शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

'मराठी शब्द' - आपल्या भाषेचा समूह : मराठी संवर्धनाचा एक आगळावेगळा प्रयत्न

 https://www.inmarathi.com/114895/marathi-bhasha-din-marathi-samvardhan/?fbclid=IwAR2sRwekT7s0nda3JXsFYJEYsi4KrWLV4E8l3yOMq2P8qBu_LGqvntjfVoA

inmarathi ने  मराठी भाषा दिवसानिमित्त प्रकाशित केलेला लेख इथे देत आहे.

WhatsApp Forwards साठी  'ढकलगप्पा' असा छान शब्द आहे आणि itinerary सारख्या लांबलचक अवघड शब्दाला मराठीत 'प्रवासरेखा' असा अर्थपूर्ण शब्द आहे, हे तुम्हांला माहीत आहे का?  असे  नवे आणि  अर्थपूर्ण शब्द "मराठी शब्द" नावाच्या फेसबुक  समूहात शोधले आहेत. हा समूह ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार ह्यांच्या भाषणातून प्रेरणा घेऊन सुरू झाला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी २७ फेब्रुवारीला  जागतिक मराठी दिवसानिमित्त माझ्या एका मैत्रिणीने, वृषालीने, मला महेश एलकुंचवारांचं मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल काळजी व्यक्त करणारं  अतिशय प्रभावी भाषण पाठवलं होतं. सध्याची जी मराठी आहे, विशेषतः शहरी लोकांची मराठी, तिच्याइतकी बाधित भाषा कुणी बोलत नसेल, अशी खंत ते व्यक्त करतात. खेड्यामध्ये मात्र सहज प्रतिशब्द तयार होतात असं सांगून त्यांनी मोबाईल फोनला कानशा किंवा  लाऊड स्पीकरला बोंबल्या अशी उदाहरणं दिली आहेत. आपण आत्मपरीक्षण करणार, मराठी टिकवण्यासाठी काही करणार, की  "गेली  मराठी तरी हरकत नाही" असं  म्हणणार असा प्रश्न ते विचारतात.माझ्या मैत्रिणीने हे भाषण माझ्यासारखंच इतरही बऱ्याच लोकांना पाठवलं होतं. पण काही मोजके लोक सोडले तर बहुतेकांनी ते भाषण ऐकायचीही तसदी घेतली नव्हती.  तिला वाईट वाटलं आणि म्हणून  गेल्या वर्षी तिने २७ फेब्रुवारीला त्या  भाषणाचा गोषवारा लिहून बऱ्याच लोकांना पाठवला. हा जास्त लोकांपर्यंत  पोहोचला. पण ह्याच्याहून जास्त काहीतरी करायला हवं; असं एक भाषण आणि एक लेख एवढ्यावरच थांबता येणार नाही, असं मला त्या  दिवशी  प्रकर्षाने वाटलं आणि म्हणून  जागतिक मराठी दिवसाच्या दुसऱ्याच  दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीला 'मराठी शब्द' हा फेसबुक  समूह सुरू केला.    

 

मराठी ही नीट मराठीत बोलली जावी. जिथे मराठी शब्द आहेत, ते शोधले आणि वापरले जावे. जिथे इंग्लिश शब्द रुळलेले नाहीत, तिथे प्रतिशब्द शोधावे हा ह्या समूहाचा मुख्य आणि प्राथमिक उद्देश आहे. "हा माझा personal choice आहे", असं बोलणाऱ्या माणसाला it's आणि my असे दोन इंग्लिश शब्द शिकवावे आणि "इंग्लिश तरी धड बोल" असं मनापासून सांगावंसं वाटतं. खोलीला room म्हणू नये, इतका साधा विचार आहे. त्यातून पुढे जाऊन "मला ह्याचं exposure नव्हतं" किंवा "तुझी itinerary पाठव" अशी वाक्यं व्यवस्थित मराठीतही म्हणता येतील आणि ती कशी म्हणावी ह्यासाठी, ह्यावर चर्चा करण्यासाठी हा समूह आहे. एखादी संकल्पना किंवा वस्तूसाठी मराठीत उत्तम शब्द आहे. पण त्या मराठी शब्दाचा वापर न होता इंग्लिश शब्द वापरला जात आहे. उदा. crux म्हणजे  कळीचा मुद्दा. पण crux हा शब्द बस, टेबल इतका खोलवर रुळलेला नाही. बरेच जण 'कळीचा मुद्दा' वापरतातही. पण crux वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. हे असंच चालू राहिलं तर काही वर्षांनंतर "कळीचा मुद्दा" नामशेष होऊन, crux हा पूर्णपणे रुळेल. मराठी भाषा फक्त कर्ता आणि क्रियापदापुरतीच राहू नये असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी हा समूह आहे. ह्या समूहात जनसहयोगातून, चर्चा करून खूप चांगले मराठी शब्द आम्हांला मिळाले आहेत.  उदाहरणच द्यायचं, तर  crowd sourcing ला 'जनसहयोग' किंवा default option ला 'आपसूक पर्याय' असे समर्पक शब्द इथे शिकायला मिळाले. ह्याखेरीज आपली मराठी शब्दसंपत्ती वाढावी म्हणून वळेसर, खेंगट यांसारखे वापर कमी झालेले शब्द आणि विलोल, दु:खकालिंदी यांसारख्या सुंदर शब्दांवरही चर्चा होते. शब्दांच्या छटा आणि बारकावे ह्यावरही चर्चा होतात. "प्रत्यय आणि प्रचीती ह्यात काय फरक आहे" किंवा "आमंत्रण आणि निमंत्रणात काय फरक आहे" अशासारख्या चर्चांमुळे आमची सगळ्यांची मराठी भाषेची समज वाढू लागली आहे.   

 

ह्या  समूहात मराठीच्या सर्व बोली भाषांचा, सर्व शैलींचा, प्रमाण भाषेचा, फार्सी शब्दांचा आणि संस्कृतचाही आदर राखला जातो.ज्यांना ग्रामीण मराठी शब्द आवडतात, त्यांनी ते वापरावे. ज्यांना संस्कृतप्रचुर शब्द आवडतात, त्यांनी ते वापरावे, अशी भूमिका आहे. जात्यावरच्या ओव्या, लोकगीतं, किशोर कुमार, बेगम अख्तरच्या गजला आणि कुमारांची मैफल ह्या सगळ्यात संगीत असतं. काहींना सगळीकडचं संगीत भावतं. तर काही एकच टोक धरून बसतात. भाषेचंही तसंच आहे. एकच टोक धरून बसणाऱ्या लोकांनी दुसऱ्याच्या आवडीला कमी लेखू नये, हे धोरण आम्ही कटाक्षाने पाळतो.  

