच आहे.” :D :D आता लवकरच भेटू! मग तू प्रत्यक्ष बघशील तिला!


सप्टेंबर २००८

प्रिय ताई,

गार्गी आता पहिलीत गेली. तिला शाळा खूप आवडते. इथे भाषा शिकवण्यावर खूप जास्त भर आहे. खूप वेळ देतात, मेहनत घेतात. गार्गी खूप वाचते. वयाच्या मानाने तिची vocab पण खूप जास्त आहे. तिला नवे नवे शब्द, त्यांचे बारकावे शिकायला खूप आवडतं आणि तिची teacher ते शिकवते सुद्धा. Looks like she is a language person – अगदी तिच्या मावशीसारखी!! :) :)


नोव्हेंबर २०१२

प्रिय ताई,

गार्गीला इंग्लिश भाषेचं आणि वाचनाचं किती वेड आहे, ते तुला माहितीच आहे. पण तिला भाषा शिकवतात सुद्धा इतकी छान! म्हणजे भाषेचं सौदर्य, त्यातली समृद्धी या सगळ्याची या वयातच ओळख करून देतात! तिची टीचर सांगते, की सगळीकडे good, nice, happy असं नाही म्हणायचं. वेगवेगळे शब्द वापरा. Use adventurous vocabulary. तिला happy, excited, full of joy, elated, blissful अशा सगळ्याच्या वेगवेगळ्या छटा आत्ताच माहिती झाल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्या छटेनुसार काय वापरायचं ते ती शिकतेय आणि तिला मनापासून आनंद होतोय. ते शब्द, त्या छटा ह्या सगळ्यात तिच्या विचारात पण किती clarity आली आहे! तिला शब्दांचा नाद, वैविध्य असं सगळं जाणवू लागलं आहे. She is in love with the language. She is just like you ताई! मला वाटतं, आता कुठे मला तू समजू लागली आहेस. तुझी ती मराठीवरून होणारी चिडचिड मला उमजू लागली आहे. आता तू काय म्हणतेस, ते मला मोकळेपणाने बघता येतंय. फोन करेनच. बोलू सविस्तर. पण म्हटलं, तुझं बरोबर आहे असं वाटलं तर लगेच सांगून टाकावं :) :) बोलूच!

 


बुधवार, २ डिसेंबर, २०२०

अनोळखी लोकांशी बोलताना - माल्कम ग्लॅडवेल यांचं नवं पुस्तक

माल्कम ग्लॅडवेल हे नावाजलेले लेखक आहेत. वेगवेगळ्या घटना, प्रयोग आणि संशोधनांचा आढावा घेऊन, त्यात काही सामायिक सूत्र शोधून त्याआधारे काही नवीन विचार, विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. गेल्या सुमारे पंधरा वर्षांमध्ये मी त्यांची The Tipping Point, Blink, Outliers आणि David and Goliath अशी चार पुस्तकं वाचली होती. नुकतंच त्यांचं नवीन आलेलं Talking to Strangers – What We Should Know about the People We Don’t Know हे पुस्तक वाचलं. रोचक पद्धतीने एकेक घटना किंवा प्रयोग खुलवत नेणं आणि त्यातून विषयाचा एकेक पैलू उलगडत नेणं, ही खास ग्लॅडवेल शैली इथेही दिसते.

सर्वसाधारणपणे आपल्याला असं वाटतं, की एखाद्याला प्रत्यक्ष बघून, भेटून आपल्याला त्या माणसाचा बऱ्यापैकी अंदाज येतो. समोरच्या अनोळखी माणसाचा चेहरा, डोळे बघून, त्याच्याशी बोलून तो माणूस कसा आहे त्याची साधारण कल्पना आपल्याला येते, असं आपण समजतो. म्हणून तर प्रत्यक्ष मुलाखत घेऊन आपण कोणाला नोकरी द्यायची किंवा कोणाला कामाला ठेवायचं, ते ठरवतो. आपल्याकडे तर वर्षानुवर्षं असं एक-दोन भेटीत लोक लग्नही ठरवत/करत आले आहेत. आपलं हे गृहितक कसं चुकीचं आहे आणि अनोळखी माणूस समजून घेणं किती गुंतागुंतीचं आणि अवघड काम आहे, ह्याबद्दल ग्लॅडवेल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे.

ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलेन (आणि इतर अधिकारी) हिटलरला प्रत्यक्ष भेटूनही त्यांना त्याच्या मनसुब्याचा अजिबात अंदाज आला नाही. त्याउलट, जे नेते हिटलरला कधीच भेटले नव्हते, त्यांना मात्र त्याच्या हेतूबद्दल (रास्त) शंका होत्या. दुसरं उदाहरण म्हणजे अमेरिकी गुप्तचर खात्यातले (CIA) काही हेर प्रत्यक्षात क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोसाठी काम करत होते आणि त्याचा अमेरिकन अधिकाऱ्यांना अनेक वर्षं थांगपत्ता लागला नाही. अशी बरीच उदाहरणं ग्लॅडवेल देतात. आरोपीशी बोलून, त्याच्याकडे बघून ‘जामीन द्यायचा की नाही’ हा निर्णय घेणाऱ्या न्यायाधीशांपेक्षा आरोपीला न बघणारा संगणकाचा प्रोग्राम कुणाला जामीन द्यायला हरकत नाही, हा निर्णय जास्त चांगल्या प्रकारे घेतो; हे सिद्ध झालेलं आहे. ग्लॅडवेल आपल्यासमोर मुख्यत: दोन प्रश्न उभे करतात. पहिला म्हणजे, ‘समोरचा माणूस आपल्या तोंडावर साफ खोटं बोलतो आहे, हे आपल्याला कसं कळत नाही?’ आणि दुसरा प्रश्न असा, की ‘काही वेळेला एखाद्या माणसाला न भेटलेल्या लोकांना भेटलेल्यांपेक्षा त्याचा चांगला आडाखा कसा काय बांधता येतो?’. वेगवेगळी उदाहरणं आणि संशोधनाच्या आधारे पुस्तकात ह्या प्रश्नांचा धांडोळा घेतलेला आहे.

आपसूक खरं वाटणे – एका प्रयोगात काही तरुणांची चाचणी परीक्षा घेतली. ह्या परीक्षेत मुद्दाम पर्यवेक्षक मध्येच बाहेर गेला आणि प्रयोगासाठी आधीच नेमलेल्या एका तरुणाने “आपण उत्तरं बघू” असं इतरांना सुचवलं. काहींनी बघितली, काहींनी नाही. परीक्षेनंतर “तुम्ही कॉपी केली का” अशा मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचं चित्रण केलं. मुलाखतीत काही लोक खरं बोलले आणि काही खोटं. ह्या चित्रफिती बघून किती लोकांना मुलाखतीतला तरुण खरं बोलतो का खोटं हे समजतं, त्याचा अभ्यास केला. फक्त ५४% वेळा लोकांना समोरचा खरं बोलतो का खोटं, ते ओळखू आलं. हे म्हणजे अनियत (random) तर्कापेक्षा थोडंसंच जास्त आहे. पण त्यात गंमत अशी आहे, की खरं बोलणारा माणूस “खरं बोलतो” हे लोकांना ५०% हून खूप जास्त वेळा समजतं. पण खोटं बोलणारा “खोटं बोलतो आहे” हे मात्र ३०% हूनही कमी वेळा ओळखायला येतं. ह्याचं मुख्य कारण म्हणजे समोरचा खरं बोलतो, असं आपल्याला आपसूकच वाटतं. जोपर्यंत शंका घेण्यासारखं काही वेगळं वाटत नाही, तोपर्यंत “माणूस खरंच बोलतो आहे” असं आपण धरून चालतो. शंका आल्यावरही आधी आपला संशयाचा फायदा देण्याकडे कल असतो. पुरेशा शंका आल्यावर, शंकांचा एक विशिष्ट टप्पा (threshold) पार केल्यावरच आपल्याला समोरचा खोटं बोलतो आहे, असं वाटतं. पोलिस, न्यायालय अशा खात्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही खोटं बोलणारा सहज ओळखता येत नाही. “आपसूक खरं वाटणे” ह्या मनुष्यस्वभावामुळे काही फसगती होतात, काही धोके निर्माण होतात. पण परस्परांवर विश्वास नसेल, प्रत्येक बाबतीत संशय येत असेल तर समाज चालूच शकणार नाही, माणूस काही घडवूच शकणार नाही. म्हणून आपला स्वभाव असा झालेला आहे.

पारदर्शकतेचा अभाव – आपल्याला जेव्हा एखादा माणूस माहिती नसतो, तेव्हा आपण त्याचे हावभाव, देहबोली आणि त्याच्या वागण्यावरून त्याच्याबद्दल आपलं मत बनवतो. आपण असं मानून चालतो, की माणसाच्या मनात जे आहे त्याचं प्रतिबिंब त्याच्या हावभावात दिसतं. थोडक्यात म्हणजे, माणसाचा चेहरा आणि देहबोली पारदर्शक आहेत, असं आपल्याला वाटतं आणि इथेच मोठी गफलत होते.

सर्जिओ हारिलो नावाच्या एका मानववंशशास्त्रज्ञाने वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला, की वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्याच हावभावांचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. उदा. आठ्या घातलेल्या माणसाचा फोटो बघून बहुतेक स्पॅनिश लोक त्याला “रागावलेला” म्हणाले. तर प्रशांत महासागरातल्या ट्रोब्रिअंड नावाच्या बेटावरच्या बऱ्याच लोकांना तो “घाबरलेला” वाटला. स्मितहास्य असलेला फोटो सर्व स्पॅनिश लोकांना आनंदी वाटला. ट्रोब्रिअंड बेटावर मात्र फक्त ५८% लोकांना तो आनंदी वाटला. एकाच संस्कृतीत सुद्धा आपल्याला एकमेकांचे जसे हावभाव अपेक्षित असतात, तसे प्रत्यक्षात बऱ्याचदा दिसत नाहीत. आतल्या भावना आणि बाहेरचे हावभाव जेव्हा जुळतात, तेव्हा तिथे पारदर्शकता असते असं लेखकाने म्हटलं आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी हे जुळत नाही, पारदर्शकतेचा अभाव असतो. त्यामुळे चेहरा बघून माणूस समजत नाही.

जोडी जुळणे – माणसाचं वागणं हे त्याची परिस्थिती, आजुबाजूचं वातावरण ह्यावर अवलंबून असतं. ते विचारात न घेता माणसाला सुटं बघता येत नाही. त्याच्या वागण्याची त्याच्या वातावरणाशी जोडी जुळलेली असते. ही जोडी बदलली म्हणजेच परिस्थिती/वातावरण बदललं, तर त्याचं वागणंही बदलतं. हे लक्षात न आल्यामुळेही दुसऱ्याला ओळखण्यात, समजून घेण्यात आपण चूक करतो.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये घराघरांत स्वयंपाकासाठी पाईपने जो गॅस येत असे, तो विषारी असायचा. त्या काळी आत्महत्या करणारे बरेच लोक (जवळ जवळ ४४%) हा गॅस वापरून आत्महत्या करत असत. साठच्या दशकापासून त्यांनी हळूहळू हा गॅस बदलून त्या जागी नैसर्गिक वायू (फारसा विषारी नसलेला) द्यायला सुरू केला. १९७६ सालापर्यंत सर्व ठिकाणी हा बदल करून झाला. ह्या काळात आत्महत्यांचं प्रमाण पण कमी कमी होत गेलं. कमी झालेली आकडेवारी ही गॅस वापरून आत्महत्या करणाऱ्या लोकांची होती. म्हणजेच ज्यांना आत्महत्या करायची होती, पण घरात विषारी गॅस उपलब्ध नव्हता; त्यांनी आत्महत्येसाठी दुसरा मार्ग शोधला नाही. कॅलिफोर्नियातल्या गोल्डन गेट पुलावरून उडी मारून खूप लोक आत्महत्या करतात. एका अभ्यासात असं दिसून आलं, की त्या पुलावरून उडी मारताना थांबवलेल्या ५१५ लोकांपैकी फक्त २५ लोकांनी (५% हूनही कमी) नंतर दुसऱ्या मार्गाने स्वत:चं आयुष्य संपवलं. आत्महत्येची सुद्धा कशाशी तरी सांगड घातलेली असते, जोडी जुळलेली असते. ती काढून घेतली, तर आत्महत्या टाळली जाऊ शकते. माणसाच्या वागण्याची संदर्भचौकट महत्त्वाची असते.  