 

 बऱ्याच प्रतिशब्दांची चर्चा होते. ते यादीतही घेतले जातात. पण यादी बरेच लोक बघत नाहीत. प्रत्यक्षात वापरतात का, हा अजूनच वेगळा मुद्दा आहे. जास्तीत जास्त मराठी शब्द "वापरणे" हे महत्त्वाचं आहे. म्हणून 'भाषांतर' आणि 'गोधडी' असे दोन नवे उपक्रमही सुरू केलेले आहेत. दर आठवड्याला भाषांतरासाठी दोन परिच्छेद दिले जातात.  त्यावर टिप्पण्या म्हणून वेगवेगळे  सदस्य  त्याचं भाषांतर किंवा  भावानुवाद लिहितात.  त्यातून काही नवे शब्द हाती लागतात, तर काही विस्मरणात गेलेले वर येतात. शिवाय मराठीच्या वेगवेगळ्या शैली वापरूनही भाषांतर करता येतं. ज्यांना ग्रामीण ढंगात सांगायचं आहे, ते तसं लिहू शकतात. ह्या महिन्यातच सुरू केलेल्या 'गोधडी' उपक्रमात कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला चांगली चालना मिळत आहे. ह्यात एकमेकांशी संबंध नसलेले ८-९ शब्द दिले जातात. त्यांत ह्या समूहाने  शोधलेल्या  एक-दोन नव्या शब्दांचाही समावेश असतो. ह्यातले किमान ५ किंवा जास्त शब्द वापरून, आटोपशीर व अर्थपूर्ण (जणू एखाद्या लेखाचा भाग वा एखाद्या नाटकातील संवाद) असा परिच्छेद लिहायचा असतो. नुसताच वाक्यात उपयोग नाही, तर सर्व वाक्यांचा एकमेकांशी ताळमेळ घालून 'छोटा' परिच्छेद लिहिण्यात एक वेगळंच आव्हान आणि मजा येते. पहिल्या गोधडीसाठी गणगोत, अवडंबर, पायपोस, वेषसंकेत, हडबडणे, उत्कट, कर्बठसा, भन्नाट, डबघाईला येणे, अजागळ असे शब्द दिले होते. ते एकमेकांना जोडून लोकांनी खूप वेगवेगळ्या छान छान गोधड्या तयार केल्या. 

 

कुठल्याही चांगल्या कामात "ह्याने काय साध्य होणार" किंवा "काहीच साध्य कसं होणार नाही" असं  म्हणणारी माणसं भेटली नाहीत, तर खरं म्हणजे चुकल्या-चुकल्यासारखं होतं. त्यामुळे इथेही असले प्रश्न अधूनमधून येतच असतात. ह्या समूहातून काय साध्य होणार?  सध्या सोप्या मराठी शब्दांऐवजीही इंग्लिश शब्द सर्रास वापरले जाताना दिसतात. 'अडचण'ऐवजी प्रॉब्लेम, 'अवलंबून' म्हणण्याऐवजी डिपेंड, वगैरे.  तर दुसरीकडे आम्ही प्रतिशब्द शोधून वापरायचा प्रयत्न करत आहोत. कदाचित परिणाम ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी असेल. नक्की कुणीच सांगू शकणार नाही. पण प्रतिशब्द आणि मराठी शब्द ह्यांच्यावर विचार आणि चर्चा सुरू केल्यापासून आमच्यासारख्या अनेकांचा मराठीचा, मराठी शब्दांचा वापर वाढला आहे. आता पुन्हा मराठीत विचार करण्याची सवय लागली आहे. तयार केलेल्या प्रतिशब्दांपैकी काही शब्द रुळतील किंवा नाहीतही रुळणार; पण त्या ‘व्यायामा’मुळे मराठी वापरण्याची ‘प्रकृती’ सुधारत असेल, तर ते खूप मोलाचं आहे. ह्या समूहात काही लेखक, पत्रकार आणि  भाषांतरकारही सहभागी झालेले आहेत. त्यांच्याद्वारे हे शब्द आणि 'बाधित' नसलेली मराठी सर्वदूर पोहोचावी, अशी आशा नक्कीच आहे.

 

माझी मित्रमंडळी हर्षद, अमित आणि स्मिता हे सगळे ह्यात मनापासून कार्यरत झाले आणि ह्या समूहाला एक वर्ष कधी पूर्ण झालं, ते समजलंही नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं योगदान हे  आमच्या अनेक  व्युत्पन्न, उत्साही, कल्पक आणि मराठीप्रेमी सदस्यांचं आहे. मराठीचे इतके वेगवेगळे पैलू, बारकावे आणि  भन्नाट शब्द ही मंडळी रोज घेऊन येतात, की त्यामुळे रोजच्या नेमस्त जगण्याला एक वेगळीच रंगत आली आहे. आमच्या ह्या आनंदात ज्यांना ज्यांना  सहभागी व्हायचं असेल त्यांनी 'मराठी शब्द'   समूहात अवश्य यावे.



गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

रेंज – विविधांगी असण्याचं महत्त्व सांगणारं पुस्तक

डेव्हिड एपस्टाईन ह्यांचं “Range  - Why Generalists Triumph in a Specialist World”  नावाचं, विविधांगी असण्याचं महत्त्व विशद करणारं पुस्तक नुकतंच वाचलं. आपण किंवा आपल्या मुलांनी कशात तरी “विशेषज्ञ” व्हावं, अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते आणि त्यासाठी अगदी लहानपणापासून एखाद्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करून मोठं यश मिळवता येईल, असं त्यांना वाटत असतं. एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणारी व्यक्ती वेगवेगळी इतर कौशल्ये शिकल्यामुळे (शिकून सुद्धा नव्हे!) कशी यशस्वी होते, हे स्पष्ट करणं हा ह्या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच रॉजर फेडरर आणि टायगर वूड्स ह्या दोन महान खेळाडूंच्या जडणघडणीबद्दल लिहिलं आहे. अगदी दोन वर्षांचा असतानाच टायगर वूड्सला गोल्फचा चेंडू मारता आला आणि चार वर्षांचा असल्यापासून त्याने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गोल्फचं प्रशिक्षण सुरू केलं. त्याउलट फेडरर मात्र लहानपणी बरेच वेगवेगळे खेळ खेळला – फूटबॉल, बास्केटबॉल, पोहणे, टेबल टेनिस आणि मग हळूहळू त्याचा टेनिसकडे ओढा वाढत गेला आणि शेवटी त्याने तो खेळ निवडला. वेगवेगळ्या खेळांमधून त्याची अंगयष्टी तयार झाली, हाता-डोळ्यांचा समन्वय साधला आणि तो एक अष्टपैलू खेळाडू झाला.

बुद्धिबळातल्या जगप्रसिद्ध पोल्गार भगिनी किंवा टायगर वूड्स अशी शक्य तितक्या लवकर सुरुवात करून यशाचं शिखर गाठणारी काही उदाहरणं असली, तरी विरुद्ध बाजूची उदाहरणं जास्त आहेत, असं लेखकाचं म्हणणं आहे. त्याखेरीज, आयुष्यातली बरीच क्षेत्रं ही बुद्धिबळ किंवा गोल्फइतकी नियमबद्ध आणि सरळ नसतात. त्यात जास्त घटक, जास्त गुंतागुंत, संदिग्धता आणि बऱ्याच अज्ञात गोष्टी असतात. अशा वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रातली कौशल्ये नुसती उपयोगीच नाही, तर आवश्यकही ठरतात. लेखकाने वेगवेगळी वाद्यं शिकलेल्या संगीतकारांची, वादकांची उदाहरणं दिली आहेत. व्हॅन गॉगसारखा अतिशय महान कलावंत आयुष्यात किती उशिरा चित्रकलेकडे वळला, ते सांगितलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या पाहिजेत, प्रयोग करायला हवे आणि त्यातून आपला मार्ग गवसला पाहिजे. लेखकाने ह्याला “चाचपणीचा काळ” (sampling period) म्हटलं आहे. “लवकरात लवकर आपण क्षेत्र ठरवून, आधी सुरुवात करून सगळ्यांच्या पुढे जाऊ” अशा विचारसरणीपेक्षा चाचपणीचा काळ कसा महत्त्वाचा आहे, ह्याची लेखकाने पुष्कळ उदाहरणं दिली आहेत.

पुस्तकात ज्ञानाची ‘खोली’ की ‘रुंदी’ ह्यावर बरीच उदाहरणं देऊन विस्तृत चर्चा केली आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांची जी भाकितं साफ चुकली, त्याचा आढावा घेतला आहे. शीतयुद्धाच्या काळातल्या ज्या तज्ज्ञांची विश्लेषणं आणि भाकितं चुकली, त्याबद्दल अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं, की विशेषज्ञ जितका जास्त प्रसिद्ध आणि माध्यमांत दिसणारा, तितके त्याचे अंदाज जास्त चुकले होते. फक्त स्वत:च्याच क्षेत्रावर झापडबंद पद्धतीने लक्ष केंद्रित केल्याचे आणि आजूबाजूच्या इतर गोष्टींचं अवधान न राखल्याचे हे परिणाम आहेत, असं लेखकाला वाटतं. स्वत:च्या मतांबद्दल ह्या तज्ज्ञांना पुष्टीग्रह (confirmation bias) असतो आणि म्हणून त्यांना त्यांची गृहीतं, समजुती तपासता-बदलता येत नाहीत.

ह्याउलट म्हणजे नोबेलविजेत्या कोणत्या शास्त्रज्ञांना स्वत:च्या विषयाखेरीज इतर विषयांचं ज्ञान होतं, ह्याबद्दलही विस्ताराने सांगितलं आहे. आधी वैद्यकशास्त्र शिकून नंतर रसायनशास्त्र शिकलेल्या नोबेलविजेत्याला दोन्ही ज्ञानाची सांगड घातल्याचा कसा फायदा झाला, ते आपल्याला समजतं. चौकटीबाहेरचा विचार करणं, एका विषयातून आलेली समज, दृष्टी, कल्पना दुसऱ्या विषयात वापरणं हे माणसाचं खरं वैशिष्ट्य आहे. अशा गोष्टींमध्ये संगणकापेक्षा माणसाचीच गरज भासणार आहे.

“आतला दृष्टिकोन” आणि “बाहेरचा दृष्टिकोन” ह्या विषयावरही चर्चा केली आहे. एका औषध कंपनीच्या संशोधकांना जे प्रश्न सुटले नाहीत, ते जेव्हा संकेतस्थळावर देऊन त्यासाठी बक्षीस ठेवलं, तेव्हा जनसहभागातून (crowd sourcing) बाहेरच्या लोकांनी बरीच चांगली आणि कल्पक उत्तरं सुचवली. एखाद्या क्षेत्राशी संबंध नसलेल्या लोकांना बाहेरचा, वेगळा दृष्टिकोन असल्यामुळे त्या क्षेत्रातले प्रश्न कसे सुटतात, ह्याची वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. सखोल ज्ञान असल्याने काही गोष्टी जास्त समजतात, पण त्या पूर्वग्रहामुळे इतर बऱ्याच गोष्टी नजरेस पडत नाहीत.

पुस्तकात बारा प्रकरणं असली तरी फिरून फिरून वेगवेगळी उदाहरणं देऊन त्याच गोष्टी परत परत सांगितल्यासारखं वाटतं. वेगवेगळ्या गोष्टी करून बघाव्या, प्रयोग करत रहावे, झापडबंद विचार करू नये, गृहीतकं तपासत जावी, चुका करणं महत्त्वाचं असतं, आपलं काम आणि आपली नीट जोडी जमत नसेल तर वेगळ्या क्षेत्रात जाता येतं आणि तसं करण्यात फायदाच असतो इ. मुद्दे वेगवेगळ्या वळणांनी येत राहतात. उदाहरणं पुष्कळ असली, तरी हा सगळा वानगीचा पुरावा आहे. प्रत्यक्ष ठोस आकडेवारी त्यामानाने खूपच कमी दिलेली आहे. बऱ्याचदा असं वाटतं, की ह्यातल्या काही उदाहरणांचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीनेही करता येऊ शकतं. मात्र माझ्यासारख्या पन्नाशीच्या तोंडावर उभ्या असलेल्या व्यक्तीला “ह्यानंतरही वेगळं काही करता येईल आणि त्यात आधीच्या अनुभवांचा फायदाच होईल” अशी प्रेरणा किंवा दिलासा देण्याचं कामही हे पुस्तक नक्की करतं. 


शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

कथा - पत्रांचे तुकडे

 ताईला लिहिलेल्या पत्रांचे भाग/तुकडे


जुलै १९९०

प्रिय ताई,

आता कॉलेजमध्ये माझं चांगलं बस्तान बसलं आहे. माझ्या रूममेटशी मैत्री झाली आहे. तिची एक गंमत आहे. ती स्वत:बद्दल “मी आली, मी गेली, मी जेवली” असं म्हणते. मी तिला ह्याबद्दल विचारलं, तर म्हणाली, “आमच्याकडे असंच म्हणतात.” सुरुवातीला कानाला फार खटकायचं. पण आता सवय झाली आहे.


ऑगस्ट १९९१

प्रिय ताई,

यंदा अभ्यास मला आवडायला लागलाय. शिकवणारे सगळे चांगले आहेत. मला सगळ्यांसमोर इंग्लिशमध्ये शंका कशी विचारायची ते सुचत नाही. मग मी लेक्चर संपल्यावर जाऊन मराठीत शंका विचारते. बहुतेक सगळे माझ्याशी मराठीत बोलतात. आमचे एक धाडधाड इंग्लिश बोलणारे सर मराठी मात्र “आनी-पानी” प्रकारचं बोलतात! मला आश्चर्यच वाटलं. इतकं शिकलेला, प्राध्यापकी करणारा माणूस मराठी शुद्ध कसं काय नाही बोलू शकत? पण शिकवतात मात्र एकदम छान! सगळ्या संकल्पना अगदी स्पष्ट होतात. आम्ही इथे संकल्पना किंवा कन्सेप्ट वगैरे म्हणत नाही, फंडाज् म्हणतो!!


जानेवारी १९९२

प्रिय ताई,

तुला मी मागे अमोलबद्दल सांगितलेलं आठवतंय का? माझा मित्र, खूप वाचणारा आणि सामाजिक उपक्रमांत भाग घेणारा? तर परवा त्याचा आणि माझा कडाक्याचा वाद झाला. तो मला म्हणाला, “तू बोलतेस ते मराठी बरोबर, शुद्ध आणि बाकीच्यांचं अशुद्ध असं तू कोण ठरवणार? लोकशाहीच्या तत्त्वानुसार मतदान घेतलं तर तुझंच चूक निघेल.” आता भाषा, व्याकरण ही काय मतदान करायची गोष्ट आहे का? प्रत्येक गोष्टीचं मानक ठरलेलं असतं. ‘कोण म्हणतं टक्का दिला’ अशा नावाचं एक नाटक आहे म्हणे. त्यातला नायक हा आपण ज्याला अशुद्ध, खेडवळ म्हणतो तसं बोलत असतो आणि नंतर तो एकदा आपल्यासारखं शुद्ध बोलून दाखवतो आणि म्हणतो, “मला असं बोलायला येतं. पण मी तुमच्यासारखं का बोलू? मी माझीच भाषा बोलणार.” मला काही हे पटलं नाही. प्रत्येकाने स्वत:चीच भाषा बोलायची म्हणजे काय? भाषा काय एकेकट्याची असते का? अशाने मराठीचा काही दर्जाच उरणार नाही.