थोडक्यात म्हणजे, अनोळखी माणूस समजून घेताना आपसूक खरं मानल्याने आणि पारदर्शकता नसल्याने चुका होतातच. शिवाय त्या माणसाबरोबर त्याची संदर्भचौकट बघावी लागते. त्याचं जग, त्याची संस्कृती समजावी लागते. नाहीतर मोठ्या गैरसमजुती होतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की आपल्याला निसर्गतःच, अन्त:प्रेरणेने बरंच काही समजतं. पण खरं तर प्रत्यक्ष जग खूप गुंतागुंतीचं, क्लिष्ट आणि अवघड असतं. चित्रदर्शी वर्णनं, एकमेकांत गुंफलेल्या रंजक कथा आणि त्यांचं विश्लेषण करत करत ग्लॅडवेल आपल्याला त्यांचे हे सिद्धांत आणि निष्कर्ष सांगतात. पण ह्या पुस्तकात खूप काही नवीन शिकल्यासारखं वाटत नाही. पुस्तक चांगलं आहे. पण त्यांच्या खूप चांगल्या, प्रभावी पुस्तकांमध्ये हे मोडत नाही, असं वाटलं. 


सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

कथा - पाहुणे

उषाताई नेहमीप्रमाणे गजर वाजायच्या आधीच जाग्या झाल्या. ह्या वयात झोपेचं जरा अवघडच झालं होतं. दोन वाजता जाग येते, पुन्हा चार वाजता येते आणि शेवटी साडे पाचला जाग आल्यावर त्या सहाच्या गजरासाठी न थांबताच उठतात. एकटीला घर खायला उठतं. अगदी जिवावर येतं एकटीसाठी चहा करून प्यायला. पण नेमकी आता मेली झोप लागत नाही. वीणा तान्ही होती आणि पहाटेच उठून दुधासाठी रडायची, तेव्हा मात्र पापणी अगदी उचलायची नाही.

चहा पिऊन झाडांना पाणी घालून त्या रोज फिरायला जातात. घरातून बाहेर पडत राहावं लागतं, चालत राहावं लागतं. आपणच आपल्याला गुंतवून ठेवावं लागतं. चहा पिऊन त्या बाल्कनीत आल्या. वठलेली कृष्णतुळस बघून त्यांना आज पुन्हा हळहळ वाटली. तिथे नजर गेली, की पुन्हा त्यांच्या मनात तिचा निकोप गंध दरवळू लागे. पानं, मंजिऱ्या निस्तेज पांढरट पडून गळून गेल्या होत्या. पण आता तिच्या आजुबाजूला इवली इवली चार-सहा जिज्ञासू रोपं उगवून आलेली दिसत होती. उषाताईंनी हलक्या हाताने त्यांना हळुवार पाणी पाजलं आणि क्षणभर त्यांना अगदी धन्य वाटलं. त्यांच्या जिवणीची हसल्यासारखी हालचाल झाली आणि त्यांच्या ओघळू लागलेल्या सावळ्या गालाला खळी पडली.  

आज काही त्या फिरायला जाणार नव्हत्या. उद्या अमेरिकेहून नातवंडं येणार म्हणून त्यांना बरीच कामं करायची होती आणि थकवाही यायला नको होता. कालच दुकानदाराने किराणा आणून दिला होता. आज त्या थोडी तयारी करून ठेवणार होत्या. पुरण करायचं होतं, मोदकाचं सारण करायचं होतं. अशी सगळी तयारी करून त्या फ्रिजमध्ये पदार्थ ठेवून देणार होत्या. मुलं दहा दिवस इथे राहणार होती. नंतर आठ दिवस तिकडच्या आजी-आजोबांकडे आणि मग परत जाणार होती. मुलांसाठी आणि मुलांबरोबर काय काय करायचं, त्याची सारखी आखणी, उजळणी त्या मनाशी करत होत्या. त्याचे अजुनाजून तपशील ठरवत होत्या. नाश्त्याला त्यांना गोड घावन द्यायचं आणि म्हणायचं, “हा इथला पॅनकेक.” वीणाची पेटी त्यांना द्यायची आणि म्हणायचं, “हा तुमच्या आईचा हार्मोनियम. पियानोसारखा दोन हातांनी नाही, एकाच हाताने वाजवायचा बरं का! दुसरा हात मागे भात्याला.” रोज भारतीय पदार्थ खाऊन कंटाळतील म्हणून मध्येच एक दिवस पास्ता करायचा.

एका माणसाचा स्वयंपाक तो किती असणार! उषाताईंनी स्वत:साठी थालीपीठ लावलं आणि मोदकाचं सारण करायला घेतलं. दुसरीकडे पुरणाची डाळ लावली शिजायला. तेवढ्यात कामाला सविता आली. तिच्याकडून सगळं घर चकचकीत करून घेतलं त्यांनी आणि बजावलं, “आता दहा दिवस अजिबात दांडी मारू नकोस हं!” तिलाही एक थालीपीठ दिलं खायला. सविताने विचारलं, “आता किती वर्षाची झाली ओ मुलं?”

“मोठा बारा वर्षाचाय, धाकटा होईल आता दहाचा.”

“थोरला वीणाताईंसारखा दिसतो ना?”

“थोडासा दिसतो, रंग तिचा घेतलाय त्याने. दोघांमध्येही थोडाफार भास आहे तिचा”, असं म्हणता म्हणता भरून आलं त्यांना. स्वत:ला सावरत त्या म्हणाल्या, “वीणा अगदी तिच्या वडिलांसारखी दिसायची. सगळे मला म्हणायचे, की पितृमुखी मुलगी भाग्यवान असते. कसलं भाग्य आलं वाट्याला? भरल्या ताटावरून उठून निघून गेली बघ.” आता मात्र कंठ दाटून आला त्यांचा आणि डोळे भरून आले.

“शांत व्हा आजी. आता मुलांसमोर खंबीर ऱ्हायचं ना तुमाला?”

पावसाची अचानक मोठी सर येऊन लगेचच थांबावी तशा उषाताई शांत झाल्या. सविताही पुढच्या कामांना निघून गेली. वीणा म्हणजे नुसता चैतन्याचा झरा होती. कधी लाजणं माहीत नाही, कशाचा संकोच नाही. लहानपणापासून पुढे होऊन सगळ्यात भाग घेणारी. कशात कधी मागे राहणं माहीत नव्हतं. आणि इथेही अशी पुढे निघून गेली, रांग मोडून पुढे गेली! वडिलांची लाडकी होती खूप. घाईघाईने गेली त्यांना भेटायला. दीड वर्ष होऊन गेलं तरी उषाताईंना खरं वाटत नव्हतं. काही जखमा कधीच भरून येणार नसतात.

वीणाच्या आजारपणात उषाताई तिच्याकडे जाऊन राहिल्या होत्या. तिला ‘बरी होशील’, असं सांगत होत्या. पण तिसऱ्या टप्प्यावरचा कॅन्सर बरा होण्याची शक्यता फारशी नसल्याचं तिलाही माहीत असावं बहुतेक. उसनं अवसान आणून त्यांनी तिचं आणि नातवंडांचं खूप केलं आणि त्यांच्याइतकंच देवेननेही केलं. बायको-मुलांसाठी दिवसरात्र तो झटला होता.  नंतरही त्या दोन महिने तिथेच होत्या. देवेन आणि मुलांची घडी बसवत होत्या, धीराने उभ्या होत्या. मुलं त्यांना आणि देवेनला बिलगली होती. पण कुणी कितीही केलं, तरी आईची सर येते का; असं उषाताईंना राहून राहून वाटे. त्यांचा पाय निघत नव्हताच. पण त्या देशात त्यांना अजून राहताही येणार नव्हतं.

इकडे परत आल्या आणि मग मात्र त्यांचा धीर सुटला. ह्या रिकाम्या घरात कितीतरी वेळा त्या ओक्साबोक्शी रडल्या. अमेरिकेला जायच्या आधी पण त्या इथे एकट्याच राहात होत्या. पण तेव्हा हे घर जिवंत वाटायचं. आता सगळं भकास झालं, सगळी रयाच निघून गेली. वीणाच्या जन्मापासून त्यांच्या आयुष्यात खरोखरीच वीणा झंकारत होती. इतका उत्साह, इतका आनंद, इतकं समाधान त्यांनी कधी अनुभवलं नव्हतं आणि आता अचानक आयुष्यातलं संगीतच हरवलं. उषाताईंच्या डोक्यातली विचाराची घरघर कधी थांबायचीच नाही. एकच एक मूल असू नये म्हणतात, तेच बरोबर होतं का? चुकलंच होतं का आपलं? पण वीणाला खूप अभिमान होता आपले आई-वडील ‘त्या’ काळी एका मुलीवर थांबले म्हणून! आणि झालं जरी असतं तिच्या पाठीवर दुसरं मूल, तरी त्याने दु:ख कमी होणार होतं का? भळभळ थांबणार होती का? करवतीच्या दातांसारखे हे प्रश्न त्यांना चिरत राहायचे.

देवेनने त्याचा शब्द पाळला होता. वीणा जशी दर आठवड्याला व्हिडिओ कॉल करायची, तसाच तो उषाताईंची नातवंडांशी भेट घडवून आणायचा. उषाताईंकडे बोलण्यासारखं काय असणार? त्या आपल्या ‘पाऊस संपला’, ‘थंडी पडली’ असं काहीतरी सांगायच्या. मुलांचं ऐकण्यातच आनंद असायचा. मुलं काही ना काही सांगत राहायची. काढलेली चित्रं दाखव, कधी काही जादू करून दाखव, शाळेत कशी छान ग्रेड मिळाली ते सांग असं चालायचं. ह्या एका संवादासाठी आठवडा ढकलत राहायचा. सगळ्या पाकळ्या गळून गेल्या तरी कुठल्या ना कुठल्या धाग्याने जीवन तुम्हांला कसं बांधून ठेवतं!

आज दिवसभर बरीच कामं करून उषाताई जरा थकल्या होत्या. सोफ्यावर जरा वेळ शांत बसल्या तर तिथे बसल्या बसल्याच डोळा लागला. डोळे उघडले तेव्हा निळीसावळी संध्याकाळ पसरली होती. वातावरण जडशीळ झालं होतं. सगळं अंधुक अंधुक दिसत होतं. उठून त्यांनी चष्मा घातला आणि देवापुढे दिवा लावला. तुळशीपाशीही दिवा ठेवला. त्या मंद केशरी प्रकाशात तुळशीची बाळं अगदी रेखीव, नितळ दिसत होती. त्यांना नुसतं बघूनच उषाताईंचे डोळे निवले आणि मनातल्या मनात त्या “इडा-पीडा टळो” असं म्हणाल्या. आजुबाजूच्या एकेका घरात हळूहळू दिवे लागत होते. आता दोन घास पोटात ढकलायचे, आवराआवर करायची आणि लवकरच झोपायचं असं त्यांनी ठरवलं. पहाटेच त्यांची बछडी येणार होती!