एप्रिल १९९२

प्रिय ताई,

परीक्षेपूर्वीचं हे माझं शेवटचं पत्र. आता ह्यानंतर सुट्टीत प्रत्यक्षच भेटू. १० दिवसांपूर्वी मी आणि अनु शनिवार-रविवार एका पाड्यावर जाऊन आलो. अमोल आणि त्याची मित्रमंडळी आळीपाळीने शनि-रवि तिथे जाऊन लहान मुलांना शिकवत असतात. ह्यावेळी अमोलबरोबर आम्ही पण गेलो. खूप मजा आली. पहिल्यांदाच त्या मुलांना भेटतेय, असं अजिबात वाटलं नाही. मुलांना शिकवताना माझ्या लक्षात आलं, की त्यांना श, ष आणि क्ष तला फरक शिकवणं जवळ जवळ अशक्य आहे. का एवढी क्लिष्ट केलीय आपण भाषा? आपण भाषा सोपी करायला हवी, शिकणं आनंददायी नको का? आणि ‘श’-‘ष’ उच्चार असे किती लोकांना माहिती आहेत? शिवाय ऱ्हस्व, दीर्घ म्हणजे मुलांचा छळ आहे नुसता. अमोल म्हणतो, की एकच वेलांटी आणि एकच उकार भाषेत ठेवला पाहिजे – फक्त दीर्घ. दीर्घ नाही, दुसरा! सोपं करायला हवं. पटतंय ना तुला? 


ऑक्टोबर १९९२

प्रिय ताई,

तू लिहिलंस तसं झालंय खरं माझं. माझ्या बोलण्यात हिंदी-इंग्लिश शब्दांचा खूप भरणा झालाय आजकाल. त्यामुळे पत्रातही तसं येत असेल. आजकाल अशा मिक्स लँग्वेजचाच जमाना आला आहे. त्याला हिंग्लिश (हिंदी-इंग्लिश) आणि इंगराठी (इंग्लिश-मराठी) म्हणतात. मला आता इतक्या वेगवेगळ्या ठिकाणचे मित्र-मैत्रिणी आहेत, की आम्ही असं सगळं मिक्स करूनच बोलतो! मला वाटतं, की आपण पूर्वी भाषेच्या बाबतीत उगीचच खूप सोवळे होतो. कधी ‘त्रास झाला’ म्हणायचं, कधी ‘वाईट वाटलं’ म्हणायचं आणि कधी ‘दु:ख झालं’ म्हणायचं असा कीस काढत बसायचो. आपल्या घरात आणि शाळेत अशा प्रत्येक शब्दाचा किती बाऊ करायचे ना? आता मला वाटतं, की भाषा हे शेवटी विचार, भावना पोचवण्याचं साधन आहे. तुम्हांला मुद्दा कळला, भावना पोचल्या की झालं! कशाला तो शब्दच्छल. तुला बहुतेक पटणार नाही – पण चलता है गं ताई! 


जानेवारी १९९३

प्रिय ताई,

माझं सध्या खूप बिझी झालंय सगळं. सेमिनार, प्रोजेक्ट, कॅम्पस इंटरव्ह्यू. मी इंग्लिश बोलायची सॉलिड प्रॅक्टिस करतेय आणि जमायला लागलंय बरंचसं. पण आता त्यामुळं मराठीची लेव्हल घसरतेय... रागावू नकोस बरं का मला! तुझ्या सहवासात आले की सुधारेल परत.


सप्टेंबर १९९४

प्रिय ताई,

ऑफिसमध्ये माझं चांगलं चाललंय. खूप शिकायला मिळतंय. नवीन टेक्नॉलॉजी आहे म्हणून अभ्यासही करत असते. माझा बॉस साउथ इंडियन आहे आणि क्लायंट अमेरिकेचा. त्यामुळे इंग्लिश बोलावंच लागतं. आता चांगला कॉन्फिडन्स वाढलाय. मी आता get आणि gate च्या उच्चारातला फरक शिकलेय. आपल्याकडे दोन्हीला “गेट” असं असल्यामुळे मला हे पूर्वी माहितीच नव्हतं. बॉस म्हणतो, “तू इंग्लिशमध्ये विचार करायला शिकलं पाहिजेस.” तो म्हणतो, की नीट लिहिता-बोलता येणं is must! It really matters. नुसत्या टेक्नॉलॉजीने भागत नसतं. बाकी मजेत.


नोव्हेंबर १९९८

प्रिय ताई,

मी आता इथे छान सेटल झालीय. मला अमेरिकन ॲक्सेंट समजायला फारसा त्रास झाला नाही. पण काही काही वेगळे उच्चार शिकायला मिळाले. उदा. Newark ला नूअर्क म्हणतात आणि मेक्सिकन पदार्थांचे उच्चार तर अजूनच विचित्र “J” ला ह म्हणतात. मी हे सगळं नवीन नवीन शिकतेय आणि मला गंमत वाटतेय. सुरुवातीलाच आनंदने अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यामुळे बाहेर कुठे माझी पंचाईत नाही झाली. तो मला म्हणतो, की तू टीव्ही बघत जा म्हणजे इथल्या phrases पटापट शिकशील. नवरा स्वत:च टीव्ही बघ म्हणत असेल तर काय, मी नुसती लोळतेय सोफ्यावर...


मे १९९९

प्रिय ताई,

आता इथे जॉब मिळालाय मला. तो छान चाललाय. मला खूप आवडतंय इथे. ऑफिसमध्ये माझी एका अमेरिकन मुलीशी मैत्री झालीय. तिचं नाव मार्सी. तिला आपल्या कल्चरमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी पण तिला अमेरिकेबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल बरंच काही विचारत असते. तिने मला v आणि w च्या उच्चारातला फरक सांगितला. w म्हणताना ओठाचा चंबू करत असतात म्हणे! आपल्याला माहितीच नसतं ना – इतकं ग्रेट वाटलं मला समजल्यावर! आता मी what, who, whistle, window अशी प्रॅक्टिस करत असते. मला असं नवीन नवीन शिकायला खूप आवडतं. असे बारकावे समजले, की you start appreciating the language!


जून २०००

प्रिय ताई,

तुझ्याकडे ईमेल आलीय, हे किती छान. आता मी तुला अगदी frequently लिहू शकते ना! इथे आल्यापासून मला खूप जास्त शिस्त लागलीय, especially job मध्ये. म्हणजे टेक्नॉलॉजी तर मला तिकडे पण येत होती. पण प्रत्येक गोष्टीत खोलात जाऊन बघायचं, बारीकसारीक विचार करायचा हे माझं सुधारलं आहे – attention to details. साधं बोलताना पण माझ्यात खूप सुधारणा झाली आहे. मी आता खूप particular झालेय. उदा. मी पूर्वी today night म्हणायचे. आता tonight म्हणते. परवा मी एकाला सांगत होते, की मराठी मिडियमची आहे. तर त्याला खोटंच वाटलं!


जुलै २००२

प्रिय ताई,

आपल्याला भेटून वर्ष होऊन गेलं हे खरंच वाटत नाही. अजून दोन महिन्यांत आई-बाबा येतीलच इथे. माझी तब्येत एकदम मस्त. मी walk ला जाते, balanced diet घेते. सध्या पुस्तक वाचतेय What to Expect  When You Are Expecting. इतकं छान सगळं डिटेलमध्ये दिलं आहे! परवा मी बाळ-बाळंतीण रिलेटेड मराठी शब्द आठवून बघत होते...बाळंतविडा, पाचवी आणि काय काय गं? मला तर आठवतच नाही. तूच कळव ना.. आणि हो, तुझ्या येऊ घातलेल्या भाच्चीसाठी नावही सुचव :) :)


डिसेंबर २००४

प्रिय ताई,

आम्ही मजेत. गार्गी आता खूप बडबड करते. तिच्या नावातला ‘र’ ती अमेरिकन ॲक्सेंटमध्ये म्हणत असल्यामुळे आम्हांला ते खूप फनी वाटतं :) :) . आई, बाबा. दूध आणि पाणी असे चार शब्द सोडले तर बाकी सगळं इंग्लिशमध्येच बोलते. दिवसभर daycare ला असल्यामुळे इंग्लिशच तिची भाषा झाली आहे. काही मित्र-मैत्रिणी मला विचारतात, की तिची मदर टंग कोणती? मी म्हणते, “तिच्या मदरची टंग मराठी असली तरी तिची टंग इंग्लिशच आहे.” :D :D आता लवकरच भेटू! मग तू प्रत्यक्ष बघशील तिला!