अंथरुणावर पडल्या तेव्हा त्यांना झोप लागेना. नेहमीसारखा नागाचा मोठा फणा काढून चिंता समोर उभ्या राहिल्या. आजकाल हे रोजचं झालं होतं. मन पुन्हा पुन्हा म्हणायचं, की मुलांना आता इथेच ठेवून घ्यायचं. आईनंतर तितक्या तळमळीने फक्त आजीच करू शकते सगळं. ह्या वयातही जमेल. एकदा ठरवलं की हत्तीचं बळ येईल अंगात. शिवाय आपल्याकडे कामाला बायकाही मिळतात. त्यामुळे काही अवघड नाही. तिकडच्या एवढं मोठं घर नाही, तिकडे जास्त सुविधा असतात; हेही खरंच. पण आपल्याकडेही चांगलं शिक्षण मिळतं. लहान आहेत तोवर राहतील इथे, आजीच्या पंखाखाली. मग कॉलेजला जातील तिकडच्या देशात. मोठीही होतील तोवर. चाळिशीतला देवेन म्हणजे तसा तरुणच म्हणायचा. तो त्याच्या डोळ्यांनीच आयुष्याकडे बघणार. तीन-चार महिने झाले त्याला एक मैत्रीणही भेटली होती. फिलिपिनो होती कुणी. अजून लग्नाचं काही ठरलं नसलं, तरी वर्षभरात करतील, असं उषाताईंना वाटत होतं. तसं देवेनने त्यांच्यापासून काही लपवलं नव्हतं कधी. पण कोण कुठली वेगळ्या संस्कृतीची बाई येईल घरात आणि ही सोन्यासारखी मुलं अगदी बिचारी होऊन जातील! ह्याच एका चिंतेची कबुतरं रोज फिरून फिरून घिरट्या घालत होती. त्या अजून कुणाशी – मैत्रिणी-बहिणीशी - ह्यावर बोलल्या नव्हत्या. पण आता त्यांचं ठरलं, की देवेनशी बोलायचं. कसंही करून मुलांना आपल्याकडेच ठेवून घ्यायचं. “मुलं राहतील इकडे”, अशी स्वत:चीच समजूत घातली, की मग त्यांना झोप लागत असे. आजही हाच विचार पांघरून त्या झोपी जाणार होत्या.

थोडा वेळ गेला आणि उषाताईंना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत अडकल्यासारखं, गुदमरल्यासारखं वाटू लागलं. आतून काहीतरी आवळल्यासारखं झालं. त्या हेलपाटत उठून बसल्या. जीव अगदी घाबराघुबरा झाला. उशाशी ठेवलेलं पाणी कसंबसं प्यायल्या आणि एक उबळ आली. घशात तिखट तिखट जाणवलं, करपट ढेकरा आल्या आणि त्यांनी हुश्श म्हटलं. पित्तच होतं साधं. थालीपीठ सोसलं नसेल बहुतेक. पण त्या पाच मिनिटांच्या प्रसंगाने त्यांना हादरवून सोडलं, खऱ्या अर्थाने जागं केलं. उषाताईंच्या लक्षात आलं, की आपला काही भरवसा नाही. आज आहे, उद्या नाही. नश्वरता अशी आतून आतून जाणवत असते तर! अचानक एखाद्या मोठ्या लाटेने थडकावं आणि सगळं धुवून स्वच्छ करावं, तसं झालं. एकदा मुलं इथं राहू लागली, की त्यांच्या स्वत:च्याच घरात पाहुणी होतील ती. उषाताईंचं काही बरंवाईट झालं, तर देवेनच्या नव्या संसारात प्रवेश करणं किती अवघड होईल मुलांना! कल्पनेने सुद्धा पीळ पडतो पोटात. आधी तिकडची रोपं आणून इथे रुजवायची आणि नंतर पुन्हा इथून तिथे हलवायची? त्यांना स्वत:चा वेडा हट्ट सोडावा लागणार होता. आता ह्या वयात समंजस स्वीकार करण्याखेरीज दुसरं काय हातात होतं? हळवेपणाचे झरे तर पाझरणारच होते, मनाविरुद्ध वाहणारच होते. पण आता ते सगळं आत वळवायचं. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाला भिजवायचं नाही. “तुमच्या तुमच्याच घरी रहा, बाळांनो! आजीकडे चार दिवस पाहुण्यासारखे या, कोडकौतुक करून घ्या आणि पुन्हा आपल्या घरी जा”, उषाताई स्वत:शीच मोठ्यांदा म्हणाल्या आणि गाढ झोपी गेल्या. निरभ्र आकाशात अष्टमीचा अर्धा चंद्र शांत तेवत राहिला.

रात्रीची गडद मखमली दुलई बाजूला सारत पहाट वर येऊ लागली होती. वातावरणात लालसर मोहिनी जाणवू लागली होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि हलका वारा. उषाताईंची लगबग सुरू होती. कधीही दार वाजेल म्हणून त्या तयारीतच होत्या आणि तसं ते वाजलंही. दार उघडलं तेव्हा समोर देवेनबरोबर दोन्ही हसतमुख गोंडस पिल्लं उभी होती. आपापलं सामान सांभाळणारी. कॉलवरती दिसतात त्यापेक्षा कितीतरी उंच आणि मोठी वाटणारी. थोरल्याचा वीणासारखाच झळाळता गोरा रंग, तशीच जिवणी, तेच हास्य. धाकट्याच्या सावळ्या लाघवी चेहऱ्यावर उठून दिसणारे वीणाचे काळेभोर बोलके डोळे. उषाताईंनी दोघांकडे डोळे भरून पाहिलं आणि झटकन त्यांना कुशीत घेतलं. त्यांच्या घशात मोठा आवंढा आला, नाकाचा शेंडा लाल झाला आणि नकळत डोळे भरून वाहू लागले. त्यांच्या घराचा कण न् कण जिवंत झाला, भारला गेला, आतून आतून उमलून आला. त्यांच्या अवघ्या घराचं फुलांनी मोहरलेलं चाफ्याचं झाड झालं.

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

वेदांची तोंडओळख

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने गेल्या महिन्यात “वेदांची तोंडओळख” असा तीन आठवड्यांचा (१८ दिवस) प्रशिक्षण वर्ग ठेवला होता. घरबसल्या नेटवरून शिकायचं असल्यामुळे मला त्यात सहभागी होता आलं, हे खूपच चांगलं झालं. वेदांबद्दल त्यांच्या नावाखेरीज काहीच माहिती नसल्यामुळे “हे आहे तरी काय” अशा उत्सुकतेपोटी मला ह्या वर्गाला जाण्याची इच्छा होती. त्यातून काहीतरी दिव्य ज्ञान मिळणार आहे, असा संस्कृती-अभिमान अजिबात नव्हता आणि धार्मिक दृष्टिकोन तर त्याहूनही नव्हता. भारतीय संस्कृती आणि इतिहासाबाबत थोडी उत्सुकता, जिज्ञासा असाच उद्देश होता आणि तो सफल झाला. :) :) 

वेदांचा अभ्यास करणे, समजून घेणे असा काहींचा दृष्टिकोन असतो. तर “गुण गाईन आवडी” म्हणत वेदांचा प्रचार-प्रसार करणे, असा एक वेगळा हेतू असू शकतो. वेदांकडे चिकित्सक दृष्टीने आणि “अभ्यासाचा विषय” म्हणून बघणारे डॉ. थिटे (ते पूर्वी पुणे विद्यापीठात संस्कृत आणि प्राकृतचे विभागप्रमुख होते) आणि डॉ. बहुलकर ह्यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकांचीही काही व्याख्याने ऐकायला मिळाली. एकूण अठरा दिवसांमध्ये काय काय समजलं, त्याचं सार सांगणं जरा लांबलचक आणि अवघडच होईल. म्हणून मला ज्या विशेष वाटल्या, रोचक वाटल्या, त्या गोष्टी अशा :

१. विद् म्हणजे ज्ञान. ह्या धातूपासून वेद हा शब्द आला आहे. संहिता (सूक्तांचा संग्रह) आणि ब्राह्मणे (सूक्तांचं गद्य स्पष्टीकरण) मिळून वेद होतात. ह्या ब्राह्मणांमध्येच आरण्यके आणि उपनिषदे येतात. वेद हे अपौरुषेय आहेत, अशी समजूत होती. म्हणजे ते मनुष्यनिर्मित नाहीत. कधी ते ब्रह्माकडून आले आहेत, असं मानलं जातं. तर कधी ते अनादि-अनंत मानले जातात.  पण खरं तर वसिष्ठ, विश्वामित्र, वामदेव अशा वेगवेगळ्या ऋषींची (किंवा त्या घराण्यांची) सूक्तं ऋग्वेदाच्या मंडलांमध्ये आहेत.
२. महाभारताला ‘इतिहास’ संबोधलं गेलेलं आहे. त्याला पाचवा वेदही म्हणतात आणि गीतेला उपनिषद. एका विशिष्ट अधिकाराचं साहित्य हे वेदाच्या योग्यतेला पोहोचतं. त्यामुळे नवनवे वेद येऊ शकतात आणि म्हणून वेद अनंत आहेत, असं मानलं जातं.
३. ऋग्वेद हा साधारण आताच्या पंजाबच्या भागात, सिंधू आणि आता लुप्त झालेली सरस्वती ह्या नद्यांच्या मधल्या भागात रचला गेला आहे. वेदांमध्ये बियासचं नाव “विपाश्” असं आहे तर सतलज नदीचं नाव “शुतुद्री”.
४. ऋग्वेदाच्या काळाबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहेच. शिवाय त्याबद्दल एकवाक्यता होणं हे जवळ जवळ अशक्य आहे. इ. स. पूर्व १००० पासून ते इ. स. पूर्व ४५०० वर्षे अशी वेगवेगळी मतं अभ्यासकांनी दिलेली आहेत. ह्या वर्गामध्ये त्यांनी इ. स. पूर्व २५००-२००० असा काळ धरलेला होता. 
५. वेद हे बऱ्याच काळात (शतकांमध्ये) रचले गेले आहेत. ते एका काळातले नाहीत, एका स्थानातले नाहीत आणि एका माणसाचे/कुळाचेही नाहीत. ऋग्वेदात गंगेचा उल्लेख नाही. नंतरच्या काळात अजून पूर्वेला सरकल्यावर गंगा-यमुना येतात. ऋग्वेदात भात आणि वाघाचाही उल्लेख नाही. सातूचा (बार्ली) उल्लेख आहे. नंतरच्या वेदांमध्ये मात्र तांदळाचा उल्लेख येतो. शेती अगदी कमी आहे. पशुपालन हाच मुख्य व्यवसाय आहे. सर्व मोठ्या व्यवहारांसाठी मुख्यत: बैल किंवा सोनं देण्याबाबत सांगितलं आहे. गुरांसाठी लढायाही होत असत.
६. कोणत्याही धार्मिक साहित्याप्रमाणे वेदांमध्येसुद्धा तीन प्रकारच्या गोष्टी आहेत – दंतकथा किंवा दैवतकथा (mythology), कर्मकांड आणि नीतिशास्त्र. ह्या सर्वच गोष्टी त्या काळाला अनुसरून आहेत. तीन प्रकारचा विचार ह्यात आढळतो – काही शास्त्रीय गोष्टी (कार्यकारणभाव असलेल्या), काही जादुई गोष्टी (कार्यकारणभाव नसलेल्या – उदा. एखाद्या पक्ष्याला बघितल्यामुळे अमुक एक घडतं) आणि काही देवाला सर्वोच्च मानून केलेला विचार.
७. ऋग्वेद ही मनुष्याच्या ज्ञानाची उपलब्ध असलेली सगळ्यात जुनी ग्रंथसंपदा आहे. “त्या काळासाठी” त्यातलं ज्ञान, विचार, भाषा ही खूपच पुढारलेली होती. उदा. वैदिक काळात गणिताचं, खगोलशास्त्राचं काही मूलभूत ज्ञान त्यांना झालं होतं. चांद्रमास आणि सूर्यमासातला फरक आणि आकडेमोड माहीत होती. अधिकमासाची संकल्पना होती. यज्ञाची व्यवस्था करताना विटा रचत असत. विटा कशा बनवायच्या, भाजायच्या असं तंत्र त्यांना अवगत होतं. रथ तयार करता येत होते. रथांच्या शर्यतींचा उल्लेख आहे. त्या काळातल्या जगासाठी ते नक्कीच पुढारलेलं होतं. मात्र सध्याच्या काळातल्या ज्ञानाशी त्याची तुलना करता येणार नाही. अशी तुलना अगदी व्यर्थ आहे.
८. वेद हे पूर्वी मौखिक परंपरेने जतन केले गेले आणि बरेच नंतर लिहिले गेले. त्या काळी लिखाणाचं साहित्य मिळवणं, लिहिणं आणि लिहिलेल्या गोष्टी नंतर जतन करणं हे सगळंच इतकं अवघड होतं, की पाठ करून जतन करणं हे त्यापेक्षा सोपं होतं. कदाचित लेखनकला वेदांच्या नंतर विकसित झाली असू शकेल. अजून एक गोष्ट म्हणजे लिखित साहित्याचा वापर कराव्या लागणाऱ्याला कमी दर्जाचा विद्वान समजलं जाई. फक्त वैदिकच नाही तर बौद्ध, जैन साहित्याचीही मौखिक परंपराच होती.
९. ऋग्वेदात जातीव्यवस्थेचा उल्लेख नाही. फक्त एका सूक्तात वर्णांचा उल्लेख आहे. पण ते सूक्त नंतरच्या काळातलं आहे. स्त्रियांना खूप महत्त्व नसलं, तरी हीन लेखलेलंही नाही. सगळे यज्ञ नवरा-बायकोने मिळून एकत्रपणेच करायचे आहेत. बायको नसेल तर नवऱ्याला एकट्याला यज्ञ करता येत नाही.
१०. ऋग्वेदात सगळ्यात जास्त महत्त्व अग्नीला आहे, मग इंद्राला आणि मग इतर. त्या काळी अन्न शिजवायला, प्रकाश आणि उष्णता मिळवायला अग्नी इतका महत्त्वाचा होता, की सगळ्यात जास्त महत्त्व त्याचंच असणं स्वाभाविक होतं. इंद्र हा त्यांचा सेनापती होता, रक्षणकर्ता होता. म्हणून त्यालाही खूप महत्त्वाचं स्थान होतं. विष्णू, रुद्र ह्यांना त्यामानाने फारसं महत्त्व नव्हतं. संस्कृती कशी बदलत जाते, ते बघणं मनोरंजक आहे. आज हजारो वर्षांनंतर इंद्राची किंवा अग्नीची मंदिरं कुठे दिसत नाहीत. पण शिव आणि विष्णूची मात्र असंख्य मंदिरं आहेत!
११. वैदिक संस्कृत ही अभिजात संस्कृतपेक्षा (म्हणजे कालिदासाची आणि आपल्याला परिचित असलेली) थोडी वेगळी आणि जास्त समृद्ध आहे. साधारण दहा टक्के फरक आहे, असं म्हणता येईल. आताच्या संस्कृतमध्ये नसलेली “ळ” आणि “ळ्ह” अशी अक्षरं त्यात आहेत! साधारण २००० वर्षांपूर्वी पहिल्यांदा “संस्कृत” असा उल्लेख येतो. त्याआधीच्या भाषेला सगळीकडे फक्त “भाषा” असं म्हटलेलं आहे. पाणिनीने सुद्धा “भाषा” असंच म्हटलं आहे.
१२. यज्ञासाठी सगळीकडे ‘सोम’ वनस्पती आणि सोमरसाचं खूप महत्त्व विशद केलेलं आहे. ही वनस्पती नक्की कोणती, ते आता सांगता येत नाही. इराणी लोकांमध्ये सुद्धा ह्या वनस्पतीचं महत्त्व आहे. तिथे तिला “सोम” ऐवजी “होम” म्हटलं आहे. पण सोमरस म्हणजे मद्य नाही. मद्याला “मद्य” किंवा “सुरा” म्हटलेलं आहे.
१३. वेदांमधल्या दैवतकथा (mythology) ह्या प्रवाही, बदलणाऱ्या आहेत. इंद्र हा आधी नेता होता, त्याच्या शौर्यकथा आहेत. मग कालांतराने त्याचं दैवत झालं आणि आता तर काही विशेष महत्त्वही उरलं नाही. एकूणच ह्या प्रवाही संस्कृतीने यज्ञाकडून मूर्तिपूजेकडे आणि प्राण्यांच्या आहुतीपासून शाकाहाराकडे प्रवास केलेला आहे.
१४. ऋग्वेदातील सूक्तांमध्ये संवादसूक्त आहेत. ह्या संवादांचा बऱ्याचदा संदर्भ लागत नाही आणि नंतरच्या काळातल्या साहित्यावरून त्याचा अर्थ लावला जातो. उदा. विश्वामित्र-नदी संवादसूक्तात बियास आणि सतलजच्या (विपाश् आणि शुतुद्री) संगमाच्या ठिकाणी पूर आला आहे आणि विश्वामित्राचा नदीशी संवाद होतो आहे. त्याच्याबरोबर “भारत” लोक आहेत. नंतरच्या काळातील साहित्यावरून हा दाशराज्ञ युद्धाच्या वेळचा संवाद असल्याचं लक्षात येतं. (हे महाभारताच्या बऱ्याच आधी झालेलं मोठं युद्ध आहे). नंतरच्या काळातल्या प्रसिद्ध संस्कृत नाट्यपरंपरेची बीजं अशा संवाद सूक्तांमध्ये दिसतात.
१५. ऋग्वेदातलं ‘नासदीय सूक्त’ हे खूप महत्त्वाचं आणि सुंदर आहे. विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घ्यायचा प्रयत्न त्यात केलेला आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे विश्वनिर्मितीचं श्रेय इथे परमेश्वराला दिलेलं नाही, तर देवसुद्धा विश्वनिर्मितीनंतरच आल्याचं म्हटलं आहे! त्यात वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला आहे. सुरुवातीला काय होतं? असत् होतं की सत् होतं? की अवकाश होता? की खोल पाणी होतं? आणि मग असं म्हटलंय, की ह्याबद्दल खात्रीपूर्वक काही सांगता येणार नाही. देवही नंतर आले. त्यामुळे परमेश्वरालाही हे माहीत असेल की नाही, ते सांगता येणार नाही! ह्यातून खरं तर अज्ञेयवाद (agnosticism) डोकावतो. हे सूक्त ही ह्या प्रशिक्षण वर्गातली मला सगळ्यात जास्त आवडलेली, भावलेली गोष्ट आहे. 
१६. यजुर्वेद मुख्यत: यज्ञ, आहुती आणि कर्मकांडांशी संबंधित आहे. कुणी यज्ञ करायचा, कोणत्या दिवशी (उदा. पौर्णिमा), कोणतं नक्षत्र असताना, कुठल्या दिशेला, रचना काय, मंत्र कोणते, आहुती कशाची असे भारंभार तपशील दिलेले आहेत. लोणी, तूप अशा गोष्टी तर अग्नीत टाकायचेच. शिवाय बकरीसारख्या प्राण्यांची आहुतीही दिली जायची. अश्वमेध यज्ञात घोड्याची आहुती दिली जायची. पुरुषमेध यज्ञात माणसाची आहुती द्यायचे की ती प्रतीकात्मक आहुती असायची, ह्यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. कालांतराने हिंसा कमी होऊन पिष्टपशूंची (पिठाचे प्राणी) आहुती द्यायला सुरुवात झाली. आजकाल जे काही लोक यज्ञ करतात (हे प्रमाणही कमीच आहे), त्यात जवळजवळ सगळीकडे पिष्टपशूच असतात. 
१७. सामवेद हा मुख्यत: भारतीय संगीताचा पाया म्हणून ओळखला जातो. साम म्हणजे गायले जाणारे मंत्र किंवा ऋचा. ह्यातले बहुतेक मंत्र हे ऋग्वेदातलेच आहेत. एकच मंत्र वेगवेगळ्या चालीत गाता येतो. गंधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद मानला जातो. सामवेदातल्या छांदोग्य उपनिषदात ओंकाराचा उल्लेख पहिल्यांदा आला आहे. ऋग्वेदात तीन ‘उच्चार’ (accents) आहेत. मात्र सामवेदात पहिल्यांदा सात स्वर येतात. त्यांची आज असलेलीच गांधार, पंचम, धैवत अशी सगळी नावं आहेत. आजच्या संगीतापेक्षा त्याचा आविष्कार बराच वेगळा असला तरी काही तत्वं सारखी आहेत. रागांच्या जशा काही वेळा असतात, तसं सामगान कधी गायचं त्या वेळांचाही उल्लेख आहे. सामवेदात बासरीचा उल्लेख आहे. ‘गात्रवीणा’ म्हणून बोटांच्या पेरावर स्वर दाखवायची पद्धत होती.
१८. अथर्ववेदातून त्या काळातल्या दैनंदिन जीवनाची, त्यातल्या वेगवेगळ्या अंगांची माहिती मिळते. काही शुभ आणि माहितीपूर्ण गोष्टी आहेत; तशाच जादूटोणा, चेटूक अशा गोष्टीही खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. इतर कुठल्याही वेदापेक्षा अथर्व वेदात चेटूकविद्येवर जास्त भर आहे. गोत्र, ग्राम, जन, राष्ट्र असे (प्रशासकीय) विभाग केलेले दिसून येतात. शेती, पशुपालन आणि द्यूत (जुगार) ह्यांचा उपजीविकेची साधनं म्हणून उल्लेख आहे. चांगला पाऊस पडू देत म्हणून ढगाला म्हटलेले मंत्र आहेत, पिकावर टोळ येऊ नयेत म्हणून मंत्र आहेत. तसंच द्युतात जिंकावं म्हणून करायची कर्मकांडं आहेत. उदा. द्यूताचे फासे दही आणि मधात ठेवणे! चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मंत्र आहेत. तसंच कुटुंबातल्या सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं, राग जावा, इतर टोळ्यांशी युद्ध होऊ नये अशा सगळ्यासाठी मंत्र आहेत. आवडलेली स्त्री (किंवा पुरुष) वश व्हावी म्हणून, सवतीचं वाईट व्हावं म्हणून, बाळंतपण नीट व्हावं म्हणून, मूल जगावं म्हणून, मुलगा व्हावा म्हणून अशा शेकडो गोष्टींसाठी मंत्र आणि कर्मकांडं दिली आहेत. त्या काळच्या बऱ्याच सामाजिक, राजकीय आणि तात्त्विक गोष्टी ह्या वेदातून लक्षात येतात. मुलीच्या लग्नापूर्वी वडिलांची सत्ता आणि नंतर नवऱ्याची अशी संकल्पना स्पष्ट आहे. म्हणूनच लग्नात कन्यादान आहे. आजही प्रचलित असलेले कन्यादान, लाजा यज्ञ, सप्तपदी हे सगळे विधी अथर्ववेदात येतात.
१९. आयुर्वेदाची बीजं अथर्ववेदात आहेत. शरीराच्या आतल्या बऱ्याच अवयवांची माहिती त्यांना होती. कोणत्या रोगांवर कोणत्या वनस्पती वापरायच्या ह्याचा विचार केलेला आहे. वनस्पतींचं वर्गीकरणही केलेलं आहे. अर्थातच इथेही मंत्र, कर्मकांडं आहेतच. उदा. कुठले मणी बांधून कुठला रोग बरा होतो, ह्यासारखे उपचार बरेच आहेत.

वेदांचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या संस्था, विद्यापीठं आहेत. त्यांच्या अभ्यासात जिज्ञासा, कुतूहल,   इतिहास आणि संस्कृती समजून घेण्याची इच्छा आणि तळमळ दिसते. त्याबद्दल मला आदरच आहे. मात्र आजही बऱ्याच ठिकाणी वेदपाठशाळा आहेत. त्यात रोज नऊ-दहा तास अभ्यास करून १२-१३ वर्षं शिक्षण घेतल्यावर एक वेद शिकून होतो. हे शिक्षण पुराण काळातल्या मौखिक परंपरेनुसार चालतं. वेदात पारंगत झालेल्यांना ‘वेदमूर्ती’ अशी पदवी मिळते. लहान म्हणजे दहा-बारा वर्षांच्या मुलांना अशा वेदपाठशाळांमध्ये पाठवून त्यांना आधुनिक शिक्षणापासून वंचित ठेवणं मला तरी खूपच चुकीचं वाटलं. अभ्यासक लोकांना अभ्यास करायला मौखिक परंपरांची मदत झाली. उच्चार किंवा सामगान समजून घेता आले. पण ह्या काळात ती परंपरा सुरू ठेवण्यामागची भूमिका, कार्यकारणभाव मला अनाकलनीय आहे. ज्यांच्याकडे ह्या परंपरेचं ज्ञान आहे, त्यांच्या सगळ्यांच्या शेकडो चित्रफिती तयार करून ठेवता येतील. ऐतिहासिक ऐवज म्हणून जपता येईल. अभ्यास-संशोधनाला वापरता येईल. पण हजारो वर्षांपूर्वीची शिक्षणपद्धती तशीच सुरू ठेवणं मला तरी समजू शकलेलं नाही.

बऱ्याच लोकांना वेदांची माहिती घेताना “आपण” तेव्हा एवढा विचार केला होता, “आपल्याला” अमुकतमुक माहीत होतं, असा अभिमान वाटत असतो. मला अर्थातच असं काही वाटत नाही. ह्या देशात हजारो वर्षांत एवढा संकर झाला आहे, की स्वत:ला “आपण” म्हणून नासदीय सूक्तांसारख्या गोष्टींचा अभिमानही कुणी वाटून घेऊ नये किंवा प्राण्यांच्या आहुत्यांबद्दल अपराधी, क्षमायाचकही होऊ नये, असं वाटतं. समजा असा काही संकर झाला जरी नसता, तरी जन्म हा शेवटी जीवशास्त्रीय आणि भौगोलिक अपघात आहे. त्यामुळे हजारो वर्षांपूर्वीच्या ह्या देशात राहणाऱ्या माणसाने त्याच्या आजुबाजूच्या गोष्टींकडे कसं बघितलं, त्याचा काय अर्थ लावला आणि तो कसा जगला; ह्याच्या उत्सुकतेपलीकडे त्यात अभिमान किंवा अस्मिता मला तरी वाटत नाही.

ह्या प्रशिक्षणातून अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे प्राच्यविद्येबाबत एखादा लेख वाचणं किंवा एखादं पुस्तक वाचणं, कधी सहलीला गेल्यावर एखाद्या इतिहासकालीन ठिकाणाला भेट देऊन तिथलं सगळं उत्साह-कौतुकाने पाहणं इतपतच मला त्याची आवड आहे. त्याहून जास्त काही मला ह्या विषयात रस नाही. यजुर्वेदासारख्या कर्मकांडांनी भरलेल्या साहित्याची तर नावडच आहे. शिवाय इतरत्रही चेटूक, मंत्र, कर्मकांडे ह्यांचा डोंगर पोखरून नासदीय सूक्तासारखा देखणा उंदीर काढायची माझी वृत्ती नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे असा अभ्यास करून ह्या विषयाची तोंडओळख माझ्यासारख्या लोकांना करून देणाऱ्या सर्व तज्ज्ञांबद्दल मला चांगलाच आदर-कौतुक वाटून मी हा वर्ग संपवला.


रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

नवे मार्ग कसे सुचतात? कल्पकतेचा इतिहास

 

सुमारे दहा वर्षांपूर्वी स्टीव्हन जॉन्सन ह्यांचं “Where Good Ideas Come From: The Natural History of Innovation” असं पुस्तक आलं होतं. वाचायला खूप सोपं, मनोरंजक आणि कल्पकतेबद्दल नव्या संकल्पना शिकवणारं असं हे पुस्तक आहे. खरं तर हे पुस्तक मी पाच-सहा वर्षांपूर्वीच वाचलं होतं. आता त्यावर लिखाण करायचं म्हणून पुन्हा एकदा उघडलं. विलक्षण बुद्धिमत्तेच्या लोकांना अचानक दिवा पेटल्यासारखं काहीतरी जगावेगळं सुचतं आणि त्यातून नवकल्पना, नवमार्ग (innovations) जन्मतात, असा एक सामान्यत: समज असतो. ‘कल्पकता’ ही काहीतरी दिव्य, अद्भूत गोष्ट आहे, असं मानायला आपल्याला खूप आवडतं. परंतु कल्पकता ही एकमेकांच्या कल्पनांवर, संवादावर आणि आजुबाजूच्या पोषक वातावरणावर कशी अवलंबून असते, ते वेगवेगळ्या उदाहरणांमधून आणि अभ्यासातून लेखकाने स्पष्ट केलं आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाने शहरं आणि इंटरनेटमध्ये कशा नवकल्पना, अभिकल्पना आकार घेतात ते स्पष्ट केलं आहे आणि मग कल्पकता कुठे कुठे आणि कशामुळे आकार घेते, वाढीस लागते त्या गोष्टी, त्याचे नमुने (patterns) ह्यांचा पुस्तकभर धांडोळा घेतला आहे. नावीन्याचा शोध घेताना निसर्ग आणि मानवी संस्कृती ह्या दोन्हीचा विचार केलेला आहे आणि सात प्रमुख मुद्दे सांगितले आहेत.

१.     लगतची शक्यता – १६११ साली जगातल्या चार वेगळ्या देशात राहणाऱ्या चार शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे सूर्यावरचे डाग शोधले. ऑक्सिजन वेगळा करणे, टेलिफोन, वाफेचे इंजिन अशा शेकडो गोष्टींना एकापेक्षा जास्त “स्वतंत्र” जनक आहेत. अशा १४८ शोधांचा अभ्यास करून १९२० साली “शोध अटळ आहेत का?” असा निबंधच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातल्या संशोधकांनी लिहिला होता. ह्याचं कारण असं, की नवे शोध कुठून आकाशातून पडत नाहीत. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, त्याचे घटक, काही पद्धती ह्या अस्तित्वात असतात आणि त्यामुळे त्यावर अवलंबून “त्याच्यालगतची” कल्पना, शोध सुचत असतो – लगतचा, शेजारचा, जवळचा. त्याच्या अलीकडचे शोध, कल्पना अस्तित्वात असल्या तरच त्या कल्पनेसाठी लागणारं वातावरण मिळतं. एक दार पुढच्या खोलीत उघडतं. तिथे गेल्यावर अजून पुढची दारं सापडतात. ती उघडून अजून पुढे जाता येतं. लेखकाने ह्याची वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. एकोणिसाव्या शतकात चार्ल्स बॅबेजने “ॲनॅलिटिकल इंजिन” अशी कल्पना मांडली होती. प्रोग्राम करता येणारा तो पहिला संगणक ठरला असता. अत्यंत विलक्षण अशी ही कल्पना प्रत्यक्षात यायला पुढची शंभर वर्षे जावी लागली. कारण ती त्या काळातल्या “लगतच्या शक्यतां”च्या खूपच पुढे होती. त्यासाठी लागणारं व्हॅक्युमट्यूबसारखं इलेक्ट्रॉनिक्स विकसित झाल्याखेरीज संगणक प्रत्यक्षात येणं शक्य झालं नाही.

२.     द्रवासारखं जाळं – रसायनशास्त्रात पदार्थाच्या तीन स्थिती दिलेल्या असतात – घन, द्रव, वायू. “वायू” अवस्थेत रेणू इतके दूर पसरलेले असतात, की प्रक्रिया होणं सोपं नसतं. घन अवस्थेत हालचालच होत नाही म्हणून प्रक्रिया होणं अवघड जातं. प्रक्रिया होऊन काही नवीन हाती लागण्यासाठी द्रवरूप ही सगळ्यात चांगली अवस्था आहे. रेणू सहज फिरू शकतात, एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतात; मात्र वायूइतकी अस्थिरता आणि अनागोंदी नसते. परिस्थिती जेव्हा द्रवासारखी असते, तशी संस्कृती आणि वातावरण असतं, तेव्हा नवनवे मार्ग सापडतात आणि शोध लागतात. मानवी मेंदूत सुद्धा मज्जापेशींच्या लवचिक जाळ्यामधून नव्या कल्पना सुचतात. कल्पक लोकांचा वेगवेगळ्या कल्पक लोकांशी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क येतो तेव्हा अभिकल्पना उदयाला येतात. एकाच्या कल्पनेवर आधारित दुसऱ्याला पुढची कल्पना सुचत असते किंवा दोन वेगवेगळ्या लोकांच्या संबंधांतून, संवादातून एखादी नवीच कल्पना जन्म घेते. म्हणून शहरांमध्ये नवीन कल्पना जास्त प्रमाणात जन्माला येतात. ज्या कंपन्यांमध्ये, देशांमध्ये मोकळेपणा असतो, निरनिराळ्या लोकांशी संपर्क आणि संवाद साधण्याची संस्कृती असते, तिथे बरेच नवे शोध लागतात. वेगवेगळ्या लोकांच्या अशा लवचिक जाळ्यामधून, एकमेकाला जोडलं गेल्यामुळे नव्या कल्पना उदयाला येतात. इटलीमध्ये बाजाराच्या छोट्या शहरांमधून लोकांचा कसा एकमेकांशी संपर्क वाढला आणि त्यातून कसं पुनरुत्थान झालं त्याचं उदाहरण लेखकाने दिलं आहे. एकट्या माणसाकडून काही विशेष घडण्याची शक्यता कमी असते. त्यापेक्षा विचारांच्या, कल्पनांच्या आदानप्रदानातून अभिनव काही निर्माण होत असतं.

३.     मनात कुठेतरी वाटणं आणि योगायोग – अगदी स्पष्ट अशी अंतर्दृष्टी अचानक मिळत नसते. मनात कुठेतरी काहीतरी वाटत असतं. बऱ्याचदा अस्पष्ट, अपूर्ण अशा काही कल्पना असतात. बराच काळ मनात राहिलेल्या अशा गोष्टी इतरांशी झालेल्या संपर्क-संवादामुळे नीट आकार घेऊ लागतात. आपल्या अपूर्ण कल्पनांचा दुसऱ्याच्या अपूर्ण कल्पनांशी कुठेतरी मेळ बसतो आणि त्यातून काहीतरी नवीन अर्थपूर्ण कल्पना साकार होते. एका अपूर्ण कल्पनेला, काहीतरी वाटण्याला दुसरं पूरक काही सापडणं हा योगायोगाचा भाग असतो. अर्थात, तुम्ही जितका लोकसंग्रह वाढवाल आणि जितकं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटाल, तितकी अशा योगायोगाची शक्यता वाढत जाते. लेखकाने डार्विनचं उदाहरण दिलं आहे. डार्विन ह्यांच्या वहीमधल्या १८३५ पासूनच्या नोंदी आणि निरीक्षणं पाहिली, तर उत्क्रांतीच्या सर्व संकल्पना त्यात होत्या. परंतु १८३८ मध्ये त्यांनी माल्थस ह्यांचा लोकसंख्येवरचा निबंध वाचला आणि मग त्यांना अचानक उत्क्रांतीच्या सिद्धांताची जाणीव झाली. तो निबंध वाचेपर्यंत उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांच्या लक्षातच आला नव्हता! त्यांच्या मनात जी जवळजवळ तयार झाली होती, ती कल्पना एका निबंधवाचनाने पूर्णत्वाला नेली, जणू तो कोड्यातला शेवटचा तुकडा होता.