सप्टेंबर २००८

प्रिय ताई,

गार्गी आता पहिलीत गेली. तिला शाळा खूप आवडते. इथे भाषा शिकवण्यावर खूप जास्त भर आहे. खूप वेळ देतात, मेहनत घेतात. गार्गी खूप वाचते. वयाच्या मानाने तिची vocab पण खूप जास्त आहे. तिला नवे नवे शब्द, त्यांचे बारकावे शिकायला खूप आवडतं आणि तिची teacher ते शिकवते सुद्धा. Looks like she is a language person – अगदी तिच्या मावशीसारखी!! :) :)


नोव्हेंबर २०१२

प्रिय ताई,

गार्गीला इंग्लिश भाषेचं आणि वाचनाचं किती वेड आहे, ते तुला माहितीच आहे. पण तिला भाषा शिकवतात सुद्धा इतकी छान! म्हणजे भाषेचं सौदर्य, त्यातली समृद्धी या सगळ्याची या वयातच ओळख करून देतात! तिची टीचर सांगते, की सगळीकडे good, nice, happy असं नाही म्हणायचं. वेगवेगळे शब्द वापरा. Use adventurous vocabulary. तिला happy, excited, full of joy, elated, blissful अशा सगळ्याच्या वेगवेगळ्या छटा आत्ताच माहिती झाल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्या छटेनुसार काय वापरायचं ते ती शिकतेय आणि तिला मनापासून आनंद होतोय. ते शब्द, त्या छटा ह्या सगळ्यात तिच्या विचारात पण किती clarity आली आहे! तिला शब्दांचा नाद, वैविध्य असं सगळं जाणवू लागलं आहे. She is in love with the language. She is just like you ताई! मला वाटतं, आता कुठे मला तू समजू लागली आहेस. तुझी ती मराठीवरून होणारी चिडचिड मला उमजू लागली आहे. आता तू काय म्हणतेस, ते मला मोकळेपणाने बघता येतंय. फोन करेनच. बोलू सविस्तर. पण म्हटलं, तुझं बरोबर आहे असं वाटलं तर लगेच सांगून टाकावं :) :) बोलूच!

 


बुधवार, २ डिसेंबर, २०२०

अनोळखी लोकांशी बोलताना - माल्कम ग्लॅडवेल यांचं नवं पुस्तक

माल्कम ग्लॅडवेल हे नावाजलेले लेखक आहेत. वेगवेगळ्या घटना, प्रयोग आणि संशोधनांचा आढावा घेऊन, त्यात काही सामायिक सूत्र शोधून त्याआधारे काही नवीन विचार, विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. गेल्या सुमारे पंधरा वर्षांमध्ये मी त्यांची The Tipping Point, Blink, Outliers आणि David and Goliath अशी चार पुस्तकं वाचली होती. नुकतंच त्यांचं नवीन आलेलं Talking to Strangers – What We Should Know about the People We Don’t Know हे पुस्तक वाचलं. रोचक पद्धतीने एकेक घटना किंवा प्रयोग खुलवत नेणं आणि त्यातून विषयाचा एकेक पैलू उलगडत नेणं, ही खास ग्लॅडवेल शैली इथेही दिसते.

सर्वसाधारणपणे आपल्याला असं वाटतं, की एखाद्याला प्रत्यक्ष बघून, भेटून आपल्याला त्या माणसाचा बऱ्यापैकी अंदाज येतो. समोरच्या अनोळखी माणसाचा चेहरा, डोळे बघून, त्याच्याशी बोलून तो माणूस कसा आहे त्याची साधारण कल्पना आपल्याला येते, असं आपण समजतो. म्हणून तर प्रत्यक्ष मुलाखत घेऊन आपण कोणाला नोकरी द्यायची किंवा कोणाला कामाला ठेवायचं, ते ठरवतो. आपल्याकडे तर वर्षानुवर्षं असं एक-दोन भेटीत लोक लग्नही ठरवत/करत आले आहेत. आपलं हे गृहितक कसं चुकीचं आहे आणि अनोळखी माणूस समजून घेणं किती गुंतागुंतीचं आणि अवघड काम आहे, ह्याबद्दल ग्लॅडवेल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे.

ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलेन (आणि इतर अधिकारी) हिटलरला प्रत्यक्ष भेटूनही त्यांना त्याच्या मनसुब्याचा अजिबात अंदाज आला नाही. त्याउलट, जे नेते हिटलरला कधीच भेटले नव्हते, त्यांना मात्र त्याच्या हेतूबद्दल (रास्त) शंका होत्या. दुसरं उदाहरण म्हणजे अमेरिकी गुप्तचर खात्यातले (CIA) काही हेर प्रत्यक्षात क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोसाठी काम करत होते आणि त्याचा अमेरिकन अधिकाऱ्यांना अनेक वर्षं थांगपत्ता लागला नाही. अशी बरीच उदाहरणं ग्लॅडवेल देतात. आरोपीशी बोलून, त्याच्याकडे बघून ‘जामीन द्यायचा की नाही’ हा निर्णय घेणाऱ्या न्यायाधीशांपेक्षा आरोपीला न बघणारा संगणकाचा प्रोग्राम कुणाला जामीन द्यायला हरकत नाही, हा निर्णय जास्त चांगल्या प्रकारे घेतो; हे सिद्ध झालेलं आहे. ग्लॅडवेल आपल्यासमोर मुख्यत: दोन प्रश्न उभे करतात. पहिला म्हणजे, ‘समोरचा माणूस आपल्या तोंडावर साफ खोटं बोलतो आहे, हे आपल्याला कसं कळत नाही?’ आणि दुसरा प्रश्न असा, की ‘काही वेळेला एखाद्या माणसाला न भेटलेल्या लोकांना भेटलेल्यांपेक्षा त्याचा चांगला आडाखा कसा काय बांधता येतो?’. वेगवेगळी उदाहरणं आणि संशोधनाच्या आधारे पुस्तकात ह्या प्रश्नांचा धांडोळा घेतलेला आहे.

आपसूक खरं वाटणे – एका प्रयोगात काही तरुणांची चाचणी परीक्षा घेतली. ह्या परीक्षेत मुद्दाम पर्यवेक्षक मध्येच बाहेर गेला आणि प्रयोगासाठी आधीच नेमलेल्या एका तरुणाने “आपण उत्तरं बघू” असं इतरांना सुचवलं. काहींनी बघितली, काहींनी नाही. परीक्षेनंतर “तुम्ही कॉपी केली का” अशा मुलाखती घेऊन त्या मुलाखतींचं चित्रण केलं. मुलाखतीत काही लोक खरं बोलले आणि काही खोटं. ह्या चित्रफिती बघून किती लोकांना मुलाखतीतला तरुण खरं बोलतो का खोटं हे समजतं, त्याचा अभ्यास केला. फक्त ५४% वेळा लोकांना समोरचा खरं बोलतो का खोटं, ते ओळखू आलं. हे म्हणजे अनियत (random) तर्कापेक्षा थोडंसंच जास्त आहे. पण त्यात गंमत अशी आहे, की खरं बोलणारा माणूस “खरं बोलतो” हे लोकांना ५०% हून खूप जास्त वेळा समजतं. पण खोटं बोलणारा “खोटं बोलतो आहे” हे मात्र ३०% हूनही कमी वेळा ओळखायला येतं. ह्याचं मुख्य कारण म्हणजे समोरचा खरं बोलतो, असं आपल्याला आपसूकच वाटतं. जोपर्यंत शंका घेण्यासारखं काही वेगळं वाटत नाही, तोपर्यंत “माणूस खरंच बोलतो आहे” असं आपण धरून चालतो. शंका आल्यावरही आधी आपला संशयाचा फायदा देण्याकडे कल असतो. पुरेशा शंका आल्यावर, शंकांचा एक विशिष्ट टप्पा (threshold) पार केल्यावरच आपल्याला समोरचा खोटं बोलतो आहे, असं वाटतं. पोलिस, न्यायालय अशा खात्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही खोटं बोलणारा सहज ओळखता येत नाही. “आपसूक खरं वाटणे” ह्या मनुष्यस्वभावामुळे काही फसगती होतात, काही धोके निर्माण होतात. पण परस्परांवर विश्वास नसेल, प्रत्येक बाबतीत संशय येत असेल तर समाज चालूच शकणार नाही, माणूस काही घडवूच शकणार नाही. म्हणून आपला स्वभाव असा झालेला आहे.

पारदर्शकतेचा अभाव – आपल्याला जेव्हा एखादा माणूस माहिती नसतो, तेव्हा आपण त्याचे हावभाव, देहबोली आणि त्याच्या वागण्यावरून त्याच्याबद्दल आपलं मत बनवतो. आपण असं मानून चालतो, की माणसाच्या मनात जे आहे त्याचं प्रतिबिंब त्याच्या हावभावात दिसतं. थोडक्यात म्हणजे, माणसाचा चेहरा आणि देहबोली पारदर्शक आहेत, असं आपल्याला वाटतं आणि इथेच मोठी गफलत होते.

सर्जिओ हारिलो नावाच्या एका मानववंशशास्त्रज्ञाने वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला, की वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्याच हावभावांचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. उदा. आठ्या घातलेल्या माणसाचा फोटो बघून बहुतेक स्पॅनिश लोक त्याला “रागावलेला” म्हणाले. तर प्रशांत महासागरातल्या ट्रोब्रिअंड नावाच्या बेटावरच्या बऱ्याच लोकांना तो “घाबरलेला” वाटला. स्मितहास्य असलेला फोटो सर्व स्पॅनिश लोकांना आनंदी वाटला. ट्रोब्रिअंड बेटावर मात्र फक्त ५८% लोकांना तो आनंदी वाटला. एकाच संस्कृतीत सुद्धा आपल्याला एकमेकांचे जसे हावभाव अपेक्षित असतात, तसे प्रत्यक्षात बऱ्याचदा दिसत नाहीत. आतल्या भावना आणि बाहेरचे हावभाव जेव्हा जुळतात, तेव्हा तिथे पारदर्शकता असते असं लेखकाने म्हटलं आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी हे जुळत नाही, पारदर्शकतेचा अभाव असतो. त्यामुळे चेहरा बघून माणूस समजत नाही.

जोडी जुळणे – माणसाचं वागणं हे त्याची परिस्थिती, आजुबाजूचं वातावरण ह्यावर अवलंबून असतं. ते विचारात न घेता माणसाला सुटं बघता येत नाही. त्याच्या वागण्याची त्याच्या वातावरणाशी जोडी जुळलेली असते. ही जोडी बदलली म्हणजेच परिस्थिती/वातावरण बदललं, तर त्याचं वागणंही बदलतं. हे लक्षात न आल्यामुळेही दुसऱ्याला ओळखण्यात, समजून घेण्यात आपण चूक करतो.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये घराघरांत स्वयंपाकासाठी पाईपने जो गॅस येत असे, तो विषारी असायचा. त्या काळी आत्महत्या करणारे बरेच लोक (जवळ जवळ ४४%) हा गॅस वापरून आत्महत्या करत असत. साठच्या दशकापासून त्यांनी हळूहळू हा गॅस बदलून त्या जागी नैसर्गिक वायू (फारसा विषारी नसलेला) द्यायला सुरू केला. १९७६ सालापर्यंत सर्व ठिकाणी हा बदल करून झाला. ह्या काळात आत्महत्यांचं प्रमाण पण कमी कमी होत गेलं. कमी झालेली आकडेवारी ही गॅस वापरून आत्महत्या करणाऱ्या लोकांची होती. म्हणजेच ज्यांना आत्महत्या करायची होती, पण घरात विषारी गॅस उपलब्ध नव्हता; त्यांनी आत्महत्येसाठी दुसरा मार्ग शोधला नाही. कॅलिफोर्नियातल्या गोल्डन गेट पुलावरून उडी मारून खूप लोक आत्महत्या करतात. एका अभ्यासात असं दिसून आलं, की त्या पुलावरून उडी मारताना थांबवलेल्या ५१५ लोकांपैकी फक्त २५ लोकांनी (५% हूनही कमी) नंतर दुसऱ्या मार्गाने स्वत:चं आयुष्य संपवलं. आत्महत्येची सुद्धा कशाशी तरी सांगड घातलेली असते, जोडी जुळलेली असते. ती काढून घेतली, तर आत्महत्या टाळली जाऊ शकते. माणसाच्या वागण्याची संदर्भचौकट महत्त्वाची असते.  

थोडक्यात म्हणजे, अनोळखी माणूस समजून घेताना आपसूक खरं मानल्याने आणि पारदर्शकता नसल्याने चुका होतातच. शिवाय त्या माणसाबरोबर त्याची संदर्भचौकट बघावी लागते. त्याचं जग, त्याची संस्कृती समजावी लागते. नाहीतर मोठ्या गैरसमजुती होतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की आपल्याला निसर्गतःच, अन्त:प्रेरणेने बरंच काही समजतं. पण खरं तर प्रत्यक्ष जग खूप गुंतागुंतीचं, क्लिष्ट आणि अवघड असतं. चित्रदर्शी वर्णनं, एकमेकांत गुंफलेल्या रंजक कथा आणि त्यांचं विश्लेषण करत करत ग्लॅडवेल आपल्याला त्यांचे हे सिद्धांत आणि निष्कर्ष सांगतात. पण ह्या पुस्तकात खूप काही नवीन शिकल्यासारखं वाटत नाही. पुस्तक चांगलं आहे. पण त्यांच्या खूप चांगल्या, प्रभावी पुस्तकांमध्ये हे मोडत नाही, असं वाटलं. 


सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

कथा - पाहुणे

उषाताई नेहमीप्रमाणे गजर वाजायच्या आधीच जाग्या झाल्या. ह्या वयात झोपेचं जरा अवघडच झालं होतं. दोन वाजता जाग येते, पुन्हा चार वाजता येते आणि शेवटी साडे पाचला जाग आल्यावर त्या सहाच्या गजरासाठी न थांबताच उठतात. एकटीला घर खायला उठतं. अगदी जिवावर येतं एकटीसाठी चहा करून प्यायला. पण नेमकी आता मेली झोप लागत नाही. वीणा तान्ही होती आणि पहाटेच उठून दुधासाठी रडायची, तेव्हा मात्र पापणी अगदी उचलायची नाही.