बऱ्याचदा आपण असं ऐकतो-वाचतो, की स्वप्नात एखादा शोध लागलेला असतो किंवा कल्पना सुचलेली असते. पण हे विचार किंवा अपूर्ण कल्पना बरेच दिवस आपल्या मनात (कधी नेणिवेत) सुरू असतात आणि झोपेत अशा अपूर्ण कल्पना किंवा आठवणींची दुसऱ्या पूरक कल्पनेशी जोडणी होते. मज्जापेशींच्या लवचिक जाळ्यामधला हा छानसा योगायोग असतो. आपण आपल्या डोक्यातले असे योगायोग मुद्दाम जुळवून आणू शकतो का? लेखकाने म्हटलंय, ही ह्यासाठी फिरायला जाणे हा एक चांगला उपाय आहे. फिरताना किंवा अंघोळ करताना चांगल्या कल्पना सुचतात.

४.     त्रुटी (error) – नवीन शोध लागतो, तेव्हा अचानक काहीतरी अनपेक्षित सुचतं किंवा घडतं आणि माणूस टाळी वाजवून “आहा” म्हणतो, असं काहीसं बऱ्याचदा आपल्या डोळ्यांसमोर असतं. पण बऱ्याचदा अशा “अपघाती” घटना एखाद्या त्रुटीमुळे घडलेल्या असतात आणि ती त्रुटी/चूक घडण्यापूर्वी सुद्धा खूप काम आणि प्रयत्न चालू असतात. लुई डगेअरने आयोडाइज्ड सिल्व्हर प्लेटवर प्रतिमा तयार करायचे प्रयत्न बरीच वर्षं केले होते. १८३० मध्ये  अशाच एका अपयशी प्रयोगानंतर त्याने त्या प्लेटस् एका कपाटात ठेवून दिल्या. त्या कपाटात बरीच रसायनं होती. दुसरे दिवशी सकाळी त्याला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. कपाटात सांडलेल्या पाऱ्याच्या वाफांमुळे त्या प्लेटस् वर स्पष्ट प्रतिमा उमटली होती! ह्यातूनच फोटोग्राफीचा (छायाचित्रण) जन्म झाला! छायाचित्रण, प्रतिजैविके (antibiotics), पेसमेकर्स अशा कित्येक गोष्टी अशा चुकांमधून साकारल्या आहेत. ह्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे अशा घटनांकडे बघताना “चूक” म्हणून सोडून देण्याऐवजी त्यांचं व्यवस्थित निरीक्षण करण्यात आलं!  बरोबर असलेला माणूस एके ठिकाणीच थांबून राहतो. चुका मात्र आपल्याला अन्वेषण करायला भाग पाडतात. खूपच कडक शिस्तीच्या वातावरणापेक्षा जरा मोकळं, वेगवेगळ्या लोकांशी संबंध येणारं, चुकण्याची, चुकांमधून शिकण्याची आणि त्यातून नवीनच काही जोडण्या हाती लागण्याची संधी देणारं वातावरण नव्या कल्पनांसाठी जास्त पोषक असतं.

५.     कार्यांतर – कार्यांतर म्हणजे एका क्षेत्रातली कल्पना दुसऱ्या क्षेत्रात वापरली जाते. हा शब्द आधी उत्क्रांतीसाठी वापरण्यात आला. शरीराच्या तापमानाचं नियमन करण्यासाठी अस्तित्वात आलेली पक्ष्यांची पिसं नंतर उडण्यासाठी वापरली जाऊ लागली. त्यांचा नवा उपयोग सापडला, कार्य बदललं, कार्यांतर झालं. लेखकाने छापखान्याचा शोध लावणाऱ्या गटेनबर्गचं उदाहरण दिलं आहे. वाईन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राचा (प्रेसचा) गटेनबर्गने शब्द छापायला उपयोग करून घेतला. त्याने काहीतरी अभिनव कल्पना काढली नाही, तर अस्तित्वात असलेलं तंत्र नव्या गोष्टीसाठी वापरायची युक्ती त्याने शोधली. वाईनचं यंत्र आणि शब्द छापणे ह्या दोन कल्पना त्याला जोडता आल्या! संशोधकांना एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करता यावी म्हणून सुरू झालेलं इंटरनेट आता कार्यांतर होऊन खरेदीपासून शिक्षणापर्यंत सगळ्यासाठी वापरलं जाऊ लागलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी जर संबंध ठेवले, संवाद साधला तर एका क्षेत्रातल्या कल्पना दुसरीकडे वापरायला मदत होते.

६.     मंच – नवीन काही शोधण्यासाठी कोणता मंच उपलब्ध आहे, तेही महत्त्वाचं असतं. ज्या विद्यापीठांमध्ये चांगल्या प्रयोगशाळा, जिज्ञासू वृत्तीला उत्तेजन आणि तज्ज्ञ सहकारी असतात, तिथे बरंच नवनवीन संशोधन होत असतं. हर्ली, चेन आणि करीम अशा तीन तरुणांनी फक्त सहा महिन्यांमध्ये ‘युट्यूब’ तयार केलं. असं नवीन काही तयार करण्यासाठीचा मंच त्यांना मिळाला. त्यासाठी लागणारे सगळे घटक त्यांच्याकडे होते – इंटरनेट, चित्रफीत चालवू शकणारा अडोबीचा फ्लॅश प्लॅटफॉर्म आणि जावास्क्रिप्ट ही भाषा. ह्या घटकांच्या एका आगळ्यावेगळ्या मिश्रणातून सगळ्या जगावर प्रभाव पाडणारं ‘युट्यूब’ जन्माला आलं. केवळ तंत्रज्ञानातच नाही, तर निसर्गात, संस्कृतीत आणि कलेच्या क्षेत्रातही उपलब्ध मंचावर आधारित नव्या कल्पना कशा येतात, ह्याची लेखकाने बरीच उदाहरणं दिलेली आहेत. 

बऱ्याच नवीन शोधांचा आणि नव्या मार्गांचा अभ्यास करून लेखकाने असा निष्कर्ष काढला आहे, की गेल्या पाचशे वर्षांमध्ये अभिनव कल्पना शोधण्यामध्ये मोठा फरक झाला आहे. पूर्वी एकेकटा माणूस आणि मुख्यत: ज्ञान मिळवण्यासाठी शोध घेत असे. आता जास्तीत जास्त नवे शोध हे अनेक व्यक्तींनी मिळून केलेले, त्यांच्या संपर्कजालातून साकारलेले असतात. आताच्या नवकल्पनेमागे ज्ञान किंवा पैसे ह्यापैकी कुठलीही प्रेरणा असू शकते. कल्पकता जोपासताना स्पर्धा आणि सहकार्य हे दोन्ही आवश्यक असतात. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र अस्तित्वात असू शकतात. वर्षावने (rain forests), मोठी शहरे, इंटरनेट ह्या सर्व ठिकाणी स्पर्धाही असते आणि सहकार्यही असतं आणि त्यातूनच नावीन्य वाढीस लागतं. विविध लोकांच्या मोठ्या जाळ्यामध्ये वेगवेगळे अनियत (random) संपर्क होतात, कल्पनांचं आदानप्रदान होऊन अपूर्ण कल्पना सिद्धीस जातात किंवा कल्पनांचं कार्यांतर होतं, कधी फलदायी चुका होतात आणि लगतच्या शक्यता प्रत्यक्षात उतरतात. 

पुस्तकातल्या वेगवेगळ्या शोधांच्या कथा मनोरंजक तर आहेतच. शिवाय प्रोत्साहन देणाऱ्याही आहेत. ओघवत्या, चित्रदर्शी शैलीत बऱ्याच कथा, उदाहरणं सांगत एकेक सिद्धांत स्पष्ट केल्यामुळे पुस्तक वाचायला मजा येते.  


गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

कथा - दुर्बीण

आज सरांचा मुख्याध्यापक म्हणून पहिला दिवस. ह्या दिवसाची ते कित्येक वर्षं आतुरतेने वाट पाहत होते. आधीचे मुख्याध्यापक कालच निवृत्त झाले. त्यांनी शाळेसाठी काहीच धड केलं नाही आणि सरांनी काही प्रयत्न केलेलाही त्यांना आवडायचा नाही. सरांनी आज शाळेचं नवं पर्व सुरू करायचा निश्चय केला होता. त्यांनी सगळ्या शाळेसमोर भाषण करून त्यांचं स्वप्न सांगितलं, “मुलांना नुसतं लिहायवाचायला आलं, गणितं करता आली म्हणजे शिक्षण होत नाही. आपल्याला त्यांना वेगवेगळे अनुभव द्यायचे आहेत. ह्याची सुरुवात म्हणून आपण आपल्या शाळेत एक मोठी दुर्बीण आणणार आहोत. विश्वाच्या अफाट पसाऱ्याची जाणीव मुलांना झाली पाहिजे. आकाशाशी त्यांचं नातं जडलं पाहिजे. आपल्या शाळेतून खगोलतज्ज्ञ निर्माण झाले पाहिजेत.” आपल्या शाळेत असं काही होऊ शकतं, असा कधी विचारही कुणी केला नव्हता. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. विज्ञानाच्या शिक्षकांना तर भरूनच आलं.

सरांनी विज्ञानाच्या शिक्षकांना बोलावून त्यांना योजना नीट समजावून सांगितली. सरांनी स्वत:च पुढाकार घेतला होता. पुढच्या आठवड्यात शहरातून दुर्बिणवाला माणूस सरांना भेटायला आला.  तो म्हणाला, “शाळेसाठी म्हणजे तुम्हांला डोब्सोनियनच चांगला राहील.” विज्ञानाच्या शिक्षकांना नक्की काही समजलं नाही. पण सर ‘हो’ म्हणाले म्हणून त्यांनीही मान डोलावली. मग पुढे तो म्हणाला, ह्यात आरसा असणार, न्यूटोनियन.” विज्ञानाचे शिक्षक म्हणाले, “आणि भिंग?” दुर्बिणवाला म्हणाला, “नाही, ह्यात भिंग नसतं.” सर म्हणाले, “बरोबर! काय किंमत म्हणता?”

तरी तीस-पस्तीस हजारापर्यंत जाईल बघा आठ इंचाला.”

“आठ इंच?”

“आता शाळेला म्हणजे आठ इंचाचा तरी लागेलच की आरसा! आणि शहरातून आणून पोचवायचा खर्च वेगळा.”

“इथं वरती गच्चीवर लावून द्याल ना?”

“निरीक्षणाच्या वेळी फक्त वर न्यायची दुर्बीण. एरव्ही पावसापाण्यात खराब होणार, सर.”

“वरती नेऊन लावायची?”

“हो, तुम्हांला काय बघायचं तशी लावायची, जुळवून घ्यायची. आकाशाचा नकाशा वाचायचा आणि तशी लावायची. म्हणजे मग ग्रह, तारे बघता येतील.”