चहा पिऊन झाडांना पाणी घालून त्या रोज फिरायला जातात. घरातून बाहेर पडत राहावं लागतं, चालत राहावं लागतं. आपणच आपल्याला गुंतवून ठेवावं लागतं. चहा पिऊन त्या बाल्कनीत आल्या. वठलेली कृष्णतुळस बघून त्यांना आज पुन्हा हळहळ वाटली. तिथे नजर गेली, की पुन्हा त्यांच्या मनात तिचा निकोप गंध दरवळू लागे. पानं, मंजिऱ्या निस्तेज पांढरट पडून गळून गेल्या होत्या. पण आता तिच्या आजुबाजूला इवली इवली चार-सहा जिज्ञासू रोपं उगवून आलेली दिसत होती. उषाताईंनी हलक्या हाताने त्यांना हळुवार पाणी पाजलं आणि क्षणभर त्यांना अगदी धन्य वाटलं. त्यांच्या जिवणीची हसल्यासारखी हालचाल झाली आणि त्यांच्या ओघळू लागलेल्या सावळ्या गालाला खळी पडली.  

आज काही त्या फिरायला जाणार नव्हत्या. उद्या अमेरिकेहून नातवंडं येणार म्हणून त्यांना बरीच कामं करायची होती आणि थकवाही यायला नको होता. कालच दुकानदाराने किराणा आणून दिला होता. आज त्या थोडी तयारी करून ठेवणार होत्या. पुरण करायचं होतं, मोदकाचं सारण करायचं होतं. अशी सगळी तयारी करून त्या फ्रिजमध्ये पदार्थ ठेवून देणार होत्या. मुलं दहा दिवस इथे राहणार होती. नंतर आठ दिवस तिकडच्या आजी-आजोबांकडे आणि मग परत जाणार होती. मुलांसाठी आणि मुलांबरोबर काय काय करायचं, त्याची सारखी आखणी, उजळणी त्या मनाशी करत होत्या. त्याचे अजुनाजून तपशील ठरवत होत्या. नाश्त्याला त्यांना गोड घावन द्यायचं आणि म्हणायचं, “हा इथला पॅनकेक.” वीणाची पेटी त्यांना द्यायची आणि म्हणायचं, “हा तुमच्या आईचा हार्मोनियम. पियानोसारखा दोन हातांनी नाही, एकाच हाताने वाजवायचा बरं का! दुसरा हात मागे भात्याला.” रोज भारतीय पदार्थ खाऊन कंटाळतील म्हणून मध्येच एक दिवस पास्ता करायचा.

एका माणसाचा स्वयंपाक तो किती असणार! उषाताईंनी स्वत:साठी थालीपीठ लावलं आणि मोदकाचं सारण करायला घेतलं. दुसरीकडे पुरणाची डाळ लावली शिजायला. तेवढ्यात कामाला सविता आली. तिच्याकडून सगळं घर चकचकीत करून घेतलं त्यांनी आणि बजावलं, “आता दहा दिवस अजिबात दांडी मारू नकोस हं!” तिलाही एक थालीपीठ दिलं खायला. सविताने विचारलं, “आता किती वर्षाची झाली ओ मुलं?”

“मोठा बारा वर्षाचाय, धाकटा होईल आता दहाचा.”

“थोरला वीणाताईंसारखा दिसतो ना?”

“थोडासा दिसतो, रंग तिचा घेतलाय त्याने. दोघांमध्येही थोडाफार भास आहे तिचा”, असं म्हणता म्हणता भरून आलं त्यांना. स्वत:ला सावरत त्या म्हणाल्या, “वीणा अगदी तिच्या वडिलांसारखी दिसायची. सगळे मला म्हणायचे, की पितृमुखी मुलगी भाग्यवान असते. कसलं भाग्य आलं वाट्याला? भरल्या ताटावरून उठून निघून गेली बघ.” आता मात्र कंठ दाटून आला त्यांचा आणि डोळे भरून आले.

“शांत व्हा आजी. आता मुलांसमोर खंबीर ऱ्हायचं ना तुमाला?”

पावसाची अचानक मोठी सर येऊन लगेचच थांबावी तशा उषाताई शांत झाल्या. सविताही पुढच्या कामांना निघून गेली. वीणा म्हणजे नुसता चैतन्याचा झरा होती. कधी लाजणं माहीत नाही, कशाचा संकोच नाही. लहानपणापासून पुढे होऊन सगळ्यात भाग घेणारी. कशात कधी मागे राहणं माहीत नव्हतं. आणि इथेही अशी पुढे निघून गेली, रांग मोडून पुढे गेली! वडिलांची लाडकी होती खूप. घाईघाईने गेली त्यांना भेटायला. दीड वर्ष होऊन गेलं तरी उषाताईंना खरं वाटत नव्हतं. काही जखमा कधीच भरून येणार नसतात.

वीणाच्या आजारपणात उषाताई तिच्याकडे जाऊन राहिल्या होत्या. तिला ‘बरी होशील’, असं सांगत होत्या. पण तिसऱ्या टप्प्यावरचा कॅन्सर बरा होण्याची शक्यता फारशी नसल्याचं तिलाही माहीत असावं बहुतेक. उसनं अवसान आणून त्यांनी तिचं आणि नातवंडांचं खूप केलं आणि त्यांच्याइतकंच देवेननेही केलं. बायको-मुलांसाठी दिवसरात्र तो झटला होता.  नंतरही त्या दोन महिने तिथेच होत्या. देवेन आणि मुलांची घडी बसवत होत्या, धीराने उभ्या होत्या. मुलं त्यांना आणि देवेनला बिलगली होती. पण कुणी कितीही केलं, तरी आईची सर येते का; असं उषाताईंना राहून राहून वाटे. त्यांचा पाय निघत नव्हताच. पण त्या देशात त्यांना अजून राहताही येणार नव्हतं.

इकडे परत आल्या आणि मग मात्र त्यांचा धीर सुटला. ह्या रिकाम्या घरात कितीतरी वेळा त्या ओक्साबोक्शी रडल्या. अमेरिकेला जायच्या आधी पण त्या इथे एकट्याच राहात होत्या. पण तेव्हा हे घर जिवंत वाटायचं. आता सगळं भकास झालं, सगळी रयाच निघून गेली. वीणाच्या जन्मापासून त्यांच्या आयुष्यात खरोखरीच वीणा झंकारत होती. इतका उत्साह, इतका आनंद, इतकं समाधान त्यांनी कधी अनुभवलं नव्हतं आणि आता अचानक आयुष्यातलं संगीतच हरवलं. उषाताईंच्या डोक्यातली विचाराची घरघर कधी थांबायचीच नाही. एकच एक मूल असू नये म्हणतात, तेच बरोबर होतं का? चुकलंच होतं का आपलं? पण वीणाला खूप अभिमान होता आपले आई-वडील ‘त्या’ काळी एका मुलीवर थांबले म्हणून! आणि झालं जरी असतं तिच्या पाठीवर दुसरं मूल, तरी त्याने दु:ख कमी होणार होतं का? भळभळ थांबणार होती का? करवतीच्या दातांसारखे हे प्रश्न त्यांना चिरत राहायचे.

देवेनने त्याचा शब्द पाळला होता. वीणा जशी दर आठवड्याला व्हिडिओ कॉल करायची, तसाच तो उषाताईंची नातवंडांशी भेट घडवून आणायचा. उषाताईंकडे बोलण्यासारखं काय असणार? त्या आपल्या ‘पाऊस संपला’, ‘थंडी पडली’ असं काहीतरी सांगायच्या. मुलांचं ऐकण्यातच आनंद असायचा. मुलं काही ना काही सांगत राहायची. काढलेली चित्रं दाखव, कधी काही जादू करून दाखव, शाळेत कशी छान ग्रेड मिळाली ते सांग असं चालायचं. ह्या एका संवादासाठी आठवडा ढकलत राहायचा. सगळ्या पाकळ्या गळून गेल्या तरी कुठल्या ना कुठल्या धाग्याने जीवन तुम्हांला कसं बांधून ठेवतं!

आज दिवसभर बरीच कामं करून उषाताई जरा थकल्या होत्या. सोफ्यावर जरा वेळ शांत बसल्या तर तिथे बसल्या बसल्याच डोळा लागला. डोळे उघडले तेव्हा निळीसावळी संध्याकाळ पसरली होती. वातावरण जडशीळ झालं होतं. सगळं अंधुक अंधुक दिसत होतं. उठून त्यांनी चष्मा घातला आणि देवापुढे दिवा लावला. तुळशीपाशीही दिवा ठेवला. त्या मंद केशरी प्रकाशात तुळशीची बाळं अगदी रेखीव, नितळ दिसत होती. त्यांना नुसतं बघूनच उषाताईंचे डोळे निवले आणि मनातल्या मनात त्या “इडा-पीडा टळो” असं म्हणाल्या. आजुबाजूच्या एकेका घरात हळूहळू दिवे लागत होते. आता दोन घास पोटात ढकलायचे, आवराआवर करायची आणि लवकरच झोपायचं असं त्यांनी ठरवलं. पहाटेच त्यांची बछडी येणार होती!

अंथरुणावर पडल्या तेव्हा त्यांना झोप लागेना. नेहमीसारखा नागाचा मोठा फणा काढून चिंता समोर उभ्या राहिल्या. आजकाल हे रोजचं झालं होतं. मन पुन्हा पुन्हा म्हणायचं, की मुलांना आता इथेच ठेवून घ्यायचं. आईनंतर तितक्या तळमळीने फक्त आजीच करू शकते सगळं. ह्या वयातही जमेल. एकदा ठरवलं की हत्तीचं बळ येईल अंगात. शिवाय आपल्याकडे कामाला बायकाही मिळतात. त्यामुळे काही अवघड नाही. तिकडच्या एवढं मोठं घर नाही, तिकडे जास्त सुविधा असतात; हेही खरंच. पण आपल्याकडेही चांगलं शिक्षण मिळतं. लहान आहेत तोवर राहतील इथे, आजीच्या पंखाखाली. मग कॉलेजला जातील तिकडच्या देशात. मोठीही होतील तोवर. चाळिशीतला देवेन म्हणजे तसा तरुणच म्हणायचा. तो त्याच्या डोळ्यांनीच आयुष्याकडे बघणार. तीन-चार महिने झाले त्याला एक मैत्रीणही भेटली होती. फिलिपिनो होती कुणी. अजून लग्नाचं काही ठरलं नसलं, तरी वर्षभरात करतील, असं उषाताईंना वाटत होतं. तसं देवेनने त्यांच्यापासून काही लपवलं नव्हतं कधी. पण कोण कुठली वेगळ्या संस्कृतीची बाई येईल घरात आणि ही सोन्यासारखी मुलं अगदी बिचारी होऊन जातील! ह्याच एका चिंतेची कबुतरं रोज फिरून फिरून घिरट्या घालत होती. त्या अजून कुणाशी – मैत्रिणी-बहिणीशी - ह्यावर बोलल्या नव्हत्या. पण आता त्यांचं ठरलं, की देवेनशी बोलायचं. कसंही करून मुलांना आपल्याकडेच ठेवून घ्यायचं. “मुलं राहतील इकडे”, अशी स्वत:चीच समजूत घातली, की मग त्यांना झोप लागत असे. आजही हाच विचार पांघरून त्या झोपी जाणार होत्या.

थोडा वेळ गेला आणि उषाताईंना अस्वस्थ होऊ लागलं. छातीत अडकल्यासारखं, गुदमरल्यासारखं वाटू लागलं. आतून काहीतरी आवळल्यासारखं झालं. त्या हेलपाटत उठून बसल्या. जीव अगदी घाबराघुबरा झाला. उशाशी ठेवलेलं पाणी कसंबसं प्यायल्या आणि एक उबळ आली. घशात तिखट तिखट जाणवलं, करपट ढेकरा आल्या आणि त्यांनी हुश्श म्हटलं. पित्तच होतं साधं. थालीपीठ सोसलं नसेल बहुतेक. पण त्या पाच मिनिटांच्या प्रसंगाने त्यांना हादरवून सोडलं, खऱ्या अर्थाने जागं केलं. उषाताईंच्या लक्षात आलं, की आपला काही भरवसा नाही. आज आहे, उद्या नाही. नश्वरता अशी आतून आतून जाणवत असते तर! अचानक एखाद्या मोठ्या लाटेने थडकावं आणि सगळं धुवून स्वच्छ करावं, तसं झालं. एकदा मुलं इथं राहू लागली, की त्यांच्या स्वत:च्याच घरात पाहुणी होतील ती. उषाताईंचं काही बरंवाईट झालं, तर देवेनच्या नव्या संसारात प्रवेश करणं किती अवघड होईल मुलांना! कल्पनेने सुद्धा पीळ पडतो पोटात. आधी तिकडची रोपं आणून इथे रुजवायची आणि नंतर पुन्हा इथून तिथे हलवायची? त्यांना स्वत:चा वेडा हट्ट सोडावा लागणार होता. आता ह्या वयात समंजस स्वीकार करण्याखेरीज दुसरं काय हातात होतं? हळवेपणाचे झरे तर पाझरणारच होते, मनाविरुद्ध वाहणारच होते. पण आता ते सगळं आत वळवायचं. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाला भिजवायचं नाही. “तुमच्या तुमच्याच घरी रहा, बाळांनो! आजीकडे चार दिवस पाहुण्यासारखे या, कोडकौतुक करून घ्या आणि पुन्हा आपल्या घरी जा”, उषाताई स्वत:शीच मोठ्यांदा म्हणाल्या आणि गाढ झोपी गेल्या. निरभ्र आकाशात अष्टमीचा अर्धा चंद्र शांत तेवत राहिला.

रात्रीची गडद मखमली दुलई बाजूला सारत पहाट वर येऊ लागली होती. वातावरणात लालसर मोहिनी जाणवू लागली होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि हलका वारा. उषाताईंची लगबग सुरू होती. कधीही दार वाजेल म्हणून त्या तयारीतच होत्या आणि तसं ते वाजलंही. दार उघडलं तेव्हा समोर देवेनबरोबर दोन्ही हसतमुख गोंडस पिल्लं उभी होती. आपापलं सामान सांभाळणारी. कॉलवरती दिसतात त्यापेक्षा कितीतरी उंच आणि मोठी वाटणारी. थोरल्याचा वीणासारखाच झळाळता गोरा रंग, तशीच जिवणी, तेच हास्य. धाकट्याच्या सावळ्या लाघवी चेहऱ्यावर उठून दिसणारे वीणाचे काळेभोर बोलके डोळे. उषाताईंनी दोघांकडे डोळे भरून पाहिलं आणि झटकन त्यांना कुशीत घेतलं. त्यांच्या घशात मोठा आवंढा आला, नाकाचा शेंडा लाल झाला आणि नकळत डोळे भरून वाहू लागले. त्यांच्या घराचा कण न् कण जिवंत झाला, भारला गेला, आतून आतून उमलून आला. त्यांच्या अवघ्या घराचं फुलांनी मोहरलेलं चाफ्याचं झाड झालं.