दुर्बिणवाल्याला “आमचं नक्की काय ठरेल ते कळवू” असं म्हणून सरांनी पाठवून दिलं. सर आणि विज्ञानशिक्षक विचारात पडले. एवढा खर्च करायचा आणि हा माणूस आठ इंचाचंच आणणार म्हणतो काहीतरी. सरांनी विज्ञानशिक्षकांना आकाशाच्या नकाशाबद्दल विचारलं, तर त्यांनी कधी पाहिलाही नव्हता तो. कसा वाचायचा आणि काय करायचं, हे कुणालाच माहिती नव्हतं.  एवढा खर्च करून आकाशातलं काय कसं बघायचं, हा प्रश्नच होता. नुसत्या शाळेतच नाही, तर अख्ख्या गावात बातमी पसरली होती, की इथे दुर्बीण बसणार, मुलांना आकाश निरीक्षणाची संधी मिळणार. उत्सुकता वाढली होती, अपेक्षा उंचावलेल्या होत्या. नव्या सरांबद्दल आदर पसरला होता. आता मागे सरकायला जागाच नव्हती.

सरांनी ठरवलं, की आता वेगळा विचार केला पाहिजे. आपल्याला नवनवीन सुचत राहिलं पाहिजे. शाळेच्या गच्चीवर एक अडगळीची मोठी खोली होती. सरांनी ती एकदम रिकामी आणि स्वच्छ करून घेतली. रविवारी सुट्टीच्या दिवशी चित्रकलेचे शिक्षक आणि विज्ञानशिक्षक असं दोघांनी मिळून सरांच्या मार्गदर्शनाखाली गच्चीवरच्या खोलीत मोठ्या कामगिरीला सुरुवात केली. विज्ञानाच्या पुस्तकातली ग्रह-ताऱ्यांची चित्रं बघायची आणि रात्री अंधारात चमकणाऱ्या रंगाने छतावर, भिंतीवर रंगवायची. दिवसा हा रंग पांढरटच दिसतो. त्यामुळे पांढऱ्या छतावर आणि भिंतीवर रंगवलेलं काही कुणाला कळायची शक्यता नव्हती. तीन वेगवेगळे चमकणारे रंग होते. अंधारात हिरवट दिसणारा एक, दुसरा गुलाबी-लालसर आणि तिसरा केशरी दिसणारा. गुरूला आणि शनीला केशरी घेतला, मंगळाला गुलाबीसर. आता शुक्राला हिरवट करावं का? पुस्तकात तर पांढरा होता. मग शुक्र रद्दच केला. हिरव्या रंगाचं काय करायचं? त्याचा छान शेपटीवाला धूमकेतू काढला. चंद्राच्या तर कला असतात. रोज वेगळा दिसतो. मग कुठला आकार काढायचा? सर म्हणाले, “चंद्र डोळ्याला दिसतच असतो चांगला. तो दुर्बिणीतून दाखवायची गरज नाही.”  थोडीफार नक्षत्रंही काढली. नक्षत्रांचे रंग काही कुठे पुस्तकात नव्हते. कुठलाही कुठेही देऊन रंग वापरून टाकले.

रंगकाम झाल्यावर एक सुतार बोलवून ह्या गच्चीवरच्या खोलीच्या दाराला गोल भोक पाडून घेतलं. चांगली हातभर लांबीची, दीड इंच व्यासाची नळी त्यात बसवून घेतली. भोकापेक्षा नळी लहान होती. नळीच्या बाजूला कड्या लावून ती भोकात अशी बसवली, की खाली-वर, उजवी-डावीकडे फिरवता येईल. सुताराला जास्तीचे पैसे दिले, जरा दमही भरला. शाळेची इथून पुढची सगळी दुरुस्तीची कामं त्यालाच मिळणार होती. त्यामुळे तसाही तो ह्याबद्दल कुठे काही बोलणार नव्हता. आता रोज रात्री थोड्या थोड्या मुलांना ग्रह-तारे दाखवायचं ठरलं. दिवसा गच्चीला कुलुप असणार होतं. त्यांची ही गावातली शाळा सातवीपर्यंतच होती. मोठी मुलं असती तर उगीच डोकेदुखी झाली असती.

मुलांना आकाश दाखवायची जबाबदारी विज्ञानाच्या शिक्षकांवर होती. पहिल्या रात्री त्यांच्या पोटात चांगलंच डचमळायला लागलं. सरांनी त्यांना धीर दिला. आत्मविश्वासाने पुढे जायला सांगितलं. आकाश बघायसाठी गच्चीवर पूर्ण अंधार केला होता. जिन्यातले दिवे पण बंद ठेवले होते. विज्ञानाचे शिक्षक वरती नळी धरून थांबले होते. चित्रकलेचे शिक्षक खालून एकावेळी दोन दोन मुलांना वर पाठवायचे. विज्ञानशिक्षक नळीतून दाखवायचे, “हा गुरू बघा. बाजूला त्याचे छोटे छोटे चंद्र.” मुलांचं बघून झालं, की ते नळीत बघून नळी शनीकडे फिरवायचे आणि पुन्हा मुलांना दाखवायचे, “कडी दिसली का शनीची?” मुलं पण भारावून गेली होती, धन्य झाली होती! अमावस्या होती. अंधार पांघरून सगळं सुरळीत पार पडलं.

पहिले दोन दिवस नीट पार पडल्यावर विज्ञानाच्या शिक्षकांच्या जिवात जीव आला. ते जरा मोकळेपणाने फिरू लागले. तिसऱ्या दिवशी मुलांना आकाश दाखवत असताना अचानक वारा सुटला. विजा चमकू लागल्या. ढग दाटून आले. नळीतून मंगळ बघताना एक आगाऊ कार्टं म्हणालं, “विजा चमकताना पण मंगळ छान दिसतोय की!” दुसरा म्हणाला, “आता भिजेल का हो दुर्बीण?” तसं विज्ञानशिक्षकाने एकेकाला खालीच हाकललं. “पाऊस येणारे. बास झालं आता”, म्हणून दटावलं.

दुसऱ्या दिवशी मुलांची आपापसांत चर्चा सुरू झाली.  कुणी म्हटलं, “दुर्बीण गच्चीवरच्या खोलीला लावली आहे.” कुणी म्हटलं, “खोलीला लावून आकाश दिसेल का?” अजून एक म्हणाला, “वीज चमकली, तेव्हा मी नक्की पाहिलं. खोलीच्या दाराला दुर्बीण लावलीय.” एक हुशार मुलगा म्हणाला, “ती नळी खोलीच्या छताला जोडलेली असणार. छताला भिंग बसवलंय.” मग गावातही ह्यावर चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी अफवा पसरल्या, की “सरांनी खोलीच्या आकाराची मोठीच्या मोठी दुर्बीण आणलीय.” काही म्हणाले, “आपल्या राज्यातली सगळ्यात मोठी दुर्बीण आपल्याच गावात आहे.” कुणी कुणी म्हणू लागले, की “पुढच्या महिन्यात चंद्रग्रहण आहे. दुर्बिणीतून बघायला पाहिजे.” काही पालक विचारू लागले, “आम्हांला मिळेल का दुर्बीण बघायला?” विज्ञानशिक्षकांना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत धडधडू लागलं. सारखा घाम फुटू लागला. सरांची देहबोलीच अशी असायची, की त्यांना कुणी काही विचारणार नव्हतं. एक प्रकारचा दरारा आणि आदर वाटायचा लोकांना. पण विज्ञानशिक्षकांकडे वेगवेगळे प्रश्न आणि चौकश्या येऊ लागल्या.  

शेवटी हिंमत करून विज्ञानशिक्षक मुख्याध्यापकांकडे गेले आणि आपली सगळी चिंता आणि परिस्थिती त्यांना सांगितली. सरांना नेहमी काही नवीन सुचत असे. त्यांनी ह्याच्यावर तोडगा काढायचं ठरवलं. गच्चीवरचं आकाशनिरीक्षण ताबडतोब थांबवलं आणि पुढच्याच आठवड्यात सर्व पालक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठा समारंभ ठेवला. गावातल्या मूर्तिकाराकडून तातडीने चांगली तीन फूट उंचीची देखणी मूर्ती तयार करून घेतली. ती सरांच्या कार्यालयाबाहेरच्या चार फुटाच्या कठड्यावर ठेवली. त्यामुळे अनावरण झाल्यावर सात फुटासारखा परिणाम साधणार होता. मूर्तीच्या मागच्या भिंतीवर मोठमोठे रंगीबेरंगी माहितीपूर्ण तक्ते लावून घेतले. समारंभाच्या दिवशी सगळ्या पालक-शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सरांनी मूर्तीवरचं कापड काढून त्या सुंदर मूर्तीचं अनावरण केलं, मूर्तीला हार घातला आणि भाषण सुरू केलं, “ही मूर्ती पाहिलीत? हे आर्यभट्ट आहेत. थोर गणिती आणि खगोलशास्त्राचे प्रणेते. १५०० वर्षांपूर्वी त्यांनी खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहिला. त्यांना त्या काळी पृथ्वी गोल असल्याचं समजलं होतं. त्यांनी पृथ्वीला कदंबाच्या फुलासारखी म्हटलं होतं!” मुलं आणि पालक थक्क झाले! इतक्या थोर शास्त्रज्ञाबद्दल त्यांना आधी काहीच माहिती नव्हती. सर म्हणाले, “ह्या मूर्तीमागे तुम्हांला पुष्कळ तक्ते बघायला मिळतील. ती चित्रं बघा, माहिती वाचा आणि समजून घ्या. नुसते ग्रह-तारेच नाही तर आकाशगंगा, कृष्णविवर असं सगळं शिका. आपली दुर्बीण परवाच्या वादळी पावसामुळे बिघडली आहे. पण काही हरकत नाही. त्यामुळे आपलं शिक्षण थांबत नसतं. वाचनालयात पुस्तकं आहेत. शाळेत उत्तम शिक्षक आहेत. आपल्याला आर्यभट्टाचा समृद्ध वारसा पुढे चालवायचा आहे. आपल्यामध्येही त्याचा अंश आहे.” टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. सरांचे शब्द ऐकून मुलांचं दुरापास्त वाटणारं उज्ज्वल भविष्य डोळ्यांसमोर आवाक्यात दिसू लागलं, दुर्बिणीतून पाहिल्यासारखं.

  

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

कथा - स्वातंत्र्य

 गडद निळ्या रंगाचा चुणीदार, गाठ मारून तिरकी बांधलेली पातळ झिरझिरीत ओढणी, तेल लावून, विंचरून घातलेली लांबसडक वेणी अशी सुमीची ठेंगणी अशक्त सावळी मूर्ती फाटक उघडून लगबगीने आत शिरली. तीन किलोमीटर चालत आली होती ती. तिने तिच्या जुनाट पर्समधून किल्ली काढली आणि ऑफिसचं कुलुप उघडलं. सगळे लोक यायच्या आधी दोन मजली बंगला झाडून-पुसून स्वच्छ करायचा होता. आज साहेबही येणार होते. म्हणजे बाल्कनीही स्वच्छ धुवून काढायची होती. इतर लोक येण्यापूर्वी ती मस्त मोकळेपणाने वावरत असे आणि धडाधड कामं करत असे. पण एकेकजण येऊ लागला, की मानेवर खडा ठेवल्यासारखी मान गोठून जायची. सगळ्या हालचालींना एक अवघडलेपण यायचं. कुणी काही विचारलं, तरी आवाज खोल जायचा. शक्यतो कमीच बोलायची ती.

तिच्याशी आणि साहेबांच्या ड्रायव्हरशी सोडून सगळे एकमेकांशी जास्ती करून इंग्रजीतच बोलायचे. पांढऱ्या चकाकत्या लॅपटॉपवर इंग्रजीत लिहायचे. जास्ती करून मुली आणि बायकाच होत्या ऑफिसात. तीनच पुरुष होते. कुठली तरी संस्था आहे म्हणे. सामाजिक काम करतात. खूप चांगलं काम आहे म्हणतात. पण इंग्रजीतलं तिला काय कळणार? तशी सुमी शाळेत गेली होती. आठवीपर्यंत शाळाही शिकली. मग त्याच्यानंतर खूप अवघड परीक्षा, नापासही करायचे. नंतर सुटलीच शाळा. सुमी शाळेत मराठी लिहाय-वाचायला शिकली. पण सगळ्यात जास्त काही शिकली असेल, तर आपल्याला डोकंच कमीय आणि आपण उगी कुठे डोकं लावू नये, हेच शिकली. आता हे प्रशस्थ ऑफिसच बघा ना. ती लिहाय-वाचायला शिकल्याचा इथे काही फायदा आहे का? सगळे हुशार, डोकंवाले लोक फाडफाड इंग्रजी बोलून इथे काम करतात.

सुमीची झाडलोट झाली होती. ऑफिस आता गजबजलं होतं. तिने सगळ्यांसाठी चहा केला. नंतर कपबश्या धुतल्या. तेवढ्यात साहेबांची भव्य रथासारखी जीप फाटकातून आत आली. पन्नाशीला आलेले साहेब खाली उतरले. त्यांना छाती पुढे काढून चालायची सवय होती. वयामुळे पोटही पुढे यायचंच. आत येताना ते आजुबाजूला कटाक्ष टाकत. कुंड्या नीट ठेवल्या आहेत ना? झाडांना पाणी नीट घातलं जातंय ना? त्यांच्या मागेच लगबगीने त्यांच्या लॅपटॉपची पिशवी घेऊन ड्रायव्हर आला. एखाद्या सम्राटाच्या ऐटीत ते सभोवती नजर टाकत वरती त्यांच्या खोलीत गेले. ते आले, की सुमीला खूपच दडपण जाणवायचं. तिने ड्रायव्हरला विचारलं, “चहा ठेवू का साहेबांचा?” त्याने निरोप आणला, की “आज कॉफी कर.”

साहेब नेहमी इथे नसायचे. कधी परदेशी जायचे, कधी दिल्ली, कधी बंगलोर असे फिरत असायचे. दौऱ्यावरून आल्यावर मात्र सलग आठ-पंधरा दिवस इथेच असायचे. आले, की सगळ्यांना गोळा करून तासन् तास बैठकी घ्यायचे. मग दर दोन तासाला सगळ्यांना चहा, कधी काही खायला असं चालायचं. साहेब तसे गप्पिष्ट होते. परदेशी कुठे जाऊन आले, दिल्लीत कुणाला भेटले असे सगळे किस्से बैठकीत रंगवून सांगायचे. कधी कधी त्यांच्या लाडक्या कुत्र्याच्या गंमतीजमती सांगायचे. सांगता सांगता सभोवार नजर फिरवून आपल्याला दाद मिळतेय ना, असं बघायचे आणि मनातल्या मनात सुखावून जायचे. साहेब तसे रसिक होते. आपल्या विनोदावर कोण फिदा होऊन हसतेय, कुणाच्या गालाला खळी पडतेय आणि कोण लटक्या आश्चर्याने डोळे विस्फारतीय हे सगळं ते भिरभिरत्या नजरेने पटापट टिपायचे. कुणाचे सुशोभित काळेभोर डोळे, कुणाचं केसाच्या बटांशी खेळणं तर कुणाचे बिनबाह्यांचे रसरशीत दंड. साहेबांना एखाद्या पुष्पवाटिकेत बसल्यासारखं वाटायचं.

सुमी कॉफी करून वरती घेऊन गेली. साहेबांनी लॅपटॉपवरची नजर क्षणभर वर केली आणि मानेनेच “ठीक” असं सांगितलं. त्यांच्या नजरेत एक थंड नापसंती होती. टेबलवर कॉफी ठेवून सुमी खाली आली. तिला त्यांच्या नजरेतला तो भाव आवडायचा नाही. साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. ड्रायव्हर सुट्टीवर होता आणि साहेबांना भेटायला ऑफिसमध्ये कुणीतरी येणार होतं. येणाऱ्या माणसाला नीट पत्ता सापडेना. साहेबांनी सुमीला सांगितलं, की गल्लीच्या तोंडाशी जा आणि पाहुण्यांना घेऊन ये. सुमी निघाली तसं साहेबांनी फोनवर पाहुण्यांना सांगितलं, “एक मुलगी पाठवतोय तुम्हांला घ्यायला. लाल कपडे, किडकिडीत, साडे चार फुटी.” आणि तिच्याकडे बघून विनोद केल्यासारखे हसले होते. सुमी चांगली पाच फुटाच्या जवळ होती. लहान चणीची होती. कुणी कुणी तिला शाळकरी समजायचे. पण साडे चार फुटी नक्कीच नव्हती आणि समजा असती जरी, तरी त्यात साहेबांनी असं हसण्यासारखं काय होतं? तेव्हापासून तिला साहेबांची नजर जास्त चांगली समजायला लागली होती. “तू कुणी नाहीस”, असं त्यात स्पष्ट लिहिलेलं असायचं.

पण सुमी तिला काय वाटतं, ते कधी कुणाकडे बोलली नाही. तिला आठवलं, की आजी नेहमी म्हणायची, “पोरीची जात म्हणजे दिसायला बरी असावी लागते बाई!” ज्या दिवशी सुमीला सगळ्यात जास्त वेदना झाल्या होत्या, तेव्हाही आजी हेच आणि एवढंच म्हणाली होती. सुमी दहा-अकरा वर्षांची होती तेव्हाची गोष्ट. तिला आइस्क्रीम खावंसं खूप वाटत होतं म्हणून तिने आईचे पैसे घेतले आणि गुपचूप बाहेर जाऊन आइस्क्रीम खाऊन आली. आईच्या लक्षात आलं तेव्हा सुमी म्हणाली, “मी नाही घेतले पैसे.” आता मात्र तिच्या आईचा पारा चांगलाच चढला. आई स्वयंपाक करत होती. तिने सांडशी उचलली. विस्तवात चांगली लाललाल तापवली आणि संतापाने सुमीला म्हणाली, “बोलशील पुन्हा खोटं? याच जिभेने खोटं बोललीस ना?” आणि तिने सुमीच्या जिभेला सरळ चटकाच दिला. सुमी जिवाच्या आकांताने किंचाळली. ऊर फुटून रडली. कित्येक दिवस तिला नीट जेवता-खाताही येत नव्हतं. तेव्हा तिची आजी तिच्या आईला रागवली, “काही अक्कल आहे का तुला? सांडशी चुकून ओठाला लागली असती, गालाला लागली असती, डाग राहिला असता म्हंजे? पोरीची जात ती. बरी दिसायला नको?”

सुमीची दिवसभराची कामं संपली होती. दिवसभर खूप गरम होत होतं, घामाच्या धारा लागत होत्या. संध्याकाळ होऊ लागली तसं आभाळ भरून येऊ लागलं. एकेकजण घाईघाईने घरी जाऊ लागला, लागली. पण साहेब कुठल्यातरी मोठ्या फोनकॉलवर तास झाला तरी बोलत होते. त्यामुळे ऑफिस बंद करता येईना. ती अडकून पडली. जोराचा वारा सुटला. एकदम अंधारून आलं. विजा कडकडायला लागल्या आणि वळवाचा रपरप पाऊस सुरू झाला. तिच्याकडे छत्री पण नव्हती. आता इथे किती वेळ अडकून पडणार कुणास ठाऊक, असं तिला झालं. तेवढ्यात साहेब काम संपवून वरून खाली उतरले. ड्रायव्हर म्हणाला, “साहेब, जाता जाता हिला घरी सोडून जाऊ या का? खूप दूर नाही, तीन किलोमीटरच जायचं.” साहेबांनी मानेनेच त्याला परवानगी दिली आणि उपकृत केलं. साहेब तसे मोठ्या मनाचेच होते.

भल्या थोरल्या जीपमध्ये सुमी एकदम अवघडूनच बसली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं. जीप पुढे जाताना बाजूने चालणाऱ्यांच्या अंगावर फर्रफर्र फवारे उडत होते. आता तर दिवेही गेले होते. पाच मिनिटांत सुमीची वस्ती आली सुद्धा. गटारं पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत होती. ड्रायव्हर म्हणाला, “इथं सोडू का? ह्याच्यापुढं गाडी जाणार नाही.” सुमीसाठी हेच खूप होतं. ती घाईघाईने उतरली. तिने तिची झिरझिरीत ओढणी काही उपयोग नसताना उगीचच डोक्यावर घेतली आणि गाडी वळवेपर्यंत ती त्या फाटक्या वस्तीत दिसेनाशी सुद्धा झाली. साहेबांनी ही वस्ती पाहिली आणि त्या अंधुक प्रकाशातही त्यांना ओळख पटली. ते वीस-बावीस वर्षांपूर्वी इथेच आले होते.

तेव्हा ते साहेब नव्हते. तो तरुण जयंता होता, अमेरिकेत शिकून नुकताच परत आला होता. त्याला सूट-बूट घालून कुठल्या कंपनीत नोकरी करण्याची अजिबात इच्छा नव्हती. जे मनापासून वाटतं, जे बदलायलाच हवं तेच तो करणार होता. त्याचे काही जुने मित्र-मैत्रिणी मानवाधिकारासाठी झटत होते. असाच एकदा एका मैत्रिणीचा फोन आला “तू येतोस का” म्हणून आणि जयंता ह्या वस्तीत आला होता. कोण बरं तरुण होता त्या वस्तीतला? महादू. महादूला कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी सरकारी लोक घेऊन चालले होते. त्याला पैसे देणार होते आणि त्याची बायको रडत होती. जयंता हिरिरीने मध्ये पडला. जयंता कमालीचा स्वातंत्र्यवादी होता. महादूला एक मूल होतं. त्यानंतर शस्त्रक्रिया करायची की नाही, हा निर्णय घेण्याचं त्याला आणि त्याच्या बायकोला पूर्ण स्वातंत्र्य हवं. महादूसारखा दारुडा माणूस पैशासाठी तयार होतो, तेव्हा त्याने खरंच स्वतंत्रपणे मनापासून निर्णय घेतला असं म्हणता येईल का? “लोकशिक्षण करा, समजावून सांगा आणि निर्णय त्या माणसावर सोडा”; असं त्याचं स्पष्ट मत होतं. जयंताने त्या सरकारी लोकांना हाकलून लावलं. महादूच्या बायकोने येऊन जयंताचे पायच धरले होते! साहेबांना हे सगळं आठवून त्यांच्या डोळ्यांत अभिमान तरळू लागला. कुणी आई-बाप व्हायचं आणि कुणी नाही, ह्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायलाच पाहिजे. महादू अजून तिथेच राहत असेल का? सुमीला तो माहीत असेल का? साहेबांची जीप त्यांच्या घरी पोहोचली.

महादूला नंतर वर्षभरातच सुमी झाली. ती तीन वर्षांची असतानाच तो दारू पिऊन पिऊन रक्ताच्या उलट्या करून मेला. सुमीच्या वाट्याला कुठलंच स्वातंत्र्य आलं नाही. व्यवस्थित खायला मिळण्याचं स्वातंत्र्य. शरीराची धड वाढ होण्याचं स्वातंत्र्य. धुण्या-भांड्याची कामं न करता “नुसतं” शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य. आईची मारहाण न सोसता लहान मूल असण्याचं स्वातंत्र्य. जयंताचे प्रतिष्ठित स्वातंत्र्यवादी साहेब झाले आणि सुमीची नगण्य चिपाड मोलकरीण.